'मी आणि माझे हेच सा-या दु:खाचे मूळ होय. मालकीच्या भावनेतून स्वार्थ उदभवत असतो
आणि हा स्वार्थीपणा दु:खाला जन्म देतो. स्वार्थीपणाची प्रत्येक क्रिया, स्वार्थीपणाचा प्रत्येक
विचार आपल्यात त्या त्या वस्तूविषयी आसक्ती उत्पन्न करतो आणि लगेच आपण त्या
वस्तूचे गुलाम बनून जातो. पण ज्याच्या मनात मुक्तीची इच्छा निर्माण झाली आहे तो या
गुलामीत अडकणारच नाही.
ही मुक्ती मिळणार कोठे? The Song
of Sanyasin या त्यांच्या कवितेत स्वामीजी म्हणतात,
तू कुठे शोधिसी? नाही कधी मित्र रे,
मुक्तता लब्ध ही मर्त्य लोकी।
अन्य लोकांतही ग्रंथी की मंदिरी,
शोध तुझा असे हा व्यर्थ की।।
आत्मशोधाच्या विविध अवस्था आहेत. त्यातील टप्पे विभिन्न
आहेत. त्यात खरे-खोटे, चांगले-वाईट काही नाही. मुक्तीचा शोध हा सर्व धर्मांचा प्रयत्न आहे. निसर्गाचे
नियम मोडू शकेल अशा कोणत्यातरी 'आदर्शा’च्या शोधात मानवजात नेहमी आहे. आपले देव बघा!
हवेतून उडतात, पाण्यावर चालतात, वाघ-सिंह-सर्पावर बसतात. त्यांनी मनात आणले तर ते भूक नियंत्रित करु शकतात.
माणसाला जे जे काही अशक्य आहे ते ते सारे त्याचे देव करतात. पण आत्म्याचा हा शोध
काहीही झाले तरी ठरतो मात्र बाहेरचाच! कारण आपण पूर्ण मुक्त होऊ शकणार नाही असेच
तेंव्हा माणसाला वाटत होते.
नंतर हळूहळू त्याला असे वाटू लागले की, या देवता भिन्न नसून
त्यांच्यात एकत्व आहे, आणि या देवत्वाशी सर्व माणसांचे अगदी जवळचे नाते आहे. या देवता म्हणजे त्याचे
स्वत:चेच प्रतिबिंब, हेही नंतर त्याच्या ध्यानात आले. त्यातूनच अंतरात्म्याची कल्पना त्याच्या हृदयात उगम पावली. ‘जो अनंत परमात्मा आहे तोच सान्त जीवात्मा आहे’ असे ज्ञान होणे हा या शोधाचा सर्वोच्च आणि अंतिम टप्पा होय. पण त्यामुळे इतर
टप्पे कनिष्ठ दर्जाचे अथवा खोटे ठरत नाहीत, हे विवेकानंदांचे म्हणणे आपण नेहमीच लक्षात ठेवायला
हवे. सर्वांना मुक्तीची आशा आहे. सर्वजण या प्रवासाच्या कोठल्या ना कोठल्या वळणावर
आहेत. त्यामुळे कोणीही निराश व्हायचे कारण नाही, खचून जायचे तर अजिबात कारण नाही. प्रत्येकाने
प्रवासास प्रारंभ केलेला आहेच. मुक्कामी कोणी आज पोहोचेल, कोणी उद्या, कोणी कालांतराने - पण पोहोचणार तर
प्रत्येकजणच आहे. 'आकाशात पतितं तोयं, यथा गच्छति सागरम्’ - आकाशातून पडणारा
पाण्याचा प्रत्येक थेंब जसा अंती सागरालाच जाऊन मिळणार आहे तसा प्रत्येकच जीव
मुक्तावस्थेला पोहोचणार आहे. मुक्तीच्या या परिक्रमेची गती वाढविणे नक्कीच त्या
त्या जीवाच्या हाती आहे.
