ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Friday, August 6, 2010

३८. काही कविता: १२ पांडुरंग

बेल वाजली..
’आत्ता या वेळी कोण?’
चडफडत दार उघडले,
तर समोर पांडुरंग -
मला म्हणाला, “बोल".

कटेवर हात नव्हते,
पायाखाली वीट नव्हती,
चंदनाचा टिळा नव्हता,
भोवती भक्तीचा मळा नव्हता.

मी म्हटले, “या, बसा.
सुखदु:खाच्या गोष्टी बोलू हवे तर,
पण उगीच दांभिक
देवत्त्वाचा आव आणू नका.”

“हे तर लई बेस झालं"
म्हणत तो विसावला,
आरामखुर्चीत बसून
गॅलरीतून दिसणारा
आकाशाचा तुकडा
न्याहाळताना हरवून गेला.

त्याने मला
प्रश्न विचारले नाहीत,
मीही नाही.
त्याने मला
उपदेश केला नाही,
मीही नाही.
त्याने स्वत:भोवती
एक अदृष्य भिंत रचली,
मीही तेच केले.
माझ्या सहवासात
त्याने स्वत:चे एकाकीपण
मनमुराद जपले -
मीही तेच केले.

तरीही आम्ही
एकमेकांचे झालो
आणि त्या एकतानतेतही
दोन भिन्न वस्तू उरलो.

खूप दिवसांनी
काचेला तडा जाताना
मधेच एकदा भावूक म्हणाला,
“ज्ञाना, तुका, नामा
गेल्यापासून
जीव रमत नाही....”
त्याला पुढचे बोलू न देता
(ते जरासे चुकलेच माझे!)
मी चकित होऊन म्हटले,
“मायेच्या
या जंजाळात अडकून
देवा, तुम्ही वायाच गेलात!”

त्याने दयार्द्र
(की कसल्याशा त्याच)
नजरेने माझ्याकडे पाहिले
आणि गप्प झाला.
माझे लक्ष नसताना
कधीतरी अचानक
मला न सांगताच
हलके निघून गेला.

माझ्या घरात
अजून त्याची
वैजयंती माळ आहे;
सगळे व्यापून
एकाकीपणाशी
चिरंतन नाळ आहे;
मुठीत आलेले
हरपून गेले
रौद्र त्याचा जाळ आहे;
व्याकूळ स्वर
भिरभिरणारा
अनंत बाहू काळ आहे.

वाट पाहते मी रोज
पण मला खात्री आहे-
तो इकडे फिरकणार नाही,
विटेविना त्याचा
अधांतरी पाय आता
माझ्या दारात थिरकणार नाही.

आता अखेर
मलाच पाऊल उचलावे लागेल,
त्याच्या दारात
जाऊन म्हणावे लागेल,
“बोल".

पण तो अखेर
पांडुरंग आहे.
माझ्या घरात येणे, गुंतणे
आणि निघून जाणे
त्याला शक्य होते -
मला जमेल का गुंतणे?
आणि गुंतल्यावर
सहज निघून जाणे?


पुणे १५ मार्च २००५ २१.३०

11 comments:

 1. कवींच्या तावडीतून पांडुरंगाची पण सुटका नाही तर!
  आवडली तुमची कविता.

  ReplyDelete
 2. मला जमेल का गुंतणे?
  आणि गुंतल्यावर
  सहज निघून जाणे?


  faar chhan

  ReplyDelete
 3. अनामिक, बरोबर आहे तुमचं मत!

  धन्यवाद आणि स्वागत आहे BinaryBandya

  ReplyDelete
 4. आभार कमलेशजी.

  ReplyDelete
 5. वेल... पांडुरंगाच्या देवत्त्वाची मर्यादा आहे ती. तो, खरं तर, देव नव्हेच. तो स्वाभाविक जगणारा माणूस. देवत्त्वाच्या आपल्या कल्पनांच्या मोजपट्टीतून आपण त्याला मोजतो आणि चुकतं. त्यामुळं, त्याला जे जमलं ते जमतंच. त्याच्यासारखं होता आलं पाहिजे. आता तेच कठीण असतं, म्हणून त्याला देव म्हणत असावेत. उत्तम कविता. उत्तम.

  ReplyDelete
 6. अनामिक,आभार.

  ReplyDelete
 7. तरीही आम्ही
  एकमेकांचे झालो
  आणि त्या एकतानतेतही
  दोन भिन्न वस्तू उरलो.......

  वाह!! सुंदर .....

  ReplyDelete