ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Sunday, February 9, 2014

१८८. आणखी एक जास्वंदी


बस अजून आली नाही म्हणून जास्वंदी खुशीत होती. आज बस चुकली असती तर तिला आजचा दिवस निभावून नेणं अवघड गेलं असतं. आज काहीही झालं तरी तिला शाळेत जायचं होतं. शाळेवर तिचं काही फार प्रेम नव्हतं; पण आज घरी बसावं लागलं असतं तर फार त्रास झाला असता तिला. कधी एकदा घरातून बाहेर पडता येतंय याची ती वाट पाहत होती कालपासून. आज तिला घर नकोसं झालं होतं.

काल रात्री बाबा घरी आले, ते चांगले पिऊन तर्र होऊन. चालताना त्यांच्या झोकांड्या जात होत्या ते लांबून कुणालाही दिसलं असेल. जास्वंदीला आठवतंय तसं बाबा आधी दारू पीत नव्हते. पण गेल्या दोनेक वर्षांत हे सुरु झालं. अलीकडे तिला त्याची सवय झाली होती. बाबा पिऊन आले की घरात एक प्रकारची शांतता असायची – भीतीदायक शांतता. ‘आता कधी स्फोट होईल’ याची वाट पाहणं एवढ एकच काम असायचं त्या शांततेत. तिला आता काय घडणार हे साधारण माहिती झालं होतं अनुभवाने, आणि म्हणूनच भीती वाटायची.

तसं ठरलेलं असायचं सगळं. बाबा पहिल्यांदा आईला काहीतरी घाणेरडं बोलायचे. आई आधी बराच वेळ शांत बसायची, मुकाट्याने स्वैपाक करायची; जेवायला वाढायची सगळ्यांना. मग  आई जास्वंदीला आणि अमोलला जाऊन गुपचूप झोपायला सांगायची. आईचा आवाज असा, की एरवी कटकट करणारा अमोलही निमूट अंथरुणावर पडायचा आणि मिनिटांत झोपीही जायचा. कधीकधी तर अभ्यासाची कटकट नाही, म्हणून अशा प्रसंगी अमोल खूष असायचा. जास्वंदीला मात्र झोप यायची नाही – आईच्या दबक्या हुंदक्यांचा मागोवा घेत राहायाची ती. आईला काहीतरी त्रास होतोय इतकं जास्वंदीला कळायचं पण उठून काही विचारायची तिची हिमंत व्हायची नाही. दुस-या दिवशी सकाळी आई शांत दिसायची पण तिचे डोळे सुजलेले असायचे आणि तिचा चेहरा दु:खी दिसायचा. हे इतक्या वेळा घडलं की बाबांच्या झोकांड्या पाहतातच जास्वंदीला पुढचं सारं दिसायचं – आणि पुन्हा पुन्हा ते तसंच घडायचं – पुस्तकातल्या धड्यासारखं. कधीही वाचा, धडा तसाच असतो, नेमकं तसंच!

दर वेळी बाबा दारू पिऊन आले की हे अगदी  असंच घडायचं. बाबांनी दारू पीत नव्हते तेव्हा किती छान होतं सगळं!

एखाद्या दिवशी तर गोष्टी आणखी बिघडायाच्या. आईचा आवाज चढायचा. त्यावर बाबांचाही. ते आईला घाणघाण शिव्या द्यायचे. आई काही ऐकून घ्यायच्या मूडमध्ये नसायची. मग दोघांचे चढे आवाज, धमक्या, आणि बाबांचा आईला मारण्याचा आवाज. तो आवाज घरभर घुमत राहायचा. शेजारच्या काकू, मावशी, नाना – कुणीतरी  मदतीला येतील म्हणून जास्वंदी वाट पाहायची – पण कुणीच यायचं नाही. आईचं तळमळणं तिला जाणवायचं; पण तीही उठायची नाही. आपण उठलो तर आपल्याला काय पाहावं लागेल याची तिला भीती वाटायची. जास्वंदीही तळमळत राहायची रात्रभर.

