ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Saturday, November 24, 2012

१४२. लेखन: बाहेर आणि आत

‘लिहिणं’ ही जाणीवपूर्वक केली जाणारी कृती असूनही ती काहीशी धूसर आहे माझ्यासाठी.
म्हणून ‘लिहिण्या’बद्दल मला अनेक प्रश्न पडतात.
उदाहरणार्थ: ‘लिहिणं म्हणजे नेमकं काय?’
‘अव्यक्ताला व्यक्त होण्याची निकड का भासते?’
‘यासाठी शब्दांचं माध्यम का निवडलं जात?’
‘अभिव्यक्तीसाठी रचनाप्रकार (गद्य की पद्य, ललित की वैचारिक ..) कसा निवडला जातो?’
‘मला अक्षरओळख नसती, तर मी कशी व्यक्त झाली असते?’
‘लिहिण्याची प्रक्रिया आत किती असते आणि बाहेर किती असते?”
‘लिहिण्याला कशाची मदत होते? कशाचा अडथळा होतो?’
‘मी का लिहिते?’

***
‘मी लिहायला कधी लागले’, हा काही महत्त्त्वाचा प्रश्न नाही. तो फार फार तर ‘मी लिहायला का लागले’ असा विचारणं अनेकजण पसंत करतील. खरं तर आपण जे कोणी शाळेत जातो, ते सगळेच ‘लिहायला’ शिकतो. मग तरीही ‘काही लिहू शकतात’ आणि ‘काही लिहू शकत नाहीत’ अशी विभागणी कसकशी होत जाते याबद्दल मला नेहमीच कुतूहल वाटत आलेलं आहे. मान्यवर साहित्यिकांच्या जीवनात आणि साहित्यात या प्रश्नाचं उत्तर बहुधा मिळत असणार; पण त्यात मी ते कधी शोधलं नाही. कारण? आळस; बाकी काही नाही. स्वत:च्या आयुष्यात उत्तरं शोधणं मला नेहमी जास्त सोयीचं वाटतं. ते उत्तर सर्वसमावेशक नक्कीच नसतं. पण अगदी खरं सांगायचं तर ‘सर्वसमावेशक’ या शब्दाचा अर्थ संदर्भांनुसार बदलत जातो आणि तसं ‘सर्वसमावेशक’ काहीच नसतं!
‘मी कधी लिहायला लागले’ हा काही फार मोठा संशोधनाचा किंवा गूढ विषय नाही. कारण शाळेत गेले पहिल्या वर्गात, तेव्हा पाटीवर पेन्सिलनं वेगवेगळे आकार काढून त्यांना ‘ग’, ‘म’ अशी नावं असतात ती म्हणायला आणि काढायला मी शिकले. म्हणणं आणि लिहिणं या दोन्ही क्रिया एकाच वेळी व्हायच्या – म्हणजे बोलताना लिहिलं जाईलच अशी गरज नसायची. पण जो शब्द लिहायचा तो मोठमोठ्याने उच्चारत लिहायचा अशी पद्धत मला शिकवण्यात आली होती. नंतर कधीतरी लक्षात आलं की बोलणं आणि लिहिणं या दोन वेगळ्या क्रिया आहेत आणि त्या एकमेकींच्या सोबतीविनाही मजेदार असू शकतात. त्यातली कोणती गोष्ट अधिक सोपी याबद्दलचं माझं मत प्रसंगानुसार बदलत जातं!
शाळकरी वयात लिहिताना – विशेषत: पहिल्या दोन-चार इयत्तांत - डोक्यात नेमकं काय चालायचं हे माहिती नाही. पण इतरांकडे पाहून आणि शिक्षणपद्धतीचा एकंदर विचार करता ते ‘लिहिणं’ म्हणजे ‘केवळ नक्कल करणं असणार’ हे नक्की म्हणता येतं. म्हणजे पुस्तकाच्या धडयातली वाक्य ‘न पाहता’ जशीच्या तशी उतरवता येणं या कौशल्याला ‘लेखनकौशल्य’ म्हटलं जायचं असा तो काळ होता. पाटी, पेन्सिल, हात (एक पुरेसा होता!), स्मरणशक्ती आणि थोडंफार डोकं इतकंच लागायचं लिहिण्यासाठी.
आणखी पुढं गेल्यावर ‘निबंध लेखन’ हा प्रकार समोर आला. ‘कवितेतल्या ओळींचं स्पष्टीकरण’ हाही प्रकार आला. इथंही वाचलेले आणि ऐकलेले शब्द कागदावर उतरवले जाणं इतकंच अपेक्षित होतं. पण हे शब्द वर्गाबाहेरचे असायला मुभा होती. किंबहुना असे ‘बाहेरचे’ शब्द वापरल्याबद्दल कौतुक होतं. शब्दांशी खेळ करता येतो हे निबंध लिहिताना पहिल्यांदा लक्षात आलं. खरं आणि खोटं असंच फक्त नसतं – तर काल्पनिकही काही असतं आणि त्याला खऱ्या-खोट्याचा न्याय लावता येत नाही हे कळल्यावर थोडा गोंधळ झाला होता. माझा. ‘जे नाही त्याचाही विचार आपण करू शकतो’ (नाही अशा अर्थानं की जगण्यात नाही आणि पुस्तकांतही नाही) या अनुभवाने ‘ग्रेट’ वाटलं होतं. इथं आता लिहिण्याची कला ‘केवळ नक्कल’ यापल्याड जाऊ लागली. पण तरीही त्याला काही मर्यादा होत्याच. अनुभवविश्व मर्यादित असल्यानं कल्पना ताणून ताणून किती ताणली जाणार? कागद, पेन, हात, स्मरणशक्ती, थोडंफार डोकं – यासोबत ‘मनाला मोकाट सोडण्याची तयारी’ इथं जोडली गेली लेखनाच्या प्रक्रियेत. यात अनुभव, वास्तव आणि स्वप्न यांचं एक अनोखं मिश्रण व्हायला लागलं नकळत! आपल्या मनात जे काही असतं ते समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचायचं तर ‘नीट’ मांडावं लागतं (अक्षर चांगलं असणारे चांगलं लिहितात असा समज शाळेने घडवला आणि तो पुढे धक्का बसून सुटेपर्यंत सोबत होता!) हेही अनुभव शिकवून गेला होता तोवर. लिहायला ‘विचार’ करावा लागतो – निदान ते कसं मांडायचं याचा विचार करावा लागतो हे पुसटसं जाणवलं, पण त्यावर विचार नाही केला अधिक. प्राथमिक वर्गांपेक्षा इथला आवाका थोडा वाढला होता आता. काहींची कल्पनाशक्ती आणि अभिव्यक्ती इतर अनेकांपेक्षा वेगळी असते हे लक्षात आलं. चांगलं लिहिता येणं आणि हुशार असणं या दोन गोष्टींचा तसा संबंध नाही हेही कळलं. पण हा बदल सावकाश झाला असल्यानं तो जाणवलाही नव्हता.
