ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, June 9, 2011

७५. अनोळखी


शिबिराची पहिली संध्याकाळ. डोंगर चढून दमून येणारी पण प्रफुल्लित चेह-याची तरुण मुल आणि मुली. त्यांच स्वागत तितक्याच उत्साहाने करणारी महेश, स्वाती, रंजना, प्रकाश वगैरे कार्यकर्ती मंडळी! तूर्त माझ्याकडे कोणतचं काम नसल्याने मी निसर्गास्वाद घेत निवांत....

तेवढयात रंजना चिंताक्रांत चेहरा घेऊन आली. सहसा ती अशी नसते कायम हसतमुख असते म्हणून मी जरा विचारांत पडले. ती मुलगी आहे ना, ह, तीच निळा शर्ट आणि जीन्स घातलेली ..: रंजनाने सुरुवात केली. ती मुलगी तर मला एकदम आवडली. काय झालं तिचं? मी रंजनाला विचारलं! अग, तिन आधी नाव नोंदवलेल नाही, तशीच आलीय आणि आता ती अर्ज भरून देणार नाही म्हणतेय जरा बघतेस का? रंजनाला खरचं टेन्शन आलं होत!

आता आठ दिवसांच हे निवासी शिबिर. कोणी आजारी पडल, काही अडचण आली तर घरचा पत्ता हवाच की सगळ्यांचा. कधी कधी पोलिस पण येतात विचारायला. आपल्या बाजूने आपण सगळ व्यवस्थित ठेवायला पाहिजे. ही मुलगी ठीकठाक दिसत होती म्हणजे तिच्या चेह-यावरून तरी सगळ काही नॉर्मल आहे अस वाटत होत. मग काय असेल नेमक?

ती मुलगी माझ्याकडे आली. मी तिला बसायला सांगितल. मी काही विचारण्याची वाट न पाहताच ती म्हणाली, मी ललिता. पण यापलिकडे मला काहीच सांगायचं नाही. माझ्याकडे पैसे आहेत शिबिराची फी भरायला. मला यायचं आहे या शिबिरात. तुम्ही प्लीज मला नाही म्हणू नका..... तिच्या स्वरांत प्रामाणिकपणा होता, एक प्रकारचा ठाम निश्चय होता. इतकी शिबिरं आजवर मी घेतलीत, पण अशी विनंती कोणी कधी केली नव्हती.

मी क्षणभर विचार केला. मी सहसा कोणावर अविश्वास दाखवत नाही. शिवाय ही मुलगी काही अगदी लहान नव्हती स्वत:चं भलंबुरं समजण्याइतकी मोठी होती. ती जे बोलत होती त्यामागे काहीतरी कारण असणार पण ते ती सांगणार नाही. काही माणस पत्ता लागू देत नाहीत त्यांच्या अडचणींचा ही त्यातली दिसत होती. मी म्हटल, ठीक आहे, काही हरकत नाही. माझा विश्वास आहे तुझ्यावर. फक्त मला एक सांग तुझी इच्छा असली तर सांग तू काही अडचणीत तर नाहीस? काही मदत हवी आहे? आम्ही काही करू शकतो का?

माझ्या प्रश्नावर ती स्वच्छ हसली. म्हणाली, तुम्हाला मोकळेपणाने सांगायला हरकत नाही माझी. मला ओळखी करून घ्यायचा फार कंटाळा आलाय. माझ आडनाव, माझे आई वडील, माझ कॉलेज .. ही माझी ओळख कशी काय असू शकते? ते सगळ समोरच्यानं विचारायचं आणि मी सांगायचं आणि मग आम्ही एकमेकाना ओळखतो अस म्हणायचं हे मला फार औपचारिक आणि विनोदी वाटत. इतकी वर्ष तेच तर केलं. आता जरा अनोळखी लोकांमध्ये राहायचा अनुभव मिळवण्यासाठी इथे आलेय.

मला तिचा विचार आवडला. मी तिला सांगितलं, ठीक आहे. मी बघते काय करायचं त्या अर्जाच ते. पण काहीही अडचण आली तर आम्ही आहोत इथे आम्ही सगळे तुझे हितचिंतक आहोत हे विसरू नकोस. इतक्या कमी वेळात मला तिची बाजू पटेल अस तिला वाटलं नव्हत बहुतेक. एक क्षण ती नुसतीच उभी राहिली. मग भानावर येत हसून म्हणाली, माझ्यामुळे तुम्हाला काहीही त्रास होणार नाही याची खात्री बाळगा.

