(नाशिक स्थित ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ १९९६ पासून दरवर्षी ‘साहित्यभूषण परीक्षा’ आयोजित करते. १९९६ सालच्या
म्हणजे पहिल्याच परीक्षेत मी सहभागी झाले होते. त्या परीक्षेत मला ‘इंद्रायणी’ (प्रथम )पुरस्कार मिळाला होता. उत्तरपत्रिका घरीच बसून लिहायच्या होत्या - आजही तसंच आहे. त्यावेळी पाच पेपर होते. १. वाड्मयीन परंपरा, प्रवृत्ती आणि प्रवाह. २. साहित्य
विचार आणि समीक्षा ३. मराठीतील साहित्यप्रकारांचा अभ्यास ४. भाषिक व्यवहार आणि
कौशल्ये ५. दीर्घ निबंध
उत्तरपत्रिका ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ला पाठवण्यापूर्वी मी त्या फोटोकॉपी करून घेतल्या होत्या. आता त्या फोटोकॉपी जीर्ण होत चालल्या आहेत,
म्हणून इथं केवळ त्यांची नोंद करते आहे. मलाच पुन्हा वाचायला उपयोगी पडेल हा हेतू
आहे.
१९९६ सालची ‘मी’ आता
बरीच बदलली आहे. आज मी हे असंच लिहीन (किंवा यापेक्षा बरं किंवा वाईट लिहीन) असं
काही निश्चितपणे सांगता येणार नाही. जे मी तेव्हा लिहिलं होतं, ते जसंच्या तसं इथं
उतरवते आहे. त्यात आता दुरुस्त्या सुचल्या तरी त्या केल्या नाहीत. माझं मलाही हे
पुन्हा वाचताना नव्यानेच कळल्यासारखं वाटतंय हे मात्र खरं 😊 )
प्रश्न १.१: केशवसुतांना आधुनिक मराठी कवितेचे जनक का
म्हणतात, ह्याचे सप्रमाण विश्लेषण करा.
केशवसुतांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणतात, मराठी कवितेचे जनक म्हणत नाहीत
हा भेद आपण नीटपणे ध्यानात घ्यायला हवा. केशवसुतांचा जन्म १५ मार्च १८६६ रोजी
झाला. त्यांचे पूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले असे होते. त्यांचा म़त्यू ७
नोव्हेंबर १९०५ रोजी झाला. म्हणजे केशवसुतांना जेमतेम चाळीस वर्षांचे आयुष्य
लाभले. ‘समग्र
केशवसुत’ या व्हीनस प्रकाशनने प्रकाशित केलेल्या पुस्तकात
(आवृत्ती दुसरी, १९७०, संपादक – प्रा. भ. श्री. पंडित) केशवसुतांच्या १३२ कविता
आहेत. त्यावरून केशवसुतांच्या प्रतिभेचा व सामर्थ्याचा आपल्याला अंदाज येतो. पण
केशवसुत हे काही मराठीतील आद्य कवी नव्हेत. तरीही मग आधुनिक मराठी काव्याचे जनकत्व
केशवसुतांकडे का जाते?
मराठीत कविता फार लिहिल्या जातात. साहित्य संमेलनातील
कवीसंमेलनातील कवींची गर्दी आपल्याला धास्तावून टाकते. पण हे आजच घडते आहे असे
मात्र नव्हे. तर पूर्वीही घडत असावे. कारण समर्थ रामदासांनीही “कविता गवताऐसी I उदंड वाढली असे I” असे उद्गार काढले
आहेत. पण काही मोजक्याच कवींचा ठसा काळावर उमटतो. प्राचीन काळातील काही कवींचा
फक्त नामोल्लेख मी करणार आहे – त्यावरून मराठी वाङ्मयातील कवितेची प्राचीनता आपल्या ध्यानात येईल.
