ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, March 28, 2011

६७. निमित्तमात्र दिल्ली: भाग ४

आपण अनेक घटनांमध्ये, प्रसंगांमध्ये, शहरांमध्ये, माणसांच्या आयुष्यांमध्ये निमित्तमात्र असतो. पण तशाच अनेक घटना, प्रसंग, माणसे, शहरे आपल्याही आयुष्यात निमित्तमात्रच असतात. माझ्या जगण्यातल्या निमित्तमात्र दिल्लीची ही झलक....

यावेळी मी सांगणार आहे ‘Full Dress Rehearsal’ बाबत! ‘दिल्ली’च्या लेख मालिकेत मी एकदम नाटकाबद्दल का बोलतेय असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. पण त्यात काहीही रहस्यमय नाही हे पहिल्या काही ओळी वाचताच तुमच्या ध्यानात येईल!

जानेवारीतला तिसरा आठवडा. रस्त्यावर ‘संरक्षण मंत्रालयातर्फे प्रजासत्ताक दिन संचलनासाठीची तिकीट विक्री’ या आशयाच्या एका पाटीकडे माझं लक्ष गेलं. ते वाचून मला जरा आश्चर्यच वाटलं! प्रजासत्ताक दिनाचा सोहळा दूरदर्शनवर शेवटचा पाहिलेला तो जवळजवळ वीस वर्षांपूर्वी! त्यामुळे ‘हे संचलन पाहायला रस्त्याच्या दोन्ही बाजूंना जी गर्दी असते, ती माणसं असतात तरी कोण?’ असा प्रश्न मला पडला होता हे मी पार विसरून गेले होते.

जेवणाच्या सुट्टीत मी तिकीट विकत घ्यायला चालले होते, तेवढयात एक वरिष्ठ सरकारी अधिकारी भेटले. मी कशासाठी चाललेय हे त्यांना सांगून मी आपली सहज विचारणा केली “कशी असते व्यवस्था? नीट दिसतं का संचलन?” चालताचालता ते थांबले. माझ्याकडे वळून पहात त्यांनी विचारलं, “तुम्हाला राष्ट्रपतींना पाहायचंय का?” आता राष्ट्रपती तर सोडा, कोणीही “पाहण्यासारखं” असतं असं मला कधी वाटत नाही. हं! कोणाला ‘भेटायची’ संधी असेल तर ती गोष्ट वेगळी. पण एवढं काही न बोलता मी नकारार्थी मान हलवली.

मग ते सरकारी अधिकारी हसून म्हणाले, “ मग २३ तारखेच्या Full Dress Rehearsal ला का नाही जात?”

असं काही असतं हेच तोवर मला माहिती नव्हतं! त्यांनी मला समजावून सांगितलं, “२३ जानेवारीला अतिमहत्त्वाच्या व्यक्ती नसतात, पण सगळ्या कार्यक्रमाची तंतोतंत उजळणी होते. त्यादिवशी सुरक्षाव्यवस्था पण एवढी कडक नसते. म्हणजे तुम्हाला मोबाईल, कॅमेरा नाही नेता येणार सोबत, पण कमी क्षेत्रात सुरक्षाकवच असतं, त्यामुळे तुम्हाला यायला-जायला कमी त्रास होईल.”

मला ही कल्पना आवडली. अनायासे २३ ला रविवार होता. “त्याची पण तिकीटं त्याच विक्री केंद्रावर मिळतील का?” मी विचारलं. त्यावर ते अधिकारी हसले आणि म्हणाले, “संरक्षण मंत्रालयाकडून आमंत्रण पत्रिका येतात आपल्याकडे. त्यातली एक मी तुम्हाला देतो. दिल्लीत आलाच आहात तर पहा ही परेड. एकदा नक्कीच पाहण्यासारखी असते!”

२१ जानेवारी. शुक्रवार. संध्याकाळी साडेपाचपर्यंत संरक्षण मंत्रालयाकडून आमंत्रण पत्रिका आल्या नव्हत्या. या पासच्या भानगडीत मी २६ जानेवारीच तिकीट पण काढलेलं नव्हतं! त्यामुळे प्रजासत्ताक दिनाचं संचलन पाहायची संधी हातची गेली अस मी समजून चालले होते. सहा वाजता निघता निघता intercom वरून फोन करून पाहिला. तिथल्या माणसाने सांगितलं, “ आता उदया दुपारीच पास येतील. तुम्ही असं करा, उदया दुपारी एकच्या सुमारास मला फोन करा आणि मग घेऊन जा पास” अस म्हणत त्याने मला त्याचा थेट संपर्काचा नंबर दिला.

आता हे काम आणखीनच अवघड झालं तर! माझ्याकडे रोजच्या प्रवेशासाठीचं ओळखपत्र आहे. पण शनिवारी आणि सुट्टीच्या दिवशी लेखी ‘विशेष परवानगी’ असल्याविना सुरक्षारक्षक कोणालाच आत सोडत नाहीत. ज्यांची ‘परवानगी’ मी घेऊ शकते, अशी वरिष्ठ मंडळी तोवर निघून गेलेली होती. ज्या विभागात पास मिळणार तिथले कुणी माझ्या ओळखीचं नव्हतं, त्यामुळे ‘मला प्रवेशद्वारात पास आणून दया’ अशी विनंती मी कुणाला करू शकत नव्हते. पण अर्थात पुरेशा अडचणी आल्याविना माझं कोणतंच काम पूर्ण होत नाही (कोणाचं होतं म्हणा!) हा अनुभव असल्यामुळे शेवटपर्यंत प्रयत्न करत राहायची सवय मी स्वत:ला लावून घेतली आहे.

शनिवारी दुपारी दीड वाजता पासवाल्या माणसाला फोन केला. “पास आले आहेत” अस त्याने सांगितल्यावर अर्ध्या तासांत तिथं पोचले. “Full Dress Rehearsal चा पास घ्यायचाय” अस सांगितल्यावर सुरक्षा अधिका-याने “दिल्लीत नवीन आहात का?” अस म्हणत हसत मला आत जायची परवानगी दिली.

पास देणा-या माणसाने विचारलं, “तुम्हाला कोणत्या विभागातला पास हवाय?”. तोवर मला हे संचलन विजय चौक, राजपथ या मार्गावरून होतं हेही माहिती नव्हतं! मग त्याने मला दोन चार प्रश्न विचारून – मी कुठे राहते, गाडीने येणार की मेट्रोने – मला पास दिला. ‘पटेल चौक मेट्रो स्टेशनला उतरा आणि दहा मिनिटात पोचाल मग’ हे तो मला सांगायला विसरला नाही. “पासवर दोन माणस जाऊ शकतात, एकटया जाऊ नका” असंही त्याने का कोणास ठावूक पण मला सांगितलं! मग मी स्वानंदला फोन केला. हा माझ्या जुन्या ऑफिसमधला सहकारी. गेली दोन वर्ष दिल्लीत आहे तो. तो यायला एका पायावर तयार झाला.

दुस-या दिवशी सकाळी पटेल चौक मेट्रो स्टेशनमध्ये स्वानंदची वाट पहात मला बराच वेळ थांबावं लागलं तेव्हा दोन तरुण पोलिसांशी गप्पा झाल्या. त्यादिवशी त्या मेट्रो स्टेशनवर उतरणारे सगळे लोक संचलन पाहण्यासाठी आलेले होते हे उघड होतं! या दोन पोलिसांना संचलन पाहण्यात रस होता पण त्यांना दिल्लीच्या दुस-या भागात कामासाठी जायला सांगण्यात आलं होतं म्हणून ते नाराज होते. गणवेषात नसते तर ते दोघजण कोणत्याही तरुणासारखे वाटले असते अशाच आमच्या गप्पा झाल्या. आम्ही दहा पंधरा मिनिट गप्पा मारल्यामुळे मेट्रोच्या सुरक्षारक्षकांना आणि माझ्यासारखी कोणाची तरी वाट पहात असलेल्या इतर प्रवाशांना मी ‘गुप्त पोलिस’ आहे अस वाटलं असावं बहुधा! एकाने तसं मला विचारलंसुद्धा!

संचलनाच्या ठिकाणी आम्ही पोचलो तर फारशी गर्दी नव्हती, बरचसे stand शेवटपर्यंत रिकामेच होते. या दिवसाची तिकिटं विकली जात नाहीत; फक्त ‘पास’वाली माणसंच येऊ शकतात म्हणून असं असेल. सुरक्षाव्यवस्थाही तितकी कडक नव्हती. म्हणजे ‘मोबाईल आणायचा नाही’ असा नियम असतानाही मी स्वानंदशी संपर्क साधण्यासाठी मोबाईल नेला होता. ‘तो बंद करा’ अस त्यांनी मला सांगितलं आणि मी ‘हो’ म्हटल. पुढे प्रत्यक्ष संचलन चालू असताना अनेक लोक फोटो काढत होते आणि सुरक्षारक्षक, पोलिस त्याकडे दुर्लक्ष करत होते. प्रत्यक्ष प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात असं काही नक्कीच घडत नसेल!

थंडी असल्यामुळे उन्हात तीन तास बसताना बरं वाटलं! भोवतालचं वातावरण एकदम भावूक, देशभक्तीने भारावलेलं होतं – विशेषत: या वातावरण निर्मितीत commentators चा वाटा फार मोठा होता. म्हणजे ‘शौर्यपदक’ विजेती मुलं मुली जात असताना “टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करा” अस commentators नी सांगितलं की लोक टाळ्या वाजवत होते. मधून मधून ‘सूर्य पण कसा हे संचलन पाहायला उत्सुक आहे’ – म्हणून आज धुकं नाही – अशी साहित्यिक वर्णनं पण होती. ती एरवी गमतीदार वाटली तरी त्या क्षणी मात्र चांगली वाटत होती. म्हणजे सूर्याला काही देणंघेणं नसणार आपल्या दिवसाचं हे कळतं – पण ते आहे असं मानताना बरंही वाटतं!

संचलनाबद्दल मी जास्त काही लिहीत नाही कारण तुम्ही सर्वानी त्याच वर्णन वृत्तपत्रांत वाचलं असेल किंवा दूरदर्शनवर प्रत्यक्ष पाहिलंही असेल. एका अर्थी हे देशाच्या सैन्यशक्तीच प्रदर्शन असतं! T-90 रणगाडे, तेजस, पिनाक rocket launcher, Tactical Control Radar Reporter, ब्रह्मोस launcher अशा वेगवेगळ्या शस्त्रास्त्रांचं वर्णन commentators सांगतात आणि म्हणून त्या क्षणी आपल्याला ते कळलंय असं वाटतं इतकंच! ही इतकी गुंतागुंतीची शस्त्रास्त्रं निर्माण करता येणारी बुद्धिमता आपल्याकडे आहे तर - असा दिलासा मिळाळा त्यातून.

सैनिकांचं संचलन अतिशय देखणं होतं! पंजाब रेजिमेंट, मराठा रेजिमेंट, राष्ट्रपतींचं सुरक्षा पथक हे सगळे अतिशय आकर्षकपणे संचलन करतात. सैन्याताला भ्रष्टाचार, Armed Forces Special Powers Act चा देशाच्या अनेक भागात झालेला दुरुपयोग ही सगळी चर्चा  मला माहिती आहे. अखेर सैन्य, पोलीसबळ, राखीव दले, सामाजिक संस्था यात सगळेच काही देशप्रेमामुळे भारावून बलिदान करण्यासाठी येत नाहीत – ती त्यातल्या अनेकांची पोट भरण्याची व्यवस्था – गोंडस शब्द वापरायचा तर ‘उपजीविका’ - असते हे मला माहिती आहे. तरी त्या क्षणी आपल्या सैनिकांबद्दल अभिमान वाटला. ते आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत याचं भान आलं. त्यांचे रंगीबेरंगी गणवेष, त्यांची शिस्त, त्यांची एकजूट, त्यांचा जोश, सगळं विलोभनीय वाटलं! उंटावर बसून band वाजवणारा समूह पाहून आश्चर्य वाटलं! उंट मस्त सजवलेले होते – यातल्या एखादयाला आपण आपल्या घरी घेऊन जावं असं मला त्या क्षणी फार प्रकर्षाने वाटलं! डेअरडेविल्सची मोटरसायकलवरची प्रात्यक्षिक श्वास रोखून ठेवणारी होती. (पहा http://im.rediff.com/news/2011/jan/25ss19.jpg ) विमानांची formations क्षणार्धात नजरेसमोरून नाहीशी झाली तरी त्यांचा परिणाम मात्र दीर्घकाळ टिकला माझ्या मनात.

‘तुम्ही युद्धाच्या बाजूने आहात की शांतीच्या बाजूने?” असा प्रश्न अनेकदा लोक विचारतात. मला तो अनेकदा निरर्थक वाटतो. एकदा आपण देशाच्या सीमा निश्चित केल्या की आज ना उदया युद्ध अटळ होऊन बसतं. आपण बाहेर जाताना आपल्या घराला कुलूप लावून का जातो – याचं उत्तर आपल्याला माहिती आहे. नेमक्या त्याच कारणासाठी सैन्य असायला हवं – बलवान असायला हवं हेही ओघान आलं! दुबळ्यांची अहिंसा हा भेकडपणा असतो. सामर्थ्य असून शांतीचा पाठपुरावा करत राहणं यातच शहाणपण आहे. शांतीसाठी युद्ध कराव लागतं कधीकधी हे एक विलक्षण विरोधाभासी सत्य आहे या जगात.

