ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, May 2, 2011

७१. संभ्रम


पुणे रेल्वे स्टेशनपासून माझ्या घरी यायचं हे एक कठीण काम होत. म्हणजे बाहेरगावचा प्रवास परवडला पण पुणे स्टेशन ते घर हा प्रवास मला नको वाटायचा – तो मुख्यत्वे रिक्षावाल्यांच्या अनुभवामुळे! खर तर पोलिस देखरेखीखाली Pre Paid Auto’ चा प्रयत्न वाहतूक पोलिसांनी केला होता. मी शक्यतो तिथून रिक्षा घ्यायचे. स्टेशनवरच्या गर्दीतून रिक्षा शोधणे आणि रिक्षावाल्याशी घासाघीस करणे या दोनही गोष्टी यामुळे टळायच्या. काहींच्या मते त्यात दहा एक रुपये जास्त लागायचे आणि कधी कधी रांगेत काही काळ उभे रहावे लागायचे – असे दोनच तोटे खर तर होते. तरीही रेल्वे स्टेशनवरचा हा प्रयोग शहाण्या पुणेकरांनी – त्या सेवेचा अजिबात उपयोग न करून - हाणून पाडला होता. आता एखादी सेवा कोणी वापरली नाही, तर ती बंद पडणारच की!

बरेचदा रिक्षावाले अव्वाच्या सव्वा रक्कम मागायचे. पहाटे पाच साडेपाच किंवा रात्री अकराच्या सुमारास कोणी जास्त पैसे मागितले तर ते एकवेळ समजू शकत! कारण अनेकदा त्याना परतीचे प्रवासी मिळत नाहीत अशा वेळी. पण सकाळी सात वाजता किंवा संध्याकाळी पाच वाजता कोणी जास्त पैसे मागितले – म्हणजे मीटरनुसार न येता थेट पैसे मागितले किंवा मीटरपेक्षा दहा वीस रुपये जास्त मागितले तर मी ती रिक्षा सोडून द्यायचे (अजूनही देते). रिक्षावाल्यांच एक असत – त्यांच्यात एकी खूप असते. एका रिक्षाला आपण जास्त पैसे द्यायला नाही म्हणल आहे हे इतर रिक्षावाल्यांना कळत आणि ते आपल ‘भाड’ नाकारतात. अशा वेळी मग थोड चालत जाव आणि दुस-या स्पॉटवरून रिक्षा पकडावी हे उत्तम!

त्यादिवशी तसच झालं. म्हणजे कोणी रिक्षावाला मीटरनुसार यायला तयार नव्हता. सकाळचे सहा वाजले होते. वातावरण छान उल्हसित करणार होत. प्रवास ठीकठाक झाला होता. म्हणून मग मी चालायला सुरुवात केली. पाच सात मिनिटांच्या अंतरावर एक मोठा चौक आहे – तिथ मिळेलच रिक्षा अस म्हणून मी निघाले.

दोन तीन मिनिटातच पाठीमागून एक मोकळी रिक्षा आली. रिक्षावाले काका पन्नाशीचे असावेत. ते थांबले; कुठे जायचय ते मी सांगितलं, ते बसा म्हणाले आणि मी त्या रिक्षात बसले. आमच्या गप्पा झाल्या. पाऊस, पुण्यातले रस्ते, राजकारण, पुण कस ‘आता’ बदलत चाललय – असे नेहमीचे दोन अनोळखी माणसांनी बोलायचे विषय आम्ही बोलत होतो. ते संपल्यावर बोलताना काका माळकरी आहेत, दरवर्षी न चुकता वारीला जातात, नियमित ज्ञानेश्वरी वाचतात – अशा अनेक गोष्टी समजल्या. मजा आली मला त्यांच्याशी गप्पा मारायला.

माझ्या घराशी आम्ही पोचलो, तेव्हा मीटरनुसार नव्वद रुपये बील झालं होत. मी शंभर रुपयांची नोट काकांच्या हातात दिली आणि ‘बर वाटलं तुमच्याशी गप्पा मारून’ अस म्हणत घराकडे चालायला लागले. “ताई, दहा रुपये राहिलेत ...” अस काकांच वाक्य पूर्ण व्हायच्या आत मी म्हटलं, “राहू दया हो काका, दहा रुपयांच काय एवढ नाही महत्त्व ...”

