ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Friday, May 25, 2012

१२६. राग दरबारी

आजकाल पुस्तकं वाचताना मला माझ्यात झालेला एक बदल जाणवतो.
पूर्वी 'कोणतं पुस्तक छान आहे, आवडलं आहे?' या प्रश्नाचं उत्तर खूप सोपं होतं.
जे पुस्तक वाचताना भूक, झोप, इतर व्यवधानं यांचा पूर्ण विसर पडतो; जे पुस्तक एकदा हातात घेतलं की शेवट होईपर्यंत हातातून सोडवत नाही; दुर्दैवाने ते बाजूला ठेवायची वेळ आलीच तर संधी मिळताक्षणी ते जिथं सोडलं होतं तिथून पुढे चालू केलं जातं - ते चांगलं पुस्तक!

पण आजकाल माझं मत बदललं आहे.
अनेक चांगली पुस्तकं वाचताना हा बदल जाणवतो.
'राग दरबारी' ही श्रीलाल शुक्ल यांची कादंबरी वाचताना हे पुन्हा एकदा प्रकर्षाने लक्षात आलं माझ्या. 

जे पुस्तक (खरं तर कोणतीही कलाकृती) मला विचार करायला भाग पाडतं; जे मला अस्वस्थ करतं; जे माझ्या मनात प्रश्न निर्माण करतं; जे मी घेतलेले अनेक अनुभव माझ्यात पुन्हा एकदा जागवतं; जे मला एकहाती वाचायची चैन करू देत नाही आणि अक्राळविक्राळ रुप धारण करुन नाचतं समोर, जे वाचताना हे आजही किती लागू आहे असं वाटत राहतं - ते चांगलं पुस्तक असं आता माझं मत बनलं आहे. आणि 'राग दरबारी' माझ्या या सगळ्या निकषांना पुरुन उरलं. ३३५ पानांच पुस्तक वाचायला मला जवळजवळ एक महिना लागला यातच माझ्यासाठी या पुस्तकाची गुणवत्ता आहे.

पुस्तकाच्या नावावरून संगीताबद्दल पुस्तक असेल किंवा राजकीय सत्तेबद्दल पुस्तक असेल असा अंदाज होता - यातला दुसरा अंदाज बरोबर आहे हे पहिल्या पानातच लक्षात आलं माझ्या.

'शिवपालगंज' हे तुम्ही आम्ही पाहिलेलं कोणतही गाव असू शकतं -आजही आहे ते. 'जे इतरत्र नाही ते इथं आहे आणि जे इथं नाही ते कुठेच आढळणार नाही' या महाभारताच्या गौरवाची आठवण यावी असं गाव आहे हे! शहरापासून हे जवळ आहे आणि मुख्य म्हणजे रस्त्याच्या बाजूला आहे. त्यामुळे बाहेरच्या जगापासून अलिप्त नाही हे गाव पण ते आपलं आपल्यात रममाण पण आहे. या गावाच्या छोटयाशा परिघात घडणारी एक गोष्ट.

हे गाव कसं आहे? रात्रीच्या अंधारात गावात प्रवेश करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्त्रिया शौचास बसल्या आहेत. कुत्री भुंकत आहेत. गावात काही दुकानं आहेत; सरकारी कार्यालयं आहेत; दारुच दुकान आहे. इथं रस्त्यावर येणारे घरांचे चौथरे आहेत. गावात एक कॉलेज आहे ज्याला वर्ग भरवण्यास पुरेशी इमारत नसल्याने ते जणू 'शांतीनिकेतन' आहे. या गावात एक 'गांधी चबुतरा' आहे - ज्याच्या आड गावाचे पुरुष मूत्रविसर्जन करतात आणि इथं निवांत कुत्री बसलेली असतात.  गावापासून पाच मैल अंतरावर एक मंदिर आहे - जिथं जत्रा भरते. इथं कर गोळा करताना आपला वाटा घेणारे कर्मचारी आहेत आणि फुकट हादडणारे गावगुंड आहेत. दरवर्षी नेमाने वृक्षारोपण होणारे उजाड मैदान आहे. गावाची घाण पोटात घेणारा एक तलाव आहे.  आपल्या गावची जी परिस्थिती आहे तीच दिल्लीची आहे याची इथल्या लोकांना अगदी स्पष्ट जाणीव आहे आणि त्यामुळे आपलं कोणी काही घडवू आणि बिघडवू शकणार नाही याची खात्रीही. 