मुकुंदराज हे
मराठीतील आद्य कवी होत. त्यांच्या विवेकसिंधुचा काळ थेट इसवी सनाच्या बाराव्या
शतकाइतका मागे पोहोचतो. ज्ञानेश्वरी इसवी सन १२९० मध्ये लिहिली गेली. ज्ञानेश्वरीत
तत्त्वज्ञानात्मक विवेचन जरी जास्त असले (कारण ती गीतेवरील टीकाच आहे) तरीही
ज्ञानेश्वरी स्वतंत्र काव्य म्हणूनही परिणामकारक आहे असे माझ्यासारख्या सामान्य
वाचकाला वाटते. ज्ञानेश्वरांच्या भाषेतील सहजता (जरी काळाच्या अंतरामुळे आज ती
भाषा काही अंशी क्लिष्ट वाटते आहे तरीही), त्यांच्या सुंदर, सोप्या उपमा, त्यातील
रस हे सारे काही विलक्षणच आहे. ज्ञानेश्वरांच्या परंपरेतील सारे संत वाड्मय मग याच
वाटेने जाते. निवृत्तीनाथ. सोपानदेव, मुक्ताबाई, चोखामेळा याच परंपरेत मोडतात.
नामदेव, जनाबाई, कान्होपात्रा, एकनाथ, रामदास हीच वाट चोखाळतात. नीट विचार केला तर
आरत्या यासुद्धा कविताच आहेत. रामदासांची ‘करूणाष्टके’ ही सुद्धा वेगळीच पण कविताच आहे. आणि तुकारामांच्या बाबतीत बोलायचे तर ‘तुका झालासे कळस’ हे भक्तीच्यात नव्हे तर काव्याच्या
क्षेत्रातही खरेच आहे.
पंडित विश्वनाथ बाळापूरकर. म्हाइंभट, महदाईसा, नरसिंह
पंडित, नारायण व्यास ... अशी ही काव्यपरंपरा अबाधित राहते. मुक्तेश्वर, वामन
पंडित, रघुनाथ पंडित, हरि पंडित, मोरोपंत, शाहीर राम जोशी, अनंत फंदी, शाहीर
होनाजी बाळा यांचाही यात हातभार लागला आहे.
केशवसुतांना थोडेसे मोठे. एक-दोन पिढ्या मोठे
असलेलेही काही कवी आहेत. परशुरामपंत गोडबोले (१७९९-१८७४) यांच्या ‘शाकुंतल’ व ‘भवभूती’ या रचना प्रसिद्ध
आहेत. कृष्णशास्त्री चिपळूणकर १८२४ ते १८७८ या काळात होऊन गेले. महादेव मोरेश्वर
कुंटे (१८३५-१८८८० यांची ‘बहिर्जी नाईक’ ही कविता वाचण्याजोगी
आहे.
केशवसुतांचे समकालीन असे काही कवी आणि त्यांच्या
कविता आजही प्रसिद्ध आहेत. उदाहरणच द्यायचे तर ‘संगीत सौभद्र’ नाटकातील ‘प्रिये पहा, रात्रीचा
समय सरूनी येत उष:काल हा’ हे गाणे आजचेच वाटते.
त्याचे कवी आण्णासाहेब किर्लोस्कर १८४३-१८८५ या काळात होऊन गेले. गोविंद बल्लाळ
देवलांची (१८५५-१९१६) ‘मृच्छकटिक’ व ‘झुंजारराव’ नाटकांतील पदे या चांगल्या कविताच आहेत. वासुदेव खरे
(१८५८-१९२४) यांची ‘पोटासाठी भटकत जरी दूर देशी फिरेन’ ही कविता आजही जवळची
वाटते. हरि नारायण आपटे (१८६४-१९१९), दत्तात्रय कोंडो घाटे (१८७५-१८९९), नारायण
वामन टिळक (१८६१-१९१९ – ‘केवढे हे क्रौर्य’, ‘पाखरा येशील का परतून’ चे कर्ते), चंद्रशेखर
शिवराम गोऱ्हे (१८७१-१९३७), नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ बी (१८७२-१९४७) या कवींची
कामगिरीही तितकीच लाखमोलाची आहे. राम गणेश गडकरी (गोविंदाग्रज – १८८५-१९१९) यांच्या
‘राजहंस माझा निजला’ आणि ‘महाराष्ट्रगीत’ या दोनच कविता त्यांचे
कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी पुरेशा आहेत. आणि बालकवींचे (त्र्यंबक बापूजी ठोमरे,
१८९०-१९१८) ऋण कोणता मराठी माणूस विसरेल? ‘आनंदी आनंद गडे’, ‘श्रावणमासी हर्ष मानसी’, ‘फुलराणी ती खेळत होती’, ‘पाय टाकूनि जळात बसला
असला औदुंबर’ या ओळी मराठी मनात चिरंतन स्थान मिळवून बसलेल्या
आहेत. नव्या-जुन्यांच्या या अक्षुण्ण प्रवाहात केशवसुतांनी काय नेमका ठसा उमटविला
आहे?
