ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, October 31, 2013

१७९. विवेकानंदांचा वेदान्त विचारः भाग १६: आत्मविचार (२)

माणसाचे ईश्वरत्व

आपली माणसांची मने गंमतीदार आहेत.'आपण अमर आहोत’ असे म्हटले की, माणसांना वाटते की आपण याच शरीरासह, याच नात्यांसह, याच स्वप्नांसह अमर राहणार आहोत. या सा-या गोष्टी मिथ्या आहेत याची जाणीवच आपल्याला नसते. सामान्यत: माणूस 'मी शरीर आहे’ याच्या पलिकडे जाऊन विचारच करु शकत नाही याची विवेकानंदांना जाणीव आहे. 'नित्यता कोठे वसते? या प्रश्नाचे ते दोनच शब्दांत उत्तर देतात: 'स्वाधीनतेच्या भावनेत’. 

स्वामीजी सांगतात, “मनुष्याची स्वाधीनता त्याच्या मनामुळे नसते, कारण ते बद्ध आहे. त्याच्या ठायी स्वाधीनता नाही. मनुष्य म्हणजे मन नव्हे. तो आत्मा होय. आत्मा हा नेहमी मुक्त, अनंत, शाश्वत आहे. या आत्म्यातच मनुष्याची स्वाधीनता आहे. आत्मा सदैव स्वाधीन आहे.”

आपल्या या स्वाधीनतेचा, या मुक्ततेचा एक अगदी साधा पुरावा आहे. जरी ही मुक्तीची अवस्था तर्काने जाणणे शक्य नाही, तरीही उदाहरण म्हणून याचा विचार केल्यास आपले तार्किक समाधान होऊ शकेल. आपण स्वत:बद्दलच्या अनेक कल्पना करु शकतो. या कल्पना कधी खूप चांगल्या असतात, कधी कधी खूप सामान्य असतात तर क्वचित कधी (की बरेच वेळा?) खूप वाईटही असतात. पण एक चित्र तुम्ही नजरेसमोर आणण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला कोणालाही ते जमणार नाही - ते म्हणजे स्वत:च्या विनाशाचे चित्र समोर आणण्याचा प्रयत्न करा! स्वामीजी म्हणतात, “माझ्या स्वत:च्या विनाशाची नुसती कल्पना करावयाची झाल्यास, मला तिच्यापासून दूर उभे राहून साक्षी या नात्याने तिचे अवलोकन करावे लागेल. म्हणजे आपला विनाश पाहण्यासाठीही आपल्यातले काहीतरी मागे राहावेच लागते. आपल्या नाशाची  पूर्ण कल्पना आपल्याला कधीही करता येणार नाही. कारण माणसाच्या जाणीवेच्या प्रांतातील ही अगदी अशक्यप्राय घटना आहे.”

त्याचबरोबर  दुसरे असे की, माणसाला नेहमी दिव्यभव्यतेची एक उपजत आकांक्षा असते. आकाश, सागर, पाऊस, निसर्ग या गोष्टींचे मानवाला जणू जन्मत:च एक प्रकारचे वेड असते. माणूस व्यवहारात अगदी साध्या गोष्टी करत असतो. पण उच्च ध्येयाने झपाटलेली माणसे मात्र खडतर, हालअपेष्टांचे जीवन जगतानाही सुखात असतात. या ठिकाणी कविवर्य बोरकरांच्या एका कवितेच्या ओळी मला आठवतात – (संदर्भ मात्र नेमका आठवत नाही) - ते म्हणतात,
चालले हे उंट कोठे तप्त रेताडातुनी
स्वार झाल्या प्रेषितांना कोण हाकी कोठुनी? 
का निघाले टाकुनी हे बायकापोरे घरे?
ना जरी वाटेत कोठे पान, पाणी, पाखरे?
पाणियाला पाठमोरी कोणती यांची तृषा?
आणि डोळे बांधणारी कोणती यांची दिशा?