कादंबरीत पात्रं तशी पाहायला गेली तर मर्यादित आहेत; पण त्यांच विश्व मात्र असीम आहे. पुस्तकाची सुरुवात रंगनाथच्या नजरेतून होते. रोजच्याप्रमाणे रेल्वे दोन तास उशीरा येणार अशा अंदाजाने रंगनाथ रेल्वे स्थानकावर पोचतो तर गाडी आज फक्त दीड तास उशीर होऊन निघून गेलेली आहे. "शिकायती किताब के कथा-साहित्य मे अपना योगदान देकर" रंगनाथ बाहेर पडल्याचा उल्लेख पहिल्याच पानावर आहे. पुस्तकात उपहास ठासून भरलेला आहे याची खूण इथे मिळते, या उपहासात्मक टिपण्यांनी पुढे हसू येत राहतं, ते पटत राहतं, लेखकाची निरीक्षणशक्ती एकदम 'भारी' आहे अशी दाद आपण देत राहतो. पुस्तक इथंच थांबलं असतं तर बरं झालं असतं - असं नंतर वाटायला लागतं; कारण हा उपहास नंतर नंतर अंगावर यायला लागतो; विषण्ण करायला लागतो. 

शिवपालगंजइतकाच प्रातिनिधिक आहे तो रंगनाथ. शहरातून खेडयात आपल्या मामाकडे काही महिने प्रकृती सुधारण्यासाठी तो चालला आहे. त्याने एम.ए. केलं आहे इतिहासात. तिथं आहेत वैद्यजी - रंगनाथचे मामा. वैद्यजी बरंच काही आहेत. ते वैद्य तर आहेतच शिवाय कॉलेजचे व्यवस्थापक आहेत; सहकारी संस्थेचे व्यवस्थापक आहेत. त्यांना अशा दोन दोन पदांवर राहायला आवडत नाही. पण काय करणार? दुसरं कोणी जबाबदारी पेलण्याइतकं लायक नाहीच या गावात! 'ब्रह्मचर्या'वर उपदेश करतात ते आणि वीर्यनाश टाळण्यासाठीच्या त्यांच्या गोळ्या कॉलेज विद्यार्थ्यांमध्येही चांगल्या खपतात. ते संस्कृतही वाचू शकतात.

रुप्पन हा वैद्यजींचा कॉलेजमध्ये शिकणारा मुलगा. बरीच वर्ष तो एकाच वर्गात आहे. तो एक 'युवा नेता' आहे. बाप नेता असल्याने त्याची नेतागिरी जन्मजात आहे. काहीही मनाविरुद्ध व्हायला लागलं की रुप्पन 'कॉलेजचे विद्यार्था रस्त्यावर उतरतील' अशी धमकी देतो. इथले दरोगाजी दोन पुढा-यांना खेळवत स्वतःचा फायदा करून घ्यायचा प्रयत्न करतात आणि फसतात. छंगामल कॉलेजातले शिक्षक वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांचे आहेत - त्यांच्यापैकी कुणालाच विद्यार्थ्यांना शिकवण्यात रस नाही आणि त्यांच्याकडे ते कौशल्यही नाही. विद्यार्थीही उगाचच कॉलेजात येतात. प्राचार्यांच्या मते वैद्यजींच्या 'दरबारात' हजेरी लावणे हे सर्वात महत्त्वाचे काम, तेवढे ते इमानेइतबारे करत राहतात. इथे शिकवणा-यांत तट पडतात, कोर्टबाजी होते वगैरे ब-याच घडामोडी होत राहतात.  अर्धाअधिक उघडाच असणारा आणि वैद्यजींच्या दरबारात भांग घोटण्याचे काम करणारा सनीचर एके दिवशी गावचा प्रधान बनवला जातो. 