माझ वाक्य पूर्ण व्हायचा आत काका हसायला लागले. क्षणभर मला त्यांच हसण जरा वेगळ आणि विचित्र वाटलं. “का हो काका, हसायला काय झालं?” माझा आवाज नकळत जरा चढला असणार कारण काका एकदम बिचकले आणि शांत झाले. “नाही, हे दहा रुपये घ्या तुम्ही परत,” ते मला म्हणाले. आता आश्चर्य करण्याची वेळ माझी होती. मी परत एकदा ती दहाची नोट त्यांच्या हातात दिली आणि घराकडे निघाले.

मी मागे वळून पाहिलं तर काका हातात ती नोट तशीच ठेवून स्वत:शीच हसत होते. आता मात्र मला राहवल नाही. मी दोन पावल परत आले. काका मला पाहून चपापले आणि रिक्षा सुरु करायला लागले. मी हसत आणि शांतपणे विचारल, “काका, तुम्हाला कशाच हसू येतय ते मला सांगाल का?” त्यावर काकांनी नुसतीच मान हलवली. मी त्याना परत आर्जवाने म्हटल, “काका, मला न सांगण्यासारख काही असेल तर ठीक आहे. पण तुमच्या मनात आत्ता आलेला विचार माझ्यासाठी पण महत्त्वाचा ठरू शकतो.”

काकांनी माझ्याकडे पाहिलं. “ताई, राग तर नाही येणार न तुम्हाला?” त्यानी विचारल. असा प्रश्न समोरच्या माणसाने विचारला की आता आपल्यापुढे न आवडणार काहीतरी वाढून ठेवलय इतक मला समजत. पण मीच त्यांना बोलण्याचा आग्रह करत होते, आता माघार घेण्यात काही अर्थ नव्हता. “काका, तुम्ही सांगितल्याशिवाय कस काय कळणार मला राग येतोय की नाही ते ..” मी जरास हुशारीने उत्तर दिल.

काका क्षणभर थांबले. मग म्हणाले, “मी रेल्वे स्टेशनवर होतो आज सकाळी.” मला त्यांच्या वाक्याचा काही अर्थ कळला नाही. “बर मग?” मी विचारल. “नाही, तुम्ही जास्त पैसे द्यायचे नाहीत म्हणून तिथल्या रिक्षा सोडल्यात आणि आता मला मी न मागताच दहा रुपये देताय....” अच्छा! इतकाच मुद्दा होता तर! मी म्हटल, “काका, ते तिथले रिक्षावाले मागत होते, इथे मी स्वखुषीन देतेय. “

“त्याचच तर मला हसू आलं ताई.” काका माझ्याकडे पहात, मला कितपत राग येण्याची शक्यता आहे हे अजमावत म्हणाले. “काम एकच आहे – दहा रुपये जास्त दयायचं! पण तुमचा विचार बदलतो त्यामागचा ..” ते अर्धवट थांबले. हा माणूस काहीतरी वेगळ आणि महत्त्वाच बोलतोय हे माझ्या लक्षात आलं. अर्थातच कृती करणारी मी असल्यामुळे संकोचाने ते जास्त मोकळेपणाने बोलत नव्हते ते मला जाणवलं.

“काका, तुम्हाला अस म्हणायचय का की माणूस स्वखुशीने आनंदाने काम करतो आणि लादल गेल त्याच्यावर काही तर ते त्याला आवडत नाही?” मी विचारल.

रिक्षावाले काका पुन्हा एकदा ‘बोलाव की नाही’ या विचारत पडले. मग निश्चय केल्यासारख म्हणाले, “मी तुमच्याबद्दल नाही बोलत ताई, त्यामुळे वाईट वाटून नका घेऊ. पण तुम्ही म्हणलात तो मुद्दा आणखी थोडा पुढे नेऊन मला अस म्हणायचय की आपला विचार माणसाला महत्त्वाचा वाटतो – दुस-याचा नाही. म्हणजे माझच बघा ना, मी दहा रुपये जास्त मागितले असते तर मी ते तुमच्याकडून हक्काने घेतले असते, तसे घेण्यात मला समाधान मिळाल असत. पण तेच तुम्ही देताय तर मला घ्यायला नको वाटतात.”