मानव असा पुढेच जातो. यशाकडे, सुखाकडे पाठ फिरवून वाटचाल करण्याची ही प्रेरणा माणसाला कोठून मिळते? तर ती त्याच्या आत्म्याची हाक असते. ही साद येते याचा अर्थच असा की, अंतर्यामी काही शक्ती विराजमान आहे. गांधीजींचा 'आतला आवाज’, अरविंदांचा 'दैवी आदेश’ या गोष्टी महापुरुषांच्या जीवनातच केवळ घडतात असे समजून आपण त्याला दैवी चमत्काराचे रुप देण्याचे काहीच कारण नाही. तुमच्या आमच्या सर्वांच्याच जीवनात असे प्रसंग, अशा घटना घडतात. आपण त्याला सहजप्रवृत्ती instinct म्हणतो. त्यावर विश्वास ठेवत नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष करतो. पण ती खरोखर आत्म्याची साद असते. दिव्यत्वाची, नि:स्वार्थीपणाची उपजत प्रवृत्ती आपल्याला आपल्यातील ईश्वरत्वाची ग्वाहीच देत असते. 

स्वामीजी म्हणतात, “आपण स्वत: एक फार मोठे रहस्य आहोत. मी म्हणजे एक लांबच लांब शृंखला आहे की काय कोण जाणे! .... सतत प्रवाही अशी जाणीव म्हणजेच 'मी’ की काय? की मी त्यापेक्षा अधिक काहीतरी आहे? ... आत्मा म्हणजेच जाणिवेच्या असंबद्ध अशा अवस्थाचा समुदाय आहे की तो एकरस पदार्थ आहे? .....”

आपण पापी आहोत ही कल्पनाच चुकीची आहे. जर आपण वस्तुत: पापी असू तर मग आपल्याला उत्थानाची आशाच नको!  कशाला हवेत मग तुमचे ते सामाजिक नियम अन सामाजिक नीतिमत्ता? 'ऋणं कृत्वा घृतं पिबेत्’ हा चार्वाकमार्गच मग अनुकरणीय नव्हे काय?

केवळ सामाजिक नीतिमत्ता शिकावी या सद्हेतूने विवेकानंद माणसाच्या ईश्वरत्वासंबंधी बोलतात असा अपसमज कोणी करुन घेऊ नये. आधी माणसांना वाटेल ते पाप करु देणारा आणि मग शेवटच्या दिवशी त्यांचा न्यायनिवाडा करणारा ईश्वर विवेकानंदांना बालीश वाटतो. “पावित्र्य हेच आपले खरे स्वरुप आहे, म्हणून आपण पुन्हा पवित्र होऊ शकतो.” असा त्यांचा विश्वास आहे. धर्म हा त्या पूर्वस्थितीकडे जाण्याचा एक मार्ग होय. एखादा हिरा धुळीत पडलेला असतो. पण म्हणून जाणकार व्यक्ती काही तो हिरा कच-याच्या पेटीत फेकून देत नाही. धूळ झटकली की झाले! तद्वतच एखादा माणूस सध्या काही दुष्कृत्ये करत असेल तर तो काही चिरंतन काळापर्यंत, शाश्वत रुपाने पापी ठरत नाही. त्याचे अज्ञान दूर करा, की तो आत्मस्वरुपात, तेजस्वी रुपात प्रकट होईल. आपण मेंढरे नाही तर सिंहाचे छावे आहोत. माणसाच्या दुबळेपणातून धर्माचा उगम झाला आहे असे म्हणणे म्हणजे माणसाच्या आत्मिक शक्तीवर अविश्वास ठेवण्यासारखेच आहे! विवेकानंदांना ते मान्य नाही. 