या संचलनातले बरेचसे चित्ररथ (झाँकी) मात्र हास्यास्पद होते. म्हणजे त्यात प्रदर्शन जास्त आणि कला कमी होती. महाराष्ट्राचा चित्ररथ म्हणजे लावणी नृत्य होते. आता लावणी ही एक पारंपारिक कला आहे, तिचे जतन केले पाहिजे हे मला मान्य आहे. पण प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात (पहा http://im.rediff.com/news/2011/jan/25ss13.jpg) लावणीच्या निमित्ताने रस्त्यावर नाचणा-या स्त्रिया पाहताना मला तरी एकदम विचित्र वाटलं. मी स्त्री असल्यामुळे स्त्रियांच्या वाटयाला राजपथावरही ठराविक साच्याची भूमिका यावी; आणि त्यांनी त्यातच आनंद मानावा याच वैषम्य वाटलं! किंवा कदाचित मी काळाच्या फार मागे असेन अजूनही! राज्याच्या वतीने कोण हे चित्ररथाबाबतचे निर्णय घेतात ते माहिती नाही! त्यांच्याशी एकदा बोलायला हवं या विषयावर! अर्थात अनेक सैन्य तुकडयाचं नेतृत्व स्त्रिया करत होत्या, मुलींचे NCC पथक एकदम ऐटबाज आणि शिस्तीचं होतं – हा एक दिलासा होता! शेवटी त्यातलं काय पाहायचं आणि काय लक्षात ठेवायचं हा माझा निर्णय असणार आहे – नेहमीप्रमाणे – हेही लक्षात आलं.

अर्थात हे चित्ररथ या संचलनात ठेवण्यामागे एक सावधगिरीची भूमिका असू शकते. या निमित्ताने आपण फक्त सैन्यशक्तीचे प्रदर्शन केलं तर आजवर इतर देशांनी आक्षेप घेऊन ते कधीच बंद पाडलं असतं. त्याला सांस्कृतिक जोड दिल्यामुळे – नृत्य संगीत वगैरे कार्यक्रमही असतो संचलनाच्या शेवटी – सैन्यबळाचं प्रदर्शन फार डोळ्यावर येत नाही. पण हे अधिक चांगले करता आलं तर बरं असं मात्र वाटत राहिलं. हल्ली सरकारची वेगवेगळी खाती social networking sites वर असतात आणि माझा त्याबाबतचा अनुभवही चांगला आहे. संरक्षण मंत्रालयाला याबाबत काही लिहावं असा विचार मी करते आहे.

त्या तीन तासांत काही गमतीदार गोष्टीही घडल्या. म्हणजे संचलन चालू झाल्यावर मधेच एक कुत्रं सुरक्षाव्यवस्थेला न जुमानता राजपथ ओलांडून गेलं – चेह-यावरची रेघही हलू न देता सैन्याचं पथक संचलन करत पुढं जात राहिलं! त्यांना यापेक्षा मोठया अडचणींची सवय असणार हे उघड आहे! प्रेक्षक ज्या ठिकाणी बसतात तिथं एकमेकांपासून हातभर अंतरावर पोलिस तैनात होते. त्यांनी राजपथाकडे (म्हणजे संचलनाकडे) पाठ करून उभं राहावं आणि लोकांकडे लक्ष ठेवावं अशी अपेक्षा होती. पण त्यांना संचलन पाहण्यात आणि आपापसात गप्पा मारण्यात जास्त रस होता. त्यांचे वरिष्ठ अधिकारी मधून मधून त्यांच्यावर ओरडून जात – तेवढयापुरते सगळं ठीकठाक होई आणि लगेच गाडी पूर्वपदावर येई. गणवेषातल्या लोकांचे एक मस्त ‘मानवी’ दर्शन घडलं मला त्या निमित्ताने!

हेलिकॉप्टर आणि विमानांच्या आवाजाने दरवेळी परिसरातल्या घारी, कबुतर, कावळे, पोपट, खारी आपली जागा सोडत आणि सैरभैर होऊन आवाज करत. वर्षातून एकदा होणा-या या समारंभाची त्यांना सवय झालेली दिसत नाही. किंवा बिरबल म्हणाला तसे ते सगळे बहुधा ‘पाहुणे पक्षी’ असावेत! रोज राजपथ तसा शांत असतो – म्हणजे वाहतूक असते भरपूर पण शांत असतो – त्यात एकदम बदल पक्षांना मानवत नसणार.