विवेकानंद म्हणतात, “जाणता किंवा अजाणता या मुक्तीचा शोध घेणे म्हणजेच प्रत्येक
मनुष्याचे जीवन होय..... ज्ञानी मनुष्य जाणीवपूर्वक याचा शोध घेतो तर अज्ञानी
मनुष्य अजाणताच शोध घेतो. एखाद्या सूक्ष्म अणूपासून ते एखाद्या विशाल ता-यापर्यंत प्रत्येकाची मुक्त
होण्याची धडपड चालू असते.” ज्ञान हे आपले अंतिम लक्ष्य नाही तर मुक्ती हे
आपले अंतिम लक्ष्य आहे याची आपण सदैव जाणीव ठेवली पाहिजे.
काहीजणांना वाटते की, आपण काहीही केले तरी आपण मुक्त होणारच आहोत.
विवेकानंदांच्या वेदान्तानुसार सर्वांना मुक्ती आहे. मग आपण काही साधना केली किंवा
न केली तरी काय फरक पडतो? आहे ते जीवन यथेच्छ उपभोगून घेऊ या. मुक्ती काय आहेच नंतर! कोठे जाते आहे ती?
पण आपण विसरतो की या जगात निखळ चांगली अशी गोष्टच नाही. जग
हे सुखदु:खांचे मिश्रण आहे. या जगात गुंतताना आपण कर्माची शृंखला वाढवत असतो.
आसक्तीने केलेले कोणत्याही प्रकारचे कर्म - मग ते चांगले असो का वाईट - आपल्याच
दु:खाला कारणीभूत ठरत असते. धुळीने माखलेला चेहरा आपण धुळीनेच पुसत नाही. आसक्तीने
कर्म करुन आपण मुक्तीचा मार्ग स्वत:साठी अधिकच अवघड करुन घेतो. वाटेल तसे आचरण
करुन तुम्हाला मुक्तीची अपेक्षा करता येणार नाही. मुक्तीचा मार्ग प्रत्येकासाठी
खुला असला तरी तो तितका सोपा नाही. या मार्गावरुन वाटचाल करण्यासाठी त्यागाची अगदी
जरुरी आहे. हा त्याग बाह्यरुपाने नव्हे तर
आतून हवा. जनकासारखी, श्रीकृष्णासारखी, शुकासारखी वृत्ती हवी. बाह्य पातळीवर सारे
सुखोपभोग घेताना त्यांच्या मनावर कशाचाही परिणाम घडून येत नव्हता. कर्मातून अधिक
कर्म निर्माण होऊ न देण्याची युक्ती ज्याला कळली तो मुक्तच आहे. 'सा तु अस्मिन् परमप्रेमरुपा अमृतस्वरुपाच’ अशी भक्ती जो करु शकतो तो मुक्तच आहे. ज्याला 'नेति नेति’ म्हणत केवळ ब्रह्मच आकळले आहे तोही मुक्तच आहे. आणि ज्याने स्वत:च्या
चित्तवृत्तींचा पूर्णत: निरोध केला आहे तोही मुक्तच आहे!
जीवन्मुक्ती आणि विदेहमुक्ती असे मुक्तीचे दोन प्रकार
विवेकानंद मानतात. जीवन्मुक्त परमेश्वरी इच्छेनुसार कार्य करीत राहतो. या जगात त्याची
स्वत:ची, स्वत:साठी म्हणून
काहीही इच्छा नसते. या ठिकाणी श्रीमद्भगवदगीतेतील 'स्थितप्रज्ञा’ची वाचकांना आठवण येणे स्वाभाविक आहे. 'यदा संहरते चायं कूर्मोङानीव सर्वश:। इन्द्रियाणीनिद्रयार्थेभ्यस्तस्य
प्रज्ञा प्रतिष्ठिता।।‘ असाच हा जीवन्मुक्त
असतो.
मुक्ती म्हणजे रुक्षता, कशाबददलच काहीही न वाटणे - अशी भिती काहीजणांना
वाटते - अशी उदासीन अवस्था काय कामाची?
