ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Friday, June 24, 2011

७७. चंपावतच्या स्त्रिया: भाग २


त्यार्सोमध्ये नळान पिण्याच पाणी पुरवल जात. बर्फवृष्टीच्या काळात पाणी गोठत तेव्हा हे नळ बंद असतात. उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे इकडून तिकडून वाहणा-या झ-यांना पाणी असत.  परिसरातल्या कोणत्यातरी डोंगरात झरे वाहते आहेत इतकं स्त्रियांना पुरत! स्व्च्छ, शुद्ध, पिण्यायोग्य पाणी वगैरे कल्पनांनी त्यांच्या राज्यात अजून प्रवेश केलेला नाही.

आरोग्यविषयक चर्चेच्या ओघात कळलं की, इथे लोहाघाटमधून एक नर्सबाई येते. ती पण इतर      गावक-यांसारखी चालतच येते. “काही आजार झाला तर नर्सबाईला बोलावतो” अस स्त्रियांनी सांगितलं. “कसा निरोप देता त्यांना?” या माझ्या प्रश्नावर “टेलिफोनवरून” अस उत्तर आल्यावर मी चकितच झाले.

या परिसरात नुकत्याच दळणवळणाच्या काही सोयी झाल्या होत्या. त्यार्सोत एक टेलीफोन आला होता. एकदा ग्रामप्रधानाने (सरपंच) टेलीफोन वापरून नर्सबाईला निरोप दिला होता, ही वस्तुस्थिती. स्त्रियांनी काही अद्याप  टेलीफोन वापरला नाहीये. पण आकस्मिक आजारांवर उपचार मिळण्याची सोय झाली आहे ही आशा त्यांना वाटतेय.

माझ्या मनात अनेक प्रश्न उमटतात. टेलीफोन नेहमी चालू राहील का? – हा अनुभवातून आलेला प्रश्न. नर्सबाईला घरी जाऊन निरोप कोण देणार? आणि निरोप मिळाला तरी वादळवा-यात, थंडीच्या कडाक्यात, अपरात्री नर्सबाई इथवर कशी पोचणार? – पण हे प्रश्न मी विचारत नाही. सध्या तरी टेलीफोन ही त्या गावात आणि त्या स्त्रियांच्या आयुष्यात घडलेली क्रांतिकारक घटना आहे. या स्त्रियांना या टेलीफोनचा उपयोग व्हावा अशी सदिच्छा बाळगत मी परत फिरते.

संध्याकाळी सहा वाजता चौंडी गावात जायला निघालो तेव्हा सर्वत्र काळोखाच साम्राज्य पसरलं होत! लोहाघाटपासून हे गाव फक्त दोन किलोमीटरवर. चौंडीचे चार पाच तरुण लोहाघाटला दुकानांत काम करतात – ते आम्हाला घेऊन जायला आले होते. नदी ओलांडून आम्ही जंगलात प्रवेश केला तेव्हा त्या तरुणांनी सोबत आणलेले ढोल वाजवायला आणि मोठया आवाजात गाणी म्हणायला सुरुवात केली. चौकशी केल्यावर कळलं, त्या जंगलात वाघोबाचा वावर आहे. आधीच अंधार, त्यात जंगलातून जाणारी चिंचोळी चढण आणि त्यात वाघोबाच्या भीतीची भर!

तासाभराच्या चालण्यानंतर आम्ही ग्रामप्रधानाच्या घरी पोचलो. तिथ पंधरा वीस पुरुष जमले होते. स्त्रिया नव्हत्याच. संध्याकाळी सातची वेळ स्त्रियांना बैठकीसाठी कधीच सोयीची नसते. दिवसभरातील शेताच्या, लाकूडफाट्याच्या, चा-याच्या कामान दमलेल्या स्त्रियांना स्वैपाकाची गडबड होती. पुरुष साधारणपणे गावसभा याच वेळी ठेवतात आणि स्त्रियांचा सहभाग कमी असल्याची तक्रार करतात.

ग्रामप्रधानाने चर्चेत पुढाकार घेतला. बैठकीत मी असल्यामुळे असेल कदाचित्, पण स्त्रियांच्या अडचणीचा विषय निघाला. गावाच्या भोवतालच जंगल वन खात्याच्या ताब्यात आहे. जनावरांसाठी चारा आणण हे इथे स्त्रियांच काम आहे. पावसाळा आणि हिवाळ्याच्या जवळजवळ सहा महिन्यांच्या चा-याची तरतूद स्त्रियांना करावी लागते. शिवाय जळणासाठी लाकडाची व्यवस्था पण! वन खात जंगलातल काही तोडू देत नाही. चारा आणि जळणासाठी चार महिने स्त्रियांना फार वणवण करावी लागते.

एक पुरुष म्हणाला, “बाया चार महिने चा-यासाठी इतक्या घराबाहेर असतात, की आम्हाला वेळेवर जेवणखाण पण मिळत नाही. लहान लेकरांचे हाल तर विचारू नका.” जणू काही स्त्रियांबद्दल फार उदार चर्चा चालली आहे अशा थाटात दुस-याने पुस्ती जोडली, “ ताई, बायांना या काळात इतक काम असत, की आम्हाला बरेच दिवस न धुतलेले कपडे घालावे लागतात. “ त्यावर सगळ्या पुरुषांनी माना डोलावल्या.

