ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, June 16, 2011

७६. चंपावतच्या स्त्रिया: भाग १


काही दिवसांपूर्वी उत्तराखंडमधून माझ्यापर्यंत आलेली माहिती वाचत होते. तिथल्या स्त्रियांबरोबर काम करणा-या संस्थेने काही स्त्रियांची माहिती पाठवली होती. त्यातल्या निम्म्यापेक्षा जास्त स्त्रियांनी पाण्याचा स्रोत झरा अस लिहील होत आणि निम्म्याहून अधिक घरांत मोबाईल मात्र होता. ती माहिती वाचताना मला उत्तराखंडच्या माझ्या खूप जुन्या भेटीची आठवण झाली.

*******
(हे चित्र बरच जुन आहे - आज काय आहे तिथली परिस्थिती ते माहिती नाही.)

चंपावतला जाण्याची संधी अचानक समोर आली तेव्हा मी क्षणभर चकित झाले. तोवर का कोण जाणे पण चंपावत हा महाभारत काळातील प्रदेश आहे आणि त्यामुळे तो सध्या अस्तित्वात नाही अस मला वाटत होत. चंपावतला जाण्याचा मार्ग निश्चित करताना नकाशा पाहणे आणि रेल्वेचे वेळापत्रक वाचणे हे दोन्ही छंद मी ब-यापैकी पुरे करून घेतले.

पुणे-मुंबई प्रवास किरकोळ होता. मग पुढे लखनौपर्यंतचा रेल्वे प्रवास. लखनौ स्थानकात काही वेळ इकडे तिकडे काढून नैनिताल एक्स्प्रेसने मी लालकुवा गावात पोचले. हा सगळा प्रवास तसा नेहमीसारखाच होता. माणसं, निसर्ग, संवाद .. दर टप्प्यावर थोड थोड बदलत गेल. पण लालकुवाहून टणकपूरला जाताना मात्र मी पूर्ण जागी झाले.

टणकपूर ते लोहाघाट प्रवास म्हणजे मौज होती. एका बाजूला नजर पोचणार नाही इतकी खोल दरी तर दुस-या बाजूने आकाशाला गवसणी घालणारे पहाड. या पहाडांवरच्या प्रचंड शिळा कोणत्याही क्षणी आपले स्थान सोडून मैदानावर उडी घेण्याच्या पवित्र्यात दिसत होत्या. जगण आणि मरण यात क्षणाचाही अंतर असत नाही याची सतत जाणीव करून देणारा हा रौद्र आणि तरीही सुंदर निसर्ग! हिमालयाच्या अंगाखांदयावर वावरताना माझ्या मनात नेहमीच कृतज्ञता आणि समाधान असत.

लोहाघाटला पोचले तेव्हा सभोवताली अंधार दाटला होता. अंधारात एखाद्या गावात पहिल्यांदाच प्रवेश करताना गावाचा काही अंदाजच येत नाही. दिवसाच्या उजेडात लोहाघाटचे दर्शन होईपर्यंत मी अस्वस्थ होते; रात्री नीट झोपही आली नाही. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातल्या दमदार थंडीतही त्यामुळे मी दुस-या दिवशी पहाटेच जागी होते.

त्या सकाळी हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांच अत्यंत विलोभनीय दर्शन झालं. पुढचे दोन चार दिवस आसपासच्या गावांमध्ये भटकताना त्या झळाळत्या शिखरांनी सतत सोबत केली. आम्ही डोंगर उतरत असलो की काही काळ ती दिसेनाशी व्हायची. डोंगर चढून पुढच्या वस्तीत पोचताना लपंडाव खेळत असल्यासारखी ती सोनेरी शिखर पुन्हा दिसायची. ती इतक्या जवळ होती की थोडा हात लांब केला तर मी त्यांना स्पर्श करू शकेन अस मला वाटत होत!! पण त्या शिखरांच्या प्रसन्न आत्ममग्नतेला दुसर काही स्पर्श करू शकणार नाही असही कळत होत. त्यांच्या प्रसन्नतेला आमचा वावर लिप्त करू शकत नव्हता. त्या नीरव शांतेतेन मला एकदम उत्साही आणि आनंदी बनवल!

आमच्या संस्थेने ‘स्त्रियांचे आरोग्य आणि सबलीकरण’ अस मुख्य सूत्र असलेला एक कार्यक्रम हाती घेतला होता. लोहाघाट परिसरात हा कार्यक्रम घेण्याची गरज आहे का, आणि असल्यास नेमक काय करावं याचा अंदाज घेण्यासाठी मी इथे आले होते. आमच्या स्थानिक कार्यकर्त्यानी चार गावच्या भेटींचा कार्यक्रम आखला होता.

प्रत्येक गाव म्हणजे काही काळ जीवघेण्या घाटातून मोटरसायकलचा प्रवास (मी अर्थातच मागे बसून) आणि मग रस्ता संपला की एक दोन डोंगर पायी चढून जाणे. प्रत्येक डोंगर चढताना आता हृदय फुटेल की काय अशी शंका येण्याइतपत दमछाक होत होती. पण गम्मत म्हणजे एकदा डोंगरावर पोचलं की क्षणार्धात थकवा पळून जायचा. मग गावातील स्त्री-पुरुषांसमवेत चर्चा, गप्पा. तसाच परतीचा प्रवास. डोंगर उतरताना पाय लटपटायचे आणि वाटायचं की डोंगर चढण परवडल पण हे उतरण नको! तुलनेत सुख शोधण्याची माझ्या मनाची लगबग मला लोहाघाटने एकदम अधोरेखित करून दाखवली!

