ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Tuesday, November 23, 2010

५४. नवा निश्चय!

कोणे एके काळी आपण हाताने - म्हणजे अर्थातच पेन/ पेन्सिल आणि कागद - यांच्या साहाय्याने लिहित होतो हे जणू मी आता विसरुनच गेले आहे. भूर्जपत्रावर लिहिण्याच्या कलेइतकीच हाताने लिहिण्याची कला प्राचीन वाटू लागली आहे मला ..... हे चांगल की वाईट असा प्रश्नही मला पडत नाही.

खर तर संगणकाची आणि माझी ओळख तशी फार जुनी नाही. तसा कॉलेजमध्ये शिकत असताना 'संगणक' हा एक विषय होता आम्हाला. तेव्हा काही प्रोग्रामसुदधा लिहिले होते मी. आम्ही कागदावर लिहून तो कागद विद्यापीठात नेउन द्यायचो. तिथे एका मोठया खोलीत संगणक असायचा. विद्यापीठातल्या फक्त वरिष्ठ प्राध्यापकांना (आणि शिपायांना) त्या खोलीत जायची परवानगी होती. थोडं आत जायचं डेस्कपर्यंत तरी देवळात गेल्यासारख चपला बाहेर काढून जाव लागायच! एक गूढ़ वातावरण होत त्या संगणकाच्या भोवती! पण संगणकापेक्षा इतर गोष्टीतला रस वाढला आणि संगणक मागे पडला

मग काही वर्षांनी ओळखीच्या काही लोकांच्या घरी संगणक आला. तो कोणाकडून तरी - बहुतेक वेळा त्यांच्या मुला -मुलीकडून उघडून घ्यायचा आणि एखादा 'गेम' खेळायाचा इतकेही मला पुरेसे आव्हानात्मक वाटायचे - ते माझ्यासाठी तसे असायाचेही.

२००० मध्ये मी माझा इ-मेल अकाउंट उघडला. माझ्या एका मैत्रीणीच्या विद्यार्थ्याने पदवी मिळाल्यावर 'सायबर कॅफे ' उघडला होता. तिथे एकदा मैत्रीणीचे काम होते. ते होईपर्यंत नुसतीच बसून होते मी. तो विद्यार्थी म्हणाला, ' मैडम, तुम्हाला चेक करायची असेल मेल तर करा तोवर.' माझे इ-मेल अकाउंट नाही असे मी त्याला सांगितल्यावर त्याने मान डोलावली. त्याचा अर्थ काय होता कोणास ठाऊक! त्याने तत्परतेने मला अकाउंट उघडून दिले.

अकाउंट उघडल खर, पण मेल कोणाला पाठवायची? त्यावर तो बिचारा म्हणाला, "मला पाठवा." पहिली मेल मी माझ्या समोर बसून मला इन्टरनेटची शिकवणी देणाऱ्या मुलाला /माणसाला पाठवली. पुढे दोन तीन महिने नियमितपणे त्याच्याकडे जाउन मी इन्टरनेट शिकले! त्याला मजा यायची 'टीचर' च्या मैत्रीणीला शिकवताना!

पुढे २००० मध्ये मी एका सामाजिक संस्थेत नोकरी करायला लागले. संस्थेच कार्यालय भल मोठ असल तरी पाहिले काही महिने मला ना बसायला जागा होती ना संगणक होता! कोणी सहकारी कामानिमित्त प्रवासाला जाणार अस कळल, की मला आनंद व्हायचा. त्यांच्या जागेवर मला ते परत येइपर्यंत बसता यायचा आणि त्यांचा संगणक वापरता यायचा. संगणक वापरायची भीती वाटायची. काही बिघडले तर, असे सतत वाटत राहायचे. तेव्हा मला Microsoft ऑफिस वगैरे काही माहिती नव्हते.Word Document कसे लिहायचे, कसे save करायचे हा सगळा अनुभव माझ्यासाठी मजेदार होता. मग मी एक्स्सल शिकले, पॉवर पॉइंट शिकले. Laptop वर मीटिंग्सचा धावता अहवाल करण्यात मी वाकबगार झाले.

