ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Tuesday, April 5, 2011

६८. गजर


‘लवकर उठे लवकर निजे त्याला सुखसमृद्धी भेटे’ अशा अर्थाचा सुविचार लहानपणी शाळेत असताना वाचला होता आणि असंख्य वेळा तो मला ऐकवला गेला होता. ‘कळत पण वळत नाही’ या सदरात ज्या अनेक गोष्टी आहेत माझ्या; त्यातली ही एक! लवकर उठण्याचे फायदे माहिती असले तरी माझ जीवशास्त्रीय घडयाळ मात्र ब-यापैकी उलट चालत! म्हणजे रात्री दोन वाजता मी उत्साहात असते, त्यावेळी मी अगदी मजेत आणि कितीही आव्हानात्मक काम करू शकते. ऑफिसच्या कामाची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी सहा अशी असण्याऐवजी दुपारी एक ते रात्री अकरा अशी असली तर मला जास्त सोयीचं होईल – पण अर्थातच तसं काही होत नाही.

खर तर मला कितीतरी नवीन कल्पना, विचार अस ‘जग शांत झोपलेले’ असताना सुचतात. दिवसा गर्दी, भोवतालचे आवाज, माणसांशी औपचारिकता म्हणून काहीबाही बोलाव लागण ... अशा गोष्टींत बराच वेळ वाया जातो, विचारांची साखळी अनेकदा तुटते. “या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी, यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुने:’ हा गीतेतला श्लोक पहिल्यांदा वाचताना मला एकदम समजल्यासारखा वाटला होता! त्या श्लोकाचा खरा अर्थ वेगळाच आहे आणि आपण काही केवळ उशीरा झोपण्याच्या सवयीमुळे ‘स्थितप्रज्ञ’ बनत नाही हे कळल्यावर भ्रमनिरास झाला होता माझा आणि गीतेला नंतर बरेच दिवस मी हातही लावला नव्हता!

त्यामुळे कन्याकुमारीला पहिल्यांदा गेले तेव्हा एक नवीनच संकट माझ्यासमोर उभ ठाकल – ते म्हणजे पहाटे साडेचार वाजता उठण्याचं! एखादया दिवशी नाही तर रोज पहाटे! साधारणपणे पहाटे तीन साडेतीन ही माझी तोवर झोपी जाण्याची वेळ होती – तीच नेमकी इथ उठायची वेळ होती! अनेकदा ‘जाग आली नाही तर’ काही अडचण नको म्हणून पहाटे तीन साडेतीनला मी परिसरातल्या रस्त्यावर फे-या मारत असे. परिसर सुरक्षित होता त्यामुळे अडचण नाही यायची. रात्रपाळीच्या सुरक्षा कर्मचा-यांना सुरुवातीला जरा अजब वाटलं ते – पण अजब गोष्टींची पण लोकांना सवय होते. एरवी अशा जाग्रणातून ‘साठलेली’ झोप दुपारी पुरी करता यायची. कन्याकुमारीतही तसा दुपारी थोडा मोकळा वेळ असायचा. पण मला उगीच आपली दहा वीस मिनिटांची झोप म्हणजे स्वत:ची समजूत घातल्यासारख वाटत! त्यापेक्षा न झोपलेल परवडल! मी त्या काळात जास्त वेळ बहुतेक ‘नीट झोपायला कधी मिळेल’ याच विचारांत घालवले – अस म्हटल तर अतिशयोक्ती होणार नाही.