उंट आणि घोडयांच्या पथकामागून गणवेषातली मुल हातात झाडू, खराटा, बादल्या घेऊन चालत होती. आधी मला त्यांच्या तिथे असण्याचा अर्थ कळला नाही. मग लक्षात आलं, की प्राण्यांचा मल-मूत्र विसर्जनाची सफाई लगेच करण्याची ही व्यवस्था आहे. त्यांच्या मागून आणखी तुकड्या येत असतात – त्यांचा मार्ग स्वच्छ ठेवण्याची या पथकाची जबाबदारी असते. कधी नव्हे ते सफाई कामगारांचे महत्त्व राजपथ मान्य करतो आहे हे बघून मला बरंही वाटलं!

सैन्यातले तरुण अधिकारी संचलनाला ‘मार्गदर्शन’ करत होते – म्हणजे कधी चालण्याचा वेग कमी अधिक व्हायचा दोन तुकड्यांचा, कधी त्यांच्यात जास्त अंतर पडायचं तर कधी फारच जवळ यायचे. पण सैन्याची communication यंत्रणा चांगली आहे याचे प्रत्यंतर देणारा अनुभव होता तो. या किरकोळ अडचणी प्रत्यक्ष २६ जानेवारीच्या दिवशी आल्या नसतील याची मला खात्री आहे.

कार्यक्रम संपताना राष्ट्रगीताची धून वाजवण्यात येते. माझ्या शेजारी एक आठ वर्षांची मुलगी आणि तिचे आई-बाबा होते. आई बाबा आपापसात गप्पा मारत होते. राष्ट्रगीत सुरु झाले आणि तरी आपले आईबाबा जागेवर बसून आहेत हे त्या छोटीच्या लक्षात आलं. “उठो, राष्ट्रगीत शुरू हुआ है” हे तिने इतके कळवळून आईबाबाना सांगितलं की मी चकितच झाले. ती मुलगी राष्ट्रगीत म्हणत होती हे मी पाहिलं .. कार्यक्रम संपल्यावर मी तिला ‘hello’ म्हटले तेव्हा तिच्या चेह-यावरचे हसू आणि तिच्या डोळ्यांतली चमक मला फार विलोभनीय वाटली.

देशभक्ती हे तुमच्या माझ्यासाठी दोन दिवसांचे कर्मकांड बनलं आहे. पण त्यादिवशी त्या मुलीकडे पाहताना मला जाणवलं की हे कर्मकांड आपण समजत आलो तितकं निरर्थक नाही. निरागसता आपण गमावली असली तरी अजून अनेक लोक निरागस आहेत. त्यांना या कर्मकांडाचा आपल्याला लागतो त्यापेक्षा वेगळा अर्थ गवसत असेल.

परत येताना पटेल चौक मेट्रो स्टेशनातला प्रवेश अतोनात गर्दीमुळे काही काळ बंद होता. मग मी बसने परत आले. बसच्या वाह्काशी गप्पा मारत होते. मी परेड पाहून आले आहे असे बोलताबोलता त्याला सांगितल्यावर तो म्हणाला, “आप नसीबवान है, हमारी जिंदगी दिल्लीमे गुजरी, लेकिन हमे कभी मौका नही मिला वह देखनेका ...” तेव्हा मी स्वतशीच हसले.

पुन्हा एकदा हा देश, हा समाज, ही माणस, यांची स्वप्नं समजून घ्यायला हवीत – नाही समजली तर आपली समजून घेण्याची पद्धत बदलायला हवी अस मला जाणवलंं! माझ्यासाठी ही एक वेगळीच Full Dress Rehearsal होती याबद्दल माझ्या मनात शंका नाही!

Friday, March 18, 2011

६६. काही कविता: १६

ऋतु बदलतो
आणि त्याच्याबरोबर
अविरतपणे
मीही बदलते.

रंगीबेरंगी, उत्कट,
धुम्म, गंभीर,
रखरखीत, प्रश्नांकित,
अवखळ, मोकळेढाकळे
वगैरे मीही होऊन जाते.

रस्ता वळतो
आणि त्याच्याबरोबर
मागचे मागे टाकून
मी चालत राहते.

जे सुटले
त्याची फिकीर नसते
तरी नव्या पावलांमध्ये
आसक्तीची खूण
पुन्हा
हमखास पाहते.

