पाँडिचेरीला बऱ्याचा वर्षांत गेले नाही हे सहजच कधीतरी लक्षात आलं. शेवटची गेले होते ती २०१२ मध्ये. मग पुन्हा एकदा जायचं ठरवलं. आधी मुळात तिथली राहण्याची व्यवस्था नक्की करावी लागते, त्यानुसार ट्रेनचं तिकिट काढलं. चेन्नेहून पाँडिचेरीला कसं जायचं, पाँडिचेरीत काय काय पाहायचं हे ठरवण्यासाठी एआयची मदत घेतली. एआयला तारखा दिल्या, बजेट सांगितलं, मला काय आवडेल ते सांगितलं. एआयने बऱ्यापैकी नियोजन करून दिलं. ते प्रत्यक्षात मी जसंच्या तसं अंमलात आणलं नाही हा भाग वेगळा.
एआय अर्थात काही माहिती चुकीचीही सांगतो हे मला मी पूर्वी पाँडिचेरीला जाऊन आल्यामुळे लक्षात आलं. उदाहरणार्थ पार्क गेस्ट हाऊस ते अरविंद आश्रम हे अंतर त्याने सहाशे पावलं असं सांगितलं (मी एआयला रोज सुमारे सात हजार पावलं चालायची आहेत मला - असं सांगितलं होतं,) पण प्रत्यक्षात ते अंतर सुमाारे दीड किलोमीटर आहे. पण अशा किरकोळ गोष्टी वगळता एआयने दिलेल्या माहितीचा मला चांगला उपयोग झाला.
प्रवास म्हणजे फक्त ट्रेन, स्थानकं, आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोचणं नसतं. प्रवासात भेटणारी माणसं पाहणं, त्यांच्याशी बोलणं ... हाही एक प्रवासच असतो. पाहायला लागलं की नेहमी माणसं दिसतात, अनुभव येतात, तसे याही प्रवासात ते आले.
विविधांगी माणसं ..
मुंबई-चेन्नै ट्रेनने प्रवास होता. शिरस्त्याप्रमाणे एक तास आधीच पुणे रेल्वे स्थानकावर पोचले. मेट्रो स्थानकाकडून फलाटांकडे जाण्याच्या जागेत बरीच मोकळी जागा होती, तिथं मी उभी राहिले. एवढी जागा होती तरीही लोक धक्के देत जात होते, काहीजण अगदी जवळ येऊन उभे राहात होते. खाजगी अवकाश (पर्सनल स्पेस) ही संकल्पना आपल्याकडे इतक्या कमी लोकांना का कळते हा मला नेहमी पडणारा प्रश्न आहे.
एकापाठोपाठ अशा दोन मुंबई-चेन्नै सुपरफास्ट ट्रेन आहेत असं दिसत होतं. त्यामुळे माझा थोडा गोंधळ झाला. माझी ट्रेन पंचेचाळीस मिनिटं लेट होती. गाडीत बसल्यावर टीसीशी बोलताना कळलं की दुसरी सुपरफास्ट ट्रेन आठवड्यातून एकदा आहे. काही आकस्मिक अडचण आली, तर ती ट्रेन थांबवतात. मी चालले होते ती ट्रेन रोजची असल्याने तिला शक्यतो उशीर होत नाही. या गाडीला प्राधान्यक्रम असतो.
एक विनोदी संभाषण कानांवर पडलं.
माझ्यासमोर ज्यांचा लोअर बर्थ होता, त्या ताई साईड लोअर बर्थवाल्या एका तरुण माणसाला "जागांची अदलाबदल करू" म्हणत होत्या. लोअर बर्थ सोडून साईड लोअर बर्थ त्यांना हवा होता कारण त्यांच्यासोबत असणाऱ्या दोन स्त्रियांची जागा तिकडं होती.
लोअर बर्थ सोडणारी स्त्री विरळाच. आणि लोअर बर्थ मिळत असतानाही साईड लोअर बर्थचा आग्रह न सोडणारा पुरुषही विरळाच.
