भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपापल्या परीने, पध्दतीने काम करणा-या कार्यकर्त्यांची ती बैठक होती. स्त्री प्रश्नांबाबत, कामांबाबत, त्यामध्ये येणा-या अडचणींबाबत आणि विकासाच्या वाटचालीबाबत या सर्व कार्यकर्त्यांची आपापसात चर्चा घडवून आणावी असा संयोजकांचा हेतू होता. सुखद आश्चर्याची बाब अशी की, स्त्री प्रश्नांबाबत संवेदनशील असणारे मोजके का होईना, पण पुरुष कार्यकर्तेही तेथे उपस्थित होते.
विविध राज्यांमधली स्त्रियांची परिस्थिती ऐकली, की आपण महाराष्ट्रात जन्माला आलो आणि त्यातही विशेषतः मुंबई-पुण्यासारख्या शहरांत जगण्याची संधी आपल्याला मिळाली, हे स्वतःचं परमभाग्यच वाटायला लागतं! कारण अशाच कोणत्यातरी निरूपद्रवी चर्चेत ’एखाद्या दिवशी घरातल्या पुरुषाने चहा केला तर काही बिघडत नाही’ या माझ्या साध्या वाक्यावर त्या बैठकीतील अनेक स्त्रियांनी माझ्याकडे दचकून पाहिलं होतं!
एकंदर त्या ठिकाणी नवीन काहीच नव्हतं! स्त्रियाच प्रेमळ असतात, स्त्रीची सहनशीलता आणि त्यागच कुटुंबाला आणि पर्यायाने समाजाला तारू शकतात........ वगैरे गोष्टींचा प्रतिवाद करायचाही मला कंटाळा आला होता. तेवढयात आंध्र प्रदेशातील एका बाईंनी उठून गर्भजलचिकित्सा आणि तिचे दुष्परिणाम यावर बोलायला सुरुवात केली.
विषय गंभीर होता. त्या बाई स्वतः ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय करत होत्या आणि मुख्य म्हणजे त्या अतिशय पोटतिडिकेने बोलत होत्या. त्यांच्याकडे आकडेवारी होती, जिवंत अनुभवही होते. त्या झुंज देत होत्या. अशा प्रकारच्या संघर्षात वाटयाला येणारा एकाकीपणा, अस्वस्थता अशा सा-या छटा त्यांच्या बोलण्यातून प्रकट होत होत्या. श्रोत्यांसमोर अनेक प्रश्नचिन्हे उभी करून त्या बाईंनी आपले बोलणे संपवले.
त्यानंतर बोलायला पंचाहत्तरीच्या डॉ. जानकी उठल्या. त्याही अनेक वर्षे ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय केलेल्या, जुन्या-जाणत्या प्रख्यात कार्यकर्त्या! गर्भजलचिकित्सेची समस्या अतिशय गंभीर असल्याचे मान्य करून त्या म्हणाल्या, “पण त्यामुळे एवढे हतबल होण्याचे कारण नाही. यावर आपल्या प्राचीन शास्त्रांत एक हमखास उपाय आहे.....”
सर्वचजणी जरा नीट सावरून बसल्या. कारण गर्भजलचिकित्सेची भीषणता, दाहकता, स्त्रीला जन्मच नाकारण्याचे क्रौर्य, याबाबतची अस्वस्थता आमच्या सर्वांच्या मनात खदखदत होती. डॉ. जानकी पुढे म्हणाल्या, “ जन्माआधीच मुलीची हत्या करणे ही क्रूरता आहे. पण काय करणार? आपल्या समाजाला तर मुलं -’मुलगे’ - च हवे असतात. मुलीची गर्भावस्थेतील हत्या टाळायची असेल तर ज्यांना मुलगा हवा आहे, त्यांना मुलगाच कसा होईल हे आपण पाहिले पाहिजे. त्यासाठी आपल्या जुन्या ग्रंथांमध्ये ’पुंसवन’ नामक एक विधी सांगितला आहे.......”
आम्ही काहीजणी अक्षरशः हैराण, अवाक! तर काहीजणी ते शास्त्र ऐकायला उत्सुक! त्याचाही मनाला प्रचंड धक्का! जानकीबाई त्या विषयावर विस्ताराने बोलू लागल्या, तशी आमची चलबिचल आणखी वाढली. पण त्यांना थोपवायचे कसे? आरडाओरडा करून त्यांना गप्प बसवणे आमच्या मनातील सभ्यतेच्या कल्पनेला पटत नव्हते. शिवाय झुंडशाहीने एखाद्याला गप्प बसवणे हे दुधारी शस्त्र आहे, ते आपल्यावरही उलटू शकते याची आम्हाला जाणीव होती.
हळूहळू आपापसातल्या निषेधाची कुजबूज तीव्र झाली. आमच्यातली एकजण जोरात ओरडली, “ आम्हाला मुली हव्या आहेत या जगात!” तिला पाठिंबा देत कोणीतरी कोप-यातून सौम्यपणे म्हणाली, “ वेळ खूप जातो आहे. आता पुढच्या कार्यकर्तीला बोलू द्या...” त्यावर वेगवेगळ्या समूहातून निषेधाचे सूर जोर पकडू लागले. श्रोत्यांमधून येणा-या प्रतिक्रिया क्षणोक्षणी वाढू लागल्या. मग अध्यक्ष – त्याही पंचाहत्तरीच्या - जानकीबाईंना काहीतरी म्हणाल्या आणि जानकीबाई काही न बोलता स्मितहास्य करत त्यांच्या जागेवर जाऊन बसल्या.