रात्रीची कार्यकर्ता बैठक अपेक्षेप्रमाणे या मुद्द्यावर आलीच. एका मुलीला तिचं आडनाव, शिक्षण, पत्ता असल्या माहितीविना मी शिबिरात प्रवेश द्यायला सांगितला हे कोणालाच आवडलं नव्हत. खर तर हा माझा मूर्खपणा होता अस इतरांना वाटत होत. पण तोंडावर टीका करायची आपली पद्धत नाही – म्हणून ते सगळे मला “तू फार भोळी आहेस, असा भाबडेपणा उपयोगाचा नाही, आपण कठोर निर्णय वेळीच घ्यायला पाहिजेत..” अस काहीबाही म्हणत होते. “ललिता एक नवा प्रयोग करू पाहतेय” या माझ्या स्पष्टीकरणावर तर सगळे मस्त हसले.

माणसांना कधीकधी एकमेकाची भाषा समजत नाही हे मला अनुभवाने माहिती होतं – इथ अर्थातच मी विचारांबद्दल, दृष्टीकोनाबद्दल बोलतेय! त्या सगळ्यांना समजेल अशा भाषेत मग मी म्हटलं, “एका तरुण मुलीला रात्री तर आपण इथून जायला सांगू नये हे तुम्हाला पटेल. कोठेतरी जाण्यापेक्षा आपल्याजवळ सुरक्षित राहिल ती. आणि आठ दिवस आहे शिबिर – त्या अवधीत तिची ओळख होईलच! काही संशयास्पद वाटलं तर आपण पोलिसांना कळवू – पण उगीच घाई करू नका. तरुण मुला मुलींची मन वेगळ्या पद्धतीने चालतात – आपण तेही जरा समजून घेतलं पाहिजे.” आमच्या गटातल्या सगळ्यात ज्येष्ठ आणि अनुभवी जाधव काकांनी पण हा मुद्दा उचलून धरला आणि चर्चा एकदाची थांबली.

ललिताने पुढच्या आठ दिवसांत कसलेच प्रश्न आमच्यापुढे उभे केले नाहीत. पहाटे पाचपासून रात्री दहापर्यंत चालणा-या भरगच्च कार्यक्रमात ती उत्साहाने सामील झाली. व्याख्यात्यांना तिने अनेक प्रश्न विचारले, पुढे येऊन समूहगीते गायिली, नाटकात भाग घेतला, एका प्रकल्पाची गटप्रमुख म्हणून काम पाहिले, जोरदार चर्चा केल्या, सगळ्याना हसवलं ....फक्त तिचं आडनाव, कॉलेज, भाऊ-बहीण किती, कोणत्या गावात राहते .. असले प्रश्न कोणी विचारले की ती हसून गप्प बसायची. शिबिरातल्या इतर पोरा-पोरींनी तिच हे मत समजून घेतलं; आणि त्याबद्दल पूर्ण आदर दाखवत हे प्रश्न तिला विचारण बंद केल.

मी आणि जाधव काका ललितावर बारीक लक्ष ठेवून होतो पण आम्हाला तरी काही वेगळ वाटलं नाही. शिबिरात ती भलतीच लोकप्रिय झाली. मधल्या मोकळ्या वेळात जिकडून तिकडून तिच्या नावाचा पुकारा होत राहायचा. तिच्याभोवती उत्साहाने सतत काहीतरी चालू असायचं. तिला आनंदात पाहताना मलाही बर वाटायचं. या मुलीच्या आयुष्यात काही अडचण असू नये अशी मनोमन मी इच्छा करत होते.

शिबिर आता उदया दुपारी संपणार. आदल्या रात्री कार्यक्रम अकराच्या सुमारास संपला. बाकी कार्यकर्ते उद्याच्या समारोप कार्यक्रमाची चर्चा करत होते – त्यात माझी गरज नव्हती मुल-मुली आज काही झोपणार नव्हती हे नक्की. सगळीकडे शेवटची एक चक्कर टाकून, ‘दंगा करू नका जास्त’ अस उगीच सगळयांना सांगून (कोणी माझ ऐकणार नव्हत हे मलाही माहित होत!) मी एकटीच झोपाळ्यावर बसले होते.. पौर्णिमा बहुतेक नुकतीच होऊन गेली होती. रात्रीच्या उघड्या आकाशाखाली असे बसता येण्याचे क्षण आता क्वचितच असतात. शिबिर व्यवस्थित पार पडल याच समाधानही होत.

अचानक मी पाहिलं तर ललिता माझ्या शेजारी उभी होती – कधीपासून उभी होती कोण जाणे! मी तिला माझ्या शेजारी बसण्याची खूण केली. मला काही बोलायचं नव्हतं. तीही काही बोलत नव्हती. मला स्वत:ला अनेकदा बोलायचं नसत – त्यामुळे इतर कोणी बोलत नसल तर ते मला चालत – मी समजू शकते मौन! त्यामुळे मी उगीच काही बोलले नाही. पाच दहा मिनिट तशीच शांततेत गेली. ललिताने माझा हात पकडला आणि आणखी काही वेळ ती नुसतीच बसून राहिली. थोडया वेळाने म्हणाली, “ताई, Thank You!!” मी पाहिलं तर तिच्या डोळ्यांत पाणी तरारलं होत .. पण ओठांवर हसूही होत. तेवढयात कोणीतरी तिला हाक मारली. “बोलू नंतर” अस मला सांगत ती पळाली.

