ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६
Showing posts with label दृष्टिकोन. Show all posts
Showing posts with label दृष्टिकोन. Show all posts

Tuesday, July 1, 2014

२०४. आत्ममंथन!

तो लेखक आहे. आणि चित्रकारही. त्याचं नाव भारत. (की भरत? इंग्रजी अनुवाद वाचताना नावांची ही अशी पंचाईत होते! पण बहुधा ‘भारत’ असावं!)

ब-याच दिवसांनी तो घराबाहेर पडतो तर त्याला शहर बदललेलं दिसतं. काय आहे भवताली?

आता शहराच्या हद्दीत हसायला बंदी आहे.

‘कुणालाही मदत करू नका, कारण एकदा मदत केली की लोक तुमच्या मदतीवर अवलंबून राहतात’ असं सांगणा-या मुलांसारख्या दिसणा-या मुली आहेत; मुलीच्या वेशात नोकरीचा शोध घेणारा मुलगा आहे. खरं सांगायचं तर स्त्रिया आणि पुरुष यांच्या दिसण्यातला फरक नाहीसा झाला आहे आता.

दुकानांत दिव्यांचा झगमगाट आहे, रस्त्यांवर आता माणसांना नाही तर वाहनांना प्राधान्य आहे असा नवा नियम झाला आहे. संगीतकार असण्यासाठी तुम्हाला संगीत कळायला पाहिजे अशी सक्ती नाही, खांद्यावर हस्तिदंत घेऊन संगीतकार असल्याचा आविर्भाव असला तरी पुरे. असे बदललेले हजारो नियम ज्यात कालचं ओळखीचं शहर नष्ट झालंय.

समुद्रमंथनातून तर विष निघालं होतं म्हणतात; मग या शहरमंथनातून काय बाहेर पडेल?

ज्या शहरात भारत राहतो, तिथं नेमकं काय घडतंय? कोणते बदल होताहेत? या बदलांचा शहरातल्या लोकांवर काय परिणाम होतो आहे? या सगळ्याबद्दल बोलायचा, रडायचा त्याला अधिकार का नाही? त्याच्यावर शांत बसण्याची सक्ती का केली जातेय?

पहिल्या एक दोन पानांतच कादंबरी मनाची पकड घेते. ही कादंबरी थोडी जॉर्ज ऑर्वेलच्या “१९८४” ची आठवण करून देतेय का? का यात त्याच्याच “अ‍ॅनिमल फार्म”चे पण धागे आहेत? मनात प्रश्न येत राहतात.

या कादंबरीत रुढार्थाने पात्रं नाहीत आणि पारंपारिक शैलीतली वर्णनंही नाहीत. आहेत त्या एकामागोमाग घडणा-या घटना; त्या घटनांबद्दल प्रश्न निर्माण करणारा भारत. जणू आपला सभोवताल आणि आपली जाणीव यांची ही दोन्ही प्रतीकं. काहीकाही आठवतं. वाचलेलं; पाहिलेलं; अनुभवलेलं; घुसमट करणारं; दंगली, बॉम्बस्फोट यांच्यातून तगताना हतबल करणारं – काहीतरी जे लिंपून टाकलंय आपण सगळ्यांनी, पण अविरत आपला हिस्सा असणारं! जे प्रश्न विचारतं राहतं... ते .. आपल्यामधलं एक आवर्तन..

हे शहर ‘आपल्या’ शहरासारखंच आहे – गरीब आणि श्रीमंत यांच्यासाठी वेगवेगळं; दुभंगलेलं! इथं मुखवटे विकले जाताहेत; लोक ते धारण करताहेत त्यामुळे माणसा-माणसांतील फरक नाहीसा होतोय; सगळे अनोळखी वाटताहेत. मुखवटे माणसांच्या फक्त चेह-याचा नाही तर विचारांचा ताबा घेताहेत; मुखवटा पुरवणा-यांचा तोच उद्देश आहे. एकदा मुखवटा चढला की जबाबदारी आपली वाटायला लागते, मुखवटा विकणा-या गटाने फसवलं तरी लक्षात येत नाही; कल्पना आणि वास्तव यातल्या सीमारेषा पुसट होत जातात.

लेखकाला काही प्रश्न पडतात आणि हे प्रश्न जाऊन इतरांना विचारायची जबाबदारी त्याचा शेजारी घेतो. हा शेजारी सावलीसारखा सतत लेखकाच्या सोबत आहे. पण त्याला नाव नाही. हा सतत लेखकाला वास्तवाची जाणीव करून द्यायचा प्रयत्न करतो, लेखकाला जपायचा प्रयत्न करतो आणि तरीही लेखकाचे प्रश्न बाहेर जाऊन विचारायला तयार होतो. 

तर प्रश्न असे आहेत: तुम्ही स्वत:च्या जवळ आहात की स्वत:पासून दूर? तुम्ही कुटुंबाच्या जवळ आहात की कुटुंबापासून दूर? तुम्ही शेजा-यांच्या जवळ आहात की दूर? तुम्ही रस्त्यांच्या, झाडांच्या, गल्लीच्या, भिंतीच्या, विटांच्या जवळ आहात की त्यांच्यापासून दूर आहात? जर तुम्ही जवळ असाल तर त्याने (तुम्ही स्वत:, कुटुंब, रस्ता, झाड ...) तुमच्यासाठी काय केलंय? तुम्ही त्याच्यासाठी काय केलंय?

या प्रश्नांचा शोध घेताना शेजा-याला विविध अनुभव येतात. एक स्त्री सांगते, “ मी स्वत:पासून फार दूर आहे. मी माझ्यातला दुसरा भाग कधी माझ्यातल्या पहिल्या भागाशी जोडू शकले नाही. माझ्यातल्या एका भागाला या जगाचा आणि जगण्याचा प्रचंड कंटाळा आला आहे पण दुसरा भाग मात्र जगण्याची लालसा राखून आहे. ..... इतका दुभंग घेऊन मी कशाच्या जवळ असणार आहे?”

