ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Tuesday, September 27, 2011

९१. भक्तीहीनता

आजवर अनेक लोकांनी माझ्यात भक्तीचं, श्रद्धेचं बीज रुजावं म्हणून प्रयत्न केले आहेत पण ते दुर्दैवाने सगळे फोल ठरले. मी कधीच चांगली ‘भक्त’ नव्हते आणि पुढेही बहुधा मी ती होऊ शकणार नाही. पण कोणा पंथावर, धर्मावर, देवावर श्रद्धा नसतानाही आजवरचे माझे आयुष्य एकंदरित आनंदाचे गेले आहे.

पण अर्थातच मला देवळांत जायला आवडतं – विशेषत: तिथ गर्दी नसते तेव्हा! मला देऊळ पहायला आवडतं. माझ मन भूतकाळात जातं आणि त्या काळाची चित्र रंगवतं – काल्पनिकच! या चित्राची मी वर्तमानाशी तुलना करते. कधी त्या चित्रात फरक पडलेला असतो तर कधी ते चित्र तंतोतंत तसंच असतं! देवापेक्षा लोकांचा देवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला नेहमी कुतुहलाचा विषय वाटतो. अनेकदा अशा ठिकाणांबाबत ज्या कथा असतात, त्या विलक्षण असतात आणि अशा देवळांभोवतीचा बाजारही चित्तवेधक असतो. तुमच्या माझ्यासारखी सामान्य माणसं एका हातात भौतिकवाद आणि एका हातात अध्यात्म घेऊन(?) वाटचाल करत असतात. या प्रक्रियेत नेमकं काय घडतं हे ज्याचं त्याला – जिचं तिलाच कळतं!

त्यादिवशी कारेकल (Karaikal) या पुदुचेरीतील जिल्ह्याच्या शहरात प्रवेश करताना सुंदरराजनने या परिसरात जागृत शिव मंदिर असल्याचं मला सांगितलं आणि त्याने मला उत्साहन विचारलं, “तुम्हाला जायला आवडेल का या देवळात?” खरं तर आज दिवसभर भरपूर काम आहे, म्हणून आम्ही भल्या सकाळी सहा वाजता पुदुचेरीतून बाहेर पडलो आहे. पण आत्ताच कशाला नकारघंटा वाजवायची म्हणून मी म्हणते, “ बघू, आपलं काम वेळेत संपलं तर जाऊ”. अनुभवाने मला माहिती आहे की मी स्पष्ट नकार देत नाही तेव्हा आमचं काम ‘वेळेत’ हमखास संपतं!

दिवसभरात दोन तीन मीटिंग होतात, काही गावांत आम्ही जातो तिथ गावक-यांशी चर्चा होते, अडचणी काय आहेत आणि त्यातून पुढं  कसं जायचं यावर विचारविनिमय होतो. हे करताकरता संध्याकाळचे साडेपाच वाजतात. “जायचं का आपण मंदिरात?” गावातला एकजण अपेक्षेने विचारतो. आमच्यातला एक गट मागच्याच आठवड्यात तिथ जाऊन आलाय त्यामुळे ते सगळे थेट पुदुचेरीकडे प्रयाण करतात.  

दिवसभर ब-यापैकी दगदग झालीय. पुदुचेरीला पोचायला अजून चार तास लागतील. पण अर्धा एक तास जास्तीचा या देवळासाठी द्यायला माझी हरकत नाही. मग आम्ही थिरूनल्लार (Thirunallar) ला जातो.

