ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, December 20, 2010

५६. पाच रुपयांची भिंत

गटाची मीटिंग संपली. आम्ही सगळ्याजणी ग्रामपंचायतीच्या कार्यालयातून बाहेर पडलो. 'स्वयं-सहाय्यता गट' असं अधिकृत भारदस्त नाव असलं, तरी बायांसाठी मात्र हा 'गट'च - फार फार तर 'बचत गट'.

राहीबाई हळूच माझ्याजवळ आली. माझ्या खांद्यावर तिने अलगद तिचा हात ठेवला. मी तिच्याकडे पाहून हसले.
"काय राहीबाई, आज शेळ्यांना चरायला सुट्टी द्यायचा विचार आहे काय?" मी सहज विचारलं.
राहीबाई आज खुषीत दिसत होती. तिचे डोळे चमकत होते. रापलेल्या चेहऱ्यावर सुरकुत्यांच्या साथीला आज हसू होतं!

"तुझा हात पुढे कर", राहीबाईने मला हुकूम सोडला.
"डावा नाही, ताई, नेहमी उजवा हात पुढे करावा" राहीबाईची प्रतिक्रिया.
मी डावखुरी नाही पण अनेक गोष्टी मी डाव्या हाताने करते. आत्ताही अभावितपणे माझा डावा हात पुढे आला होता. आता यावर राहीबाईशी वाद घालण्यात फारसा मुद्दा नव्हता. राहीबाईच्या आज्ञेनुसार मी उजवा हात पुढे केला.

माझा उजवा हात  राहीबाईने तिच्या डाव्या हाताने पकडला. त्यावर स्वत:ची उजवी मूठ ठेवली. ती कोणाला दिसू नये अशा रीतीने तिने माझ्या तळहातावर उघडली. माझ्या हातात कागदाचा एक तुकडा पडल्याचं मला जाणवलं. राहीबाईने मग त्या हाताने माझी उजवी मूठ बंद केली.

भोवतालच्या सगळ्या बाया आणि डझनभर   पोरसोरं मजेत हसायला लागली.
मला काही समजेना. काय रहस्य होतं?

"काय आहे राहीबाई हे?" मी झाकलेली मूठ तशीच ठेवत विचारलं.
"उघडून बघ की ताई आता," रखमाने दिलेल्या सल्ल्यावर सगळे परत जोरजोरात हसले. रस्त्यावरून जाता जाता गंमत बघणारे दोन चार पुरुष पण त्यात सामील झाले.
बऱ्याचदा मी साध्या गोष्टी उगीच गुंतागुंतीच्या करते हे जाणवून मला पण हसायला आलं.

उजवी मूठ मी उघडली. त्यात दहा घड्या पडलेली, मळकट, फाटकी अशी पाच रुपयांची एक नोट होती.
"हे काय राहीबाई? हे कसले पैसे? गटाचा हिशोब तर झाला नाही का नुकताच?" मी आश्चर्यचकित होऊन, काहीसं भांबावून जात राहीबाईकडं पाहिलं.
"ताई, गटाचा हिशोब संपला मघाच. हे पैसे तुझ्यासाठी आहेत." सांगताना राहीबाईच्या नजरेत कसली तरी शंका होती, कसलं तरी दु:ख होतं.
"मला? मला कशाला पैसे राहीबाई?" माझा गोंधळ वाढला होता.
"तू चहा पी त्या पाच रुपयांचा", हे म्हणताना राहीबाईने माझी नजर चुकवली.

तोवर इतर बायांनी गलका सुरु केला होता. "ताई, नाही म्हणू नकोस तिला. बिचारीने मोठ्या कष्टाने जमवले आहेत ते पैसे," रखमा कधी नाही ते आर्जवाने म्हणाली.
"मागच्याच वेळी देणार होती ती, पण तुला घाबरत होती बिचारी," कुसुम म्हणाली.
"अग पण राहीबाई, चहा प्यायला मी तुझ्या घरी येते की, पैसे कशाला?" म्हणत मी ती नोट राहीबाईला परत द्यायचा प्रयत्न केला.

"तू कशी येशील माझ्या घरी?" राहीबाईचा स्वर हळवा झाला होता.
मला काहीच समजेना.

सोलापूर जिल्ह्यातलं ते एक  छोटं गाव. तालुक्याच्या ठिकाणाहून दिवसातून चार वेळा बस या गावात यायची. मागच्या दीड वर्षापासून मी या गावात येत होते. पहिले तीन चार महिने पहिल्या 'गटा'ची स्थापना करण्यात गेले. गट म्हणजे काय, बचतीचं महत्त्व, एकत्र बचत करण्याचे फायदे .. अशा अनेक चर्चांमधून पहिला गट तयार झाला होता. पहिल्या गटातल्या वीसही बाया उत्साही होत्या. सगळ्या वेळेत बचत करत होत्या, अडीअडचणीला घेतलेले कर्ज वेळेत परत देत होत्या. त्यांना होणारा फायदा पाहून आणखी दोन गट तयार झाले.

राहीबाई पहिल्या गटाची सभासद होती. पन्नाशीच्या आसपास तिचं वय असेल. नवरा दहा वर्षांपूर्वी गेला होता. एक मुलगा होता पण तो आईची विचारपूस करत नव्हता. जमीन नाही, उत्पन्नाचं दुसरं साधन नाही. राहीबाई आणि तिच्या दोन चार शेळ्या एका खोपटात रहात. राहीबाई स्वभावाने सौम्य होती. इतर बायांना वेळप्रसंगी शेतातल्या आणि घरातल्या कामात मदत करत असे. बायाही तिची कदर करत. सणासुदीला पक्क्वान्नाचे ताट राहीबाईला वाढून दिले जाई, लग्नप्रसंगी आठवणीने तिला लुगडे चोळी दिली जाई.

या गावात मी संध्याकाळच्या शेवटच्या बसने - इथल्या भाषेत मुक्कामाच्या बसने - येत असे. जेवण गटातल्या वेगवेगळ्या बायांकडे असायचं. पण मी  रहायचं ते अनिताबाईच्या घरी -अस त्या सर्वानी ठरवलं  होतं. इतर घरांत दारुडा नवरा होता , घरात जनावरं होती, लेकरं फार लहान होती, आजारी - म्हातारं माणूस होतं ....म्हणून कदाचित मी अनिताबाईच्या घरी त्यांना जास्त सोयीची होते. अनिताबाईचा नवरा माळकरी होता, शाळेत जाणारी मोठी मुलं होती, दोन पक्क्या खोल्या होत्या, घरात  गॅस होता, मुख्य म्हणजे संडास आणि बाथरुमची सोय होती. मी फार खोलात न जाता ही व्यवस्था मान्य केली होती. मात्र जेवायला मी सगळ्यांकडे जात होते.

मात्र या दीड वर्षात मी एकदाही राहीबाईच्या घरी गेले नव्हते. एक तर तिच्या घरी दुसरं कोणी  नव्हतं - त्यामुळे कोणाला भेटायला जाण्याचा प्रश्न नव्हता. दुसरं म्हणजे मीटिंग संपली की राहीबाई तिच्या शेळ्या चारायला घेऊन जायची - ती थेट दिवस मावळल्यावर परत यायची. राहीबाईची परिस्थिती मला माहित असल्याने मीही तिच्याकडं जायचा विषय कधी काढला नव्हता.

आणि हीच राहीबाई आता मला 'चहासाठी' मोठ्या कष्टाने जमा केलेले पाच रुपये देत होती.
"न यायला काय झालं तुझ्या घरी? चल, आत्ता येते. साखरेची चिंता करू नकोस. मला गुळाचा चहा आवडतो," मी हसत हसत राहीबाईला म्हटलं.
पण राहीबाईचा चेहरा चिंताग्रस्तच होता.
"हं! आणि मला कोरा चहा आवडतो. हल्ली शहरात कोराच चहा पितात," मी आश्वासक स्वरात बोलतच होते.
राहीबाईची मान खाली होती.

एरवी टणाटण बोलणारी रखमा पण गप्प होती.
कुसुम, शारदा, मंगल, शेवंता .... सगळ्या गप्प होत्या.
पोरंही शांत होती.
जो तो माझ्याकडे कुतुहलाने पहात होता.
वातावरणात तणाव होता.

