ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, May 17, 2012

१२५. नवी दृष्टी

पुण्यातून अलाहाबादला चालले होते. मी नेहमी एकटीच प्रवास करते. पण त्या वेळी कधी नाही ते सोबत टीम होती. गप्पांच्या नादात स्टेशन कधी आलं ते कळलंही नाही. तिथून पुढे प्रतापगढला पोचलो. दुस-या दिवसापासून होणा-या प्रशिक्षणाची चर्चा करायला बसलो तेव्हा लक्षात आलं की माझा चष्मा मी ट्रेनमध्येच विसरून आले आहे. माझ्याभोवती सगळे 'साक्षर' लोक असल्याने पुढचा आठवडाभर माझ काही अडलं नाही. शिवाय संगणकावर अक्षराचा आकार हवा तितका मोठा करता येतो, त्यामुळे लिहायलाही मला काही अडचण नव्हती. त्यामुळे चष्म्याविना आयुष्य काही तितकं खडतर असत नाही असं लक्षात आलं. 

पुण्यात परतल्यावर पहिलं काम नवा चष्मा घेण्याचं. माझ्याकडे जुना कागद होताच डॉक्टरांनी दिलेला. म्हटलं, नवा चष्मा घ्यायचा आहेच तर नंबरही एकदा तपासून घेऊ. हे डॉक्टर भलतेच व्यस्त असतात; न सांगता गेलं तर भेटायची शक्यता कमी; त्यामुळे आधी फोन केला. हे डॉक्टर  पुण्याबाहेर  आहेत हे समजलं - दहा दिवसांनी येणार होते ते. पुढचे दहा दिवस मी ऑफिसातच असणार होते आणि संगणकावर काम करणार होते. त्यामुळे दुसरा कोणतातरी डॉक्टर गाठण्याऐवजी मी दहा दिवस थांबायचं ठरवलं. वर्तमानपत्र, मासिकं, पुस्तकं वाचायला अडचण होती खरी .. पण त्यांच्याविना मी जगू शकते हे माहिती झालेलं होत तोवर. 

ते दहा पंधरा दिवस मजेत गेले माझे. संध्याकाळी ऑफिसातून घरी आलं की निवांत बसायचं; विचार करायचा ; जुनं काही आठवायचं - आणि मी बहुतेक वेळा चांगल्याच आठवणी लक्षात ठेवते - यामुळे मी हसतमुख होते. संगीत ऐकलं; रात्री झोपण्यापूर्वी योगनिद्रेची कॅसेट ऐकली; घरातली साठलेली साफसफाई केली; शेजा-यांशी गप्पा मारल्या; प्लंबर आणि इलेक्ट्रीशियन यांना बोलावून कामं उरकली.. ..वगैरे वगैरे. 

डोळ्यांच्या डॉक्टरकडे नेहमीची तपासणी झाली. त्यांच्या साहाय्यकाने सांगितलं, "आधी तुम्हाला जवळचचं कमी दिसत होत पण आता लांबचंही कमी दिसायला लागलंय, त्यामुळे चष्म्याचा नंबर बदललाय. आता तुम्हाला बाय-फोकल चष्मा वापरावा लागणार." हे ऐकून मला वाईट वाटेलं असं गृहित धरून माझी समजूत काढल्यागत तो म्हणाला, "काळजीचं काही कारण नाही. वाढत्या वयाबरोबर हे बदल होतात - हे अगदी नॉर्मल आहे." अर्थातच तो साहाय्यक पंचविशीतला होता आणि दिवसभरात तो हे वाक्य किमान पंचवीस वेळा म्हणत असणार!!