आज माणूस स्वत:ला दुबळा समजतो आहे. पण त्याने जर मानवी जीवनाकडे नीटपणे पाहिले, नुसते डोळेच नव्हे तर मनही उघडे ठेवून पाहिले, तर त्याच्या लक्षात येईल की, “आपल्या जीवनातील प्रत्येक क्रिया, मग ती अत्यंत स्थूल वा भौतिक स्वरुपाची असो, किंवा अत्यंत सूक्ष्म, उच्च वा आध्यात्मिक स्वरुपाची असो, ती आपल्याला त्या एकाच ध्येयाकडे नेणारी असते. ते ध्येय म्हणजे एकत्वाचा शोध होय.” माणसाची ही सारी गती भेदाकडून अभेदाकडे चालली आहे. विज्ञानशाखा, मानववंशशास्त्र, सामाजिक शास्त्रे, भाषाशास्त्र .......... या सा-या  गोष्टींनी भेदांवर भर देत त्यांच्या कार्याला सुरुवात केली होती. आज ते सारे अभेदाचाच संदेश देत आहेत, निदान एकमेकांशी असलेले नाते तरी नक्कीच सांगत आहेत. 

मग माणसाच्या, इतिहासाच्या, समाजाच्या या विविध अवस्थांना काय म्हणायचे? त्यापैकी कुठली अवस्था नेमकी अंतिम सत्याची समजायची? कुठल्या अवस्था असत्य आहेत म्हणून त्यांचा त्याग करायचा? काय सांगतात विवेकानंद याबाबत? 

असे म्हणता येईल की, विवेकानंदांचा एका अर्थी क्रांतीवर विश्वास नव्हता. एका छान सकाळी जगात सारे काही आलबेल असेल असे मानणे हा एक भाबडा आशावाद आहे. सत्य हे उत्क्रान्त होत असते. ते हळूहळू अधिकाधिक अभिव्यक्त होत आहे. दिसत असणा-या  सा-या च अवस्था सत्याच्या आहेत. विवेकानंद या ठिकाणी जे उदाहरण देतात, ते वाचताना त्यांच्या वैज्ञानिक दृषिटकोनाबाबत आपल्याला आदर वाटल्यावाचून राहत नाही. ते म्हणतात, “एकाच गोष्टीकडे पाहण्याचे जवळजवळ विरोधी असे दृष्टिकोन असू शकतात. पण ते सर्व ती एकच गोष्ट अभिव्यक्त करत असतात. आपण अशी कल्पना करा की, कोणी एक मनुष्य सूर्याकडे प्रवास करीत आहे. प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर तो सूर्याचा फोटो घेत आहे असे समजा. प्रवासातून तो परत आल्यावर त्याच्याजवळचे सूर्याचे अनेक फोटो तो आपल्यासमोर ठेवतो. त्यापैकी कोणतेही दोन फोटो सारखे नाहीत हे आपल्याला दिसते. तथापि हे सर्व फोटो त्या एकाच सूर्याचे, पण निरनिराळया स्थानांतून घेतलेले आहेत हे कोणाला नाकारता येईल?”

ईश्वर सर्व माणसांमध्ये सारख्याच प्रमाणात का बरे अभिव्यक्त नाही याचे हेच अगदी स्पष्ट आणि शास्त्रीय उत्तर आहे. आपण जे जग पाहतो ते आपल्या चष्म्यातून पाहतो. एका विशिष्ट प्रकारच्या मानसिक भूमिकेवरुन आपण हे जग आता पाहत आहोत म्हणून ते आपल्याला तसे दिसते आहे. जर आपण सर्वत्र ईश्वराला पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला सर्वत्र ईश्वरच दिसेल. 'तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति’ असा साक्षात भगवंतांचा दृष्टान्त आहे.

मानवजात आपले हे मूळचे स्वरुप विसरलेली नाही याची विवेकानंदांना खात्री आहे. यातच त्यांची मानवी भवितव्याविषयीची आशाही एकवटलेली आहे. ते म्हणतात, “आतापर्यंत असा एकही मानववंश निर्माण झाला नाही की, ज्याने कोणत्या ना कोणत्या धर्माचे अनुसरण केले नाही आणि ईश्वराची किंवा कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या देवदेवतांची उपासना केली नाही. ईश्वर किंवा देवदेवता आहेत की नाही हा प्रश्न नाही. पण या मानसशास्त्रीय घटनेचे विश्लेषण काय दर्शविते? सर्व जग जणू ईश्वराचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे .... तो का? कारण जरी आपण बंधनात आहोत, जरी प्रकृती आणि तिचे शक्तीशाली नियम आपल्याला भरडून टाकत आहेत, जरी ते आपल्याला इकडेतिकडे थोडेदेखील हलू देत नाहीत, जरी प्रकृतीचे सर्वव्यापी नियम आपल्या मार्गामध्ये, आपल्या कार्यामध्ये भयंकर अडथळे निर्माण करतात, तरी आपला आत्मा स्वत:चे मूल स्वरुप कधीही विसरत नाही. आणि ते शोधण्याचा तो सतत प्रयत्न करत असतो.....”

