ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Saturday, October 9, 2010

४७. खैरखेडीतील अंधार

कामानिमित्त मी बराच प्रवास करते. ज्या गावाचे नाव कधी ऐकलेही नव्हते, अशा गावांतही जाते. तिथल्या लोकांशी बोलते. भूगोलाच्या पुस्तकाने मनावर पक्क्या ठसवलेल्या सीमारेषा या प्रवासात नकळत अदृश्य होत जातात. गाव, तालुका, जिल्हा, राज्य इतकेच नव्हे तर राष्ट्राचीही सीमारेषा आपल्याला माहितीच नसती - तर काय झालं असतं, असा एक विचार मधूनच कधीतरी मनात डोकावतो.


अशा प्रकारच्या कृत्रिम सीमारेषांचा अर्थातच एक फायदाही असतो. आपल्या मनात ’आतले’ आणि ’बाहेरचे’ अशी एक भिंत तयार झालेली असते. ’आत’ल्यांशी आपली सांस्कृतिक वीण घट्ट जुळलेली असते. मात्र त्याचवेळी आपण ’बाहेर’च्यांशी नाते प्रस्थापित करताना साहसाचाही अनुभव घेत असतो. सीमारेषेच्या आतल्या जगावर बाहेरच्या जगाचा सतत परिणाम घडत असतो आणि त्यामुळे आतले जगणे आपल्याही नकळत अधिक प्रगल्भ आणि समृद्ध होत जाते.

पण ज्यांच जगच मुळी मर्यादित परिघात बांधलं गेलं आहे, त्यांच काय होत असेल? त्यांच्या जीवनाला या बंधनाने काही बाधा येत असेल का? जगण्याच्या भौतिक मर्यांदामुळे माणसांची स्वप्नही मर्यादित राहत असतील का? असे अनेक प्रश्न आनंदपुरच्या (हिंदी भाषेप्रमाणे ’पुर’ असचं लिहिते आहे मी!) वाटेवर माझ्या मनात येत होते.

आनंदपुर हे मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील गाव. तसं बघायला गेलं तर राजधानी भोपाळपासून ते अवघ्या १२० किलोमीटर अंतरावर आहे. पण स्वत:ची गाडी घेऊन गेलो तरी हे अंतर पार करायला चार साडेचार तास सहज लागतात. (आलिकडे परिस्थिती थोडी सुधरली आहे म्हणा!) खड्डय़ांतून रस्ता शोधायला भरपूर कल्पकता, चिकाटी आणि दूरदृष्टी लागते. इथल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या मनमानी कारभारापुढे पुण्यातली बसबाहतूकही कौतुकास्पद वाटते!

आनंदपुर हे तीनशे घरांच गाव. इथे दहावीपर्यंत शाळा आहे. दूरध्वनी केंद्र आहे. मुख्य म्हणजे परिसरातल्या गावांसाठी हे बाजा्राचं ठिकाण आहे. सोमवार हा आठवडी बाजाराचा दिवस. पण एरवी देखील छोटया मोठया गोष्टींसाठी माणसे (मुख्यत्वे पुरूष) आनंदपुरला येतात. ’बिजली, सडक, पानी’ हे इथले कायमचे त्रासाचे आणि म्हणून चर्चेचे विषय! भारतातलं एक प्रातिनिधिक खेडं!

पुढे पाच-सहा किलोमीटर अंतरावर आतल्या भागात गेलं की मात्र आनंदपुर म्हणजे स्वर्ग वाटायला लागतो. हेही भारताचं प्रातिनिधिक चित्र! त्या दिवशी आम्ही खैरखेडीची वाट पकडली, तेव्हा सर्वात आधी सामोरी आली ती लाल धूळ. आणि त्यानंतर आम्हा पाहुण्यांना ’पाहायला’ आलेला बालचमू!