पण विवेकानंद म्हणतात की,
ही मुक्ती रुक्ष भावावस्था
नसून आनंदाची सर्वोच्च स्थिती आहे. 'आशिष्टो दृढिष्टो बलिष्ठ:।
यस्येयं पृथिवी सर्वं वित्तस्य पूर्णास्यात’ अशा युवकाच्या आनंदापेक्षा हा आनंद शतपटींनी अधिक आहे. (उपनिषदांच्या नेमकया
शब्दांत सांगायचे तर १0 च्या १८व्या घाताइतका मोठा आनंद!) लहान मुले जगातील प्रत्येक वस्तूचे
मूल्यमापन त्या वस्तूपासून किती मिठाई मिळेल या मापदंडातून करत असतात. आपलीही
मुक्तीची अपेक्षा 'इन्द्रियसुखांच्या
आनंदासारखी स्थिती' अशीच असेल तर मग आपण
बालिश बुद्धीचे आहोत असे समजावे.
मुक्तावस्थेचे काही लोकांना भयही वाटते. आपण ब्रह्मरुप
झाल्यावर मग आपल्या व्यक्तिमत्वाचे काय होणार याची त्यांना धास्ती वाटते. 'मी मोठा झाल्यावर माझ्या बाहुल्यांचे काय होईल?’ - असा प्रश्न केवळ
लहान मुलेच विचारतात. स्वत:ची, कुटुंबाची, गावाची, तालुक्याची, जिल्हयाची, राज्याची, देशाची, खंडाची, विश्वाची ...... अशी तुझी जाणीवेची कक्षा विस्तारत गेली तर त्यात तुझ्या व्यक्तिमत्वाचे काय बिघडले? खरोखर संकोच झाला का त्याचा?
आणि अखेर तुझे स्वतंत्र व्यकितमत्व म्हणजे तरी काय? मी-माझे म्हणत तुझ्या अहंकाराने जमवलेले, जपलेले, घटट पकडून ठेवलेले सारे संस्कारच ना? सारे आहेत का खरेच तुझे? तू तरी तुझा आहेस का? मग कसले भय? कसली भीती? मुक्तावस्थेत आपले परके असे भेदच नसतात, मग कुठला अहंकार? कुठले व्यकितमत्व? दुसरे असणारच काय त्या
अवस्थेत अखंड, एकरस जाणिवेशिवाय?
श्री अरविंद आणि डा राधाकृष्णन यांच्यासारखे तत्त्वचिंतक
नंतरच्या काळात सर्वमुक्तीची (Masss Liberation) संकल्पना मांडतात. त्या दोघांच्या मते व्यक्तिगत मोक्ष हे मानवी जीवनाचे
अंतिम ध्येय नसून सार्वजनीन मुक्ती होईपर्यंत प्रत्येक जीवाला पुन:पुन्हा जन्म
घ्यावाच लागतो.
पण विवेकानंदांना हे मत मान्य असल्याचे दिसत नाही.
बोधिसत्वाप्रमाणे जीवन्मुक्त इतरांसाठी काम करीत राहील. इतरांच्या मुक्तीसाठी तो
त्यांना दिशा दाखवेल हे खरे. पण इतर सर्वजण मुक्त झाल्याविना त्याची मुक्ती पक्की
होत नाही असे म्हणणे जरा विचित्र वाटते. ज्या भेदांवरुन आपण जीवांच्या विविध
भावावस्था पाहतो ते भेदच मुळी प्रातिभासिक आहेत असे विवेकानंदांचे मत आहे. सर्व
जीवांचा जर आपण विचार केला तर मग मानवप्राण्यात मनसुद्धा विकसित व्हायला नकोच होते
- कारण पाषाणांमध्ये, जडद्रव्यांमध्ये चेतनेचा इवलासाही विकास दिसून येत नाही. सर्वजण मुक्त होऊ
शकतात - नव्हे ते मुक्तच आहेत - अशा अर्थाने सर्वमुक्तीची कल्पना त्यांना मान्य
आहे. पण समष्टि अवस्थेस व्यष्टि अवस्था बांधून ठेवणे मात्र त्यांना मान्य नाही!
क्रमश: