ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, January 14, 2010

१८. काही कविता: ८ सख्य

आपण ज्या समाजात वावरतो, ज्या संस्कृतीत वाढतो, त्याचा आपल्यावर कळत नकळत - बरेचदा नकळतच! - फार मोठा पगडा असतो. माझ्या कवितांमध्ये जेव्हा जेव्हा कृष्ण प्रकटतो, तेव्हा त्याच्या अचानक येण्याने मी आश्चर्यचकित होते.

मी कोणत्याही अर्थाने धार्मिक नाही. मी व्रत करत नाही, उपास करत नाही, नवस करत नाही, पूजा करत नाही. मला देऊळ आवडते, पण मी देवाला नमस्कार करत नाही. या जगात आपल्याला न कळणारे बरेच काही आहे हे मला जाणवते. दुःख दिसते तसेच सुखही दिसते. या शक्तीचा शोध मानवी मनाच्या पल्याड आहे आणि तो माझा प्रांत नाही असे मी स्वतःला फार पूर्वी सांगितले आहे.

कृष्ण मला माहिती नाही असे नाही. लहानपणापासून अनेक गोष्टी ऐकताना तो भेटला आणि त्याचा खोडकरपणा आणि त्याचे शूरपण भावले. मोठेपणी भगवद्गीता वाचायची संधी मिळाली. ती समजली नाही अजुनही, पण त्याची भव्यता आकर्षक वाटली. हा लोणी वगैरे चोरून खाणारा आपल्या लहानपणीचा कृष्ण तत्त्ववेत्ता आहे हे लक्षात आल. पुढे एकदा नेटाने मी संपूर्ण महाभारतही वाचल.. त्यातला मानवी मनाचा व्यापक आवाका पाहून मन थक्क झाल.

ते सगळ नेणीवेत रूजले असणार आणि संधी मिळताच मला त्याची जाणीव करून देत असणार...अन्यथा या कल्पनेचा दुसरा काय अर्थ लावणार?


सुदाम्याने पोहे केले,
मला बोलावले;
कृष्ण होता भुकेजला,
त्याला सारे दिले.

कृष्ण तृप्त झाला,
जरा डोळाही लागला;
स्वप्न त्याने पाहिले,
त्याचा अंश मला आला.

सख्य ओतप्रोत दिले,
जिणे बहकून गेले;
सावळ्याच्या सावलीला,
मीच घुंगरू बांधले.

पुणे, ८ नोव्हेंबर २००५ ११.५०

4 comments:

  1. सविताबाई : पोस्टचा गद्‌य भाग छान ज़मला आहे.

    - डी एन

    ReplyDelete
  2. आभारी आहे तुमच्या प्रतिसादाबद्दल :)

    ReplyDelete
  3. अगदी छान लिहिले आहेस, असेच लिहीत रहा, महेश

    ReplyDelete
  4. महेश, प्रोत्साहनासाठी आभारी आहे.

    ReplyDelete