अर्थात हा शोधाचा, स्व-शोधाचा, आत्मशोधाचा प्रवास सरळ रेषेत कधीही होत नाही. पण आत्मा मुळात सच्चिदानंद स्वरुप असल्याने कोणाचाही नाश होणार नाही. पुन्हा उत्थानाची उषा उजाडणारच नाही इतक्या अवनत स्थितीला कोणी कधीच जाणार नाही. एका अर्थी माणसाची, जीवाची ही गती वर्तुळाकार आहे. आपण सारे एकाच केंद्रापासून म्हणजे अर्थातच ईश्वरापासून निघालो आहोत. अगदी नीचातला नीच प्रतीची जीवसुद्धा ईश्वरापासून निघाला आहे याची आपण सतत जाणीव ठेवली पाहिजे. जो माणूस दगडातही देव पाहतो त्याला माणसातले सुप्त देवत्व पाहणे अजिबात कठीण जाऊ नये. जीवामधील ईश्वत्वाच्या विचारांचे दूरगामी पडसाद भारताच्या भावी काळातील क्षेत्रात  उमटलेले आपल्याला दिसून येतील. “मानवसेवा हीच माधवसेवा” या स्वामीजींच्या उदगारांच्या अनुषंगाने देशात एक नवेच वारे गेल्या शतकात वाहत राहिले आहे. मरगळलेल्या देशात या नवचेतनेने जणू नवीन प्राणच फुंकले आहेत.

स्वामीजी निर्गुण आणि सगुण (ईश्वर) अशी ब्रह्माची दोन्ही रुपे स्वीकारतात हे आपण यापूर्वी पाहिले आहेच. “आत्मा हाच ब्रह्म” अशीही त्यांची स्पष्ट धारणा आहे, ती ते कशा पद्धतीने मांडतात याचा आपण आता मागोवा घेऊ.

ब्रह्मैव आत्मा

प्रत्येक जीव हा ईश्वरस्वरुप आहे हे स्वामीजींचे मत आपण याआधीच पाहिले आहे. “सर्व व्यक्तित्वांची समष्टि म्हणजे ईश्वर. परंतु ईश्वरही एक व्यक्ती आहे. जसे शरीर हे सर्व विभिन्न पेशींची समष्टि असूनही ते एक वस्तू आहे, तसेच ईश्वराचे आहे. समष्टि म्हणजे ईश्वर व व्यष्टि म्हणजे जीवात्मा. म्हणूनच ज्याप्रमाणे पेशींच्या अस्तित्वावर शरीर व शरीराच्या अस्तित्वावर पेशी अवलंबून असतात, त्याचप्रमाणे जीवात्म्यांच्या अस्तित्वावर ईश्वराचे व ईश्वराच्या अस्तित्वावर जीवात्म्यांचे अस्तित्व अवलंबून आहे. जीव व ईश्वर हे दोन्ही बरोबरच अस्तित्वात असतात. त्यांच्यापैकी एकजण जोवर अस्तित्वात आहे तोवर दुस-या चे अस्तित्व असलेच पाहिजे” असे विवेकानंदांनी एके ठिकाणी म्हटले आहे. 

