ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, December 10, 2015

२३३. उशिरा

चौकातला दिवा लाल झाला, गाड्या थांबल्या.
रस्ता ओलांडून फटाफट ते सगळे रस्त्याच्या बाजूला ठरलेल्या जागी आले.
मनातली काळजी, शंका, उत्सुकता इतरांना कळू नये याची सगळ्यांची धडपड चालू होती.
पण कदाचित जगण्याचा तितकासा अनुभव पाठीशी नसल्याने असेल, भावना लपवण्याच्या धडपडीत त्यांचे चेहरे जास्त बोलत होते.
“आले का समदे?” नंदाने विचारलं. ते विचारताना एक कमी आहे हे तिच्या लक्षात आलं.
“बच्चन यायचाय अजून, जरा रुकेंगे...” हवेली विनंतीचा - तिला एरवी न शोभणारा - सूर लावत म्हणाली.
कुणी काही बोललं नाही, पण कुणी जागचं हललंही नाही.
“वो देख बच्चन...” मन्या ओरडला.
वाहत्या रस्त्यावर, चौकात दिवा लाल व्हायची वाट पाहत पाच वर्षांचा बच्चन उभा होता. त्याचं खरं नाव इतरांना काय, त्यालाही माहीत नव्हतं. त्याच्या हातात एक प्लास्टिकची पिशवी होती आणि ती त्याला बहुतेक जड झाली होती. दिवा लाल होताच गाड्या पुन्हा कचकन थांबल्या, दुसर्‍या बाजूला गती मिळाली.. बच्चन पळत पळत आला.
खान पुढं झाला. बच्चनच्या गालावरून हात फिरवत म्हणाला, “किदर लंबा गयेला था रे छोटू?”
बच्चन नुसताच हसला.
“चलो, शाळेच्या पीछे जाऊ. सुट्टी है, कुणी नसंल उधर.” जेमतेम आठ-नऊ वर्षांचा असेल खान. पण सगळे त्याच्या पाठोपाठ शाळेच्या मागच्या बाजूला निघाले.
ती शाळा म्हणजे या मुलांच्या दृष्टीने एक मोठी इमारत होती. त्यात दहा-बारा खोल्या होत्या. शाळेचं कुंपण बर्‍याच ठिकाणी मोडलं होतं. तिथे राहत नव्हतं कुणी. पण सकाळी भरपूर पोरं-पोरी आणि आठ-दहा मोठी माणसं यायची. दुपारी असेच आणखी काही जण यायचे. दिवाळी जवळ आली की सुट्टी असायची. या वेळी शाळेच्या आसपास गेलं तर चालायचं, कारण शिपाईसुद्धा कुठेतरी आत झोपलेला असायचा किंवा पत्ते खेळत असायचा.
शाळेकडे जाता जाता हळूहळू त्या मुलांचे चेहरे हसरे झाले.
लिंबाच्या सावलीत कोंडाळं करून ते बसले. मुंगीही आत शिरणार नाही इतके दाटीवाटीने बसले. प्रत्येकाच्या हातात प्लास्टिकची पिशवी, कागदाची पुरचुंडी, खोकं असं काही ना काही होतं. हातातलं दुसर्‍याला दिसू नये अशी प्रत्येकाची पुन्हा धडपड होती. डोळ्यांत चमक होती.
“आता समदे डोळे बंद करा.” नंदा म्हणाली.
“मी न्हाय करायचा” कंद्या जोरात ओरडला.
बच्चनने कंद्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, “घबरनेका नाय. नंदादीदी है ना.” सगळे हसले.
खान कंद्याला म्हणाला, “छोटूका डोका अच्चा है, उसका ऐकत जा.”
नंदा म्हणाली, “कंद्या, कोणबी घेणार नाही तुज्या हातातलं, मी हाये ना हितं? ”
नंदा त्या सगळ्यांची दीदी होती. कंद्याला तिचं म्हणणं पटलं.
“समदे डोळे बंद करा. मी तीन बार राम-सीतामाय-हनुमान बोलीन. तिसर्‍या येळी हनुमान बोल्ले की समद्यानी आपल्याजवळ जे काय हाय ते सबको दिखाना.” नंदा म्हणाली.
“राम-सीतामाय-हनुमान”
“राम-सीतामाय-हनुमान”
“राम-सीतामाय-हनुमान”
सगळ्यांनी डोळे उघडले आणि हातातला खजिना इतरांना दाखवायला सुरुवात केली.
नंदाच्या हातातल्या फाटक्या खोक्यात तीन लाडू होते.
खानच्या प्लास्टिक बॅगमध्ये काही सादळलेले फटाके होते.
बच्चन नशीबवान होता. एका बाईने त्याला शंकरपाळी दिली होती, त्याला थोडासा वास येत होता, पण त्या बाईने बच्चनला दहा रुपयांची नोट दिली होती.
कंद्याने पाकीट उघडलं आणि तो रडायला लागला. त्याच्या पाकिटात फक्त दोन वेफर्स होते.
हवेलीकडे बाकरवडी होती.
नानीला कागदात बांधलेली शेव मिळाली होती.
संगीला कसलीतरी वडी मिळाली होती.
“चलो, आपण भी दिवाळी मनवू.” बच्चन आनंदाने ओरडला. सगळे हसले.
नंदा आणि खानने खाण्याच्या पदार्थांची वाटणी केली. भूक तर होतीच प्रत्येकाला. तरी पोरं-पोरी एकमेकांना घासातला घास “ये देख, अच्चा है” म्हणत आग्रह करत देऊ लागली. कंद्याही रडू विसरून हसायला लागला. बघता बघता त्यांनी खाऊचा फडशा पाडला.
“आता क्या करनेका?” मिंटू म्हणाली.
“अब वो बडे चौकमे जायेंगे. याद रखना छोटू, लंबा नई जाना जादा. और कंद्या, केवल कारवालोंसे माँगना, बाईकवाले कुच्च नहीं देते. मिंटू, गाली मत देना किसीको....” खान सूत्रं हाती घेत एकेकाला सूचना द्यायला लागला.
ती साताठ मुलं-मुली पुढच्या चौकाकडे निघाली.
एक हात संगीच्या, तर दुसरा हवेलीच्या खांद्यावर टाकून नंदा चालायली लागली.
खानने एका हातात बच्चनचा, तर दुसर्‍या हातात मन्याचा हात घेतला.
“कित्ते दिन है दिवाली अजून?” संगीनं विचारलं.
“दिवाळी संपली काल,” नंदादीदी म्हणाली. “मंग आता लोकं उरलंसुरलं देतेत ना आपल्याला, अजून दोन चार दिस हाये म्हणायची आपली दिवाळी.” संगीला समजावत ती म्हणाली.
“त्याचं काय हाय संगे, आपली दिवाळी जरा उशिरा येतीय.” हवेली म्हणाली.
नंदाने मान डोलावली.
काय बोलावं ते न सुचून संगी आणि हवेली गप्प झाल्या.
बड्या चौकाचा रस्ता संपता संपत नव्हता.
***
('मिसळपाव' दिवाळी अंक २०१५ मध्ये पूर्वप्रकाशित)

3 comments: