ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, June 30, 2011

७८. त्रिपुरामय: भाग १

“म्हणजे तुम्ही ब्राह्मण का?” आकस्मिकपणे त्या तरुणाने मला प्रश्न विचारला. माझ वजन पुरेसं नसत तर हा प्रश्न ऐकून मी उडालेच असते.

नाही, म्हणजे हा प्रश्न काही नवा नाही – तो अनेकदा विचारला जातो. आपल्या समाजात अजूनही ‘जात’ ही एक मोठी ओळख आहे. पण या ठिकाणी हा प्रश्न आणि तोही शुद्ध मराठीत ऐकून मी चकित झाले. म्हणजे मी होते आगरताळा शहरात. एका प्रशिक्षण कार्यक्रमात. सुरुवातीला माझी ओळख करून दिली होती संयोजकांनी सर्वांना. त्यात नावासह आडनावही सांगितलं होत त्यानी माझ. मधली चहाची सुट्टी म्हणजे अनौपचारिक गप्पांची सोय. त्यात हा तिशीचा एक माणूस येऊन मला हा प्रश्न विचारत होता. त्याच्या चेह-यावरून तो स्थानिक वाटत होता – म्हणजे तो काही त्रिपुरात स्थायिक झालेला मराठी तरुण नव्हता.

त्यामुळे ‘मी जात मानत नाही’ असे उत्तर देऊन लगेच त्या तरुणाला तुम्ही कस काय मराठी बोलताय?” अस न राहवून विचारल.

तो तरुण हसला. तो म्हणाला, “बरेच मराठी लोक जात मानत नाहीत म्हणतात; पण महाराष्ट्रातही जातीवाद आहेच.” पुढे त्याने सांगितलं की त्याने औरंगाबादमधून बी. टेक. केल आणि दोन वर्ष मुंबईत नोकरी केली. सात वर्ष महाराष्ट्रात राहिल्यामुळे त्याला मराठी चांगली येते. खूप दिवसानी तो कोणाशीतरी मराठी बोलू शकत होता म्हणून खूष होता. पुढचे दोन दिवस मग मी त्याला त्रिपुराबाबत काहीबाही विचारत राहिले – मराठीत!

खर तर पंधरा दिवसांपूर्वी मला त्रिपुराबाबत दोनच गोष्टी माहीत होत्या; एक म्हणजे ते भारतातले एक राज्य आहे आणि दुसरे म्हणजे आगरताळा ही त्याची राजधानी आहे. शाळेत भूगोलाच्या शिक्षकांनी घोटून घेतलं असणार ते चांगल म्हणून लक्षात राहिलं! आगरताळाचं तिकीट माझ्या हातात आलं तेव्हा मी घाईघाईने विकिपीडियावर नजर टाकली आणि त्रिपुराबाबात थोड वाचल. आजकाल मी विकिपीडियाचा फारच आधार घ्यायला लागलेय – एका नव्या ग्रंथप्रामाण्याची मी शिकार तर बनत नाही ना – अशी माझी मलाच शंका येते कधीकधी.

तशीही मी फार माहिती गोळा करायच्या कधी फंदात पडत नाही. सामान्य ज्ञानाच्या सर्व चाचण्यांत मी नक्की नापास होईन. एक तर आजकाल इतकी माहिती असते भोवताली की माहिती घेणे कधी संपत नाही आणि ‘मला हा विषय माहिती आहे’ असे धडपणे कधी म्हणता येत नाही. शिवाय पुस्तके, वेबसाईट, वृत्तपत्रे आणि मुख्य म्हणजे माणसं – असे माहितीचे स्रोत असतात आसपास. आपले अज्ञान इतरांना कळण्याची लाज वाटली नाही की भरपूर माहिती मिळते पाहिजे तेव्हा. अनुभवाने मला हेही माहिती आहे की अखेर कोणतीही माहिती ही एका प्रकारे वस्तुस्थितीचा लावलेला अर्थ असतो. माहिती गोळा करणा-या व्यक्तीचे पूर्वग्रह, अपेक्षा आणि माहिती गोळा करण्याचे पद्धत यावरून हाती येणा-या माहितीचे स्वरूप ठरते. आणि हाती आलेल्या माहितीचा अर्थ कसा लावायचा आणि तिचा उपयोग कसा करायचा हेही ठरवणारे पुन्हा आपणच असतो! असो.