ऋतुंचे एक चक्र
पूर्ण होऊन
सारे काही पुनश्च
जणू स्थिर झाले आहे;
सारी जुनी वळणे
एकमेकांत गुंतून, त्याने
क्षितिज काहीसे
अकस्मात धूसर झाले आहे .

***************

हे असेच
निरंतर चालू शकते;
पण प्रश्न आहे -
काय चालू द्यावे?

आत्ता या क्षणी
नेमके त्यातले
साक्षेपी विवेकाने
ओंजळीत काय घ्यावे?

थेट सूत्र पकडून
रानोमाळ भटकताना
अखेर सोबत
भान कोणते न्यावे?

शेवटच्या श्वासाला
जग बदलताना
सहज गाभ्यातून
मनाला काय आठवावे?

पुणे २० मार्च २००५, २०.०० 

Wednesday, March 9, 2011

६५. भीषमदादा


“तो हम कहाँ  थे?” सिग्नलला उजवी बाजू पकडण्याच्या प्रयत्नात मागचे दहा सेकंद गप्प असलेल्या चक्रधराने (Taxi driver) मला अचानक विचारलं तेव्हा मी दचकले. मला वाटलं -  हा गृहस्थ नक्की रस्ता चुकला आहे आणि आता योग्य रस्ता शोधायची धडपड मला करावी लागणार! आदल्या दिवशी पुण्यात सकाळी शंकरशेठ मार्गावरून पत्र्या मारुतीपर्यंतचा, दुपारी असाच कुठून तरी प्रतिज्ञा मंगल कार्यालयापर्यंतचा रस्ता शोधून माझा मेंदू इतका शिणला होता की रात्री मी मैत्रिणीच्या घरचा नेहमीचा रस्ताही चुकले होते. “पुण्यात तू खूप दिवसांनी आलीस ना, मग असं होणारच” हा माझी समजूत घालण्यासाठी इतरांनी केलेला युक्तिवाद फोल होता – कारण रस्ते चुकण्यात मी पुष्कळ आयुष्य घालवलेलं  आहे!  (आणखी पुराव्यासाठी ‘पळवाट’ ही जुनी पोस्ट वाचा!) त्याचा एक फायदा असा की मुक्कामाला पोचण्याइतकाच चालण्याचाही आनंद घ्यायला मी शिकले! असो, तर मुद्दा असा की आणखी एकदा रस्ता शोधावा लागणार तर!

सुदैवाने माझा चेहरा चक्रधरकाकांना वाचता आला आणि ते हसून म्हणाले, “रास्ते की बात नहीं कर रहा हूँ मैं, उसकी चिंता मत करियेगा आप, मैं तो भीषमदादा की बात कर रहा था!”

हा माणूस रस्ता चुकलेला नाही हे कळल्यावर मला एकदम हायसं वाटलं! मग मी फारसा विचार न करता म्हटलं, “आप कह रहे थे - भीषमदादा सोयेला था” – मी चक्रधराचं वाक्य अचूक सांगितल्यामुळे तो एकदम खूष झाला. पितामह भीष्म माझ वाक्य ऐकून बहुधा पुन्हा शरपंजरी पडले असते आणि उत्तरायणाची वगैरे वाट न पाहता त्यांनी घाईने प्राणत्याग केला असता. अर्थात ही एक शक्यता. कदाचित सारखं संस्कृत बोलून कंटाळलेल्या भीष्माला ही बोली भाषा ‘बदल’ म्हणून किंवा ‘fashion म्हणून आवडलीही असती म्हणा – काही सांगता येत नाही! आणि भीष्माभोवतीची सगळी मंडळी – विशेषत: स्त्रिया  तर – संस्कृत बोलत नसत! त्यामुळे तर त्याला प्राकृताची सवय असेल! भीष्माचं व्यक्तिमत्त्व एकदम जबाबदार, गंभीर, भारदस्त अशी प्रतिमा आहे माझ्या मनात – पण तोही मनुष्य होता म्हणजे कधीमधी हसत असेलच की! माझं बोलणं कदाचित त्याने हसण्यावारी पण नेलं असतं!

मुंबईतल्या एका उपनगरात मी काल रात्री साडेबारा - एक वाजता पोचले होते. मित्राच्या घरच्या लोकांशी गप्पा मारून झोपायला अडीच तीन झाले होते. दिवसभरात नंतर भेटायला जमणार नव्हतं म्हणून मी आणि आणखी एक मैत्रीण सकाळी सहा वाजता भेटून तासभर चालत गप्पा मारत होतो. आता परत दिवसभरात ब-याच जणांकडे जायचं होतं. तसेही मागचे चार पाच दिवस मी बोलून बोलून दमले होते. उपनगरीय प्रवासात अर्धा पाऊण तास थोडी झोप घ्यायचा माझा विचार होता. आणि भेटला होता हा गप्पिष्ट चक्रधर!