या ठिकाणी जीव व आत्मा यातील फरक नीटसा स्पष्ट होत नाही. पण आणखी एके ठिकाणी विवेकानंद देह म्हणजे प्रातिभासिक आत्मा असे म्हणतात. तसेच इच्छाशक्ती + जाणीव + इंद्रिये + वासना + कामक्रोधादि षडरिपु म्हणजे जीवात्मा (मायेच्या उपाधिद्वारा बद्ध असे परब्रह्म) आणि तिसरा नित्यमुक्त आत्मा अशी विभागणी करतात. त्यावरुन असे म्हणता येते की शंकराचार्यांप्रमाणेच विवेकानंदही आत्मा व जीव यात भेद करतात. 

आत्म्याच्या स्वरुपाविषयी वेगवेगळी मते आहेत. उपनिषदांत म्हटले आहे की, “आत्माच ब्रह्म आहे”. जे काही आहे ते सर्व आत्माच आहे. तो एकच आत्मा विविध रुपांनी प्रकट होतो. बौद्धांच्या मते आत्मा वगैरे काही नाही. जाणीवसुद्धा सतत बदलत असते. 'स्व’ची कल्पनाच मुळी भासमय आहे. ईश्वरापेक्षा भिन्न स्वरुपाचे असंख्य आत्मे असून ते त्यापासून रुप इत्यादीबाबत सर्व बाबतीत सर्वदा पृथक् असतात असे द्वैत तत्त्वज्ञान सांगते. तर विशिष्टाद्वैताच्या मते आपला आत्मा हा परमात्म्याचा एक अंश आहे. याबाबत विवेकानंदांना वाटते की, - “मी अनंताचे स्फुल्लिंग आहे वगैरे काव्यात्मक भाषा, भाषा म्हणून ठीक आहे, पण प्रत्यक्षात तुम्ही अनंताचे विभाजन कसे करणार?” - हा प्रश्न मनात उदभवतोच. संपूर्ण ब्रह्म आपणच आहोत हा शंकराचार्यांचा सिद्धान्त विवेकानंदांना जास्त आपलासा आणि तर्कशुद्ध वाटतो. 

हा आत्मा आहे तरी काय? आत्मा म्हणजे सूक्ष्म शरीर नव्हे. सर्व शरीरे ही सूक्ष्म किंवा स्थूल अशा जडद्रव्यांचीच बनली असली पाहिजेत. जडद्रव्ये म्हटली की, त्याला रुप आणि आकार आले म्हणजे पर्यायाने मर्यादा आली. शिवाय प्रत्येक जड वस्तू परिवर्तनशील असते. म्हणून आत्मा म्हणजे कोणत्याही प्रकारचे शरीर नव्हे.

स्वामीजींच्या मते “आत्मा हे असे एक वर्तुळ आहे की, ज्याचा परीघ कोठेच नाही परंतु ज्याचा मध्यबिंदू शरीरात आहे.” हा आत्मा (वास्तविक 'हा’ शब्द येथे अयोग्यच आहे) अनंत आहे. आत्मा कोठल्याही घटकद्रव्यांचा बनलेला नसल्याने तो अविनाशी आहे. तो अखंड आणि एकरस आहे. तो अनादि आणि अनंत आहे. भगवदगीतेतील दुस-या  अध्यायात आत्म्याचे वर्णन करणारी जी विशेषणे आली आहेत - अजर, अमर, अविनाशी, अच्छेद्य, अदाह्य, अक्लेद्य - अशा सर्व शब्दांचा वापर विवेकानंदही आत्म्याचे वर्णन करताना करतात. आत्मा अवकाशापलिकडे आहे. आत्मा देश व काल यांनी मर्यादित नाही. म्हणजेच आत्मा सर्वव्यापी आहे. आत्मा स्थिर , अपरिवर्तनीय, अचल आणि नित्य असल्याकारणाने तो ब्रह्म होय. आत्मपद हे अभयपद आहे. आत्म्याचे स्वरुप मुक्त होय. मुक्ती म्हणजे आत्मरतीची चिरंतन अवस्था. आत्म्याचे भाग करता येत नाहीत, विभाजन करता येत नाही. विद्या व अविद्या किंवा ज्ञान व अज्ञान ही दोन्ही आहेत, जग या दोहोंचे आहे. परंतु आत्म्यावर अविदयेचा कधीही  परिणाम होत नाही, तो अविदयेने कधीही झाकला जात नाही. 