वातावरण निवळावे, मोकळे व्हावे म्हणून संयोजकांनी लगेच चहापानाची सुट्टी जाहीर केली. सर्वजणी तावातावाने त्या विषयावर बोलू लागल्या. एक बाई रागावून मला म्हणाल्या, “ ऐकून घ्यायला तुमचं काय जात होतं? आजकालच्या पिढीला नाहीतरी आपल्या प्राचीन शास्त्रांचा अभिमानच नाही!” त्यांना टाळून मी पुढे गेले. एक जराशी प्रसिद्ध लेखिका दुसरीला म्हणत होती, “ पण जगात सगळे मुलगेच झाले तर त्यांना लग्नाला मुली कोठून मिळणार? ” (जणू मुलग्यांच्या - म्हणजे पुरुषांच्या - लग्नाची सोय म्हणूनच मुली जन्माला येतात!)
अर्थशास्त्र शिकवणा-या एक बाई म्हणत होत्या, “कधी कधी मला असं वाटतं की, असचं होत राहावं! (म्हणजे जन्माआधीच मुली मरून जाव्यात??) बायकांची संख्या तुलनेने कमी झाली की त्यांची ’किंमत’ वाढेल! ” (यांना फक्त मागणी-पुरवठा-किंमत हेच माहीत! स्त्रीसन्मान वाढवण्याचा काय पण अघोरी उपाय! आणि तो ठरवण्याचा अधिकार यांना कोणी दिला? )
“स्त्रीच स्त्रीची शत्रू असते असं म्हणतात, हे आता पटलं मला! या बायका इतक्या निर्दयीपणे या विषयावर बोलू तरी कशा शकतात? यासुद्धा पुरुषप्रधान मानसिकतेच्या बळी.. खरी जागृती यांच्यातच घडवायला हवी...” एक तडफदार प्रतिक्रिया! “जागृती कसली करता? गोळ्या घालायला हव्यात असल्या लोकांना....” एक दाहक स्वर!
गर्दीतून हिंडताना प्रतिक्रियांचे तुकडे- तुकडे समोर येत होते. प्रश्न एक पण त्याकडे बघण्याचे दृष्टिकोन अनेक! काही विकृत, काही विवेकी! काही पारंपरिक, काही चिकित्सक! काही संवेदनशील, काही निर्दयी! काही तटस्थ, काही आव्हानात्मक, काही हताश तर काही स्फोटक! माणसांच्या मनाचा जणू एक असीम कॅलिडोस्कोपच माझ्यासमोर.....
तेवढयात जानकीबाईंना गप्प बसवणा-या अध्यक्ष मला दिसल्या. मी त्यांना म्हटलं, “तुम्ही जानकीबाईंना थांबवलतं याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. सुशिक्षितांनी असं बोलावं हे खूप धक्कादायक.......”
“हो ना!” माझं बोलणं अर्धवट तोडत त्या म्हणाल्या, “ जानकीबाईंना मी तेच म्हटलं! समोर अजून लग्न न झालेल्या काही मुली आहेत.. काही पुरुषसुद्धा आहेत! त्यांच्यासमोर बायकांच्या विषयाची चर्चा करू नये हे कसं लक्षात आलं नाही त्यांच्या? बायकांचे असले विषय फक्त बायकांसाठीच असतात....!”
मी अध्यक्षांच्या चेह-याकडे पाहतच राहिले. या समाजात ’स्त्री प्रश्न’ नावाच्या कॅलिडोस्कोपमध्ये जखम करणा-या धारदार काचांचाच भरणा जास्त आहे हे सत्य जाणवून मला त्या क्षणी फार निराश, हताश, अगतिक वाटलं!
कदाचित हा जुना कॅलिडोस्कोप तोडून फोडून हवा तसा नवीन बनवताही येईल प्रयत्नांती ….
पण आपल्या दृष्टीचं काय?
*
पूर्वप्रसिद्धी: लोकसत्ता, ९ आक्टोबर १९९९
फार भयंकर अनुभव आहे हा. ५० वर्षानुपुर्वीचा म्हणून सांगितला तरी सहज चालेल. अशा गोष्टी आणि असे कोते विचार करणारे जीवसमूह अजूनही आपल्या समाजात आहेत हे वाचून विषण्ण झालो. आणि त्या अध्यक्षिणबाईंची प्रतिक्रिया म्हणजे तर सगळ्यांवर कडी झाली.
ReplyDeleteहेरंब, दुर्दैवाने काही लोक अजूनही भूतकाळात अडकले आहेत..त्यातच त्यांना आनंद आणि अभिमानही वाटतो!
ReplyDeleteबापरे काटा आला हे वाचून...मला खर सांगु लाज वाटते की अशा लोकांना मदत करणारी डॉक्टर लोकं शपथेवर खोट वागतात...
ReplyDeleteत्यांना पण कडक शिक्षा होत नाही तोवर हा रोग डॉक्टरमार्फत असंच पसरत जाणार....
लोक कितीही शिकली तरी जिथे तिथे मुलीला कमी लेखलं जातं आणि हे योग्य नाही हे वाटणारी लोकं कमी आहेत...:(