काल तसंच झालं. शेजारपाजारचे लोक एरवी इतके गोड बोलतात, मदतही करतात. पण बाबा आईला मारतात तेव्हा मात्र सगळे कुठे गायब होतात देव जाणे! कुणाचा आवाजही नाही ऐकू येत. शेजा-यांना हाक मारली आणि ते आलेच नाहीत तर – म्हणून जास्वंदीने काही कुणाला हाक मारली नाही.

रात्री बाबा आल्याआल्याच आईशी जोरदार भांडले. आईच्या अंगात काही ताकद नव्हती, सारखी रडत होती ती. मग जास्वंदीने भराभरा कणिक मळली, चपात्या लाटल्या, बटाट्याची भाजी केली, बाबांना जेवायला वाढलं. अमोलला एरवी बटाट्याची भाजी आवडते पण काल त्याला नको होती ती.  त्याची कशीबशी समजून काढून त्याला खायला लावलं. त्याने हट्ट केला किंवा नुसता आवाज चढवला असता तर बाबांनी त्यालाही मारलं असतं. अमोल लहान आहे. त्याला गप्प कधी बसायचं आणि कधी हट्ट करायचा हेही कळत नाही अजून. आई काही खायला तयार नव्हती – तिलाही बळेबळे दोन घास खायला घातले. सगळे जेवल्यावर जास्वंदीने उरलंसुरलं पोटात ढकललं; भांडी घासली, अंथरूणं घातली; अमोलला झोपवलं. जास्वंदीला कामाचं काही वाटत नाही, पण ज्या परिस्थितीत तिला काम करावं लागतं, ती परिस्थिती तिला आवडत नाही.

अशा भांडणाच्या रात्रीनंतर दुस-या सकाळी बाबा मात्र एकदम मायाळू होऊन जातात. सूर्य उगवला की बाबा बहुतेक शुद्धीत येतात. अमोलला मांडीवर घेऊन त्याच्या केसांवरून हात फिरवत बसतात, जास्वंदीकडे पाहून हसतात आणि मधेच तिला थोपटतात. त्यांचा आवाज अशा वेळी इतका मऊ असतो की जास्वंदीला एकदम झोप यायला लागते. ते आईकडे पाहून काहीतरी हळू आवाजात बोलतात. ते ऐकून न ऐकल्यासारखं केलं आईने, तरी तिच्या चेह-यावरची दु:खाची एक रेषा कमी होते. आई हसली की किती छान दिसते. तिला का रडवतात बाबा?

आई हसली की तिला आईचा राग येतो. का हसते आई बाबांच्या बोलण्यावर? रात्रीच्या शिव्या, रात्रीची मारहाण, रात्रीच रडणं कसं काय विसरून जाते आई लगेच? आईने तिला आणि अमोलला घेऊन हे घर सोडून निघून जावं असं जास्वंदीला वाटतं. तिला नाहीत आवडत आई-बाबांच्या भांडणाचे आवाज आणि आईच हुंदके. पण अशी हसरी आई पहिली की जास्वंदी निराश होते. दारू पिण्याबद्दल आणि ती पिऊन सगळ्यांना त्रास दिल्याबद्दल बाबांना जबरी शिक्षा झाली पाहिजे असं जास्वंदीला वाटतं खरं – पण आईच बाबांच्या बाजूने झाली की शिक्षा कोण करणार बाबांना?