महाविद्यालयात शास्त्र शाखेचं शिक्षण घेतल्यानं ‘भाषा’ विषयाची संगत सुटली. भाषेत ‘फक्त पास होण्यापुरते’ मार्क मिळवण्याची सोय होती. या काळात अभ्यासात जे लिहावं लागायचं त्यातून कल्पनाशक्तीला लगाम बसला पण ‘तर्क’ नावाची नवी गोष्ट आली. अंदाज तर्कानं बांधता येतात आणि अंदाज कल्पनेनंही करता येतात असं जाणवलं. मग यातले कोणते अंदाज जास्त बरोबर निघतात याचा शोध घेताना ‘तर्क’ हे जास्त चांगलं म्हणजे ‘विश्वासार्ह’ साधन आहे हे जाणवलं. लिहिण्यात आपण कल्पनाशक्ती स्वैर सोडू शकतो पण बोलताना ते करून चालत नाही हे कळल्यावर गंमत वाटून बोलणं आणि लिहिणं या दोन्हींमधली साम्यस्थळं आणि फरक शोधण्याचाही खेळ खेळून झाला.
शाळेत शिकत असताना वार्षिक हस्तलिखित अशी अभ्यासेतर लेखनाची मर्यादित संधी असायची. महाविद्यालयातही ती संधी होती. पण इथं जागा कमी आणि लिहिणारे भरपूर अशी स्थिती असल्यानं लिहू ते छापून येईलच अशी (शाळेत असणारी) खात्री नव्हती. लेखनाच्या प्रक्रियेत वाचक नावाचा वर्ग महत्त्वाचा असतो; वाचकाला काय आवडेल याचा अंदाज घ्यावा लागतो हेही ध्यानी आलं.
त्या काळात काही लिहावं वाटलं, तरी माझी पंचाईत झाली. नुसत्या तर्काच्या आधारे काही लिहावं तर त्यात नावीन्य नसायचं. अगदी नवीन लिहिण्यासाठी त्या विषयाचं सखोल ज्ञान असावं लागतं – जे माझ्याकडे तेव्हा नव्हतं (आजही नाहीच!) आणि मुख्य म्हणजे तर्काच्या आधारे लिहिलं तर ते पुरेसं मनोरंजक नसायचं वाचणाऱ्यांच्या आणि माझ्याही मते. ‘कशासाठी लिहायचं’ असा प्रश्न पडला आणि त्याचं उत्तर मी अजूनही शोधतेच आहे. कधी सापडल्यागत होतं ते – पण पुढच्याच क्षणी त्याच्या विपरीतही वाटतं.
‘पूर्ण काल्पनिक लेखन असतं का?’ याचं उत्तर ‘हो’ असं द्यायला हरकत नाही. पण वाचताना मात्र आपण ती गोष्ट पूर्ण काल्पनिक राहू देत नाही. अगदी काल्पनिक लेखनात सुद्धा एखादी व्यक्तिरेखा पुढे कशी वागेल याचा काही तर्क आपण करतो आणि तो अंदाज सारखा चुकत गेला तर लेखन वाचताना आपल्याला मजा येत नाही - याची जाणीव झाल्यावर गोंधळ वाढला. म्हणजे काल्पनिक व्यक्तिरेखेत, कथानकात आपण आपलं वास्तव आपल्या नकळत लादत असतो. एक वाचक म्हणून लेखकाकडून असणाऱ्या अपेक्षा आणि एक लेखक म्हणून वाचकांकडून असणाऱ्या अपेक्षा यात गल्लत होऊ न देणं अवघड असतं. ‘आपला तो बाब्या’ या भावनेतून लेखकाची सुटका होणं सोपं नसतं. लेखन प्रक्रियेतल्या वाचकाच्या भूमिकेचं नाही म्हटलं तरी दडपण आलं माझ्यावर. तर्क आणि कल्पना यांचा मिलाफ करत काही लिहिलं, त्याचं थोडंफार कौतुकही झालं, तरी एकंदर ‘लेखन हा आपला प्रांत नाही’ अशी खूणगाठ मी मनाशी बांधली. लिहायचं असेल तर कागद, पेन, कल्पना (प्रतिभा हा शब्द फार मोठा आहे माझ्यासाठी), विचार यांसोबत आणखी दोन गोष्टी हव्यात हे कळलं. एक म्हणजे शैली आणि दुसरं म्हणजे समज!
आयुष्याबद्दलची समज, चांगलं-वाईट याबाबतची समज. इतरांकडे आणि स्वत:कडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन.. अशा अनेक गोष्टींचा अंतर्भाव माझ्या मते ‘समज’ या संकल्पनेत होतो. शैली आणि समज यांचा नातेसंबंध पाहणं हा एक नवा छंद जडला मला या काळात. आणि एक चांगली गोष्ट झाली – ती म्हणजे माझं लिहिणं जवळजवळ थांबलं. आधीही फार काही लिहीत होते अशातला भाग नाही. पण महाविद्यालयीन काळात तर ते पूर्ण थांबलं. क्वचित कधी मास्तरांच्या आग्रहावरून काही लिहिलं – पण ते अगदी अपवादात्मक. काही लिहिलं तर ते कुणालाही न दाखवता तसंचं ठेवून द्यायचं असा एक नवा टप्पा आला.
पुढं मग अनेक वर्ष माझं लिहिणं हे उपयुक्ततावादाच्या चौकटीत बसणारं राहिलं. म्हणजे रोजचा जमाखर्च लिहा, कामाच्या ठिकाणी मीटिंगची टिपणं काढा, कार्यक्रमांची माहिती देणारी पत्रकं लिहा, वार्षिक अहवाल लिहा, प्रेस नोट लिहा, पत्रं लिहा इत्यादी. याचं मुख्य कारण - बहुधा माझं अक्षर इतरांना सहजी वाचता यायचं – असं होतं! दर मीटिंगमध्ये टिपणं काढायचं कामं माझ्याकडे यायला लागलं म्हणजे ‘आपण चांगलं लिहितो’ असं मला वाटण्याची काही शक्यता नव्हतीच. कारण माझ्या ज्येष्ठ सहकाऱ्याने ‘तुला कामाला नाही लावलं की तू गप्पा मारत बसतेस, म्हणून तुला टिपणं काढण्याचं काम देण्यात येत आहे’ हे पहिल्याच वेळी सगळ्यांच्या समोर स्पष्ट केलं होतं. ती एक प्रकारे शिक्षा होती मला दिलेली. त्यामुळे टिपणं काढता काढता कागदाच्या कोप-यात मी रेघोट्या ओढायला लागले पण आपण चित्रकार नाही हे मला आधीच माहीत असल्यानं लोक वाचले माझ्या चित्रकलेपासून.
