ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Saturday, July 18, 2026

२८३. 'बोशांको'ची भेट: भाग ४: काली आणि मेघनाद

(If you want to read this post in English, it is available here!) 

कोलकात्यातला मुक्काम संपत आला होता. कोलकात्यात जायचं तर दक्षिणेश्वर आणि बेलूर मठाला भेट देणं माझ्यासाठी आवश्यकच होतं. कोलकात्यातला शेवटचा दिवस दक्षिणेश्वर आणि बेलूर मठ भेटीसाठी राखून ठेवला होता. पण वेळेअभावी बेलूर मठात जाता आलं नाही. 

साधारणपणे १९८५च्या सुमारास मी दक्षिणेश्वर मदिरात गेले होते असं मला आठवतं. तेव्हा तिथल्या एका शिवमंदिरात वर्तमानपत्र वाचत बसलेला पुजारी पाहून धक्का बसला होता ते आठवतं. मंदिर माझ्या आठवणीप्रमाणे काही फार मोठं नव्हतं, तेव्हा तिथं गर्दी, रांग असला काही प्रकार असल्याचं मला आठवत नाही. यावेळी मात्र मंदिरात प्रवेश करताना (बाहेरून पाहताना)  ते प्रशस्त असल्याचं लक्षात आलं. 

बाहेरून दिसणारा मुख्य मंदिराचा एक भाग

त्या दिवशी आम्ही तिथं दुपारी अडीचला पोचलो तर कळलं की मंदिर तीन वाजेपर्यंत बंद असणार आहे. मंदिर असं मधल्या वेळात बंद असतं याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. मग थोडा वेळ घाटावर जाऊन बसलो. गंगा नदी जेमतेमच स्वच्छ होती – अपेक्षेप्रमाणे. 

पाणी कितीही घाण असू दे, गंगा नदीचं सान्निध्य नेहमीच सुखावणारं असतं. मंद वारा, दूरवर समोरच्या किनाऱ्यावर दिसणारं कोलकाता शहर, एक पूल, नदीत डुबकी घेणारी माणसं, माणसांनी नदीत टाकलेली नाणी शोधून काढणारी मुलं आणि स्त्रिया, गंगाजल घेऊन जायला पाण्याच्या छोट्या बाटल्या विकणारे लोक .... 

हुगळी (गंगा) तीरी

आणि या सगळ्यांत असून नसणारा गंगेचा प्रवाह .... गंगेचा तो विशाल आणि संथ प्रवाह पाहताना मला स्वतःच्या सुख-दुःखांचं क्षणिकत्व पुन्हा एकदा जाणवलं. नदीच्या आणि माणसांच्या पारंपरिक नात्यातला आपुलकीचा अंश आपल्यात अजून जसाच्या तसा रुजलेला आहे – याचा साक्षात्कार अविस्मरणीयच.

तिथं माझं आणि प्रतीक्षाचं मराठी बोलणं ऐकून एक बाई आमच्याशी बोलायला लागल्या.  त्या मराठीत बोलत होत्या म्हणून आधी वाटलं की त्याही आमच्यासारख्या पर्यटक असतील.

पण त्या निमलष्करी दलाच्या बँकेतल्या अधिकारी होत्या. (बँक हा त्यांनी वापरलेला शब्द. अशी  काही बँक असते ही माहिती मला नवीच होती. आंतरजालावर शोधल्यावर कळलं की ही सार्वजनिक बँक नसून त्या विशिष्ट दलाची आंतरिक सहकारी सोसायटी आहे.) त्यांचे पतीही त्या निमलष्करी दलामध्ये वरिष्ठ अधिकारी आहेत. गेली सात वर्ष त्या कोलकातामध्ये आहेत. त्या नेहमी दक्षिणेश्वरला येतात. आणखीही बरीच वैयक्तिक माहिती त्यांनी आपणहून उत्साहाने दिली. दूरच्या ठिकाणी आपली भाषा बोलणारी माणसं भेटली की लोकांना खूप बरं वाटतं असं दिसतं. 