*****
जास्वंदीला खरं तर कधीपासून आईशी बोलायचं होतं. शाळेबद्दल बोलायचं होतं. बाबांशीही बोलायचं होतं. आईच्या आणि बाबांच्या कुशीत शिरून तिला खूप जोरात रडायचं होतं. एक दिवस नाही दोन दिवस नाही, चांगली आठवडाभर जास्वंदी वाट पाहत होती ती घरातल्या शांततेची. पण मागचा आठवडा घरात अगदीच वाईट गेला. रोज बाबा दारू पिऊन यायचे, आईशी भांडायचे, आईला मारायचे, आई रडत बसायची रात्रभर ... असं चालू होतं. महिनाभरातून एक-दोनदा जे व्हायचं ते रोजचं झालं होतं. एरवी काही न कळणारा अमोल पण एकदम उदास झाला होता. त्याचं असं गप्प बसणं जास्वंदीला पाहवत नव्हतं. तो एकदम मोठा झाला होता. जास्वंदीही अशीच नव्हती का मोठी झाली? जास्वंदीला स्वत:चं दु:ख पाहत बसायला वेळ नव्हता; तिला काहीच नव्हतं म्हणा. ना बोलायला कुणी, ना रडायला कुणी, ना पुढचा दिवस चांगला असेल अशी आशा. जास्वंदी मनोमन खचली होती.
*****

आज शाळेत जाण्यातही खरं तर  काही मजा नव्हती. परीक्षा जवळ आली होती आणि त्यामुळे की काय सर आणि बाई जास्त कडकपणे वागत होते सगळ्यांशी. घंटा झाली, मुलं-मुली वर्गात पळतपळत गेली. वर्गाच्या दारात "एमजी" सरांना पाहून जास्वंदीच्या छातीतले ठोके एकदम वाढले. तिच्या तळहाताला घाम फुटला.

एमजी सरांना सगळेजण “गुड सर” म्हणत – म्हणजे चांगले सर. फक्त शाळेतले बाकीचे सर नाही तर मुलं-मुलीही त्यांना “गुड सर” म्हणतात. ते सगळ्यांचे लाडके आहेत. तसे म्हातारे आहेत ते, पण मायाळू आहेत. वर्गातल्या खोडकर मुलांनाही ते कधी मारत नाहीत. छडी वापरत नाहीत, शिक्षाही वेगळ्याच असतात त्यांचा – ‘उठाबशा काढ’ असल्या शिक्षा कधीच नाहीत करत ते. शिकवतात पण छान ते. तास संपायची घंटी थोडी उशीरा वाजली तरी चालेल असं वाटतं त्यांच्या तासाला.

काही मुलांची-मुलींची ते स्पेशल शिकवणी घेतात. शाळा संपल्यावर थांबून ते हे काम करतात  ही शिकवणी कधी दोन तीन मुलांची एकत्र असते – पण ब-याचदा एकेकट्या मुलाला किंवा मुलीला ते शाळा संपल्यावर शिक्षकांच्या खोलीत यायला सांगतात. अशी शिकवणी ते काही फक्त श्रीमंत मुला-मुलींना देतात असं नाही, गरीब मुलं-मुली पण असतात त्यांच्या यादीत. फक्त मुलं नसतात; मुलीही असतात. अशी शिकवणी ते फुकट घेतात, म्हणून सगळेजण त्याचं कौतुक करतात. त्यांच्याबद्दल सगळे चांगलं बोलतात. हं, आता काही मुलं त्यांना नावं ठेवतात म्हणा – पण तशी मुलं-मुली कमीच.

“गृहपाठाच्या वह्या आणा इकडं,” एमजी सर हसून सांगतात. मुलं-मुली आपापल्या वह्या घेऊन टेबलाकडे धावत जातात.

आपण गृहपाठ पूर्ण केला नाही, हे जास्वंदीला आठवतं.  घरात कालपरवा  दप्तर उघडणं शक्यच नव्हतं.

मुलं-मुली आपापल्या वह्या ठेवून हसत परत जागेवर येतात. जास्वंदीचे पाय जड होतात. तिच्या पाठीवरून घामाचे ओघळ वाहायला लागतात. नजरेसमोर धुकं पसरल्यागत होतं. छातीतले ठोके कानात  घुमायला लागतात. चक्कर आल्यासारखं वाटतं तिला.