"ताई, घेऊन टाका पैसे. राहीबाई   प्रेमानं देतेय, तिचा मान राखा," न राहवून ग्रामसेवक बोलले.
सगळ्यांचे चेहरे उजळले.
गावातल्या त्या छोट्याशा रस्त्यात आता दोन बैलगाड्या, चार सायकली, दोन कुत्री, असंख्य माणसं जमा झाली होती.
माझ्या उजव्या तळहातात अजूनही ती पाच रुपयांची नोट होती.

"ताई, उगीच हटून बसू नको, घे ते पैसे," रखमाने आज्ञा केली.
मी नकार दिला.
मला हा सगळा प्रकारच काही समजत नव्हता.
चहापाण्यासाठी मी पैसे घेईन असं या लोकांना का वाटलं असेल?

"चल राहीबाई, आज तुझ्याकडेच चहा पिणार मी", मीही आता हट्टाला पेटले होते.
"ताई, तुम्ही कशा जाल राहीबाईच्या घरी चहा प्यायला?" आता सरपंचही आले होते.
"का? काय झालं? मला तर काही अडचण नाही," मी मोठ्या आवाजात बोलले.
पुन्हा एकदा भीषण शांतता पसरली.

सरपंच, ग्रामसेवक, रखमाबाई, कुसुम, शारदा यांची आपापसात नजरानजर झाली.
राहीबाईचा चेहरा विदीर्ण झाला होता.

"अहो ताई, मांग जातीची आहे राहीबाई, तुम्ही कसं तिच्या घरचं अन्नपाणी घ्याल?" एका शिक्षकाने कोंडी फोडली.

जमलेल्या सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकलेला मला जाणवला.
त्यांनी 'सत्य' सांगितल्यावर मला काही पर्याय राहणार नाही, माझा सगळा युक्तिवाद संपेल याची त्यांना पुरेपूर खात्री होती.

मी उजव्या तळहातावरच्या त्या जीर्ण नोटेकडं पाहिलं.
तो केवळ एक निर्जीव कागद नव्हता.
त्या पाच रुपयांच्या नोटेमाग एक मोठा इतिहास दडलेला होता.

विषमतेचा इतिहास.

अन्यायाचा इतिहास.

शोषणाचा इतिहास.

दांभिकतेचा इतिहास.

"ईशावास्यमिदम सर्वम्" तत्त्वज्ञानाशी प्रतारणेचा इतिहास.

किती वेदना, किती अश्रू, किती दु:ख, किती अपमान, किती असहाय्यता, किती विद्वेष .. त्या एका क्षणात मला ते सगळ दिसलं!

ती पाच रुपयांची नोट ही आमच्या परंपरेनं निर्माण केलेली एक भिंत होती. अवाढव्य. बोजड. भक्कम.

मी हसले. राहीबाईच्या खांद्यावर हात ठेवत मी म्हटलं, "ठीक आहे, घेते मी हे पैसे,"
माझ वाक्य पूर्ण व्हायच्या आत सगळे परत हसायला लागले.
"पण एका अटीवर," मी  म्हटलं .. परत सगळे चिंतीत झाले.

"राहीबाई, आज मी तुमच्या घरचा चहा प्यायल्याशिवाय गावातून जाणार नाही तुमच्या," माझ्या या बोलण्यावर राहीबाई हसली. पण तिच्या डोळ्यांत पाणी तरारलं होतं!
रखमा म्हणाली, 'चला, ताईबरोबर आपण सगळ्याच जाऊ राहीकडे चहा प्यायला."
शारदा दूध आणायला गेली. कुसुम कप आणायला पळाली. वीस जणी चहा प्यायच्या तर सगळ्यांचीच मदत लागणार!

त्यादिवशी राहीबाईच्या खोपटात आम्ही मावत नव्हतो.
राहीबाईच्या चेहऱ्यावर हसू ओसंडून वाहत होतं.
तसा चहा आजवर परत मला कधी मिळाला नाही!

21 comments:

  1. मनाला भिडली पोस्ट..
    अजूनही गावागावात अश्या प्रथा चालू आहेत ह्याच वाईट वाटत

    ReplyDelete
  2. खरच हृदयाला भिडली! वर्णव्यवस्थेचा चुकीचा अर्थ लोकांनी केला.वाल्मिकी रामायणात उल्लेख आहे की सर्व वर्णाचे लोक दशरथांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमंत्रित असायचे! अस्पृश्यता हे अलीकडे निर्माण झालेले खुल आहे.

    ReplyDelete
  3. loved this! am so happy that you could alone make such a big difference!

