ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Wednesday, December 29, 2010

५७. यक्ष प्रश्न

१. ...
गर्द जंगलात
निरुद्देश भटकताना
पाणी दिसले,
तेव्हा त्याच्या काठाशी
नकळत विसावले मी.

पापणीच्या
आतल्या पाण्याला
अचानक
बाहेरच्या पाण्याची ओढ.
मी ओंजळ पुढे करताच
कोठूनसा धारदार आवाज आला:
माझ्या प्रश्नाचे
उत्तर दिल्याविना
पाण्याला स्पर्श करू नकोस.
अन्यथा प्राण गमवावे लागतील.

२. ...
महाभारतातील
कूट प्रश्न विचारणाऱ्या
यक्षाची कथा
वाचली होती मी फार पूर्वी,
बहुधा त्याचाच वंशज असणार हा!

पण आता
अशा या सैलावलेल्या क्षणी
कोण माथेफोड करणार?
आणि ते करून
ना काही सिद्ध करायचे होते,
ना काही साधायचे होते.

प्राण, जीवन क्षणभंगूर आहे हे खरे,
पण तो उगाच
दुसरे कोणी म्हणते म्हणून
विनाकारण
उधळून देणेही
शहाणपणाचे नाही.

म्हणून मग
यक्षबुवा,
तुमच्या विद्वत्तेला प्रणाम
म्हणत मी
दोन पावले मागे फिरले.

पाण्याचे एक बरे असते.
ते नेहमीच जवळ भासते.
आणि भिजणे, डुंबणे, ओलावणे
या साऱ्या क्रिया
तसे पाहिले तर
मनाच्या पातळीवरच
घडत असतात;
शरीर एक
साधन मात्रच असते अनेकदा.

शिवाय
समोर आलेली
सगळीच आव्हाने
हाती घ्यायची गरज नसते.
काहींना वळसा घालून
तर काहींना
तात्पुरते शरण जाऊन
काम भागते.
दूरचे ध्येय गाठायचे तर
उर्जा, शक्ती, संघर्षाची प्रेरणा
सारे काही टिकवून ठेवावे लागते.
मुख्य म्हणजे
आव्हान घ्यायचे की नाही
हे आपण स्वत: ठरवायचे असते
निर्णयाचा अधिकार
साक्षेपाने वापरून!

३. ...
मी मागे फिरल्यावर
का कोणास ठावूक
यक्ष जरासा लटपटला.

आवाजातील
अधिकार, गुर्मी
कमी करत तो म्हणाला,
“येथे जवळ दुसरे पाणी नाही,
आहे ते हेच, इतकेच,
तृष्णा शमवणारे.
त्यामुळे माझ्या प्रश्नाकडे
दुर्लक्ष करण्याचा पर्याय
खरे तर तुला नाही.”

त्यावर गप्प राहत
मी स्वत:शीच हसले.
संदर्भ बदलला तरी
“पर्याय नसण्याचा” मुद्दा
पुन्हा समोर येतोच तर!

दोन क्षण वाट पाहून
यक्ष पुढे म्हणाला,
“किती वेळ विचार करणार आहेस?
कधी ना कधी
जे अटळपणे करणे भाग आहे,
ते लगेच का करत नाहीस?”

हा यक्ष
बऱ्यापैकी गप्पिष्ट होता तर!
बोलावे का याच्याशी मनातले?
मी जराशी घुटमळले.

घायकुतीला येत
यक्ष म्हणाला,
“हे आजवर असे कोणी केले नाही.
मी प्रश्न विचारायचे
आणि माणसांनी उत्तरे देत
जगण्याचे वा मृत्यूचे
मार्ग स्वीकारायाचे
अशीच हजारो वर्षांची
इथली परंपरा आहे;
त्याला सुरुंग लावण्याचा
तुला अधिकार नाही.”

हेही जुनेच.
परंपरा, अधिकार वगैरे.

४. ...
खरे तर
एवढे ऐकल्यावर
तेथे थांबायचे
काही कारण नव्हते.
पण त्या यक्षाबद्दल
माझे कुतुहल जागृत झाले.

महाभारताचा दाखला
ध्यानात घेतला तर
उणीपुरी पाच हजार वर्षे
(इतिहास पंडीतांनो
चूकभूल माफ करावी
काळाला गणना नसते तसे पाहायला गेले तर!)
हा बेटा
प्रश्न विचारत येथे
अदृष्यपणे का होईना
पण उभा आहे –
हा किंवा याचे बापजादे!

इतक्या साऱ्या वर्षांत
याने प्रश्न तरी
काय विचारले असतील?
दहावी – बारावीच्या
बोर्डाच्या परीक्षेसारखे
हा तेच तेच प्रश्न
आलटून पालटून विचारतो?
की प्रत्येकाला नवा प्रश्न विचारतो?

समोरच्या व्यक्तीचा
संदर्भ लक्षात घेऊन
हा प्रश्न विचारतो?
की लोंटरी पद्धतीने?
एकदम चार पाचांचा गट आला
तर प्रत्येकाने उत्तर द्यायचे?
की प्रतिनिधीचे उत्तर चालते याला
आपल्या लोकाशाहीसारखे?
प्रश्न गटाला असतो? की व्यक्तीला?

उत्तर बरोबर असले तर जीवन,
चुकले तर मरण.
म्हणजे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर
याला आधीच माहिती आहे.
मग तरीही
हा इतके सारे प्रश्न का विचारतो?

मी म्हटले,
“पण यक्षदादा,
तुम्ही प्रश्न का विचारता?
हे प्रश्न तुम्हाला खरोखर पडतात?
की कोणी तुम्हाला
प्रश्न विचारण्याचेच
काम लावून दिले आहे?”

स्वत:च्या भावना
काबूत ठेवत तो म्हणाला,
“लक्षात घे,
प्रश्न मी विचारायचे,
तू नाही.”

५. ..
मी आणखी दोन पावले
मागे सरकले.

तेव्हा माझी मनधरणी करत
यक्ष म्हणाला,
“घाबरू नकोस.
सोपा प्रश्न विचारेन मी अगदी.
वाटले तर
पर्याय पण मीच देईन,
त्यातला तू एक निवड.
पण थांब जराशी.
माझ्याकडे पाठ फिरवून
न बोलताच
अशी जाऊ नकोस.”

आता मला जरासा
राग येऊ लागला होता –
ही काय सक्ती?
प्रश्नाचे उत्तर देऊन
हाती काय –
तर जगणे किंवा मरणे.
ते तर तसेही आहेच.
जगणेही अपरिहार्य;
मरणेही अटळ.

शिवाय या क्षणी
जगण्याचा सोस नाही,
मरणाची आस नाही,
तहान नाही,
तृप्त आहे मी –
मग या यक्षाची
ही दादागिरी का?

नकळत
मीही हटटास पेटले.
आता परत फिरायचे नाही
आणि या यक्षाला शरणही जायचे नाही.

माझा अंदाज घेत यक्ष म्हणाला,
“बस जरा निवांत.
दमली असशील प्रवासाने.
प्रश्न काय,
आणखी थोड्यावेळाने विचारला तरी चालेल.”

मग एक
हलका निश्वास टाकत म्हणाला,
“हल्ली इकडे कोणी फिरकत नाही फारसे.
जे येतात ते
काही बोलण्यापूर्वीच
प्राण त्यागतात.

एकटेपणामुळे
आणि
वय झाल्यामुळे
मी जरासा चिडचिडा झालो आहे.
मी तुझ्याशी
आधीच नीट बोलायला हवे होते.
मला माफ कर.”

प्रश्नांतून सुटका नसणाऱ्या
त्या यक्षाची
दया आली मला.
माफी मागून
माझ्या संवेदनशीलतेला
थोडे हलवले होते त्याने.