मी विचारत पडले. त्यांच उदाहरण मलाही लागू पडत होत. थोडक्यात ते माणसाच्या अहंकाराबद्दल बोलत होते. रिक्षावाले मला जास्त पैसे मागतात तेव्हा मी देत नाही, पण मी आपण होऊन मात्र जास्तीचे पैसे देते. पैसे देण्याची कृती एकच असते – फक्त एका प्रसंगात माझा अहंकार सुखावतो तर एकात तो दुखावतो. अहंकार सुखावणारी कृती करण्याकडे आपला स्वाभाविक कल असतो आणि अहंकार दुखावणारी कृती आपण शक्यतो टाळतो – त्याला तात्विक मुलामा देतो अनेकदा.

“काका, मला समजल तुम्ही काय म्हणताय ते! तुमच म्हणण मला एकदम पटल. कधी लक्षात नव्हत आलं आजवर हे.” मला त्यांचे कसे आभार मानावेत ते कळत नव्हत.

“दया काका ती दहाची नोट परत मला. “ मी हात पुढे करत म्हटल.

काका परत एकदा हसले. म्हणाले, “मी त्याच तर धर्मसंकटात आहे. पैसे तुम्हाला परत द्यावे तर तो माझा अहम् होतो – मी मागितले नव्हते ना ते पैसे. पैसे ठेवावेत तर त्या पैशांचा लोभ मला आहे असं दिसतय.. त्यामुळे हसायला आलं मला. कसे आपण सगळे या ‘अहम्’ ची शिकार आहोत हे कळून!”

काही कळल तरी प्रश्न आहेत; काही न कळल तरीही प्रश्न आहेतच!
ज्ञानाने, माहितीने सगळे प्रश्न सुटतात असा आपला एक भ्रम असतो – त्याने बरेचदा प्रश्न वाढतात! छोटे वाटणारे प्रश्न मोठ रूप धारण करतात; नसलेले प्रश्न उपस्थित होतात वगैरे ब-याच गोष्टी घडतात!

एक गोष्ट खरी की माझ्यासारख्या माणसांना संभ्रमात राहायला अस काही ना काही निमित्त मिळतच!

9 comments:

  1. इतका गहन विषय अहंकाराचा, आपण सहज या कथेत परिणामकारक पणे सांगितला, अहंकाराची गोष्ट अगदी खरी आहे, रोज असेच होत असतं पण , जाणवत नाही!

    ReplyDelete
  2. >> तुमच म्हणण मला एकदम पटल. कधी लक्षात नव्हत आलं आजवर हे.

    अगदी अगदी असंच वाटलं मला !!

    ReplyDelete
  3. >>>अहंकार सुखावणारी कृती करण्याकडे आपला स्वाभाविक कल असतो आणि अहंकार दुखावणारी कृती आपण शक्यतो टाळतो – त्याला तात्विक मुलामा देतो अनेकदा.

    शब्द न शब्द पटला.....
    सुंदर पोस्ट... म्हणावं तर हलकंफूलकं, पण गहन विषय सहज सांगणारं!!!

    ReplyDelete
  4. मोहिनी, एखादया क्षणी अस नकळत शिकायला मिळत आपल्याला!

    हेरंब, आपण स्वत:ला किती गृहीत धरलय हे अशा वेळी लक्षात येत!

    सुदीपजी, आभार.

    तन्वी, सहमतीबद्दल आभार :-)

    ReplyDelete
  5. देणारा आणि घेणारा या दोन भूमिका, दोन्हीत सत्तासंबंध आहेत. आपण या सत्ता संबधात अडकत जातो याचं कारण post मधे आलंच आहे, आपला सुखावणारा अहम. किती छोटया छोटया गोष्टीत हे भान ठेवायची गरज असते याची जाणीव दिल्याबद्दल धन्यवाद!

    ReplyDelete
  6. प्रीति, आभार तर त्या रिक्षावाल्या काकांचे मानायला हवेत :-)

    ReplyDelete
  7. kakanch nav kay ho

    ReplyDelete
  8. अनामिक/का, नाही मी नाव विचारलंही नाही त्यांच! आत्ता वाटतय विचारायला हव होत म्हणून :-(

    ReplyDelete