मराठीतील प्राचीन कविता जर आपण पाहिल्या तर असे
लक्षात येते की या काव्यात रस आहे. कवींची भाषा प्रासादिक आहे. त्यांच्या काव्यांत
निरर्थक शब्द आपल्याला आढळत नाहीत. प्रत्येक शब्द वजनदार आणि अर्थपूर्ण असतो. पण
शब्दांचे वजन वाढविण्याच्या नादात ते शब्द दुर्बोध बनू नयेत, जनसामान्यांच्या
आकलनाच्या पल्याड आपले काव्य जाऊ नये याची या कवींनी (विशेषत: संत कवींनी) काळजी
घेतलेली दिसते. कारण ‘कवितेकरिता कविता’ असा त्यांचा भाव नसून ‘लोकशिक्षणाकरिता कविता’ असे त्याचे स्वरूप
आहे. त्यांच्या कवितेच्या मुळाशी काही विशिष्ट हेतू आहे. (तुकाराम याला अपवाद
म्हणावे लागतील.)
प्राचीन कवितेत आजच्या संकल्पनांनुसार असे काही दोष
जरी आढळले तरी त्या कवितेचा स्थलकालातीतपणा लक्षणीय आहे. त्या काव्याचा स्वर
विश्वव्यापी सह-अनुभूतीचा असल्याने आजही ती कविता तितकीच अर्थपूर्ण आणि आपल्या
मनाला स्पर्श करणारी ठरते. या कवितेतील कारूण्य आणि उत्कटता दोन्हीही विलोभनीय
आहे. एका ठराविक छंदात तिची रचना झाल्याने ती गाता येते हेदेखील तिचे एक वैशिष्ट्य
आहे.
मध्ययुगीन कवींनीही याच रस्त्यावरून चालण्याचा
प्रयत्न केला आहे. त्यांच्या कवितांचे विषय रामायण-महाभारत-पुराणे-संस्कृत
सुभाषिते यावर आधारलेले आहेत. त्यातील संस्कृतप्रचुर क्लिष्ट मराठी जपण्याचा
त्यांचा प्रयत्न जाणवतो. कवी हा एक माणूस असल्याचा प्रत्यय त्यांच्या कवितेतून येत
नाही. त्या अर्थी जुनी अथवा मध्ययुगीन मराठी कविता व्यक्तिवादी अभिव्यक्ती करत
नाही. ती एका समूहमनाची, एका सुसंस्कृत परंपरेची, आणि एका आदर्शाची अभिव्यक्ती
करते. त्यातून त्यांचे कवीहृदय कळते. पण या कवीहृदयालाही एक माणूस या नात्याने कधी
संदेह निर्माण होत असतील, कधी निराशा येत असेल, कधी उदासीनता येत असेल, कधी विकृती
येत असेल हे मात्र त्यांच्या कवितेतून व्यक्त होत नाही. (पुन्हा एकदा या सगळ्या
विधानाला तुकाराम, नामदेव, रामदास अपवाद ठरतील असे वाटते. पण त्यांच्या मनाचे हे
आविष्कार सामान्य माणसासारखे भौतिक स्तरावरचे नाही. त्यांचा संघर्ष अधिक तीव्र
आहे, पण तो आध्यात्मिक स्तरावरचा आहे!) ते एक आदर्शवादी, नैतिक कविता लिहितात. पण त्यातून
त्यांच्या मनाची खरी अवस्था आपल्याला कळते का – असा प्रश्न मनात येतोच.