६. ...
जमिनीवर
ऐसपैस बैठक मारत मी म्हटले,
“यक्ष आजोबा,
मलाही पूर्वी हा शाप होता.
समोर जे कोणी येईल
त्याला मी पण प्रश्न विचारायचे,
खूप प्रश्न विचारायचे,
सतत विचारायचे.”

“मग आता?”
यक्ष जिज्ञासेने म्हणाला.

मन उलगडत मी सांगितले,
“दुसऱ्यांनी दिलेली उत्तरे
पुरत नाहीत,
कितीही प्रगल्भ असली तरी –
आपली वाट आपल्यालाच
निर्माण करावी लागते नव्याने
हे समजले आहे मला.
तेव्हापासून जणू
प्रश्न विचारण्याची गरज संपली आहे
जरी प्रश्न आहेत खूप तरीही ...”

माझे बोलणे तोडत
खूष होऊन
स्वत:शी हसत म्हणाला,
“माझ्या प्रश्नाचे बरोबर उत्तर दिल्याबद्दल
(हाच त्याचा प्रश्न होता हे मला कळले नाही;
हुषार आहे बेटा!)
जगण्यासोबत आणखी एक
वरदान देतो मी तुला.
शेवटच्या श्वासापर्यंत
तुला प्रश्न पडत राहावेत
यासाठी माझा एक अंश
तुझ्यात रुजवून देत आहे मी.”

‘आता कशाला आणखी प्रश्न?
पुरेसे आहेत माझ्याजवळ
या जगण्यासाठी..’
माझ्या चेहऱ्यावरचे भाव वाचत
हळव्या मायेने यक्ष म्हणाला,
“तुझी वाट तुलाच शोधावी लागेल,
पण इतरांनाही प्रश्न विचार.
कारण
एका प्रश्नाचे एकच उत्तर
अन तेही अचूक
असे कधीच नसते.
दुसऱ्यांचीही उत्तरे समजून घेशील
गर्भगृहासह
तर अंतर्ज्योत उजळेल.”

आणि यक्ष अंतर्धान पावला
त्या पाण्यासह.

७. ...
तसे निरर्थक, निरुद्देश
असे आयुष्यात
काहीच असत नाही.
प्रवास थांबण्यानेही
नवे काही हाती लागते
हा देखील रंजकच अनुभव!

यक्षप्रश्नांचे
एक गुंतागुंतीचे चक्र असते
सत्याच्या एका स्तरावरून
उच्चतर सत्याकडे नेणारे –
वाटचालीस साहाय्य करणारे.

रितेपणाच्या
एका अमर्याद टप्प्यानंतर
माझ्यातच रुजलेले
ते घनदाट अरण्य,
ते निळे – सावळे पाणी
ते यक्षप्रश्न
सापडले आहेत मला
आता
पुन्हा एकदा!

18 comments:

  1. >>सगळीच आव्हाने
    हाती घ्यायची गरज नसते.
    काहींना वळसा घालून
    तर काहींना
    तात्पुरते शरण जाऊन
    काम भागते.


    हे आवडल अन पटलही....मस्त लिहल आहे.

    ReplyDelete
  2. छान झालीये कविता.. यावर एक कथा लिहिता येईल?

    ReplyDelete
  3. योगेशजी, हे सगळ शहाणपण आयुष्यात जरा उशीरा सुचत एवढीच अडचण आहे :-)

    हेरंब, कल्पना चांगली आहे.. काही सुचल तर तुम्हाला कळवते :-)

    ReplyDelete
  4. this is brilliant!!!!!
    this is what life teaches

    loved this
    जगणेही अपरिहार्य;
    मरणेही अटळ.

    so like Yudhisthir said
    I act because I must!

    ReplyDelete
  5. दीपकभाई, आभार. सगळे तत्त्ववेत्ते असच म्हणतात .. पण ते जगण खरच अवघड आहे!

    ReplyDelete
  6. @ aativas
    पाणी! पाणी!! पाणी!!! पाणी हाच "यक्षप्रश्न" उरलाय! आता कधीही न संपणारी प्रश्नांची मालिकाच माझ्यापुढे उभी आहे; अन रात्र थोडी सोंगें फार अशी अवस्था झाली... अभिनंदन!

