‘फूलघर’
ही झाडांनी वेढलेली एक सुंदर जागा. संध्याकाळच्या वेळी तिथं बसून सगळेजण चहा पीत आहेत
निवांत. एक तेजस्वी आवाज विचारतो, “मनुष्याला ज्या पद्धतीने जगावसं वाटतं, त्या पद्धतीने
तो जगू शकेल? विशेषकरून स्त्री? ” तो प्रश्न
असतो वसुधाचा.
अॅना,
आलोपा, विनोद, मित्रा . . त्यांच मत मांडतात.
“करू
शकेल. पण नंतर तो दु: खी होईल. स्त्री असेल तर विशेषत्वाने.” एक स्पष्ट उत्तर येतं.
“स्त्रीसुखाची
तुमची व्याख्या काय?” वसुधाचा त्यावर आणखी
एक धारदार प्रश्न.
‘सात
पाउले आकाशी’ (मूळ गुजराती शीर्षक ‘सात पगला आकाश मा') या कुंदनिका कपाडीआ यांच्या कादंबरीची सुरुवातच अशी
पकड घेते मनाची. या कादंबरीचा विषय काय आहे आणि किती खोलात जाऊन त्यात विचार मांडलेले
आहेत याची झलक अशी पहिल्या दोन चार पानांतच मिळते.
व्योमेशच्या
आवडी-निवडींशी स्वत:चं आयुष्य बांधून घेणारी वसुधा आणि
एकेका अनुभवातून जागं होत जाणारं तिचं स्वत्व. रोजच्या दगदगीत स्वत:चा म्हणून वेळ नाही,
स्वत:चं अस्तित्व पुसून टाकणारी सगळी नाती – त्यात प्रामाणिकपणा नाहीच – जे करायचं ते
सगळं ‘लोक काय म्हणतील' या भयास्तव. पावसाचं, आकाशाचं, वाचण्याचं, एकट बसण्याचं .
. . हे सगळं सुख वसुधाच्या आयुष्यातून गायब झालं आहे लग्नानंतर. आई आजारी असल्याची
तार आली तरी ‘व्योमेशच्या परवानगीशिवाय जायचं नाही’ या आत्याच्या हेक्याखातर आईच्या कलेवराचं दर्शन घ्यावं लागल्याचं दु: ख जन्मभर बाळगणारी वसुधा.
वसुधा घरातून पळून आलेल्या तिच्या मैत्रिणीला सुमित्राला आपल्या घरात आसरा देऊ शकत नाही.
शेजारीण रंजनाला तिच्या अडचणीसाठी पाचशे रुपये हवे आहेत – पण व्योमेश ते पैसे देत नाही
– वसुधाचा तेवढाही अधिकार नाही घरातल्या पैशांवर. वसुधा कोणतेच निर्णय घेऊ
शकत नाही. तिने किती वाजता उठावं; कोणत्या क्रमाने कामं करावीत – हे तिला स्वत:
ला ठरवता येत नाही. हे
कधीतरी संपेल, एक दिवस आपण यातून मार्ग शोधू,
एक दिवस आपण प्रामाणिकपणे जगू शकू या आशेवर
ती जगते आहे.
व्योमेशच्या
आत्या लहान वयात विधवा झालेल्या – व्योमेशला
मोठ केलं ते त्यांनीच. पण आत्याच्या मृत्युची तार येऊनही घरातली पार्टी तशीच चालू ठेवणारा
व्योमेश पाहून वसुधा मुळापासून हादरते. उद्या आपल्याही मरणाला व्योमेशच्या लेखी काही
किंमत असणार नाही; कारण आपल्या जगण्यालाही त्याच्या लेखी काही किंमत नाही या जाणीवेने
ती बदलून जाते. वसुधाच्या या आंतरिक आणि बाह्य संघर्षाची कहाणी मग कादंबरीत हळूहळू
उलगडत जाते.
मग
कथानकात पुढे अनेक स्त्रियांचे आणि त्यांच्या जगण्याचे चित्रण येते – आपुलकीच्या बळावर
स्वत: च्या इच्छेविरुद्ध
लग्नाला संमती द्यावी लागतेय हे माहिती असल्याने दुखावलेली सुमित्रा; कामाच्या ओझ्याखाली
पिचलेली पण ते व्यक्त करण्याचं
स्वातंत्र्य नसलेली लीला; नव-याच्या संशयी स्वभावाने पिचून गेलेली आणि मार खाणारी
- एके काळी संस्कृत वाड्मयाचा
अभ्यास असणारी ललिता; सतीशसाठी सगळ सोडणारी
वासंती - पण ती शस्त्रक्रियेसाठी इस्पितळात
दाखल असताना स्वत: च्या
पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम रद्द न करू शकणारा सतीश; मुलासाठी एक कप कॉफी करायला सांगितली तर धुमसणारा विपुल. . . . . यातल्या अनेक स्त्रिया आणि
अनेक पुरुष ओळखीचे वाटतात, कोणीही अवास्तव वाटत
नाही - हे या पुस्तकाचं सगळ्यात मोठ यश आहे.
ही
कादंबरी सध्याच्या समाजरचनेतल्या स्त्रियांच्या स्थानाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करते
– जे प्रश्न खरं तर एरवी अनेक स्त्रियांना (आणि काही पुरुषांनाही) पडतात पण ते विचारणं हा एक
गुन्हा मानला गेलाय. उदाहरणार्थ, स्त्रीचं घर कोणतं? घरात तिच्या आकांक्षांचा कितपत
मान राखला जातो; नोकरी करत असली तरीही घरकाम ही मुख्यत्वे स्त्रियांचीच जबाबदारी का?
