ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, October 21, 2010

४९. कॉमन सेन्स

कॉलेजमध्ये आमचा पाच सहा जणांचा ग्रुप बनला. एक तर सगळेच होस्टेलमध्ये राहणारे. पुणेकरांच्या खडूसपणाचा अनुभव हा आम्हाला जोडणारा धागा ठरला सुरूवातीला. रोज संध्याकाळी गप्पांसाठी आम्ही भेटू लागलो.

खरं तर आमची किती छान मैत्री! पण तरूण मुलं-मुली रोज एकमेकांना भेटताहेत हे पाहून दोन्ही वसतिगृहांचे अधिक्षक जरा जास्तच चौकस झाले, सतरा प्रश्न विचारायला लागले. त्याचा वैताग येऊन आम्ही मग कॉलेजच्या मैदानात तळ ठोकला. गप्पा मारायला आम्हाला असंख्य विषय होते. सगळे जण भरपूर वाचायचे. शिवाय पुण्यात व्याख्यानांची उणीव कधीच नव्हती. त्यातून आमच्या वादांना, चर्चांना खतपाणी मिळत राहिले.

बराच काळ असा चर्चेत गेल्यावर ’आता प्रत्यक्ष काहीतरी करायला हवे’ या निष्कर्षाप्रत आम्ही आलो. फार चिकित्सा न करताच समोरच्या कामगार वस्तीतल्या लहान मुलामुलींचा अभ्यास घ्यायला, त्यांच्याबरोबर खेळायला जाऊ लागलो.

संस्था - संघटना या गोष्टींशी आमचा कोणाचाही तोवर कधी संबंध आला नव्हता. पण काहीतरी काम सुरू झाले हे पाहून आणखी मित्र मैत्रिणी आमच्याबरोबर आले. आमच्या गटाची ओळख म्हणून आम्ही ’मंथन’ असे नाव घेतले. आता नियमित बैठकांसाठी एका जागेची गरज भासू लागली. शनिवारवाडा ही आमची लाडकी जागा होती, पण ती नेहमीच सोयीची नव्हती.

अशा वेळी अगदी देवाने पाठवल्यासारख्या कमलमावशी आम्हाला भेटल्या. त्या चंदुच्या आईची मैत्रीण. ब-याचदा आम्हाला सर्वांना (म्हणजे चंदुला मुलींबरोबर!!) पाहून त्यांनी चंदुला हटकले होते. पण वस्तुस्थिती कळल्यावर त्यांनी त्यांच्या घरातली एक खोली आमच्या बैठका, आमचे कागद, मुलांच्या शिबिरांसाठी खरेदी केलेले सामान.. वगैरे गोष्टींसाठी दिली. आस्थेने त्या प्रत्येक वेळी आमच्यासाठी चहाही करायच्या. बघताबघता त्या ’मंथन’चा एक भाग होऊन गेल्या.

कमलमावशी नुसत्या गप्पा मारायच्या तोवर ठीक होते. पण त्या कामात मदत करायला लागल्यावर मात्र आम्हाला त्यांचा त्रास व्हायला लागला. त्यांचे अक्षर अगदीच वाईट होते. साधी नावांची यादी करायला सांगितली तर त्यात शुद्धलेखनाच्या शंभर चुका करायच्या. कागदाला समास सोडायचा असतो हे त्यांच्या गावीही नव्हते. कागद फाईल करायला सांगितले, तर पुढे मागे, वेडावाकडा पंच करायच्या कागद! पत्रांवर तिकिटे चिकटवण्याचे काम असले की तिकिटांना इतका डिंक लावून ठेवायच्या की, तिकिटेच काय, पत्रेही एकमेकांना बिलगून बसायची!

कमलमावशींच्या ’मदतीने’ आम्ही हैराण होऊन गेलो. त्यांना आम्ही काही बोलूही शकत नव्हतो. एक तर त्या वयाने मोठया, त्यांच्याच घरात आम्ही बसलेलो आणि त्या सगळं करायच्याही आपुलकीने! ’मला मेलीला काही येत नाही’ असं त्यांनी ओशाळून म्हटलं, की आम्हीच कानकोंडे व्हायचो.