हं!! मी 'जवळच्या' गोष्टी पाहण्यात कधीच फार हुशार नव्हते; त्यांच्याकडे माझं दुर्लक्ष होतंच नेहमी. वयाचा आणि जवळचं न दिसण्याचा माझ्यासाठी काही संबंध नाही. मी त्या गुणवैशिष्ट्यासह जन्माला आले आहे हे मला माहिती आहे. पण माझा असा (गैर)  समज होता की मी 'दूरचं' पाहू शकते;  सोबत असलेल्या इतरांना ज्या गोष्टी दिसत नाहीत त्या मला दिसतात; त्या वरवर अदृश्य असणा-या गोष्टींचे अर्थ मला समजतात. माझा असा स्वत:बद्दल समज होता (अजूनही आहे) की ज्या गोष्टी जन्मसिद्ध हक्क म्हणून मला लाभल्या नाहीत त्या माझ्यासाठी असणा-या  जगाचं स्वप्न पाहण्याचा मला अधिकार आहे - तसं स्वप्न मला दिसत. हे काही सहज घडत गेलं नाही, त्यात संघर्ष होता अपार .. पण मजाही होतीच.

आता प्रत्यक्ष एका विशिष्ट अंतरापल्याडचं मला सहज दिसणार नाही. जसजसे दिवस जातील तसतशी ही शक्ती आणखी कमी होत जाणार! मला तर जवळच्या गोष्टी पाहायची सवय नाही आणि तीही शक्ती कमीच होत जाणार. मला ना दूरचं दिसणार, ना जवळचं - मग इथून पुढे मी काय पाहीन? माझ्या आयुष्यात मी काय शोधेन आता जर मला दिसणारच कमी गोष्टी तर?

वय वाढताना दृष्टी कमी होत जाते हे मला फार गंमतीशीर वाटत. बाहेरच्या गोष्टी पहायला बाह्य साधनाची मदत घ्यावी लागते हे आणखी विशेष. आधी आयुष्याच्या धावपळीत 'पहायला' वेळ नव्हता .. आता वेळ मिळेल तर पाहण्याची क्षमता कमी होत जाणार ..

फक्त तरुण वयात 'पाहता' येत का माणसाला?
की आता बाहेरच लक्ष कमी करून मी 'आत' पहावं - याची वेळ झालेली आहे?
मी विचारांत पडले.


मग अखेर नवा चष्मा आला.

त्यातून सगळ काही पुन्हा एकदा स्पष्ट दिसायला लागलं.
मनात काही प्रश्न उरले नाहीत. 
काही शंका उरल्या नाहीत. 
जे काही संभ्रम निर्माण झाले होते मनात, ते लयाला गेले. 
मनात काही किंतु राहिला नाही. 


आयुष्य मर्यादितच आहे. आणि या एका आयुष्यात अनेक गोष्टी करायच्या आहेत - ती यादी कधी संपणार नाही. 
बाह्य साधनांच्या मदतीने हा प्रवास सुकर करता येतो नक्कीच. 

जेव्हा ही बाह्य साधनंही बिनकामाची होतील, निरुपयोगी ठरतील तेव्हा मी काय करायचं हे ती वेळ, ती परिस्थिती मला सांगेलच - त्याचा विचार आत्तापासून कशाला? 

कदाचित त्या परिस्थितीत आणखी एखादी 'नवी दृष्टी' उमलेल आतून. 
एक दृष्टीच्या संपण्यातून दुसरी दृष्टी, नवी दृष्टी जन्माला येते.. हे अनुभवलं आहेच की आजवर कित्येकदा. 

या नव्या दृष्टीच स्वागत करून पुढे जात रहायला हवं....

**

13 comments:

 1. या विषयावर अशाच स्वरूपाचं काही वाचल्याचं आठवतंय. धूसर आठवण आहे. अगदी असंच अंतर्मुख करणारं गंभीर की विनोदी अंगानं जाणारं पण गंभीर, हे नीट आठवत नाही.

  ReplyDelete
 2. साधा नेहमीचा अनुभव. पण कुठल्या कुठे पोचलात तुम्ही. आवडलं लेखन नेहमीप्रमाणे.

