वैभवला कशाचा तरी आनंद साजरा करायचा होता, कसला ते
तो मला आधी सांगायला तयार नव्हता. पण त्यासाठी तो मला एका प्रसिद्ध ‘कॉफी शॉप’मध्ये
घेऊन गेला.
वैभवने मला हुकूम सोडला. “साधं-सरळ वाच. तुझं
उर्दू वाचन इथं आत्ता दाखवायची गरज नाही.”
छे! मला उर्दू वाचता येत नाही. पण ‘जनरेशन नेक्स्ट’च्या
या मुलाला आमच्या पिढीची सवय माहिती आहे. हॉटेलमध्ये मेन्यू कार्ड वाचताना आधी
उजवीकडची पदार्थाची किंमत वाचायची आणि मग नेमकं काय आपल्या खिशाला परवडतंय याचा
अंदाज घ्यायचा ही माझी (आणि माझ्या पिढीतल्या अनेकांची) सवय. वैभवचे आई-बाबा माझे
मित्र आहेत. त्यामुळे लहानपणापासून अनेकदा वैभवने आम्हाला असं मेन्यू कार्ड
वाचताना पाहिलेलं आहे. हातात पैसे आले तरी ती एक प्रतिक्षिप्त क्रिया होतेच अजूनही.
वैभव आणि भवतालची ‘जनरेशन नेक्स्ट’ आमच्या या सवयीची ‘उर्दू वाचन’ म्हणून संभावना
करते.
आता वैभव मोठा झालाय, तो भरपूर पैसे कमावतो. ही नवी
पिढी त्यांच्या पगाराबद्दल बोलते तेव्हा तो महिन्याचा पगार असतो की वर्षाचा असतो
याबाबत माझा अनेकदा गोंधळ होतो. एकदा माझे एक सहकारी मला सांगत होते की ‘त्यांच्या
जावयाला वीस हजाराची वाढ मिळालीय.’ त्यावर मी ‘वा! छान!’ असं म्हटलं खरं; पण मी
बहुतेक फार प्रभावित नव्हते झाले. त्यामुळे त्यांनी लगेच सांगितलं ‘ वर्षाची नाही,
महिन्याची पगारवाढ सांगतोय मी’. माझे हे सहकारी माझ्याहून जुन्या काळातले असल्याने
‘महिन्याच्या’ पगाराबद्दल बोलले. नाहीतर आजकाल कोण मासिक उत्पन्नाबद्दल बोलतंय?
वैभवही मला लहान असला तरी आता या भरपूर पैसे कमावणा-या गटात मोडतो. पैसे भरपूर कमावत
असल्यामुळे या लोकांचा खर्चही अफाट असतो. ‘एवढे पैसे कशाला लागतात?’ या माझ्या
प्रश्नावर वैभव आणि त्याच्या वयाच्या मुला-मुलीचं एकचं उत्तर असतं – “जाऊ दे, तुला नाही
कळायचं ते!’ ते बरोबरचं असणार त्यामुळे मीही जास्त खोलात कधी जात नाही.
“काय घेणार मावशी तू?”, वैभवने अगदी मायेनं विचारलं मला.
“अरे, हे
कॉफी शॉप आहे ना? मग कॉफीचं घेणार ना, दुसरं काय?” माझ्या मते मी अत्यंत तर्कशुद्ध मत व्यक्त केलं होतं.
वैभव समंजसपणे हसला. मग मी त्याच्या
लहानपणी त्याला ज्या थाटात त्याला समजावून सांगायचे त्याच पद्धतीने म्हणाला, “अगं, असं नाही मावशी. इथं कॉफीच्या आधी खायचे पदार्थ
मिळतात, कॉफीसोबत खायचे पदार्थ मिळतात. कॉफीचे तर असंख्य प्रकार आहेत. तू फक्त सांग
तुला काय हवंय ते. आणि प्लीज, किंमत पाहून नको ठरवूस काय मागवायचं ते! मी काही आता
लहान नाही राहिलो ..मला आज पैसे खर्च करायचेत, तुझ्यासाठी खर्च करायचेत. तू उगीच
माझी मजा किरकिरी करू नकोस.”
