ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, September 12, 2011

८९. ताळेबंद

वसंता म्हणाली, “दीदी, प्रदर्शन पहायला जायच?”
हे ती अर्थातच मोडक्यातोडक्या हिंदी इंग्रजीला अभिनयाची जोड देत म्हणाली.चेन्नैला एका कामानिमित्त गेले होते तेव्हा मी वसंताच्या घरी उतरले होते. तिच्या वडिलांची आणि माझी खूप जुनी ओळ्ख होती म्हणून गप्पा मारायला मी इकडेच रहायच अस आमच ठरल होत.  पण वसंताची आत्या गंभीररीत्या आजारी पडल्याने वसंताच्या आई -बाबांना अचानक सेलमला जाव लागल होत. मी रात्री मुंबईला परतणार होते. संध्याकाळी सात वाजता वसंताचे मामा आम्हा दोघींना त्यांच्या घरी घेऊन जाणार होते. मला रात्री स्टेशनवरही तेच पोचवणार होते. आता फक्त दुपारचे तीन वाजले होते.
वसंता आठवीतली मुलगी – तामिळ माध्यमातून शिकणारी. माझे तामिळ भाषेचे ज्ञान  ’वणक्कम’ (नमस्कार) पासून सुरु व्हायचे आणि दोन तीन मिनिटांत ’तामिळ तेरीयाद’ (मला तामिळ येत नाही) इथवर धापा टाकत पोचायचे. त्यामुळे वसंताबरोबर काय बोलायचे हा प्रश्नच होता. म्हणून मग मी वसंताची प्रदर्शन पहायची सूचना लगेच उचलून धरली. जरा बाहेर पडून तिला तिच्या आवडीचे काहीतरी खायला घालावे, एखादे पुस्तक द्यावे असा विचार मी करत होते.
प्रदर्शन चित्रांचे होते. वसंता स्वत: चांगली चित्र काढते, त्यामुळॆ ती त्यात रंगून गेली. तिच मन रमलेल पाहून मला बर वाटल. मी मात्र जरा विमनस्क मन:स्थितीत होते. आमच्या कामाचा गाडा काही पुढे रेटला जात नव्ह्ता. जे जे म्हणून हाती घ्याव, त्यात अपयशच येत होत. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हे सुभाषित आम्ही वारंवार एकमेकांना सांगत होतो. पण खर तर आम्ही त्या ’पहिल्या पायरीवर’ फार काळ रेंगाळलो होतो. सगळी अपयशी माणस दैवाला दोष देतात आणि आम्हीही कळत नकळत दैववादी बनत चाललो होतो. आता इथलेही काम न झाल्याने मुंबईला वाट पहात असणारी माझी मित्रमंडळी निराश होणार होती तर!
कोणत्याही चित्रकला प्रदर्शानात असत, तसच वातावरण सभोवताली होत.सौम्य प्रकाशात रंगांची उधळण मोहक वाटत होती. कलाकाराभोवती लोक घोळ्क्याने उभे होते. काहींच्या चेह-यावर सारे काही समजल्याचा भाव होता तर काही चित्राचा अर्थ लावताना विचारात पडलेले दिसत होते.काही एकटे उभे होते तर काही समुहात फिरत होते. काही निवांत होते तर काही घाईघाईने पुढे सरकत होते. मला चित्रकलेत(ही) काही गम्य नाही त्यामुळे माझी नजर निरुद्देशपणे फिरत होती.
तितक्यात त्या घोळक्यातून पंचविशीचा एक तरूण माझ्याकडे धावत आला. “दीदी, तुम्ही इकडे कशा काय? “ मी गोंधळून इकड- तिकड पाहिल पण तो माझ्याशीच बोलत होता. बोलता बोलता त्याने मला वाकून नमस्कारही केला. त्याच्या स्वरांतली आस्था आणि कृतज्ञता विलक्षण होती. मला वाटल तो चुकून मला दुसरच कोणीतरी समजला आहे. वसंता पण भलत्याच आश्चर्याने माझ्याकडे पहात होती. तिची आणि त्या मुलाची चांगली ओळख दिसत होती कारण ती त्याला ’चित्र छान आहेत रे तुझी’ अशा थाटाच काहीतरी म्हणाली आणि तोही तिच्या पाठीवर हात ठेवत कौतुकाने हसला. मी आणखी काही बोलणार तेवढ्यात त्याने वसंताला तामिळमधून काहीतरी विचारले. मग त्याने ओरडून कोणालातरी गाडी आणायला सांगितली. मला म्हणाला, “आपण माझ्या घरी चाललोय. आई-बाबा एकदम खूष होतील तुम्हाला इथे पाहून.”
वसंता हसत होती. त्या दोघांनी कट केल्यासारख मला काही बोलू दिल नाही आणि मी ’जे जे होईल ते पहावे’ अशा अविर्भावात गाडीत बसले. मी वसंताला हळूच “याचे नाव काय” अस विचारल पण ते त्यालाही ऐकू गेल आणि ते दोघही हसायला लागले. मग मी काही जाणून घेण्याचा नाद सोडून दिला. ते दोघ आपापसात बोलत होते आणि ते माझ्याबद्दल होत एवढ मला समजत होत.
त्याच्या घरी त्याच्या आई वडिलांना पाहिल्यावर मला तो प्रसंग आठवला.
सात आठ वर्षांपूर्वीची गोष्ट. अशाच एका मुंबई –चेन्नई प्रवासात वेंकटरमण (हाच तो मुलगा) आणि त्याचे आई वडील माझे सहप्रवासी होते. (वसंताची आई आणि रमणची आई मैत्रिणी आहेत त्यामुळे त्या दोघांची ओळ्ख आहे हा खुलासाही लगेचच झाला.) चेन्नईजवळच्या एका छोट्या गावात ते रहात होते. तिघेही खूप अस्वस्थ, दु:खी, आणि तणावग्रस्त होते. हळूहळू आमच बोलण झाल. रमण खूप हुशार मुलगा, म्हणून त्यांनी मुद्दाम त्याला मुंबईला शिकायला पाठवले होते – बहुधा आय. आय. टी. किंवा कसल्यातरी परीक्षेच्या अभ्यासासाठी. पण हा मुलगा बारावीच्या परीक्षेला बसलाच नव्हता. वर्षभर कॉलेजच्या नावाखाली कुठ जात होता कोण जाणे! व्यसनाधीनही झाला होता. आता या मुलाचे काय करायचे, कसे निभावायचे पुढे याचे, हा नीट रस्त्यावर येईल का पुन्हा – अशा चिंतेत त्याचे आईवडील होते. आणि रमण बेदरकारपणे, बधीरपणे बसला होता. त्याला राग आला होता आपण पकडले गेलो याचा, आपल्याला आता आई वडील सांगतील ते ऐकावे लागेल याचा – की आणखी कशाचा ते कळत नव्हते आम्हाला कोणालाच.