या आत्मस्वरुपाची कल्पना आपल्या सीमित मनाने व या बुद्धीने करता येणे अशक्य आहे हे विवेकानंदांनाही माहिती आहे. पण आत्म्याचे असे सगुण रुपात, शब्दांत वर्णन केल्याशिवाय लोकांना त्याचे आकलन तरी कसे होणार, हा त्यांच्यापुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे.

ते म्हणतात, “आत्म्याचे ज्ञान होणे शक्य नसते. कल्पनेचा अमर्यादपणा हाच त्याच्या अस्तित्वाचा आधार आहे. उदाहरणार्थ, माझ्या आत्म्याव्यतिरिक्त दुसरे काहीही माझ्या ठायी निश्चितपणे अस्तित्वात नाही. आणि तरीही त्या आत्म्याची मी शरीर वा मन, सुखी वा दु:खी, स्त्री वा पुरुष अशा रुपांतच कल्पना करु शकतो. आत्मा जसा आहे त्याच स्वरुपात त्याची कल्पना करण्याचा मी प्रयत्न करतो. पण त्याला खालच्या पातळीवर ओढून आणल्याशिवाय मला त्याची कल्पनाच करता येत नाही असे मला आढळून येते. तरीही आत्म्याच्या अस्तित्वाबद्दल मला खात्री असते.”

आता प्रश्न असा पडतो की, आत्म्याची उत्पत्ती झाली कोठून? आत्मा शून्यापासून निर्माण झाला असे विधान आपल्याला करता येत नाही. कारण शून्यातून इतके शक्तिमान, सामर्थ्यवान असे काही कसे निर्माण होईल? शिवाय ते कसे निर्माण झाले, त्याची प्रक्रिया काय आणि ते कोणी निर्माण केले व कोणत्या उददेशाने - अशी प्रश्नांची साखळी मग या मार्गाने वाढतच जाते. शिवाय यातून अटळ नियतीवाद व क्रूर ईश्वर अशा दोन वेगळयाच व पूर्णत: विसंगत तत्त्वांची प्रस्थापना होते. 

या ठिकाणी पुनर्जन्माचे तत्त्व महत्त्वाचे ठरते. न्यायमतानेही असे म्हटले आहे की, 'आपली कर्मे जरी आपल्याला लुप्त झाल्यासारखी वाटतात, तरी ती 'अदृष्ट’ अवस्थेत विद्यमान असतात. आणि ‘प्रवृत्तीच्या’ रुपात ती पुन्हा प्रकट होतात.’ या अनुषंगाने विवेकानंदांच्या वेदान्तविचारांत कर्मसिद्धान्ताला महत्त्व प्राप्त होते.

आत्म्याविषयीचा आणखी एक विचार असा आहे - आत्मा जर मूलत: व स्वभावत: शुद्ध आहे व पूर्ण आहे आणि जर प्रत्येक आत्मा अनंत व सर्वव्यापी असेल तर मग आत्मे 'पुष्कळ’ आहेत या वाक्याला काही अर्थच उरत नाही. खूप वस्तू 'अनंत असूच शकत नाहीत. 'अनंत’ अशी एकच सदवस्तू असू शकते. या ठिकाणी विवेकानंदांना मुण्डकोपनिषदातील पुढील श्लोकाची आठवण येते:
द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानवृक्षं परिषस्वजाते।
तयोरन्य: पिप्पलं स्वाद्वत्ति अनश्नन्नन्यो अभिचाकशिति ।।

ज्या नात्याने दोन आत्मे असूच शकत नाहीत, त्याच नात्याने आत्मा व ब्रह्म या दोन भिन्न गोष्टी असूच शकत नाहीत. आत्मा व ब्रह्म एकच होत. याबाबत चर्चा करताना श्री. लाल म्हणतात, “Like a true Vedantist, Vivekananda never hesitates in identifying the true nature of Atman with Brahman itself. His reasons for identifying the two are generally similar to the reasons given by Vedanta. The basic fact to be noted is that unless the two are identified, the strict monistic character of reality cannot be maintained. Soul cannot be said to be an aspect or part of the ONE, because in that case The ONE will become composite having parts or aspects within itself. Souls cannot be conceived also as expressions or manifestations of the Absolute, because even in that case they would become separate realities over and above the Brahman. Then there is only one way of conceiving the relation between the two that the two are basically identical and their difference is only apparent.”