हे वाचताना सार्त्र, काम्यू असं काहीबाही मला आठवलं असतं एरवी (आत्ता लिहिताना ते आठवले), पण वाचताना स्वत:च्या आरपार कट्यार घुसल्यागत वेदना झाली. ती क्षणिकच होती, पण खरी होती. असे प्रश्न, अशी वेदना निर्माण करणं हे या कादंबरीचं वैशिष्ट्य. वाचकाला स्वत:कडे पाहायला ही कादंबरी भाग पाडते हे या कादंबरीचं वैशिष्ट्य! यातलं काहीही अवास्तव वाटत नाही; उलट हे आपल्याभोवती घडतंय आणि आपल्याला त्याची जाणीवही नाही याचं भान ही कादंबरी जागं करते – हेही तिचं वैशिष्ट्य! ही कादंबरी आत्ममंथन करायला उद्युक्त करते – आपल्याही नकळत.

मग ती कादंबरी फक्त ६३ पानांची आहे याचं महत्त्व राहत नाही.
ती मूळ डोगरी भाषेत आहे; ही भाषा जम्मू परिसरात (आणि लगतच्या पाकिस्तानमध्ये) बोलली जाते, तिथे कुठे असलं शहरीकरण झालंय असा तार्किक प्रश्न महत्त्वाचा राहत नाही.
या कादंबरीला १९७९ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे यात नवल वाटत नाही. 

“नग्न रुख” – श्री ओ. पी. शर्मा ‘सारथि’.
इंग्लीश अनुवाद श्री शिवनाथ यांनी केला आहे: ‘चर्निंग ऑफ द सिटी’ या नावाने.
प्रकाशक आहे साहित्य अकादमी, दिल्ली.
किंमत? १९९१ मध्ये मी विकत घेतलेल्या प्रतीची किंमत फक्त दहा रुपये आहे.


(१९९१ नंतर आजच मी ही कादंबरी पुन्हा वाचली.)

Monday, April 15, 2013

१६३. विवेकानंदांचा वेदान्त विचार: भाग १०. व्यावहारिक वेदान्त

भाग ९ 

विवेकानंद हे मुळात एक लोकशिक्षक असल्याने तात्त्विक चर्चेत, केवळ पारलौकिकाविषयीच्या शब्दच्छलात त्यांना अजिबात रस नव्हता हे आपण यापूर्वीच्या प्रकरणात पाहिले आहेच. पण नीट पहिले तर असे दिसते की वास्तवात मात्र त्यांनी वेदान्ताचाच प्रसार केला आहे. 'प्रत्येक जीव अव्यक्त ब्रह्म आहे हेच स्वामीजींच्या गीताचे ध्रुवपद आहे.

वेदान्त तत्त्वज्ञान म्हणून उच्च असेलही; पण वेदान्ताच्या शिकवणुकीमुळे (त्याबाबतच्या आपल्या समजामुळे) आपल्यापुढे अनेक व्यावहारिक प्रश्न निर्माण होतात. सगळेच जर ब्रह्म असतील तर मग चांगले-वाईट, खरे-खोटे सारे काही ब्रह्माच्याच इच्छेने होत आहे!  त्यात मानवाने करण्यासारखे काय आहे – काही आहे का नाही - असा प्रश्न स्वाभाविकपणेच मनात येतो. माणूस आणि पाषाण यांत काहीच फरक न करणारी ही तथाकथित वेदान्ताची विचारसरणी कोणाला जर अत्यंत भयावह वाटली तर त्यात काहीच नवल नाही. म्हणून मग अशा प्रकारच्या तत्त्वज्ञानावर आपली सर्वसाधारण प्रतिक्रिया असते की - 'तत्त्व म्हणून हे सारे ठीक आहे. पोटभर खाणे झाल्यानंतर आणि उद्याची चिंता नसल्यावर घरात आरामशीर बसून बोलायला हे असले विषय ठीक आहेत. प्रत्यक्ष रोजच्या जगात मात्र त्याप्रमाणे वागून चालत नाही, व्यवहार पाहावाच लागतो. तात्पर्य? वेदान्त तत्त्वज्ञान म्हणून कितीही उच्च प्रकारचे असले तरी ते व्यावहारिक मात्र नाही असे सर्वसाधारण मत आढळून येते.

विवेकानंदांना अर्थातच आपले हे मत अमान्य आहे. ते म्हणतात, वेदान्त दर्शन पूर्णपणे व्यवहार्य आहे. त्याच्या आस-याने जीवन जगणे व घडविणे शक्य आहे, अगदी शक्य आहे. सर्वात आधी आपण ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती ही की वेदान्ताची तत्त्वे काही अरण्यात जन्माला आलेली नाहीत. सर्वसंगपरित्यागी संन्याशांना नव्हे तर राज्याच्या व्यवस्थेत, प्रजेच्या रक्षणात गुंतलेल्या क्षत्रियांना ब्रह्मज्ञान प्रथम झाले. त्यांनी नंतर ते पुरोहितांना शिकविले. यातील कितीतरी सिद्धान्त अरण्यवासात, एकान्तात जन्मलेले नसून, ज्यांची जीवने सर्वात जास्त गडबडीची आणि धकाधकीची असणे स्वाभाविक होय अशा सिंहासनाधिष्ठीत सम्राटांनी जगाला त्याचे दान दिलेले आहे.

श्रीमद्भगवद्गीता तर कुरुक्षेत्रावर युद्धाच्या धुमश्चक्रीच्या वातावरणात सांगितली गेली आहे. (युद्धप्रसंगी हे तत्त्वज्ञान सांगायला-ऐकायला वेळ असतो का अशी शंका काहीजण घेतात, त्यावर बोलता येईल पण इथे नको!) आपण काय जनक, अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्यापेक्षा कार्यव्यस्त आहोत काय? धकाधकीच्या जीवनात जर हे लोक वेदान्त तत्त्वज्ञानाचे आचरण करु शकले तर आपल्यासमोरच अशी काय मोठी अडचण आहे? आपल्यावर ना त्यांच्याइतका कामाचा ताण आहे, ना आपल्याला लाखो लोकांचे जीवन ज्यावर अवलंबून आहेत असे निर्णय घ्यायचे आहेत. मग का नाही आपण वेदान्त जगू शकत?