इथल्या देवळात शिव आणि शनी असे दोघे एकत्र आहेत. मी आजवर फार थोडी शनीची देवळं  पाहिली आहेत. पुण्यातलं (शानिपारापाशी असलेलं!) शनीच देऊळ कधी आत जाऊन पाहिलेलं नाही. एकदा कधीतरी शनी शिंगणापूरला गेले होते असं आठवतं. दिल्लीत आश्चर्य वाटावं इतक्या जास्त संख्येत शनीची देवळं दिसतात. पण सगळ्याच शनी मंदिरांभोवती भिकारी असतात, अपंग लोक असतात. शनी आणि दु:ख, शनी आणि वेदना, शनी आणि जगण्याची धडपड असंच चित्र माझ्या मनात आहे. शिवाय एकदा कधीतरी वाचलेलं शनिमाहात्म्य पण आनंददायी नाही. त्यामुळे ‘शनी’च्या देवळात जाणं  मी आजवर टाळत आलेय. त्याउलट मी ब-याच ‘शिव’ मंदिरांत गेलेय. ती सगळी साधारणपणे थंड, सुंदर आणि शांत होती. अशा प्रत्येक भेटीत मी एक प्रकारच्या अपूर्व शांतीचा अनुभव घेतला आहे.  

इथल्या देवळाला जैन आणि शैवांच्या संघर्षाचा इतिहास आहे. एक राजा होता, एक संत होते आणि काही चमत्कारही होते. या जागेचा महाभारतकालीन नल राजाशीही संबंध आहे. इथे नलाने शनी देवतेची कृपा प्राप्त करून घेतली अशी कथा आहे. भक्त सांगतात की, हे एकच ठिकाण आहे की जिथं शनी ‘कृपेच्या’ अवस्थेत आहे. इथे शंकराच्या शक्तीमुळे शनी ‘नियंत्रणात’ आहे!

कोणत्याही धार्मिक ठिकाणी गेलं, धर्मग्रंथ वाचले आणि पुराणकथा वाचल्या की एक गोष्ट लक्षात येते – ती म्हणजे आपले देव अगदी मानवी आहेत. देवांचे विचार, देवांच्या कल्पना, देवांचे स्वभाव आणि देवांच वागणं  अनेकदा माणसांसारखं असतं. कदाचित मानवी मन देवाची कल्पना ‘इतकीच’ करू शकतं. अज्ञाताला जाणण्याचा प्रयत्न ज्ञात बाबींमधून करायचा ही आपली शिकण्याची नेहमीची पद्धत आहे.  

मला ते देऊळ आवडतं. त्याची वास्तू आकर्षक आहे. मला काही कळायच्या आधी मला एका रांगेतून पुढं  नेलं जातं रांग मोडून – आणि तिथं पूजा आहे. आम्ही रांग मोडून पुढे घुसतो तेव्हा कोणी तक्रार करत नाही. नंतर  माझ्या  लक्षात येतं की सगळ्याच मंदिरांत “जास्त पैसे दया आणि लवकर दर्शन घ्या” अशी व्यवस्था असते. मला अशी रांग मोडून जाणं  आवडत नाही, देवापुढे कोणी कसा काय जास्त मोठा असतो – आणि तेही केवळ पैसे जास्त आहेत किंवा पद मोठं  आहे म्हणून? खरं सांगायचं तर लोकांचा देवावर विश्वास नाही हेच यातून सिद्ध होतं! मी देवळात पूजा वगैरे कधी करत नाही पण इथं मी अगतिक आहे. म्हणजे मी अजूनही त्यातून बाहेर पडू शकते हे आहेच – पण जे काही चाललं आहे त्यात आधी नकळत का होईना सहभागी होऊन मी माझी संमती दिलेली आहे अप्रत्यक्षपणे – आता एकदम बाहेर पडायचं तर माझे सहकारी दुखावले जातील. ग्रंथालयात निरक्षर माणसाची जी अवस्था होईल तशीच माझी इथं झाली आहे.


