ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, January 6, 2011

५८. सलाम

गेल्या काही दिवसांपासून ती गोष्ट रोज घडत होती; अगदी माझ लक्ष वेधून घेण्याइतपत नित्यनेमाने घडत होती. आणि मी त्यावर स्वत:शीच हसत होते.

त्याच अस झाल होत:

या कार्यालयात मी काम करायला लागून जवळजवळ आठ वर्षांचा काल लोटला होता. तोवर मी एका जागी राहून, म्हणजे एका कार्यालयात बसून कधी काम केल नव्हत. माझी नेहमी भटकंती चालू असायची. रोज वेगळ गाव आणि रोज वेगळ कार्यालय अशी ती एक वेगळीच मजा होती कामाची. आधीच्या कोणत्याच कार्यालयात मी नोकरी करत नव्हते – जरी मी काम करत असले तरी ती नोकरी नव्हती. इथे मी भरपूर भटकत असले तरी ती एक नोकरी होती अखेर!

इथे नोकरीला लागल्या लागल्या मी शहरातून बसने इथवर यायचे. मग सुमारे तीन वर्षे मी संस्थेच्या क्वार्टर्समध्ये राहिले – त्यामुळे बाहेरून कुठून मी ऑफिसात येण्याचा प्रश्न उद्भवला नव्हता. त्यानंतर मी स्वत;चे घर घेतले ते ऑफिसच्या अगदी जवळ – चालत पंधरा मिनिटांच्या अंतरावर. मला चालायला आवडत आणि रोज चालायलाही आवडत, अगदी कामासाठी चालायलाही आवडत. त्यामुळे गरज म्हणून, हौस म्हणून, पर्याय नाही म्हणून, वेळ आहे म्हणून, चालावास वाटतं म्हणून .. अशी अनेक कारण घेऊन, त्यांच निमित्त करून मी भरपूर चालते.

त्यामुळे अनेक वर्षे पुण्यात अपरिहार्य समजली जाणारी दुचाकी माझ्याकडे नव्हती. एक तर मी आधी सांगितल्याप्रमाणे घर आणि ऑफिस चालत जाण्यायेण्याच्या अंतरावर असल्याने दुचाकीची गरज नव्हती, दुसर म्हणजे कामानिमित्त मी बराच काळ पुण्याच्या बाहेर असायचे – ‘अनिवासी पुणेकर’ होते मी एका अर्थी. तिसरी गोष्ट म्हणजे पुण्यातल्या भर गर्दीच्या रस्त्यावर गाडी चालवायला मला काही मजा येत नव्हती. गर्दी, एकेरी दुहेरी वाहतुकीचे बदलते नियम, रस्त्यांबाबातच मर्यादित ज्ञान – अशा अनेक गोष्टींमुळे पुण्यात गाडी चालवायचा माझा उत्साह मावळला होता बऱ्यापैकी. शिवाय पर्यावरण प्रेमही मधल्या काळात जागृत झाल होत – तेही एक ‘तात्त्विक अधिष्ठान’(!) होतच!

ऑफिसच्या प्रवेशद्वारात दोन तीन सुरक्षा रक्षक असतात येथे. चालत जाता येता कधी कधी त्यांच्याशी एक दोन वाक्यांची देवाणघेवाण व्हायची. ‘जेवण झाला का?’; ‘गावाला जाऊन आलात का?’; किंवा ‘आज थंडी जरा जास्तच आहे नाही!’ – अशा थाटाची वाक्ये! कधीतरी घरच्या गोष्टी सांगायाचे ते लोक – मुलगा पास झाला, वडील आजारी आहेत वगैरे. या सगळ्या संभाषणात विशेष काही नसायच. ते बोलण नसत झाल तरी काही बिघडलं नसत!

असे दिवस मजेत चालले होते. दुचाकीच्या मोहाला मी बळी पडत नव्हते.

मग एक दिवस लक्षात आलं, की आता दुचाकी नाही चालवली तर ती चालवण्याच कौशल्य आपण एकदम विसरून जाऊ आणि कधी गरज पडली तर गाडी चालवता येणार नाही. पुण्यात राहायचं तर पुण्यातल्या वाहतुकीला तोंड देता यायला पाहिजे असही जाणवलं! आपल्या बुद्धीचं एक बर असत – कोणत्याही निर्णयाच्या समर्थनार्थ ती तर्काचे इमले रचू शकते. माझ्या बुद्धीनही तेच केल – आणि ‘दुचाकी घेतली पाहिजे’ – एवढेच नव्हे तर ती कशी गरजेची आहे – अशा निष्कर्षाप्रत मी आले! मग काय, गेले दुकानात आणि घेतली दुचाकी. चालवायला वगैरे मी काही विसरले नव्हते हे दहा मिनिटांतच माझ्या लक्षात आल! आता गाडी आहेच हाताशी, ती नुसती पडून राहून चालत नाही – तिला चालवायला लागत अधूनमधून – आणि पुण्यात तर मी महिन्यातले पंधरा दिवस नसायचेच. म्हणून मग पुण्यात असेन तेव्हा ‘चालत जाण्याजोग्या अंतरावर’ असलेल्या ओफिसात मी दुचाकी घेऊन जायला लागले! सवयी बिघडायला आणि तत्त्वज्ञान गुंडाळून ठेवायला मला काही वेळ लागला नाही!