मीटिंगमधल्या चर्चेचं टिपण तयार करणं ही एक कला आहे. आपल्याकडे माणसं भारंभार बोलतात. आधीची व्यक्ती जे बोलली त्याच्याशी पुढची व्यक्ती जे बोलते त्याचा काही संबंध असतोच असं नाही – नसण्याचीच शक्यता जास्त. मुद्दा एकच असला तरी उदाहरणं बरीच असतात आणि ती उदाहरणं अनेकदा परस्परविरोधीही असतात. एक व्यक्ती एकच भूमिका सातत्यानं मांडेल असंही नसतं. त्यामुळे निष्कर्ष काय हे कळत नाही. बरं, बोलतात खूप काही खूप जण, पण अनेकदा निर्णय काहीच होत नाहीत. पण मीटिंगची टिपणं काढताकाढता विचारांच्या गोंधळातून मार्ग कसा काढायचा आणि नेमकं महत्त्वाचं काय ते कसं टिपायचं याच माझं प्रशिक्षण होत गेलं (ते अजूनही चालूच आहे!). लिहायचं म्हटलं की मनात असंख्य विचार येतात – त्यातले महत्त्वाचे आणि बिनमहत्त्वाचे कसे ओळखायचे आपले आपणच, त्यांचा क्रम अधिक परिणामकारक कसा करायचा याचे प्रयोग सुरु झाले.
या काळात माझ्या ओळखीच्या लोकांपासून मी दूर गेले होते. काम नवं होतं, अनुभव नवे होते, सभोवतालची माणसं नवी होती, शहर नवं होतं – या सगळ्याबद्दल विस्तारानं लिहायचं ‘पत्र’ हे एक साधन झालं. आठवडयाला कमीत कमी एक तरी पत्र – व्यक्तिगत पत्र – मी लिहायला लागले. त्यात भावना, विचार, प्रश्न हेही असायचं; काही अनुभव असायचे, काही चौकशा असायच्या वगैरे. बरीच पत्रं लिहून झाल्यावर लक्षात आलं की पत्र म्हणजे ‘आपुलाच संवाद आपणासी’ असतो आणि समोरची व्यक्ती ही केवळ निमित्तमात्र असते. आपण काय सांगतो? दुसऱ्याला जे पाहिजे ते नाही, तर स्वत:ला जे सांगायचं आहे ते. हं, ते सांगणं समोरच्याशी असलेलं नातं पाहून थोडं थोडं बदलतं हे खरं. म्हणजे परिस्थिती बदलत नाही, सांगण्याचा मुख्य मुद्दा बदलतो आणि दुसरं म्हणजे सांगण्याची ‘शैली’ बदलते. इथं लेखन होतं ते व्यक्तिसापेक्ष असतं. व्यक्तिनिरपेक्ष लेखनापेक्षा हे वेगळं असतं – पत्र हे जास्त व्यक्तिसापेक्ष असतं, इतर लेखन जास्त व्यक्तिनिरपेक्ष.
एकच गोष्ट सरळ सांगता येते, भावनिक होऊन सांगता येते, निराशेनं सांगता येते, आक्रमकपणे सांगता येते, विचारपूर्वक सांगता येते, उद्वेगानं सांगता येते, उद्रेकानं सांगता येते, रागावून सांगता येते, आनंदानं सांगता येते, समंजसपणे सांगता येते, अलिप्ततेनं सांगता येते आणि विनोदानंही सांगता येते हे समजल्यावर मजा वाटायला लागली. ‘रिक्षावाल्यानं फसवून जास्त पैसे घेतले’ हा साधा प्रसंग मी एकदा अशा वेगवेगळ्या पद्धतीने लिहून पाहिला गंमत म्हणून! मग मनाला तो एक नादच लागला. आपल्याला ज्यात आनंद वाटतो त्यात कुणाला दु:ख वाटत असेल तर, आपल्याला ज्याचा राग आला, त्याचं कुणाला हसू येत असेल तर – असे प्रश्न घ्यायचे आणि कल्पना करत बसायचं असं सुरु झालं – ते सगळं मी लिहिलं मात्र नाही कारण ‘लिहायचं तर सलग वेळ हवा’ अशी स्थिती आली होती आणि सलग वेळ मिळण्याची काही चिन्हं नव्हती. शिवाय लिहायला खासगीपणा, एकांत लागतो तोही नव्हता.
मी ज्या ठिकाणी काम करत होते, तिथं आम्ही एक नियतकालिक सुरू करायचं ठरवलं. आणि मग मी लिहावं अशी परिस्थिती निर्माण झाली. अंक काढायचा तर पुरेसे लेख हवेत. ते पुरेसे नसतील तर संपादक मंडळाची नैतिक आणि व्यावहारिक जबाबदारी असते अंकाची पानं भरून काढण्याची. नियतकालिक नवं असल्यानं त्याची काही प्रतिमा नव्हती की त्याबाबत काही परंपरा जपण्याची जबाबदारी आमच्यावर नव्हती. त्या स्वातंत्र्याचा फायदा घेत मी लिहायला लागले पुन्हा एकदा. विषय ठरवायचा, अनेकदा सहकारी विषय सुचवायचे. त्या विषयासाठी मुद्दे काढायचे, सगळे संदर्भ काही हाताशी नसायचे – मग त्यांचा शोध, पहिला मसुदा, दुसरा मसुदा .. हे सगळं हातानं लिहीत बसायचं. पुन्हा पुन्हा लिहायला लागू नये म्हणून काळजीपूर्वक, विचार करून लिहावं लागायचं. लिहिण्याच्या कृतीआधी कितीतरी विचार त्यावर केला जायचा. ‘अव्यक्त’ व्यक्त होण्याची ती एक मजेदार प्रक्रिया असली तरी त्यात गूढ काही नव्हतं – कारण हे ठरवून केलेलं लेखन होतं. एका अर्थी गरज म्हणून केलेलं लेखन होतं ते – स्वान्तसुखाय वगैरे नव्हतं, तर कामाचा भाग म्हणून होतं. माझ्या तिथल्या भूमिकेत मी लिहिणं ‘आवश्यक’ होतं. कागद, पेन, बैठक मारून लिहिणं यासारखं एक महत्त्वाचं काम म्हणजे लिहून झालेले कागद छपाई जिथं होत असे त्या शहरापर्यंत पोचवणं. आपण लिहिलेल्यात मुख्य किंवा इतर संपादक काटछाट करतात का, आणि काय करतात याचं उत्तर छापील अंक हातात पडल्यावरचं मिळायचं. त्याबद्दल कुतूहल असायचंच!