बद्री पैलवान आहे. हा वैद्यजींचा मोठा मुलगा. त्याचा शिष्य छोटू पैलवान आहे जो स्वतःच्या वडिलांना नियमित मारहाण करतो. मुलाने बापाला मारहाण करण्याची त्या घराण्यात परंपराच आहे. 'फ्लश' खेळण्याचे कौशल्य असणारा जोगनाथ आहे - त्याला कसे गुन्ह्यात अडकवले जाते आणि कसे सोडवले जाते याची रोचक कहाणी आहे. एक लंगड आहे इथं. लाच न देता तहसील कार्यालयातून एक कागद मिळवण्याची त्याची लढाई आहे. इथल्या सहकारी संस्थेत घोटाळा होतो. रामाधीन कलकत्त्यात अफूचा व्यापार करण्याचा अनुभव घेऊन गावी परतला आहे. तो आता वैद्यजींचा विरोधक आहे. त्यावरुन गावात राजकारण होत. कॉलेजच्या व्यवस्थापन समितीची बैठक व्हावी अशी रामाधीन मागणी करतो. गयादीन व्याजाने पैसे देतो आणि त्याचे एक कपडयांचे दुकान आहे. त्याच्याकडे कॉलेजातली शिक्षक मंडळी सतत सल्लामसलतीसाठी येतात - पण तो प्रत्यक्ष कुणा एकाची बाजू घ्यायचे नेहमीच नाकारतो. कॉलेजच्या व्यवस्थापन समितीचा हा उपाध्यक्ष. एका अर्थी वैद्यजींच्याच पक्षातला.

शिवपालगंजमध्ये घडणा-या अनेक घटनांचे सविस्तर चित्रण या कादंबरीत येतं. सहकारी संस्थेतला घोटाळा;   कॉलेजच्या व्यवस्थापकीय समितीची बैठक आणि नव्या कार्यकारी मंडळाची निवडणूक; सनीचरचा निवडणूक प्रचार आणि निवडणूक 'जिंकण्याच्या' तीन यशस्वी पद्धती; शिक्षकांची कोर्टबाजी आणि त्यावरचे कोर्टाचे ताशेरे; दरोगाजींची बदली;  बापाने मुलाविरुद्ध केलेली मारहाणीची तक्रार ऐकणारी न्याय-पंचायत; सरकारी योजनाच्या जाहिराती आणि विकासाची  भाषणबाजी; हिंदी सिनेमाचा जनमानसावर असलेला प्रभाव ; कॉलेजचे विद्यार्थी आणि त्यांचे  दिशाहीन जगणे; कोर्टात साक्ष देण्यात वाकबगार असलेले खेडूत; ताकदवान बापाला विरोध करणारी मुलं आणि त्यामुळे हतबल झालेला बाप; आंतरजातीय विवाहाचे राजकारण आणि त्यातून सुटका; शहरातल्या लोकांशी ग्रामीण सत्तावानांचे नाते; कुटुंब नियोजनाचा गावात प्रसार करणारा एक अविवाहित कर्मचारी; कोर्टातला खटला बाहेर मिटवू पाहणारे दरोगाजी;  सहकारी संस्थेत घोटाळा झाला या आरोपाची जबाबदारी घेत पदाचा राजिनामा देणारे वैद्यजी आणि त्याच सभेत बद्रीला बिनविरोध त्याच पदावर बसवणारे गावकरी ....एकामागून एक घटना होत राहतात .. अगदी ख-या जगण्यात घडाव्यात तशा .. त्याच गतीने, त्याच पद्धतीने, त्याच फळांना जन्म देत ...

या सबंध कादंबरीत  स्त्रियांचे उल्लेख ठराविक प्रसंगी आणि ठराविक संदर्भात येतात. एक आहे: गावचा राधेलाल शहरात जाऊन दुस-याची बायको पळवून घेऊन आला आहे - लग्नाची म्हणून. तिची छेड काढणे हा विद्यार्थ्यांचा आवडता उद्योग आहे. बकरी चारणारी एक तरूण मुलगी आहे. गयादीनची मुलगी बेला आहे, जिला रुप्पन प्रेमपत्र लिहितो, छोटा पैलवान भर कोर्टात तिचे नाव दुस-याशी जोडतो, बद्री तिच्याशी लग्न करु इच्छितो, आणि गयादीन तिचे लग्न जातीतल्या मुलाशी लावायची धडपड करतो. ही मुलगी बेला कधीच समोर येत नाही - तिला काय वाटते, तिच्या भावना काय आहेत याची काही किंमत नाही. ती फक्त एक साधन आहे इतरांच्या भावनांचे! तिला जणू काही अस्तित्वच नाही. देवीच्या जत्रेत नटूनथटून वावरणा-या स्त्रिया आहेत. जत्रेच्या परिसरात एका 'गाणा-या स्त्रीची दलाली करणारा' पुरुष आहे.  हिंदी सिनेमातली गाणी माहिती असणारी ग्रामसेविका आहे - जी दुस-यांना प्रेमपत्र लिहायला मदत करते असा एक उल्लेख आहे. स्त्रिया इथं अदृश्य आहेत, त्यांची भूमिका आणि स्थान दुय्यम आहे - समाजात आणि पुरुषांच्या भावविश्वातही  .... १९६८ मधल्या एका प्रातिनिधिक खेडयात काही वेगळ चित्र कसं दिसेल? 