लग्नानंतर आपले छंद पुढे चालू ठेवणं स्त्रियांसाठी इतकं अशक्यप्राय का होउन जात? स्त्री
म्हणजे फक्त तिच शरीर का? तिने नेहमी स्वत:
ला झाकूनच जगायला हवं का?
कितीतरी प्रश्न.
इथं अनेक संवेदनशील पुरुषही भेटतात. ईशाला एकटं बसून विचार करायला आवडतं याची जाणीव ठेवणारा
आणि थंडी वाजू नये म्हणून तिच्यासाठी आठवणीने शाल आणणारा स्वरूप; घटस्फोट घेतलेल्या
पत्नीबद्दल कधीही कडवटपणाने न बोलणारा विनोद;
सगळ्यांना हसवणारा आदित्य; ‘पोळ्या लाटणं हे किती कंटाळवाणं काम आहे' याचा अनुभव आल्यावर
बेकरी उघडणारा अग्निवेश; मुलगी छोटी आहे आणि माझ्या कु्टुंबाला माझी गरज आहे म्हणून
परदेशी जाण्याची संधी नाकारणारा गगनेंद्र; सलोनीची काळजी घेणारा कृष्णन . . . . . ही कादंबरी
स्त्रिया विरुद्ध पुरुष अशा संघर्षाची मांडणी करणारी नसून स्त्रिया आणि पुरुष यांनी
एकमेकांसोबत (फक्त पती
आणि पत्नी या भूमिकेतून नाही, सर्व प्रकारच्या भूमिकेत) , स्त्रियांनी इतर स्त्रियांसोबत
आनंदाने जगण्यासाठी काय केलं पाहिजे याच उत्कट स्वप्न ही कादंबरी रंगवते.
या
कादंबरीत जयाताई आणि अॅना या सासू-सुनेच नातं वेगळ्याच पद्धतीने समोर येत. कोणत्याही
नात्यांत दोन्ही व्यक्तींना उमलण्याची शक्यता निर्माण करत जगता येतं याची ग्वाही त्या
दोघींचा प्रवास बघताना मिळते – जे फार आनंददायी आहे.
पुस्तकाची प्रस्तावनाही वाचनीय आहे. त्यात
एकूण स्त्रियांच्या विकासाचा विचार मुद्देसुदपणे मांडला आहे. उदाहरणार्थ हा परिच्छेद
बघा:
“समानतेचा अर्थ इतकाच आहे की स्त्रीला राजकीय, वैधानिक, सामाजिक, आर्थिक आणि
कौटुंबिक क्षेत्रात पुरुषाइतकाच अधिकार हवा. तिला बौद्धिक आणि इतर शक्तींचा विकास
करण्यासाठी पुरुषाइतक्याच संधी मिळावयास हव्यात. कुटुंबाची रचना अशी असायला हवी की
श्रम आणि संपत्ती ह्या दोन्हींमध्ये दो्घांचा सारखा वाटा असावा. असे मो्कळे वातावरण
असलेल्या समाजात स्त्री वस्तू नव्हे, व्यक्ती असेल. पुरुष ज्याप्रमाणे स्त्रीच्या
फायद्यासाठी किंवा सुखासाठी जन्माला आलेला नाही, त्याप्रमाणेच स्त्रीसुद्धा फक्त पुरुषाच्या फायद्यासाठी
किंवा सुखासाठी जन्माला आलेली नाही. भिन्न व्यक्तिमत्व पण समान शक्ती असलेल्या व्यक्ती म्हणून उभयतांची गणना करायला
हवी. “
१९८२-८३
मध्ये ही कादंबरी ‘जन्मभूमि प्रवासी’च्या रविवारच्या अंकात क्रमश: प्रसिद्ध झाली होती
– ४० भागांत. या कादंबरीला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले आणि साहित्य अकदमीने
या कादंबरीचा २२ भारतीय भाषांमध्ये अनुवाद केला आहे. मराठी अनुवाद उषा पुरोहित यांनी
केला असून पहिली आवृत्ती १९९१ मध्ये प्रकाशित
झाली आहे. आजच्या स्त्री प्रश्नांबाबत संवेदना
जागी करण्याचं काम, जगण्याच्या धडपडीत विझलेल्या विचारांना चेतवण्याचं काम हे पुस्तक
करतं.
केवळ
स्त्रियांनी नाही तर पुरुषांनीही हे पुस्तक आवर्जून वाचाव असं मी सुचवेन.
सात पाउले आकाशी
लेखिका: कुंदनिका कापडीआ
अनुवादिका: उषा पुरोहित
प्रकाशक: साहित्य अकादमी, नवी दिल्ली
किंमत: रुपये १८०/-
पहिल पुस्तक परीक्षण का हे तुमच? वाचतो पुस्तक मिळवून.
ReplyDeleteसविता ताई परिक्षण छान झाले आहे...पुस्तक वाचावेसे वाटते आहे....ह्या पुस्तकाबद्दल माहित दिल्याबद्दल धन्यवाद!
ReplyDeleteआभार अनामिक आणि श्रिया. तुम्हाला हे पुस्तक आवडेल अशी आशा आहे :-)
ReplyDeleteपरिक्षण आवडले. पुस्तक वाचावेसे वाटते आहे.
ReplyDeleteपरिक्षणाबद्दल धन्यवाद
टिवटिव, तुम्ही जरुर वाचा हे पुस्तक. मग बोलू त्यावर.
ReplyDelete