या काळात नुसतेच मुद्दे लिहिलेले कितीतरी कागद इतस्तत: पडलेले असत. त्यातल्या काहींचा विस्तार झाला, काही तसेच नामशेष झाले. काय नामशेष झाले ते आता आठवतही नाही.
बारा वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात संगणक आला आणि लिहायचं एक नवं तंत्र आलं. मी पहिल्यांदा लिहिला तो ‘स्त्रियांचे आरोग्य आणि सबलीकरण’ या एका प्रकल्पाचा ‘प्रोजेक्ट इम्प्लीमेंटेशन प्लान’. आम्ही पाच जणांनी पाच विभाग वाटून घेतले होते. सर्वात आधी माझं लिहून झालं म्हणून इतर सहकारी माझ्याकडे येऊन बसायला लागले. चर्चा करता करता त्यांनी बोलायचं आणि मी टंकन करायचं असं सुरु झालं. त्यांचं बोलणं मी आधी तसंच (ते जसं बोलायचे तसंच) लिहायचे आणि मग सोबत माझ्या शैलीत पण लिहायचे. असं करता करता मी माझ्या टीमची लेखनिक (पण थोडं अधिक स्वातंत्र्य असलेली) झाले. एक मसुदा झाला की तो टीममधल्या वरिष्ठ सहकारी लोकांना दाखवायचा. त्यांच्या सूचनांनुसार बदल करायचे. मग ते प्रकल्पासाठी निधी देणाऱ्या संस्थेला पाठवायचं. त्यांच्या सूचना यायच्या. मला कुणी सांगितलं नव्हतं – तरी मी आपले सगळे मसुदे एकामागोमाग एक तारखेनुसार साठवून ठेवले होते. हळूहळू लक्षात आलं की माणसं आपण आधी मांडलेली कल्पना मोडीत काढतात पण काही काळानंतर तीच स्वत:ची म्हणून मांडतात. मुद्दा काय आहे यापेक्षा तो कुणी मांडलाय याला आपला समाज महत्त्व देतो. माझी त्याबद्दल तक्रार नव्हती. मी ते परिच्छेदच्या परिच्छेद आधीच्या मसुद्यातून घेऊ शकत होतेच. या कॉपी-पेस्ट रोगाचे अधिक भयाण आविष्कार मी पुढं पाहिले – पण ते बरेच नंतर.
विचार आणि लिहिणं प्राथमिक शाळेत असताना एकत्रच व्हायचं. माध्यामिक शाळेत त्यात थोडा खंड पडला. महाविद्यालयीन जीवनात विचार आधी केलेला असायचाच – जरी लिहिताना विचार सोबत आहेत असं वाटलं तरी तो विचार पूर्वनियोजित असायचा. मीटिंगची टिपणं काढताना माझा विचार हा फक्त ‘काय टिपायचं आणि काय कोणत्या क्रमाने सादर करायचं’ इतकाच होता – विषयाबाबत फारसा विचार करण्याची संधी मला मिळत नसे. त्यामुळे विचार आणि लिहिणं यांतल्या अंतराचा मी चांगला अनुभव घेतला होता बरीच वर्षं. जे व्यक्त करायचं त्यात घाई करायची नाही हे सूत्र होतं. ते केवळ इतरांपुढं स्वत:ची प्रतिमा जपायची या भूमिकेतून आलेलं नव्हतं. आपल्याला नक्की काय सांगायचं आहे, जे सांगायचं आहे तेच आपण सांगतो आहोत ना, जे सांगतो आहोत तेच इतरांपर्यंत पोचतंय ना अशा विचारांतून सावकाश सांगितलं जायचं. मौन हा संवादाचा जणू अविभाज्य भाग होता. दोन लेखांमध्ये बराच काळ जायचा – आणि तो आवश्यकही असायचा.
या काळात मुख्य प्रवाहातल्या वृत्तपत्रांसाठीही लिहिलं – ते लिहिताना अभ्यासपूर्ण लेखन न करता माझे अनुभव सांगायचं धोरण मी स्वीकारलं. कारण एक तर माझा ‘अभ्यास’ नव्हताच. दुसरं म्हणजे माझे अनुभव मला सांगावेसे वाटले इतरांना – अगदी मी ज्यांना ओळखत नाही त्यांनाही. पण वृत्तपत्रांत लिहिण्याचा अनुभव एकंदरीत फारसा सुखद नव्हता. लेख मिळाल्याची पोच तर मिळत नसेच, लेख छापल्याचं कळवण्याचंही सौजन्य अनेकांकडे नसे. त्या ‘वाट पाहण्याचा’ मला कंटाळा आला आणि ते लेखन मी बंद केलं. शिवाय वाचकांशी थेट संवाद त्यात जवळजवळ होत नसे.
संगणकावर मी लिहायला लागले तेव्हा विचार आणि लिहिणं पुन्हा ‘एकसमयावच्छेदे’ घडायला लागलं. पण सुरुवातीला टंकन करण्याची गती कमी असल्याने विचारांची साखळी तुटून चिडचीड व्हायची. विचार पुढे पळायचे आणि हाताला त्या गतीने काम करता यायचं नाही. त्यावर उपाय म्हणून ‘टायपिंग ट्युटोरियल’ उतरवून घेतलं आणि त्याचे धडे गिरवले. मग ‘की बोर्ड’कडे न पाहताही बरोबर अक्षर स्क्रीनवर उमटायला लागल्यावर विचार आणि लिहिणं या क्रियांमध्ये असेलेलं द्वैत जणू संपून गेलं. सगळ्या कामाला गती आली.
पण म्हणून काम कमी झालं का? नाही, ते वाढलंच. त्यातला दबावही वाढला.
पूर्वी प्रकल्पांचे आराखडे लिहिले जायचे तेव्हा त्यात आधीच बराच विचारविमर्ष व्हायचा आणि सर्वांनुमते जे मुद्दे मान्य असतील त्यांचाच आराखडा लिहिला जायचा. समोरासमोर बसून चर्चा करण्याची जागा आता टेलि-कॉन्फरन्स, व्हिडीओ-कॉन्फरन्स, ई-मेल संवाद यांनी घेतली. पूर्वी एखाद्या व्यक्तीनं एखादं मत मांडल्यावर आपल्याला प्रतिसाद द्यायला वेळ मिळायचा. आता या बाबतीत ‘झिरो टॉलरन्स’ आला. त्यामुळे विचार करण्याची पद्धत प्रतिक्रियात्मक होऊ लागली. ‘काहीही सांगा पण लगेच सांगा’ असं वातावरण निर्माण झालं. आपण वेळ घेतला थोडासा तर आपण ‘स्लो’ आहोत असा शिक्का बसेल याची धास्ती निर्माण झाली. तो/ती काय म्हणतेय यावरच विचार केंद्रित होऊ लागला. स्वत:ला काही म्हणायचं आहे हे विसरून जायला होऊ लागलं. संवाद म्हणजे प्रश्नोत्तरी व्हायला लागली.
