आपण अनेक घटनांमध्ये, प्रसंगांमध्ये, शहरांमध्ये, माणसांच्या आयुष्यांमध्ये निमित्तमात्र असतो. पण तशाच अनेक घटना, प्रसंग, माणसे, शहरे आपल्याही आयुष्यात निमित्तमात्रच असतात. माझ्या जगण्यातल्या निमित्तमात्र दिल्लीची ही झलक....
तिच्या येण्याबद्दल बरीच चर्चा होती, इशारे होते. कोणाचाही फोन आला, की पहिला मुद्दा तिच्या आगमनाविषयीचा असायचा. तिच्यापासून मी स्वत:ला जपल पाहिजे, काळजी घेतली पाहिजे, फाजील आत्मविश्वास नको .. असा सल्ला जवळजवळ सगळ्यांनी दिला. एका नव्या मित्राने डिसेंबरच्या सुरुवातीस मला पहिली मेल पाठवली. त्यात ‘Warm Regards’ असा मेलचा शेवट करताना ‘दिल्लीच्या थंडीत तुला याची गरज भासेल’ अस लिहील होत – ते वाचून मला हसायला आल!
मग एकदाची ती प्रसिद्ध, बहुचर्चित थंडीची लाट दिल्लीत आली.
दिवस धुक्यात गुरफटले. सूर्यदर्शन अप्राप्य झालं. ‘तोंडची वाफ दवडू नये’ या वाक्प्रचाराचा (की म्हण? हल्ली मी जरा वाक्प्रचार आणि म्हणींवर विचार करायला लागल्यामुळे माझा गोंधळ वाढला आहे!) प्रत्यय आला. लोक एकदम ‘सेल्सियस’च्या भाषेत बोलायला लागले. आग्रा, सिमला अशा शहरांशी तुलना व्हायला लागली. रस्त्यांवरच्या झाडांच्या फांद्या तोडून जागोजागी शेकोट्या पेटायला लागल्या. स्कार्फ, स्वेटर्स, शाली, कानटोप्या.....यांच्या रंगांची उधळण भोवताली दिसू लागली.
मागचे तीन महिने थोडीफार माहिती झालेली दिल्ली एकदम जणू बदलून गेली. एका बाजूने ती अधिक खुलली आहे अस वाटत असताना तीच गूढ अधिक गहिर झालं! पान गळून गेलेल्या झाडांमध्ये जसा जीव तगून असतो, तस दिल्लीचही आहे हे माझ्या लक्षात आल ...म्हणजे वर काही का दिसेना, आतल रहस्य अजून अबाधितच आहे माझ्यासाठी!
दिल्ली मला अजून नीट माहिती न होण्याच एक मुख्य कारण म्हणजे मी रोजचा प्रवास ‘मेट्रो’ ने करते. त्याचा मला भरपूर फायदा होतो – वेळ वाचतो, गर्दी कमी असते, दगदग वाचते, प्रवास तुलनेने आरामदायी आहे .. वगैरे वगैरे. पुणेकरांना मेट्रोच महत्त्व पटवून द्यायला आता माझ्याकडे भरपूर मुद्दे आहेत. पण त्यामुळे एक गोष्ट अशी झालीय की दिल्लीची फारशी चित्र माझ्या मनावर उमटत नाहीत. दिल्लीत मेट्रोचे आता सहा वेगवेगळे मार्ग आहेत. त्यांना Yellow Line, Red Line, Violet Line, Green Line, Blue Line आणि Orange Line अशी नाव आहेत. यातले काही मार्ग जमिनीवर आहेत, तर काही जमिनीच्या वरून (elevated) आहेत. रस्त्याने गेले तर इमारती दिसतात, माणस दिसतात, आकाश दिसत, वाहन दिसतात ..... पण माझा रोजचा प्रवास भुयारी मार्गावर असतो. त्यामुळे मला यातल माणसं वगळता काही दिसत नाही. घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर हा माझा रोजचा प्रवास म्हणजे जणू एका गुहेतून दुसऱ्या गुहेपर्यंतचा माझा अखंड प्रवास. त्याला अपवाद अर्थात सुट्टीच्या दिवसांचा. तेव्हा मी भरपूर भटकते, चालते – पण माझी मजल अजून तरी फार दूर गेलेली नाही. त्यादिवशी संध्याकाळी चांदणी चौकात गेले होते भटकायला. तेव्हा दोन तीन तासांत हजारो माणसं बघताना, त्यांचे स्पर्श चुकवत गर्दीतून चालताना आपण या महानगरात कस आपल्यापुरत एक बेट बनवून घेतलं आहे हे जाणवल! आता अधूनमधून बसने, चालत निरुद्देश दिल्लीत फिरायचा बेत आहे. सध्या सगळे बेत ‘थंडी कमी झाली की’ या एका मुद्द्यावर येऊन थबकले आहेत!
दिल्लीत आल्यापासून माझ्या काही सवयी बदलल्या आहेत हे नक्कीच!