बारामतीतल्या दहा-बारा माणसांचा एक गट दौंडला चढला. त्यांची तिकिटं वेगवेगळ्या ठिकाणी होती आणि नेहमीप्रमाणे त्यांना एकत्र बसायचं होतं. गंमत म्हणजे ते टीसीच्याच मागे लागले की त्याचा दाराजवळचा बर्थ सोडून त्याने कुठलातरी २३ का ४३ क्रमांकाचा बर्थ घ्यावा म्हणून.
ती चर्चा फार इंटरेस्टिंग होती.
आपण खूप आग्रह केला की समोरच्याला मानण्याशिवाय पर्याय राहणार नाही - असा काही लोकांना आत्मविश्वास असतो. तो या गटाच्या म्होरक्याकडे होता. टीसी त्यांच्या दबावाला बळी पडला नाही म्हटल्यावर त्यांनी माझ्याकडे मोर्चा वळवला.
मला साईड लोअर बर्थ गैरसोयीचा वाटतो.
मी त्यांना म्हटलं, “तुम्हाला गप्पा मारायच्या आहेत तोवर बसा सगळे इकडं. तुम्ही इथं रात्री नऊ-साडेनऊपर्यंत गप्पा मारत बसायला माझी काहीच हरकत नाहीये.”
तरी त्याचं तुणतुणं सुरूच होतं.
मग मी जरा मोठ्या आवाजात – “एकदा सांगितलं ना मी जागा बदलणार नाही” – असं म्हटलं.
त्यावर जणू काही या बाई जागा बदलत नाहीत म्हणजे किती क्रूर आहेत अशा थाटात त्यांचे आपापसात संवाद सुरू झाले. मी दुर्लक्ष केलं आणि निवांत खिडकीबाहेर पाहत बसले. समोर दिसणारी दृष्यं क्षणाक्षणाला बदलत होती.
त्या गटाच्या आपापसातल्या गप्पा अर्थातच माझ्या कानांवर पडत होत्या. बारामतीचा पोहणाऱ्या लोकांचा गट होता तो. वयं वेगवेगळी, व्यवसाय वेगवेगळे, पोहणं हा त्यांना जोडणारा धागा. सगळे मिळून तिरुपतीला चालले होते.
माझं त्या गटाच्या म्होरक्याशी झालेलं आधीचं संभाषण माहिती नसलेले एक काका तिथं येऊन बसले. त्यांनी मला सहज विचारलं, “कुठं जाणार आहात?”
मी सांगितलं, “चेन्नैला उतरून पुढं पाँडिचेरीला जाणार आहे.”
पाँडिचेरी हे नाव ऐकल्यावर ते काका माझ्याशी एकदम आदराने बोलू लागले.
काकांना मी योगी अरविंदांची शिष्या वाटले बहुतेक. ते निवृत्त प्राचार्य होते आणि त्यांनी योगी अरविंद, विवेकानंद यांचं बरंच काही वाचलं होतं. दुसरे एक काका निवृत्त सैनिक होते. त्यांनी काही वर्ष कारगिल परिसरात काम केलं होतं. तिथल्या वातावरणाबद्दल, अनुभवांबद्दल ते मला सांगत होते. मी मागच्या वर्षी लडाखला गेले होते आणि कारगिल बेस कॅम्पला भेट दिली होती असं सांगताच त्यांनी मला अगदी आदराने नमस्कार केला. हे दोन ज्येष्ठ नागरिक माझ्याशी आदराने बोलताहेत हे पाहताच क्षणार्धात त्या गटातल्या बाकीच्यांचा नूर पालटला.
मला त्या गटाच्या बदललेल्या वागणुकीची फार गंमत वाटली. मी एकटी इतक्या लांबचा प्रवास – म्हणजे चेन्नैपर्यंतचा, तोही ट्रेनने – करत होते याचं त्यांना फार कौतुक वाटलं. त्यांना असं कौतुक वाटावं याचंच मला नवल वाटलं. मी एकदम जणू काही त्यांच्यापैकी एक होऊन गेले. त्यांच्यासाठी 'बाहेरची/परकी ' ते 'आतली/आपली ' हा बदल नेमका कशामुळे झाला हे मला समजलं नाही.