चूक माझीच होती म्हणा - नेहमीप्रमाणे! मला माणसांशी बोलायची हौसच दांडगी! मी Taxi stand वर आले तेव्हा चक्रधरकाका काहीतरी वाचत बसले होते. मीच विचारलं, “हनुमान चालिसा का?” आणि त्यावर आमचा संवाद सुरु झाला. संवादात माझ्याकडे फक्त ऐकण्याचं आणि मी झोपले नाही इतकं कळण्यापुरतं एखादं अक्षर उच्चारण्याचं काम होतं!

हनुमान कसा बलवान आहे याचे किस्से ऐकता ऐकता आम्ही महाभारतात कधी शिरलो ते कळलंही नाही मला! कृष्ण कर्णाला शाबासकी देतो तेव्हा अर्जुन जरासा रागावतो. तेव्हा कृष्ण त्याला सांगतो, ‘”बाबा रे, बलशाली हनुमान रथावर बसला आहे, मी सारथ्य करतो आहे तरी कर्णाच्या बाणाने आपला रथ मागे जातोय, कर्ण किती महान योद्धा आहे याचा आणखी काय पुरावा पाहिजे तुला? त्याचे कौतुक नको करायला?”

मला ही गोष्ट नवी वाटली. त्यामुळे मी चक्रधरकाकांना आणखी काही गोष्टी सांगायला प्रोत्साहित केलं. त्यांच्याकडे गोष्टींचा खजिनाच होता. म्हणजे मृत्युनंतर कर्णाला स्वर्गात खायला काहीच मिळत नाही – सोने चांदी मिळते फक्त! कारण? त्याने आयुष्यभर सोन्या- चांदीचेच दान केलं – अन्नदान कधीच केलं नाही. मग धृतराष्ट्र – भीष्म संवाद (बहुतेक तो दुर्योधन भीष्म संवाद असावा). तेव्हा भीष्म पाचही पांडवांना दुस-या दिवशी रणांगणात मारण्याची प्रतिज्ञा करतो. मग कृष्ण द्रौपदीला सल्ला देतो, “अंधार पडल्यावर सर्व ज्येष्ठांच्या शिबिरात जाऊन त्यांचा आशीर्वाद घे. सर्वात शेवटी भीष्माकडे जा. ” त्यानुसार  दौपदी पोचते तेव्हा “भीषमदादा सोयेला था”. मग तो तिला आशीर्वाद देतो वगैरे गोष्ट!

पितामह म्हणजे आजोबा – दादाजी. त्यामुळे भीष्माला दादा म्हणण्यात गैर काहीच नाही. राहता राहिला एकेरी उल्लेख. पण ‘अहो जाहो’ संबोधनाने आदर दाखवायची पद्धत काही विशिष्ठ सामाजिक घटकांतच आढळते. अरे-तुरे अगं-तुगं ही पाश्चात्य विशेषत: अमेरिकन पद्धत आहे असं अनेकांना वाटतं. पण  खेड्यांत, आदिवासी क्षेत्रात सगळ्यांनी एकमेकाना अरे-तुरे, अगं-तुगं बोलण्याची पद्धत आहे – आता शहरी माणसांच्या सहवासाने खेडीही बदलत चाललीत म्हणा! भीष्माचा भीषम पण स्वाभाविक! अशा भाषेत एक वेगळाच गोडवा वाटतो – कदाचित अशी भाषा आपण बोलत नाही म्हणून! मी उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशात कामानिमित्त ब-यापैकी भटकले असल्याने मला अशी भाषा ऐकायला आवडतं! माणस मनापासून बोलतात असं वाटतं!

मला या माणसाला महाभारत इतकं सगळ माहिती आहे याचं नवल वाटतं होतं! शिवाय ही माहिती फक्त पुस्तकी नव्हती – त्या त्या प्रसंगाचे तात्पर्य हा माणूस मला समजावून सांगत होता. “आप समझ गयी ना इसका मतलब?” – अशी खात्री करून घेत होता. मला या माणसाच्या माहितीचं कौतुक वाटतं होतं आणि त्याच्या शहाणपणाबद्दल (wisdom या अर्थाने शब्द वापरतेय मी, अन्यथा मराठीत शहाणपणाला वेगळीच छटा आहे!) आदरही वाटत होता. पुष्कळ लोकांकडे पुस्तकी पांडित्य असतं – पण प्रगल्भता नसते - ती या माणसाकडे आहे असं मला वाटतं राहिलं!