अर्थात याला काही दिवस, काही प्रसंग अपवाद होते. कन्याकुमारीत असताना काही दिवस हे विशेष ‘Rock’ दिवस असायचे. नाही; याचा संगीत अथवा नृत्याशी काही संबंध नाही. ब-याच ‘शुभ’ दिवसांना (आणि असे दिवस बरेच आहेत आपल्याकडे!) पहाटे उठून ‘विवेकानंद शिला स्मारकावर’ (म्हणजेच Rock!) जाण्याचा कार्यक्रम असायचा. भल्या पहाटे सूर्य उगवण्याच्या आधी आम्ही तेथे पोचायचो. त्याआधी कन्याकुमारी देवीच्या गाभा-यात जाऊन तिला (म्हणजे तिच्या मूर्तीला – हो, उगीच गैरसमज नको!) पाहणे मला आवडायचे. समुद्रावरून येणारी वा-याची थंड झुळूक, लाटांचा अव्याहत नाद, समुद्र आणि आकाशाचा एकरूप होऊन गेलेला निळा रंग, पूर्व क्षितिजावर सूर्याच्या आगमनाची हळूवार उमटत जाणारी पदचिन्ह...सगळ गूढ वातावरण 'आपल' वाटायचं! मला कधीही जिथं परक वाटलं नाही - आजही वाटत नाही - अशी ती एक जागा! त्यात भर पडायची तिथल्या ध्यान कक्षातल्या शांततेची. आपण फार भाग्यवान आहोत अस तेव्हा वाटायचं .. ही संधी मिळणार असेल तर आणखी एकदा ‘मनुष्य जीवनाच्या चक्रातून’ जायला माझी काहीही हरकत नाही! मला खात्री आहे, आत्ताही ज्यांना ही संधी मिळते ते स्वत:ला भाग्यवान समजत असतील! Rock ला जायचं असल की मी भल्या पहाटे उठायला उत्साहाने तयार असायचे नेहमीच!

मग हळूहळू माझ्या लक्षात आलं, की काही विशेष करायचं असेल तर मला पहाटे कितीही वाजता उठायला चालत – माझी त्याबाबत काही तक्रार नसते. म्हणजे आजही टेकडी चढायला जायचय, सायकलवर गावात फेरी मारायचीय, पक्षी पाहायचेत, पाउस पडतो आहे, प्रवास करायचा आहे, मीटिंग आहे, काही लिहायला सुचलं आहे, फोन करायचाय .. अशा अनंत कारणांसाठी मला कितीही वाजता उठायला आवडत. सकाळची गाडी अथवा बस पकडायला मला आजवर कधी गजर लावावा लागलेला नाही. माझा प्रवासाचा बेत दोनच वेळा बारगळला आहे. एकदा दुपारी दोनची गाडी चुकली माझी! कारण त्यावेळी ऐन मे महिन्यात, भर दुपारी, पावसाची चिन्ह नसतानाही पुण्यात पेशवे पार्कमध्ये एक मोर नाचत होता आणि आम्ही ते दृश्य पहात बसलो! दुस-या वेळी संध्याकाळी पाचची गाडी चुकली कारण मैत्रिणीकडे एक पुस्तक मिळाल आणि ते वाचण्याच्या नादात मी किती वाजलेत ते विसरले. मैत्रिणीला अर्थात मला गाडी पकडायची आहे हे मी सांगायचं विसरले होते. अन्यथा विशेष कार्यक्रमांच्या वेळी मला घडयाळाच्या गजराची कधीच गरज भासत नाही.

पण एरवी जेव्हा काहीच विशेष घडणार नसेल त्यादिवशी मात्र मला झोपेतून उठण्यासाठी गजर लावावा लागतो. केवळ एकाच गजराने काम भागत नाही; म्हणून दोन किंवा तीन गजर लावावे लागतात. मोबाईलच्या जमान्यात असे तीन तीन गजर एकाच वेळी लावून ठेवण्याची मोठी सोय आहे. अर्थात त्या गजरांचाही एक कार्यक्रम असतो – ऋतुनुसार किंवा स्थानानुसार तो बदलतो! म्हणजे पुण्यात असताना पहिल्या गजर झाला की घराच्या खिडक्या आणि बाल्कनीचे दार उघडायचे. दुसरा गजर झाला की पाणी भरायचे, तिस-यानंतर व्यायाम करायचा .. असे ठरलेले कार्यक्रम असत. ते ते काम आटोपून दोन गजरांच्या मध्ये मला स्वप्न पडण्याइतकी गाढ झोप लागतेही. मी सहसा कधीच रात्री दोनच्या आत झोपत नाही – त्यामुळे सकाळचा गजर म्हणजे माझ्यासाठी ‘अजून झोपायला इतका वेळ शिल्लक आहे’ याचा निर्देश असतो.