१९६८ मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकातला ग्रामीण भारत आजही बराचसा तसाच आहे, काहीही बदल झालेला नाही या जाणीवेने पुस्तक वाचता वाचता जीव गुदमरायला लागतो. या सगळ्यातून सुटका नाहीच या अपरिहार्यतेने घुसमट वाढते. साहित्याचा आणि जीवनाचा काय संबंध असतो हे धारदारपणे सांगणारी लेखकाची शैली चकित करून जाते आधी; आणि वेदना देते शेवटी शेवटी. 

'शायनिंग इंडिया'च्या  भूलाव्यातून ज्यांना बाहेर पडायचं आहे त्यांनी हे पुस्तकं अवश्य वाचावं .. कारण आजही आपल्या देशात असंख्य शिवपालगंज आहेत. आजही हे पुस्तकं तितकंच खरं आहे जितकं पाच दशकांपूर्वी होतं!  बदल झाले आहेत - पण ते किती वरवरचे आहेत हे 'राग दरबारी' जाणवून देतं! हे पुस्तक आपण अजून किती प्रवास करायचा बाकी आहे याची जाणीव करून देत राहत.

हे पुस्तक मनोरंजन करत नाही, हे पुस्तक तुम्हाला आभासी स्वर्गात नेत नाही; हे पुस्तक तुमचा निवांतपणा घालवतं - तुमची झोप उडवतं....अशी अस्वस्थ करणारी पुस्तकं वाचावीत का? आहेत  ते प्रश्न काय कमी आहेत म्हणून अशी गंभीर पुस्तक वाचावीत? .. असे प्रश्न पडू शकतात ...अशा प्रश्नांची उत्तरं आपण आपल्यालाच द्यायची असतात - खरीखुरी! हे पुस्तक अशा गंभीर आत्मचिंतनासाठीही अतिशय मोलाचं आहे. 

राग दरबारी
श्रीलाल शुक्ल 
राजकमल पेपरबैक्स, नयी दिल्ली 
२०१२
किमत:  रुपये २५०/- 
(या पुस्तकाला १९६९ चा  'साहित्य अकादमी' पुरस्कार मिळाला आहे आणि बाजारात सध्या या पुस्तकाची चौदावी आवृत्ती आहे. कादंबरी हिंदी भाषेत आहे.  तिचा मराठीत अनुवाद आहे की नाही ते माहिती नाही. 

Thursday, May 17, 2012

१२५. नवी दृष्टी

पुण्यातून अलाहाबादला चालले होते. मी नेहमी एकटीच प्रवास करते. पण त्या वेळी कधी नाही ते सोबत टीम होती. गप्पांच्या नादात स्टेशन कधी आलं ते कळलंही नाही. तिथून पुढे प्रतापगढला पोचलो. दुस-या दिवसापासून होणा-या प्रशिक्षणाची चर्चा करायला बसलो तेव्हा लक्षात आलं की माझा चष्मा मी ट्रेनमध्येच विसरून आले आहे. माझ्याभोवती सगळे 'साक्षर' लोक असल्याने पुढचा आठवडाभर माझ काही अडलं नाही. शिवाय संगणकावर अक्षराचा आकार हवा तितका मोठा करता येतो, त्यामुळे लिहायलाही मला काही अडचण नव्हती. त्यामुळे चष्म्याविना आयुष्य काही तितकं खडतर असत नाही असं लक्षात आलं. 