त्या ताई उत्साहाने आमच्या सोबत राहिल्या आणि आम्हाला माहिती देत राहिल्या. सामान कुठं ठेवायचं, चपला कुठं ठेवायच्या वगैरे सांगत राहिल्या.  खरं तर एवढी माहिती सांगून त्या रांगेत निघून जातील असं मला वाटलं होतं. पण त्या आमच्या सोबतच थांबल्या. मंदिरात प्रवेश केल्यावर तीन रांगा असतात, त्यातल्या मधल्या रांगेत उभं राहिलं तर देवीचं पूर्ण दर्शन होतं असं त्यांनी सांगितल्यामुळे आम्ही मधल्या रांगेत त्यांच्यासोबत उभे राहिलो. पुढचे दोन-अडीच तास रांगेतही आमच्या गप्पा चालू राहिल्या. 

त्यांच्या बोलण्यातून त्या कानडी-मराठी ब्राह्मण कुटुंबातल्या होत्या असं दिसलं. त्या शुद्ध शाकाहारी होत्या. त्यामुळे बंगाली लोकांच्या मासेप्रेमावर खूप नाराज होत्या. ‘इथं सगळीकडं फार घाण असते’ म्हणाल्या. त्यांचा एकंदर सूर तक्रारीचाच होता. 

काली मंदिर

मंदिर शांत होतं. सूर्यप्रकाश हळूहळू कलायला लागला होता तेव्हा तर गंगेच्या तीरावरून येणारी हवा मस्त वाटत होती. लोक रांगांमध्ये शांतपणे उभे होते. लोकांना मोबाईल बाहेर ठेवून यावं लागल्यामुळे रील्स-कॉल्स वगैरे शक्य नव्हतं. रांग अत्यंत संथपणे पुढं सरकत होती, पण कोणी त्यासाठी अस्वस्थ दिसत नव्हतं.

दक्षिणेश्वर काली मंदिर. रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्या आयुष्यात या मंदिराचं स्थान अतिशय महत्त्वाचं आहे. जानबाजारच्या जमीनदार घराण्यातील 'राणी रासमणी' यांनी या मंदिराची स्थापना केली. समाजात एका खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीच्या (तत्कालीन समाजाची धारणा) स्त्रीने बांधलेल्या मंदिरात उच्चवर्णीय ब्राह्मण पूजा करणार नाहीत, असा त्या काळी मोठा वाद निर्माण झाला. पण त्याला न जुमानता राणी रासमणी यांनी १८५५ मध्ये हे मंदिर पूर्ण केलं. याच मंदिराचे मुख्य पुजारी म्हणून रामकृष्ण परमहंस रुजू झाले. त्यापुढचा इतिहास आपल्याला माहिती आहेच.

हे मंदिर बंगालच्या पारंपारिक नवरत्न (नऊ शिखरं असणाऱ्या) शैलीचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. मुख्य मंदिर एका अवाढव्य चौथऱ्यावर उभं आहे. मंदिराला तीन मजले असून त्याच्या कोपऱ्यांवर आकर्षक रीतीने नऊ शिखरं रचलेली आहेत. मुख्य मंदिराच्या समोर विस्तीर्ण पटांगण आहे. हुगळी (गंगा) नदीच्या घाटाला लागून एकाच रेषेत बांधलेली हुबेहूब अशी १२ 'शिव मंदिरं' आहेत. ही मंदिरं बंगालच्या पारंपारिक 'आठचाला' (आठ छतांची) स्थापत्यशैलीत आहेत. लाल विटांचा आणि पांढऱ्या चुन्याचा वापर करून केलेल्या या बांधकामात एक प्रकारचा साधेपणा आहे. आणि त्याचवेळी राजेशाही थाटही आहे. 

वास्तुविशारद असलेल्या प्रतीक्षाने तिचं छोटं स्केचबुक आणि पेन माझ्या स्लिंग बॅगमध्ये ठेवलं होतं. ते बाहेर काढून तिने मंदिराचं स्केच करायला सुरूवात केली. हे स्केच पाहून तुम्हाला मुख्य मंदिराच्या बाह्य स्वरूपाची थोडी कल्पना येईल. 