ममता ही त्या गावातली एक चुणचुणीत मुलगी. आठवीनंतर इतर मुलींची सोबत नसल्याने तिची शाळा सुटली. पण इथे बायकांचे बचत गट स्थापन करण्यात आणि ते चालवण्यात ती पुढाकार घेते. सायकल चालवता येणारी गावातली ही एकमेव मुलगी! स्त्रियाच्या गटांच्या बैठका झाल्यावर ममताचे माझ्याकडे आणखी एक काम आहे. ते म्हणजे मुलींची बैठक घेण्याचे.

ममताने येथे ’किशोरी गट’ स्थापन केला आहे. ममताने बोलवून आणल्यानंतर किशोरी गटाच्या सात मुली मान खाली घालून माझ्यासमोर येऊन बसल्या. नजरेच्या खाणाखुणांनी त्यांचा आपापसांत संवाद चालू होता. पण माझ्याशी मात्र त्या बोलायला तयार नव्हत्या. माझ्यासारख्या बाहेरच्या जगातल्या व्यक्तीशी बोलण्याचा हा त्यांच्या आयुष्यातला बहुधा पहिलाच प्रसंग होता.

ममताने त्यांना माझी ओळख करून दिली. मी पुण्याहून आले आहे, काय काम करते वगैरे सांगितलं. त्या सातही जणी माझी नजर चुकवत नुसत्याच हसत होत्या. पूल सांधावेत असं जणू आमच्यात काहीच नव्हत...मला ते एक मोठं आव्हान वाटल!

गप्पांना सुरूवात व्हायला थोडा वेळ गेला खरा पण हळूहळू त्यांच्या परिस्थितीचे एक एक पदर उलगडू लागले. त्या सात जणींपैकी पाच जणी कधीच शाळेत गेलेल्या नव्हत्या. उरलेल्या दोघी तिसरी चौथीपर्यंत शिकून थांबल्या होत्या आणि आता अक्षरओळखही विसरल्या होत्या. गावात चौथीपर्यंतच शाळा आहे त्यामुळे मुली फार फार तर तिथवरच शिकतात. नंतर धाकटया भावंडांना सांभाळायला त्या घरात हव्या असतातच.

’तुम्ही दिवसभर काय करता?’ या माझ्या प्रश्नावर ’कुछ नही’ हे एकमुखी उत्तर आलं. मी खोदून खोदून विचारल्यावर त्यांना जरा मजा वाटायला लागली आणि त्या खुलल्या, बोलायला लागल्या. दहा बारा वर्षांच्या या कोवळ्या मुली घर झाडण्यापासून ते जनावरांसाठी चारा आणण्यापर्यंत आणि लहान भावंडांना सांभाळण्यापासून ते विहिरीवरून पाणी आणण्यापर्यंत सर्व कामं करतात. या कामांत त्यांचे दिवसाला सहा ते आठ तास सहज जातात.

त्या सातपैकी दोन मुलींचं लग्न झालं होतं! त्यांना लग्नाचा अर्थ तरी समजला होता की नाही देव जाणे! त्या अजून ’पुरेशा मोठया झालेल्या नाहीत’ (हे त्यांचेच शब्द!) म्हणून सध्या त्या आई-वडिलांकडे राहत होत्या. इतर मुलींची स्वप्नही ’लग्न करून नवरा मिळवणे’ याचे सीमेवर रेंगाळताना दिसली.

या मुली आजपर्यंत गाव सोडून कोठवर जाऊन आल्या आहेत, याची चौकशी केली आणि आश्चर्याचा आणखी एक धक्का बसला. अवघ्या पाच किलोमीटर अंतरावरच्या आनंदपुरलाही त्यातल्या दोघी कधीच गेल्या नव्हत्या. जास्तीत जास्त दूर जाऊन आलेली होती ती रमा. पंचवीस किलोमीटरवर असलेल्या सिरोंजला ती एकदा जाऊन आली होती. तिचा अपवाद वगळता कोणतीही मुलगी बसमध्ये बसलेली नव्हती. इतर चौघी त्या मानाने भाग्यवान म्हणायच्या - त्यांनी बस निदान पाहिली तरी होती. दोन मुलींनी तर बस पाहिलीही नव्हती. तीन मुलींना आगगाडीच चित्र पाहिल्याचं आठवतं होतं. पण अर्थातच आगगाडीत त्या कोणीही बसलेल्या नव्हत्या. बाप- चुलता - मामा - भाऊ यांच्या सायकलवर कधीतरी लहान असताना त्या बसल्या होत्या. पण सायकला चालवणं ही गोष्ट त्यांना अशक्यप्राय वाटत होती. सायकल चालवल्याबद्दल गावातले लोक काय म्हणतात ते ममता चिडून सांगत होती तर या सगळ्या त्यावर मस्त हसत होत्या.