पूजेत लगेचच एक अडचण येते. “तुमची रास काय?” असं मला पुजारी विचारतो आणि मी “मला रास  नाही” असं उत्तर देते. त्यावर सगळे एकदम चिडीचूप होतात. मग आपापसात ते तामिळ भाषेत काहीतरी बोलतात – जे मला सुदैवाने समजत नाही. मग पुजारी मला “तुमचा जन्म कोणत्या महिन्यातला?” असं विचारतात. इथं काहीतरी ठोकून द्यावं, खरं सांगू नये असं मला वाटतं. पण मी खरी माहिती सांगते. पूजा संपल्यावर सुंदररा जन मला दक्षिणा द्यायला सांगतो. पण माझं पैशांच पाकीट गाडीतच आहे. तो घाईघाईने एक नोट माझ्या हातात देतो ती मी आरतीच्या तबकात टाकते. नंतर त्याला मी पैसे देते तेव्हा तो घेतो कारण हे पैसे मी दिले नाहीत तर या पूजेचं पुण्य मला मिळणार नाही. म्हणजे एका अर्थी माझ्या इच्छेविरुद्ध मला पैसे द्यावे लागले आहेत. पण सुंदरराजनचा हेतू चांगला आहे हे मला माहिती आहे – म्हणून मी वाद घालत नाही.

आता कसल्यातरी महागड्या मण्याची पूजा आहे. हा मणी कसला, त्याची काय गोष्ट आहे हे काहीच मला समजत नाही. एक पुजारी किल्ल्यांचा भला मोठा जुडगा घेऊन येतात आणि कुलुपांमागून कुलूपं उघडतात. भक्तांचा एक गट शांतपणे या समारंभाची वाट पाहतोय – म्हणजे काहीतरी महत्त्व असणार याचं. अचानक दोन स्त्रिया शंकराच एक तामिळ भक्तीगीत गायला सुरुवात करतात. मला ते गाणं  आठवतंय. एके काळी ते मी खूपदा ऐकलं होतं. इतर भक्तांसोबत मीही ते  गाणं त्या दोन स्त्रियांच्या पाठीमागं म्हणते आहे. मी ते विसरलेय असं वाटतं होतं मला – पण आता ते मला व्यवस्थित आठवतंय. मला लहान मुलीसारखा आनंद होतो – मला ते गाणं आठवतंय याचा आणि ते अवघड तामिळ शब्द मला उच्चारता येताहेत याचाही.

एकदाच्या सगळ्या पूजा संपतात. मंदिराचे मुख्य पुजारी मला प्रसाद देतात. त्यांच्या मोडक्यातोडक्या हिंदी इंग्रजीत ते मला सांगतात की हे मंदिर तिरुपती बालाजी मंदिराच्या खालोखाल प्रसिद्ध आणि जागृत आहे. देवांमधला हा श्रेणीक्रम मला कधी समजत नाही. ते सगळेच शक्तिशाली आणि सर्वसमावेशक नसतात का? आता उदाहरणार्थ इथं मी प्रार्थना केली नाही म्हणून शिव माझ्यावर रागावला अशी आपण कल्पना केली, तर त्यातून असं निष्पन्न होईल की शिव हा माणसासारखा मातीचा आहे – त्याला सलाम नाही केला की तो रागावतो! असल्या सगळ्या मानवी भावांच्या पल्याड देव पोचलेले असतात असं मी समजते!

मुख्य पुजारी पुढे सांगतात: इथं तुम्ही जी काही इच्छा मनात धरली असेल ती पूर्ण होईल.

त्यावर सगळे समाधानाने हसतात. मीही हसते. त्यांची श्रद्धा त्यांना सुखी ठेवते आहे तर असू दे, उगाच कशाला प्रश्न विचारायचे त्यांना?

“तुम्ही काय इच्छा धरली होती?” परतीच्या वाटेवर सुंदरराजन मला विचारतो.

“मला हा देव इतका शक्तिशाली आहे हे जर आधी माहिती असतं, तर मी नक्की दोन तीन गोष्टी मागितल्या असत्या ..” मी सांगते. सामान्यपणे सगळ्या भक्त मंडळींचं या उत्तराने समाधान होतं असा माझा आजवरचा अनुभव आहे. आजचा प्रसंग त्याला अपवाद नाही.