“जास्वंदी, बाळ, तुझा गृहपाठ कुठंय?” एमजी सर तिच्या अगदी जवळ उभे राहून गोड आवाजात विचारतात. जास्वंदीचे अंगांग थरथरतं. तिला शाळेतून पळून जावंसं वाटतं. ती काही बोलू शकत नाही, तिचे ओठ कोरडे पडलेत. मान खाली घालून ती उभी आहे.

“ठीक आहे, समजलं मला. तुझ्याकडे खास लक्ष देऊन अभ्यास करून घ्यायची गरज आहे दिसतंय. असं कर, आज शाळा संपली की शिक्षकांच्या खोलीत ये. आपण पूर्ण करून घेऊ तुझा गृहपाठ”, एमजी सर शांतपणे बोलतात आणि तिच्या पाठीवर हात फिरवून पुढे जातात. सगळा वर्ग समजूतदारपणे हसतो. त्यात सरांचं कौतुक आहे आणि जास्वंदीबद्दल कणव; अभ्यासात मागे पडलेल्या मुलांबद्दल बाकीच्यांना असते तशी कणव!

“पुन्हा एकदा?” जास्वंदी धीर करून पण असहाय्यपणे विचारते.

“होय बाळ, पुन्हा एकदा!  मागच्या वेळचा अभ्यास आवडला नाही का? पास व्हायचंय ना तुला? मग आवडून घ्यावा लागेल असा जास्तीचा अभ्यास.” एमजी सर मागे वळून तिच्याकडे पाहत बोलतात.  मग जास्वंदीच्या उत्तराची वाट न पाहता म्हणतात, “बरं बाई, थोडा जास्त वेळ घेऊ मग आज. मला काय, तुझी अभ्यास करायची तयारी असली की झालं!” वर्ग पुन्हा एकदा हसतो.

जास्वंदी सैरभैर होते. तिला मागच्या सोमवारची ‘शिक्षक कक्षातली शिकवणी’ आठवते. काहीही झालं तरी एमजी सरांबरोबर एकटीने कधी थांबायचं नाही – हे तिला मागच्या सोमवारी व्यवस्थित समजलं होतं. मागच्यावेळी तिला काही माहिती नव्हतं. पण माहिती असून आज संध्याकाळी थांबणं चांगलं नव्हतं. तिच्या लक्षात येतं की गृहपाठ नाही केला हे तर निव्वळ निमित्त आहे. काहीही झालं तरी आजच्या शिकवणीला तिचा नंबर ठरलेला आहे. गेलं तरी तिचं नुकसान; नाही गेलं त्या शिकवणीला तरीही नुकसान तिचचं. एमजी सर काय, नेहमीच चांगले राहणार सगळ्यांसाठी. आता तिला यातून काहीतरी वाट शोधायला लागणार होती. आईबाबांना भांडणाच्या नादात आपल्या पोरीची पण चिंता नव्हती. वाट काढायची तर ती कुणाच्याही मदतीविना, स्वत:ची स्वत:च.

तास संपल्याची घंटा झाली. पुढचे शिक्षक वर्गात यायच्या आत जास्वंदी तिथून बाहेर पडते. काय करावं? कुठे जावं? कुणाला सांगावं? कोण ऐकेल तिचं? कुणाचा विश्वास बसेल तिच्यावर? “मी असं केलंच नाही” असं एमजी सर म्हणतील आणि सगळे त्यांचचं खरं मानतील. तिला फक्त मार बसेल, ‘खोटारडी’, ‘नालायक’ , ‘आगाऊ’ म्हणतील. कदाचित शाळेतून नाव काढून टाकतील. ते बरं होईल म्हणा. पण शाळेतून नाव नाही काढलं तर? मग काय करायचं? जास्वंदीला खूप रडावंसं वाटतंय.

