ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, March 26, 2012

११९. पुन्हा जंतर मंतर: भाग १

'नरेन्द्र ट्रॅक्टर से कुचला गया; सोनवणे जिंदा जला दिया गया' हे वाचून मला कुठल्यातरी टी.व्ही. मालिकेची माहिती दिसते आहे असं वाटलं होत. पण लागोपाठ दोन तीन दिवस तोच निरोप येत राहिल्यावर मी तो नीट वाचला. त्यातून लक्षात आलं की तो 'इंडिया अगेन्स्ट करप्शन' कडून आलेला निरोप आहे आणि दुसरं म्हणजे २५ मार्चला 'जंतर मंतर' वर एक दिवसाच लाक्षणिक उपोषण आहे. अनायासे तो रविवार होता आणि मी दिल्लीत असणार होते; त्यामुळे जायच ठरवलं.

साधारणपणे साडेदहाला मी पोचले तोवर आधीच भरपूर गर्दी जमली होती. मागच्या वेळी 'जंतर मंतर' वर पोलिस होते पण ते निवांत होते. याहीवेळी ते निवांत होते पण सावध होते - त्यामुळे सुरक्षा तपासणीतून जावं लागलं - ज्याबद्दल माझा कधीच आक्षेप नसतो. एप्रिल २०११ मधलं 'जंतर मंतर'वरचे उपोषण आणि ऑगस्ट २०११ मधलं रामलीला मैदानावरचं उपोषण हे दोन्ही मी काहीसं जवळून, म्हणजे त्यात थोडी सहभागी होऊन पाहिलं होतं. रामलीला मैदानाने तर माझा भ्रमनिरास केला होता. त्यानंतर मुंबईत फार कमी प्रतिसाद मिळाल्याचंही पाहिलं होतं. तरीही मी यावेळी परत जायच ठरवलं कारण भ्रष्टाचार हा माझ्याही मते एक मोठा सामाजिक मुद्दा आहे. शिवाय आधीच्या चुकांमधून आंदोलन काही शिकलं आहे की नाही हे पाहण्याचीही उत्सुकता होती.

यावेळच वातावरण एकदम वेगळं होत हे प्रथमदर्शनीच लक्षात आलं. एप्रिल २०११ मधल वातावरण भाबडं आणि उत्साही होतं. त्यावेळी जो तो स्वतंत्रपणे काही ना  काही करत असे. तिथे पाठीशी 'भारतमातेच' चित्र होतं आणि व्यासपीठ छोटं होतं. रामलीला मैदानावर वातावरण जास्त आक्रमक आणि काहीसं धोरणी होतं. अण्णा तोवर 'दुसरे गांधी' झालेले होते आणि 'मै अण्णा हूं' अशी टोप्या आणि टी शर्ट यांचा सुळसुळाट होता.  दोन्ही ठिकाणी घोषणाबाजांचा सुकाळ होता. 'जीत के कगार पर हम है' अशी भावना होती, काहीसा उद्दामपणा होता. जमलेली गर्दी म्हणजे आंदोलनाला पाठबळ असा साधा हिशोब तेव्हा होता.  संसदेने अधिवेशन बोलावलं म्हणजे झालंच आता काम अशी मानसिकता होती.


यावेळीही 'मै अण्णा हूं' टोप्या आणि टी शर्ट होते पण त्यांची संख्या  तुलनेने कमी होती. घोषणाही फार अंगावर येणा-या नव्हत्या - माफक होत्या - ज्या वातावरणनिर्मितीसाठी आवश्यक होत्या. गीतेही मोजकीच होती - दिवसभरात फक्त चार (किंवा पाच फार फार तर). व्यासपीठावर सगळे एकत्र बसले होते आणि मुख्य म्हणजे व्यासपीठाच्या भिंतीवर दोन तिरंगा आणि काही शहीदांचे फोटो होते. हे शहीद कोण - या प्रश्नाचे उत्तर तसं मला आलेल्या एस. एम. एस. मधे होतच म्हणा!

कार्यक्रमाची सुरुवात या शहीदांना श्रद्धांजली वाहून झाली. त्यानंतर गेल्या काही वर्षांत भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवल्याने मारल्या गेलेल्या शहीदांची ओळख करून देण्यात आली. या प्रत्येक व्यक्तीवर एक मिनिटाची फिल्म केली होती (कोणी ते माहिती नाही) ती दाखवून मग त्या व्यक्तीच्या कुटुंबियांपैकी एकजण अधिक तपशील देत होता. हा सगळा कार्यक्रम अंगावर काटा आणणारा होता. राज्यांच्या सीमा ओलांडून लोक भ्रष्टाचाराविरुद्ध लढताहेत आणि शासन कोणत्याही पक्षाचे असो, त्याची किंमत कार्यकर्ते मोजत आहेत हे चित्र विषण्ण करणारं होतं.

होळीच्या दिवशी (८ मार्च २०१२) बेकायदेशीर खाणकामाविरुद्ध आवाज उठवणारा पोलिस अधिकारी नरेन्द्र कुमार ट्रॅक्टर अंगावर घालून मारला जातो; सत्येन दुबे (२८ नोव्हेंबर २००३) राष्ट्रीय महामार्गातील भ्रष्टाचार पंतप्रधान कार्यालयाला 'माझे नाव गुप्त ठेवा' अशी विनंती करत कळवतो. त्यावेळी केंद्रात वाजपेयींच्या नेतृत्वाखाली एन. डी. ए. चे सरकार होते आणि बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांचे. तरीही पंतप्रधान कार्यालयातून हे पत्र 'फुटते' आणि दुबे यांची हत्या होते. लखनौ आय. आय. एम. मधून पदवी घेतल्यावर मंजूनाथ इंडियन ऑईल मध्ये काम स्वीकारतो आणि तेलात भेसळ पकडताना २७व्या वर्षी (१९ नोव्हेंबर २००५) गोळ्या घालून मारला जातो.

अमित जेटवा हा गुजरातमधील 'माहिती अधिकाराचा' कार्यकर्ता. सौराष्ट्रातल्या बेकायदेशीर खाणकामाबद्दल त्याने रीतसर तक्रार नोंदवली होती. २० जुलै २००९ रोजी कोर्टासमोर गोळ्या घालून त्याचा जीव घेण्यात येतो. आंध्र प्रदेशातील सीतारामपूर भागातील सोला रंगा राव हा तीस वर्षांचा पोलिओग्रस्त तरूण. गावातील विकास कामासाठी किती पैसे आले आहेत अन ते कसे खर्च झाले आहेत हे कळावे म्हणून 'माहिती अधिकारा'अंतर्गत तो अर्ज दाखल करतो, त्यापायी त्याला १५ एप्रिल २०१० रोजी जीव गमवावा लागतो. त्याला सळईने मारहाण झालेली दिसते. झारखंडमधला ललितकुमार मेहता रोजगार हमी योजनेतील घोटाळे उघडकीस आणतो आणि त्यालाही १४ मे २००८ या दिवशी मारण्यात येते. झारखंडमधल्या कामेश्वर यादवची याच गोष्टीसाठी ७ जून २००८ रोजी हत्या होते. याच राज्यातल्या नियामत अन्सारीने आपले प्राण असेच गमावले.