हं! आता एक मात्र खरे की वेदान्ताचा आदर्श आपल्या आदर्शाच्या कल्पनेपेक्षा फारच उच्च दर्जाचा आहे. एखाद्या माणसाने दिलेली वेळ पाळली, पत्राचे उत्तर लगेच दिले, शासकीय कार्यालयातील माणसाने वेळेत काम केले, रिक्षात विसरलेले पैशांचे पाकीट प्रामाणिकपणे परत केले अशा घटनांचे आणि लोकांचे कौतुक वाटावे अशी सध्याची स्थिती  आहे. आपण जर आपले आदर्श तपासायला गेलो, तर आपल्या असे लक्षात येईल की, जे आपल्या सोयीचे असते तेच आपल्याला व्यवहार्य वाटते. जे काही आपल्या गैरसोयीचे असेल, त्यावर लगेच आपण अव्यवहार्यतेचा शिक्का मारुन मोकळे होतो! चोराला चोरीइतके व्यवहार्य दुसरे काहीच वाटत नाही हे आपण लक्षातच घेत नाही. व्यवहार्यतेचा हा मुददा अतिशय सापेक्ष आहे हे आपण विसरता कामा नये.

मानवी मनाच्या या दुबळेपणाची, स्वार्थी प्रवृत्तीची जाणीव विवेकानंदांना नाही - असे कसे होईल? ते स्पष्टपणे सांगतात की, एक गोष्ट मी तुमच्या मनावर बिंबवू इच्छितो की, वेदान्त हा पूरेपूर व्यवहार्य असला तरी तो या असल्या सर्वसाधारण अर्थाने नव्हे. वेदान्त आमच्यापुढे एखादाही अव्यवहार्य आदर्श ठेवत नाही. आणि त्याचबरोबर शंभर टक्के व्यवहार्य असूनही वेदान्ताचा आदर्श हा 'आदर्श होण्याइतका उच्चही खासच आहे.

माणसाची एक स्वाभाविक प्रवृत्ती अशी असते की, अवघड गोष्टी सोप्या करुन घ्यायच्या. या प्रक्रियेत सोय होते खरी पण मूळ तत्व अथवा नियम शिथिल होतो. ‘सोपे द्या अन्यथा आम्ही करणार नाही’ (शुद्धलेखनाचे नियम माफ असले की कसे बरे वाटते!) ही एक सार्वजनिक प्रवृत्ती आहे. कुणाला ‘क्ष’ ही गोष्ट अवघड वाटेल तर दुस-या कुणाला ‘य’ ही गोष्ट – तो भाग वेगळा.

आपल्या स्वभावातील या उणीवेवर विवेकानंदांनी नेमके बोट ठेवले आहे. आदर्शाला खाली खेचू नका, तर तुम्ही स्वत: त्या आदर्शाइतके उन्नत व्हा असे त्यांचे आपल्याला कळकळीचे सांगणे आहे. वेदान्ताचा आदर्श व्यवहारात चालणार नाही असे तुम्ही का म्हणता? तुमचा व्यवहार तुम्ही वेदान्तातील आदर्शाप्रमाणे ठेवा. भोवतालचे जग कसेही असो, तुम्ही तुमच्या आदर्शानुसार जगा. भर्तृहरी त्याच्या नीतिशतकात म्हणतो,
निन्दन्तु नीतिनिपुणा: यदि वा स्तवन्तु।
लक्ष्मी: समविशतु गच्छतु वा यथेच्छम।
अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा ।
न्यायात पथ: प्रविचलन्ति पदं न धीरा:।।
(कोणी निंदा करो अथवाच स्तुती, लक्ष्मी येवो अथवा जावो, मरण समोर असेल वा युगांतराने, साहसी लोक न्यायाचा मार्ग सोडत नाहीत – म्हणजे ते आपले आदर्श कधी खाली आणत नाहीत)

याप्रमाणे वागणे तुम्हाला जमले की, तुमचा-आमचा व्यवहार आदर्श होऊन जाणार!

आपला आदर्श आपल्याला व्यवहार्य का वाटत नाही? कारण तशी आपल्या मनात इच्छा नाही म्हणून! एखाद्या खेळाडूकडे/गायिकेकडे पहा. त्या विशिष्ट खेळात/गायनात प्राविण्य मिळविण्याची त्याची किंवा तिची इच्छा असली की त्या व्यक्तीकडून केवढी मेहनत घेतली जाते! अशी व्यक्ती किती प्रकारच्या मोहांवर मात करते! पहाटे पाच वाजता उठून मैदानावर पळणे, विशिष्ट अन्नपदार्थांचे सेवन टाळणे अशा गोष्टी तुम्हा-आम्हाला अव्यवहार्यच वाटतात. पण विशिष्ट ध्येय समोर असणारी व्यक्ती मात्र इतरांना कितीही कठीण वाटले तरी त्यांचे आदर्श आचरणात आणतातच.

विवेकानंद म्हणतात, आपण समजतो त्यापेक्षा कितीतरी अधिक सवड आपल्याला आहे असे आपल्यापैकी बहुतेकांना आढळून येईल. प्रश्न वेळेचा नसतो, प्रश्न असतो वेळेचा सदुपयोग करण्याच्या इच्छेचा! खरोखरच इच्छा असेल तर, आपल्याला जी  सवड आहे तीत एकच काय पण असले पंचवीस आदर्श आपण याच जीवनामध्ये प्रत्यक्ष आणू शकू. इच्छा मात्र हवी. पण काही झाले तरी आपल्या आदर्शाला खाली खेचणे मात्र उचित् नाही.