कसल्याशा रेल्वे अपघातामुळे आमचा तो प्रवास अनेक तास लांबला होता. त्या काळात आम्ही चौघे खूप बोललो. रमण आधी गप्प गप्प होता, पण नंतर तोही खुलला. ’मी कधी नापास झाले नव्हते आणि तो अनुभव घेण्यासाठी मी एकदा केमिस्ट्रीचा पेपर कसा कोरा दिला होता – उत्तर येत असूनही’ असा माझा एक अनुभव सांगितल्यावर तर त्याला त्याच्यापेक्षा मूर्ख लोक असतात याचा प्रत्यय आला – आणि अशा एखाद्या मूर्खपणामुळॆ सगळे आयुष्य काही बिघडत नाही असा दिलासाही मिळाला.
लांबच्या प्रवासात वाचायला म्हणून एखादे पुस्तक माझ्याजवळ असतेच. त्यादिवशी योगायोगाने विवेकानंदांचे ’कर्मयोग’ माझ्याजवळ होते. चेन्नैला उतरताना रमणला ते पुस्तक मी देऊन टाकल. मी अर्थातच हे सगळ आजवर विसरून गेले होते. प्रवासात अशी कितीतरी माणस भेटतात, कितीतरी भावना कळतात, कितीतरी गोष्टींची देवाणघेवाण होत राहते. तो प्रवासाचा एक अविभाज्य भाग असतो. त्या क्षणांना चिकटून राहता येत नाही, आणि ते क्षण पकडूनही ठेवता येत नाहीत – ते आपोआप विस्मरणात जातात.
रमणच्या अम्मा सांगत होत्या की, ’कर्मयोग’ वाचून रमण खूप अंतर्मुख झाला. जवळजवळ सगळे ’विवेकानंद साहित्य’ त्याने वाचून काढले. मनाच्या निग्रहाने त्याने व्यसनावर मात केली. चित्रकलेतली पदवीही त्याने चांगल्या प्रकारे मिळवली. आता तो पैसाही पुष्कळ कमावतो, नावही मिळ्वले त्याने अल्पावधीत. मुख्य म्हणजे त्यांचा रमण त्यांना परत मिळाला.
रमणच्या या यशाचे सारे श्रेय तो आणि त्याचे आई वडील मला देत होते. मी भेटले प्रवासात, मी गप्पा मारून त्यांना मानसिक आधार दिला, मी ’कर्मयोग’ रमणला वाचायला दिले … म्हणूनच पुढच सगळ व्यवस्थित घडल अस ते सारखे म्हणत होते. त्यांची भावना अगदी प्रामाणिक होती यात शंकाच नाही. पण ते ऐकताना मला फार संकोचल्यासारख झाल. खर तर यात मी काहीच केल नव्हत .. मी फक्त निमित्तमात्र होते. देण्याघेण्याच्या प्रक्रियेत मधला एक हात माझा होता हा फक्त योगायोग होता, त्यात माझे ना कर्तृत्त्व होते ना काही श्रेय होते!
आपण केलेल्या कामाचे फळ नेहमी मागतो. ते अपेक्षेप्रमाणे मिळाले तर स्वत:च्या प्रयत्नांमुळे, गुणांमुळे, कष्टांमुळे ते मिळाले असे मानतो. ’दुस-या कोणाच्या तरी निरपेक्ष मदतीमुळॆ मला इतके यश मिळाले’ असेही कोणी क्वचितच मनापासून म्हणताना दिसते. यशात  आपण स्वत:ची पाठ थोपटून घेतो, स्वत:ची टिमकी वाजवतो. अपयश आले तर मात्र दैवाला, परिस्थितीला, नशिवाला किंवा दुस-याच कोणाला तरी दोष देतो. ’माझ्यात काही तरी कमी आहे, म्हणून मला अपयश आले’ अस माणस क्वचितच म्हणताना दिसतात.
पण आयुष्यात किती तरी वेळा आपण न केलेल्या कष्टांचे फळ, त्याचे श्रेय आपल्याला मिळत असत, हे आपल्या कधी लक्षात आल आहे का? रमणच्या घरातून बाहेर पडल्यावर पुढेही असे कितीतरी प्रसंग आले, कितीतरी माणस भेटली – जी सहजपणे मी न केलेल्या कर्माचे फळ मला देत गेली. कोणालातरी सहज दिलेला हात, कोणालातरी सहज केलेली मदत, कोणाचे तरी फक्त ऐकून घेतलेले शब्द, कोणालातरी न बोलता दिलेले काही क्षण, कोणासाठी तरी खर्च केलेली काही किरकोळ रक्कम …. आपल्या स्मरणातही नसते ती … पण ते ’कोणातरी’ कधीतरी अचानक भेटतात आणि त्याबद्दल भरभरून बोलतात. प्रत्येक वेळी असा अनुभव मला आयुष्यातल्या सकारात्मक गोष्टींची नव्याने जाणीव करून देतो.
खर तर आपल्यासाठीही हे सगळ कोणीतरी केलेल असतच.. मदत केलेली असते, आधार दिलेला असतो, सेवा केलेली असते, आपल्या पाठीशी उभे राहिलेले असते, आपले ऐकून घेतलेले असते, निरपेक्षपणे …. आपण सुखात रहावे एवढ्याच अपेक्षेने ...अशी माणस, असे क्षण, असे  प्रसंग…  आपण समजतो त्यापेक्षा अनेक पटींनी जास्त असतात ते आपल्या आयुष्यात!
जगण्यात जमेची बाजूही असते पुष्कळ . ती विचारात न घेता आपण फक्त दोष देत राहतो परिस्थितीला, दैवाला, नशिबाला, इतरांना! चांगल्या माणसांना, क्षणांना विसरून जायच आणि फक्त वाईट तेवढ लक्षात ठेवायच, पुन्हापुन्हा उगाळत रहायच अस आपण का करत असतो?
आपला ताळेबंद चुकणार नाही, तर काय मग?