पुढ सगळ शिस्तीत झालं. अनेकदा ललिताच्या घरी आम्ही गेलो, जेवलो, राहिलो. अनेक बैठका तिथे झाल्या. ओळखीशिवाय जगण्याच्या त्या शिबिरातल्या ललिताच्या प्रयोगावर “त्यातून निष्पन्न काय झालं तर आणखी काही ओळखी” अशी थट्टाही तिच्या मित्र-मैत्रिणीनी केली.

पण मला ललिताचा तो प्रयोग तेव्हाही अनोखा वाटला होता – आजही वाटतो. ओळखींशिवाय जगण्याची ताकद आपल्यात असते का? आपण माणसांच्या महासागरात आपले एक बेट निर्माण करू शकतो का? त्याचे फायदे –तोटे काय असतात? असे अनेक प्रश्न मला तेव्हा पडले होते.

आता समजत की भौतिक स्तरांवरच्या ओळखीचं एवढ काही महत्त्व नसत – ते बदलत जात. आपण अगदी सहजतेने गावांची, माणसांची ओळख जोडू शकतो आणि तोडूही शकतो. परिस्थिती अनेकदा आपल्याला ओळखी बदलायला भाग पाडते – त्याची सवय होते. तो जगण्याचा एक प्रवाह असतो. सतत पुढे नेणारा.

पण विचारांचं, मूल्यांचं, तत्त्वांचं, दृष्टिकोनाचं काय? एक तर त्यांच्याशी ओळख होण अवघड – ओळख झाली तर ती टिकण अवघड! पण एकदा ते टिकले की त्यांना अनोळखी होऊन जाण, आपण त्या गावचे नाही, आपला त्यांचा काही संबंध नाही असा आव आणण आणखी अवघड!

माणसांना अनोळखी होऊन जाण सोपं आहे तुलनेने, पण विचारांना अनोळखी होऊन जाण मात्र मला आजही अवघड वाटत!

14 comments:

 1. गोष्ट ओळखीची वाटतेय :-) कोण विसरेल ती!!

  - DK

  ReplyDelete
 2. खरय. विचारांची ओळ्ख पुसता येणे कठीण आहे आणि त्या ओळखीचा दबाव सांभाळत त्यातले चूक-बरोबर ठरवणे अजून कठीण. अनेक जण विचारांच्या ओळखीनंतर विचारांची बांधिलकीही स्वीकारतात आणि मग त्या विचार, तत्व, मूल्ये यांच्यातल्या उणीवा दिसत असतानाही बांधिलकी, ओळ्ख जपण्याच्या अजीब नैतिक जबाबदारीने वागत राहतात.

  ReplyDelete
 3. >> मला ओळखी करून घ्यायचा फार कंटाळा आलाय. माझ आडनाव, माझे आई वडील, माझ कॉलेज .. ही माझी ओळख कशी काय असू शकते? ते सगळ समोरच्यानं विचारायचं आणि मी सांगायचं आणि मग आम्ही एकमेकाना ‘ओळखतो’ अस म्हणायचं हे मला फार औपचारिक आणि विनोदी वाटत.

  हे मस्त आहे.. एकदम पटलं !!

  ReplyDelete
 4. माणसांना अनोळखी होऊन जाण सोपं आहे तुलनेने, पण विचारांना अनोळखी होऊन जाण मात्र मला आजही अवघड वाटत!.............fantastic
  मला बर्याचदा आसे वाटते खरच आपल्या सर्व ओळ खी विसरून म्ह्नंजे माज़े नाव काय, मी काय शिकले आहे, मी कोणाची मुलगी, बायको आहे , कुठे नोकरी करते हे सगले विसरून जगुन बघायला पाहिजे..............................
  अश्लेशा

  ReplyDelete
 5. DK, :-)

  किरण, हा मुद्दा ध्यानात नव्हता आला. खरचं, बांधिलकी, निष्ठा अशा गोष्टीचं आपण कौतुक करतो .. पण अनेकदा ती पण एक चौकटच होऊन बसते विचारांची! नैतिकतेच्या अतिरेकाबाबत बोलल पाहिजे अजून .. कधीतरी बोलू.

  हेरंब, आपली अशी 'विनोदी' ओळख नाही हे बरच आहे, नाही का?

