ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Saturday, January 30, 2010

२०. नक्षत्रांचे देणे

आरती प्रभू याच्या शब्दांत नेहमीच ठसठसणारे दुःख असे ओतप्रोत भरलेले असते. आयुष्याच्या एखाद्या अचानक समोर आलेल्या वळणावर ’आता नक्की रस्ता चुकला बरं का आपला, परतीची वाट नाही यापुढे ’ अस मलाही कधीकधी वाटून जात. आणि ही कविता वाचताना तर नक्कीच तस वाटत. सगळी ताकद संपल्यावर मनाचा दगड उशाला घेऊन कण्हत झोपणे तुमच्या आमच्या सर्वांच्याच वाटयाला येते, पण ते दाहक सत्य इतक्या निरपेक्षपणे केवळ आरती प्रभूच व्यक्त करू शकतात. कवीच्या या सामर्थ्याचा मला हेवा वाटतो कधीकधी. अर्थात त्यासाठी कवीने मोजलेली किंमत माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या कुवतीच्या तर सोडाच, कल्पनेच्याही बाहेरची आहे.

तरी अनेक प्रश्न पडतातच. कविता वाचताना, तिचा अर्थ लावण्याची धडपड करताना, तिच्या सान्निध्यात मनावर चढणा-या मळभाकडे त्रयस्थपणे पाहताना... मागे उरलेल्या पाचोळ्यात जीव गुंतताना....

काहीतरी समजल्यासारख वाटतं ही कविता वाचताना पण तरीही काही तरी सुटतेच हातातून...

गेले द्यायचे राहून
तुझे नक्षत्रांचे देणे
माझ्यापास आता कळया
आणि थोडी ओली पाने.

आलो होतो हासत मी
काही श्वासांसाठी फक्त
दिवसांचे आता ओझे
रात्र रात्र सोशी रक्त

आता मनाचा दगड
घेतो कण्हत उशाला
होते कळ्यांचे निर्माल्य
आणि पानांचा पाचोळा.

2 comments:

  1. > कवीच्या या सामर्थ्याचा ... अर्थात त्यासाठी कवीने मोजलेली किंमत
    >
    > गेले द्यायचे राहून ... तुझे नक्षत्रांचे देणे
    >

    ही कविता खानोलकरांनी आपल्या प्रतिभाशक्तीला उद्‌देशून लिहिली आहे, असं मी वाचल्याचं आठवतं.

    सविताबाई, कवीनी मोज़लेल्या किमतीविषयी काही सांगू शकाल का? पु लं नी त्यांच्या स्वभावाप्रमाणे आरती प्रभूंवर गुळमुळीत, अजीर्ण होईल असा गोडमिट्ट लेख लिहिला आहे. (तो लेख आता धड आठवतही नाही.) पण कवींचे मित्र रवींद्र पिंगे यांनी लिहिलेल्या लेखातून खानोलकरांची एक प्रतिभावान, पण अहंकारी आणि विवेकशून्य माणूस अशी प्रतिमा दिसली. शिवाय माणूस पट्टीचा पिणारा होता, अगदी कंट्री ढोसणारा. आपल्या प्रतिभेची जगानी यंव किंमत करायला हवी (जेणेकरून आम्ही अज़ून नशापाणी करू आणि वि स खांडेकरांसारख्या लेखकाचा अज़ून मोठा अपमान करू) असा या लोकांचा आग्रह मला काही कळत नाही. खानोलकरांनी स्वत:च स्वत:ची दशा करून घेतली.

    चांगली निर्मिती करायला माणसाला कसली किंमत मोज़ावी लागतेच असं काही नाही. एरवी लहानपणीच आईबाप मेलेल्या, बापाचा मार खात बालपण गेलेल्या, दोन घासांची मारामार असलेल्या, पोलिसचौकीत लाथाबुक्क्या खाल्लेल्या अनेकांनी कविता केल्या असत्या. पण तुम्हाला खानोलकरांनी चुकवलेल्या किमतीची माहिती असल्यास ती वाचायला मला आवडेल. आयुष्यभर सुखी असलेले बोरकरांसारखे लेखकही अव्वल लिहू शकतात.

    ReplyDelete
  2. नानिवडेकर, नाही मला खानोलकरांच्या जगण्याबद्दल काहीही माहिती नाही. पु.ल.,पिंगे यांचे लेख मी वाचलेले नाहीत, किंवा वाचले असतील तरी मला ते आठवत नाहीत. कविता फक्त दुःखातून जन्मते असे नाही, तसेच प्रत्येक माणूस आयुष्यभर फक्त सुखी किंवा दुःखी असतो असेही नाही. त्यामुळे मी फक्त निर्मितीच्या प्रक्रियेत त्या त्या माणसाला येणा-या अनुभवाबद्दल बोलत होते. ज्याने ’ग्रेट’ लिहिल, त्याचा /तिचा अनुभव जास्त सखोल असणार हा माझा तर्क फारच चुकीचा वाटतो आहे तुमच मत वाचल्यावर. :)

    ReplyDelete