घराचा रस्ता सोडून जास्वंदी उजवीकडे वळते; दुस-याच रस्त्याला लागते. तिला सुटकेचा फक्त एक रस्ता दिसतोय. त्रास होईल का त्याचा? जमेल का तिला? शेवटच्या क्षणी ती माघार तर नाही घेणार? क्षणभर तिला अमोल आठवतो. तो छोटा आहे अजून, आईला बाबा मारतात तेव्हा अमोलला आपल्याशिवाय कुणी नाही, कसं होईल त्याचं? पण होईल तो मोठा; मी नाही का झाले? होऊ दे बाबांना शिक्षा त्यांच्या दारू पिण्याबद्दल! आईलाही कळू दे हसण्याचे परिणाम. ती बाहेर पडली असती आम्हाला घेऊन तर  दुस-या शाळेत गेले असते मी. मग कशाला हे एमजी सर भेटले असते मला? हं! एमजी सरांचं भांडं  झाकलेलं राहील – पण तसंही आपण काय करू शकणार त्यांचं  वाकडं?
*****

त्या संध्याकाळी  ६ वाजून ३६ मिनिटांनी रेल्वे रुळांच्या मधून एक मुलगी चालत होती. अंगात शाळेचा गणवेश होता, पाठीवर दप्तर होतं. दोन वेण्या वरती बांधलेल्या होत्या, लाल रिबिनी होत्या. तसं काही नवीन नव्हतं म्हणा यात; असे बरेच लोक रेल्वे रूळ ओलांडतात  रोज. पण आज जेव्हा शिट्टी वाजवत गाडी आली, जोरात आली, तेव्हा घडू नये ते घडलं. आसपासच्या लोकांनी बराच आरडाओरडा केला. पण ती मुलगी कसल्या तंद्रीत होती देव जाणे, ती काही बाजूला झाली नाही.

ड्रायव्हरने गाडीचा ब्रेक दाबला – पण तोवर खूप उशीर झाला होता. ती मुलगी क्षणात गेली. पाहणारे सगळे हळहळले. बारा-तेरा हे काही जाण्याचं वय आहे का? काय वाटेल तिच्या आई-वडिलांना? कशी ही आजकालची मुलं? कसल्या तंद्रीत असतात एवढ्या?

पोलीस आले. गणवेशावरून शाळा कळली. तिथं मुलीचा शोध घेतला. मिळालं मुलीचं नाव आणि पत्ता. कळवलं तिच्या वडिलांना.
*****

दुस-या दिवशीची सकाळ.
तीच शाळा. तोच शिक्षक कक्ष.

एक शिक्षिका दुसरीच्या कानात कुजबुजते, “आपल्या शाळेतल्या मुलीने आत्महत्या केली”
“आणखी एका मुलीने..” दुसरी शून्य नजरेने उत्तरते.
तिसरी एमजी सरांकडे एक कटाक्ष टाकते.
चौथी एक दीर्घ श्वास घेते.

सगळीकडे सन्नाटा पसरलाय.
शिक्षक शांत आहेत. मुलं शांत आहेत. भिंती शांत आहेत. पाखरं शांत आहेत.

आपला जबडा पसरून त्या शांततेने सगळं गिळंकृत केलं आहे.
पुन्हा एकदा.

उमलण्यापूर्वी कुस्करली गेलीय.
आणखी एक जास्वंदी.

**

7 comments:

  1. नको गं…नको. असह्य झाल्यात ह्या गोष्टी आता.
    लिखाण - चांगलंच झालंय. परिणामकारक.

    ReplyDelete
  2. सुन्न :-/
    काळीज चिरत जाणारी कथा :(

    ReplyDelete
  3. Sandhya Supanekar (on Facebook) : very touching....

    ReplyDelete
  4. अनामिक/का, अनघा, टिवटीव, संध्या सुपनेकर, अपर्णा आणि अनुज्ञा - सर्वांचे आभार.

    ReplyDelete