मुख्य मंदिराचं प्रतीक्षाने रांगेत उभ्या उभ्या काढलेलं स्केच

माझ्यापुढं रांगेत दोन परदेशी तरुण उभे होते. त्यांच्याशी बोलणं झालं. त्यातला एक अमेरिकेचा होता तर दुसरा ग्रीसचा. अमेरिकन तरुण गेली काही वर्ष रमण महर्षींच्या आश्रमात (तिरूवण्णामलै, तामिळनाडू) राहतो आहे. मी काही वर्षांपूर्वी तिथं जाऊन आले होते, त्यामुळे काही आठवणी शेअर केल्या गेल्या. मग अर्थातच पाँडिचेरी, कन्याकुमारी, वाराणसी, अलाहाबाद, रामेश्वरम ... असे अनेक विषय निघाले. त्या अमेरिकन तरुणाला भारतीय तीर्थक्षेत्रांची माझ्यापेक्षा जास्त माहिती होती असं मला वाटलं. ग्रीक तरुणाची ही पहिलीच भारतभेट होती आणि हा अमेरिकन तरुण त्याचा मार्गदर्शक सोबती होता. ते दोघंही मंदिरातल्या वातावरणाचा शांतपणे आस्वाद घेत होते.

जवळजवळ अडीच तास उभं राहून, केवळ एक मिनिटांत कालीमातेचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो. या दर्शनाबद्दल शब्दांत काही सांगता येणं अवघड आहे. मी काही श्रद्धाळू व्यक्ती नाही. पण तरीही मी अडीच-तीन तास रांगेत आनंदाने उभी राहिले. मला जाणवलं की मी मंदिरांमध्ये मूर्ती किंवा देव पाहायला जात नाही. दर्शन म्हणजे केवळ मूर्ती पाहणं नसतंच मुळी माझ्यासाठी. दर्शन म्हणजे तिथं असलेल्या शेकडो-हजारो वर्षांच्या सांस्कृतिक संचिताशी मी जोडलं जाण्याचा एक क्षण. या एका क्षणाकरता मी केलेला प्रवास...... आणि म्हणूनच कदाचित तो शब्दातीत असतो.  

दिवसाच्या दुसऱ्या अध्यायात होता  ‘मेघनादवध काव्य’ हा नाट्यप्रयोग. त्यासाठी आम्ही ‘गिरीश मंच’च्या दिशेने निघालो. धार्मिक विश्वातून थेट रंगभूमीच्या जगात. 

गिरीश मंच 

कोलकात्याच्या बागबाजार या ऐतिहासिक भागात असलेलं 'गिरीश मंच' हे बंगाली नाट्यसृष्टीचं एक महत्त्वाचं केंद्र आहे. आधुनिक बंगाली रंगभूमीचे जनक अशी उपाधी देण्यात आलेले प्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक, आणि अभिनेते गिरीशचंद्र घोष यांचं नाव या नाट्यगृहाला देण्यात आलं आहे. हे गिरीश दुसरेतिसरे कुणी नसून रामकृष्ण परमहंसांचे शिष्य होते हे कळल्यावर उगाचंच छान वाटलं. इथं प्रायोगिक आणि व्यावसायिक अशा सर्व प्रकारचे नाट्यप्रयोग होतात. 


गिरीशचंद्र घोष नास्तिक होते. ते दारूच्या आहारी गेले होते. पण रामकृष्ण परमहंसांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. महेन्द्रनाथ गुप्त यांनी 'एम' या नावाने लिहिलेल्या 'श्रीश्री रामकृष्ण कथामृत' या ग्रंथात रामकृष्ण परमहंस आणि गिरीशचंद्र यांच्यातील हृद्य नात्याचे वर्णन आहे. गिरीशचंद्र यांनी 'बुद्धदेव चरित', 'बिल्वमंगल', 'तपस्या' यांसारखी नाटकं बंगाली रंगभूमीवर सादर केली. विवेकानंद आणि गिरीशचंद्र  एकमेकांना खूप जवळचे होते. दक्षिणेश्वरहून 'गिरीश मंच'मध्ये जाणं हा म्हणूनच एक प्रकारचा सुसंगत प्रवास होता, त्यात काहीही विरोधाभास नव्हता.  