‘त्रिपुराची लोकसख्या किती आहे’ अशी आमची चर्चा चालू असताना एकाने ३६ लाख अस सांगितलं. जनगणनेत काम केलेल्या त्याच्या सहका-याने लगेच दुरुस्ती केली ‘ खर म्हणजे ती ३,६७१,०३२ आहे’ (ती ३२ की २३ यावर पण त्यांची चर्चा झाली!) त्या माणसाच्या माहितीची अचूकता, त्याचा उत्साह, त्याची कार्यक्षमता यांनी मी प्रभावित झाले. पण निदान त्या क्षणी तरी ७१,०३२चा फरक माझ्यासाठी महत्त्वाचा नव्हता. त्रिपुराची लोकसंख्या साधारणपणे पुण्याइतकी आहे इतका अंदाज मला पुरेसा होता.

एक आठवडाभर आगरताळा शहरात राहिल्यावर आणि आठ गावांत जाऊन आल्यावर त्रिपुराबद्दलचे माझे ज्ञान वाढले नक्कीच आहे. आता मला माहिती आहे की त्रिपुरामध्ये चार जिल्हे आहेत – कारण त्या चारही जिल्ह्यातल्या लोकांना मी भेटले आहे. त्रिपुराच्या सीमा तीन दिशांनी बांगला देशाला भिडतात हे आता मला माहिती आहे – कारण त्या सीमारेषेवर मी काही वेळा प्रत्यक्ष होते. बांग्ला आणि कोक्बोरोक (Kokborok) या दोन भाषा त्रिपुराच्या अधिकृत भाषा आहेत हे मला माहिती आहे – कारण त्या भाषांतले अधिकृत फलक मी पाहिले आहेत. स्वातंत्र्यापूर्वी त्रिपुरा एक संस्थान होते हे आता मला कळले – कारण त्या काळच्या राजाचा महाल मी पाहिला – तिथे अनेक वर्षे विधानसभा भरत असे. त्रिपुरात अजूनही मंदिरांत पशुबळी दिला जातो – कारण पशुबळी देण्याची जागाही मी मंदिरांत पाहिली.

अर्थात मी आधी म्हटल तसं माहिती ही नेहमी अपुरीच असते. त्रिपुराबद्दल मला जितक माहिती आहे त्याहून कैक पटींनी माहिती नाही! पण माझ्या मनावर त्रिपुराची शेकडो, हजारो क्षणचित्र कोरली गेली आहेत गेल्या आठ दिवसांत.

पहिल्या संध्याकाळी मी एकटीच आगरताळा शहरात भटकले. चालताना मला नेहमी मजा येते – कोणतीही जागा वेगळ्या कोनातून दिसते, सगळ जणू सावकाश उलगडत जात! हवा चांगली होती आणि रविवारची संध्याकाळ असल्याने रस्त्यावर वाहनांची वर्दळ नव्हती. या शहरात पहिल्यांदाच आलेले असूनही शहर मला ओळखीच वाटलं. चढ-उतारावरचे रस्ते, नदीवरचे पूल, तळी .. अस एकंदर रम्य दृश्य होत. चढण-उतार पाहताना मला धारवाड शहराची आठवण आली आणि गम्मत वाटली. धारवाडला मी आजवर एकदाच गेले आहे तरीही ते शहर अस स्मरणात राहिल आहे तर!
दुस-या दिवशी जाग आली तेव्हा लख्ख उजाडलं होत. मला वाटलं सात तरी वाजले असतील. भिंतीवरच्या घड्याळात पाच वाजून सात मिनिट झालेली दिसत होती. हे घड्याळ बंद पडलेलं दिसतय असा विचार मी करत होते तेवढ्यात मला एकदम आठवल की मी नॉर्थ-ईस्ट भागात आहे. इथे सूर्य लवकर येतो. पुढचे काही दिवस मी पहाटे चार साडेचारच्या प्रकाशाचा आनंद घेतला.