वेदान्ताने सांगितलेल्या सत्याचा अनुभव प्रत्येकाला येणे शक्य आहे, असे विवेकानंद आवर्जून सांगतात. वेदान्त तत्त्वज्ञान काही निवडक लोकांसाठी मुळीच नाही; ते सर्वांसाठी आहे, ते सर्वसमावेशक आहे. वेदान्त तत्त्वज्ञान कोणालाही कमी लेखत नाही; कोणाचाही तिरस्कार करीत नाही;  कोणालाही नाकारत नाही. माणूस पापी आहे आणि तो हळूहळू पवित्र होत जातो अशी कल्पना वेदान्ताला मान्य नाही. जो मूळचा पापी आहे, तो पवित्र होईलच कसा? आपण पवित्र होऊ शकतो याचा अर्थ असा की, आपण सारे मूलत: पवित्रच आहोत. अज्ञानाने आपण स्वत:ला दुबळे अथवा पापी म्हणवून घेत आहोत. पण वस्तुत: आपण सारे ‘सच्चिदानंद’ स्वरुप आहोत.

अर्थात वेदान्ताचे ध्येय व्यवहार्य जरी असले तरी सोपे मात्र नाही. कोठल्याही ध्येयाप्रत जायचे म्हणजे, काही ना काही त्याग करावाच लागतो. पण आपली गंमत अशी आहे, की हातातले काहीही न सोडता आपल्याला उच्च ध्येयाचा लाभ हवा असतो. ध्येयप्राप्ती ही काही लोकांसमोर, बाहेरच्या जगात मिरवण्याची गोष्ट नाही याचा आपल्याला सोयिस्करपणे विसरच पडलेला असतो. आपल्या आजच्या वागणुकीशी जुळेल असा सिद्धान्त आपण 'सोळा आणे व्यवहार्य म्हणून लगेच स्वीकारतो. पण ध्येयासाठी कोणी आपल्याला एक कप चहा कमी करायला सांगितला तर आपली पहिली प्रतिक्रिया असते - ' नको रे बाबा! कोणी सांगितले आहे इतका अवघड आदर्श ठेवायला? आम्ही आपले आहोत तेच आणि आहोत तसेच बरे आहोत!

इंद्रियांच्या दुर्बलतेचे समर्थन करणारा आदर्श आपल्याला व्यवहार्य वाटतो. पण 'इंद्रियांचे गुलाम असण्यात कसला आलाय आदर्श? - असा विचार आपण कधीही करत नाही. विवेकानंद सांगतात, जे संप्रदाय भोग आणि भगवान यांची सांगड घालण्याचा, त्या दोघांचा मेळ बसविण्याचा कधीच प्रयत्न करत नाहीत, त्यांचीच उन्नती होत असते. जे मिलाफ साधतात, त्यांचा -हास नक्की आहे.

आपल्या शरीरात जर एखाद्या रोगाने प्रवेश केला, तर त्याचा नुसता विचार करुन काय उपयोग?  त्यावर काहीतरी औषध घेणे हाच खरा उपाय आहे. एक गोष्ट आपण जरुर समजावून घ्या की,  वेदान्ताचा ईश्वर काल्पनिक नाही. तो अनेकांना प्रत्यक्ष दिसलेला आहे. तो अनेकांचा अनुभव आहे. आणि ज्याअर्थी मानवी जाणीवेच्या प्रांतात या अनुभवांची नोंद झाली आहे, त्या अर्थी प्रत्येक मानवाला कधी ना कधी हा अनुभव येणारच आहे.

वेदान्ताला व्यावहारिक वेदान्त असे नाव स्वामीजी का देतात हे आता आपल्या लक्षात आलेच असेल. या वेदान्ताचे मुख्य सूत्र म्हणजे 'आत्मविश्वास! आपल्या पुराणातील तेहतीस कोटी देवांवर आणि परकीयांनी आपल्यात घुसवलेल्या आणखी देवदेवतांवर तुमचा विश्वास असेल, पण स्वत:च्या ठायी मात्र अविश्वास असेल, तर तुमच्या नशीबी मुक्ती लिहिलेली नाही. आधी स्वत:वर श्रद्धा ठेवा. त्या श्रद्धेच्या शिळेवर दृढपणे उभे रहा. सामर्थ्यसंपन्न व्हा! आजची आवश्यकता जर काही असेल तर ही आहे! आजची काळाची ही गरज वेदान्त पूर्ण करु शकतो.

आपल्या आदर्शांच आपण सतत चिंतन केले पाहिजे. 'आत्मा वा अरे श्रोतव्य: मन्तव्य: निदिध्यासितव्य: असे उपनिषदांनी सांगितलेले आहेच. आपण त्याचे अनुसरण केले पाहिजे. मग पाहा, आपल्याभोवतालचे जग कसे बदलून जाते ते! 'जशी दृष्टी, तशी सृष्टी अशी जी म्हण आहे त्यात तथ्य आहेच. सृष्टी बदलण्याचे काम अवघड आहे, पण आपली दृष्टी मात्र आपण बदलू शकतो. हे काम अगदी सोपे आहे अशातला भाग नाही, अशक्यप्राय मात्र नक्कीच नाही!

'आपण सारेच स्वरुपत: ईश्वर आहोत अशा म्हणण्याने जगात नुसता गोंधळ माजून जाईल अशी भीती काही लोकांना वाटते. कोणी काहीही करेल आणि त्याचे उत्तरदायित्व मात्र ईश्वरावर टाकेल अशी एक शक्यता या विचारामुळे निर्माण होते. विवेकानंदांना वाटते की, होऊ दे असला गोंधळ! नाहीतरी आम्ही पापी आहोत, आम्ही सैतान आहोत असा घोष करुन जगाचे काय भले झाले आहे? यापेक्षा जगाचे आणखी काय वाईट होणे बाकी राहिले आहे? मग मी ईश्वर आहे असे म्हणताना लोक निदान सत्याच्या निकट तरी असतील. म्हणून भयाचे काहीच कारण नाही.