रात्री त्या सर्वांनी त्यांच्या डब्यातलं जेवण मला आग्रहाने वाढलं. माझी 'रेलरेस्टो'वरची ऑर्डर सोलापूर स्थानकावर आली होती, तरीही. दहा लोकांच्या घरचं जेवण म्हणजे खूप सारं वैविध्य, अगदी लोणचं, ठेच्यापासून ते लाडूंपर्यंत. एकूण काय तर अनोळखी लोकांच्या घरचं जेवण्याची माझी परंपरा याही प्रवासात चालू राहिली.
रात्री दहा वाजता आणखी एक गंमत झाली.
माझ्या समोरचा लोअर बर्थ बदलून घेतलेल्या ताई अचानक प्रकट झाल्या. त्यांनी आधी तो बर्थ सोडला होता; पण आता तिथं मी (एक बाई) असल्यामुळे तोच लोअर बर्थ त्यांना हवा होता. त्यांनी बदलून घेतलेल्या बर्थच्या आसपास सगळे पुरुष होते, त्यामुळे त्यांना तिथं सुरक्षित वाटत नव्हतं.
दरम्यान सोलापूरला जुना टीसी जाऊन नवा आला. त्याला आधीचा अदलाबदलीचा इतिहास माहिती नव्हता. त्यामुळे तो काकांनाच ओरडायला लागला. ते बिचारे अंथरूण पसरून झोपायच्या तयारीत होते.
त्यांनी, “या ताई बघा. इथं आजुबाजूला आम्ही सगळे पुरुष असून त्या एकट्या असल्या तरी निवांत आहेत. तुम्ही पण झोपा तिकडं,” असा युक्तिवाद करायचा प्रयत्न केला.
त्या ताई काही बधल्या नाहीत. त्या काकांना उठून दुसऱ्या जागी जावंच लागलं.
'पुणे-अजनी वंदे भारत' जशी शेगावला रिकामी होते, तशीच ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठच्या सुमारास रेणिगुंठाला रिकामी झाली. जवळजवळ ऐंशी टक्के प्रवासी तिरुपतीला उतरणार होते. रेणिगुठा ते तिरुपती हे अंतर पंधराएक किलोमीटर असावं.
बायकांचा एक गट एक तास आधीच मोठमोठ्या बॅगा घेऊन दाराशी उभा राहत होता. त्यांना मी "अहो, वेळ आहे अजून तासाभराचा" म्हणून आतमध्ये आग्रहाने बसवून घेतलं. रेणिगुंठाला गाडी किती वेळ थांबेल, आपल्याला उतरायला जमलं नाही तर ... असे प्रश्न त्यांना पडले होते. रेणिगुंठाला गाडी चांगली पाच मिनिटं थांबते हे मी त्यांना पुन्हापुन्हा सांगत होते. तरी शेवटी पंधरा मिनिटं आधी त्या दारात जाऊन उभ्या राहिल्याच.
तिरुपतीला जाणाऱ्या पुरुषांचे आणि बायकांचे असे दोन गट दिसले. दोघांच्या प्रवासी बॅगांमध्ये फरक होता. बायकांच्या बॅगा भल्या मोठ्या होत्या, पुरुषांच्या अगदी छोट्या.
गप्पांमध्येही फरक होता. पुरुषांच्या गप्पा व्यावसायिक, कुणाच्या ओळखीने तिरुपतीत काय सोय झालीये, आणखी काय पाहायचंय, बायकोने डब्यात काय काय दिलंय... अशा प्रकारच्या. बायकांच्या गप्पा म्हणजे आंघोळीची सोय कशी आहे, आपल्याला चढावं लागेल ना, खायला काय मिळेल, फक्त इडलीच असेल का नाश्त्याला... वगैरे.
गप्पांचे विषय वेगळे होते, बॅगा वेगळ्या होत्या; पण आपापल्या समूहाला घट्ट चिकटून राहण्याची, त्यातच गुरफटून राहण्याची वृत्ती दोन्ही गटांमध्ये अगदी सारखी होती.
चेन्नेमध्ये ....
चेन्नैला एकच रेल्वे स्थानक नाही. चेन्नै सेंट्रल, चेन्नै एग्मोर आणि तांबरम ही मोठी स्थानकं आहेत; त्याशिवाय शहराच्या उपनगरी रेल्वेच्या जाळ्यात अनेक लहान-मोठी स्थानकं आहेत. त्यातलं चेन्नै सेंट्रल हे सर्वांत महत्त्वाचं स्थानक. पूर्वी ते Madras Central (एमएएस) म्हणून ओळखलं जायचं. २०१९ मध्ये त्याचं नाव बदलून Puratchi Thalaivar Dr. M.G. Ramachandran Central Railway Station करण्यात आलं. पण वापरातलं नाव एमएएस असंच आहे.