मला वैभवची भावना समजली. पण असल्या भपकेबाज ठिकाणी
माझी आणखी एक अडचण असते. ब-याच पदार्थांची नावं वाचून मला नेमकं काहीच
कळत नाही. मागवलेला पदार्थ आवडला नाही तरी ‘ताटात काही टाकून द्यायचं नाही’ या सवयीने
संपवला जातो. पदार्थांची नावं लक्षात रहात नसल्याने मागच्या वेळी कोणता पदार्थ आवडला
नव्हता हेही लक्षात रहात नाही. त्यामुळे अशा ठिकाणी माझ्या प्रयोगशील वृत्तीला मी
गप्प बसवते. त्यातल्या त्यात ‘चीज सॅन्डविच’ मला माहिती आहे – मग मी तेच पाहिजे
म्हटलं. मी खायला इतकं स्वस्त काहीतरी निवडावं याचं वैभवला वाईट वाटलं, पण तो घेऊन
आला ते माझ्यासाठी.
आम्ही गप्पा मारत बसलो. वैभवचे आई-बाबा माझे मित्र
असले तरी वैभवचं आणि माझंही चांगलं गूळपीठ आहे. तो अनेक गोष्टी मला सांगतो, अनेक
विषयांवर आमच्या गप्पा होतात. मी ब्लॉग लिहिते, मी फेसबुक वापरते – अशा
गोष्टींमुळे वैभवला मी नव्या जगाशी जुळवून घेणारी वाटते. मी पहिल्यांदा मोबाईल वापरायला
सुरुवात केली तेव्हा काही अडचण आली की वैभवकडे मी धाव घ्यायचे. एस एम एस कसा करायचा,
ब्लू टूथ म्हणजे काय, ते कसं वापरायचं – असं काहीबाही वैभवने मला शिकवलेलं आहे.
त्यामुळे आम्हाला गप्पा मारायला विषयांची कधी वानवा नसते.
मग कॉफीची वेळ. मीही वैभवबरोबर काउंटरपाशी गेले.
तिथल्या तरुण मुलाने विचारलं, “काय घेणार?”
“कॉफी”, मी सांगितलं.
"कोणती?"
मी एक नाव सांगितलं.
"कोणती?"
मी एक नाव सांगितलं.
“साखर हवी की नको?” त्या मुलाने विचारलं.
“पाहिजे”, मी सांगितलं.
“किती?” पुढचा प्रश्न –
त्याचंही उत्तर मी दिलं.
“दूध?” आणखी एक प्रश्न.
“हो” माझं उत्तर.
“गरम का
थंड?” प्रश्न – त्याचंही उत्तर
दिलं.
“ क्रीम हवं?” प्रश्न काही संपेनात.
“अरे
बाबा, मी साधी एक कप कॉफी प्यायला इथं आलेय तर किती प्रश्न विचारशील मला?” मी हसत पण काहीशा वैतागाने त्या मुलाला म्हटलं . वैभव आणि
तो मुलगा दोघांच्याही चेह-यावर हसू होतं.
काउंटरवरच्या त्या मुलाला
माझ्या पिढीला तोंड द्यावं लागत असणार नेहमी – किंवा त्यांना प्रशिक्षण देणारी
व्यक्ती थोर असेल. कारण तो मुलगा मिस्कीलपणे मला म्हणाला, “आपल्या आवडीचं काही हवं असेल आयुष्यात तर अनेक प्रश्नांची
उत्तरं द्यावी लागतात शांतपणे आणि निर्णय करावा लागतो प्रत्येक टप्प्यावर ...”
मला त्याच्या या उत्तराचं
आश्चर्य वाटलं. तो जे काही म्हणाला त्यात तथ्यही होतंच म्हणा. पण माझ्या चेह-यावरचं
आश्चर्य पाहून त्याला राहवलं नाही. तो पुढे म्हणाला, “असं परवाच ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक त्यांच्या एका
विद्यार्थ्याला इथं सांगत होते ...” तो हसून पुढच्या ग्राहकाकडे
वळला आणि आम्ही आमच्या टेबलाकडे परतलो. वैभवने एकही प्रश्न विचारायला न लागता
त्याला काय हवं ते सांगितलं होतं आणि मिळवलंही होतं , हे माझ्या लक्षात आलं.