बेगुसराय (बिहार)मधल्या शशिधर मिश्राची तर रोजगार हमी घोटाळे उघडकीस आणले म्हणून त्याच्या घरासमोर त्याला गोळ्या मारून त्याची चाळणी केली गेली ती १४ फेब्रुवारी २०११ या दिवशी. पुण्याचे 'माहिती अधिकार' कार्यकर्ते सतीश शेट्टी (१३ जानेवारी २०१०) आणि कोल्हापूरचे दत्ता पाटील (२६ मे २०१०) यांच्या हत्यांची आपल्याला माहिती आहेच. महेन्द्र शर्मा, विश्राम ढुढिया, तामिळनाडूचा सतीशकुमार, उत्तर प्रदेशातले डी.पी. सिंग ... एकामागून एक घटना आणि त्यातले साम्य जाणवत होते. एक जण कोणीतरी घोटाळा शोधून काढतो, संबंधितांना त्याचा कायदेशीर जाब विचारला जातो आणि शेवटी तो स्वतःचे प्राण गमावतो. जाणारा तर गेला पण भ्रष्टाचाराचा भस्मासूर मात्र तसाच कायम आहे. यातल्या अनेक खटल्यांचे निकाल लागणं तर सोडून द्या, आरोपीही अद्याप सापडलेले नाहीत.  लोकपाल' कायदा असता तर या लढणा-या कार्यकर्त्यांना संरक्षण देता आले असते, निदान काही जीव तरी वाचले असते - अशी संयोजकांची हळहळ अनेकांना स्पर्श करून गेली आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढणे हे  फक्‍त  तिरंगा लहरवत 'वंदे मातरम' म्हणण्याइतके सोपे नाही याची जाणीव जमलेल्या लोकांना होते आहे असं त्यांच्या संवादावरून, त्यांच्या विचारमग्न चेह-यांवरून जाणवलं मला. या शहीदांच्या घरच्यांची हिंमत खरच दाद देण्याजोगी होती. ललितकुमारची पत्नी जेव्हा म्हणाली, "मी तर या एका आशेवर जगतेय की ज्यासाठी माझ्या पतीला प्राण द्यावा लागला, त्या भ्रष्टाचाराचा कधीतरी नाश होईल ..." तिच्या या जिगरबाज शब्दांनी  तिथे जमलेले लोक क्षणभर निस्तब्ध झाले.

मी मागेही म्हटले होते तसे दिल्लीच्या एरवी अतिशय आक्रमक आणि स्त्रियांशी गलिच्छ वागणा-या गर्दीचा मला आणखी एक चांगला अनुभव आला. लोकांच्या एकत्र येण्याचे कारण जर चांगले असेल तर लोक आपणहोऊन चांगले वागतात हे पुन्हा एकदा अनुभवायला मिळाले. सात तास मी एकटी स्त्री अनोळखी लोकांच्या गर्दीत होते पण मला काहीही त्रास झाला नाही. सहा सात तास एकत्र बसल्यामुळे आसपासच्या लोकांशी थोडी ओळख झाल्यासारखे वाटायला लागले होते. साधारण संध्याकाळी पाचच्या सुमारास माझ्याशेजारी एक पुरुष येऊन बसला तेव्हा त्याला मात्र मला 'नीट बसा तुम्ही' असं सांगायला लागलं. माझ हे वाक्य ऐकून शेजारच्या अनेकांनी त्याच्याकडे पाहिलं. तिस-यावेळी मी पुन्हा तेच त्या गृहस्थाला सांगितल्यावर अचानक माझ्या पुढे बसलेला दुसरा एक पुरुष त्याला म्हणाला, "ते बघा, तुम्हाला हात करताहेत." त्या गृहस्थाने त्या दिशेला वळून पाहिलं तर कोणीच नव्हत. त्यावर माझ्या पुढचा पुरुष त्याला म्हणाला, "ते बघा, ते चहाच्या टपरीकडे गेले ते, पोलिसांच्या आड आहेत ते त्यामुळे तुम्हाला दिसत नाहीत ते. जा तुम्ही तिकडे." मग हा माणूस उठून तिकडे गेल्यावर मागचा एक पुरुष पुढे सरकला. तो गृहस्थ परत आला तरी त्याला आता ती जागा परत मिळणार नव्हती. मग पुढचा माणूस माझ्याकडे पाहून हसून म्हणाला, "बसा आता तुम्ही निवांत. तो पिऊन आला होता, पण त्याला आता पळवून लावलय आम्ही." त्याच्या या हुषारीच मला  मनापासून कौतुक वाटलं.

उत्तरेत वावरताना कवींना एक वेगळा मान असल्याच जाणवतं. कविता लिहून सामाजिक क्रांती घडवून आणायची स्वप्नं आजही इथले कवी पाहतात. या कवींना स्वतःच्या रचना अत्यंत तालासुरात गाता येतात हे आणखी एक विशेष.  कुमार विश्वास या तरूण कवीची 'होठों पे गंगा हो, हाथों मे तिरंगा हो' ही रचना तिथं जमलेल्या लोकांना बेभान करायला समर्थ होती. 'जंतर मंतर कब तक' अशी कोणत्यातरी वाहिनीवर चर्चा चालू असल्याचे सांगून तो म्हणाला, "याच उत्तर सोप आहे: भ्रष्टाचार जब तक, जंतर मंतर तब तक” - यावर लोकांनी उस्फूर्त पाठिंबा दिला त्याला. अजमेर जिल्ह्यातल्या शहनाझ राजस्थानी या आणखी एका कवीने 'वंदे मातरम' या घोषणेसह सुरुवात केली आणि 'मी ही घोषणा देतोय याच अनेकांना आश्चर्य वाटत असेल' हेही सांगितल. क्षणभर थांबून पुढे तो म्हणाला, "मै मुसलमान हूं, मगर हिन्दुस्थानी मुसलमान हूं" - अशी वाक्य एरवी ऐकताना काही वाटत नाही; पोकळ वाटतात ती - पण त्या समुहात बसून ऐकताना त्या वाक्याने समुहात किती उर्जा पेटवली ही अनुभवण्याचीच गोष्ट आहे. 'कुछ भी हो जाये, हमको ये तस्वीर बदलनी है' या त्याच्या कवितेवर मग सगळेजण डोलत होते. सामाजिक आंदोलनांत कलेचा माध्यम म्हणून उपयोग करणं हे काही नवीन नाही आपल्याला - पण इतिहासाचा वारसा पुढे न्यायला नवीन पिढीतही तितके समर्थ कलाकार आहेत हे जाणवून बर वाटलं.