बघता बघता संगणक मला चांगला वापरता यायला लागला. मी इतरांना मदतही करायला लागले. मग सुरु झाले 'मेल' पर्व. मेल चेक करणे ही आवश्यक बाब न राहता ते जणू एक व्यसन झाले. कामाच्या दोन चार मेल रोज असायाच्याच. उरलेल्या काही आणीबाणीच्या मेल नसतात; आठ दिवस काय महिनाभर उत्तर नाही दिले तरी चालेल हे माहिती असायचे. तरीही संगणक दिसला कोठेही की 'इन्टरनेट कनेक्शन आहे का?' असे हमखास विचारले जायचे आणि मेल चेक केली जायची. ते एक प्रतिष्ठेचेही लक्षण होते असे आता मागे वळून पाहताना जाणवते.

माझे एक चांगले आहे. कोणतीही नवी गोष्ट मी अतिशय उत्साहाने करते - त्यात जीव ओतून करते, त्याच्या आरपार जाते. त्यात कितीही कष्ट पडले तरी मला त्याची तमा नसते. स्वत:ला झोकून देण्यात मला मजा वाटते. भान विसरुन मी नव्या नव्या गोष्टी करत राहते.

पण माझे एक वाईट आहे. कोणत्याही गोष्टीचा एकदा अंदाज आला की मला त्याचा कंटाळा येतो. मग मी नवे काहीतरी शोधते. त्याचा कंटाळा आला की आणखी नवे काही शोधते. काय शोधायचे आहे मला नेमके हे मी त्या नादात विसरूनही जाते.

इ-मेल च्या व्यसनाच्या नादात मधल्या काळात घरात संगणक आला होता. त्यामुले ऑफिस आणि घर यांच्यातल्या सीमारेषा पुसट होत गेल्या. रात्री एक वाजता एखाद्या Workshop चा रिपोर्ट पूर्ण करण ही माझ्यासाठी नित्याची बाब झाली.

कधीतरी असाच ब्लॉग विश्वाशी संबंध आला. मी उत्साहाने ब्लॉग सुरु केला. माझ्या ओळखीतल तेव्हा कोणीही ब्लॉग वाचतही नव्हत .. ब्लॉग लिहिण्याची तर गोष्ट लांबच! त्यामुळे मला एक नवे आव्हान मिळाले. त्यात अनेक चुका मी केल्या ... त्यामुळे शिकण्याची प्रक्रिया आनंददायी राहिली. थोडा एकटेपणा वाटायचा ... कारण ब्लॉग या विषयावर बोलायला कोणीच नव्हत माझ्याभोवती. त्यातला आनंद, त्यातला ताण, त्यातले समाधान, त्यातले यश, त्यातली फजिती ... एकटीने उपभोगताना मजा आली. आधी माझा ब्लॉग फक्त आमंत्रितासाठी होता नियमित लिहिणे जमते आहे याचा अंदाज आल्यावर मी तो सर्वांसाठी खुला केला.

मग मी एका ब्लॉग नेटवर्कमध्ये सामील झाले. कोणतीही अडचण आली, की नेटवर्कवर प्रश्न टाकायचा. त्यातले अनुभवी लोक उत्तर द्यायचे. त्यातून खूप शिकायला तर मिळालेच आणि अनेक ओळखीही झाल्या. इ-मैत्री ही एक नवी गोष्ट माझ्या आयुष्यात आली  आणि तिचा पुरेपूर आनंद मी घेतला -- सध्याही घेते आहे.

माझा पहिला ब्लॉग इंग्रजी भाषेत होता. तो व्यवस्थित चालायला लागल्यावर मी मराठी ब्लॉग सुरु केला. मराठी टाइपिंग हे आव्हान मोठे होते - कारण त्यात फॉण्टनुसार की बोर्ड बदलायचा. मग बरहा, ओपन ऑफिस यांचा आधार घेत घेत लिहित राहिले. या अडचणींमुळे मराठी ब्लॉग लिहिण्यात नियमितपणा नव्हता, प्रयत्नपूर्वक लिहावे लागायचे.

दोन ब्लॉग , वाढते काम यामुळे घरातला संगणक अव्याहत चालू राहू लागला. कोणताही ब्लॉगर जातो त्या हिट्स, कमेंट्स या चक्रातून मी गेले, त्यातून बाहेरही पडले.

या काळात हाताने लिहिण्याची कला मी जवळ जवळ विसरून गेले आहे म्हणा ना! आता दिल्लीत मी येताना Laptop घ्यायचा नाही विकत सध्या तरी- अस ठरवल! संगणकाच्या व्यसनातून बाहेर पडायची वेळ झालेली आहे असे माझे मला जाणवले. इथे मी एक सोडून तीन ऑफिसमध्ये जाते - प्रत्येक ठिकाणी रजेवर असलेल्या कोणीतरी सहकारी असतोच - मग त्या जागेवर बसते, तिथला संगणक वापरते – माझ्या लिहिण्यावर अनेक भौतिक मर्यादा येत आहेत हे सतत जाणवते.