अर्थात सूर्य लवकर उगवतो म्हणून लोक कार्यक्रमाला वेळेवर येतात अस काही नाही – ते उशीरा येतात आणि त्यांना उशीर का झाला याची अनेक कारण असतात. लोक लवकर जातात आणि त्याचीही असंख्य कारण असतात! भारतात बाकी कितीही वैविध्य असू दे, एवढ्या बाबतीत मात्र ‘हम सब एक है’ अस म्हणता येत!

त्रिपुरात माझी बांग्ला भाषेची हौस भागली. (बंगाली ‘लोक’ आहेत आणि बांग्ला ‘भाषा’ आहे असा फरक एकाने मला ठणकावून सांगितला तिथ!) या भाषेच – मला ती येत नसली तरी – मला वेड आहे. इथे मी भरपूर बांग्ला ऐकल – व्यवहाराची भाषा तीच आहे इथे. जाता येता रस्त्यावरच्या पाट्या वाचल्या – आणि त्या पुष्कळशा बरोबर वाचायला शिकले मी! ‘तोमार नाम की?’ (तुमचे नाव काय?), ‘ आमि बांग्ला अल्प बुझे तो पारी, बोलते पारी ना’ (मला बांग्ला थोड समजत, बोलता मात्र येत नाही) अशी ‘जीवनावश्यक’ वाक्य मी शिकून घेतली. त्यातला उच्चार महत्त्वाचा. म्हणजे ‘पंचायत समिती’ हे बांग्ला भाषेत ‘पोन्चायोत शोमिती’ अस म्हणायचं! माझ्या भाषेच्या हौसेपायी आणि त्यात मी करत असलेल्या चुकांमुळे भोवतालच्या लोकांना भरपूर हसायची संधी मिळाली. शाळेत मी संस्कृत कधी शिकले नाही. पण एक समजल की बांग्ला भाषेत संस्कृतच्या जवळचे अनेक शब्द आहेत. त्यामुळे अनेक शब्दांचा मी अंदाजाने लावलेला अर्थ बरोबर निघे. शिवाय ज्या विषयावर चर्चा चालू होती तो विकसित करणा-या टीमची मी एक सदस्य आहे. त्यामुळे काय बोललं जातय त्याचा संदर्भ मला माहिती होता. अनेकदा कोणीतरी बांग्लामध्ये विचारलेल्या प्रश्नाच मी थेट (अर्थात हिंदीत) उत्तर देऊ शकले. “तुम्ही महिनाभर इथ रहा म्हणजे बांग्ला एकदम छान शिकाल” अस प्रमाणपत्रही लोकांनी मला दिल! त्यात प्रोत्साहनाचा भाग जास्त होता हे मला समजत. नवी भाषा शिकण तितक सोप नसत!