एक तर प्रश्न माहिती
पाहिजेत किंवा त्यांची उत्तरं देता आली पाहिजेत. नाहीतर मग नको ते वाट्याला येईल
आणि त्याचा आनंद न मिळता ते फक्त एक ओझं होईल – हे मला पटलंच! साधं कॉफी शॉपमध्येही
शिकण्यापासून सुटका नाही.
या प्रसंगानंतर काही
महिन्यांनी मी पॉन्डिचेरी आणि कन्याकुमारीला गेले. एकटीच होते मी. कन्याकुमारीला
पोचल्यावर कॅन्टीनमध्ये गेले आणि ‘कॉफी’ एवढंच सांगितलं. माझ्यासमोर मला आवडते तशी –
अगदी पहिजे तितकी साखर, दूध, पाहिजे त्या चवीची गरमागरम कॉफी समोर आली. तिचा वास, तिची
चव, तिचं रूप – सगळं अगदी माझ्या आवडीचं – मुख्य म्हणजे एकही प्रश्न मला न विचारला
जाताच! अशी कॉफी मी एक दिवस, दोन दिवस नाही तर पुढचे दहा दिवस घेत राहते. मला कॉफी
या विषयाचा काही विचार करावा लागत नाही, त्याबाबत काही निर्णय घ्यावे लागत नाहीत
(साखर किती वगैरे...). मला ज्यातून आनंद मिळतो ती कॉफी मिळवण्यासाठी मला डोकेफोड
करावी लागत नाही, धडपड करावी लागत नाही.
कॉफी शॉपमध्ये एक ग्राहक
म्हणून माझी आवडनिवड लक्षात घेऊन कॉफी बनवली जाते – निदान तसा प्रयत्न तरी असतो. पण
तिथं मला मजा येत नाही. मला हव्या त्या चवीची कॉफी तिथं मिळत नाही सहसा. इथं सगळ्यांसाठी
जी कॉफी बनते, तीच माझ्या समोर येते. इथं मला काही खास वागणूक मिळत नाही, पण
इथल्या कॉफीचा आस्वाद मी सहाही इंद्रियांनी घेऊ शकते, घेते. हो, इथं ग्लासातून
वाटीत कॉफी ओतण्याचा आवाज ऐकायलाही मजा येते!
माझ्या मनात नकळत या दोन्ही प्रसंगांची तुलना होते.
कॉफी शॉपमध्ये जे हवं त्यासाठी धडपड करावी लागत तर होती, पण जे हवं तेच हाती येईल
अशी खात्री नव्हती. दुस-या परिस्थितीत फार धडपड न करावी लागता जे पाहिजे ते मिळत
होतं. पहिली कॉफी दुसरीच्या कैक पट महाग होती (असते) हा मुद्दा फारसा महत्त्वाचा
नसला तरी दुर्लक्ष करण्यासारखाही नाही.
जगताना बरेचदा पहिली परिस्थिती आपल्या वाट्याला
येते. धडपड करायची आणि काहीतरी कमवायचं पण त्याचा आनंद, समाधान मात्र नाही. पण अनेकदा
दुसरी परिस्थितीही असते. फार काही न करता अचानक सुख, समाधान, आनंद समोर येतो.
यातली फक्त एकच परिस्थती असत नाही – साधारणपणे दोन्हीही असतात. अनुकूल वातावरण
असेल तर चांगलंचं – पण तितकसं अनुकूल नसेल तरी आपल्याला पाहिजे ते मिळवता येतचं –
प्रश्न विचारायची आणि उत्तरं शोधायची तयारी मात्र पाहिजे आपली.
मग निमित्त कॉफीचं असेल
किंवा नसेल ...
**
**