ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Saturday, March 10, 2012

११७. सांभाळ

त्या प्रसंगाला तीन वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेलाय. पण आजही ते चित्र जसच्या तसं डोळयांसमोर येत राहतं माझ्या! 

त्या शनिवारच्या सकाळी मी एका छोटया गावात होते. सकाळचे जेमतेम अकरा - साडेअकरा वाजले होते, पण सूर्य डोक्यावर अक्षरश: तळपत होता. बस स्थानकावर मला उतरवून घ्यायला जे स्थानिक कार्यकर्ते आले होते, त्यांच्यापैकी एकाच या शाळेत काम होत. मला कोणाला भेटायच नव्हत शाळेत; म्हणून शाळेच्या आवारात थांबवलेल्या चारचाकीत मी  नुसतीच बसून होते. 

डाव्या हाताला दिसत असलेली शाळेची इमारत देखणी होती. शाळेसमोर भव्य पटांगण होत - त्या खुल्या मैदानामुळे त्या इमारतीला एक प्रकारचा उठाव आला होता. त्या मोठया मैदानातून अनेक मुलं-मुली जा-ये करत होती. ते बहुतेक सगळे घरी चालले होते शाळा संपवून. त्याचवेळी मैदानाच्या एका बाजूने, माझ्या गाडीजवळून जाणा-या दोन लहान मुलांनी माझ लक्ष वेधून घेतलं.

ती मुलगी साधारणपणे सात-आठ वर्षांची असेल. पांढरा ब्लाऊझ आणि निळा स्कर्ट असा गणवेश तिच्या अंगावर होता. केस छोटेच होते तिचे पण त्याची तिने ऐटदार शेपटी बांधली होती (पोनी टेल). तिच्या पाठीवर दप्तर होतं. तिच्या डाव्या खांद्यावर आणखी एक दप्तर लटकलेलं होतं - ते बहुधा त्या मुलाचं होतं. हा चार-पाच वर्षांचा मुलगा तिचा धाकटा भाऊ असावा अशी मी अटकळ बांधली. तिच्या उजव्या खांद्यावर आणखी एक कापडी पिशवी होती - त्यात एखादी वजनदार वस्तू असावी असं मला वाटलं. छोटा भाऊ हसत हसत बहिणीला काहीतरी सांगत होता. त्याचे कुरळे केस कपाळावर आले होते - त्यासोबत त्याचे चमकते डोळे हा पोरगा खटयाळ आहे अस सांगत होते. धाकटया भावाला शाळेतून नीट घरी घेऊन येण्याची जबाबदारी आज त्या ताईकडे (तीही छोटीच होती म्हणा!) दिसत होती तर!  

छोटयाच्या मनात अर्थातच वेगळे बेत होते. ताईला आपण सहज गुंडाळू शकू याची त्याला अनुभवातून आलेली खात्री असणार. त्यामुळे आज शाळेतून घरी जाताना पाहिजे ते करायला आपण मोकळे आहोत असा त्याचा अविर्भाव दिसत होता. ताई जास्त रागावू शकणार नाही हे त्याला माहिती होतं त्यामुळे तो जरा जास्तच खोडकर मूडमध्ये दिसत होता. ताईचा हात सोडून;  त्याने घरचा रस्ता सोडून इकडेतिकडे धावायला सुरुवात केली. ताई त्याला हाक मारत होती, स्वत:चा हात पुढे करून त्याला बोट पकडायला सांगत होती. तिच्या हाकांकडे साफ दुर्लक्ष करत छोटा जोरात धावत होता - ताईपासून लांब. मग ती ताई त्या तीनही पिशव्यांचे ओझे सांभाळत भावाच्या मागे धावायला लागली. छोटा मधेच पळायच थांबवून 'आपण याला पकडूच एका क्षणात' अशी आशा ताईच्या मनात जागवत होता. ताई हाताच्या अंतरावर आली की छोटा परत जीव खाऊन पळत होता. छोटयाचे हात मोकळे होते, दप्तर ताईच्या गळ्यात अडकवून तो मोकळा झाला होता, त्यामुळे तो मस्त पळत होता. 'पकड बघू मला आता' असं ताईला तो चिडवतही होता. त्याला मस्त मजा येत होती असं पळायला आणि ताईला चिडवायला. 

सुरुवातीला ताईही हसत होती, तिलाही मजा वाटत होती बहुतेक. पण दोन तीनदा असं झाल्यावर मात्र ती रडकुंडीला आली. छोटयाला आपण इतक्या तीन पिशव्यांच्या ओझ्यासह पकडू शकणार नाही याची तिला जाणीव झाली बहुतेक. मैदान चारी दिशांनी मोकळच असल्याने छोटा कोणत्याही दिशेने पळत होता आणि मागच्या दहा मिनिटांत ते अजिबात पुढे सरकले नव्हते - गोल गोल त्याच ठिकाणी फिरत होते ते. चौथ्यावेळी जवळजवळ हातात आलेला छोटा निसटून लांब पळाल्यावर मात्र ताईचा धीर खचला. ती खाली बसली. तिच्या दोन्ही खांद्यावरच्या पिशव्या जमिनीवर पडल्या. ती मान खाली घालून हुंदके द्यायला लागली. तिच शरीर थरथर कापत होतं - अपमानाने की अपयशाने ते कळायला मला काही मार्ग नव्हता. गुढग्यांत आपला चेहरा लपवून ती रडत होती. ती अगदी असहाय्य वाटली मला त्या क्षणी. 