वेदान्तधर्म सर्वसमावेशक असल्याने भांडणांना, तंटाबखेडयांना येथे अजिबात जागा नाही. निर्गुण  ईश्वराच्या उपासकांपेक्षा सगुण ईश्वराच्या उपासकांनी जगावर जास्त युद्धे लादली आहेत हे विवेकानंद आपल्या लक्षात आणून देतात. वेदान्तधर्मानुसार जर आपण सारेच आचरण करु, तर मग जगात युद्धांना आणि तंटाबखेडयांना जागाच उरणार नाही, सर्वत्र शांतीचे साम्राज्य प्रस्थापित होईल असे विवेकानंदांचे मत आहे. जगाच्या भल्यासाठी आणि स्वत:च्या विकासासाठी आपण वेदान्तधर्माचे पालन करणे आज खरोखरच 'व्यवहार्य ठरेल  यात शंकाच नाही!

छांदोग्य उपनिषदातील सत्यकाम जाबालाची कथा आपणा सर्वाना ठावूक असेल. या बालकाला अग्नीने, क्षाने, वृषभाने ब्रह्मज्ञान दिले असा पुढील कथाभागात उल्लेख आहे. यातील कथेचा भाग सोडला तर तात्पर्य असे निघते की, सर्व ज्ञान हे अंतरंगातच असते आणि बाहय कालादि निमित्तांनी, कारणांनी त्या ज्ञानाची आपल्याला जाणीव होते इतकेच! ज्ञानविषयक वेदान्ताचे हे व्यवहार्य सूत्र आपण लक्षात घेतले तर आजच्या शिक्षणक्षेत्रातील आपल्या ब-याचशा समस्यांचे निराकरण होईल – निदान शक्यता तरी वाढेल.

वेदान्तमत हे जग मिथ्या – खोटे - असल्याचे सांगते असा आपला एक समज आहे. विवेकानंद वेदान्ताची जगत्’विषयक भूमिका फार चांगल्या त-हेने मांडतात. ते म्हणतात, 'वेदान्त जग उडवून देत नाही, तर तो त्याचे स्वरुप खरोखर काय आहे हे स्पष्ट करुन सांगतो. वेदान्त 'मी चा नाश करत नाही, तर खराखुरा 'मी कोणता हे दाखवून देतो. हे जग व्यर्थ आहे, त्याला अस्तित्व नाही असे वेदान्त म्हणत नाही. वेदान्त एवढेच म्हणतो की, हे जग खरोखर काय आहे ते जाणून घ्या म्हणजे तुमचे ते अनिष्ट करु शकणार नाही,  तुम्हाला ते घायाळ करु शकणार नाही.

विवेकानंदांचे हे विचार वाचल्यावर वेदान्त आणि जीवन हातात हात घालून चालू शकतात अशी आपली नक्कीच खात्री पटली असेल! 

क्रमश:

Thursday, February 21, 2013

१५२. बांधिलकी?

एका संस्थेचा कार्यक्रम.
संस्थापकांची जयंती. इथं तसं माझ्यासारखा एखादा अपवाद वगळता बाहेरचं कुणी नसतं.

विद्यार्थ्यांचं संचलन. बघायला ब-यापैकी गर्दी.
आम्ही बरेच लोक उभे. पण झाडाभोवतीच्या कट्ट्यावर काहीजण बसलेले.
मला किंचित ढकलत आणि मग ओशाळून ‘सॉरी’ म्हणत एक आठ वर्षांचा मुलगा माझ्या पुढ्यात येऊन उभा राहिला. मी हसून थोडी मागे सरकले. 

दहा पंधरा मिनिटांचा तर कार्यक्रम.
त्याची सांगता ‘वंदे मातरम्’च्या संपूर्ण गायनाने.  
आम्ही सगळेजण – अगदी तो आठ वर्षांचा मुलगाही- सोबत गातो. मला बरं वाटतं.

कट्ट्यावरचे मात्र लोक बसून. उभेही राहत नाहीत.
वयस्कर? वेगळ्या क्षमतेचे? आजारी? छे! तरुण लोक आहेत ते सगळे.

विचारांशी बांधिलकी असणा-या ठिकाणी हे असं.
बांधिलकी नसेलच – तिथं काय? 

(केवळ शंभर शब्दांत - शीर्षक सोडून शंभर शब्द-  अनुभव मांडण्याचा हा प्रयोग. या मालिकेत आणखीही काही सांगण्याचा विचार आहे.)

Thursday, January 10, 2013

१४६. सौदा

"बहनजी," कुणीतरी मला हाक मारत होतं.
मी  थांबले, माझ्या विचारांतून बाहेर आले आणि इकडंतिकडं पहायला लागले कोण बोलतंय म्हणून. 

एक तरुण - साधारण पंचविशीचा असावा तो - माझ्याकडे हसत पाहत होता. 
त्या हसण्याचा अर्थ काही मला लागला नाही. ओळखीच्या लोकांच्या हसण्याचा अर्थ लक्षात येतो, पण हा तरुण तर अनोळखी होता मला. 

पण हास्याची एक गंमत असते - ते तुमच्याही नकळत तुमचा भाग बनून जातं. 
मीही हसले. 
माझ्या हसण्याने त्याला आणखी धीर आला असावा. 

"माझ्याकडे चांगल्या कानटोप्या आहेत. एक घेऊन तर बघा," तो म्हणाला. 
मग मी त्याच्याकडे नीट पाहिलं. 
रसत्यावर मफलर, टोप्या, मोजे .. असं थंडीसाठीच (म्हणजे थंडी कमी होण्यासाठी) सामान विकणारा एक किरकोळ विक्रेता होता तो. 