या नव्या तंत्रज्ञानाबरोबर माहितीचा भडीमार पण आला. एखादी कल्पना मांडायची असेल नव्याने किंवा खोडून काढायची असेल तरीही काहीतरी ‘विदा’ देण्याची अपेक्षा निर्माण होऊ लागली. विदा जणू काही दरबारात ‘सिवा’ला संपवण्याचा विडा उचलायचा आहे अशा थाटात कशाचाही मागितला जाऊ लागला आणि कुणीही मागू लागलं. सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ वेगळे असल्यानं एका ठिकाणचं उदाहरण दुस-या ठिकाणी तंतोतंत लागू होणार नाही याचंही भान काही माणसं विसरली. कुठल्या कुठल्या जुन्या प्रामाण्याऐवजी नवे लोक आले, नवी संकेतस्थळं आली – पण प्रामाण्य मानण्याची परंपरा मात्र कायम राहिली.
२००८ मध्ये एका नव्या प्रकल्पाचा मसुदा लिहिताना हा बदल मला जास्त जाणवला. आता आम्ही एकत्र बसून एल. सी. डी.चा वापर करून प्रकल्प ‘लिहीत’ होतो. प्रत्येकाची विचार करायची पद्धत वेगळी, अनुभव वेगळा आणि आज संध्याकाळी मसुदा पाठवायचा आहे हा ताण – त्यामुळे लिहिण्याताला आनंद जाऊन ते पुन्हा एकदा काम बनलं. फारसा विचार न करता वेळ गाठण्यासाठी मुद्दे उरकले जाऊ लागले. ‘अमुक एक गोष्ट केली तर त्याचे फायदे काय आणि तोटे काय’ असा विचार करण्याची प्रक्रिया थंडावली. म्हणून मग संवाद वाढला पण त्याची अर्थपूर्णता कमी झाली. संवादाचं ओझं व्हायला लागलं आमच्या टीमला. मसुदा हाताने लिहायचो तेव्हा फार फार तर तीन वेळा लिहायला लागायचं. आता एकेका प्रकल्पाचे चौदा-पंधरा मसुदे आमच्या संगणकात साठायला लागले. पूर्वी एकच ‘फायनल फाईल’ असायची. आता ‘फायनल वन’ ‘फायनल टू’ ‘फायनल फायनल’ अशी नावं आम्ही सहज द्यायला लागलो. त्यात काही चुकतं आहे असं कुणाला वाटेनासं झालं. विचार करून लिहायचं हा क्रम बदलून आधी लिहायचं आणि मग विचार करायचा असं चक्र सुरु झालं – जे अजूनही कायम आहे मी काम करते त्या क्षेत्रात!
हे काम करत असताना प्रक्रियांचं डॉक्युमेंटेशन करण्याची संधी मिळाली. स्वतंत्र लिहिण्याचा थोडाफार अनुभव असणा-या व्यक्तींना ब-यापैकी डॉक्युमेंटेशन करता येतं, की डॉक्युमेंटेशन करण्याच्या अनुभवामुळे इतर स्वतंत्र लेखन सुधारतं – याचा अजून मी नीट विचार केला नाही. त्या दोन्ही कृती एकमेकींना बळ देत असाव्यात असा अंदाज मात्र बांधला आहे मी.
दरम्यान ‘ब्लॉग’ समोर आला. माझ्या ओळखीत तेव्हा कुणी ब्लॉग लिहायचं तर सोडून द्या, वाचतही नव्हतं. त्यामुळे मला हे एक नवं खेळणं मिळाल्यासारखं झालं. त्यापूर्वी इंग्रजीत ललित लेखन कधीच केलं नव्हतं – इंग्रजीत लिहायचं ते फक्त कामाचं. पण मराठी टंकनाची माहिती नव्हती म्हणून इंग्रजी ब्लॉग सुरु केला. त्यात अनेक अडचणी आल्या. पण ओळखदेख नसलेले लोक आपण लिहिलेलं वाचतात, त्यावर प्रतिसाद देतात, त्यातलं कुणीतरी कधीतरी परखडपणे चार शब्द सुनावतं आणि त्याचा आपल्याला उपयोग होतो, लोक आपल्याला तांत्रिक मदतही करतात - हा अनुभव नवा आणि बरंच शिकवून जाणारा ठरला. (मराठीत टीका तत्परतेने होते, मदत मात्र क्वचित – असा निदान माझा अजून तरी अनुभव आहे!) ब्लॉगवर लिहिण्यासाठी मग विषय सुचत गेले. पूर्वी जे अनुभव न सांगता तसेच विरून गेले असते, ते आता सांगितले जाऊ लागले. मराठीत ब्लॉग सुरु केला तो इंग्रजी ब्लॉगनंतर जवळजवळ सहा महिन्यांनी. आधी मराठी लिहायला अडचण यायची. ‘बरहा’ वापरून लिहायचं आणि ते ब्लॉगरमध्ये पेस्ट करायचं असे उद्योग चालायचे. त्यात प्रचंड वेळ जायचा आणि कंटाळा यायचा. पण काही वाचकांनी ‘तुम्ही मराठी ब्लॉग गांभीर्याने घेत नाही’ अशी तक्रार केली आणि मी जागी झाले!
इथं आता लेखनप्रक्रिया पुन्हा वेगळी व्हायला लागली. ब्लॉग स्वत:चा असल्यानं लिहिलंच पाहिजे असं काही बंधन नव्हतं (नसतं). पण लिहायचा उत्साह, व्यक्त व्हायचा उत्साह मात्र होता. ब्लॉग लिहिताना विचार जाणीवपूर्वक केला जात नाही हे ध्यानात आलं. बरेचदा ‘अमुक एक लिहू’ म्हणून मी संगणकावर बसते पण प्रत्यक्षात दुसराच एखादा विषय लिहून उठते. मी इंग्रजीत अमुक एक विषय का लिहिते आणि मराठीत अमुक एक विषय का लिहिते – याचीही कारणमीमांसा मला अद्याप सापडलेली नाही. पण मनात कधी येईल तेव्हा लिहा, समाधान नाही वाटलं तर काढून टाका, किंवा साठवून ठेवा आणि नंतर कधीतरी त्यावर काम करा – अशा सोयीमुळे लिहिणं सोपं झालं, स्वत:साठी तरी आनंददायी झालं (– वाचकांचे काय हाल व्हायचे ते होवोत!). वाचकांशी थेट संवाद वाढला. यातल्या काही वाचकांनी केवळ लेखन प्रक्रियेत नाही तर जगण्यातही मोलाची भर घातली.
