ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, February 9, 2026

२८०. “बोशांको”ची भेट: भाग १

(Want to read this post in English? It is available here.)

शीर्षकातला बोशांको हा शब्द तुम्ही बहुधा पहिल्यांदाच वाचत असाल.

कोण आहे हा किंवा ही बोशांको असंही तुम्हाला कदाचित कुतुहल वाटत असणार.

तर बोशांको हे कुणाही व्यक्तीचं नाव नाहीये. किंबहुना बोशांको हा शब्द माझ्याही कधी ऐकण्यात-वाचण्यात आलेला नाहीये. आज मीच हा शब्द तयार केलाय. तीन जागांच्या नावांमधलं प्रत्येकी पहिलं अक्षर घेत तयार केलेला शब्द.

बोलपूर-शांतिनिकेतन-कोलकाता इथं मी नुकतीच जाऊन आले. त्या प्रवासाच्या या नोंदी. बोशांकोच्या नोंदी. किंवा मला दिसलेलं, अनुभवायला मिळालेलं बोशांको”.

या लेखमालिकेत चार लेख असतील. पहिल्या लेखात बोलपूरमधलं मातीचं घर आणि खाद्यपदार्थांबद्दलचे अनुभव आहेत. दुसरा लेख शांतिनिकेतनवर आहे. तिसरा लेख जुन्या कोलकात्यातील भटकंतीबाबत आहे. चौथ्या आणि शेवटच्या लेखात दक्षिणेश्वर भेट आणि एका कलाकृतीबद्दलची माझी निरीक्षणं असतील.

*****

कोलकात्याच्या दिशेने

पुणे ते कोलकाता हा प्रवास आझाद हिंद एक्स्प्रेसने केला. चौतीस तास अपेक्षित असणारा प्रवास - गाडीला उशीर झाल्याने बेचाळीस तासांचा झाला. हा प्रवास फक्त किलोमीटरमध्ये नसतो, तर तो सहप्रवाशांना जाणून घेण्याचाही असतो. अर्थात इतक्या लांबच्या प्रवासात सहप्रवाशांचे बरे-वाईट अनुभव येतातच. मनमाड किंवा भुसावळ कुठंतरी रात्री एक मोठा गट डब्यात चढला. रात्रीच्या अंधारात बर्थचे नंबर नीट दिसत नाहीत, त्यामुळे त्यांचा थोडा वेळ गोंधळ चालणार हे समजण्याजोगं होतं. इतर लोक झोपले आहेत, याचं भान तसंही कमी लोकांना असतं हा नेहमीचा अनुभव. पण अर्धा तास झाला तरी या लोकांचे आवाज काही थांबेनात. मग मी त्यांना आवाज कमी करायला सांगितलं तर त्यांना राग आला आणि त्यांचा आवाज आणखीच वाढला.

दुसऱ्या दिवशी त्यांच्यातल्या काहीजणांशी गप्पा मारताना कळलं की हा एक आध्यात्मिक गट होता आणि गंगासागरला चालला होता. गटात एकूण चाळीस लोक होते, आणि त्यात पंचवीस पुरूषही होते. त्यातल्या काही पुरूषांना खालचा बर्थ मिळालेला होता. म्हणजे काल रात्री हे लोक आपल्या गटातल्या स्त्रियांना खालचा बर्थ द्यावा म्हणून दुसऱ्याच पुरूष प्रवाशांशी भांडत बसले होते – ते फारच स्वार्थीपणाचं होतं तर. आपापसात त्यांना गटातल्या स्त्रियांना खालचा बर्थ देण्याचं काम शांतपणे करता आलं असतं. पण शक्यतो आपली सोय न सोडता दुसऱ्यांकडून लाभाची अपेक्षा करायची ही आपल्या समाजाची (त्यातल्या बहुसंख्य लोकांची) सवय आहे.

दुसरे एक दादा होते. ते पुण्यातून गाडी सुटतानचा अंथरूण पसरून झोपी गेले. मध्येमध्ये उठून ते फोनवर बोलत होते, खात होते. पण तिसऱ्या दिवशी सकाळी उतरेपर्यंत ते झोपलेलेच होते. त्यांना बरं नाहीये की काय हे एकदा विचारून घेतलं. ते फक्त विश्रांती घेत होते.

एक मध्यमवयीन बाई नागपूरला चढल्या. त्याही कोलकात्याला जात होत्या. त्यांचा भाऊ आजारी होता म्हणून त्या जरा विमनस्क होत्या. आम्ही काही खात असताना त्यांना खाण्याचा आग्रह केला तेव्हा जरा अधिक बोलणं झालं.. त्यांचा पुढचा प्रश्न होता – तुम्ही कुठं चाललात?

