ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Friday, June 15, 2012

१२९. चिंता

असाच आणखी एक प्रवास. 

रस्त्यावरचं गाव. 
नेहमीप्रमाणे मला उशीर झाला आहे. 
माझं काम कधी वेळेत संपत नाही -  कारण चर्चेत एकातून एक मुद्दे निघत राहतात. 
ते तितकेच महत्त्वाचे असतात. 
त्यावर बोलत राहतो आम्ही. 

पण आत्ता या उशीराबद्दल मला फार चिंता नाही. 
इथं काही मीटिंग वगैरे नाही. 
तर दोन तीन घरांत आम्ही जाणार आहोत. 
नुकतीच एक माहिती गोळा केली आहे आमच्या टीमने. 
ती काही घरांत जाऊन, तिथल्या लोकांशी बोलून आणि नंतर (आमच्या हाती असलेल्या) त्या घराच्या माहितीशी पडताळून पहायची आहे. 
म्हटलं तर एकदम सोपं काम - म्हटलं तर अवघड.  

पुढची मोटरसायकल थांबते. आमची गाडीही थांबते. 
आणखी दोघंजण आमची वाट पहात उभे आहेत. 
नमस्कार- चमत्कार होतात. 
मी त्यांच्या मागे चालायला लागते. 
वाटेत उन्हातान्हात निवांत बसलेले लोक आमच्याकडे पाहताहेत. 
पोरं मागोमाग येतात आमच्या. 
बाया आपापसात बोलायला लागतात. 
एक घर दिसतं.
वाकून आत प्रवेश करावा लागणार इतका बुटका दरवाजा. 
"मॅडम, हे विधवा कुटुंबप्रमुख स्त्रीचं घर आहे." - माझा सहकारी सांगतो. 

माहिती गोळा करताना स्त्रियांची माहिती काळजीपूर्वक गोळा केली गेली आहे ना, स्त्रियांना काही अडचण आलेली नाही ना, पुढच्या प्रक्रियेत त्यांनी सहभागी होण्याचं महत्त्त्व - असं काहीबाही मला त्यांच्याशी बोलायचं आहे. त्यामुळं  स्त्रियांचे बचत गट आणि व्यक्तिशः स्त्रियांशी बोलणं हा माझा एक मुद्दा आहे या प्रवासातला. 

आम्ही आत शिरतो. 
एक सतरंजी अंथरलेली आहे. 
लाल रंगांची ती सतरंजी बहुतेक नवी असावी इतकी स्वच्छ आहे. 
"आम्हाला उशीर झाला का? तुम्हाला बराच वेळ वाट पहावी लागली का?" मी बोलायला सुरुवात करते. 
"नाही, नाही. या ना. तुमची वाट बघत होतो. ही सतरंजी तुमच्यासाठीच अंथरली आहे." - अगदी डावीकडे बसलेली स्त्री सांगते. 

ती स्त्री असेल जेमतेम पंचेचाळीशीची. 
तिच्या डाव्या बगलेत एक पोरगी लाजत बसली आहे. ती असेल दोन एक वर्षांची. 
उजवीकडे त्यापेक्षा लहान एक पोर. 
त्या पोराचा हात पकडून बसलेली एक तरुण स्त्री. 
त्या तरुणीच्या पाठीवर हात ठेवून बसलेली आणखी एक स्त्री. तीही पन्नाशीच्या आसपासची. 

घर एका खोलीचं. पक्क्या - की कच्च्या? -  विटांवर सिमेंटचा गिलावा आहे. वरती पत्रा आहे. 
त्या एकाच खोलीला थोडा आडोसा आहे - त्याच्या पल्याड बहुतेक स्वैपाक होत असणार. 
घरात काही सामान दिसत नाही फारसं. अगदी गरीब कुटुंब असावं - असा मी मनाशी अंदाज बांधते.
क्षणार्धात मी परत त्या स्त्रियांकडे वळते. 

त्या तिघींचेही चेहरे दमलेले आहेत. 
नीट पाहिल्यावर कळतं की ती दमणूक नाही तर दु:खाची खूण आहे. 
ती मधली तरुण स्त्री एकदम ओक्साबोक्शी रडायला लागते. 
तिच्या दोन्ही बाजूला बसलेल्या स्त्रिया तिच्या पाठीवरुन हात फिरवतात. 
मी चमकते - कारण तोवर मला जाणवलं आहे की माझ्यासमोर बसलेल्या तिन्ही स्त्रिया विधवा आहेत. 