मेघनादवध काव्य आणि गौतम हालदार

इथं आम्ही आलो होतो ते 'मेघनादवध काव्य' प्रयोग पाहायला. हे काव्य मायकेल मधुसूदन दत्त (१८२४-१८७३) यांनी लिहिलं होतं. १८६१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या (दीडशे वर्षांच्या जुन्या) काव्यावर आज २०२६ मध्ये प्रयोग व्हावा, त्याची एक हजार रुपये किंमत असेलेली तिकिटं तत्काळ संपावीत याचं मला नवल वाटलं. आमच्या मैत्रिणींनी आमची तिकिटं पुरेशी आधी काढलेली असल्याने आम्हाला पुढच्या रांगेत जागा मिळाली. इथंही एकच सीट नंबर दोन व्यक्तींना देणं वगैरे घोळ होते. त्यावरुन झालेली बंगाली भाषेतली वादावादी ऐकताना आपल्याचा गावात आहोत असं वाटलं. 

नाट्यप्रयोग गौतम हालदार सादर करत होते. १९६३ मध्ये जन्मलेले गौतम हालदार हे केवळ एक अभिनेते नसून ते दिग्दर्शक, गायक आणि नृत्यकार असे बहुआयामी कलावंत आहेत. गेल्या तीस वर्षांत गौतम हालदार यांनी देश-विदेशात मेघनादवध काव्यचे शेकडो प्रयोग केले आहेत.

हा जवळपास एकपात्री प्रयोग आहे. रंगमंचावर काही वादक आणि गायक बसले होते. ते कोरस आणि वादनात साथ देत होते. पण रंगमंचावरचं सुमारे अडीच तास चालणारं सादरीकरण गौतम हालदार यांचं एकट्याचं होतं. प्रयोग पूर्णपणे बंगाली भाषेत होता. दोन प्रसंगाच्या मधल्या विरामात मी माझ्या शेजारी बसलेल्या बंगाली दीदींना  काही वाक्यांचा अर्थ विचारला तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे प्राचीन बंगाली त्यांनाही समजत नाहीये. (शिवाय बंगाली कळत नसताना हे लोक इथं का आलेत - असं प्रश्नचिन्हं दिसलं ते वेगळंच.)  मेघनाद वध झाल्यानंतरचं सगळं वर्णन पहिल्या प्रसंगात होतं असं त्यांनी मला आत्मविश्वासाने सांगितलं – पण प्रत्यक्षात प्रयोगात मेघनाद वध फार नंतर आला. कथा सुरुवातीला फारशी समजत नव्हती, हळूहळू ती उलगडत गेली. 

मेघनाद वध हे  महाकाव्य बंगाली साहित्यातील मैलाचा दगड मानलं जातं. या काव्याचा गाभा रामायणातील लंकेच्या युद्धावर आधारित आहे, पण दृष्टिकोन अपारंपरिक आहे. मधुसूदन यांनी या महाकाव्यात रावणाला एक उदात्त, स्वाभिमानी आणि दुर्दैवी राजा दाखवलं आहे. तर त्याचा मुलगा मेघनाद (इंद्रजित) याला देशासाठी प्राणांची आहुती देणारा एक परमवीर नायक म्हणून उभं केलं आहे. तसंच राम आणि लक्ष्मण यांच्या मर्यादा आणि त्यांच्याकडून झालेल्या चुकांवर कवीने बोट ठेवलं आहे. हे काव्य एकूण नऊ सर्गांमध्ये (भागांमध्ये) विभागलेलं असून त्यात वीर, करुण आणि रौद्र रसांचा अद्भुत आविष्कार पाहायला मिळतो. मधुसूदन यांनी बंगाली भाषेत पहिल्यांदाच 'अमित्राक्षर छंद' (Blank Verse) यशस्वीपणे आणला. बंगाली कवितेला त्यांनी यमकांच्या बंधनातून मुक्त केलं. या काव्यातील बंगाली भाषा ही आजची साधी किंवा बोलीभाषा नाही; ती अत्यंत संस्कृतप्रचुर, जड, गंभीर आणि अभिजात (Classical Bengali) आहे.