5 comments:

  1. The experience is great. The lessons you draw from it are 'greater'. Keep writing, you writing is reflective and fresh.

    ReplyDelete
  2. >> चांगल्या माणसांना, क्षणांना विसरून जायच आणि फक्त वाईट तेवढ लक्षात ठेवायच, पुन्हापुन्हा उगाळत रहायच अस आपण का करत असतो?

    खरंय..पण दोन्ही आठवत राहिले आणि वाईटाचा त्रास व्ह्यायला लागला की ते फक्त कसं विसरायचं हे जास्त कठीण नाही?

    ReplyDelete
  3. Anonymous, Thanks.

    अपर्णा, हीच तर कसरत आहे खरी!

    ReplyDelete
  4. बहुतेक जण आपल्या कर्तुत्वावर मोठी होत असतात ,पण ती ढेपाळलेली असतांना त्यांना एका मार्गदर्शकाची गरज असते.नाहीतर ते त्या खड्ड्यातून कधी बाहेर न येण्याच्याच मनस्थितीत असतात .तेव्हा अश्या मार्गदर्शकांच मोल काही कमी नाही.तू जर तेव्हा रमणला भेटली नसतीस तर त्याच आयुष्य कदाचित वेगळ्याच मार्गाला गेल असत... बाकी आपल्याबरोबर एकामागे एक अस दोन तीन वेळा लागोपाठ काहीतरी वाईटच होत असत तर आपली मानसिकता वेगळीच होते हे ही तितक खर ...तेव्हा सगळ वाईटच आठवत असते...हव ते काही प्रमाणात मिळाल्यावर मग हळूहळू आपल्याला चांगल्या गोष्टी चांगली माणस आठवायला लागतात .

    ReplyDelete
  5. देवेन, मला वाटत वाईट परिस्थितीत चांगले अनुभव आठवण्याचे अनेक फायदे असतात ... निदान यासाठी तरी आपण चांगले अनुभव आठवायला हवेत :-)

    ReplyDelete