मी काय विचार करत होते मंदिरात? मी प्रार्थना नक्कीच करत नव्हते – ती कशी करतात ते मला माहिती नाही. मी ईश्वराकडे काही मागत नव्हते हेही नक्की.

मी भक्त आणि त्यांची भक्ती पहात होते – त्यात कुठेतरी प्रामाणिक आणि खरी भक्ती असणार, त्यात कुठेतरी भक्तीची असीम प्रेरणा असणार. मी नेहमीप्रमाणे पहात होते; आपल्याला किती कमी माहिती आहे याचं नेहमीप्रमाणे मला आश्चर्य वाटतं होतं; शेकडो वर्षांपूर्वी इथलं चित्र काय असेल आणि आणखी पाचशे वर्षांनी चित्र कसं असेल याचा मी विचार करत होते; उत्पत्ति-स्थिती-लय यांच्या अविरत चक्राचा मी विचार करत होते; माझ्या आजच्या जगण्याबद्दल मी समाधानी होते – सुख असो की दु:ख;  यातलं काहीच अखेर टिकणार नाही या जाणीवेने मी शांत होते.

भक्तीहीनतेच्या त्या क्षणी मला ते जुनपुराणं  सत्य पुन्हा एकदा सापडलं. माझ्या भक्तीहीनतेमुळे न शिवाचे काही बिनसते, ना शनीचे, ना आणखी कोणा देवतेचे – आणि मुख्य म्हणजे न माझेही काही बिघडते. आम्ही एक निर्णय घेतला आहे – तो आहे एकमेकांकडून काही न मागता, काही अपेक्षा न करता; काही देवाणघेवाण न करता एकमेकांसोबत जगायचं. त्यात आम्ही समाधानी आहोत. निदान मी तरी नक्कीच आहे. 

तस पहायला गेलं तर भक्तीची मला काय गरज?
**

तुम्हाला कदाचित 'यशस्वी माघार' वाचायला आवडेल.

8 comments:

  1. आवडला लेख.
    आईबाबा नेहेमी सांगायचे आणि जे मला स्वत:ला पूर्ण पटलं आहे...ते असं...'माणसाने माणसाशी माणुसकीने वागावं...त्यालाच भक्ती म्हणतात.'
    त्यामुळे माझ्यासाठी 'माणुसकी' ही भक्ती आहे...आणि ती जपण्याचा प्रयत्न कायम करत आले आहे. :)

    ReplyDelete
  2. अनघा, :-)
    मला वाटत भक्ती हा इतर अनेक विषयांसारखा प्रत्येकासाठी 'स्वतंत्र' प्रांत आहे.

    ReplyDelete
  3. नेहमीप्रमाणेच सुंदर लेख.. आवडला..

    ReplyDelete
  4. हेरंब, आभारी आहे.

    ReplyDelete
  5. व्वा! भक्ती किंवा भक्तीहीनता यापेक्षा भक्ती आणि भक्ताबद्दलचा सहिष्णू विचार अधिक भावला.

    ReplyDelete
  6. मीपण स्वत:हून अस मंदिरात कधी जात नाही कोणाबरोबर गेलो तरच...देवाची पूजा मनापासून घरी केली काय आणि मंदिरात जाऊन केली काय सारखच... बाकी काही असो देवावर श्रद्धा ठेवल्याने कस का होईना (सायकोलॉजी वैगेरे )पण प्रसंगी थोडफार आंतरिक बळ मिळत ... पण अशा भक्तीची गरज आहेच अस मला वाटत नाही ...तुम्हाला वेगळ्या कोणत्या गोष्टीतुनही तशी स्फुर्ती मिळू शकते...

    ReplyDelete
  7. देवेन, भक्ती , श्रद्धा अशा भावना देवळात जाऊन पूजा करण्यानेच व्यक्त होते अस अजिबात नाही खर तर! पण ते कोणी स्वत:ला वाटत म्हणून करत असेल तर आपला काही आक्षेप असायचही कारण नाही!

    ReplyDelete