ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, January 24, 2011

६०. काही कविता: १५

कविता लिहिण्याची प्रक्रिया नेमकी काय असते – हा प्रश्न मी स्वत:ला अनेकदा विचारला आहे. तो माझ्यासाठी एक ‘यक्षप्रश्न’च आहे म्हणा ना! लिहायचं का नाही हा पर्याय नसतो अस मी समजून चालते – पण हे केवळ मी साक्षर आहे म्हणून! अक्षरांची आणि माझी ओळख नसती तर मी स्वत:ला कस व्यक्त केल असत – असाही विचार मनात येतो.
कविता कशाची असते? सुखाची? दु:खाची? समाधानाची? उदासीनतेची? वैतागाची?
मुळात कविता अनुभवांची असते? का विचारांची असते? का भावनाची असते? की त्याही पलीकडची असते?
कविता गूढ असते? की ती आपल्याला कळत नाही म्हणून गूढ वाटते?
कवितेला या सगळ्याशी काही देणे घेणे नसते .. ती येते आणि जाते ... आपल्याच नादात ..

उजाडले
रुजलेही
प्राणांतिक
उठसूट;


घेता माघार
मध्यात
राहे झाकली
ती मूठ;

तीर
मौनाचा गाठता
शब्दांची ही
लयलूट;

भग्नतेचा
शाप कोरा
निरंतर
ताटातूट!

दिल्ली, २२ जानेवारी २०११  २.०० 

11 comments:

 1. >>कवितेला या सगळ्याशी काही देणे घेणे नसते .. ती येते आणि जाते ... आपल्याच नादात ..
  खरोखर... कोरी, कोरडी पण सगळ्यांना अनेक भावनांमध्ये आकंठ भिजवून जाणारी!! :)

  ReplyDelete
 2. @aativas: निवडक मोजके शब्द, अर्थाने ओथंबलेले अब्द, बरसतात दरेक वेळी वाचताना. याना ठेका आहे नाचाचा. लय आहे गाण्याची. वाचनाबरोबर मी गुणगुणलो तर आनंद द्विगुणित होईल.

  (आनंद, इंग्रजी भाषांतर - Invulnerable हप्पिनेस: आनंद कुमारस्वामी) कलेचेच नव्हे तर आयुष्याचे किंवा जीवनाचे उद्दिष्ट केवळ आनंद - उजाडल्यापासून उजाडेपर्यंत - जन्मापासून मरेपर्यंत. हा आनंद शारीरिक - मानसिक - आत्मिक स्तरांवर घेता येतो.
  (मी "कलेसाठी कला" मानित नाही.)

  मानवाला भाषेची देणगी उत्क्रांतिने अस्तित्वात आल्यापासून मिळाली. अतिप्राचीन काळी (सुमारे ३०००० हजार वर्षांपूर्वीचे) मानवाने निर्माण केलेल्या चित्रांचे शिल्पांचे नमूने आता सापडलेत. याचा अर्थ ते लोक गात-नाचत नव्हते असा नाही. पण गाणे व नाचणे क्षणिक असते. ध्वनीफितीनी आता त्याची उत्कटता नाहीशी केलीय.

  ReplyDelete
 3. मी अजून शब्दांच्या अर्थात गुंतलोय!

  ReplyDelete
 4. रेमीजी, तुम्हाला या शब्दांचा जो काही अर्थ लागेल तो मला जरूर सांगा. कारण बरेचदा माझ्या शब्दांचा अर्थ मला कळत नाही. विशेषत: कवितेच्या बाबतीत हे नेहमीच घडत!

  ReplyDelete
 5. जे वाचले, जे जाणवले ते माझ्या बोलीत लिहिले. त्यात बरेच काही आले. मातीला आकार दिला तेव्हा घट घडला, व पाण्याने घटाचा आकार घेतला. उद्याचे कुणास माहित? शब्दाला संदर्भाने अर्थ येतो. जो तो आपापले संदर्भ आणि बोधना (perception) वापरून अर्थ लावतो.
  उदा. "आंबा पिकतो / रस गळतो / कोंकणाचा राजा, / बाई, / झिम्मा खेळतो" हे ऐकता ऐकता मी लहानाचा मोठा झालो. कधी अर्थ विचारला नाही; कुणी सांगितला नाही.
  तुमच्या कवितेत मला "घालमेल" दिसली, जी खरं म्हणजे या जमान्यात आमच्या पांचवीला पुजलेली आहे!!

  ReplyDelete
 6. :-) आभार .. अनेक गोष्टींचा अर्थ आपल्याला तसाच कळत जातो हे अगदी पटल!

  ReplyDelete
 7. शब्दांमुळे अनेक भूका किंवा गरजा निर्माण होतात कि काय असा प्रश्न पडतो. शिवाय शब्दांमुळेच अनेक गरजा पूर्ण व्हायला अथवा त्यांचा दाह शमायला मदतच होते.
  एकुणच ही प्रक्रिया मानवासाठी कुतूहलाचा विषय आहे. शब्द, अर्थ, सदर्भ, अनुभव, जाणीव- नेणीव इतका मोठा प्रवास शब्दांतून होतो. तोही व्यक्ती सापेक्ष. काळाला छेदुन.
  मानवाच्या अज्ञाताच्या प्रवासातला शब्द महत्वाचा सोबती.
  त्याविषयी किती न काय काय बोलाव...

  ReplyDelete
 8. कमलेश, शब्दांबद्दल शब्द सांगू शकत नाहीत हेच खर!

  ReplyDelete
 9. It is right direction of to find something....

  ReplyDelete
 10. Thanks Cshekhar, .. but sorry, I did not get your comment. Could you please elaborate a bit?

  ReplyDelete