मागच्या वेळी आपण लढाई तर जिंकली पण तहात हरलो, ही जाणीव 'टीम अण्णा'ला अखेर एकदाची झाली आहे हे पुढच्या काही तासांत त्यांच्या बोलण्यावरुन लक्षात आलं. उपोषण दिल्लीत असल्यामुळे अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी यांचे समर्थक मोठया संख्येने तिथे आले असणार हे स्वाभाविक आहे. पण किरण बेदी आणि केजरीवाल यांच ज्या पद्धतीने लोक स्वागत करत होते, त्यावरून त्या दोघांवर झालेल्या आरोपाला निदान दिल्लीच्या जनतेने तरी फारशी किंमत दिलेली नाही हे स्पष्ट झालं.  त्या दोघांच बोलणं ऐकून मला हे आंदोलन आता योग्य दिशा पकडतय असं वाटलं; कारण आंदोलन दीर्घ काळ चालवावं लागणार आहे, त्यासाठी नुसती भावनिक एकता पुरेशी नाही तर आपले विचार जुळेले पाहिजेत, चर्चा आणि अभ्यास केला पाहिजे असं त्यांनी सांगितलं.

लेख फार मोठा होतोय म्हणून इथे थांबते सध्या. कदाचित थोड लिहीन आणखी पुढच्या भागात.

Sunday, March 18, 2012

११८. सात पाउले आकाशी

‘फूलघर’ ही झाडांनी वेढलेली एक सुंदर जागा. संध्याकाळच्या वेळी तिथं बसून सगळेजण चहा पीत आहेत निवांत. एक तेजस्वी आवाज विचारतो, “मनुष्याला ज्या पद्धतीने जगावसं वाटतं, त्या पद्धतीने तो जगू शकेल? विशेषकरून स्त्री? ”  तो प्रश्न असतो वसुधाचा.

अ‍ॅना, आलोपा, विनोद, मित्रा . . त्यांच मत मांडतात.

“करू शकेल. पण नंतर तो दु: खी होईल. स्त्री असेल तर विशेषत्वाने.” एक स्पष्ट उत्तर येतं.

“स्त्रीसुखाची तुमची व्याख्या काय?” वसुधाचा त्यावर  आणखी एक धारदार प्रश्न.

‘सात पाउले आकाशी’ (मूळ गुजराती शीर्षक ‘सात पगला आकाश मा') या कुंदनिका कपाडीआ यांच्या कादंबरीची सुरुवातच अशी पकड घेते मनाची. या कादंबरीचा विषय काय आहे आणि किती खोलात जाऊन त्यात विचार मांडलेले आहेत याची झलक अशी पहिल्या दोन चार पानांतच मिळते.

व्योमेशच्या आवडी-निवडींशी स्वत:चं आयुष्य बांधून घेणारी वसुधा आणि एकेका अनुभवातून जागं होत जाणारं तिचं स्वत्व. रोजच्या दगदगीत स्वत:चा म्हणून वेळ नाही, स्वत:चं अस्तित्व पुसून टाकणारी सगळी नाती – त्यात प्रामाणिकपणा नाहीच – जे करायचं  ते सगळं ‘लोक काय म्हणतील' या भयास्तव. पावसाचं, आकाशाचं, वाचण्याचं, एकट बसण्याचं . . . हे सगळं  सुख वसुधाच्या आयुष्यातून गायब झालं आहे लग्नानंतर. आई आजारी असल्याची तार आली तरी ‘व्योमेशच्या परवानगीशिवाय जायचं नाही’ या आत्याच्या  हेक्याखातर आईच्या कलेवराचं  दर्शन घ्यावं लागल्याचं  दु: ख जन्मभर बाळगणारी वसुधा.

वसुधा  घरातून पळून आलेल्या तिच्या मैत्रिणीला सुमित्राला आपल्या घरात आसरा देऊ शकत नाही. शेजारीण रंजनाला तिच्या अडचणीसाठी पाचशे रुपये हवे आहेत – पण व्योमेश ते पैसे देत नाही – वसुधाचा तेवढाही अधिकार नाही घरातल्या पैशांवर. वसुधा कोणतेच  निर्णय घेऊ शकत नाही. तिने किती वाजता उठावं; कोणत्या क्रमाने कामं करावीत – हे तिला स्वत: ला ठरवता येत नाही. हे कधीतरी संपेल, एक दिवस आपण यातून मार्ग शोधू, एक दिवस  आपण प्रामाणिकपणे जगू शकू  या आशेवर ती जगते आहे.

व्योमेशच्या आत्या लहान  वयात विधवा झालेल्या – व्योमेशला मोठ केलं ते त्यांनीच. पण आत्याच्या मृत्युची तार येऊनही घरातली पार्टी तशीच चालू ठेवणारा व्योमेश पाहून वसुधा मुळापासून हादरते. उद्या आपल्याही मरणाला व्योमेशच्या लेखी काही किंमत असणार नाही; कारण आपल्या जगण्यालाही त्याच्या लेखी काही किंमत नाही या जाणीवेने ती बदलून जाते. वसुधाच्या या आंतरिक आणि बाह्य संघर्षाची कहाणी मग कादंबरीत हळूहळू उलगडत जाते.

मग कथानकात पुढे अनेक स्त्रियांचे आणि त्यांच्या जगण्याचे चित्रण येते – आपुलकीच्या बळावर स्वत: च्या इच्छेविरुद्ध लग्नाला संमती द्यावी लागतेय हे माहिती असल्याने दुखावलेली सुमित्रा; कामाच्या ओझ्याखाली पिचलेली पण ते व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य नसलेली लीला; नव-याच्या संशयी स्वभावाने पिचून गेलेली आणि मार खाणारी - एके काळी संस्कृत वाड्मयाचा अभ्यास असणारी ललिता; सतीशसाठी सगळ सोडणारी  वासंती - पण ती शस्त्रक्रियेसाठी  इस्पितळात दाखल असताना स्वत: च्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम रद्द न करू शकणारा सतीश;  मुलासाठी एक कप कॉफी  करायला सांगितली तर धुमसणारा विपुल. . . . . यातल्या अनेक स्त्रिया आणि अनेक पुरुष ओळखीचे वाटतात, कोणीही अवास्तव  वाटत नाही   - हे या पुस्तकाचं  सगळ्यात मोठ यश आहे.

ही कादंबरी सध्याच्या समाजरचनेतल्या स्त्रियांच्या स्थानाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करते – जे प्रश्न खरं तर एरवी अनेक स्त्रियांना (आणि काही पुरुषांनाही) पडतात पण ते विचारणं हा एक गुन्हा मानला गेलाय. उदाहरणार्थ, स्त्रीचं घर कोणतं? घरात तिच्या आकांक्षांचा कितपत मान राखला जातो; नोकरी करत असली तरीही घरकाम ही मुख्यत्वे स्त्रियांचीच जबाबदारी का? लग्नानंतर आपले छंद पुढे चालू ठेवणं स्त्रियांसाठी  इतकं अशक्यप्राय का होउन जात? स्त्री म्हणजे फक्त  तिच शरीर का? तिने नेहमी स्वत: ला झाकूनच जगायला हवं का? कितीतरी प्रश्न.