पण मला काही नको होतं. 
मी नकारार्थी मान हलवली आणि पुढे चालायला लागले. 
तो घाईघाईने म्हणाला, "अहो, थंडी आहे खूप. तुम्ही कुडकुडताय. घ्या कानटोपी माझ्याकडची. एकदम कमी होऊन जाईल थंडी. बघा तर एकदा घेऊन. अगदी खरं सांगतोय मी. शिवाय आता थंडी वाढेल अजून."

शनिवार होता तो. दुपारचा एक वाजला होता. मी बँकेत चालले होते पासबुक भरून घ्यायला. दिल्लीच्या थंडीचा कडाका इतका होता की एक वाजताही थंडी वाजत होती. धुक्याचा पदर अजून तसाच होता आणि सोबत बोचरा वारा होता. सूर्य गेले बरेच दिवस ढगांआड लपलेलाच होता. आत्ताही होता तो चंद्र की सूर्य असा प्रश्न पडावा इतका मलूल दिसत होता. 

मला धुकं आवडतं. मला हिवाळा आवडतो. खरं सांगायचं तर निसर्ग जसा असतो तसा मला आवडतो. ही एक अशी गोष्ट आहे की जी तुमच्यापासून अलिप्त असते आणि तरी तिच्यामुळे तुम्हाला अपरंपार सुख मिळतं. निसर्गावर हुकुमत चालत नाही आपली, त्याला आपण ताब्यात ठेवू शकत नाही. त्याच्या  लहारीपुढे आपल्याला नमतं घ्यावं लागतं नेहमी - आणि तरीही त्याचा राग मात्र येत नाही. त्याच्यातून पोषण मिळतं, मदत मिळते, आनंद मिळतो. अतिशय जवळ आणि तरीही अतिशय दूर ...

म्हणूनच हवापाण्याबद्दल, तापमानाबद्दल मी क्वचितच तक्रार करते. त्यामुळे आता  जितक्या उत्साहाने मी थंडीबद्दल बोलतेय तितक्याच उत्साहाने उन्हाच्या झळा किंवा बेफाम पाऊस यांच्याबद्दल बोलले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. 

असो. हे विषयांतर झालं.

मन कितीही चिरतरुण असल्याचा दावा करत असलं, तरी शरीर मनाला बरोबर जमिनीवर आणतं. आत्ताही माझ्या लक्षात आलं की वाढतं वय लक्षात न घेता मी दिल्लीच्या थंडीत रस्त्यावर आले होते आणि त्यामुळे मी खरंच कुडकुडत होते. मला थंडीपासून संरक्षण करण्यासाठी काहीतरी घेणं आवश्यक होतं याची मला त्या क्षणी जाणीव झाली. 

"ठीक आहे, कोणती कानटोपी उपयोगी आहे मला? दाखवा बरं..." मी म्हणाले. 
त्याने मला चार पाच प्रकार दाखवले. मला खरेदीतलं शून्य कळतं. त्यामुळे मी त्यालाच निवडायला सांगितली टोपी. ती घेतली. मग तो मुलगा म्हणाला, "मोजे पण आहेत माझ्याकडं." मी तेही घेतले दोन जोड.

"किती पैसे झाले?" मी विचारलं. 
त्याने हिशोब केला आणि सांगितलं, "एकशे तीस रुपये."
मी त्याला एक शंभरची आणि एक पन्नासची अशा दोन नोटा दिल्या. 
त्याने मला दहा रुपयांच्या तीन नोटा परत केल्या.

"तुम्ही मला फक्त वीस परत द्यायचेत. दहा जास्त दिलेत तुम्ही," असं म्हणत मी दहाची नोट त्याला द्यायला लागले. 
आश्चर्य म्हणजे त्याने ती नोट घेतली नाही. 
याचा बिचा-याचा हिशोबात गोंधळ झालेला दिसतोय असं मी स्वत:शीच म्हणत होते तोवर त्याच्या चेह-याकडं पाहून मी थबकले. 

तो मिस्कीलपणे हसत होता. 
तो म्हणाला, "हिसाब ठीक है, बहनजी,"

मग मला समजावून सांगत म्हणाला, " कुठलचं गि-हाईक घासाघीस केल्याविना पैसे देतच नाही. त्यामुळे नेहमी मी सांगितलेल्या पैशांपेक्षा दहावीस रुपये कमीच मिळतात मला. पण तुम्ही काही पैसे कमी करून मागितले नाहीत. तुमच्यासारखं गि-हाईक काय रोज भेटत नाही. म्हणून माझे मीच दहा रुपये कमी केले - तुम्ही न मागताही." 

मला त्या तरुणाचं आश्चर्य वाटलं. 
मीही देते - न मागता देते - ते फक्त ओळखीच्या लोकांना. 
अनोळखी लोकांनाही देते अनेकदा - पण ते त्यांनी मागितलं तरच. 
अनोळखी लोकांना, त्यांनी न मागता काही देणं - ही गोष्ट माझ्या हातून क्वचितच घडते. 
मला त्या तरुणाचं कौतुक वाटलं. 

मी त्याची थोडी गंमत करायचं ठरवलं. 
मी त्याला विचारलं, "जर मी घासाघीस केली असती, तर मला किती पैसे कमी द्यावे लागले असते?" 
त्याने एकदम चिंतेत पडून माझ्याकडं पाहिलं. आता त्याच्या कपाळावर एक आठी उगवली होती. त्याच्या चेह-यावर मघापासून असलेलं हसू गायब झालं. त्याने डोळे बारीक करत माझ्याकडं 'आता काय' अशा नजरेनं पाहिलं. 

मी म्हटलं, "काळजी करू नकोस. मी काही तुला पैसे परत मागणार नाही आणखी. तू दहा रुपयाची सूट दिलीस मला आपणहोऊन त्यातच मी खूष आहे. मी आपलं सहज कुतूहल म्हणून विचारतेय. कदाचित पुढच्या वेळी खरेदी करताना मला या माहितीचा उपयोग होईल."