चेन्नै सेंट्रल हे मोठं स्थानक आहे, १७ फलाट आहेत तिथं.
![]() |
| चेन्नै सेंट्रल रेल्वे स्थानक |
मी एमएएसवर उतरले तर समोरच इव्ही (इलेक्ट्रिक वाहन) उभं होतं. सतरा-अठरा तास ट्रेनमध्ये बसले होते आणि बॅगही ट्रॉली बॅग होती, त्यामुळे मी सहज चालत जाऊ शकले असते. पण इव्हीमध्ये बसण्याचा अनुभव घ्यायचा म्हणून मी त्यात बसले. तीस रुपयांत त्याने मला स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराशी आणून सोडलं.
मग मेट्रो स्थानकाचा शोध. खरं तर अनेक ठिकाणी माहिती देणारे आणि दिशा दाखवणारे फलक होते, पण तरीही माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी माणसांना विचारत राहिले. मेट्रो पकडून मला कोयम्बेडू बस स्थानकावर जायचं होतं.
चेन्नेत मेट्रोचं काम २०१५ मध्ये सुरु झालं. सध्या निळा आणि हिरवा अशा दोन मार्गांवर ५४ किलोमीटरचं अंतर मेट्रोने पार करता येतं. चेन्नै सेंट्रलवर दोन्ही लाईन्स आहेत, त्यामुळे मला योग्य ती मेट्रो शोधण्यासाठी अनेकांशी बोलावं लागलं. एआयने मला कोयम्बेडू मेट्रोला उतरायला सांगितलं होतं. मी तिकिट काढताना मेट्रोच्या माणसाला 'मला पाँडिचेरीची बस घ्यायची आहे' असं सांगितलं होतं. त्याने दिलेलं तिकिट मी नीट पाहिलंही नव्हतं. कोयम्बेडू स्थानकावर उतरले तर समोरच दोन स्त्री पोलिस उभ्या होत्या. त्यांना विचारलं की बस स्थानक इथंच आहे ना - तर त्या म्हणाल्या पुढच्या स्थानकावर - सीएमबीटीवर - उतरा. मी घाईघाईने परत त्याच मेट्रोत चढले. आणि माझ्या मनात प्रश्न आला की आपलं तिकिट तर कोयम्बेडूपर्यंत होतं. आता दंड भरावा लागेल असं मी गृहित धरलं, मी सहज म्हणून तिकिट पाहिलं तर ते सीएमबीटीपर्यंतच होतं. मेट्रो स्थानकावर तिकिट देणाऱ्या माणसाने माझी गरज समजून घेत मला योग्य तिकिट दिलं होतं. मी त्या माणसाचे मनोमन आभार मानले.
चेन्नैच्या मेट्रोमध्ये एक गोष्ट लगेच जाणवली. प्लॅटफॉर्म आणि रुळांच्यामध्ये काचेचे पूर्ण उंचीचे दरवाजे आहेत. त्यांना Platform Screen Doors म्हणतात. ट्रेन येते, तिचे दरवाजे आणि प्लॅटफॉर्मचे दरवाजे एकाच वेळी उघडतात आणि ट्रेन गेल्यावर पुन्हा बंद होतात. पुण्याच्या मेट्रोमध्ये किंवा दिल्लीच्या बहुतेक मेट्रो स्थानकांमध्ये अशी व्यवस्था दिसत नाही. त्यामुळे आपल्या नेहमीच्या मेट्रोपेक्षा इथला प्लॅटफॉर्म वेगळा दिसत होता.
