रोहित, उजनी जलाशय परिसर, डिसेंबर २०१२

Tuesday 29 December 2009

१५. काही कविता: ७ पानगळ

तशी ही वर्षाअखेरची कविता वाटावी असेच तिचे शब्द आहेत. ती कदाचित जीवनाअखेरची कविता असेल अस म्हणायला मी धजत नाही, कारण मी नेहमी कविता लिहीन याची मला कधीच खात्री वाटत नाही. प्रत्येक कविता लिहून झाल्यावर ’अरे वा! आपण अजूनही कविता लिहू शकतो’ हे जस समाधान असत, तशीच ’ही कदाचित शेवटचीच कविता असणार नाही ना’ अशी एक भयावह शंका पण मनात असते.

कधी वरवर पाहता सगळ काही संपून गेल आहे अस वाटत असतानाच ’अजून शब्द आहेत जागे आत’ याची अचानक सुखद जाणीव होते. उजाड भासणा-या जमिनीत पावसाच्या एका सरीने लाखो अंकुर तरारून यावेत त्याच धर्तीचा हा चमत्कार असतो. निसर्गाच आणि मनाच मला अद्याप न उलगडलेल हे एक कोडच! नाहीतर ऐन मे महिन्यात मला अशी जगण्याच्या निरंतर सुरेल प्रवाहाची जाणीव का बर व्हावी?

जाउ द्या! मी आपली समीक्षकाच्या भूमिकेत शिरायला लागले तर नकळत!


पानगळीचा
रेटा सोसून
काही मागे
उभेच आहे;
पाचोळ्यातून
हलके हलके
जीवनरसही
वाहत आहे;
जे गेले, ते झाले
आता, मागे
वळून पाहता
काही नाही;
तरी पाखरे
सुरेल गाती
जगणे होता
पुरे प्रवाही!


९ मे २००८ प्रवासात

Monday 7 December 2009

१४. तुझे माझे धागे

जगताना अनेक अनुभव येतात. खरे तर ते सगळ्यांनाच येतात या दुनियेत. पण फक्त कवीच अशा अनुभवांना नेमक्या शब्दांत पकडतात. यातून दोन प्रकारच्या प्रक्रिया घडतात असे मला वाटते. एक म्हणजे अत्यंत व्यक्तिगत असा अनुभव (तो नेमका कवीचा स्वतःचाच असायला पाहिजे अशी गरज अर्थातच नाही) सार्वजनीन बनून जातो. म्हणजे जी जी व्यक्ती या विशिष्ट प्रकारच्या अनुभवातून गेली असेल, तिला तिचा अनुभव शब्दबद्ध केला आहे असे वाटते. दुसरे म्हणजे कविता वाचताना दुस-या कोणाचा तरी अनुभव नकळत आपला होऊन जातो. तो आपल्याला आला नसला तरी त्या अनुभवाबद्दल एक जागा मनात निर्माण होते.

कदाचित या दोन्ही प्रक्रिया वाचकाच्या मनात एकाच वेळी घडतात, त्यात श्रेणीबद्धता असतेच असे नाही. हो. आणि आणखी एक. हे फक्त दुःखाच्या भावनेबाबत घडते असे नाही, ते सुखाच्या बाबतही घडते.

वासंती मुझुमदारांची ही कविता वाचताना मला असाच काहीसा अनुभव येतो. हातातून निसटलेले कितीतरी क्षण आठवतात. काही नकळत निसटले तर काही कळत असतानाही काही करता आले नाही. गंमत म्हणजे अशा निसटलेल्या क्षणांचे दुःखही कालांतराने नाहीसे होते. जे चिरंतन आहे असे वाटत असते ते सर्व क्षणजीवी ठरते. काही बदलेले नाही तरी हळूहळू सारे काही बदलत जाते जगण्याच्या प्रवाहात! मग अट्टाहास मागे पडतो. समांतर रेषांच्या वाढत जाणा-या अंतराचा स्वीकार होतो स्वतःसमवेत....

तुझे माझे धागे कधी
नाही वाटे जुळायचे,
नाही अमा-पॊर्णिमेने
रंग माझे पुसायचे.

चाललेल्या मुकेपणी
रेषा दोन समांतर:
श्वास रोधियेला तरी
राही वाढत अंतर.

वासंती मुझुमदार
’सहेला रे’ काव्यसंग्रहातून