आणि मग ती गोष्ट घडायला लागली. आधी ती काही माझ्या लक्षात आली नाही. लक्षात आल्यावरही मी तिच्याबद्दल फारसा विचार केला नाही. पण ती गोष्ट तशीच होत राहली. आठवडाभरात तिने माझे लक्ष वेधून घेतलं!

प्रवेशद्वारावारचे ते सुरक्षारक्षक या गोष्टीचे नायक होते. मी त्यांच्याशी आपण होऊन बोलले तर ते बोलायचे, एरवी जाता येता आम्ही एकमेकांकडे पाहून हसायचो आणि मी पुढे जायचे. पण आजवर त्यांनी मला कधी ‘सलाम’ केला नव्हता. तेच आता मी ऑफिसमध्ये जाता येता सलाम करायला लागले. हा सलाम ‘ओळखीचा’ नव्हता, अधिकाराची उतरंड दाखवणारा होता, मला तर आधी एकदोन वेळा वाटले आमचे कोणी वरिष्ठ सहकारी माझ्या मागून येत असतील – त्यांना असेल सलाम हा! मग मला वाटल की एरवी मी चालत यायचे इतकी वर्षे, आता गाडीवरून येते मी तर हे लोक मला कोणीतरी वेगळी बाई समजून सलाम ठोकत असतील. मी गोंधळले होते. कारण असे घडायचं कारण नव्हत. गाडीचे पेढे मी आवर्जून ऑफिस मधल्या सर्वांना – सफाई कामगारांना आणि या सुरक्षारक्षकांनाही दिले होते. असले पेढे वगैरे वाटायला मला आवडत नाहीत – पण माझ्या एका शिपाई सहकाऱ्याच्या आग्रहाला मी बळी पडले होते. त्यामुळे या लोकांना मी गाडी घेतली आहे (पुण्यात दुचाकीला गाडी म्हणतात – उगाच गैरसमज नसावा!), कोणती घेतली, केवढ्याला घेतली या गोष्टी माहिती होत्या. ते आधी मला सलाम मारत नव्हते – मग आता का? तसाही मला कोणी कोणाला सलाम ठोकत ते विनोदी वाटत – पण माझ्याबाबतीत ते घडायला लागल्यावर मला वैताग आला.

मग उजेड पडला!

लोकांना तुम्ही काय आहात यापेक्षा तुमच्याकडे काय आहे यावरून तुमची ओळख होते. रोज ते लोक मला सलाम करत नव्हते – मी तर पूर्वीही होतेच की – तो सलाम माझ्या गाडीला होता. त्यांच्या दृष्टीने मी आता पुरेशी पैसेवाली झाले होते तर! त्या गाडीने माझ्या प्रतिष्ठेत मोलाची भर पडली होती जणू!

अर्थात मी त्या बिचाऱ्या साध्यासुध्या माणसांना उगाच धारेवर धरायला गेले नाही. माणसांजवळ काय आहे त्यावरून माणसांची किंमत ठरवायची या जगाची रीतच आहे! माझी किंमत माझ्या गुणांवरून होत नाही, माझा किती ‘उपयोग’ आहे त्यावरून होते! म्हणून अनेक गुणवान माणसे तुलनेने मागे पडतात आणि ज्यांच्यात फारसा दम नाही ते बाजी मारतात. आपल्याजवळ जे काही आहे त्याचे ‘मार्केटिंग’ करता आले पाहिजे – ती काळाची गरज आहे! कधी कधी – म्हणजे तुमची गरज असते तेव्हा तुम्हाला आतिशय सन्मानाने वागवेले जाते – आणि गरज संपताच तुमची रवानगी कचराटोपलीत होते. म्हणून बहुधा जिकडे पहावे तिकडे माणसे सारखी काहीतरी सिद्ध करण्याच्या अविर्भावात असतात.