पुण्यात परतल्यावर पहिलं काम नवा चष्मा घेण्याचं. माझ्याकडे जुना कागद होताच डॉक्टरांनी दिलेला. म्हटलं, नवा चष्मा घ्यायचा आहेच तर नंबरही एकदा तपासून घेऊ. हे डॉक्टर भलतेच व्यस्त असतात; न सांगता गेलं तर भेटायची शक्यता कमी; त्यामुळे आधी फोन केला. हे डॉक्टर  पुण्याबाहेर  आहेत हे समजलं - दहा दिवसांनी येणार होते ते. पुढचे दहा दिवस मी ऑफिसातच असणार होते आणि संगणकावर काम करणार होते. त्यामुळे दुसरा कोणतातरी डॉक्टर गाठण्याऐवजी मी दहा दिवस थांबायचं ठरवलं. वर्तमानपत्र, मासिकं, पुस्तकं वाचायला अडचण होती खरी .. पण त्यांच्याविना मी जगू शकते हे माहिती झालेलं होत तोवर. 

ते दहा पंधरा दिवस मजेत गेले माझे. संध्याकाळी ऑफिसातून घरी आलं की निवांत बसायचं; विचार करायचा ; जुनं काही आठवायचं - आणि मी बहुतेक वेळा चांगल्याच आठवणी लक्षात ठेवते - यामुळे मी हसतमुख होते. संगीत ऐकलं; रात्री झोपण्यापूर्वी योगनिद्रेची कॅसेट ऐकली; घरातली साठलेली साफसफाई केली; शेजा-यांशी गप्पा मारल्या; प्लंबर आणि इलेक्ट्रीशियन यांना बोलावून कामं उरकली.. ..वगैरे वगैरे. 

डोळ्यांच्या डॉक्टरकडे नेहमीची तपासणी झाली. त्यांच्या साहाय्यकाने सांगितलं, "आधी तुम्हाला जवळचचं कमी दिसत होत पण आता लांबचंही कमी दिसायला लागलंय, त्यामुळे चष्म्याचा नंबर बदललाय. आता तुम्हाला बाय-फोकल चष्मा वापरावा लागणार." हे ऐकून मला वाईट वाटेलं असं गृहित धरून माझी समजूत काढल्यागत तो म्हणाला, "काळजीचं काही कारण नाही. वाढत्या वयाबरोबर हे बदल होतात - हे अगदी नॉर्मल आहे." अर्थातच तो साहाय्यक पंचविशीतला होता आणि दिवसभरात तो हे वाक्य किमान पंचवीस वेळा म्हणत असणार!!

हं!! मी 'जवळच्या' गोष्टी पाहण्यात कधीच फार हुशार नव्हते; त्यांच्याकडे माझं दुर्लक्ष होतंच नेहमी. वयाचा आणि जवळचं न दिसण्याचा माझ्यासाठी काही संबंध नाही. मी त्या गुणवैशिष्ट्यासह जन्माला आले आहे हे मला माहिती आहे. पण माझा असा (गैर)  समज होता की मी 'दूरचं' पाहू शकते;  सोबत असलेल्या इतरांना ज्या गोष्टी दिसत नाहीत त्या मला दिसतात; त्या वरवर अदृश्य असणा-या गोष्टींचे अर्थ मला समजतात. माझा असा स्वत:बद्दल समज होता (अजूनही आहे) की ज्या गोष्टी जन्मसिद्ध हक्क म्हणून मला लाभल्या नाहीत त्या माझ्यासाठी असणा-या  जगाचं स्वप्न पाहण्याचा मला अधिकार आहे - तसं स्वप्न मला दिसत. हे काही सहज घडत गेलं नाही, त्यात संघर्ष होता अपार .. पण मजाही होतीच.

आता प्रत्यक्ष एका विशिष्ट अंतरापल्याडचं मला सहज दिसणार नाही. जसजसे दिवस जातील तसतशी ही शक्ती आणखी कमी होत जाणार! मला तर जवळच्या गोष्टी पाहायची सवय नाही आणि तीही शक्ती कमीच होत जाणार. मला ना दूरचं दिसणार, ना जवळचं - मग इथून पुढे मी काय पाहीन? माझ्या आयुष्यात मी काय शोधेन आता जर मला दिसणारच कमी गोष्टी तर?