बोलणं होतं 
या तरूण स्त्रीचा नवरा दहा दिवसांपूर्वी अपघातात जागच्या जागी मरण पावला आहे. 
मोटरसायकलची धडक. 
कोणी दिली
माहिती नाही. 
यांना बातमी कळॅपर्यंत जीव गेलेला होता. 
पोलीसांत तक्रार नोंदवली का?
नाही. 
कुठं काम करत होता?
असाच कुठंतरी - यांना कुणालाच माहिती नाही. 

ही तरुण मुलगी पंचवीस एक वर्षांची असेल. 
शाळेत ती कधीच गेली नाही - कारण तिचे वडील तिच्या लहानपणीच वारले आणि आई खडी फोडून (रस्त्यावर टाकली जाणारी खडी फोडणं) पोटाला  कमावून आणत असे. धाकट्या भावाला सांभाळायचे काम ती करत असे. 

तो धाकटा भाऊ अगदीच लहान आहे - दहा एक वर्षांचा. तो शाळेत जातो आहे सध्या. 
तो पण न हसता बसला आहे. 
या तरूणं स्त्रीला दोन लेकरं आहेत वर मी उल्लेख केलेली ती दोन - एक मुलगी आणि दुसरा मुलगा. 

डावीकडे बसलेली त्या तरूण स्त्रीची सासू आहे. तीही विधवा आहे. 
तिच्या शेजारी आणखी एक दहा-बारा वर्षांचा मुलगा दरम्यान येऊन बसला आहे. 
तो तिच्या मुलीचा मुलगा आहे. 
त्या मुलाचे आई-वडील - म्हणजे सासूची मुलगी आणि जावई दोघंही मरणं पावले आहेत. 
या घरात आता तीन निरक्षर असलेल्या विधवा स्त्रिया आहेत; दोन पाचवीत शिकणारे मुलगे आहेत; एक दोन वर्षांची मुलगी आहे आणि एक दहा महिन्यांच बाळ आहे. 

शेती आहे
हो. 
किती?
माहिती नाही. 
अर्धा एक एकर असेल. 
पाण्याची काही सोय?
नाही. पाऊस येईल तितकीच सोय.
शेती कोण करायचं
तो अपघातात नुकताच गेलेला मुलगा. 
काय होत त्या जमिनीत?
पोटापुरतं काहीसं.

बाकी उत्पन्नाचं साधन?
काही नाही. 
काही कागदपत्रं आहेत का घरात
काही नाही. 
रेशन कार्ड
नाही. 
मृत्यूचा दाखला?
नाही. 
काही शिवणकाम वगैरे येत?
नाही.

तरुणीची आई अजून खडी फोडायला जाते आणि तिच्या आणि तिच्या मुलाच्या पोटासाठी कमावते. 
तिच्याकडे काही कागदपत्र
नाही. 
आधार कार्डाची काहीतरी प्रक्रिया झालेली आहे - पण हातात काहीच नाही. 
दारिद्र्यरेषेचं कार्ड नाही का
होतं - पण ते रद्द झालं.
कधी रद्द झालं
माहिती नाही. 
का रद्द झालं
माहिती नाही. 
दोघी-तिघींपैकी कुणी बचत गटात आहे का
नाही. 

इथं जवळपास कुणी इतर नातेवाईक, भावकीतले लोक आहेत का
नाही. 
होते ते पोराच्या मरणानंतर भेटायला आले होते, पण गेले ते लगेच. 
त्यांनाही पोट आहे त्यांच! 

मला काही सुचत नाही काय बोलायचं ते. 
सोबतच्या एका सरकारी कर्मचा-याला मी विधवा पेन्शन योजनेत काय करता येईल ते पाहायला सांगते. 
तो नाव लिहून घेतो त्या तरूण स्त्रीचं आणि तिच्या सासूचं.
पण़ पुढे काही होईल का
मला उगीच त्या कुटुंबाला खोटी आशा दाखवायची नाही. 
सांत्वन तरी काय करायचं?

हे आता काय खाणार?
हे कसे जगणार?
यांच्या घरात फक्त शिकणारी ही दोन मुलं.
ती कधी मोठी होणार
कधी कमावणार?
त्यांना आपल्या सध्याच्या शाळेत शिकता येईल का
तोवर हे सगळे काय करणार?
यांच्यासाठी काय करता येईल
काही करता येईल की नाही

आम्ही उठतो. 