उत्तर, दक्षिण आणि पश्चिम अशा तीनही बाजूंनी त्रिपुरा बांगला देशाने वेढला आहे. आगरताळाकडून मिझोराम आणि असमकडे नेणारा राष्ट्रीय महामार्ग ४४ हा एकमेव रस्ता आहे. या रस्त्यावर गोहातीकडे जाणा-या अनेक बसेस मला दिसल्या. आगरताळा ते गोहाती हा बसने सुमारे ३० तासांचा प्रवास आहे अस लोकांनी सांगितलं. आगरताळ्याच रेल्वे स्थानक सुंदर आहे. तिथून सिल्चर जंक्शनपर्यंत आणि पुढे गाड्या जातात. बांगला देशात जाणारी एक गाडीही मला लोकांनी दाखवली – ती कुठे जाते हे मी आता विसरून गेले. त्रिपुरा उर्वरित भारताशी फक्त एकाच दिशेने जोडलेल आहे हे त्या जमिनीवर उभ राहून लक्षात येण भीतीदायक होत.
मी पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यात आठ गावांत गेले आणि मला एकूण जे दिसलं ते फारच आवडल. पहिले दोन दिवस फारच उकाडा होता. दहा वर्षांपूर्वी आगरताळामध्ये पंख्याचीही गरज नव्हती; आता मात्र एयर कन्डीशनर लागतो असे लोक सांगत होते. हे केवळ जागतिक पातळीवरच्या हवामान बदलामुळे (climate change) झाले असे म्हणता येणार नाही. १९७० नंतर त्रिपुरात मोठया प्रमाणावर रबराची लागवड होते आहे. बांबूला विस्थापित करून रबर जागा व्यापते आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना रबराचे मळे दिसतात; बांबू फक्त दुर्गम भागात दिसतो. मेलाघर परिसरात बांबू कारागिरांच्या एका फेडरेशनच्या सभासदांना भेटायची मला संधी मिळाली. ते सांगत होते की, ‘आधी एक पावरा बांबू दहा रुपयांना मिळायचा, आता त्यालाच एकशे ऐशी रुपये मोजावे लागतात.’ बांबू लागवडीची जमीन घटत चालली आहे हा त्यांच्या चिंतेचा विषय आहे. सगळा बांबू गेला तर आम्ही काय करायचं आणि काय खायचं असा त्यांच्यापुढे प्रश्न आहे.
त्रिपुरा आकाराने लहान असल तरी इथल्या बाजारात अनेक प्रकारची फळ आणि भाजीपाला दिसला. फणस (कठाल), अननस (ऑनोरश), केळी, आंबे भरपूर दिसले. लोक मासे भरपूर खातात – तो रोजच्या जेवणाचा अविभाज्य भाग आहे. सोबत कोंबडी आणि मटण असते. मिठाईही भरपूर. शाकाहारी माणसांना मात्र डाळ-भातावर राहावे लागते. त्यात गोड पदार्थ आवडत नसतील तर काय खायचे हा प्रश्न येतोच. हेझामारा गावातून येताना माझ्या गाडीचा चालक म्हणाला, “तुम्हाला जेवण आवडलं का इथल?” मी विचारल, “का, तुम्हाला नाही का आवडल?” त्यावर तो म्हणाला, “छे! या त्रिपुरी लोकांनी बनवलेल्या जेवणाला काही चव नसते. जेवण बनवाव तर बंगाली लोकांनीच!’ त्रिपुराचे स्थानिक लोक आणि आता पिढ्यान पिढ्या त्रिपुरात वास्तव्य करून असले तरी बंगालीपण जपणारे लोक यांच्यात एक प्रकारच तणाव आहे. ते अनेक बाबतींत एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. इथे भाषिक आणि सांस्कृतिक वर्चस्वाचा मुद्दा आहे लोकांच्या मनात.

त्रिपुरा विधानसभा फार छोटी आहे – फक्त साठ सदस्यांची. फेब्रुवारी २००८ मध्ये इथे डाव्या आघाडीचे सरकार ४९ जागा जिंकून सत्तेवर आले आहे. गेली पंधरा वर्षे ही आघाडी सत्तेवर आहे. आता २०११ च्या निवडणुकीत केरळ आणि पश्चिम बंगाल मधली सत्ता गेल्यापासून डाव्या आघाडीचे हे एकमेव राज्य उरले आहे. रस्ताभर लाल झेंडे, अनेक ठिकाणी कोपरा सभा असे एकंदर आगरताळ्यात वातावरण होते – इथे २०१३ मध्ये निवडणुका होणार आहेत.

आगरताळा राजधानी आहे आणि तीन बाजूंना बांगला देश आहे त्यामुळे इथे सैन्यदलाचे अस्तित्व ठळकपणे नजरेस भरते. Border Security Force (BSF), Tripura State Rifles (TSR), and Assam Rifles (AR) अशा अनेकांचे भव्य परिसर आहेत. ताल्मुरीया गावातून येताना “For your tomorrow BRO is here” असा एक फलक मला दिसला तेव्हा BRO म्हणजे काय असा प्रश्न मला क्षणभर पडला. मग लक्षात आले की ही आहे Border Road Organization.

सीमारेषेचा मला आलेला अनुभव माझ्यासाठी फार महत्त्वाचा होता. त्याबद्दल नंतर कधीतरी – कदाचित पुढच्या पोस्टमध्ये!

त्रिपुरामय होण्याची ही केवळ एक सुरुवात आहे माझ्यासाठी!

4 comments:

  1. मलाही त्रिपुराची थोडीच माहिती होती...

    ReplyDelete
  2. chhan aahe tumach lekh mala avadala.

    ReplyDelete
  3. वैभवजी, आभार. फक्त आभार हा शब्द फार कृत्रिम वाटतो मला म्हणून मी फक्त :-) लिहिल होत!

    ReplyDelete