या भासमान भेदामुळे मानवाच्या वास्तविक भेदरुपांत कोठलाही अडसर निर्माण होत नाही अशी विवेकानंदांची धारणा आहे. आभासवाद अथवा अवच्छेदवाद्यांपेक्षा प्रतिबिंबवादाचे उदाहरण ते आत्म्याच्या अनेकत्वाचे - म्हणजे त्याच्या भासमान अनेकत्वाचे - स्पष्टीकरणार्थ देतात. मात्र आभासवाद (फुलामुळे स्फटिक लाल दिसते) आणि अवच्छेदवाद (घटाकाश- मठाकाश) याचे खंडनही ते करत नाहीत. 

गेल्या काही वर्षात माणसाचे तांत्रिक ज्ञानच वाढले अशातला भाग नाही, तर माणसाच्या शारीरिक क्षमताही वाढल्या आहेत असे वाटते. सर्जी बुबकासारख्या अनेक खेळाडूंनी एरवी शरीराने अशक्य वाटणा-या  गोष्टी साध्य केल्याची अनेक उदाहरणे आहेत - काही खेळाडू उत्तेजक द्रव्यांचे सेवन करुन ही प्रगती करतात हा भाग वेगळा - ! कार्ल लुईस, मॅजिक जॉन्सन, जॉन्टी -होडस यासारख्या अनेक खेळाडूंचे कौशल्य मानवी शरीरातही अमर्याद क्षमता असल्याचे आपल्याला दाखवून देते. सर्वव्यापी ब्रह्मच आपल्या अंतरी वसत असल्याची ही खूण नव्हे काय? 

आपण सर्वच वस्तुत: ब्रह्मस्वरुप असलो तरीही भौतिक स्थूल शरीराला, अन्नमय कोषाच्या विकासालाही महत्त्व देण्यास  विवेकानंद आपल्याला बजावतात. 'देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर’ अशीच जणू त्यांचीही भूमिका आहे. 'शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम’ याच्याशी सुसंगत असाच विचार आहे हा! उपनिषदांनीही 'नायमात्मा बलहीनेन लभ्य:।‘ अशी गर्जना केली आहे. दुबळया शरीरातच रोग ठाण मांडून बसतो असे स्वामीजी म्हणतात. आत्म्याचा, ब्रह्माचा, मुक्तीचा विचार, त्यासाठी करावयाची साधना हे येरागबाळयाचे काम नोहे! त्यासाठी सुदृढ, बलवान, सामर्थ्यसंपन्न असे शरीर हवेच. 'तुम्ही फुटबाल खेळून आधी शरीर सामर्थ्यवान बनवा. मगच भगवान श्रीकृष्णांचा तेजोमय संदेश समजण्याची पात्रता तुमच्यात येईल” अशा आशयाचा उपदेश स्वामीजी तरुणांना करतात तो याच विचारांनी! 

हे आत्मरत होणे, ब्रह्मरत होणे म्हणजेच मुक्त होणे. या अवस्थेचे विवेकानंदकृत वर्णन आणि मोक्षमार्गाचे त्यांनी केलेले विवेचन आपण पुढील प्रकरणात पाहणार आहोत. 

क्रमशः

2 comments:

  1. This is something very different.I have never come across any such readings.Its very stimulating and forces you to think on many aspects at a time. I am really surprised and stunned.I think many would like to read this.While reading you get a feeling that you are understanding at least what and how great persons think.Keep it up.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद आशुतोषजी. भाषेचा सोपेपणा हे विवेकानंदांचे वैशिष्ट्य आहे – हे मला नेहमीच जाणवत राहते.

      Delete