तसे पाहायाला गेले तर जगाची ही रीत जरा मजेशीर आहे. पण ते स्वीकारण्याशिवाय आपल्या हातात फारसा पर्याय नाही. स्वीकारायचे म्हणजे त्याला बळी पडायचे असे नाही – पण तुम्ही ते बदलू शकत नाही हे वास्तव स्वीकारायचे!
हे सगळ घडत असताना मला सारखी ती चातुर्मासाची कहाणीच आठवत होती. एका गरीब बहिणीला तिचा भाऊ कधीच मानाने वागवत नाही, तिला तिरस्काराने वागवतो. मग ती बहिण कोणत्यातरी देवतेचे व्रत करून श्रीमंत होते. आता तिचा भाऊ तिला सन्मानाने आमंत्रित करो, जेवायला पाटाचा थाटमाट करतो (गोष्ट जुन्या काळातली आहे!) वगैरे. मग ती बहीण स्वत: पाटावर बसण्याऐवजी दागिने पाटावर ठेवते आणि भावाला सांगते – “तू माझा सन्मान करत नाहीस हे मला माहिती आहे, ज्यांचा मान आहे त्यांनाच बसू दे पाटावर’! मग
अपेक्षेप्रमाणे भाऊ लज्जित होतो आणि कथेचे तात्पर्य वाचकांपर्यंत यथास्थित पोचते! मला ती गोष्ट लहानपणी तितकी आवडली नव्हती – खोटी वाटली होती! पण आज मला ती गोष्ट तिच्या तात्पर्यामुळे – जरी ते फार बाळबोध असले तरी – आवडते. त्यातला गर्भितार्थ आता त्या परिस्थितीतून मी गेल्यामुळे जास्त भावतो.

काळ बदलला, जमाना बदलला असे आपण म्हणतो – पण अनेक गोष्टी, माणसाच्या मूलभूत प्रवृत्ती मात्र अनेकदा तशाच राहतात – त्या बदलत नाहीत.

या न बदलणाऱ्या जगाला ‘सलाम’ करताना मात्र मला हसू येते.
**

13 comments:

  1. >>माझी किंमत माझ्या गुणांवरून होत नाही, माझा किती ‘उपयोग’ आहे त्यावरून होते

    हे एकदम पटेश.....युज अ‍ॅन्ड थ्रो चा जमाना आहे ....पोश्ट आवड्या... :) :)

    ReplyDelete
  2. अप्रतिम.. एका छोट्या सलामाचा एवढा मोठा प्रवास आवडला !! मस्तच !

    ReplyDelete
  3. योगेशजी, 'उपायोगीतावादाचे' आपण सगळेच कधी कधी ना बळी असतो- त्यामुळे तुम्हाला ही पोस्ट आवडली असणार .. :-) निष्कर्ष चुकला असला तर सोडून द्या!

    हेरंब, सलाम छोटा कधीच नसतो बहुतेक!

    ReplyDelete
  4. मला साध्या या अर्थी म्हणायचं होतं.

    ReplyDelete
  5. >>>> सवयी बिघडायला आणि तत्त्वज्ञान गुंडाळून ठेवायला मला काही वेळ लागला नाही!

    अगदी पटलं...

    पोस्ट नेहेमीप्रमाणे विचाराला वाव देणारी....

    ReplyDelete
  6. हेरंब, :-)
    आता यावरही मला काही सुचल होत!
    पण मला समजल तुम्ही काय म्हणताय ते .. म्हणजे अस वाटतं तरी!!

    तन्वी, आभार.

    ReplyDelete
  7. छानच लिहिलय! पटल अगदी मनापासून

    ReplyDelete
  8. छान ...अप्रतिम लिहिलंय...विचार आवडले..

    ReplyDelete
  9. चातुर्मासाची कहाणी तेव्हां ही तितकीच अंजन घालणारी आणि आजच्या जगात तर... बाकी सवयींची गुलामी आपण सगळेच करत असतो. कधी नाईलाज म्हणून तर कधी जाणूनबुजून. ( मग मनात कितीही सल असू देत )

    ReplyDelete
  10. जाकीर अली, आप मराठी पढते हो? या ऐसेही लिखा है? :-)

    शुभांगीजी, :-)

    खरडपटटी, तुमचे नाव आणि तुमची प्रतिक्रिया यातली विसंगती मजेदार वाटली :-)

    भानस, सवयीची गुलामी नाईलाजाची समजू शकते ... पण आपण सगळ्यालाच नाईलाज मानतो याची मला गंमत वाटते!

    ReplyDelete
  11. मस्त एकदम... वाचताना अर्ध्यात पोचेस्तो मलाही चातुर्मासातली कहाणी आठवली आणि लगेच पुढे तोच उल्लेख पाहून गंमत वाटली :)
    छोट्या छोट्या गोष्टींच्या मागे केव्हढं मोठं मानसशास्त्र असू शकतं ह्याचं अजून एक उदाहरण!

    ReplyDelete
  12. विद्याधर, Great Minds think alike :-) ??

    ReplyDelete