केशवसुत आणि बालकवी या दोघांनीही मराठी कवितेला
तिच्या या चौकटीच्या जोखडातून मुक्त करण्याचे प्रयत्न केले. पण बालकवींना या
बंदिस्त वाड्याच्या काहीच खिडक्या उघडण्यात यश मिळाले. केशवसुतांनी मात्र खिडक्या
आणि दरवाजे दोन्ही उघडून मराठी कवितेला नव्या प्रकाशात वाटचाल करायला लावली आहे.
केशवसुतांचा काळ हा सामाजिक संक्रमणाचा काळ होता.
१८५७ च्या क्रान्तीच्या अपयशाचे घाव हळूहळू बुजत चालले होते. स्वत:च्या सामाजिक
परिस्थितीत काही बदल, सुधारणा घडवून आणण्याची गरज केशवसुतांना भासते. केशवसुतांनी
त्यांच्या काव्यलेखनाची सुरूवात जरी परंपरेप्रमाणे संस्कृत व इंiग्रजी कवितांच्या
भाषांतरांनी केली असली तरी ते तिथेच थांबले नाहीत. परिवर्तनाच्या हाकेला त्यांनी
जोरदारपणे प्रतिसाद दिला.
रूढी जुलुम यांची भेसुर
सन्ताने राक्षसी
तुम्हाला
फाडुनि खाती, ही हतबेला
–
जल्शाची का? पुसा मनाला!
तुतारिने ह्या सावध
व्हा तर!
किंवा
नव्या मनूतिल नव्या
दमाचा शूर शिपाई आहे
कोण मला वठणीला आणू
शकतो ते मी पाहे
ब्राह्मण नाही, हिंदुही
नाही, न मी एक पंथाचा
तेच पतित की जे आखडति
प्रदेश साकल्याचा
यांसारख्या त्यांच्या ओळी त्या काळाचा विचार करता विलक्षणच
आहेत. परंपरेचा पाईक असण्याची कवीची आजवरची प्रथा केशवसुत येथे मोडत आहेत. याचा
नंतरच्या मराठी कवितेवर फारच चांगला परिणाम दिसून येतो.
मात्र केशवसुतांची क्रांती समाजविघातक नसून
समाजसुधारणावादी होते. आधी कवी काही वेगळेच लिहित असत आणि समाज काही वेगळेच जगत
असे. पण ‘अंत्यजाच्या मुलाचा पहिला प्रश्न’, ‘मजुरावर उपासमारीची
पाळी’, ‘जायाचे जग का असेच’, ‘आगबोटीच्या काठाशी एका
तरुणीस’ इत्यादी कवितांतून सामाजिक अन्यायाचे, विषमतेचे
केशवसुत स्पष्ट वर्णन करतात. समाजात भेदभाव असू नयेत ही भूमिका मांडतात. एका
दृष्टीने अध्यात्माकडे जीवनवादी दृष्टिकोनातून ते आपल्याला पाहायला शिकवतात असेच
म्हणायला हवे.
केशवसुतांनी बऱ्याच इंग्रजी कवितांचा अनुवाद केला आहे
असे म्हटले जाते व त्यात तथ्यही आहे. संस्कृत व इंग्रजी कवितांचा अनुवाद ही
केशवसुतांच्या काळाची पद्धतच होती. पण केशवसुत या अनुवादांच्या पुष्कळ पुढे गेले
आहेत. या इंग्रजी कवितांच्या विषयांचा परिणाम त्यांच्या कवितांवर दिसून येतो.
(सुनीत -Sonnet - रचना हा एक बाह्य आविष्कार होय.) केशवसुतांच्या प्रेमकविता या प्रकारचे
उदाहरण म्हणून सांगता येईल. मात्र केशवसुतांचे प्रेम केवळ शरीरापुरते मर्यादित
नाही तर ते आत्ममग्न प्रेम आहे. या प्रेमकवितेतूनही काही तात्त्विक चिंतनाकडे
जाण्याचा त्यांचा प्रयत्न स्पष्टपणे दिसतो.
प्रीति मिळेल का हो
बाजारी?
प्रीति मिळेल का हो
शेजारी?
प्रीति मिळेल का हो
बागात?