त्याचा काही माझ्यावर विश्वास बसला नाही. पण त्याने बहुधा थोडा धोका पत्करायचा ठरवलं. माझी नजर चुकवत, खाली मान घालून तो म्हणाला, "शंभर रुपये."
आणि मग आता त्याला मी वीस रुपये परत मागणार अशा शंकेने त्याने माझ्याकडं पाहिलं. 

मी हसले आणि पुढं निघाले. 

एक तरुण माणूस, जो गरीब आहे, तो माझ्यासारख्या अनोळखी व्यक्तीसाठी, मी मागितलेले नसतानाही, जाणीवपूर्वक दहा रुपये सोडू शकतो. 

मध्यमवयीन आणि मध्यमवर्गीय मी, एका अनोळखी माणसासाठी, त्याने थेट न मागितलेले वीस रुपये सोडून देण्यात मला कसली आलीय अडचण? 

त्या तरुण माणसाचं स्मितहास्य,  न मागितलेली सूट देताना त्याने दिलेलं सुखद आश्चर्य, त्याचा खरेपणा, त्याचा भाबडेपणा  .... त्यातली गंमत आणि त्यातला आनंद .... 

वीस रुपयांत एवढा मौल्यवान आणि आनंददायी अनुभव एरवी  कुठं मिळाला असता मला?

म्हणजे त्या दृष्टीने पाहता हा सौदा चांगला पडला म्हणायचा मला. 
तुम्हाला  काय वाटतं? 
**

Monday, December 31, 2012

१४५. क्षुल्लक

दिल्लीत परतल्यापासून जंतर-मंतर, इंडिया गेट इथल्या निदर्शनात सामील व्हायची संधी मिळत नव्हती. म्हणजे रोज काही ना काही घडत होतं तिथं; पण संचारबंदी लागू असल्याने आणि त्याहीपेक्षा दहा मेट्रो स्थानकं बंद असल्याने मी तिथवर पोचू शकले नव्हते.


आज मात्र गेले. जंतर-मंतरला. आजपर्यंत मी या ठिकाणी गेले आहे ती अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं. तेव्हा भरपूर गर्दी असायची. आज तितकी नव्हती. ते स्वाभाविकच. सोमवार संध्याकाळ किती लोकांना मोकळी असणार? निळ्या गणवेशातले 'रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स'चे  लोक होते पण कमी होते तेही. सुरक्षा तपासणी नव्हती. ठिकठिकाणी वेगवेगळे गट बसले होते. एका गटात दोन पुरुष गेले आठ दिवस उपोषण करत आहेत तिथं मेणबत्त्या लावलेल्या होत्या बरेचजण बसून घोषणा देत होते. त्यात पुरुषांचा सहभाग चांगला दिसत होता. देश का युवा जाग गया, राहुल गांधी भाग गया ही एक नवी घोषणा ऐकायला मिळाली.


दुसरा एक गट अनेक ट्यूबलाईट घेऊन बसला होता . त्यावर लोक मार्करने सह्या करत होते, संदेश लिहित होते. दोन-तीन लोक होते तिथं. दुस-या एका गटात आठ दहा स्त्रिया आणि दोन पुरुष उभे राहून घोषणा देत होते. बलात्कार करणा-यांना फाशी द्या ही त्यांची मुख्य मागणी होती. एका गटात शहर कुणाचं अशा आशयाचं एक गीत चालू होतं. एका ठिकाणी कागदावर संदेश लिहून तिथं मेणबत्त्या ठेवल्या होत्या. दोन मुली बसल्या होत्या तिथं. एक मुलगी एकटीच  न्याय मिळाल्याविना नव्या वर्षाचा आनंद होणार नाही असा फलक हातात घेऊन एकटीच बसली होती. तिचा चेहरा अतिशय विदीर्ण दिसत होता. आणखी एका गटात बरीच जास्त गर्दी होती, मेणबत्त्याही जास्त होत्या. तिथं काहीतरी धार्मिक वाटावा असा विधी चालला होता.


त्या विधींकडे मी पाहतच होते तेवढ्या माझ्या पाठीवर हात पडला. स्वेटर, जीन्स, गळ्यात मफलर अशी एक तिशीची स्त्री होती. तुम्ही निदर्शनात सहभागी व्हायला आलात का? तिनं मला विचारलं.
हो, मी सांगितलं.
माझ्याबरोबर पाच मिनिटं याल? ती स्त्री.

मला काही कळेना. कुठं जायचं? कशासाठी?

ती म्हणाली मी ----- वाहिनीची आहे (नाव सांगत नाही, सगळ्या वाहिन्या सारख्याच, एकीला झाकावं आणि दुसरीला काढावं!). आमचा आत्ता पाच वाजता लाईव्ह शो आहे. तुम्ही प्रतिक्रिया द्याल का? प्लीज..

या ठिकाणी वाहिन्यांचे कॅमेरे अगणित होते. नेहमीच असतात. पण मी त्यांच्यापासून नेहमी लांब राहते. परिवहन मंडळाच्या बसस्थानकावर प्रवासी शोधत जसे खासगी जीपवाले फिरतात तसे पत्रकार फिरत असतील याची मात्र मी कधी कल्पना केली नव्हती. मला जरा हसू आलं पण मी नकार दिला.

ती म्हणाली, या बलात्काराच्या घटनेत एक अल्पवयीन मुलगा आहे. त्याच्या शिक्षेबद्दल तुमचं काय मत आहे?
ही काही एका क्षणाची घटना नव्हती. स्व-संरक्षणार्थ अथवा भीतीतून हे कृत्य घडलेलं नाही. त्या मुलाने जे क्रौर्य केलं त्याची शिक्षा त्याला व्हायला हवी. ते घृणास्पद कृत्य करताना तो लहान नव्हता मग शिक्षेच्या वेळीच कसा लहान? मी उत्तर दिलं.

