ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Saturday, February 1, 2014

१८७. शिक्षा


म्या लिवत व्हते. आईशप्पत.
तरीबी गुर्जी म्हन्ले, “आन्जे, शिक्षा तुला. आंगठे धर.

म्या चालली बायेर.
तिकडं चिऊतै, खारुतै, मौ, मोत्या असतेत.
पण गुर्जी म्हन्ले, “आन्जे, माझ्यासमोर, वर्गात.”

आदी हाताचेच अंगठे पकाडले.
समदी हसाया लागली.
गुर्जीनी डोळे वटारल्यावर पायाचे.

गुर्जींच ध्यान नाय बगून हळूच भितीला टेकले.
पोरास्नी जीब काडून दावली. पाठ खाजिवली. नखं खाल्ली.
केसं मागे सारली. पैजण काडलं; बशिवलं.

पाय दुखायले.
येक उचलला. मंग तो टेकवून दुसरा.
डोळे पुसले.
मान वाकडी करून बायेर पायलं.
रस्त्यावर मोत्या बसला व्हता. माज्याकडं तोंड करून.

घंटी वाजली.
जौन मोत्याच्या गळ्यात हात टाकला.
मोत्या मला कदीबी शिक्षा देत न्हाई.  
शिक्षा फकस्त मान्सं देतेत का?


 * शतशब्दकथा

2 comments:

  1. शिक्षा आणि शिक्षण यात फरक काय ? काहीच नाही. अध्ययन ही सृष्टीची सर्व जीवमात्राला जन्मत: मिळालेली देणगी असते. त्यात आनंद असतो.

    ReplyDelete
    Replies
    1. शिक्षण आनंददायी असतं, शिक्षा नसते - हा त्यातला मोठा फरक!

      Delete