इथं अनेक संवेदनशील पुरुषही भेटतात. ईशाला एकटं बसून विचार करायला आवडतं याची जाणीव ठेवणारा आणि थंडी वाजू नये म्हणून तिच्यासाठी आठवणीने शाल आणणारा स्वरूप; घटस्फोट घेतलेल्या पत्नीबद्दल  कधीही कडवटपणाने न बोलणारा विनोद; सगळ्यांना हसवणारा आदित्य; ‘पोळ्या लाटणं हे किती कंटाळवाणं काम आहे' याचा अनुभव आल्यावर बेकरी उघडणारा अग्निवेश; मुलगी छोटी आहे आणि माझ्या कु्टुंबाला माझी गरज आहे म्हणून परदेशी जाण्याची संधी नाकारणारा गगनेंद्र; सलोनीची काळजी घेणारा कृष्णन  . . . . . ही कादंबरी स्त्रिया विरुद्ध पुरुष अशा संघर्षाची मांडणी करणारी नसून स्त्रिया आणि पुरुष यांनी एकमेकांसोबत (फक्त पती आणि पत्नी या भूमिकेतून नाही, सर्व प्रकारच्या भूमिकेत) , स्त्रियांनी इतर स्त्रियांसोबत आनंदाने जगण्यासाठी काय केलं पाहिजे याच उत्कट  स्वप्न ही कादंबरी रंगवते.    

या कादंबरीत जयाताई आणि अ‍ॅना या सासू-सुनेच नातं वेगळ्याच पद्धतीने समोर येत. कोणत्याही नात्यांत दोन्ही व्यक्तींना  उमलण्याची शक्यता निर्माण करत जगता येतं याची ग्वाही त्या दोघींचा प्रवास बघताना मिळते – जे फार आनंददायी आहे.

पुस्तकाची  प्रस्तावनाही वाचनीय आहे. त्यात एकूण स्त्रियांच्या विकासाचा विचार मुद्देसुदपणे मांडला आहे. उदाहरणार्थ हा परिच्छेद बघा:

समानतेचा अर्थ इतकाच आहे की स्त्रीला राजकीय, वैधानिक, सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक क्षेत्रात पुरुषाइतकाच अधिकार हवा. तिला बौद्धिक आणि इतर शक्‍तींचा विकास करण्यासाठी पुरुषाइतक्याच संधी मिळावयास हव्यात. कुटुंबाची रचना अशी असायला हवी की श्रम आणि संपत्ती ह्या दोन्हींमध्ये दो्घांचा सारखा वाटा असावा. असे मो्कळे वातावरण असलेल्या समाजात स्त्री वस्तू नव्हे, व्यक्ती  असेल. पुरुष ज्याप्रमाणे स्त्रीच्या फायद्यासाठी किंवा सुखासाठी जन्माला आलेला नाही, त्याप्रमाणेच स्त्रीसुद्धा फक्त पुरुषाच्या फायद्यासाठी किंवा सुखासाठी जन्माला आलेली नाही. भिन्न व्यक्तिमत्व  पण समान शक्ती  असलेल्या व्यक्ती  म्हणून उभयतांची गणना करायला हवी. “

१९८२-८३ मध्ये ही कादंबरी ‘जन्मभूमि प्रवासी’च्या रविवारच्या अंकात क्रमश: प्रसिद्ध झाली होती –  ४० भागांत. या कादंबरीला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले आणि साहित्य अकदमीने या कादंबरीचा २२ भारतीय भाषांमध्ये अनुवाद केला आहे. मराठी अनुवाद उषा पुरोहित यांनी केला असून पहिली आवृत्ती   १९९१ मध्ये प्रकाशित झाली आहे.  आजच्या स्त्री प्रश्नांबाबत संवेदना जागी करण्याचं काम, जगण्याच्या धडपडीत विझलेल्या विचारांना चेतवण्याचं काम हे पुस्तक करतं.

केवळ स्त्रियांनी नाही तर पुरुषांनीही हे पुस्तक आवर्जून वाचाव असं मी सुचवेन.


सात पाउले आकाशी
लेखिका: कुंदनिका कापडीआ
अनुवादिका: उषा पुरोहित
प्रकाशक: साहित्य अकादमी, नवी दिल्ली
किंमत: रुपये १८०/- 

Saturday, March 10, 2012

११७. सांभाळ

त्या प्रसंगाला तीन वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेलाय. पण आजही ते चित्र जसच्या तसं डोळयांसमोर येत राहतं माझ्या! 

त्या शनिवारच्या सकाळी मी एका छोटया गावात होते. सकाळचे जेमतेम अकरा - साडेअकरा वाजले होते, पण सूर्य डोक्यावर अक्षरश: तळपत होता. बस स्थानकावर मला उतरवून घ्यायला जे स्थानिक कार्यकर्ते आले होते, त्यांच्यापैकी एकाच या शाळेत काम होत. मला कोणाला भेटायच नव्हत शाळेत; म्हणून शाळेच्या आवारात थांबवलेल्या चारचाकीत मी  नुसतीच बसून होते. 

डाव्या हाताला दिसत असलेली शाळेची इमारत देखणी होती. शाळेसमोर भव्य पटांगण होत - त्या खुल्या मैदानामुळे त्या इमारतीला एक प्रकारचा उठाव आला होता. त्या मोठया मैदानातून अनेक मुलं-मुली जा-ये करत होती. ते बहुतेक सगळे घरी चालले होते शाळा संपवून. त्याचवेळी मैदानाच्या एका बाजूने, माझ्या गाडीजवळून जाणा-या दोन लहान मुलांनी माझ लक्ष वेधून घेतलं.

ती मुलगी साधारणपणे सात-आठ वर्षांची असेल. पांढरा ब्लाऊझ आणि निळा स्कर्ट असा गणवेश तिच्या अंगावर होता. केस छोटेच होते तिचे पण त्याची तिने ऐटदार शेपटी बांधली होती (पोनी टेल). तिच्या पाठीवर दप्तर होतं. तिच्या डाव्या खांद्यावर आणखी एक दप्तर लटकलेलं होतं - ते बहुधा त्या मुलाचं होतं. हा चार-पाच वर्षांचा मुलगा तिचा धाकटा भाऊ असावा अशी मी अटकळ बांधली. तिच्या उजव्या खांद्यावर आणखी एक कापडी पिशवी होती - त्यात एखादी वजनदार वस्तू असावी असं मला वाटलं. छोटा भाऊ हसत हसत बहिणीला काहीतरी सांगत होता. त्याचे कुरळे केस कपाळावर आले होते - त्यासोबत त्याचे चमकते डोळे हा पोरगा खटयाळ आहे अस सांगत होते. धाकटया भावाला शाळेतून नीट घरी घेऊन येण्याची जबाबदारी आज त्या ताईकडे (तीही छोटीच होती म्हणा!) दिसत होती तर!  