संगणक आणि त्यासोबत मराठीत लिहिण्याची सोय ही एक क्रांती आहे मी पाहिलेली. संगणक नसता तर मी किती लिहिलं असतं? किती लिहीत होते मी? – वर्षाकाठी पाच ते सहा लेख म्हणजे खूप झाले. आता संगणक आहे तर मी किती लिहिते? जवळजवळ पंधरा ते वीस पट. लेखांची संख्या ही लेखांचा दर्जा ठरवण्याचा निकष असू नये असं माझं मत आहे. लेखन कमी असलं म्हणजे दर्जेदार असतंच असं काही जरुरी नाही आणि खूप लेख लिहिले म्हणजे लेखक लोकप्रिय आहे असंही मानण्याची गरज नाही.
पण लेखकाला बाह्य अडचणींतून मोकळीक देण्यात संगणकाची भूमिका फार मोठी आहे यात मला तरी शंका नाही. हे स्वातंत्र्य सुखाचं आहे की अडचणीचं आहे हे माझं मला ठरवावं लागेल. लेखन हा एक आंतरिक प्रवासही असतो आणि त्यातल्या अडचणींना लेखक कसे सामोरे जातात यावर त्यांच्या लेखनाचा दर्जा अवलंबून असतो, असेल. पण संगणक क्रांतीनं पुन्हा एकदा मला सांगितलं आहे की: लिहिणं किंवा न लिहिणं हा निर्णय सर्वस्वी माझा आहे; त्याचं खापर मला बाहेरच्या कोणत्याही गोष्टीवर फोडता येणार नाही!
****
लिहिण्याची प्रक्रिया आधी ‘आत’ कुठेतरी घडत असते, तिला ‘बाहेर’ यायचं तर सोयी हव्यात. जुन्या काळी या सोयी नव्हत्या म्हणून लिहिण्याचा आळस, कंटाळा केला जायचा. आता बाहेरची सोय आहे चांगली म्हणून हवं तितकं लिहिता येतं. पण तंत्रज्ञानानं ‘विचार’ आणि ‘लेखन’ यांतला अवकाश (स्पेस, अंतर) कमी करून टाकलं आहे एकदम – त्याची काळजीही वाटते. त्याचा एकंदर विचारप्रक्रियेवर आणि लेखनप्रक्रियेवर काय परिणाम होतो हे मी कामाच्या क्षेत्रात जवळून पाहिलं आहे, अनुभवलं आहे. ते तोटे व्यक्तिगत पातळीवर लिहिताना होऊ नयेत असं वाटतं खरं – पण ते होत असतील तर आत्ता कळायलाही मार्ग नाही.
‘लिहिणं’ हा एका अर्थी इतरांपर्यंत पोचण्याचा एक रस्ता आहे. या संवादासाठी मी ‘शब्द’ वापरते कारण तेच एक साधन मला त्यातल्या त्यात माहीत आहे. रंग, रेषा, स्वर, ताल यांची ओळख होण्याच्या फार पूर्वी शब्द ओळखीचे झाले. म्हणून शब्द वापरताना तितकासा ताण येत नाही. रंग किंवा स्वर वापरून मला जे सांगायचं आहे ते नीट सांगता येणार नाही हे मला माहिती आहे – म्हणून मी शब्द वापरते. मी निरक्षर असते तर कदाचित मी काहीतरी पर्याय शोधला असता. पण ‘गमभन’ गिरवण्यातून शब्दांचा पर्याय मला सहज मिळाला – म्हणून तो मी वापरत राहते.
हं, शब्द ओळखीचे आहेत म्हणून हवे तसे वापरायला गेले की मात्र फजिती होते अनेकदा. अति-आत्मविश्वास नडतोच. बऱ्याचदा शब्द जुने असले, वापरातले असले, तरी नवे वाटत राहतात मला त्यांचा अर्थ नीट न कळल्यानं. त्यांचं हे एकाच वेळी पुरातन असणं आणि नवं असणं अजून मला भुरळ घालतं!
‘मी का लिहिते’ या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळत नाही तोवर मी लिहीत राहणार बहुतेक. प्रश्नाचं उत्तर मिळवण्याचा तोच एक मार्ग आहे ना! लिहिणं थांबलं तर प्रश्न नाहीसा होईल किंवा प्रश्न नाहीसा झाला की लिहिणं थांबेल. असं काही होईल का, यातलं काय आधी होईल, ते उत्तर काय असेल, लिहिण्याची गरज संपेल का एक दिवस, लिहिणं थांबल्यावर संवादासाठी मी काय माध्यम शोधेन ....
आणि कदाचित त्यावेळी हेच सगळे जुने प्रश्न नव्याने समोर येतील ...

Monday, November 12, 2012

१४१. हे अरुणाचल ....

हे अरुणाचल! माझ्या घरात प्रवेश करून आणि मला आकर्षित करून तू मला आपल्या हृदयगुहेत कैदी का बनवून ठेवले आहेस?
हे अरुणाचल! तू स्वत:च्या आनंदासाठी माझे हृदय जिंकले आहेस? की माझ्यासाठी? आता जर तू माझा त्याग केलास, तर सारे जग तुलाच दोष देईल!
हे अरुणाचल! मला वारंवार तुझी आठवण का येते आहे? मी आता तुला विसरूच शकत नाही ...
***
अरुणाचल हे नाव उच्चारताक्षणी त्या दिवसापर्यंत बर्फाच्छादित शिखरांशी लपंडाव खेळणा-या लोहितचे आणि हिरव्यागर्द जंगलांचं चित्र डोळ्यांसमोर तरळून जायचं. पण त्या दिवशी मी आणखी एका अरुणाचलला भेटून आले होते. इथं नदी नव्हती, फारसं घनदाट जंगलही नव्हतं. तरीही मन गुंतवून ठेवणारं, विस्मयचकित करून टाकणारं खास काहीतरी याही अरुणाचलात होतं! स्वाभाविकच आहे म्हणा! अभिमानाने मिरवण्याजोगी एक खूण या अरुणाचलाजवळ आहेच मुळी!! ती म्हणजे रमण महर्षींची आठवण. त्यांच्या सान्निध्यामुळे की काय, अरुणाचल अधिकच विनम्र आणि भव्य वाटतो. भव्य असूनही भयप्रद न वाटता आपलासा वाटतो.
या अरुणाचलची जुजुबी ओळख होऊन तशी बरीच वर्ष उलटली होती. पॉल ब्रन्टनच्या A Search in Secret India या पुस्तकात रमण महर्षी आणि अरुणाचल हे दोन्ही पहिल्यांदा भेटले. रमण महर्षी यांच्या मौनातच माझे सारे प्रश्न नाहीसे होऊन मला मानसिक शांती मिळाली अशा आशयाचे ब्रन्टन महोदायांचे विधान वाचून गंमत वाटली होती मला. पण त्याचा फारसा कीस काढायच्या फंदात मी तेव्हा पडले नव्हते.