वय वाढताना दृष्टी कमी होत जाते हे मला फार गंमतीशीर वाटत. बाहेरच्या गोष्टी पहायला बाह्य साधनाची मदत घ्यावी लागते हे आणखी विशेष. आधी आयुष्याच्या धावपळीत 'पहायला' वेळ नव्हता .. आता वेळ मिळेल तर पाहण्याची क्षमता कमी होत जाणार ..

फक्त तरुण वयात 'पाहता' येत का माणसाला?
की आता बाहेरच लक्ष कमी करून मी 'आत' पहावं - याची वेळ झालेली आहे?
मी विचारांत पडले.


मग अखेर नवा चष्मा आला.

त्यातून सगळ काही पुन्हा एकदा स्पष्ट दिसायला लागलं.
मनात काही प्रश्न उरले नाहीत. 
काही शंका उरल्या नाहीत. 
जे काही संभ्रम निर्माण झाले होते मनात, ते लयाला गेले. 
मनात काही किंतु राहिला नाही. 


आयुष्य मर्यादितच आहे. आणि या एका आयुष्यात अनेक गोष्टी करायच्या आहेत - ती यादी कधी संपणार नाही. 
बाह्य साधनांच्या मदतीने हा प्रवास सुकर करता येतो नक्कीच. 

जेव्हा ही बाह्य साधनंही बिनकामाची होतील, निरुपयोगी ठरतील तेव्हा मी काय करायचं हे ती वेळ, ती परिस्थिती मला सांगेलच - त्याचा विचार आत्तापासून कशाला? 

कदाचित त्या परिस्थितीत आणखी एखादी 'नवी दृष्टी' उमलेल आतून. 
एक दृष्टीच्या संपण्यातून दुसरी दृष्टी, नवी दृष्टी जन्माला येते.. हे अनुभवलं आहेच की आजवर कित्येकदा. 

या नव्या दृष्टीच स्वागत करून पुढे जात रहायला हवं....

**

Friday, May 11, 2012

१२४.निष्ठा

दोन दिवस.
दोन प्रसंग.
दोन माणसं.
त्यांचा अनुभव घेणारे आम्ही तेच.
आमचं मोजमाप मात्र वेगळ.

एक प्रसिद्ध धरण.
ते आम्ही पहायला गेलो.
तिथले कार्यकारी अभियंता जातीने हजर.

"धरण पाहण्याआधी मी केलेलं एक प्रेझेंटेशन पाहणार का?" त्यांची विचारणा.
मला 'धरण' तंत्रज्ञानातलं काहीही कळत नाही.
पण त्यांचा स्वर इतका आर्जवी की मी "हो" म्हणून गेले.
अर्ध्या तासाचं नेटकं प्रेझेंटेशन, सोबत चहा, प्रश्नांना नेमकी उत्तर.
हा माणूस उत्साही, शांत, शिस्तीचा, ज्ञानी आणि नम्र आहे हे मला जाणवलं.
मला अशी माणसं आवडतात.

त्यानंतर धरण पाहण्यासाठी अर्धा पाऊण तास गृहित धरलेला.
प्रत्यक्षात आम्ही दोन अडीच तासांनी बाहेर पडलो.
कारण हा गृहस्थ अतिशय मनापासून माहिती सांगत होता.
प्रत्येक गोष्टीत त्याच हृदय आहे, प्रत्येक गोष्टीचा इतिहास आणि त्यामागचं स्वप्न त्याला आठवतं आहे आणि ते त्याला सांगायचं आहे आम्हाला हे क्षणोक्षणी जाणवत गेलं.
कामातली त्या माणसाची निष्ठा नक्कीच वाखाणण्याजोगी होती.
जणू मी त्यांच घर पाहायला आले होते तितक्या आस्थेने ते मला प्रत्येक गोष्ट दाखवत होते.
मला मजा आली.

दुस-या दिवशी संध्याकाळी एक संग्रहालय पाहायला गेलो.
एक राजा होता इथला, त्याच्या राजवाडयातलं संग्रहालय.
दोन माणसं आधी तयार नव्हती फारशी पण त्यांनी फिरून दाखवलं मला ते - माहिती दिली मी विचारलेल्या प्रश्नांची.
पण एक तासाचा वेळ गृहित धरून मी त्या ठिकाणी गेले होते ती दहा मिनिटांत बाहेर पडायची वेळ आली.
मी जरा नाराजीने मुख्य दरवाजातून बाहेर पडले.