छोटयाच्या मनात अर्थातच वेगळे बेत होते. ताईला आपण सहज गुंडाळू शकू याची त्याला अनुभवातून आलेली खात्री असणार. त्यामुळे आज शाळेतून घरी जाताना पाहिजे ते करायला आपण मोकळे आहोत असा त्याचा अविर्भाव दिसत होता. ताई जास्त रागावू शकणार नाही हे त्याला माहिती होतं त्यामुळे तो जरा जास्तच खोडकर मूडमध्ये दिसत होता. ताईचा हात सोडून;  त्याने घरचा रस्ता सोडून इकडेतिकडे धावायला सुरुवात केली. ताई त्याला हाक मारत होती, स्वत:चा हात पुढे करून त्याला बोट पकडायला सांगत होती. तिच्या हाकांकडे साफ दुर्लक्ष करत छोटा जोरात धावत होता - ताईपासून लांब. मग ती ताई त्या तीनही पिशव्यांचे ओझे सांभाळत भावाच्या मागे धावायला लागली. छोटा मधेच पळायच थांबवून 'आपण याला पकडूच एका क्षणात' अशी आशा ताईच्या मनात जागवत होता. ताई हाताच्या अंतरावर आली की छोटा परत जीव खाऊन पळत होता. छोटयाचे हात मोकळे होते, दप्तर ताईच्या गळ्यात अडकवून तो मोकळा झाला होता, त्यामुळे तो मस्त पळत होता. 'पकड बघू मला आता' असं ताईला तो चिडवतही होता. त्याला मस्त मजा येत होती असं पळायला आणि ताईला चिडवायला. 

सुरुवातीला ताईही हसत होती, तिलाही मजा वाटत होती बहुतेक. पण दोन तीनदा असं झाल्यावर मात्र ती रडकुंडीला आली. छोटयाला आपण इतक्या तीन पिशव्यांच्या ओझ्यासह पकडू शकणार नाही याची तिला जाणीव झाली बहुतेक. मैदान चारी दिशांनी मोकळच असल्याने छोटा कोणत्याही दिशेने पळत होता आणि मागच्या दहा मिनिटांत ते अजिबात पुढे सरकले नव्हते - गोल गोल त्याच ठिकाणी फिरत होते ते. चौथ्यावेळी जवळजवळ हातात आलेला छोटा निसटून लांब पळाल्यावर मात्र ताईचा धीर खचला. ती खाली बसली. तिच्या दोन्ही खांद्यावरच्या पिशव्या जमिनीवर पडल्या. ती मान खाली घालून हुंदके द्यायला लागली. तिच शरीर थरथर कापत होतं - अपमानाने की अपयशाने ते कळायला मला काही मार्ग नव्हता. गुढग्यांत आपला चेहरा लपवून ती रडत होती. ती अगदी असहाय्य वाटली मला त्या क्षणी. 

आपण मदत करावी त्या ताईला की मधे पडू नये अशा दुविधेत सापडले मी तेव्हा. मी एकदम नवखी असल्याने मी मधे पडले तर त्या मुलांना माझी भिती वाटू शकते हेही होतच, ते मला टाळायच होत. दोन मिनिटं वाट पाहू, बघू पुढ काय होतय ते असा विचार करून मी गाडीत तशीच शांत बसून राहिले. आपल्याकडे कोणाच लक्ष आहे हे त्या दोघांच्या गावीही नव्हत. 

दरम्यान छोटा पळत पळत थोडा दूर गेला होता. मागे वळून पहात 'पकड मला, पकड' अस हसत तो ओरडत होता. त्याला आधी त्याच्या नजरेच्या टप्प्यात ताई दिसलीच नाही. त्याच ओरडणं थांबल, चेह-यावरच हसू मावळलं. साशंकपणे त्याने भोवताली पाहिलं - मग त्याला थोडी दूर जमिनीवर फतकल मारून बसलेली त्याची ताई दिसली. एक क्षणभर त्याला काही समजलं नाही. त्याने इकडेतिकडे पाहिलं - कशासाठी ते मला कळलं नाही. त्याचे डोळे विस्फारले. क्षणभर तो तसाच उभा राहिला - अगदी शांतपणे. 

मग तो दात ओठ खात अगदी जीवाच्या आकांताने धावत सुटला. पण यावेळी तो ताईपासून लांब पळत नव्हता तर ताईकडेच चालला होता. तो ताईच्या अगदी जवळ आला; पण ताई तर अजून मान खाली घालून रडतच होती. छोटयाने मागून ताईच्या गळयात हात टाकले, त्याने ताईचा चेहरा वर करून तिच्या गालाचा पापा घेतला, त्याने तिच्या पाठीवर हात फिरवला आणि ताईचे दोन्ही हात पकडून तो ताईला उठवायला लागला. मधेच थांबून त्याने ताईचा चेहरा पुन्हा वर केला, तिच्या गालावरचे पाणी त्याने स्वतःच्या हातांनी पुसून टाकले. ताईला छोटयाची ही एक युक्ती वाटली. आपण उभे राहिलो की छोटा पुन्हा लांब पळेल अशी तिला बहुतेक भिती वाटत होती, त्यामुळे आता ती उठायला तयार नव्हती. 

एक हात ताईच्या हातात तसाच ठेवून दुस-या हाताने छोटयाने एक पिशवी जवळ ओढली. त्यातून पाण्याची बाटली काढून त्याने ताईला पाणी प्यायला दिलं. मग ताईही हसायला लागली. आता छोटयाने हात थोडा ओढला तिचा आणि ती उठून उभी राहिली. छोटयाने आपल दप्तर आपल्या पाठीवर लटकवल, ताईच्या खांद्यावर दुसरी पिशवी लटकवायला तिला मदत केली. मग छोटयाने आपला हात पुढे केला, तो ताईने पकडला ... आणि ते दोघेही त्यांच्या घराच्या दिशेने चालायला लागले. 

ब-याच अंतरापर्यंत मला ते दोघे दिसत होते. दोघं बोलत होते, हसत होते. दोघंही मजेत चालले होते. आधी फक्त ताई छोटयाला जपत होती; आता मात्र छोटाही ताईची काळजी घेत होता. त्यांच नातं तेच होत, फक्त नात्यातली भूमिका मात्र बदलली होती. सांभाळ दोघंही एकमेकांचा करत होते. 