ही माझी एक गंमतच आहे. साधारणपणे लोक उठण्यासाठी गजर लावतात .. मी मात्र तो ‘अजून’ झोपण्यासाठी वापरते! विशेष गोष्ट करायची असते तेव्हा साधारणपणे लोक गजर लावून उठतात. मला मात्र विशेष गोष्ट करायची असली की अगदी पहाटे तीन वाजताही आपोआप जाग येते. ठरलेल्या दिनक्रमासाठी फार कमी लोकांना मी गजर लावताना पाहिल आहे. मला मात्र रोजच्या ठरीव साच्याच्या जगण्यासाठी गजर लावून उठावं लागत!

आणि बहुतेक सगळ आयुष्य अनेकदा ठरीव साच्याचचं असत – त्यामुळे मला कायमच गजराची गरज भासते!
**

7 comments:

  1. हे असं सगळ्यांचंच होतं?!!
    मलाही महत्त्वाच्या कामासाठी (माझ्या ’महत्त्वाच्या’ मानकाप्रमाणे!)उठायला गजर लागत नाही की! लावते गजर पण त्या बेट्याच्या पाच मिनिटं आधीच टक्क जागी होते. एरव्ही तसल्या पहाटेच्या वेळी मी झोपायची तयारी करत असते!
    तुझी गाडी चुकायची कारणं भयंकर आवडली!
    तू केलेलं वर्णन वाचून मलाही rock ला जावंसं वाटतंय....
    पाच वाजता खडलवासला backwaters पण locally चांगला पर्याय आहे! आपण जाऊ एकदा!

    ReplyDelete
  2. अगदी सहमत !! आत्ता विश्वचषकाच्या प्रत्येक मॅचच्या दिवशी मी पाच्या मॅचसाठी साडेचारचा गजर लावून सव्वाचारलाच उठून बसायचो.. अगदी ताजातवाना होऊन !! बाकी रात्री २-३ ला झोपण्याबद्दल सारखा-चिमटा (सेम पिंच) ;) !!

    ReplyDelete
  3. इथे पण रात्री २-३ ला झोपण्याबद्दल सारखा-चिमटा (सेम पिंच) ;)

    मला तर वेगळ अस काय असेल आणि त्याच्यासाठी सकाळी लवकर उठायचं असेल तर रात्री झोपच येत नाही आणि लागला तरी गजर व्हायच्या आधीच जाग येते...फर्स्ट शिफ्ट असते तेव्हा सकाळी लवकर उठाव लागत पण दोन -तीन वेळा स्नुज केल्याशिवाय उठायला होत नाही ... :)

    ReplyDelete
  4. अनू, हेरंब, देवेन, आपण सगळे एकाच बोटीचे प्रवासी दिसतो आहोत ..

    अनू, पुढच्यावेळी मी पुण्यात येईन तेव्हा नक्की जाऊ खडकवासल्याला

    हेरंब, इकडे day and night सामना असण्याच पुण्य तुमच्या पदरात पडल (किंवा खिशात पडल!) ब्राह्ममुहूर्तावर उठून!

    देवेन, रोजच्या कामात नाविन्य कस आणायचं हीच खरी तपस्या असते तर!

    ReplyDelete
  5. तुझ आयुष्य ठरीव साच्याच? You are kidding!

    ReplyDelete
  6. राजेश, नेमक कशाच हसू आलं तुला? नाही म्हणजे, मी अंदाज बांधू शकते - पण..!

    Anonymous, बदलाचा पण साचा होतो अनेकदा!!

    ReplyDelete