पण आम्हाला त्यांचा मनातून रागही यायचा. जेमेतेम विशीत होतो आम्ही सगळे, त्यामुळे असेल पण आमच्याकडे सहनशीलता कमी होती दुस-यांच्या चुकांकडे पाहण्याची. जे आम्हाला चांगले करता येते, तेच फक्त जगात गरजेचे आहे अशी आमची त्यावेळी धारणा होती. ’कॉमन सेन्स’ कसा शिकवायचा कमलमावशींना - अशी चर्चा आम्ही आपापसांत संधी मिळेल तेव्हा करत असू.

एक दिवस बैठक चालू असताना कधी नव्हे ती उत्साहाने मी चहा करायला उठले. चहाला उकळी फुटायच्या आतच गॅस संपला. “मावशी, गॅस संपला", मी आतून ओरडले. कमलमावशी बहुधा काहीतरी कामात होत्या. “दुसरा सिलिंडर आहे कोप-यात, तो लाव", त्यांनी मला बाहेरूनच सूचना केली आणि त्या त्यांचे काम करत राहिल्या.

मी कोप-यातला दुसरा सिलिंडर ओढून आणला कसाबसा. पण तो उघडायचा कसा आणि जोडायचा कसा हे मला कळेना. मी इकडून तिकडून जोर लावत घामेघूम झाले, पण मला काही जमेना. खालून, वरून, चहू बाजूंनी न्याहाळूनही मला काही युक्ती सुचेना. माझ्या घरात गॅस नव्हता, त्यामुळॆ तोवर मी कधीच सिलिंडर शेगडीला जोडलेला नव्हता.

मला जसजसा वेळ झाला तसतशी बाहेर ’बाईसाहेब दार्जिलिंगला गेलेल्या दिसताहेत चहा पत्तीच्या खरेदीसाठी’ अशी थटटा सुरू झाली होती. ती ऐकून कमलमावशी हातातले काम टाकून आत आल्या. माझ्या हताश चेह-याकडे पाहून म्हणाल्या, “मला हाक नाही का द्यायचीस पुन्हा एकदा? एवढं काही वाईट वाटून घेऊ नकोस. एखादी गोष्ट कधी केली नसेल, तर पहिल्यांदा जमायला वेळ लागतोच!”

जगताना प्रत्येकाच्या कौशल्याचे क्षेत्र वेगळे असते आणि त्यामागे उपजत गुणांपेक्षाही परिस्थिती अनेकदा कारणीभूत असते हा ’कॉमन सेन्स’ मी त्यादिवशी नकळत शिकून गेले. श्रेष्ठत्त्व – कनिष्ठत्त्वाचे सरसकट निकष असू शकत नाहीत, असू नयेत या माझ्या मतावर कमलमावशी मात्र आजही खळखळून हसतात आणि मीही नकळत त्यात सामील होते.

8 comments:

  1. कधीकधी एखाद्या छोट्याशा प्रसंगातून एकदमच अंतर्मुख व्हायला होतं.. आयुष्यभरासाठी काहीकाही गोष्टींकडे बघण्याचे दृष्टिकोन बदलून जातात!

    ReplyDelete
  2. छोटे छोटे प्रसंग आपल्याला बरंच काही शिकवून जातात ते असं...

    कॉमन सेन्स म्हटलं की मला एक इनोदी (?) वाक्य नेहमी आठवतं
    "कॉमन सेन्स इज नॉट कॉमन" :)

    ReplyDelete
  3. I wish i can learn Marathi also.

    ReplyDelete
  4. हेरम्ब, विद्याधर.. आभार. काय लिहायच ते कळत नाही .. एवढच लिहिते!!
    Sangamnath, welcome to AbdaShabda.
    Zeal.. yes, I too wish many learn many languages.

    ReplyDelete
  5. >>>जगताना प्रत्येकाच्या कौशल्याचे क्षेत्र वेगळे असते आणि त्यामागे उपजत गुणांपेक्षाही परिस्थिती अनेकदा कारणीभूत असते.

    अगदी १००% सहमत....ह कॉमन सेन्स मी पण अनुभवातुनच शिकलो..

    ReplyDelete
  6. कॉमन सेन्स बहुधा असा अनुभवातून येतो!

    ReplyDelete