टपनीपालचा दुसरा डोंगर चढून जाताना मधेच मी श्वास घ्यायला थांबले. खूप दूरवर चाळीशीची एक स्त्री डोक्यावर मोठा भारा घेऊन येताना दिसली. जे अंतर तोडायला मला अर्धा तास लागला होता, ते अंतर त्या स्त्रीने डोक्यावरच्या ओझ्यासह दहा मिनिटांत तोडल! टपनीपालमध्ये एकही दुकान नव्हत तेव्हा! सहा किलोमीटर अंतरावरच्या खेतीखानमधून ती स्त्री घरासाठीच आवश्यक सामान घेऊन आली होती. “एवढ अंतर तुम्ही चालत आलात?” या माझ्या आश्चर्यचकित प्रश्नावर “डोंगरातून मधन आलं की तेवढ लांब नाही ते ...” अशी तिन माझी समजूत घातली.

उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ऋतु कोणताही असो; टपनीपालच्या सर्व स्त्रिया खेतीखानमधून असच सामान आणतात. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात हा भाग बर्फमय होतो. पावसाळ्यात डोंगराचे कडे खचून खाली येतात आणि अनेकदा रस्ते नाहीसेच होतात. तरीसुद्धा इथल्या स्त्रिया आनंदान, हसतमुखान हा प्रवास करताना दिसतात. त्याविना त्यांना गत्यंतर नाही आणि तक्रार करण हा त्यांचा स्वभाव नाही.

तिथल्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाल्यावर मी हळूच दुकानाचा विषय काढला. गावासाठी रेशन दुकानाची मागणी करावी अस स्त्रियांना वाटत होत; पण त्यावर पुरुषांची प्रतिक्रिया वेगळीच होती. ‘खेतीखानच्या दुकानात रेशन दुकानापेक्षा स्वस्त मिळत, वेळप्रसंगी उधार मिळत – मग कशाला हव गावात रेशन दुकान?” असा त्यांचा युक्तिवाद होता. पुरुष बोलण्यात कितीही हुशार असले तरी प्रत्यक्षात ते फार कमी वेळा खेतीखानला जाऊन सामान आणतात – हे त्यांनीही कबूल केल! “क्वचित कधी वेळ आली त्यांच्यावर तिथ जायची तर ते सामान वाहण्यासाठी सोबत खेचर घेऊन जातात” अशी पुस्ती स्त्रियांनी जोडल्यावर पुरुषांचा त्या विषयावरचा अभिनिवेश काही काळ तरी ओसरला.

उत्तर प्रदेश सरकारन (तेव्हा हे अजून स्वतंत्र राज्य झालं नव्हत) गावोगाव दारूची दुकान उघडण्याचे परवाने दिले तेव्हा इथल्या स्त्रिया त्याच्या विरोधात उभ्या राहिल्या. मुळात गावातले पुरुष फारसं काही काम करत नाहीत – ठेकेदार, जंगल खात यांच्याकडे कधी काही काम असल आणि त्यांची मर्जी असली तर काम करतात. घरातल्या आणि शेतातल्या कामांची जबाबदारी स्त्रिया सांभाळतात. पुरुष दारू पिऊन पैशांची नासाडी करतात, प्रकृती बिघडवतात आणि वातावरणही खराब करतात असा स्त्रियांचा अनुभव. म्हणून या स्त्रियांनी दारू दुकानाच्या परवान्यांना विरोध केला. राष्ट्रीय महामार्गावर चार दिवस ठिय्या देऊन तो बंद पाडला. स्त्रियांच्या ताकदीपुढ नमत घेऊन सरकारला आपला निर्णय माग घ्यावा लागला. एकजुटीतून नुकत्याच मिळालेल्या या यशाच स्त्रियांना फार अप्रूप वाटत होत!

(लेख फार मोठा होतोय म्हणून इथे थांबते, बाकी पुढच्या भागात ...)

4 comments:

 1. सांगेपर्यंत कळलच नाही की लेख मोठा होतोय ते ..
  पुढचा भाग लवकर येवुदेत मग प्रतिक्रिया देते ..

  ReplyDelete
 2. अग मस्त link लागलेली ...अजून पण भरपूर मोठ्ठा केला असतास हा लेख , तरी कंटाळा आला नसता :)

  ReplyDelete
 3. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत

  ReplyDelete
 4. लीना, अपूर्वा, मोसम, आभार.

  दोन भागांत लिहिण्याची ही युक्ती असते .. मग लोक पुढच्या भागाची वाट पाहते/तो अस लिहितातचं!

  नाही, नाही तुमच्यावर अविश्वास नाही .. गमतीने लिहितेय.
  पुढचा भाग लिहिते .. वेळ मिळेल तसा!

  ReplyDelete