![]() |
| एमएएस ग्रीन लाईन मेट्रो स्थानक |
मेट्रोतल्या घोषणा आणि फलक फक्त इंग्रजी आणि तामिळ भाषांमध्ये होते. चेन्नैला उतरल्यावर मी जितक्या लोकांशी बोलले त्यातल्या बहुतेकांना हिंदी येत नव्हतं - जे स्वाभाविक आहे. कारण त्यांच्यासाठी हिंदी शिकणं हे मी तामिळ शिकण्याइतकंच अवघड आहे. दुसरी लिपी शिकायला लागते तेव्हा भाषा शिकणं जास्त अवघड असतं. इंग्रजीही सगळ्यांना येत नव्हतं - तेही ठीकच आहे. पण त्यामुळे पुढचे दहा दिवस अनेकदा असं झालं की समोर माणसं आहेत, ती बोलायला उत्सुक आहेत - पण मला त्यांच्याशी बोलता आलं नाही. कारण आमच्यात भाषेचा पूल नव्हता.
पण भाषा येत नसली तरी माणसांनी मदत मात्र केली. हातवारे करुन, कधी मला योग्य रस्त्यापर्यंत सोबत करुन, कधी मला योग्य बसमध्ये चढवून ... .. वेगवेगळ्या वयोगटातल्या स्त्री-पुरुषांनी हसतमुखाने जितकं त्यांना करता येईल तितकं माझ्यासाठी केलं. भाषा येत नसली तरी एखादं स्मितहास्य, एखादा कॉफीचा कप किंवा केळं यांची देवाणघेवाण, बसमधून उतरताना आधीच्या प्रवाशाने बॅग उतरवायला मला मदत करणं .. असा संवाद होत राहिला. आपण एका अनोळखी भागात असलो तरी इथलीही माणसं आपलीच आहेत असं सतत वाटत राहिलं.
बसचा प्रवास
पाँडिचेरीला जाणारी सरकारी एसी बस मिळाली.
![]() |
| सरकारी बस |
बसमध्ये चढल्यावर ऑनलाईन तिकिट काढता येत होतं. गर्दी नव्हती फारशी. मला एकटीला बसता आलं. बरेच स्थानिक लोकही फोनवर पैसे देऊन तिकिट काढत होते. तामिळनाडूमध्ये स्त्रियांसाठी बसप्रवास मोफत आहे, पण तो फक्त साध्या (ordinary) सरकारी बसने प्रवास करताना. एक्स्प्रेस, डिलक्स, किंवा एसी बसमध्ये स्त्रियांना सवलत नाही. आणि ते मला योग्यच वाटलं. तसंही चार तासांच्या प्रवासासाठी फक्त दोनशे रुपये तिकिट होतं.
![]() |
| राज्य महामार्ग |
तामिळनाडूतल्या लोकांना महाराष्ट्रातल्या लोकांसारखी खड्ड्यांमध्ये रस्ता असण्याची मजा अनुभवता येत नाही असं दिसतं. जेवढे रस्ते मी पाहिले, ते सगळे व्यवस्थित होते. अनेक ठिकाणी रस्त्याची कामं चालू होती, पण कुठंही वाहनांच्या रांगा लागल्या नव्हत्या. गरज नसताना हॉर्नही कुणी वाजवत नव्हतं. महामार्गावर भारंभार जकात नाके नव्हते. आणि सरकारी बसला टोल भरावा लागत नव्हता. कोस्टल रोडने जाणारी बस निवडल्यामुळे काही काळ चमचमता समुद्र दिसत राहिला.
सहप्रवाशांमध्ये गुजराती भाषा बोलणाऱ्या पण चेन्नेत स्थायिक असलेल्या (त्यामुळे चांगलं तामिळ बोलता येणाऱ्या) एक बेन भेटल्या. त्यांच्याशी गप्पा झाल्या त्या हिंदीत.
साधारणपणे संध्याकाळी पाचच्या सुमारास, म्हणजे पुण्यातून निघाल्यानंतर चोवीस तासांनी मी पाँडिचेरीत पोचले.
*****
पुढे चालू .....
.jpg)

.jpg)
.jpg)
.jpg)
No comments:
Post a Comment
पोस्टवरती प्रतिसाद नोंदवण्यात अडचण येत असल्याचे काही वाचकांनी कळवले आहे. तांत्रिक बाबी तपासून पहात आहे. प्रतिसाद येथे प्रकाशित होत नसल्यास मला इमेलवर (aativas@gmail.com) तो पाठवावा ही विनंती. धन्यवाद.