मग इतिहासातून वर्तमानात येत मी जरा त्याच्याबद्दल चौकशी केली. हा गृहस्थ उत्तर प्रदेशच्या आझमगढ जिल्ह्यातला. १९६९ मध्ये मुंबईत आला. तेव्हापासून मुंबईत taxi चालवतो. आधी बरीच वर्ष स्वत:ची गाडी होती. पण गावाला गेल की दोन चार महिने येणं होत नाही, गाडी नुसतीच पडून राहते म्हणून गाडी विकून टाकली आणि आता दुस-याची गाडी चालवतो. दिवसभरात खर्च वजा जाता तीनशे रुपये सुटतात!

“तुम्ही गणित किती शिकलात?” त्यान मला मधेच विचारलं. गणितातल माझं शिक्षण आणि आत्ताचं त्यातलं ज्ञान हा एक मोठा विरोधाभास आहे. त्यामुळे मी नुसतीच हसले. त्यावर त्यानं सांगितलं, “मी फक्त दुसरी शिकलोय – पण तुमच्यापेक्षा माझा हिशोब जास्त पक्का आहे – विचारून बघा!” मला अर्थात त्याची परीक्षा घ्यायची नव्हती.

मग त्याने बायको, दोन मुलं, त्यांची शिक्षणं, शेतीची वाईट अवस्था, मुंबई आणि गाव यात होणारी त्याची कुतरओढ अशा अनेक गोष्टी सांगितल्या. माझीही चौकशी केली – ‘आप बुरा न माने तो’ अशी सभ्य प्रस्तावना हे प्रश्न करण्यापूर्वी करायला तो विसरला नाही अर्थातच!

माणसांना आपलं नाव, आडनाव याचं किती अप्रूप असतं! शिक्षण, जात, नोकरी, भाषा यांचा किती अभिमान असतो! ‘खानदान की इज्जत’ या नावाखाली किती चुकीच्या गोष्टी निमुटपणे स्वीकारल्या जातात! वंशाचा दिवा पाहिजे म्हणून किती भले-बुरे (जास्त करून वाईटच!) प्रयत्न केले जातात! पण आपल्याला आपले पूर्वज किती माहिती असतात? कदाचित आपण आपल्या आजोबांचं आणि पणजोबांचं नाव सांगू शकतो! त्याच्यापलीकडे काय? आणि अनेकदा नुसती  नावंच माहिती असतात – पण माणूस म्हणून ते लोक कसे होते याची आपल्याला माहिती नसते.

आणि इथे हे भीषमदादा. स्वत: ब्रह्मचारी पण मोठा प्रपंच केलेले. हे खरे होऊन गेले की कोणा प्रतिभावंताचा अविष्कार आहे हेही सांगता येणार नाही! पण त्यांचे नाव, त्यांचे जगणे, त्यांचे संवाद, त्यांचे इतरांशी असलेले नाते आजही भारतीय माणसांच्या मनात जिवंत आहे! आझमगढसारख्या भागातून आलेला एक माणूस आणि मी यांच्यात संवाद साधण्याचा तो एक पूल होऊ शकतो. भीषमदादाच्या आठवणीतून आम्हाला एकमेकांचे जगणे थोडेफार समजते. आम्ही एकमेकांशी जोडले जातो – पुन्हा कधीही आम्ही भेटणार नाही कदाचित तरी या क्षणाचे नाते काही कमी प्रतीचे नसते.

भीषमदादा आमच्यातील दरी कमी करतात. अल्पशिक्षित असा तो चक्रधर आणि शिकायची संधी मिळालेली मी, एक पुरुष आणि एक स्त्री, असे आमच्यात खूप अंतर ... पण भीषमदादा आम्हाला जोडतात. आम्ही एकाच रस्त्याचे पाईक आहोत याची जाणीव करून देतात. वर्तमान इतिहासातून फुलतो – म्हणून अभिनिवेश कशाचाच धरू नये तसे नाकारूही काही नये याची मला जाणीव होते.

व्यासांच्या – किवा जे कोणी अज्ञात लेखक असतील ते – त्यांच्या प्रतिभेच्या चमत्काराने मी पुन्हा एकदा भारावून गेले आहे.