Sunday, March 4, 2012

११६. सुटका

सकाळी आश्विन दचकून जागा झाला असं म्हणता येणार नाही.
रात्रभर त्याचा डोळ्याला डोळा लागलाच नव्हता. झोप नव्हती, तर जाग येण्याचा प्रश्न कुठे उद्भवतो?
पण अशा प्रसंगी कोणाच्याही मनात यावी तशी स्वाभाविक शंका आश्विनच्या मनात आली – तो जागा आहे? की स्वप्नात आहे?
पण त्याला एकदम जाणवतं की नाही, हे स्वप्न नाही.
दु:खाचे ते सगळे क्षण आश्विनला आठवतात.
तो मुकाट्याने उठतो. सवयीने आंघोळ उरकतो. तो तयार होतो तेव्हा रोजच्याप्रमाणे सकाळचे साडेसहा वाजलेले असतात.
“कपभर दूध घे बेटा. दोन बिस्कीटं पण खाऊन घे. कालपासून पोटात काही नाही तुझ्या, उपाशीच आहेस तू. जेवायला आजही किती वाजतील सांगता येत नाही ....” आईचा स्वर आर्जवी आणि मायेचा आहे.

पण आश्विनला तिच्या बोलण्याची तिडीक येते. संतापाची कळ पार मस्तकात पोचते. सगळ माहिती असून आई आत्ता खाण्याचा विचार तरी कसा करू शकते असा प्रश्न आश्विनला पडतो. आईला ताडताड बोलावं अशी अनावर उर्मी त्याच्या मनात दाटते. पण तो काही बोलत नाही. स्वत:च्या संतापावर तो मौनाचं आवरण टाकतो. तो आईची नजर टाळत मान हलवतो. आईला त्याचा नकार स्पष्ट कळतो.

आई काहीतरी बोलण्याच्या विचारात आहे. पण आश्विनच्या चेह-याकडे पाहून ती गप्प होते. आश्विन दाराकडे वळतो तेव्हा न राहवून ती पुन्हा म्हणते, “मी येते तिकडे साडेनऊपर्यंत. शारदाबाई येऊन गेल्या कामाच्या की लगेच निघते. उशीर नाही व्हायचा मला. राजेश किती वाजता पोचेल काही माहिती आहे का तुला?”

“नाही माहिती मला. कळेल आता गेलो की, “ आश्विन तुटकपणे बोलतो. आईच्या बोलण्याचा अर्थ त्याला कळत नाही.

“आता हिला चिंता पडलीय ती कामाची बाई वेळेत येईल की नाही त्याची ....” आश्विन स्वत:शी कडवटपणे बोलतो.

शंतनुच्या घरी इतक्या भल्या सकाळी जाण्याची आश्विनची ही काही पहिली वेळ नाही. पण आजची गोष्ट वेगळी आहे. आजवर लाखो वेळा चाललेली ही वाट. जवळजवळ रोज एकदा तरी शंतनूकडे त्याची फेरी ठरलेली. आधी चालत, मग अनेक वर्ष सायकलवर आणि अगदी आत्ता आता बाईकवर. कधी त्याच्या घराकडून शंतनूच्या घराकडे जायचं तर कधी परत यायचं – नेहमीचा पायाखालचा रस्ता – इतका सवयीचा की डोळे मिटून खड्डे कसे चुकवायचे ते सांगता येईल आश्विनला. पण आज मात्र त्याला अडखळल्यासारखं वाटतंय. घरातून बाहेर तर पडला तो पण त्याला शंतनूच्या घरी जावसं वाटत नाहीय आज. त्याच्या पायातली ताकद जणू संपलीय सगळी.

अगदी खेळघरापासून ते थेट बारावीपर्यंत आश्विन आणि शंतनू ही जोडगोळी आसपासच्या सगळ्यांना माहिती. अगदी चार महिन्यापूर्वी दोघांना वेगवेगळ्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला - तोवर सगळ्या गोष्टी त्यांनी एकत्रच केलेल्या. आताही कॉलेज वेगळे असले तरी रोज संध्याकाळची – अन तेही जमले नाही तर रात्री दहा अगदी अकराची - त्यांची भेट ठरलेली. शिवाय एस. एम. एस., मेल, फेसबुक गुगल प्लस ... हे सगळ असायचच सारखं. कोठेही असले तरी शंतनू आणि आश्विन असे सोबतच असायचे एकमेकांच्या कायम. शंतनूला माहिती नाही असं आश्विनच्या आयुष्यात काही नव्हतं आणि शंतनू आपल्यापासून काही लपवून ठेवत नाही याची आश्विनला खात्री होती.

पण आता ते सगळं अचानक संपलं! आता शंतनू सोबत गप्पा मारता येणार नाहीत; फालतू विनोद सांगून हसता येणार नाही; विनाकारण राग काढता येणार नाही; त्याच्याबरोबर मजेत घालवायचे दिवस संपले – त्याच्या खांद्यावर डोक ठेवून रडताही नाही येणार आता कधी.

हे सगळं करायला शंतनू राहिलेलाच नाही आता या जगात. 
तो अपघात जीवघेणा ठरला ख-या अर्थाने.

आश्विनला शंतनूची ती शेवटची नजर आठवते. तो काय सांगत होता आश्विनला? शंतनूच्या डोक्यात त्या क्षणी नेमकं काय असेल? त्याची सगळी स्वप्नं, सगळे विचार,सगळ्या भावना, सगळे अनुभव ... त्यांचं काय झालं? शरीर जातं तेव्हा तेही निघून जातात का? पण कुठे जातात?

हॉस्पिटलायाझेशन, पोलीस चौकशी, कोमातला शंतनूचा शांत वाटणारा चेहरा – असं वाटतं होतं की तो फक्त झोपला आहे, एक हाक मारली की जागा होईल! तो ‘लाईफ सेविंग औषधांचा मारा’;  वेंटीलेटर जोडतानाची अदम्य आशा; आणि शेवटी मागे उरलेलं शंतनूचं  निष्प्राण शरीर! सगळं  जग काही दोन दिवसांत उलटपालट होऊन गेलंय!

‘असं होणं शक्य नाही. मला फक्त वाईट स्वप्न पडतंय ...” आश्विन स्वत:ला सांगायचा प्रयत्न करतो. पण त्या प्रयत्नातला फोलपणा जाणवून त्याच्या डोळ्यांत पाणी येतं. तो पाय ओढत चालत राहतो.

त्याला  सगळं आठवतंय .. अगदी आत्ता घडत असल्यासारखं! रविवारची सकाळची वेळ . शंतनू आश्विनची नवी कोरी बाईक चालवत होता; आश्विन त्याच्या पाठीशी बसून त्याला कॉलेजमधला कालचा कसला तरी विनोद सांगत होता आणि दोघेही खळाळून हसत होते. आश्विनला स्पष्ट दिसते समोरून येणारी लाल रंगाची ती मारुती कार; त्याचा रोखलेला श्वास ... तिथपासून ते डॉक्टरांनी केलेली शंतनूच्या मृत्युची निर्दयी घोषणा ...........

आश्विन पुन्हापुन्हा विचार करतोय .. त्याने काहीतरी वेगळ केल असतं तर शंतनूचा जीव वाचला असता का? कोणत्या कुमुहूर्तावर त्याला ही नवी बाईक घ्यायची इच्छा झाली? कशाला तो नेमका त्याच वेळी विनोदी बोलत होता? आश्विनला साध खरचटलंही नाही आणि शंतनू मात्र गेला जग सोडून.