त्यांनी कोणीच टीव्ही पाहिलेला नव्हता. गावात एक दोन लोकांकडेच रेडिओ आहे. पण त्यावर आवर्जून काही ऐकायचं असतं हे या मुलींना माहितीही नाही. चित्रांचं, गोष्टींचं पुस्तक त्यांच्या कल्पनाशक्तीपलिकडे आहे. आणि त्यांचे खॆळ? त्याबद्दल त्यांना काहीही सांगता आलं नाही. कृष्ण मात्र त्यांना चांगलाच माहिती आहे. हा कृष्ण नावाचा देव सगळीकडे असा ऐसपैस विराजमान असतो.. मौखिक परंपरेबद्दल अशा वेळी आदर वाटतोच.

परिस्थितीने पाश आवळलेल्या या मुलींना भविष्याची काहीही स्वप्नं नाहीत. वर्तमानाच्या मर्यादेची जाण नाही आणि त्यामुळे त्यात काही बदल घडवून आणण्याची ऊर्मीही नाही. आला दिवस जातो, हे त्यांच्या अनुभवांच्या इवल्याशा गाठोडयामुळे त्यांना पुरेसे उमगले आहे. पण या दिवसाला, आणि पर्यायाने जगण्याला आपण काही आकार देऊ शकतो, याची त्यांना जाणीवच नाही. दोष त्यांचा नाही आणि परिस्थितीने गांजलेल्या त्यांच्या आई वडिलांचाही नाही.

या मुली अशाच मोठया होणार. एक दिवस लग्न करून घर चालवायची, पोराबाळांना वाढवायची जबाबदारी घेणार. यांच्या आयुष्यात करमणूक, विश्रांती, ध्येय, वेगळया वाटा, मनस्वीपणा .. असले शब्द असतील? की कधीच असणार नाहीत?

यांना त्यांच्या पंचक्रोशीचीही माहिती नाही. यांच राज्य कोणत? यांचा देश कोणता? यांच जग कोणत? यांना आणि मला जोडणारा धागा तरी कोणता?

यांच्या आईच आणि आजीचही आयुष्य असच असणारं! त्यांच्या आयुष्यात फक्त दु:ख आणि वेदनाच असतील असं मी नाही म्हणणार. मात्र सुखाच्या, आनंदाच्या कल्पना पारंपरिक किती आणि ’स्व’च्या जाणीवेतून आलेल्या किती? माझ्या मनात प्रश्नांची मालिका सुरू होती.

समीरने मला वेळ झाल्याची खूण केली. माझं घडयाळाकडं लक्ष गेलं. गेलं वर्षभर माझ घडयाळ अधूनमधून चक्क उलटं चालतयं. पण त्यामुळे माझ फारसं काही बिघडत नाही. एक तर शहरात ज्याच्या त्याच्या हातात घडयाळ असतं - त्यामुळे कोणालाही वेळ विचारता येते. दुसरं म्हणजे थोड ठाकठीक केलं की माझ घडयाळ नीट चालायला लागतं. आणि मुख्य म्हणजे घडयाळाच्या तालावर न नाचण्याची चैन मला करता येते.

पण इकडे पाहावे तर यांचे दिवस आणि वर्षं गोठून गेली आहेत. सगळयांची जर हीच परिस्थिती असेल, तर कोणी कोणाला हात धरून पुढे न्यायचे? यांना ’आतले’ आणि ’बाहेरचे’ जग हा संघर्ष नाही - कारण यांच्यासाठी दुसरे जगच अस्तित्त्वात नाही. यांना बाहेरचे’ जग दाखवायला हवे. परिस्थितीने यांच्याभोवती बांधलेल्या भिंती तोडायला हव्यात. निदान बाहेरचा वारा येईल इतकी तरी फट निर्माण करायला हवी. त्याने काही जुने बुरूज ढासळले, तर त्याची अपरिहार्यता समजून घ्यायला हवी.