गौतम हालदार यांचा कायिक आणि वाचिक अभिनय जबरदस्त होता. कोणत्याही पात्राचा पोषाख न बदलता, केवळ आपल्या हातातील एका साध्या उपरण्याच्या आणि शरीराच्या अद्भूत लवचिकतेच्या जोरावर ते काही सेकंदात रावणाचे रौद्र रूप धारण करतात, तर दुसऱ्याच क्षणी पुत्राच्या विरहाने व्याकुळ झालेली मंदोदरी किंवा पतिव्रता प्रमिला बनतात. भीती, क्रोध, दु:ख, आनंद, प्रेम, तिरस्कार, द्वेष, शांती ... अशा विविध पात्रांच्या (रावण, मंदोदरी, सीता, लक्ष्मण, मेघनाद, बिभीषण, राम ......) भावना ते अत्यंत उत्कटपणे व्यक्त करत होते. एका बाजूला युद्धाची भयानकता दाखवणारे त्यांचे आक्रमक डोळे आणि पायांमधील ताठरता असते, तर दुसऱ्या बाजूला रावणाचा पराभव आणि असहाय्यता दाखवणारी शरीराची मान टाकलेली अवस्था. बंगाली समजत नसलं तरी त्यांची अभिनयाची भाषा थेट पोचणारी होती. मजा आली. 

**********

बोशांकोतून परतण्याची वेळ झाली.
बोलपूरमधलं मातीचं घर, रवीन्द्रनाथांचं शांतिनिकेतन, कोलकात्याचा इतिहास, दक्षिणेश्वरची भक्ती, आणि रंगभूमीवर पुन्हा जिवंत झालेला मेघनाद......... 
या आठ दिवसांत मला बंगालचे अनेक रंग दिसले. इथं अनेक सुप्त प्रवाह आहेत, गंगेसारखेच. काही कळले, काहींची फक्त चाहूल लागली. 
पाहुणी म्हणून आले होते. बंगालच्या अंगणात बसून त्याच्या गुजगोष्टी ऐकताना काही काळ तरी इथलीच होऊन गेले. 

19 comments:

  1. हा लेख लिहायला खूपच वेळ घेतला ब्वॉ तुम्ही. पण छान झालाय हाही लेख. दर्शनवालं चिंतन आवडलं. आता पुढचा दौरा कधी आणि कुठे?

    ReplyDelete
  2. मेघनाद वध - माहिती नव्हतं. शोधतो. मालिकेतले सगळे लेख आवडले. लिहिणं चालू ठेवा.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. मलाही पहिल्यांदाच कळलं या काव्याबाबत. मलाही वाचायचं आहे ते . अर्थातच इंग्रजी अनुवाद - असला तर.

      Delete
  3. You know what? This is not a travel blog. You always appear to have that connect. but people and places are not the key even though you are spending time with them. Something I cannot explain.....but it is nice.😊

    ReplyDelete
    Replies
    1. not *just* a travel blog.

      Delete
    2. धन्यवाद. लोक-जागा महत्त्वाच्या नसतात असं नाही, पण ... मला वाटतं मला समजलं तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. ते शब्दांत सांगता येणं अवघड आहे.

      Delete
  4. तू देवळात कशी काय जातेस - या प्रश्नाचं दुसरं एक उत्तर मिळालं. म्हणजे Indology हे उत्तर आधीच माहिती आहे. 😀

    ReplyDelete
    Replies
    1. हाहा... Indology हे आयुष्यात नंतर आलेलं आणि म्हणून दुसरं कारण आहे, पहिलं नाही :-)

      Delete
  5. बऱ्याच दिवसांनी वाचायला मिळाले. मेघनादवध वाचून हलदार यांचे कलाविष्कार पाहण्याची इच्छा झाली आहे. युट्यूब वर शोध घेतो. अशा साहित्यातून भारतीय संस्कृतीचा परिचय खरतर दर्शन होते.
    असेच लिहित राहावे.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. गौतम हालदार यांचा उल्लेख पहिल्यांदा जिथं आहे (मेघनाद वध शीर्षकातला दुसरा परिच्छेद) तिथं हालदार यांची युट्युब क्लिप लिंक केली आहे. त्या शब्दांवर क्लिक करा. किवा युट्युबवर गौतम यांचं नाव दिलं तरी खूप व्हिडिओ मिळतील पाहायला. नक्की पाहा, आवडेल याची खात्री आहे.