आशा निराशेचे ते अठ्ठेचाळीस तास आश्विनला चांगलेच आठवतात.

“कुठ आहेस तू, शंतनू? “ आश्विन आकाशाकडे पहात विचारतो. रस्त्यातून जाणारा पेपरवाला त्याच्याकड नवलाने पाहतो आणि काही न बोलता पुढे जातो. शाळेत जाणारी मुलं थबकून त्याच्याकडे पाहतात आणि आपापसात खोडसाळपणे हसतात. 

आश्विनला त्या कशाचीच दखल नाही. तो विचारात आहे – मृत्युनंतर जीवन असतं का? शंतनू ते मला सांगेल का? त्याला तिथं काय दिसत असेल? त्याला दु:ख झालं असेल का खूप मरताना? मी त्याला मिस करतोय हे त्याला कळत असेल का? एकदा तरी परत भेटावा शंतनू अस त्याला फार वाटतंय.

आश्विन शंतनूच्या घरी पोचतो. दार उघडंच आहे.
“ये” शंतनूचे बाबा म्हणतात. एका रात्रीत ते खूप म्हातारे झाले आहेत असं आश्विनला वाटतं.
“अरे, आश्विन, तू आहेस होय? फार लवकर आलास तू ” राघव, शंतनूच्या बहिणीचा – रचनाचा – नवरा म्हणतो. एका रिकाम्या खुर्चीकडे हात दाखवत तो आश्विनला बसायला खुणावतो.


“रचना, आश्विन आलाय, त्याच्यासाठी पण चहा आण,” काकांच्या या बोलण्यावर आश्विनला एकदम धक्का बसतो. तिकडे शंतनूचं शरीर हॉस्पिटलमध्ये पडलय अद्याप, राजेशभय्या सौदीहून आला की स्मशानात जायचंय. काहीच न घडल्यागत काका चहाचा विचार तरी कसा करताहेत? शंतनू मेला आहे हे विसरून गेले की काय सगळे अशी शंका आश्विनला भेडसावते. 

कदाचित आपल्याला वाईट स्वप्न पडलंय फक्त अशी वेडी आशाही त्याच्या मनात उमलते. त्याला वाटतं शंतनू येईलच आतमधून आणि चहा पिऊन ते दोघे बाहेर पडतील पार्कमध्ये त्यांच्या धावण्याच्या व्यायामासाठी. पण समोर शंतनूचा मोठा फोटो आहे, त्यावरचा हार ताजा आहे ... ते पाहून आश्विनचा चेहरा काळवंडतो. तो एक उसासा सोडतो आणि डोळे मिटतो.

काकू बाहेर येतात. त्यांचे डोळे लाल आहेत आणि सुजलेले आहेत. त्या आश्विनकडे पहायचंं टाळतात. त्या बसतात. सगळे शांत आहेत. कोणीच काही बोलत नाही. कोणी कोणाकडे पाहतही नाही. ते जणू एकमेकाना ओळखत नाहीत असे त्रयस्थासारखे बसलेत. एवढ्या सगळ्या लोकांचे उसासे खोलीभर पसरत पसरत आकाशाला स्पर्श करताहेत असं आश्विनला वाटतं.

राघव ‘टाईम्स ऑफ इंडिया’ उचलून कोणत्यातरी क्रिकेट सामन्याची बातमी वाचायला लागतो. आश्विन पुन्हा एकदा हादरतो. आत्ता याला पेपर वाचायला काय सुचतंय? शंतनू आवडत नव्हता का यांना कोणालाच?

“राजेशभय्या कधी पोचतोय?” शांतता असह्य होऊन आश्विन नकळत विचारतो. त्या प्रश्नाची निरर्थकता प्रश्न विचारता क्षणीच त्याच्या ध्यानात येते.

“अरे, त्या ज्वालामुखीच्या भानगडीमुळे सगळी विमानं उशीरा येताहेत. कधी पोचेल राजेश माहिती नाही. दहापर्यंत वाट बघू त्याच्या निरोपाची – मग ठरवू अंत्यविधी कधी करायचा ते” एक नातेवाईक सांगतात. मग जमलेले अनेक लोक बोलायला लागतात. इतके लोक आहेत भोवताली याची आश्विनला पहिल्यांदाच जाणीव होते. कोणीतरी पोलीस रिपोर्टबद्दल बोलतं, कोणी स्मशान परवान्याबाबत बोलतं, कोणीतरी भटजींना सांगितलं का असं विचारतं .....

रचना चहाचे कप घेऊन येते. ती आश्विनकडे पाहून हसते. इतकं दु:खाचं हसू आजवर आश्विनने पाहिलं नाही. त्याला कळत नाही काय करायचं ते. तो मान खाली घालून स्वत:चे तळहात पहायला लागतो. शंतनूची ताई त्याचीही ताई होती आजवर ...पण अचानक तो धागा तुटल्यासारखं आश्विनला वाटतं. आपण जिवंत आहोत आणि शंतनू मात्र गेला म्हणून ताई आपल्याला दोष देत असेल .... असही त्याला वाटतं. तो परत नजर वर करतो तोवर रचना आतल्या खोलीत गेलेली असते.

काका चहाचा एक घोट घेतात आणि कप खाली ठेवतात. “रचना, चहात माझ्या दूध कमी पडलंय, जरा दूध आण” ते सांगतात. ते रागावलेले नाहीत पण त्यांचा स्वर अगदी अनोळखी वाटतो. त्यांच असं बोलण ऐकलं नव्हतं त्यानं कधी.

आश्विनचं डोकं  गरगरायला लागतं. त्याची स्वत:ची आई इतक्या उत्साहाने सकाळी चहा आणि बिस्किटाबद्दल बोलत होती तेव्हा त्याला राग आला होता. पण तरी तो समजू शकला होता तिला. तिचा स्वत:चा मुलगा वाचला होता म्हणून ती स्वत:ला नशीबवान समजत असेल तर ते स्वाभाविक आहे एका अर्थी. पण शंतनू तर गेलाय. मग त्याचे आई-बाबा, राघव, जमलेले नातेवाईक .... या सगळ्यांवर शंतनूच्या मरणाचा काही परिणामच झालेला दिसत नाहीये. आश्विनला त्या सगळ्यांच्या वागण्याचा अर्थ लागत नाही. तो भिरीभिरी सगळीकडे पाहतो आहे.