मला कृत्रिम सीमारेषा माहिती होत्या. दिवसेंदिवस त्या पुसट होत जाऊन माझ्यासाठी जग ’एक’ होत आहे याचे मला अप्रूप वाटते. मात्र इकडे यांचे जग फक्त एक वाटावे इतके बंदिस्त आहे. यांच्यासाठी बाहेरचे, दुसरे जग ही गरज आहे. सामाजिक वास्तवाच्या या घट्ट भिंतीतून पलीकडे पोचण्यासाठी अथक प्रयत्न करणे, बाहेरच्या जगाला सामोरे जाणे – हा यांच्यासाठी एकाच वेळी वेदनेचा आणि सृजनाचा अनुभव असेल. पण तो त्यांना कधी घेता येईल का?

(टीप: हा अनुभव २००३– ०४ मधला. आशा आहे की आता तिथले चित्र बदलले असेल!)

पूर्वप्रसिद्धी: लोकसत्ता: २९ मे २००४

8 comments:

  1. कसली परिस्थिती!
    एकाच देशात राहतो आपण ह्यावर विश्वास बसत नाही कधीकधी!
    एकीकडे कॉमनवेल्थवर सर्वहस्तांनी वेल्थ उधळणं चाललंय आणि दुसरीकडे असा दिव्याखालचा अंधार दिसतो! :(

    ReplyDelete
  2. विद्याधर, कॉमनवेल्थचा संदर्भ आत्ता हा लेख इथे मांडताना माझ्या डोळयांसमोर नव्हता खरा.. पण खरचं. आपला देश म्हणजे प्रचंड विरोधाभास आहे सगळ्याच बाबतीत!

    ReplyDelete
  3. किती भयानक आहे हे.. आम्ही पूर्वी कसारा जवळच्या विहिगाव या गावात काम करायचो. तिथल्या लोकांचे असेच अनेक अनुभव ऐकले होते. त्याची आठवण आली... खरंय, सगळंच अजब आहे आपल्या देशात !!

    ReplyDelete
  4. हेरंब, वर्षानुवर्षे लोक तसेच जगत राहतात ..काही पुढे जातात आणि काही मागेच राहतात .. या व्यवस्थेबाबतच मला प्रश्न पडतात!

    ReplyDelete
  5. भोगजीच्या माजी सरपंचांनी मला ‘सांगितलं’ होतं की, इंदिरा गांधी या महात्मा गांधीच्या ‘मुलगी’ आहेत! सगळा इतिहास गेला चुलीत. हे आपल्या महाराष्ट्रात, मराठवाड्यातलं ८५ तलं चित्रं, तर २००४ मध्ये आनंदपुरमध्ये त्यापेक्षा मागे सगळं. १९८५ च्या बोगजीपेक्षा २००८ मधलं बर्‍यापैकी बदललेलं भोगजी पाहिअलं. या तुझ्या आनंदपुरमध्ये आत्ता कसं चित्र असेल, अशा कल्पनेत बराच वेळ छान गेला.

    ReplyDelete
  6. जाऊन पहायला पाहिजे तिकडे. बदलल असेल तेही बहुतेक!

    ReplyDelete
  7. Shikshan hech hya samasyecha uttar nahi ka? Mala athawtey lahanpani mi dnyan prabodhini chya tambu shibirat gele hote.. punya jawalchya khedya gavat.. tithe hi asha lajrya bujrya muli hotya.. pan tya shikat hotya.. tyancha jag aaj nakkich vistarlela asel..

    ReplyDelete
  8. बरोबर, शिक्षण ज्ञानाबरोबर नव्या आकांक्षा पण निर्माण करत हा आपलाही अनुभव आहेच!

    ReplyDelete