मी थक्क झाले. रागही आला मला. हे पुरुष स्वत:ला काय समजतात? बायांच्या कष्टची इतकी कदर आहे तर स्वत: जेवण का नाही बनवत? स्वत: लेकरांची काळजी का नाही घेत? स्वत: थोडा चारा का नाही गोळा करत? निदान स्वत:चे कपडे स्वत: का नाही धूत? – माझ्या या प्रश्नांवर सगळे पुरुष हसले. ग्राम प्रधान समजावणीच्या स्वरांत म्हणाला, “ही बायांची काम आहेत – पुरुष कशी करणार?”

त्या बैठकीत गावातली एक जरी बाई असती तरी चर्चेला वेगळ वळण मिळालं असत याची मला खात्री आहे. कधीतरी गावातल्या स्त्रियाच या असंवेदनशीलतेच्या विरोधात उभ्या ठाकतील याचीही मला खात्री आहे.

दीड तासाची अत्यंत कठीण चढण चढून आम्ही दुस-या दिवशी सकाळी फोर्तीला पोचलो. रामलीलेसाठी उभारलेल्या मंडपात सुमारे पन्नास स्त्रिया आणि वीस पुरुष होते. बोलण्याचे काम पुरुषच करत होते. अर्ध्या तासानंतर त्यांना गप्प बसवण्यात मला यश आलं. पुढचा काही काळ स्त्रियाना बोलत करण्यात गेला. स्त्रिया बोलायला लागल्यावर हळूहळू पुरुष उठून गेले आणि मग त्या मोकळेपणाने बोलल्या. अगदी आरोग्यविषयक बाबींवर पण आमची चर्चा झाली.

बैठक संपल्यावर तिशीतली एक स्त्री तावातावाने ग्रामप्रधानाशी बोलू लागली. स्थानिक भाषा कळत नसल्यान मला त्या संवादाचा पूर्ण अर्थ लागत नव्हता; पण ती स्त्री रागावली आहे हे सहज कळत होत. काय झालं अशी मी चौकशी केली असता, गावातील पुरुषांनी आणि माझ्या सहका-यांनी (तेही पुरुषच होते!) ‘काही विशेष नाही’ अशा थाटाची उडवाउडवीची उत्तर दिली.

मी त्या स्त्रीच्या जवळ जाऊन उभी राहिले. मला पाहताच ती दिलगिरीच्या स्वरांत म्हणाली, “माफ कीजिये दीदी, हम इनसे यह पूछ रहे है कि, सुबह के समय ये मीटिंग क्यो रखी गयी? औरंतों के काम का वक्त है यह! पुरुष थोडा ही घर का काम करनेवाले है? आप भी हमारी जैसी औरत है, इसलिये हम मीटिंग के लिये आये! अगली बार हमसे सलाहमशवीरा किये बिना मीटिंग रखी तो औरते नाही आयेगी यही मै प्रधानजी को बता राही हू .. आप ही बताईये दीदी मैने कुछ गलत कहा क्या?”

चंपावतच्या त्या स्त्रियांचे चेहरे मला अजून आठवतात. त्या स्त्रियांना प्रतिकूल परिस्थितीत आनंदान जगण्याची कला साध्य झाली होती. आपली वाट संघर्षाची आहे हे त्यांनी जाणलेलं होत. हा संघर्ष निसर्गाशी तर आहेच पण त्यांना दुय्यम लेखणा-या माणसांशी आणि व्यवस्थेशी पण आहे. कष्टांनां त्या घाबरत नाहीत पण विषमता त्यांना बोचते. त्या स्त्रियांना भेटून जगण्याची एक नवी ताकद मला मिळाली. जीवनाकडे कस सकारात्मक दृष्टीकोनातून पाहाव हे त्यांनी मला शिकवलं.

इतक्या वर्षानंतर  या स्त्रियांच्या घरात मोबाईल आले ही चांगली गोष्ट आहे. पण त्या पाणी मात्र अजून झ-याचे पितात. अजूनही शुद्ध, स्वच्छ पाणी त्यांच्या दुनियेत पोचले नाही.

विकासाचे आपले मॉडेल चुकीचे तर नाही ना अशी माझी शंका दिवसेंदिवस बळावत चालली आहे. 

5 comments:

  1. स्त्री मग शहरातली असू देत नाही तर अगदी दुर्गम भागातली, पाड्यातली विषमता कायमचीच. तिच्या संघर्षाचे पदर वेगवेगळे असतील पण तो आहे नक्की.

    स्वच्छ पाणी, डॉक्टर यासारखी सुविधा मिळणेही दुरापास्त आणि ते आजच्या काळात... :( शेवटच्या ओळीशी संपूर्णपणे सहमत.

    ReplyDelete
  2. हो ना विकासाच्या प्रचलित मॉडेलचा पुनर्विचार करण्याची नितांत गरज आहेच, जगभर हे डिबेट चालू आहेच.

    ReplyDelete
  3. भानस, स्त्रियांच्या संघर्षाची एवढी वेगवेगळी रूप पाहायला मिळतात .. की शंभर वर्षांपूर्वी काय असेल स्थिती याची कल्पनाही करवत नाही.

    प्रीति,पर्याय सापडण आणि त्यावर सहमती होण ही अजून फार दूरची गोष्ट आहे अस वाटतं!

    ReplyDelete
  4. >>विकासाचे आपले मॉडेल चुकीचे तर नाही ना अशी माझी शंका दिवसेंदिवस बळावत चालली आहे....
    नक्कीच ....!

    ReplyDelete
  5. देवेन, खर तर चुकलेलच आहे ते ..

    ReplyDelete