“देवाच्या मनात जे होतं ते झालं, काय करणार आपण? परमेश्वरालाही कोवळे निरागस जीव जास्त आवडतात असं दिसतंय. त्याच्या इच्छेपुढे आपलं काय चालणार? नशीब वाईट म्हणायचं आपलं! शरीरधर्म कोणाला चुकलाय या जगात? आता हेच बघा ना. काकूंना आहे मधुमेह – उपाशी पोटी किती वेळ बसणार त्या? काकांचं प्रेशरही वाढलं असणार – गोळी घ्यायला हवी – ती पण उपाशी पोटी घेऊन नाही चालणार. राजेशचा निरोप येईपर्यंत त्या दोघांनी थोडं खाऊन घेतलेलं बरं ......” कोणीतरी नातलग बोलत होते. इतर लोक सहमतीच्या माना डोलवत होते. घरात आता गर्दी आहे भरपूर. “हाच का तो शंतनूचा मित्र?” कोणीतरी कुजबुजतं .. पण ते आश्विनला ऐकू येतं आणि तो कानकोंडा होतो.

आश्विनला काही सुचत नाही. “मी अगदी नालायक आहे ... माझा सगळ्यात जवळचा दोस्त मरण पावलाय .. त्याची मी या सगळ्यांना आठवणही करून देऊ शकत नाही. त्याला जाऊन अजून काही तास झाले नाहीत तोवर हे सगळे त्याला विसरले आहेत ......” आश्विनच्या मनात विचारांची वादळं  आहेत.

आश्विनला वाटतं – शंतनू ऐवजी मी मेलो असतो तर काय झालं असतं? शंतनूला काय दिसलं असतं? त्याला काय वाटलं असतं हे सगळं असं पाहताना? कदाचित माणसांच्या भूमिका बदलल्या असत्या – पण चित्र कमी- अधिक हेच असलं असतं याची आश्विनला खात्री आहे मनातून. म्हणजे कदाचित त्याच्या बाबांनी चहात आणखी साखर मागितली असती आणि  कमलाबाई काम आटोपून गेल्यावर काकूआश्विनच्या घरी गेल्या असत्या. ते पाहून शंतनूला काय वाटलं असतं? काय म्हणाला असता तो? कसं निभावलं असतं त्याने हे माझ्याविना? मला जे वाटतंय ते आणि तसंच शंतनूला वाटलं असतं का?

आश्विनला तिथून पळून जावसं वाटतं. शंतनूशी संबधित जे लोक आहेत त्यांच्याशी काही संबंध नको, लांब जावं त्यांच्यापासून अशी भावना त्याच्या मनात येते. त्याला जोरात ओरडावंसं वाटतं त्या सगळ्यांवर शंतनूला विसरल्याबद्दल. त्याला खूप रडू येतंय. त्याला हे सगळ विसरून शांत झोपावं वाटतंय. आपल्या वेदनेचं ओझं  कोणाच्या तरी खांद्यावर टाकावंसं वाटतंय त्याला – पण समोरचे सगळे त्याला परके वाटतात. त्याला समोर असणा-या सगळ्या वस्तू तोडून मोडून टाकाव्यात असं वाटतंय ... त्याला चार हात करायची खुमखुमी आहे .. पण कोणाशी लढाई करायची .. तो एकटाच तर आहे तिथं. त्याला वाटतं स्वत:वरच जीवघेणे वार करावेत, सूड घ्यावा शंतनूच्या मरणाचा. आश्विन भलताच हिंसक होतोय .. त्याला भीती वाटतेय खूप .. त्याला कोणाच्या तरी आधाराची गरज आहे .... पण आधार तर फक्त शंतनूचाच आणि तोच तर आता नाही ....

आश्विन डोळे मिटून घेतो .. त्याला वाटतं – ‘आता माझेही डोळे कधीच उघडले नाहीत तर किती बरं होईल’ ...त्यालाही मरायचं आहे शंतनूसारखंच!

पण ते शक्य नाही - हेही आश्विनला उमगतं. शंतनूच्या नसण्याची वेदना त्याला पुन्हा एकदा वेढून टाकते. शंतनू पुन्हा कधीही भेटणार नाही हे स्वीकारणं  त्याला जड जातंय. आपण उध्वस्त झालो आहोत आणि त्यातून उभं राहायचं बळ आपल्यात नाही याची त्याला जाणीव होते. आश्विनला एकदम असहाय्य आणि अगतिक वाटतं.

आणि अचानक त्या क्षणी आश्विनला काहीतरी समजल्यासारखं वाटतं ... नातेसंबंधांची व्यर्थता; भावनांची निरर्थकता; यशाच क्षणजीवित्व; धाग्यांचा उथळपणा .... हे त्याला आतून उमजतं ...मनुष्य हा स्वार्थी जीव आहे हे सत्य त्याच्या समोर येतं.

त्या क्षणात आश्विन मोठा होतो, तो प्रगल्भ होतो, तो क्षण त्याचं जीवन बदलवून टाकतो.

“हे  सगळं एक नाटक आहे ...प्रत्येकानं आपापली भूमिका करायची आणि पडद्याआड जायचं ... दुसर कोणीतरी येत समोर ... आणि चालू राहतं  सगळंं विनातक्रार, विनाव्यवधान! कोणावाचून कोणाचं काही अडत नाही; कोणतंही दु:ख, कोणतीही वेदना, कोणतीही भावना ...सगळं आपल्यापुरतं असतं – तेही क्षणभंगूर.. टिकत काहीच नाही अखेर. जीवनाचं चक्र फक्त शाश्वत आहे तसं  बघायला गेलं तर ..."

आश्विनच्या घशाशी हुंदका दाटून येतो. त्याच्या डोळ्यात तरारलेल्या पाण्याने सभोवताल नाहीसं होतं क्षणभर ...त्याचे हातपाय कापतात ... त्याच्याभोवती एक अफाट पोकळी आहे आणि त्यात एकटाच आहे तो ....

आश्विन, चहा थंड होतोय तुझा....” काकूंचा स्वर वेदनेने भरलाय. असा थंड चहा शंतनूला लागायचा आणि आश्विन त्याबद्दल त्याला नेहमी रागवायचा ... आणि आज आश्विन शंतनूसारखा थंडगार चहा का पितोय? आश्विन पुन्हा एकदा काकूंची नजर टाळतोय .. त्यांना काय उत्तर द्यायचं त्याला कळत नाही.

“शंतनू, लेका तू नशीबवान आहेस. आपलं कोणी नसतं, आपण एकटेच असतो हे कळण्याच्या आधीच तू गेलास. एकटं यायचं आणि एकटं  जायचं ही या जगाची रीत आहे ... दरम्यान एकटं  जगायचंही असतं ... हे सगळ लक्षात येण्यापूर्वी तू गेलास निघून ... तुला हे दु:ख भोगावं लागलं नाही यातच मला आनंद आहे. वास्तवाची झळ तुला लागली नाही हे किती बरं झालं .....” आश्विन मनातल्या मनात शंतनूशी बोलतोय.

त्याला खूप एकाकी वाटतंय ...पण त्याला पर्याय नाही हेही त्याला समजलंय.
आश्विनला जगावं लागणार या साक्षात्कारासोबत.

शंतनू सुटला.
आश्विनची मात्र सुटका नाही.

 **
पूर्वप्रसिद्धी: मी मराठी http://mimarathi.net/node/7684