      Delete
    2. प्रवासवर्णन म्हणून नव्हे, तर बंगालच्या संस्कृतीचा, इतिहासाचा, अध्यात्माचा आणि कलेचा घेतलेला संवेदनशील वेध आहे हा..
      दक्षिणेश्वरच्या घाटावरील शांत क्षण, गंगेच्या प्रवाहातून केलेलं जीवनाचं चिंतन, रांगेत भेटलेली मराठी व्यक्ती, परदेशी प्रवाशांशी झालेला संवाद, मंदिराचं ऐतिहासिक आणि स्थापत्यवैभव, त्यानंतर गिरीश मंचावर अनुभवलेला "मेघनादवध काव्य"चा अप्रतिम नाट्यप्रयोग...या सगळ्याचं इतकं जिवंत आणि ओघवतं वर्णन केलं आहे की वाचक¿ त्या प्रवासाचा सहप्रवासी होतो.
      विशेषतः "दर्शन म्हणजे केवळ मूर्ती पाहणं नसतं; ते शतकानुशतकांच्या सांस्कृतिक संचिताशी जोडलं जाण्याचा क्षण असतो" हा विचार मनाला खोलवर स्पर्शून गेला. अध्यात्माकडे पाहण्याचा हा अतिशय सुंदर आणि व्यापक दृष्टिकोन आहे.
      इतिहास, साहित्य, रंगभूमी आणि वैयक्तिक अनुभव यांचा सुंदर मेळ घालत तुम्ही प्रत्येक ठिकाणाला एक वेगळी अर्थपूर्णता दिली आहे. लेख वाचून दक्षिणेश्वर आणि गिरीश मंच यांना नव्या नजरेने पाहावंसं वाटलं. अशाच समृद्ध, अभ्यासपूर्ण आणि मनाला भिडणाऱ्या लेखनाची आतुरतेने वाट पाहत राहीन. मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा!

      Delete
    3. अनामिक /अनामिका, सविस्तर प्रतिसादासाठी आभारी आहे. तुमच्यासारख्या वाचकांनी दिलेली दाद महत्त्वाची असते, विशेषत: माझ्यासारख्या अनियमित ब्लॉगरसाठी.

      Delete
  6. लेखाचं टायटल 😅 मला वाटलं मेघनाद हा कालीमातेचा एखादा भक्त असेल 😄 चांगला ट्विस्ट आहे. आणि हो, लेख नेहमीसारखा छान आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. :-) हे शीर्षक ठरवलं वगैरे नव्हतं. लिहिता लिहिता सुचलं आणि वापरलं. पण तुम्ही म्हणता तसं वाटू शकतं (मेघनाद हा कदाचित कालीचा एक भक्त असेल) हे डोक्यातच आलं नव्हतं.

      Delete
  7. Hi, read your article on the tour of west Bengal
    Very beautiful
    Enjoyed reading it. - Nutan

    ReplyDelete
    Replies
    1. प्रोत्साहनपर अभिप्रायासाठी आभारी आहे, नूतन.

      Delete
  8. चारी लेख आवडले. 'बंगालला जायला पाहिजे यार" असं वाटलं ☺️

    ReplyDelete
  9. लेख नेहमीसारखा उत्तम आहे. प्रतीक्षा मॅडमनी काढलेलं स्केच पण छान आहे.

    ReplyDelete

पोस्टवरती प्रतिसाद नोंदवण्यात अडचण येत असल्याचे काही वाचकांनी कळवले आहे. तांत्रिक बाबी तपासून पहात आहे. प्रतिसाद येथे प्रकाशित होत नसल्यास मला इमेलवर (aativas@gmail.com) तो पाठवावा ही विनंती. धन्यवाद.