एक पन्नाशीची स्त्री बाहेर उभी होती.
"इकडे या," तिने मला हुकूम सोडला.
मी तिच्या मागोमाग गेले.
मग दरवाजा उघडून तिने मला आत नेले.
तिथं देवीची एक मूर्ती होती.
कोण आहे ही देवी?
त्यावर ती स्त्री म्हणाली, "मला हिंदी नाही बोलता येत."

मग तिने मला दहा मिनिटे ती देवी राजावर प्रसन्न होऊन उज्जैनवरून इथं यायला कशी तयार झाली, तिने राजाला 'मागे वळून पाहायचं नाही' अशी अट कशी घातली, राजाचे शहर जवळ आल्यावर 'आपण महालात बंद होऊ आणि इतर भक्तांना आपलं दर्शन घेता येणार नाही' असं वाटून देवीने पैंजण काढून ठेवलं - त्यामुळे देवी मागे येत नाही अशी राजाला शंका आली आणि त्याने मागे वळून पाहिलं - मग देवी तिथंच थांबली अशी एक मोठी कथा सांगितली. मग देवी जिथं थांबली तिथं राजाने तिच देऊळ कसं बांधलं आणि राजवाडयापासून भुयारी मार्गाने जाऊन राजा देवीला भेटत असे रोज - हेही सांगितलं.

'समजली का गोष्ट? नसली तर पुन्हा सांगते." अस त्या मावशी म्हणाल्यावर मी हसले.
मग तिने मला पुढे नेउन अनेक फोटो दाखवले. या राजवाडयात ब-याच चित्रपटांच चित्रण होतं - त्यातल्या अभिनेत्यांचे आणि अभिनेत्रींचे फोटो आहेत इथं - ते तिने मला दाखवले.
इथल्या राजाला व्हिक्टोरिया राणीने एक बक्षीस दिले होते १८७७ मध्ये - ते दाखवले.
मग राजवाडयातला 'नाचाची जागा' दाखवली.
कोणत्यातरी चित्रपटात वापरल्या गेलेल्या 'जेल'ची जागा दाखवली.
कामातली त्या स्त्रीची निष्ठा नक्कीच वाखाणण्याजोगी होती.
जणू मी तिच घर पाहायला आले होते तितक्या आस्थेने ती मला प्रत्येक गोष्ट दाखवत होती.
मला मजा आली.

ही स्त्री तिच्या वयाच्या अठराव्या वर्षी, लग्नानंतर इथल्या राणीच्या सेवेत आली.
आता ती ५४ वर्षांची आहे. गेली ३६ वर्ष ती इथंच आहे.
दरम्यान तिचा नवरा मरण पावला.
ती इथंच काम करते.
ही स्त्री उत्साही, शांत, शिस्तीची, ज्ञानी आणि नम्र आहे हे मला जाणवलं.
मला अशी माणसं आवडतात.

मी सहज आमच्या टीमला विचारलं (त्यात सगळे पुरुष - दोन चाळीशीचे आणि दोन पंचविशीतले - सगळे टेक्निकल काम करणारे) - "कालच्या आणि आजच्या अनुभवात काही एकसारखं वाटलं का तुम्हाला?"
त्यांनी विचार केला. म्हणाले, "नाही."

मी प्रश्न बदलला - मी विचारलं, "कालचे अभियंता आणि आजच्या मावशी यांच्यात काही सारखेपणा वाटला का तुम्हाला?"
'छे! ते गृहस्थ किती शिकलेले, केवढया मोठया पदावर .. या बाई अडाणी, साध्या पगारी सेवक .. त्यांच्यात काय सारखेपणा असणार?" .. त्यांनी मलाच उलटा प्रश्न विचारला.

कामातली एखाद्याची निष्ठा आपण कोणत्या चष्म्यातून पाहतो?
ज्या व्यक्तीच शिक्षण जास्त;  वय जास्त; पद मोठं; प्रतिष्ठा जास्त; मिळणारा पैसा जास्त; सफाईने बोलता येणा-या भाषा अधिक  .........त्या व्यक्तीची कामावरची निष्ठा जास्त - असं आपल्याला का बरं वाटत असेल?
*