  आश्लेषा, करून बघ एकदा हा प्रयोग, मजा येते :-)

  ReplyDelete
 6. thodasa avastav vatala. lalita la kuthalich olakh nako hoti tar nav ka sangitla? mag tila nila t shirt ani jeans ghalanari mulagi ashi olakh milali asati. olakh apan karun det nasato apali olakh dusaryanna hot asate, ti apan kadhich rokhu shakat nahi. khara sangayacha tar mala lalitacha funda kahi kalala nahi/ ani vicharancha mhanal tar te anolakhich asatat sarvapratham yetat tevha. ekhada vachalela vichar punha manat ala tar to olakhicha varu shakato.

  ReplyDelete
 7. पटलीय खूप..
  कधी कधी विचारांच्या ओळखीने दडपण येत ..किरणन लिहिल्याप्रमाणे उगीच ओझ वाहतो मग आपण कधी कधी...
  त्यावेळेस वाटत की भौतिक ओळखीच बर्या .. निदान अनोळखी होताना त्रास होत नाही...

  ReplyDelete
 8. कोहम् जी, थोड अवास्तव आहे हे तर खरचं :-)
  हो, आणि होणारी ओळख आपल्या हवी असो की नको आपण रोखू शकत नाही हेदेखील तुमच मत पटल मला.
  विचार सर्वप्रथम अनोळखी असतात हे खर पण विचारांपासून पळ काढता येत नाही जसा माणसांपासून काढता येतो तसा!

  लीना, काहीवेळा विचारांच दडपण येत असा माझाही अनुभव आहे.

  ReplyDelete
 9. मला तर ललिताचा प्रयोग एकदम पटला. म्हणजे पूर्ण अनोळखी वातावरणात स्वत:ला खर्‍या अर्थाने शोधण्याचा आणि स्वत:ची खरी ओळख इतरांना करून देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न वाटला. मी सुद्धा विशीत असताना असंच वाटायचं. आपली ओळख ही आपले आई-वडिल कोण, आपले नातेवाईक कोण याने होण्यापेक्षा आपण नक्की कोण याने व्हावी असं वाटायचं. पण स्वत:चा शोध घेण्यासाठी अनोळखी जगात उडी मारून स्वत:ला तपासणं हाच एक उपाय असतो. मी सुद्धा तो केला.....पण माझा खरं नाव आणि पत्ता दिला होता. :-))

  ReplyDelete
 10. शांतीसुधा, स्वागत आहे तुमच 'अब्द शब्द' वर! अनोळखी जग फार काळ अनोळखी रहात नाही आणि म्हणून हा प्रयोग अनेकदा करावा लागतो आणि प्रत्येक वेळी तो अनुभव नवा असतो हे मात्र खरचं!

  ReplyDelete
 11. >>>>मला ओळखी करून घ्यायचा फार कंटाळा आलाय. माझ आडनाव, माझे आई वडील, माझ कॉलेज .. ही माझी ओळख कशी काय असू शकते? ते सगळ समोरच्यानं विचारायचं आणि मी सांगायचं आणि मग आम्ही एकमेकाना ‘ओळखतो’ अस म्हणायचं हे मला फार औपचारिक आणि विनोदी वाटत.

  हे मलातरी पटल ...मी नुकताच जाऊन आलेल्या कळसूबाई ट्रेकमध्ये माझ्या पुर्व ओळखीचे कोणीही नव्हते,तरीही मला विशेष वेगळ वाटलं नाही नव्या ओळखा आपोआप झाल्या...
  ओळखीचे फायदे-तोटे असतातच पण खरच त्यामुळे कधी कधी उगाच ओझ वाचल्या सारख वाटते... ओळखीमुळे आपली एक इमेज असते समोरच्याच्या मनात त्यामुळे ती व्यक्ती आपल्याकडे बहुतांशी त्याच दृष्टीकोनातून पाहते... अनोळखी माणसासमोर होते ती आपली खरी ओळख ...पण एकाच भेटीत खरी ओळख होऊ शकते का..? आणि पुढच्या वेळी तर ती व्यक्ती आपल्या ओळखीची असते ... मी कन्फ्युज झालोय.... :)

  >>माणसांना अनोळखी होऊन जाण सोपं आहे तुलनेने, पण विचारांना अनोळखी होऊन जाण मात्र मला आजही अवघड वाटत!
  अगदी सहमत ...!

  ReplyDelete
 12. देवेन, तुमच कन्फ्युजन स्वाभाविक आहे .. ओळख कशाला म्हणायचं हे आपण सोयीनुसार आणि परिस्थितीनुसार ठरवतो अनेकदा .. कधी न संपणारा प्रयोगच म्हणा ना तो!

  ReplyDelete
 13. you can be a very good counselor..or are you already one....:) best post...

  ReplyDelete
 14. Aparnaa, I never tried to be one, but somehow some people share their heart with me ... that is more than I want!

  ReplyDelete