ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Friday, March 13, 2009

३. भटकत फिरलो......

कवीला शब्दांमधून नेमकं काय सांगायचं असतं हा एक संशोधनाचा विषय... कवी सांगतात एक आणि आपण कदाचित त्याचा वेगळाच अर्थ लावतो... कवीने ते आपल्याला सांगितलेलं असतं का? ... एक अनुत्तरित प्रश्न...

"भटकत फिरलो भणंग आणिक
मिळेल तेथे पाणी प्यालो
जुळेल तेथे खूण जुळविली
परि होतो हा तसाच उरलो"

मर्ढेकरांनी १९५०च्या सुमारास लिहिलेल्या एका कवितेच्या या पहिल्या चार ओळी.....थेट मनाला भिडतात.... ठाण मांडून बसतात...

प्रत्येक वेळी या चार ओळी मला तितक्याच नव्या वाटतात. आपल्या देशात, संस्कृतीत विरक्तीचं, संन्यासाचं कौतुक आहे ... पण तो स्वेच्छेने असतो असं मानलं जातं म्हणून! भणंगपणा मात्र वाटयाला येतो... न मागताच... भटकंतीनंतरही तो उरतोच....तहान जागी ठेवून उरतो.

पहिल्या वाचनात या ओळी माझ्या अंगावर आल्या होत्या, त्यातली भीषणता, दाहकता मनाला चटका लावून गेली होती... कवितेची पुढ्ची तीन कडवी न वाचताच मी पान मिटून बसले होते..... आता अलिकडे मात्र या ओळी मला उदास करत नाहीत. "अखेर तसंच उरणार आहे" याची आठवण येऊन, या खटाटोपाची व्यर्थता जाणवून हसायला येतं ...

आपल्या भटकंतीचा शेवट आपल्या हातात आहे अशी मला आलेली आश्वस्तता किती खरी आणि किती खोटी हे काळच ठरवेल.... तेव्हा मला या ओळी आजच्यासारख्या वेढून टाकतील का?

2 comments:

  1. तुमचे सगळे लेख वाचायचे अस ठरवून आज सुरवात केली .. आणि सुरवात करायला मी एवढा वेळ का घेतला हा विचार वरील एक एक शब्द वाचताना येत राहिला.. थेट माझ्या मनातल बोललात इथे ..

    ReplyDelete
  2. आभार लीना. तुम्हाला इथले लेखन आवडेल अशी आशा.

    ReplyDelete