  ReplyDelete
 3. दृष्टी कशी ’बदलत’ जाते नाही? आवडला अनुभव.

  ReplyDelete
 4. >>आयुष्य मर्यादितच आहे. आणि या एका आयुष्यात अनेक गोष्टी करायच्या आहेत - ती यादी कधी संपणार नाही

  याला पूर्ण अनुमोदन....:)

  ReplyDelete
 5. drushti badali ki drushtikon hi badalatat hoy na? chhan !aavadale!!

  ReplyDelete
 6. अनामिक/का, १ कधी आठवला तुम्हाला हा लेख तर मला जरूर सांगा; वाचायला आवडेल मला.

  अनामिक/का २, आभार.

  मोहना, दृष्टी बदलन अनेकदा अपरिहार्य असत - नाही का?

  अपर्णा, तुझीही यादी न संपणारी दिसतेय :-)

  छायाजी, स्वागत आणि आभार. दृष्टी बदलली की बहुधा कोन बदलतो जगण्याचा - म्हणून तसं होत असाव!!

  ReplyDelete
 7. लेखन आवडलं.. लेन्स वापरायला सुरुवात करण्याआधी मी चष्मा वापरत होतो. :) त्यामुळे चष्मा नसतानाचे अनुभव जवळचे वाटले..

  ReplyDelete
 8. मस्त!
  मर्यादा आहेतच, राहणारच. आपल्याला फार लांबचं आणि जवळचं दिसत नाही, आपण जगाकडे एका चष्म्यातून बघतो हे माहित असणं सुद्धा महत्त्वाचं आहे, नाही का? :)

  ReplyDelete
 9. वाह! आयुष्याकडेही या चष्म्यातून म्हणजे दृष्टीतून पाहायला हवे.
  By the way, ही दृष्टी मिळायला निमित्त झालेली आपलीच अलाहाबाद टूर काय?

  ReplyDelete
 10. चष्मा, जवळचं दिसणं/न दिसणं आणि दूरदृष्टी या सगळ्यांची इतकी सुंदर आणि चपखल सांगड घातलेलं लिखाण मी यापूर्वी बघितलेलं नाही !!!

  ReplyDelete
 11. अखिलदीप, बहुधा प्रत्येकाचे हेच अनुभव असतात.. ते कोणीतरी मांडले की आपल्याला आपलेही अनुभव आठवतात!

  गौरी, हो, जगाकडे आपण सगळे कायम एका चष्म्यातून बघत असतो - हे कळलं की खूप गोष्टी बदलतात आपल्या आत!

  प्रीति, हो, हा आपल्या प्रतापगढच्या प्रवासाचा अनुभव. इंग्रजी पोस्ट तेव्हा लगेच लिहिली होती - आता इतक्या काळाने हा त्याचा मराठी अनुवाद!

  हेरंब, वय वाढत गेलं की आपण अशा गोष्टी वाचायला आणि पाहायला लागतो हे खरचं!

  ReplyDelete
 12. दूरच दिसणं लहानपणीच कमी झालेलं, जवळचं वाचताना चष्मा काढून ठेवावा लागतो...आणि संगणकावर काम करताना वेगळा चष्मा लावावा लागतो...अशी परिस्थिती. म्हणजे कायम वेगवेगळ्या नजरेतून बघावे लागते. :)
  आणि सध्या आयुष्याच्या ह्या टप्प्यावर, नजर आत वळवलीय...आपल्या मनाकडे आपण तरी निदान नजर टाकावी म्हणते ! :)

  एका दृष्टीच्या संपण्यातून नवी दृष्टी जन्माला येते....हे खरंच...अगदी पटले. :)

  ReplyDelete
 13. अनघा, कायम वेगवेगळ्या नजरेतून बघणं प्रत्यक्ष बघत असताना त्रासदायक वाटतं खरं .. पण त्याच फायदाही असतो - तो फक्‍त नंतर कळतो इतकंच!

  ReplyDelete