भाग ३: कन्याकुमारी परिसर भटकंती
कन्याकुमारीच्या प्रवासाची आखणी करतानाच तिरूवनन्तपुरमला दोन दिवस राहण्याचा बेत मी आखला होता. माझा असा समज होता (नेमका का ते माहिती नाही) की कन्याकुमारीहून त्रिवेंद्रमला जायला भरपूर बस आहेत आणि त्या सतत आहेत. प्रत्यक्षात अशा थेट बस जवळजवळ नाहीतच. नागरकोविलच्या वडस्सेरी (Vadassery) बसस्थानकावरून मला त्रिवेंद्रमसाठी बस मिळेल असं सांगण्यात आलं. मग नागरकोविल गाठलं. नागरकोविलच्या बसमध्ये चढताना खरं तर मी कंडक्टरला “वडस्सेरीला जाते ना ही बस? मला पुढं त्रिवेंद्रमला जायचंय..” वगैरे म्हणून चढले होते. नागरकोविलला उतरल्यावर इतर प्रवाशांना “त्रिवेद्रमला जाणारी बस?” असं विचारायला गेल्यावर लक्षात आलं की मी अण्णा बसस्थानकावर आले होते. “वडस्सेरीहून तुम्हाला त्रिवेंद्रमची बस मिळेल” असं जो तो मला (मोडक्योतोडक्या इंग्रजीत) सांगत होता, पण वडस्सेरीला जायचं कसं? आपल्याच देशातल्या माणसांशी आपल्याला भाषा माहिती नसल्यामुळे साधं बोलताही येत नाही – हे पुन्हा एकदा जाणवलं.
भाषा येत
नसली तरी लोक मदत करायला मात्र अगदी उत्सुक होते. पाच-सहा प्रवाशांची माझ्या गहन
प्रश्नावर एक मिनी-कॉन्फरन्स झाल्याचं मला दिसलं. एक मध्यमवयीन बाई माझा हात धरून
मला एका बसपाशी घेऊन गेल्या. त्यांनी कंडक्टरला काहीतरी सांगितलं. कंडक्टरने
हाताने मला बसमध्ये चढण्याची खूण केली. “नो
त्रिवेंद्रम, वडस्सेरी” असं त्याने
मला तीनतीनदा बजावून सांगितलं. ही बस मला नागरकोविलमधल्या वडस्सेरी या बसस्थानकावर
सोडणार - इतकं मला कळलं.
अण्णा बसस्थानकापासून वडस्सेरीपर्यंत मला तिकिट घ्यावं लागलं नाही. स्त्रियांसाठी तीस किलोमीटरचा प्रवास मोफत आहे असं कळलं. पण कन्याकुमारी ते नागरकोविल या बावीस किलोमीटरच्या प्रवासाचं मात्र मी तिकिट काढलं होतं. (नागरकोविल, कन्याकुमारी दोन्ही तामिळनाडूत आहेत.) त्यामुळे नक्की योजना काय आहे ते कळलं नाही. कदाचित स्थानिक बस आणि लांब पल्ल्याची बस असा काहीतरी फरक असावा. किंवा तामिळनाडूची बस आणि केरळची बस असा फरक असावा. तिकिट काढावं लागलं याबद्दल मला काही म्हणायचं नाहीये, योजना मला नीट समजली नाही, इतकंच म्हणायचं आहे.
बसमध्ये माझ्या शेजारी तामिळ भाषा बोलणाऱ्या ताई होत्या. त्यांनी उत्साहाने बोलणं सुरू केलं. माझं तामिळ “वणक्कम”पासून (नमस्कार) सुरू होतं आणि “तामिळ तेरियाद”पाशी (मला तामिळ येत नाही) संपतं. पण गंमत म्हणजे तरीही त्यांचा थांबा येईपर्यंत दीडेक तास आम्ही बोलत होतो. बोलायचंच असेल तर भाषेचा अडसर येत नाही – हेही पुन्हा एकदा लक्षात आलं. आणि कदाचित त्यामुळेच अन्य भारतीय भाषा शिकण्याची तेवढा सोस रहात नाही. काम भागून जातं. लोक मदत करतात. लोक हसून बोलतात. लोक त्यांचा डबा काढतात आणि आपल्यालाही चहा-नाश्त्याचा आग्रह करतात.
त्रिवेंद्रमची ही काही माझी पहिली भेट
नव्हती. इथल्याही जुन्या काही आठवणी आहेत. एका युवक शिबिरासाठी महाराष्ट्रातल्या
मुला-मुलींना घेऊन कन्याकुमारीला आले होते. चेन्नैला आमची गाडी उशीरा पोचली,
त्यामुळे त्रिवेंद्रमला जाणारी पुढची गाडी चुकली. मग चेन्नै स्थानकप्रमुखांशी
बोलणी करून दुसऱ्या एका गाडीत व्यवस्था केली. ती गाडी अपरात्री कधीतरी
त्रिवेंद्रमला पोचली होती. तीस मुला-मुलींसह त्रिवेंद्रम स्थानकाच्या फलाटावर
रात्री झोपलो होतो – तो एक संस्मरणीय अनुभव होता. नंतर कधीतरी दोन आठवड्यांच्या
एका प्रशिक्षणासाठी कोवलम बीचजवळ राहिले होते, आणि सकाळ-संध्याकाळ
समुद्रकिनाऱ्यावर जात होते. दिल्लीत असताना एका प्रकल्पाच्या निमित्ताने
त्रिवेंद्रमच्या आसपासच्या खेड्यांमध्ये जाणं झालं होतं, तेही दिवस छान होते. केरळची राजधानी असलेलं हे शहर मला केवळ
प्रशासकीय केंद्र म्हणून नाही, तर इतिहास, संस्कृती, स्थापत्यकला
आणि माणुसकी यांचं सुंदर मिश्रण म्हणून अनुभवायला मिळालं आहे. आधीच्या सगळ्या भेटी
कामानिमित्त होत्या, ही भेट निवांत होती हा एक मोठा फरक यावेळी होता.
‘तिरू’ हे एक आदरसूचक अक्षर आहे. काहीसं संस्कृतमधल्या “श्री” सारखं. तिरूचिरापल्ली, तिरूपती, तिरूवल्लुवर.... अशा अनेक शहरांच्या नावात तिरू आहे. ‘अनंत’ हे ईश्वराचं संबोधन आहे, पण इथं अनंत म्हणजे शेषनाग. ‘पुरम’ म्हणजे निवास, नगरी. शेषावर विसावलेल्या विष्णूशी जोडलेली ही नगरी. शहराचं नावचं असं अर्थपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण. या शहराला स्वत:ची एक लय आहे. रस्ते टुमदार, वळणावळांचे. रस्त्यांवरील वाहतूक पाहतानाही ही लय जाणवत राहते. दुचाकीस्वारांची संख्या मोठी असली तरी जवळजवळ प्रत्येकजण हेल्मेट घालूनच गाडी चालवतात—पुरुष, स्त्रिया, तरुण, वयस्क सगळेच, दुचाकी चालवणारे आणि मागे बसणारे – दोघेही हेल्मेट वापरतात.
हे केवळ कायद्याचं पालन वाटत नाही, तर सुरक्षिततेची एक सामूहिक जाणीव वाटते. वाहतूक तुलनेने कमी आक्रमक, अधिक संयमित आणि शांत भासते - जणू या शहराचा स्वभावच तसा आहे.
होम-स्टे
तिरूवनन्तपुरममध्ये कुठं राहायचं ते
ठरवताना Booking.com
या संकेतस्थळावर एक होम-स्टे दिसलं. Chaithritha Ladies Homestay. ते फक्त स्त्रियांसाठी होतं आणि
त्याचे रिव्ह्यूजही चांगले होते. पैसे प्रत्यक्ष तिथं गेल्यावर भरायचे होते,
त्यामुळे काही कारणांनी प्रवास रद्द झालाच तरी पैसे वाया गेले नसते. मी लगेच तिथं
राहायचं नक्की केलं.
मी
कन्याकुमारीला जायला निघण्यापूर्वी सुमारे महिनाभरापासून या होम-स्टेवाल्या
लोकांचा माझ्याशी व्हॉट्सऍपवरून संवाद सुरू झाला. मी कुठून, कशी पोचणार आहे,
स्टेशन किंवा बसस्थानकावरून मला पिकअप व्यवस्था हवी आहे का, मला त्रिवेंद्रममध्ये
काय पाहायचं आहे, त्यासाठी काही व्यवस्था करायची आहे का ... वगैरे. मी
त्रिवेंद्रमला त्यांच्या घरी पोचेपर्यंत हा संवाद चालू होता. किंबहुना मी पुण्याला
परत पोचल्यावरही मी त्यांना घरी सुखरूप पोचल्याचं कळवलं होतं – अगदी आपल्या
सुहृदांना कळवावं तसं.
होम-स्टेतर्फे
माझ्याशी संवाद साधणारी आणि माझी सगळी व्यवस्था करणारी व्यक्ती नेमकी कोण आहे हे
मला माहिती नव्हतं. त्रिवेंद्रमला पोचल्यावर बिंदू मॅडम भेटल्या तेव्हा कळलं की
माझी सगळी विचारपूस त्यांचा मुलगा लिहिन (हो, हेच त्याचं नाव) करत होता. तो दूर
दिल्लीत, मी पुण्यात आणि व्यवस्था त्रिवेंद्रममधली – हे तंत्रज्ञानामुळे सहज शक्य
झालं. दिल्लीत राहून तो आईला सगळी मदत करतो. (त्यांची वैयक्तिक माहिती अर्थातच
जास्त लिहिणार नाहीये.)
कन्याकुमारीतून त्रिवेंद्रमला बसने येणार का ट्रेनने असं मला लिहिनने विचारलं.
तोवर मी त्या प्रवासाचा फारसा विचार केला नव्हता. कन्याकुमारीला जाताना
त्रिवेंद्रम ते कन्याकुमारी हा प्रवास ट्रेनने करणार होते. मग बदल म्हणून
कन्याकुमारी ते त्रिवेंद्रम बसने जाऊयात असं ठरवलं. “त्रिवेंद्रमला येण्यासाठी
तामिळनाडू आणि केरळ अशा दोन्ही राज्यांच्या बस असतात. पण तुम्ही केरळ राज्याच्याच
बसने या”, असं लिहिनने
मला आग्रहाने सांगितलं. ते ऐकताना गंमत वाटली. आपण महाराष्ट्राच्या बसबाबत इतके
काही आग्रही नसतो हे जाणवलं.
त्रिवेंद्रम
शहरात काही ठिकाणांना भेट देण्यासाठी लिहिनने गाडीची चालकासह व्यवस्था केली होती.
हा चालक म्हणजे लिहिनचा मामेभाऊ होता. विश्वनाथ थोडासा लाजराबुजरा होता. त्याचा एक
चुलतभाऊ – मेघन त्याचं नाव -सोबत होता. हा मात्र गप्पिष्ट होता. “माझ्या घरच्यांना मुलगी हवी होती, तर मी
जन्माला आलो – म्हणून माझं नाव मुलीच्या नावाशी जवळचं (मेघन) आहे” असं तो सांगत होता. हे दोघंही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी. माझ्यासोबत तेही
पहिल्यांदाच अनेक ठिकाणांना भेट देत होते. त्यामुळे मला माहिती देणारा एखादा गाईड
सोबत असावा ही अपेक्षा पूर्ण झाली नाही. पण केरळमधल्या कुटुंबाबाबत, त्यांच्या
परस्पर-संबंधांबाबत पुष्कळ काही जाणून घेता आलं.
घरात प्रवेश केल्या केल्या वायफाय पासवर्ड मिळाला. कनेक्शन उत्तम होतं. घरगुती नाश्ता, जेवण. छोटेखानी पण टुमदार आणि स्वच्छ घर. झाडं हाताशी आहेत असं वाटायला लावणारी खिडकी. वळणारा रस्ता आणि कोपऱ्यावरच्या इमारतीच्या कठड्यावर खेळणारं मांजर.
मीही जणू एका चित्राचा भाग असावे इतकी परिसरात शांतता. मजा आली.
होम-स्टेमध्ये पुट्टु-कडला-करी, अप्पम आणि स्थानिक मासे खाता आले. पुट्टु–कडला- करी हा केरळमधील अत्यंत लोकप्रिय आणि पारंपरिक नाश्त्याचा पदार्थ आहे. मला तो ताटात दिसला तेव्हा आधी छोले-भातच वाटला.
पण पुट्टुमध्ये किसलेल्या ताज्या खोबऱ्याची चव लागली आणि छान वाटलं. पुट्टु हा तांदळाच्या पीठापासून आणि किसलेल्या नारळापासून बनवला जाणारा वाफवलेला पदार्थ. तो खास पुट्टु कुडम किंवा साच्यात उभा वाफवला जातो. त्यामुळे तो अगदी मऊ असतो. त्यासोबतची कडला-करी ही काळ्या हरभऱ्यांपासून (black chickpeas) बनवलेली असतो. त्यात असतो नारळ, भाजलेले मसाले आणि कढीपत्त्याची फोडणी. ही घट्ट रस्सेदार भाजी असते. हा पदार्थ चविष्ट तर आहेच, तसाच आरोग्यदायीही आहे. मी कितीही वेळा न कंटाळता पुट्टु-कडला-करी खाऊ शकेन - आयती मिळाली तर, अर्थात.
दिवसभर मला सोबत करणाऱ्या दोन तरूण मुलांसोबत गप्पा मारताना मला मजा आली. त्यांच्याच आग्रहामुळे दुपारच्या जेवणासोबत टॉडीचीही चव घेतली. सौम्य आंबट चवीचं हे पेय. तिथल्या उपाहारगृहात कुटुंबातले सगळ्या वयाचे लोक एकत्रितपणे टॉडीचा आस्वाद घेताना दिसले. बुधवारचा दिवस असूनही (म्हणजे सुट्टी नसताना) उपाहारगृह भरलेलं होतं.
मी अर्थात फक्त दोनेक घोट प्यायले.
श्री
पद्मनाभस्वामी मंदिर
तिरुवनंतपुरमचे
सर्वात प्रसिद्ध मंदिर - श्री पद्मनाभस्वामी मंदिर. इथं पोषाखाबाबत विशेष नियम आहेत. विश्वनाथ, बिंदू सगळ्यांनी
मला त्याबाबत आधीच सांगितलं होतं. पुरूषांनी अंगाचा वरचा भाग उघडा ठेवला पाहिजे
(शर्ट काढायचा) आणि मुंडू किंवा धोती नेसायची. स्त्रियांनी खरं तर साडी नेसून आलं
पाहिजे. पण हल्ली सलवार-कमीज सारख्या वेषात सलवारीवर मुंडू (त्याला मुंडू-नेरियथू
असं म्हणतात) नेसलं तरी चालतं. देवळाच्या आवारात साडी किंवा मुंडू भाड्याने
मिळण्याची व्यवस्था आहे. मी होम-स्टेमधून निघायच्या आधीच बिंदूने तिच्याकडचा
नवाकोरा मुंडू मला वापरायला दिला होता. मंदिरात प्रवेश करताना मी तो सलवारीभोवती
गुंडाळला. सुरक्षा तपासणी करताना तिथल्या स्त्री पोलिसाच्या लक्षात आलं की तो
मुंडू व्यवस्थित बसलेला नाही, कधीही निघेल. मग तपासणी झाल्यावर त्या स्त्री
पोलिसाने मला मुंडू व्यवस्थित बांधून दिला.
मंदिर खूप मोठं
आहे. देशातलं हे सर्वात श्रीमंत मंदिर आहे असं मानलं जातं. लोक शांतपणे रांगते उभे
होते. सकाळच्या वेळी ऑफिसला जाण्यापूर्वी नियमित दर्शनला येणारे लोक होते, आणि
माझ्यासारखे काही पर्यटक होते. मंदिराच्या एका भागात सामूहिक विष्णूसहस्रनाम पठण
चालू होतं. कोणे एके काळी मला ते पाठ होतं (तुला काय जमणार ते असं कुणीतरी म्हटल्याने
आव्हान स्वीकारून मी ते काही तासांत पाठ केलं होतं – ती एक वेगळीच कहाणी, पण ती
आठवली....) त्यामुळे माझ्या मनात त्यातले पुढचे पुढचे शब्द उमटत होते. खरं तर
कितीतरी वर्षांत मी विष्णूसहस्रनाम म्हणलेलं नाही, पण मनाची जादू अजबच.
मंदिराच्या
नावातून कळतं तसं हे विष्णूचं देऊळ आहे. इथं शेषशायी विष्णू पाहायला मिळतो. आठव्या
शतकात बांधल्या गेलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार त्रावणकोरचे राजा मार्तंड वर्मा
यांनी अठराव्या शतकात केला. त्रावणकोरच्या राजांचा या मंदिराशी अतूट संबंध होता. इ.स. १७५०
मध्ये महाराजा मार्तंड वर्मा यांनी “त्रिप्पादिदानम्” ही ऐतिहासिक घोषणा केली - ज्यात संपूर्ण
त्रावणकोर राज्य भगवान पद्मनाभस्वामींना अर्पण केलं गेलं. त्यानंतर राजे स्वतःला “श्री पद्मनाभदास” (देवाचे सेवक) म्हणवू लागले. राज्य हे देवाचे असून राजा केवळ सेवक – अशी त्यांची धारणा
होती असं म्हणतात.
मंदिराची
वास्तू म्हणजे केरळ आणि द्रविड शैलीचं मिश्रण आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात १२००८
शाळीग्राम आहेत असं वाचलं – पण मला काही ते दिसले नाहीत. नेहमीप्रमाणे याही
मंदिरात पुजारी लोकांना ढकलत होते आणि जास्त पैसे भरणाऱ्या लोकांची वेगळी रांग
होती. देवापुढं असली पैशावर आधारित विषमता तथाकथित श्रद्धावान लोक कशी काय करू
शकतात हा नेहमीचाच प्रश्न मला पुन्हा एकदा पडला. या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे तीन
दरवाजांतून होणारं दर्शन. पहिल्या दरवाज्यातून भगवान विष्णूचं मुख आणि छाती, दुसऱ्यातून मध्यभाग, आणि तिसऱ्यातून पाय दिसतात. शेषशायी मूर्ती
अठरा फूट लांबीची आहे. मंदिर शांत आहे, देखणं आहे. मन प्रसन्न झालं. फक्त मंदिराची
अजून चांगली माहिती मिळाली असती तर मला आवडलं असतं. काय पहायचं आहे ते कळल्याविना
कधीकधी गोष्टी दिसत नाहीत, तसंच इथंही झालं.
कुथिरमालिका
पॅलेस
कुथिरमालिका
पॅलेस पाहताना मला केरळच्या राजेशाही इतिहासाची जिवंत झलक अनुभवायला मिळाली. हा
त्रावणकोरच्या राजांचा राजवाडा. पद्मनाभ मंदिराला लागून. संपूर्ण राजवाडा लाकडातून
साकारलेला असून छतावर कोरलेल्या घोड्यांचं शिल्प विशेष लक्ष वेधून घेतं. हा
राजवाडा महाराज स्वाती तिरुनाळ यांनी बांधला — ते केवळ राजा नव्हते, तर नामवंत संगीतकार आणि कलाप्रेमी होते. या
पॅलेसमधील प्रत्येक दालन त्या राजवंशाच्या सौंदर्यदृष्टी, सांस्कृतिक
जाणिवा आणि कलाप्रेमाची साक्ष देतं.
राजघराणातल्या विविध वस्तूंचं
इथं आता संग्रहालय आहे. इथं आम्हाला माहिती सांगायला स्त्री गाईड होत्या. त्यांनी
चांगली माहिती दिली. फोटो काढायला परवानगी नसल्याने लोक पटापट पुढं सरकत होते. इथं
आणखी एक मजेदार गोष्ट पाहायला मिळाली की राजांच्या वंशावळीतले लोक एक छापाच्या
चेहऱ्याचे नाहीत. मग लक्षात आलं की राजेपद - थोरल्या मुलाकडं, थोरल्या भावाच्या
थोरल्या मुलाकडं ....असं न जाता राजाच्या बहिणीच्या मुलांकडं गेलं. म्हणजे राजेपद
मातृवंशीय होतं. त्यामुळे राजांची नावंही वेगवेगळी दिसतात. अर्थात हे माझं एक
निरीक्षण, मलाही नीट माहिती नाहीये.
नेपियर
संग्रहालय
हे संग्रहालय इ.स. १८५५ मध्ये स्थापन झालं आणि नंतर इ.स. १८८० मध्ये त्याची सध्याची
भव्य इमारत बांधण्यात आली. या इमारतीला तत्कालीन मद्रास प्रांताचे गव्हर्नर लॉर्ड नेपियर यांचं नाव
देण्यात आलं. संग्रहालयात केरळच्या इतिहासाशी निगडित अनेक दुर्मिळ वस्तू जतन
केल्या आहेत. यात प्राचीन कांस्य व पितळी मूर्ती, हस्तिदंतावर कोरलेली शिल्पं, पारंपरिक केरळी वाद्यं,
शस्त्रास्त्रं, तसंच त्रावणकोर राजघराण्याशी
संबंधित वस्तू पाहायला मिळतात. इथं आम्ही निवांत फिरलो आणि मी अनेक फोटोही काढले.
लॉरी बेकर यांच्या संस्थेच्या कार्यालयाचा परिसर
त्रिवेंद्रमला
जाते आहेस तर लॉरी बेकर यांचा परिसर पाहून ये – असा एका वास्तुविशारद मैत्रिणीने
आग्रह केला होता. माझ्यासोबतच्या मुलांना लॉरी बेकर हे नावही माहिती नव्हतं.
त्यामुळे जागा शोधताना आम्ही भटकत राहिलो. एका ठिकाणी पोचलो तर ती स्त्रियांच्या
स्वयंसहाय्यता गटाचा उद्योग चालवणारी एक संस्था होती. पाहुणे आलेत म्हणून तिथल्या
कार्यकर्त्या जेवण बाजूला ठेवून उठल्या. आता आपण आलोच आहोत इथं, तर हेही पाहूयात
म्हणून मग त्यांच्या कामाचीही सविस्तर माहिती घेतली. त्यांनीच मग आम्हाला लॉरी
बेकर यांच्या संस्थेच्या कार्यालयाच्या परिसरात कसं पोचायचं ते सांगितलं.