    ReplyDelete
  4. लीनाजी, हो, अजून असे खूप समज आणि प्रथा आहेत .. मला नेहमी वाटत की शिक्षणाची आणि जग पाहण्याची संधी मिळालेल्या तुमच्या माझ्यासारख्या माणसांवर फार मोठी जबाबदारी आहे योग्य तो विचार पुढे नेण्याची!

    मोहिनीजी, आभार आणि स्वागत. वर्णव्यवस्था हा खूप मोठा विषय आहे .. पूर्वी काहीही असेल, आज कस जगायचं ते आपण नक्कीच ठरवू शकतो.

    अनु, :-)

    दीपकजी, बदल घडवायला बळ लागत, या मानसिकतेतून आपण बाहेर पडलो, की खूप बदल होतात!

    ReplyDelete
  5. मी कृषी पदवीधर आहे..त्यामुळे सहा महिने गावात राहिले होते .
    तिथे जेव्हा आम्ही सरपंचांना म्हणालो कि ह्या अमुक घरात जाणार आहोत सरळ जाऊ नका म्हणाले
    पण आम्ही तरीही गेलो.. जस तुम्ही म्हणालात न, ओसांडून वाहणार हसू त्यावेळी पाहायला मिळाल..
    आणि हे हि जाणवलं कि एकीकडे देश खूप प्रगती करतो आहे न दुसरीकडे अशी 'अवस्था' आहे.. आणि तुम्ही म्हणालात तस आपण थोडंफार का होईना बदल घडवू शकतो ..अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा...

    (लिना म्हणा फक्त.)

    ReplyDelete
  6. आजही गावागावातच नाही तर शहरातही काही वेळा असे प्रसंग घडतात.

    बदल घडवायला बळ लागत, या मानसिकतेतून आपण बाहेर पडलो, की खूप बदल होतात! संपूर्णपणे सहमत. नेमकी हीच दोरी धरून लोकं धोपटत बसतात. :(

    कथन मनाला भिडले.

    ReplyDelete
  7. खरंच विदीर्ण झालो वाचून... पण तुमचा शेवटचा ठाम निर्णय आवडला... तिथल्या अनेकांना न बोलता बरंच काही शिकवून गेलात !!

    ReplyDelete
  8. पोस्टमधला आवडलेला मुद्दा म्हणजे शेवटचा निर्णय आणि राहीबाईंच्या चेहेऱ्यावरचे समाधान....

    बाकि समाजातली विषमता वगैरे कितीही काथ्याकूट केले तरी न संपणारे विषय... तुमचा निर्णय पाहून वाटतेय आपल्यापुरता तरी हा बदल केला की काही जणांना तरी त्यातून बोध मिळु शकतो!!!

    ReplyDelete
  9. लीना, :-) मलाही आवडेल तुमचे अनुभव वाचायला. तुम्ही पण लिहा .. असा सल्ला देण नेहमीच सोप असत म्हणा!!

    भानस, हो शहरातही हे घडते. फार वादात न पड़ता आपल्यापुरती आपण वाट शोधण योग्य आहे अशा निष्कर्षापर्यंत आलेय मी आता!

    हेरंब , प्रत्येक प्रसंगात आक्रमक व्हायची गरज नसते हे मी आता शिकले आहे.. आणि लोक आपल्याला तपासून पण पहात असतात.

    सहजच, आपल्यापुरता बदल आपल्या वैचारिक निष्ठेनुसार आपण करत राहावा.. आपल्याला अनेक गोष्टींचा बोध होत जातो मग!

    ReplyDelete
  10. आजच्या युगात ही हे घडते आहे हे आपल दुर्दैव....बाकी चांगली अट घातलीत तुम्ही...

    ReplyDelete
  11. ह! देवेन, आपला देश म्हणजे एक प्रचंड विरोधाभास आहे.. खूपच गुंतागुंत आहे इथे!!

    ReplyDelete
  12. मलाही असे अनुभव आहेत, लातूर जिल्ह्यातल्या एका छोट्या गावातली तारका मला खूप आठवते, नवबौद्ध मात्र जातीभेद तसेच, गावात मीटिंग देवळात मग तारकेसारख्या अनेकजणी कशा येणार? यावर मीही लिहीनच कधीतरी. मन विषण्ण होतं हे तर खरंच

    ReplyDelete
  13. प्रीति, असे अनुभव हेच सांगतात की आपल्याला अजून खूप काम करायची गरज आहे!