    ReplyDelete
  7. रेमीजी, स्वागत आहे तुमच!
    यक्षप्रश्न कधी संपत नाहीत ...
    ही त्यातली अपरिहार्यता आहे की गंमत हे आपल्यावर अवलंबून असत हे भान येण महत्त्वाच आयुष्यात! मग आपल्या उरल्यासुरल्या रात्रीपुरत प्राधान्याने कोणत्या सोंगांना सामोर जायचं हे आपल्याला ठरवता येत!

    ReplyDelete
  8. Reading comments on your posts and your responses on those is as good as reading your new post!

    ReplyDelete
  9. "पाणी" हाच "यक्षप्रश्न" : अर्वाचीन उच्चभ्रू नागरतेने (civilized society) म्हणजेच आम्ही निर्माण केलेला आहे. मानवाच्या सर्व प्रश्नांना उत्तरे आहेत. पण त्यांच्याकडे आमची हवस (wants) कानाडोळा करायला लावते.
    भरत राजाने स्वर्ग लोकातून गंगा पाताळ लोकात नेली, त्याच्या पितरांचे पुनरुत्थान करण्यासाठी. अशी आख्यायिका आहे. त्याचे वंशवादी वंशजांनी जिवंत किसानाना जीव नकोसा करून सोडला आहे. गंगेची आता गटारगंगा झाली. पाण्याचे अनिवार दुर्भिक्ष्य नागरी व अनागरी जगात, दोहोंकडे, जाणवते. या वस्तुस्थितीची जाणीव जर कला करून देत नसली तर ती काय उपयोगाची?
    माझ्यापुरते, "पाणी" हे माझ्या लेखनापेक्षा शतपटीने महत्वाचे आहे. सर्व जगातील तथाकथित सुधारणांपेक्षा महत्वाचे आहे. नाहीतर ती गोष्ट रोम जळत असताना फिडल वाजवत बसलेल्या निरो राजासारखी होईल?

    ReplyDelete
  10. "पाणी" या विषयाबाबतच्या तुमच्या काळजीशी (concern) मी १००% सहमत आहे. आपण कशा अक्राळविक्राळ समस्या निर्माण करतो, त्याच हे एक उदाहरण आहे.

    ReplyDelete
  11. अनामिक, तुमच्या प्रतिसादाबद्दल आभार.

    ReplyDelete
  12. >>दुसऱ्यांनी दिलेली उत्तरे
    पुरत नाहीत,
    कितीही प्रगल्भ असली तरी –
    आपली वाट आपल्यालाच
    निर्माण करावी लागते नव्याने

    फार विचित्र पद्धतीने दर वेळी हेच सत्य समजतं! :-s

    ReplyDelete
  13. दोनदा नव्हे,
    तीनदा वाचली
    पण तृप्तता जाणवत नाही
    कशी किमयागार रचना हो तुमची
    अंतरी असणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरे
    गवसून देखील,
    इच्छित सांगड बसत नाही.

    ReplyDelete
  14. विद्याधर, सत्य बरेचदा विचित्र पद्धतीनेच समजत असा माझाही अनुभव!
    विशालजी, तुम्हाला तुमची उत्तर गवसावीत इतकी शुभेच्छा जरूर आहे ... प्रवास आपला आपल्याला करावा लागतो, त्याला पर्याय नाही!

    ReplyDelete
  15. खूपच छान कविता ....!!!यक्षप्रश्नांची उत्तरे देणारी !! आणि सत्य सांगणारी... आवडली ...!

    ReplyDelete
  16. धन्यवाद मीरा आणि स्वागत आहे 'अब्द शब्द'वर.

    ReplyDelete
  17. 'मिसळपाव' वरील प्रतिसाद - http://www.misalpav.com/node/33755

    ReplyDelete
  18. 'मायबोली' वरील प्रतिसाद - http://www.maayboli.com/node/56461

    ReplyDelete