प्रीति मिळेल का हो
शेतात?
असे प्रश्न निर्माण करून ते स्वत:च उत्तरतात:
प्रीतिची नसे अशी ग मात;
पहा शोधुनि हृदयात!’
या ओळी वेगळ्याच आहेत. ‘दो हृदयांच्या संमगसमयी
कसल्या लौकिकरीति’ – असेही केशवसुत आपल्याला विचारतात.
तल्लीन सवे मी झालो
विकलगात्र होऊनि गेलो
निर्वाणी पूर्ण बुडालो
नुरलीच जगाची याद!
जिने मला वेडा केले –
तिच्यावर ही फिर्याद!
अशी फिर्याद करणारी प्रीति केशवसुत रंगवतात. कवितेलाच
प्रेयसी समजून तिचीही आळवणी केशवसुत करताना दिसतात.
कवीला व्यक्ती म्हणून एक स्वतंत्र अस्तित्व असते याची
जाणीव केशवसुतांच्या कवितेत दिसून येते.
आम्ही कोण म्हणूनि काय
पुससी?
आम्ही असू लाडके
-देवाचे,
…………………………
आम्हाला वगळा -गतप्रभ
झणी होतील तारांगणे
आम्हाला वगळा – विकेल
कवडीमोलावरी हे जिणे!
या कवितेत तर हे आत्मभान फारच प्रभावीपणे उतरले आहे.
उत्तरकाळात मराठी कवितेत हे आत्मभान वाढलेले दिसते आणि त्याची सुरूवात केशवसुतांनी
केली आहे. कवी हा शब्दांचा दैवी अधिकारी आहे अशी जाण केशवसुतांच्या कवितेत दिसते.
मीहि कशाला येथ रहावे?
काय असे ज्या मी
चिकटावे?
वाटे गिरक्या घेत
मिळावे –
या पवनाच्या चक्री
होऊनि लीन सच्चिदानंदात
जगद्द्रुमाचे पिकले
पर्ण
गलित असे मी अगदी जीर्ण
तर भर भर उडू द्या मला
शब्दांसंगे स्वर्गात
असे केशवसुतांना शब्दांचे वेड आहे.
काव्य लिहिले मी खरे,
परी माते
शारदेने जो मंत्र दिला कानी
तसे लिहिले मी –
काव्य तिचे मानी
यातून कविता ही साधना आहे याचीही जाण केशवसुत व्यक्त
करतात. अर्थात ही जाणीव काव्याच्या प्रांतात नवी नाही – जुनीच आहे. पण बंडखोरी
करताना, कवीला सर्वश्रेष्ठ असा द्रष्टा मानत असतानाही कविता ही समर्पणाची, साधनेची
वृत्ती आहे असे बजावायला केशवसुत विसरत नाहीत.
केशवसुतांची निसर्गाविषयीची विशेष आपुलकी – हीदेखील
मराठी कवितेतील एक नवी गोष्ट आहे. इंग्रजी कवितांवरून अशी कल्पना त्यांना सुचली
असे काहीजण म्हणतात. पण केशवसुतांच्या कवितेत अनुवादकाला सुचावे तितके निसर्गाचे
फक्त वर्णन नाही तर निसर्गाशी विलक्षण तादात्म्य आहे. (बालकवींच्या कवितेत तर ते
अधिकच उत्कट रूप धारण करते) आणि त्याचबरोबर निसर्गाशी असलेल्या आपल्या विविध
नात्यांचा आविष्कारही आहे. ‘उगवत असेल्या सूर्यास’मधील वर्णन पारंपरिक
स्वरूपाचे आहे.
सह्यगिरिच्या पायथ्याला
सुपीक
रम्य खोरे कोकणामधी एक
नदी त्यामधुनी एक
वाहताहे
एक खेडे तीवरी वसुनि
राहे
या वर्णनात व्यक्तिगत अनुभव प्रकट होतो. तर
गोष्टी घराकडील मी वदता
गड्या रे
झाले पहा कितिक हे
विपरीत सारे
आहे घरासचि असे गमते
मनास
ह्या येथल्या सकळ वस्तु
उगीच भास!