ती तरूण स्त्री म्हणते, "ताई, आणखी एक नाव लिहायचं आहे यादीत."
मी तिच्याकडे चमकून पाहते. 
ती सांगते, "पोटात पोर आहे माझ्या. त्याचं नाव आत्ताच लिहिता येईल का?" 

तिची चिंता संपणारी नाही.. ती अशीच धगधगत राहणार ...
*

9 comments:

  1. !
    याला चिंता का म्हणावं? हे तर जगणं आहे. चिंतेचंच जगणं आणि जगण्याची चिंता. दोन्ही इतके एकात्म आहेत की त्यांचा वेगळा विचार कसा करायचा? ती मुलं लौकीकार्थानं स्थिर होतील तेव्हाही त्या माऊल्यांची चिंता संपणार नाही. कारण स्थैर्याला धरून त्याच्या अशाश्वततेचा एक शाप येतो. मग त्याची चिंता सुरू होते. कारण ते स्थैर्य कहर संघर्षातून आलेलं असतं, आणि म्हणून ते स-शापच येतं... :-(

    ReplyDelete
  2. भयंकर !! शेवट तर अतिशयच :((

    >> मला काही सुचत नाही काय बोलायचं ते.


    अगदी अशीच अवस्था झाली आहे माझी आत्ता ! :(

    ReplyDelete
  3. आई गं... शेवट ... जाऊ दे. काही सुचत नाही :(

    ReplyDelete
  4. अनामिक/अनामिका, चिंता आणि जगण इथ एकात्म होऊन बसलं आहे हे खरच आहे!

    हेरंब, हो ना! काही सुचत नाही मलाही ...

    सुहासजी, शेवट ही एक सुरुवात आहे तिथली :-(

    ReplyDelete
  5. बापरे....कसं होणार...
    सुन्नच झालेय मी हे वाचून.....आणि शेवटाने काटा आला...

    ReplyDelete
  6. गंभीरच आहे समस्या ह्या तिघींची! वाचून डोके एकदम काम करेनासे झाले. मन अस्वस्थ करणारी गोष्ट आहे.आता पुढे काय...यक्ष पश्न! आला दिवस ढकलायचा असे आयुष्य ...किती कठीण !!!!

    ReplyDelete
  7. अपर्णा, श्रिया,
    'सुन्न होण' ही आपली एक स्वाभाविक प्रतिक्रिया आहे या घटनेवर. पण पुढे काहीतरी तर मार्ग असायलाच हवा - नाही का?

    ReplyDelete
  8. यास चिंता असं नाही म्हणता येणार, हे तर जगणं आहे. तुमचं लेखन छान आहे आणि या लेखामागचा तुमचा उद्देश चांगलाच असेल.... पण अशा लेखांद्वारे आपण त्यांच्या दुःखावर फुंकर घालत नसतो वा ते कमीही करत नसतो. बरेचदा असे लेख (हा नव्हे) थोड्यांच्या मनोरंजनाचे काम करतात. केवळ सहानुभूतीदर्शक प्रतिक्रिया देऊन या गोष्टी आपण विसरुनही जातो वा आपण त्या जागी नाही म्हणून (मनातल्या मनात) देवाचे आभार मानतो. त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा करुणाजनक भाग दाखविण्याऐवजी, असा भाग उजेडात यावा की जो पाहून आपल्याला त्यांना दाद द्यावीशी वाटेल. (तुमच्या लेखनाचा साधेपणा खूप भावतो व तुमच्या लेखाचा उद्देश असा काही आहे, असं मला अजिबात म्हणायचे नाही. कृपया गैरसमज होऊ देऊ नका.)
    - अभिषेक पाटील.

    ReplyDelete
  9. अभिषेक पाटील,

    तुमच्या स्पष्ट प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक आभार.
    लोकांच्या दु:खाबाबत वरवरची काळजी व्यक्त करून स्वत:च्या जगण्याबद्दल समाधान मानण्याच्या वृत्तीबद्दल इथं तुम्ही जी भावना व्यक्त केलीत, तिच्याशी मी सहमत आहे.

    अशा प्रसंगातून वाट काढणारे लोकही मला भेटतात आणि मी त्यांच्याबद्दलही लिहिले आहे, पुढेही लिहीत राहीन.

    ReplyDelete