आपण मदत करावी त्या ताईला की मधे पडू नये अशा दुविधेत सापडले मी तेव्हा. मी एकदम नवखी असल्याने मी मधे पडले तर त्या मुलांना माझी भिती वाटू शकते हेही होतच, ते मला टाळायच होत. दोन मिनिटं वाट पाहू, बघू पुढ काय होतय ते असा विचार करून मी गाडीत तशीच शांत बसून राहिले. आपल्याकडे कोणाच लक्ष आहे हे त्या दोघांच्या गावीही नव्हत. 

दरम्यान छोटा पळत पळत थोडा दूर गेला होता. मागे वळून पहात 'पकड मला, पकड' अस हसत तो ओरडत होता. त्याला आधी त्याच्या नजरेच्या टप्प्यात ताई दिसलीच नाही. त्याच ओरडणं थांबल, चेह-यावरच हसू मावळलं. साशंकपणे त्याने भोवताली पाहिलं - मग त्याला थोडी दूर जमिनीवर फतकल मारून बसलेली त्याची ताई दिसली. एक क्षणभर त्याला काही समजलं नाही. त्याने इकडेतिकडे पाहिलं - कशासाठी ते मला कळलं नाही. त्याचे डोळे विस्फारले. क्षणभर तो तसाच उभा राहिला - अगदी शांतपणे. 

मग तो दात ओठ खात अगदी जीवाच्या आकांताने धावत सुटला. पण यावेळी तो ताईपासून लांब पळत नव्हता तर ताईकडेच चालला होता. तो ताईच्या अगदी जवळ आला; पण ताई तर अजून मान खाली घालून रडतच होती. छोटयाने मागून ताईच्या गळयात हात टाकले, त्याने ताईचा चेहरा वर करून तिच्या गालाचा पापा घेतला, त्याने तिच्या पाठीवर हात फिरवला आणि ताईचे दोन्ही हात पकडून तो ताईला उठवायला लागला. मधेच थांबून त्याने ताईचा चेहरा पुन्हा वर केला, तिच्या गालावरचे पाणी त्याने स्वतःच्या हातांनी पुसून टाकले. ताईला छोटयाची ही एक युक्ती वाटली. आपण उभे राहिलो की छोटा पुन्हा लांब पळेल अशी तिला बहुतेक भिती वाटत होती, त्यामुळे आता ती उठायला तयार नव्हती. 

एक हात ताईच्या हातात तसाच ठेवून दुस-या हाताने छोटयाने एक पिशवी जवळ ओढली. त्यातून पाण्याची बाटली काढून त्याने ताईला पाणी प्यायला दिलं. मग ताईही हसायला लागली. आता छोटयाने हात थोडा ओढला तिचा आणि ती उठून उभी राहिली. छोटयाने आपल दप्तर आपल्या पाठीवर लटकवल, ताईच्या खांद्यावर दुसरी पिशवी लटकवायला तिला मदत केली. मग छोटयाने आपला हात पुढे केला, तो ताईने पकडला ... आणि ते दोघेही त्यांच्या घराच्या दिशेने चालायला लागले. 

ब-याच अंतरापर्यंत मला ते दोघे दिसत होते. दोघं बोलत होते, हसत होते. दोघंही मजेत चालले होते. आधी फक्त ताई छोटयाला जपत होती; आता मात्र छोटाही ताईची काळजी घेत होता. त्यांच नातं तेच होत, फक्त नात्यातली भूमिका मात्र बदलली होती. सांभाळ दोघंही एकमेकांचा करत होते. 

13 comments:

  1. क्लास! योगायोगानं सध्या लेसिंगची 'मारा ऍंड डॅन' वाचतो आहे. त्यात असेच ताई आणि लहान भाऊ आहेत. हा प्रसंग काही बदल केले तर त्या पुस्तकात सहज मिसळून जाईल. :)

    http://www.dorislessing.org/maraand.html

    ReplyDelete
  2. डोळ्यात पाणी आलं अक्षरश:
    :)

    ReplyDelete
  3. इन्द्रधनू, आभार.

    राज, लेसिंगच हे पुस्तक वाचलं नाही मी, आता बघते कुठ मिळतय ते!

    अनघा, माझही हेच झालं होत तेव्हा :-)

    ReplyDelete
  4. किती सहज भूमिका बदलली आहे त्याने ... हे मोठ्यांनाही जमायला हवं!

    ReplyDelete
  5. ह्र्दय अनुभव! चित्र नजरेसमोर उभं राहिलं.

    ReplyDelete
  6. श्रिया, गौरी, विद्याधर, प्रीति
    सर्वांचे आभार.

    ReplyDelete
  7. खरंय नं मोठ्यांनाही जमायला हवं हे....खूप खूप खूप छान लिहिलंय...

    ReplyDelete
  8. अपर्णा, काहींना जमतं, काहींना नाही जमतं - वयाचा प्रश्न नसतो अनेकदा असा माझा अनुभव :-)

    ReplyDelete
  9. Very nice! your writng skills are too good. Any topic you elaborate very beautifully.

    ReplyDelete
  10. वैशालीजी स्वागत आणि आभार तुमच्या प्रोत्साहनपर शब्दांबद्दल.

    ReplyDelete