हा अनुभव बघताबघता तुमचा-आमचा होऊन जातो. हा निसर्ग
आपल्याला कसा गुंतवून टाकतो याचे सुरेख वर्णन ‘कविता आणि प्रीति’ यासारख्या कवितांमध्ये
आहे.
केशवसुतांच्या कवितेला आध्यात्मिकतेचे वावडे नाही.
किंबहुना तिचा रोख तिकडे आहे. पण पारंपरिक शब्दांची कास सोडून ते नव्या रीतीने
त्याकडे बघतात.
पुरूषाशी रम्य अति
नित्य प्रकृति
क्रीडा करिती;
स्वरसंगम त्या
क्रीडांचा
ओळखणे, हा ज्ञानाचा -
हेतु; तयाची सुंदरता
व्हाया चित्ता-
प्रत ती ज्ञाता
वाडे कोडे गा आता
झपूर्झा! गडे झपूर्झा!
किंवा
वादयांतुनि त्या निघती
नंतर
उदात्ततेचे पोषक सुस्वर;
तो मज गमले विभूति माझी
स्फुरत पसरली
विश्वामाजी
दिक्कालांसहि अतीत झालो;
उगमी विलयी अनन्त उरलो;
विसरूनि गेलो अखिला
भेदा
ऐकत असता दिड दा दिड दा!
यांसारख्या ओळी वाचकालाही काही काळ वेगळ्याच उंचीवर
घेऊन जातात.
केशवसुतांच्या काही ऐतिहासिक कविता आहेत. काही बोधपर
कविता आहेत. केशवसुतांच्या कविता आत्मपर आहेत. केशवसुतांच्या कविता सुधारणावादी
आहेत. स्वानंदासाठी कविता आहेत. परहितार्थ कविता आहेत. केशवसुत पद्याच्या रचनेत
काहीसे अडकलेले असले तरी त्यांच्या रचनेत क्लिष्टता नसून सहजता व रमणीयता आहे.
त्यांच्या भाषेत उत्कटता आहे. केशवसुतांची कविता सुंदर आणि उदात्त आहे.
केशवसुतांची कविता निसर्गाशी जवळीक साधणारी आणि तरीही आत्मभान राखणारी आहे. निराशेत
घुटमळणाऱ्या केशवसुतांचा सूर अंती आशेलाच मिळतो आहे.
मला वाटते की केशवसुतांना ‘आधुनिक मराठी कवितेचे जनक’ म्हणणे शब्दश: योग्य ठरणार नाही. ते प्रतिकात्मक अर्थानेच घ्यावे लागेल. मराठी कवितेचा चहुबाजूंनी जो विकास नंतरच्या काळात दिसून येतो त्याची मुहूर्तमेढ अनेकांनी पूर्वीच रोवली आहे. अनेक संतांनीही परंपरेविरूद्ध बंडखोरी केली आहे. (‘हात लागताच ओवळे होणारे कसले ते सोवळे’ – असा सवाल रामदास-एकनाथांनीही केला आहे.) प्रणयकविता, ऐतिहासिक कविता, चिंतनात्मक कविता ... फक्त केशवसुतांनीच लिहिल्या असे म्हणता येत नाही. पण इतर साऱ्यांजवळ यातला एकेकच विशेष होता – केशवसुतांमध्ये मात्र हे सारे एका वेळी अस्तित्वात होते! मराठी कवितेच्या साचेबंद इमारतीतच केशवसुत राहिले – पण बाहेरची पुष्कळ मोकळी हवा आणि पुश्कळ प्रकाश त्यांनी आत आणला याचे श्रेय त्यांना दिले पाहिजे. ‘आधुनिक मराठी कवितेचे जनक’ असे केशवसुतांना म्हणण्यात तत्पूर्वीच्या कवींचा उपमर्द होत नाही. कारण त्यांच्याच वाटचालीचा आधार घेऊन केशवसुत पुढे आलेले आहेत. त्यामुळे केशवसुतांना ‘आधुनिक मराठी कवितेचे जनक’ म्हणण्यातील प्रतीकात्मकता आणि तारतम्य आपण लक्षात घ्यावे असे मला वाटते.