तुमच्यापैकी जे मला ओळखतात त्यांनी दिल्लीत मला चालताना पाहिलं तर मी फार नम्र झाले आहे अस तुम्हाला वाटेल – कारण रस्त्यावरचा सगळा काळ मी मान खाली घालून चालत असते. पण याच कारण नम्रता अजिबात नाही! मग का?
तर दिल्ली हे एक घाण शहर आहे. मी मुख्यत्वे दिल्लीच्या चांगल्या समजल्या जाणाऱ्या भागात फिरते – राष्ट्रपती भवन, चाणक्यपुरी वगैरे. तरीही माझ हे मत बनल आहे! कॉमनवेल्थच्या बाकी भानगडी काहीही असोत, त्यामुळे दिल्लीत सुधारणा झाल्या अस काही दिल्लीकरांना वाटत! (अनेकांना त्या काही ठराविक भागात झाल्या आहेत अस वाटत!) मला मात्र दिल्ली हे अनेक खेडयांच एक कडबोळ वाटत! जिकडे तिकडे कचरा असतो, रस्त्यांवर पाणी वाहत असत, चिखल असतो, माणस थुंकत असतात, कुत्री भटकत असतात, खाऊन माणस कचरा तिथेच टाकत असतात, प्राण्यांचे माणसांचे मल –मूत्र रस्त्यांवर असते. मेट्रो स्टेशन स्वच्छ असत – कारण एक म्हणजे त्यात खाण्यापिण्याची सोय नाही आणि तिथ थुंकण हा ‘दंडनीय अपराध’ आहे (काही अपराध कायदेशीर असतात अस ते ऐकताना, वाचताना वाटत राहत!) पण एकदा स्टेशनच्या बाहेर पडल की घरात पोचेपर्यंत सगळा बकालपणा आहे. त्यामुळे मला ‘खाली मान घालून’ चालण्याविना पर्यायाच नाही!
याच अर्थातच एक कारण आहे. महानगराला एक शाप असतो – ते कोणाच नसत आणि त्याच कोणी नसत. जो तो स्वत:ला येथे उपरा समजतो – आणि त्यामुळे या शहराच्या भल्याबुऱ्याशी कोणाला फार काही देणघेण नसत!
दिल्लीत कोणाशीही गप्पा मारा – पाच मिनिटांत ती व्यक्ती तुम्हाला सांगते: “तसं पहायला गेल तर आम्ही मुळचे ....” हे गाव, शहर, प्रांत दिल्ली सोडून कोणताही असतो.
माझ्या एका टीममध्ये तीन जण बंगालचे (त्याला आपण अजून ‘पश्चिम’ का म्हणतो, हे एक कोडच!), दोन जण ओरिसाचे, दोन पंजाबचे, एक बाई हरियाणाच्या. दुसऱ्या टीममध्ये एक पाटण्याची, एक देहारादुनची, एक आसामचा, एक उत्तर प्रदेशची. तिसऱ्या टीममध्येही कमी अधिक परिस्थिती अशीच. यातले अनेक जण मागची पंधरा वीस वर्षे तरी दिल्लीत आहेत – पण ते दिल्लीचे नाहीत. निदान मनाने तरी नाहीत. मनाने ते जे सोडून आले आहेत, आणि जेथे ते परत जाण्याची शक्यता कमी आहे तेथेच आहेत. माणसाच्या या स्वभावाची मला गंमत वाटते. जे आहे त्याचे किंमत नाही आणि जे नाही त्याचा ध्यास, त्याचे स्वप्न!
दिल्ली सुरक्षित नाही – विशेषत: स्त्रियांसाठी म्हणून माझे लोक माझी जरा जास्त काळजी करतात. दिल्लीतले आणि दिल्लीच्या बाहेरचेही. तसं पाहायला गेल तर कोणत शहर, कोणती जागा आज स्त्रियांसाठी सुरक्षित आहे हा एक प्रश्नच आहे. पुण्यात काय बलात्काराच्या कमी घटना घडतात का? घरातच हिंसेचा सामना करावा लागणाऱ्या अनेक स्त्रियांना कामाच्या निमित्ताने मी भेटलेले आहे. घरगुती हिंसा (Domestic Violence) हा आपल्या समाजातला फार मोठा प्रश्न आहे. माझ्या परीने ‘चुकीच्या वेळी, चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या माणसांबरोबर’ मी असू नये याची मी काळजी घेते – मी फक्त इतकचं करू शकते!
मी अशी दिल्ली शहरापासून हातभर अंतर राखून राहिल्यावर हे शहर मला परक राहण – ही स्वाभाविक गोष्ट आहे. थोडा धोका पत्करून शहर पाहायला लागत – तरच ते समजत. त्या समजण्यात मलाच पुढाकार घ्यावा लागेल हे नक्की! दिल्लीला माझे काही अप्रूप नाही – इथे अशी लाखो माणस येतात आणि जातात. दिल्लीच्या आयुष्यात माझ्यामुळे काही फरक होत नाही. दिल्लीमुळे माझे आयुष्य मात्र बदलते – आणि म्हणून दिल्लीशी नाते जुळवण्यात मीच पुढाकार घेतला पाहिजे इतके भान मला आले आहे. आता जे कळले आहे ते वळते का, कसे वळते हे काही दिवसांत कळेल!