अशीच आणखी काही वर्ष गेली. दरम्यान दक्षिण दौरा करून आलेल्या काही लोकांकडून तिरुवण्णामलैचे गुणगान कानी पडायचे. त्यामुळे अरुणाचलबद्दलचं माझं कुतूहल जागृत झालं. रमण महर्षीचं चरित्र मी याच काळात वाचलं. अशक्यप्राय स्वप्नं पाहण्याच्या माझ्या सवयीने अरुणाचल भेटीचं स्वप्न जागं ठेवलं.
त्यावर्षी एका मैत्रिणीने पॉन्डिचेरी भेटीचा बेत आखला. मीही गेले. पॉन्डिचेरीचा समुद्रकिनारा मला फारच आवडला. सकाळ-संध्याकाळ तिथं निवांत आनंदात जायची. अशातच एक दिवस रमणाश्रमात जाऊ यात काय? अशी विचारणा झाली. मी तयारच होते. भेटीची आखणी आणि तयारी बाकीच्यांनी केली. मी मात्र पॉन्डिचेरी पर्यटन विकास महामंडळात जा, नकाशे गोळा कर, ग्रंथालयात बसून संदर्भ पाहा .. अशी निरर्थक कामं नेहमीप्रमाणे केली.
पहाटे पाच वाजता आमचा प्रवास सुरु झाला. काळोखात फारसं काही दिसत नव्हतंच आधी पण रविराजाच्या आगमनाने सारं चित्र बदललं. दूरपर्यंत दिसणारी वळणावळणाची काळीशार सडक, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झुलणारी हिरवळ, निळसर आकाश मधेच झाकोळून टाकणारे ढग, अंगावर झेपावणारा वारा ...या सगळ्याचं सुख अनुभवत  प्रवास झाला.
वाटेत दुरून जिंजी किल्ल्याचे अवशेष दिसले. छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावर येऊन गेले आहेत म्हणून त्याला भेट द्यायची इच्छा होती – पण तेवढा वेळ हातात नव्हता. आणि बसने प्रवास करत असल्याने ‘पाहिजे तिथं’ थांबायची चैन आम्ही करू शकत नव्हतो. थोड्या वेळातच ‘तिरुवण्णामलै’ अशी पाटी दिसली आणि मी सावरून बसले.
अरुणाचलाचं पहिलं दर्शन मोठ ओबडधोबड आणि रखरखीत होतं. पाषाणखंड प्रचंड मोठे होते. निसर्गाच्या या रुद्र आणि काहीशा रुक्ष रुपाने मी बावरून गेले. इथं ना डेरेदार वृक्ष दिसत होते ना खळाणणारे झरे! ‘इतक्या कोरड्या आणि उजाड डोंगराचं माहात्म्य स्थानिक लोकांना कां वाटत असेल’ – असा प्रश्न माझ्या मनात नकळत आलाच.
पण या अरुणाचलाची महती फार प्राचीन काळापासून आहे. स्कंद पुराणात याला ‘विश्वाचे हृदय’ म्हटलं गेलं आहे. ब्रह्माण्ड आणि वायू पुराणांत कैलासाच्या पश्चिमेस असणा-या पर्वताचे असेच वर्णन आहे. अनेक संतांनी इथं तपश्चर्या केली असं लोक मानतात. रमण महर्षीही अरुणाचलास अत्यंत पवित्र स्थान मानत. अरुणाचलाच्या सान्निध्यात अखंड शांतीचा स्रोत आपल्यालाही स्पर्श करून जातो असा अनेक लोकांचा अनुभव आहे- माझाही आहे. यात वास्तव किती आणि श्रद्धा किती हा चर्चेचा आणि वादाचा विषय असू शकतो हे मला माहिती आहे.  
या पर्वताबद्दल एक पौराणिक कथा आहे – जी मला अतिशय आवडली. एकदा ब्रम्हा आणि विष्णू यांच्यात ‘सर्वश्रेष्ठ कोण’ असा वाद सुरु झाला. दोन मानवी सत्ताधीश भांडायला लागले तर काय होतं, याचा अनुभव आपण अनेकदा घेतला आहे. हे तर साक्षात देवांचं भांडण! साहजिकच पृथ्वीवर अराजक माजलं. सृष्टी लयाला जाते की काय अशी वेळ आली. इतर देवतांनी मग शिवशंकरांना ‘यातून मार्ग काढा’ असं साकडं घातलं.
मग शिव स्वत: एका प्रकाशस्तंभाच्या रूपात प्रकट झाले. या स्तंभाचा आदि अथवा अंत जो जाणेल तोच खरा श्रेष्ठ अशी आकाशवाणी झाली. विष्णूने वराहरूप धारण केलं आणि प्रकाशस्तंभाचा उगम शोधण्यासाठी जमीन खणायला सुरुवात केली. ब्रह्माने राजहंसरूपात आकाशात भरारी घेतली – प्रकाशस्तंभाचा अंत शोधण्यासाठी. पण ब्रह्माने थोडी लबाडी केली (देव कसा लबाडी करेल हा प्रश्न गैरलागू आहे!).एका पर्वतशिखराच्या वृक्षावरून पडणारं फूल त्याने आणलं आणि ‘ते प्रकाशस्तंभाच्या शिखरावरून आणलं आहे’ असं खोटंचं सांगितलं. विष्णू मात्र परमप्रकाशाच्या साक्षात्काराने नम्र होऊन परत आला. यातून विष्णूचं श्रेष्ठत्व सिद्ध झालं. विष्णू म्हणजे अहं(कार), ब्रह्मा म्हणजे मन आणि शिव म्हणजे आत्मा असं लक्षात घेतलं की या कथेचा आशय अधिक अर्थपूर्ण होतो. या कथेतला प्रकाशस्तंभ म्हणजे आजचा अरुणाचल अशी परंपरागत धारणा आहे.
रमणाश्रमाच्या दिशेनं जाताना डाव्या बाजूला एक भव्य मंदिर दिसलं. हेच ते अरुणाचलेश्वराचे मंदिर – ज्यात तेजोरूप शिवलिंग आहे. हे मंदिर विजयनगरच्या कृष्णदेवरायाने सोळाव्या शतकात बांधलं आहे. याचा विस्तार थोडाथोडका नाही तर पंचवीस एकर आहे. चारी दिशांना गोपुरं आहेत. मुख्य गोपूर बारा मजल्यांचे असून त्याची उंची दोनशे फुटांहून जास्त आहे. अरुणाचलावरील स्कन्दाश्रमातून या मंदिराचं दृश्य फार मनोहर दिसतं. दगडात कसला आला आहे देव? हा प्रश्न या मंदिराच्या दर्शनाने मला अर्थहीन वाटू लागला. अशा प्राचीन मंदिरांचा आपल्याशी नि:शब्द संबाद होतो, तेव्हा मानवी प्रवासाचा, त्यांच्या आशा-आकाक्षांचा एक रस्ता थोडासा दिसतो – निदान दिसल्याचा भास मला तरी झाला. या मुक्या मंदिरांच्या निश्चलतेआड एका सामाजिक कालखंडाचा जिताजागता इतिहास आहे ही जाणीव मनाला विलक्षण स्थितीत नेते. अर्थात माझ्याबरोबरच्या लोकांना इतिहासात फारसा रस नव्हता – त्यामुळे थोड्यात समाधान मानून घ्यावं लागलं मला.
पर्यटन संस्कृतीच्या प्रभावामुळे रमणाश्रमात पाहण्यासारखं काय आहे? असा प्रश्न लोक हमखास विचारतात. रमणाश्रमात कसलाही चकचकाट नाही, श्रीमंती बडेजाव नाही, फार कसली औपचारिकता नाही .. आहे ती फक्त शांतता. आणि स्मशानशांतता नाही तर आनंदी शांतता. निदान मला तरी असंच दिसलं!
आश्रमाच्या एका कोप-यातून मोराचा आवाज आला. आम्ही लगोलग तिकडं मोर्चा वळवला. एक-दोन नाही तर पंचवीस-तीस मोर होते. आमची चाहूल लागताच काही दूर निघून गेले, तर काही आमच्याकडे दुर्लक्ष करत तिथंच रेंगाळले. पण नृत्य करायचं मात्र कुणीच मनावर घेतलं नाही म्हणून माझी निराशा झाली. जगात प्रत्येक गोष्ट ‘मेड टू ऑर्डर मिळणार नाही आपल्याला याचं भान पुन्हा एकदा आलं! आमच्या सोबत गाय-वासरांची फौजही होती. एका वासराला मी जरासं थोपटलं तर दुसरंही माझ्याजवळ आलं – थोपटून घायला! रमणमहर्षी यांच्या प्राणीप्रेमाच्या अनेक कथा आधी वाचल्या होत्या. जेवणाची वेळ झाल्यावर पातेली भरभरून अन्न आधी प्राण्यांसाठी जाताना पाहून त्या कथा ख-या असाव्यात असं वाटलं.
महर्षींचं शेवटचं वास्तव्य ज्या सभागृहात होतं, तिथं आम्ही गेलो. त्या छोट्याशा सभागृहाला आता ध्यानकक्षाचे रूप प्राप्त झालं आहे. आत जाताच रमणांच्या भव्य चित्राने नजर खेचून घेतली. त्यांच्या डोळ्यांतला शांत आणि आश्वासक भाव; चेह-यावरची किंचित करुणेची छटा; आधार देणारे स्मितहास्य ....ते चित्र इतकं जिवंत आहे की वाटतं आता पुढल्या क्षणी महर्षी आपल्याशी बोलतील, आपल्याला आशीर्वाद देतील, काही सांगतील ... (या अनुभवावर लिहिलेला एक संवाद इथं आहे) .माझ्यासारख्या अश्रद्ध व्यक्तीलाही नतमस्तक करण्याचं सामर्थ्य त्या चित्रात आहे असं मी म्हणू शकते अनुभवानं!! महर्षीनी वापरलेल्या वस्तू तिथं ठेवलेल्या आहेत. आजकाल पंचतारांकित संस्कृतीचे अनेक साधु-संत पहायला मिळतात. त्या पार्श्वभूमीवर रमणांचा साधेपणा विलक्षण चकित करून गेला मला.
अरुणाचलाच्या माथ्यापर्यंत चढत जायचा माझा विचार होता. पण आश्रमाच्या लोकांनी फक्त ‘स्कन्दाश्रमापर्यंत जाऊन या, पुढे निर्मनुष्य भागात आज जाऊ नका अशी कळकळीने विनंती केली. त्या डोंगरावर त्या दरम्यान स्त्रियांशी गैरव्यवहाराच्या काही घटना घडल्या होत्या हे कळल्यावर (आणि आम्ही सगळ्या स्त्रियाच होतो म्हणून) मी माझा हट्ट सोडून दिला. अनेक भक्त मंडळी जातात तिथवर मिळून ठराविक दिवशी – पण त्या दिवसापर्यंत मी काही तिथं असणार नव्हते.
स्कन्दाश्रम ही अरुणाचलाच्या कुशीत वसलेली एक छोटीशी गुहाच आहे खरं तर. तिथं आता बांधकाम केलेलं आहे. रमणांनी इथं काही काळ राहून साधना केली होती. डोंगरातून एक झरा इथवर येतो त्यामुळे गुहेत एकदम मस्त थंड वाटतं. इथं आम्ही बराच वेळ नुसतेच निवांत, काहीही न बोलता बसून होतो. इथल्या वातावरणाचा प्रभावच आहे तसा.
रमण महर्षींचं तत्त्वज्ञान आणि उपदेश अद्वैत वेदांताला अनुसरणारा आहे. आत्मसाक्षात्कार हेच रमणांच्या मते मानवी जीवनाचं ध्येय आहे – असायला हवं.  ‘या साक्षात्कारासाठी गुरुकृपा आवश्यक आहे’ असंही त्यांनी आवर्जून सांगितलं आहे.  कृपा असतेच, ती घेण्याची आपली पुरेशी क्षमता हवीअशी मिस्कील पण कठोर आठवणही ते आपल्याला करून देतात. उपदेश देण्याची महर्षींची पद्धत वरवर साधीसोपी वाटली तरी अतिशय गूढ आणि सखोल होती असं दिसतं. आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी संन्यासच घेतला पाहिजे असा त्यांचा आग्रह नव्हता. महर्षींचं स्वत:चं जीवन अतिशय अद्भूत आणि अविश्वसनीय आहे. अशी माणसं आजही असतात याचं नवल वाटतं.
***
अरुणाचलावरून परतताना संध्याकाळ झाली. पाहता पाहता ‘नभ मेघांनी आक्रमिले’ आणि झिम्मड पाउस कोसळायला लागला. त्या सरींनी हातभर अंतरावरचं काही पाहणंही अशक्य करून टाकलं. काळोखाची झूल मग आसमंतावर पसरत गेली. क्षणाक्षणाला मी पाठ फिरवून जणू अरुणाचलापासून दूर चालले होते.
डोळ्यांसमोर मात्र त्याचंच रूप होतं आणि मनात महर्षींचे शब्द:
हे अरुणाचल! काय, तू मला आत नाही बोलावलेस? पण मी तर आत येऊन चुकलो आहे. माझ्या रक्षणाचा भार आता तुझ्यावरच आहे!
हे अरुणाचल! माझे मन इतस्तत: भटकू नये म्हणून तू सदैव माझ्या मनात विराजमान रहा ...
हे अरुणाचल! हे अरुणाचल!