अगदी हेच हवं आहे मला, ती पत्रकार स्त्री म्हणाली. बालगुन्हेगार कायद्यात बदल -याच विषयावर आमचा शो आहे.
अहो, पण मला कायद्याची काही माहिती नाही. इथं पुष्कळ अभ्यासक कार्यकर्ते असतील, त्यांची तुम्हाला जास्त मदत होईल, मी काढता पाय घेत म्हणाले.
छे! मी जास्त काही विचारणार नाहीच. तुम्ही आत्ता जे वाक्य बोललात ना तेच फक्त बोला, मी माईक धरणारच नाही तुमच्यापुढे त्याहून जास्त. ती अजीजीने म्हणाली.

माझे काही मित्र-मैत्रिणी पत्रकार आहेत. त्यांना बिचा-यांना अशीच अजीजी करावी लागत असेल का रोज   असा विचार माझ्या मनात आला, आणि मी तिच्याबरोबर गेले.

एका टोकाला वाहिन्यांच्या कॅमे-यांची भिंत होती. वाट काढत, मी येत आहे अशी खात्री करून घेत ती चालत होती. मी म्हटलं, हाही एक अनुभव घेऊन पाहू.

एक सरदारजी होते. पन्नाशीचे असतील. एक बाई होत्या त्याही त्याच वयाच्या. आणि मी.
सरदारजी म्हणत होते, लहान असला म्हणून काय झालं? त्याला तर उलट जास्त शिक्षा द्या. ते पाहून बाकीच्या लहान मुलांना चांगली जरब बसेल आणि पुन्हा कुणी असं वागणार नाही.

त्यांच्या पाठीमागे काही पुरुष उभे होते. एक म्हणाला, लहान आहे मुलगा, त्याला सुधरायची संधी दिली पाहिजे. आणखी कुणीतरी म्हणालं, त्या मुलाला कसली शिक्षा देताय? त्याच्या आई-बापाला दिली पाहिजे शिक्षा. मुलाला वळण लावत नाहीत म्हणजे काय? आणखी कुणी विचारत होतं, त्याला आयुष्यभर तुरुंगात टाकून द्या, तीच शिक्षा त्याला. झोपडपटटी वाढली की दुसरं काय होणार? आणखी एक प्रश्न. प्रश्नातच जणू उत्तर आहे दडलेलं अशा अविर्भावात.

तेवढ्यात कॅमेरामन आणि एक पुरुष यांची वादावादी झाली. कॅमेरामन त्याला बाजूला व्हायला सांगत होता आणि तो माणूस म्हणत होता, होऊ तर द्या तुमचं सुरु, मग होतो की बाजूला.माझ्या डावीकडे दुस-या वाहिनीचा माणूस ताडताड माईकमध्ये बोलत होता. आता रोजची सवय असणार झालेली त्याला या विषयावर बोलायची. ‘सिंगापूरमधल्या डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची’ असं काहीतरी तो बोलत होता.  उजवीकडे तिसरा वाहिनीवाला कुणालातरी फोनवर अबे, अंग्रेजी बोलनेवाला चाहिये, पकडके ला किसीको जल्दी असं सांगत होता.

माझ्या शेजारच्या बाई मुलाला सांगत होत्या मावशीला फोन कर लगेच. तिला सांग हे लाईव्ह पहायला. त्यांची मुलगी तिच्या डिजीटल कॅमे-यात बहुधा व्हिडीओ रेकॉर्डिंग करत होती. मागे घोषणा चालूच होत्या. आमच्याभोवती बरेच बघे जमा झाले होते. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा चालू होती. पाच मिनिटं झाली, दहा मिनिटं झाली .. पंधरा झाली. आमची पत्रकार हेडफोन कानात अडकवून तयारीत उभी होती. तेवढ्या एक पठ्ठा धावत आला. कॅमेरामन आणि त्याची गळाभेट झाली. मग तो लाईव्ह शो" सुरु झाला.

पहिला नंबर सरदारजींचा. ते आधी बरेच तावातावाने बोलत होते पण कॅमे-यासमोर अगदी शांत निर्धाराने बोलले. त्यांना बहुधा सवय असावी अशा कार्यक्रमात सामील व्हायची. नंतर नंबर त्या बाईंचा. त्याही इतर देशात बालगुन्हेगारांना अशा प्रसंगी कडक शिक्षा दिली जाते अशा आशयाचं एक वाक्य बोलल्या. मग अचानक ती पत्रकार आणि कॅमेरामन दोघंही निवांत झाले आणि मागच्या मेणबत्त्यांकडे पहायला लागले. मग मला कळलं की ते लाईव्ह दाखवलं जातंय. सरदारजी आणि बाई दोघांनाही अजून काही बोलायला सुचत होतं. ते पत्रकार बाईना सारखं काहीतरी सांगू पाहत होते. आणि ती त्यांना गप्प रहा, नंतर बोलू अशी खूण करत होती. ती बहुतेक ऐकत असणार कार्यक्रम.

अशी आणखी पाच एक मिनिटं गेली. मेणबत्त्यांजवळचा कॅमेरामन परत आला.
मेरा हो गया? असं पत्रकार स्त्रीने कुणालातरी विचारलं.

मग मला म्हणाली, सॉरी, तिकडे स्टुडीओत पण एक-दोन लोक होते बोलायला. त्यामुळे वेळ संपली.

मी ठीक आहे म्हणून निघाले.
बाईट हुकली माझी. ते चांगलंचं झालं. त्यामुळे काहीच बिघडलं नाही. वरवर पाहता.

एका बाईटमागे काय काय असतं ते कळलं.
मात्र आत खूप काही विस्कटून गेलं.
बाहेरच्या झगमगाटात खरी घटना, खरी वेदना, खर दु:खं किती क्षुल्लक होऊन जातं तेही अनुभवाला आलं.