    ReplyDelete
  14. gaavat kashala, ya pratha shaharat dekhil titakyach rujalya aahet...jaatibaher lagna karatana gharatunach jhalela uktivaad aani virodh ajunahi tasaach aahe ghari :)

    ReplyDelete
  15. आम्ही कितीही विकास साधला तरी पारंपारिकतेच जोगड कधीच उतरणार नाही...भारताचा विकास झाला आहे...सुपर पॉवर बनतो आहे...म्हणजे नक्की काय झाल आहे...हे माझ्या सारख्या सामान्य बुद्धीच्या पामराला कळतच नाही कारण...

    १. बालदिनाच्या दिवशी हॉटेलात, रस्त्यावर, दुकानात काम करणारी कोवळी मुल मला दिसतात.
    २.फ़ाइव्ह स्टारच्या झगमाटाच्या पलीकडे असणार्‍या झोपडपट्टीतला काळोख मला दिसतो.
    ३.कॉम्प्युटरच्या जगात गुप्तधनासाठी नरबळीची बातमी माझ लक्ष वेधुन घेत.
    ४. सोन्या-नाण्यांच्या ओझ्याखाली दबलेल्या देवाच्या मंदीराबाहेर भीकेसाठी जमलेल्या लोकांची गर्दी मला दिसते.

    दिवसागणिक गरीब अजुन गरीब अन श्रीमंत अधिक श्रीमंत होतो आहे..एकाबाजुला प्रचंड पैसा अन दुसर्‍या बाजुला कमालीचं दारिद्र..या सर्वांच्या जोडीला रुढी,परंपरा याची मानसिकता आहेच.

    तुम्हाला आलेला अनुभव हे आधुनिक भारताच जळजळीत वास्तव आहे.

    ReplyDelete
  16. किरणजी (घाग), हो शहरातही हे घडते. आपण समजतो त्यापेक्षा शहरांचा आणि खेडयांचा जास्त जवळचा संपर्क आहे .. भारतातले शहरीकरण हा एक मजेदार (!) विषय आहे अभ्यासाचा .. त्यातून ही नाळ अजूनही किती घटट आहे ते कळते. तुमच्या घराच्या युक्तिवादाला आणि विरोधाला एक सामाजिक परंपरा आहे .. त्यामुळे हताश होऊ नका इतकेच मी म्हणू शकते!

    योगेशजी, विषमता वाढत चालली आहे आणि त्याचबरोबर असंवेदनशीलताही .. पण हे वास्तव केवळ आजचे नाही ते नेहमीचेच आहे. हे एक दीर्घकाळचे दुखणे आहे!

    ReplyDelete
  17. ताई मी ऑफिसात बसलोय अन माझ्या डोळ्यांत पाणी आहे! :(
    अन तरी चंदेरी किनार दिसून बरं वाटतंय..

    ReplyDelete
  18. विद्याधर, अशीच संवेदनशीलता जप आयुष्यभर!
    अर्थात ऑफिसात काम करत! :-)

    ReplyDelete
  19. ज्या भिंतीशी तुमची टक्कर झाली ती पुरातन असली तरी अवांछनीयच होती. ती मोडून टाकण्याचा तुमचा हट्ट वाजवी होता. ती मोडण्यासाठी सहकार्‍यांनी तुम्हाला मदत केली ही आनंदाची गोष्ट होती. त्याकरता तुम्हाला कुठलाही विरोध सोसावा लागला नाही हे तुमचे भाग्यच होते.

    तरीही, तुम्ही पुढाकार घेऊन एक नकोशी गोष्ट नामशेष केलीत, म्हणून निश्चितच कौतुकास पात्र आहात. राहीबाईही कौतुकास पात्र आहे आणि तुमचे इतर सहकारीही.

    अशाच लोकांच्या भरवशावर समाज टिकून आहे, एरव्ही केव्हाच रसातळाला गेला असता. तेव्हा ही उमेद अशीच जपा.

    ReplyDelete
  20. समाजात बरेचसे चांगले लोकही आहेत .. आणि त्यांच्याच बळावर समाजाचा गाडा चालू आहे हे खरेच!

    ReplyDelete