इथं अनिल कुमार
नावाचे वरिष्ठ अधिकारी भेटले. लॉरी बेकर जिथं राहिले होते त्या गावातल्या परिसराचा
पुनर्विकास चालू आहे असं कळलं. इथं त्यांचं प्रशिक्षण केंद्र आहे.
लॉरी बेकर हे
ब्रिटिश-भारतीय वास्तुविशारद होते. त्यांचा जन्म इंग्लंडमधला. पदवीचं शिक्षणही
तिथलंच. दुसऱ्या महायुद्धानंतर ते भारतात आले. स्थानिक सामग्रीचा वापर करून
(म्हणजेच कमी खर्चात) पर्यावरणस्नेही वास्तु बांधणं हे त्यांचं वैशिष्ट्य. घर,
शाळा, हॉस्पिटल, चर्च ... अशा दोन हजारपेक्षा जास्त इमारती त्यांनी बांधल्या.
भपकेदारपणा, दिखाऊपणा, आणि खर्च यांना जाणीवपूर्वक नाकारून त्यांनी माणूस, निसर्ग
आणि गरज यांना केंद्रस्थानी ठेवलं. १९९० मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार
देऊन त्यांचा गौरव केला.
इथं पाहिलेली बहुमजली विटांची लायब्ररी मला आवडली.
कुठलाही भपकेदारपणा नाही — पण नैसर्गिक प्रकाश, हवेशीर रचना आणि विटांचा वापर यामुळे ती जागा अत्यंत जिवंत वाटते. आम्ही तीन मजले चढून गेलो. प्रत्येक मजल्यावरच्या लाकडी फळीवर दणादण पाय आपटून पाहिले (अनिल कुमार यांच्या सुचनेनुसारच ते केलं) आणि इमारत अतिशय भक्कम आहे असं लक्षात आलं. प्रत्येक मजल्यावर राहण्याची एकेक खोलीही आहे, तिथं प्रशिक्षणार्थी राहतातही. काहीतरी नवं पाहिल्याचा आनंद वाटला.
तिथून निघताना
विश्वनाथ आणि मेघन म्हणाले, “बापरे,
आपल्या आत्त्याने (की मामाने) ते नवं होम-स्टे केलंय तिथं तर
सगळ्या काचा बसवल्यात, त्याऐवजी असं विटांचं बांधकाम करायला पाहिजे होतं ना....” ते ऐकून मला बरं वाटलं. प्रत्यक्षात बदल करणं कदाचित आत्ता त्यांच्या
हातात नाही, पण काही चांगले पर्याय आहेत इतकं त्यांच्या लक्षात येणंही महत्त्वाचं
आहे.
दिवसभर भरपूर
पायपीट झाली होती. आम्ही सगळेच दमलो होतो. तरी घरी परत येईतोवर चार वाजून गेले
होते.
कन्याकुमारी आणि
त्रिवेंद्रम या दोन्ही ठिकाणी छान वेळ गेला. आठवडाभर खूप निवांतपणा मिळाला.
समुद्राचा सहवास मिळाला. काही नव्या गोष्टी पाहिल्या. नवी-जुनी माणसं भेटली. काही
जुन्या गोष्टींना पूर्णविराम मिळाला – जो आवश्यक होता. केवळ माणसंच नाही तर जागाही
आपल्याला घडवत असतात. केरळ-तामिळनाडूची मी त्यासाठी कायमच ऋणी राहीन.
दुसऱ्या दिवशी
सकाळी उठून त्रिवेंद्रम स्थानकावर जाऊन पुण्याकडं जाणारी ट्रेन पकडली. त्रिवेंद्रमचा
निरोप घेताना “मी पुन्हा
येईन” 😊 असं मी स्वत:ला आणि तामिळनाडू-केरळ यांनाही सांगितलं 😊 प्रत्यक्षात येणं होईल - न होईल, पण याही दिवसांच्या आठवणी
सोबत राहतील याची मला खात्री आहे.
ही लेखमालिका समाप्त.