हा प्रश्न जास्तच अवघड होता. कारण मी अनुज्ञाच्या (माझ्या भाचीच्या) मैत्रिणींच्या घरी ओळखदेख नसताना राहायला चालले होते. असं ओळख नसताना कुणाहीकडं राहायला किंवा जेवायला जाणं हे माझ्यासाठी नेहमीचंच आहे. पण ते अनेकदा समोरच्या माणसांच्या व्याख्यांमध्ये न बसणारं असतं. त्यामुळे मी मोघम – शांतिनिकेतन पाहायला चाललोय – असं सांगून विषय बदलला.

तिसरे एक सहप्रवासी तरूण होते. ते कपड्यांचे ठोक व्यापारी होते. गाडीला उशीर झाल्याने त्यांच्या पुढच्या विमानप्रवासांचा झालेला घोळ ते निस्तरत होते. मध्येच त्यांना घरून फोन आला. त्यांचं सगळं संभाषण मला अगदी सहज ऐकू येत होतं. त्यांच्या तिसरीतल्या मुलीला प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत भाषण द्यायचं होतं, त्याबाबत बायकोशी त्यांचं बोलणं चालू होतं. मुलीला भाषण वाचता येणार नाही, ते पाठच करावं लागेल हे कळल्यावर ते जरा विचारात पडले. मग बायकोला म्हणाले, तू काळजी करू नकोस. तिला फक्त तीन शब्द लक्षात ठेवायला सांग. भारत, संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर. एवढे तीन शब्द ती बोलली तरी छान होईल. मला त्या गृहस्थांबद्दल आदर वाटला. मग त्यांच्याशी आणखी थोड्या गप्पा झाल्या.

प्रवासात असा माणसांचा, दृष्टिकोनांचा, वास्तवांचा एक विशाल पट उलगडत राहतो.   

बोलपूर

हावडा जंक्शनला गाडी पोचली तेव्हा देबाहुती आम्हाला घ्यायला आली होती. पोटपूजा करून आम्ही बोलपूरच्या दिशेने निघालो. ज्येष्ठ नागरिक या नात्याने मला गाडीत पुढंची जागा देण्यात आली आणि संपूर्ण प्रवासात ती जागा माझ्यासाठी राखीव राहिली 😊  

कोलकाता ते बोलपूर हे अंतर सुमारे १५० किलोमीटर आहे. एकूण इथल्या लोकांना गाडीचा हॉर्न वाजवायची आणि गाडी वेगात हाकायची सवय आहे हे पहिल्या दहा-पंधरा मिनिटांतच लक्षात आलं. 

कोलकाता शहराबाहेरचा महामार्ग

आपल्याला (पश्चिम बंगाल बाहेरच्या लोकांना) शांतिनिकेतन माहिती आहे, पण बोलपूर माहिती नसतं. शांतिनिकेतन बोलपूरमध्ये आहे ही बोलपूरची मुख्य ओळख असं म्हणता येईल. पण बोलपूरला शांतिनिकेतनच्या आधीचाही इतिहास आहे, ओळख आहे.

बोलपूरमधली भातशेती 
बीरभूम जिल्ह्यातलं बोलपूर. खरं तर मी मी पर्यटक पाहतात तसं बोलपूर पाहिलंच नाही. शांतिनिकेतनला जाता-येता आणि रेल्वे स्टेशनवर जाताना जे दिसलं त्यावरून छान वाटलं. भातशेतीत (इथं तीन वेळा भात घेतला जातो आणि तिसऱ्या भातासाठी जमिनीखालच्या पाण्याचा भरपूर उपसा होतो) लावणीचं काम चालू होतं. त्यात स्त्रिया आणि पुरूष दोघंही सारख्याच संख्येने काम करताना दिसले. लाल माती दिसते आहे. रस्ते छोटे आहेत पण वाहनंही तितकी जास्त नाहीत. अनेक स्त्रिया आणि पुरूष सायकलवरून जाताना दिसले. अजून हे सायकलींचं शहर आहे असं म्हणता येईल. बरीच हॉटेल्स आणि होम-स्टे दिसले त्याअर्थी पर्यटक मोठ्या संख्येने येत असावेत.

मातीचं घर

बोलपूरला आम्ही पोचलो तोवर अंधार झाला होता. पण बाहेरून आम्ही घरात आल्या आल्या थंडी संपून एकदम उबदार वाटलं. मी आले होते अनासुआच्या घरात. मातीच्या दुमजली घरात. हे मातीचं घर बांधणारी वास्तुविशारद आहे अनुज्ञा. अनुज्ञाला साहाय्य करणारी दुसरी वास्तुविशारद आहे प्रतीक्षा.

अनुसुआचं हे घर केवळ सुट्टीसाठीचं दुसरं घर नाही, तर प्राथमिक घर आहे. ती इथं कायमस्वरूपी राहते. २०२४-२५ मध्ये मातीचं घर बांधणं आणि त्यात कायमस्वरूपी राहणं म्हणजे मागं जाणं नाही, तर पुढं पाहणं आहे. हवामान बदल, वाढती उष्णता, अनिश्चित पावसाळे आणि विजेचा अति वापर — या सगळ्या पार्श्वभूमीवर मातीचं घर हे एक चांगलं उत्तर आहे. माती उन्हाळ्यात घर थंड ठेवते, हिवाळ्यात उबदारपणा देते आणि माणसाला निसर्गाशी पुन्हा जोडते. एसी, फॅन, हीटर यांच्या आवाजाऐवजी भिंतींचं शांत श्वसन जाणवतं. अशा घरात राहणं हा एक निवांतपणाचा अनुभव होता. ते घर अनुज्ञाने बांधलेलं असल्यामुळे तर मला ते अधिकच जवळचं वाटलं.

अनासुआचं घर दुरवरून असं दिसतं

मातीचं घर पर्यावरणपूरक तर आहेच, पण ते सामाजिक आणि सांस्कृतिक विधानही आहे. स्थानिक माती, स्थानिक कारागीर, स्थानिक ज्ञान — यावर उभं राहिलेलं घर गावात रोजगार निर्माण करतं. स्थानिक कारागिरांच्या ज्ञानाची आणि कौशल्याची परंपरा ते जिवंत ठेवतं. मातीचं घर प्रतिष्ठेची, समृद्धीची प्रचलित व्याख्या मोडून काढतं. मातीचं घर सांगतं की निसर्गाशी नातं हीच समृद्धी आहे. सिमेंटच्या जंगलात उभं राहिलेलं असं मातीचं घर माणसाला आठवण करून देतं की आपण निसर्गावर राज्य करायला नाही, तर त्याच्यासोबत राहायला आलो आहोत.

बदकांचा विरंगुळा

अनुसुआचं घर प्रशस्त आणि हवेशीर आहे. भोवताली संथ वाहती हवा, आणि पक्षांचे आवाज. खिडकीतून सहज दिसणारं आकाश आणि पक्षी. तिच्या घरातल्या कुत्र्यांचा, कोंबड्यांचा, आणि बदकांचा सहज वावर आल्हाददायक होता. 

विसावा

अंगणात एक तळं होतं. 

अंगणातून दिसणारं घर. बाजूला भाताची पारंपरिक कणगी

बदकं रांगेने येत आणि त्या तळ्यात एकामागोमाग उड्या मारत ते पाहायला मजा आली. बागेत भाजीपाला आहे. भाताचं शेत आहे. आणखी एक – त्या घरात भरपूर पुस्तकं आहेत. कोणी कुठंही निवांत बसावं, वाटलं तर इतरांशी गप्पा माराव्या किंवा वाचत बसावं, काळी कॉफी किंवा  काळा चहा पीत बंगाली गीतं ऐकावी ... कोणत्याही गरजेसाठी माणसाला जणू घराबाहेर जायलाच लागू नये असं तिथलं वातावरण.

अनुज्ञाचं एक फेसबुक लाईव्ह पाहून अनुसुआला वाटलं की हीच वास्तुविशारद आपल्याला हवं तसं घर बांधू शकेल. आणि मग दोन अनोळखी व्यक्ती एकमेकींशी बोलल्या, आणि कामाला सुरूवात झाली. काम पूर्ण झाल्यावरही त्यांच्यातले भावबंध कायम राहिले. त्यातून मीही त्यांच्याशी जोडले गेले. तंत्रज्ञानाच्या सकारात्मक परिणामांचं हे एक जिवंत उदाहरण. आणि 'अनोळखी लोकांवर विश्वास ठेऊ नका' हे वारंवार सांगणाऱ्या सूचनांना आपण का नाकारलं पाहिजे याचंही एक उदाहरण. 

मातीच्या घरासंबंधी अधिक जाणून घ्यायचं असेल तर मातीमोलच्या फेसबुक पेजला अवश्य भेट द्या. 

खाद्यपदार्थ

रूढार्थाने मी खवय्या गटात मोडत नाही. स्थानिक पदार्थ मी नेहमीच चाखून बघते. पण अमूकच पाहिजे आणि तमूकच नको असं काही माझं नसतं. कुणी मला आवडती भाजी कोणती, किंवा आवडती मिठाई कोणती असं विचारलं तर मला धड सांगताही येत नाही. आधी बोलपूरमधल्या अनुसुआच्या घरात आणि नंतर कोलकात्यातल्या देबाहुतीच्या घरात मात्र खाद्यपदार्थांबाबत एक वेगळीज जागरूकता माझ्यात आली.

आम्ही सगळेच सुट्टीवर होतो, त्यामुळे घाई कुणालाच नसायची. नाश्त्याला आणि जेवणासाठी तुनिदीदी रोज वेगवेगळे पदार्थ हौसेने बनवत असायची. कोणत्याही जेवणाची सुरुवात कधीही घाईने होत नसे. बंगाली पद्धतीप्रमाणे जेवण हे एका विशिष्ट क्रमाने करायचं असतं. भात हे मुख्य अन्न. पण ते ताटात थोडंच वाढून घ्यायचं. सुरूवात करायची ती  शुक्तो  किंवा एखादी सौम्य (किंवा सौम्य कडवट चवीच्या) भाजीने. तिच्यासोबत पहिला भात संपवायचा. मग पुन्हा भात वाढून घ्यायचा. आता त्यासोबत डाळ (मसूर किंवा मूग) खायची. मग येणार  आलू पोस्टो, लाउ घोंटो  अशा भाज्या. मग येणार मासे. प्रत्येक जेवणात वेगवेगळे मासे. मी सुरूवातीला हौसेने नावं विचारली, मग हळूहळू सोडून दिलं नावांची काळजी करणं. मग येणार चिकन किंवा मटण. जेवणात बटाटा हवाच. पण मी पाहिलं की प्रत्येक भाजीसाठी बटाटा वेगळ्या पद्धतीने कापलेला असायचा.

पदार्थांची रांग होती, पण गोंधळ नव्हता. बंगाली जेवण म्हणजे मासे – असं मला वाटतं होतं, ते काही खरं नाही. शाकाहारातही प्रचंड वैविध्य आहे. प्रत्येक चवीला तिची जागा, तिचा वेळ. खाणं म्हणजे एक प्रवास वाटत होता — थेट मुख्य पदार्थावर उडी नाही, तर टप्प्याटप्प्याने पुढे जाणं. खाल्ल्यावर पोट भरल्यासारखं वाटायचं, पण डोकं जड होत नव्हतं — हीच त्या सिक्वेन्सची ताकद.

जेवणाचा शेवट नेहमी गोड आणि शांत. पायेश, छेना संदेश, रोसोगोल्ला  किंवा कधी मिष्टि दोई

गूळ-खोबऱं यांचं सारण असलेला 'पाटी-शाप्ता'

आधी खाल्लेल्या सगळ्या चवींना अलगद निरोप देणारी मिठाई. सगळे गोड पदार्थ नोरेन गुडमध्ये बनवलेले. नोरेन गुड म्हणजे बंगालच्या हिवाळ्याची खास ओळख. खजूराच्या झाडावरून पहाटे गोळा केलेल्या रसापासून बनवलेला हा गूळ फक्त काही महिन्यांसाठीच मिळतो. थंड हवेत रस हळूहळू आटवत नेला की त्यात साखरेसारखी तिखट गोडी न राहता धुरकट, मऊ, थोडी मातीची चव तयार होते. म्हणूनच नोरेन गुड  ही केवळ गोडी नाही, तर ऋतूची खूण आहे. वर्षभर सहज उपलब्ध नसणं हीच त्याची खासियत. गूळ आणि खोबरं यांचा वापर पदार्थांची चव वाढवत होता. त्या आठ-दहा दिवसांत मला हे प्रकर्षाने जाणवलं की बंगाली खाद्यसंस्कृतीत खाणं हे यज्ञकर्म किंवा उदरभरणही नाही तर शांत, संथपणे उपभोगायचा एक प्रवास आहे.

मातीच्या घरात निवांत राहताना शांतिनिकेतनला अर्थातच आम्ही विसरलो नव्हतो. पुढचे तीन दिवस वेगवेगळ्या निमित्ताने शांतिनिकेतन-विश्व भारती परिसरात फिरणं झालं. त्यासंबंधी अधिक जाणून घेऊयात पुढच्या लेखात.