पण एका दृष्टीने हेही बरेच आहे. संगणकावर थेट लिहिण्याचे अनेक फायदे आहेत - पण तोटेही अनेक आहेत. मुख्य म्हणजे संगणकावर undo ची सोय आहे - जी प्रत्यक्ष आयुष्यात नसते. ती आहे असा एक भ्रम संगणकाच्या अति वापरामुळे निर्माण होतो - निदान माझ्या बाबतीत तरी तसे झाले. लेखन पाहिजे तसे कट, पेस्ट करता येते त्यामुले विचार विस्कळीत राहतात - काहीतरी कसेतरी करायचे आणि मग शेवटी करू एडिट असे वाटत राहते. delete ची तर फार मोठी सोय आहे! त्यामुळे लिहिताना विचारात जी स्पष्टता आवश्यक असते तिचा अभाव माझा मलाच जास्त जाणवायला लागला आहे. हाताने लिहिताना जे खरोखर सांगणे गरजेचे आहे तितकेच लिहिले जाते - संगणकावर अवास्तव लिहिले जाते. आणि अति लिहिले की त्यात गुणवत्ता राहण्याची शक्यता कमीच!

कामासाठी संगणक वापरावा लागणार - आणि तो मला आवडतोही वापरायला. पण जे व्यक्तिगत आनंदासाठी लिहायचे ते आधी हाताने लिहायचे असे मी ठरवते आहे. त्यातून लिहिण्याची गती स्वाभाविकच कमी होइल, पण त्याने बिघडणार काहीच नाही.

कदाचित एकदा हा अनुभव पुरेसा घेउन झाला की मी परत भारंभार लिहायला लागेन. माझी गाडी परत मूळ पदावर येईल..


मी हे तुम्हाला इतकं सविस्तर का सांगते आहे? कारण ही पोस्टही मी थेट संगणकावर लिहिते आहे! :-)

नव्या निश्चयाची सुरुवात अजून बाकी आहे. :-)

14 comments:

  1. मी अगदी दोनेक वर्षांपूर्वीपर्यंत खूप लिहायचो हातानं. पण कॉम्प्युटरवर मराठी टंकन जमू लागल्यापासून तर अगदीच नगण्य झालंय. तुमच्या लेखामुळे मलाही ही जाणीव झालीय.
    पण मी कॉम्प्युटर कमी करू शकत नाही बहुतेक, पण लिखाण जरूर वाढवेन आता :)

    ReplyDelete
  2. तुझा संगणकीय प्रवास वाचायला मजा आली!
    दीर्घकाळ ई-लेखन-वाचन होत रहिलं कि हाताने लिहिणं कमी होतं हा अनुभव सार्वत्रिक आहे कि!
    अती वापरानंतर, किबोर्ड समोर असल्याशिवाय शब्द न सुचण्याचा अनुभवही येऊन गेला असेल!
    पण जग कितीही संगणकव्याप्त झालं तरी हाती लिखाण होतंच रहातं. कारण, घर/ऑफ़िसच्या बाहेर असताना, किंवा laptop ची battery संपली असताना लिहायची सुरसुरी हमखास येते...

    ReplyDelete
  3. नेहमीप्रमाणेच सध्या सोप्या विषयाची वेगळी मांडणी... मस्तच.. आणि शेवटची पंचलाईन झक्कास.

    माझंही हल्ली कागद-पेन घेऊन लिहिणं खूप कमी झालंय आणि हे तेव्हा अधिक जाणवतं जेव्हा पूर्वी जरा तरी बरं असलेलं अक्षर आता लिहिताना कोंबडी आणि अजून कुठल्या कुठल्या प्राण्यापक्ष्यांच्या पायांची आठवण करून देतात !!

    ReplyDelete
  4. विद्याधर, दुर्दैवाने आपण कोणीच आता संगणकाचा वापर कमी करू शकत (!) नाही. असो. पण तुमचे आणखी लेख वाचायला मिळतील ही आनंदाची बाब आहे.

    ReplyDelete
  5. अनु, माझं बहुतेक तेच झालय.. हाताशी आता संगणक नसतो फारसा म्हणून हाताने लिहायची इच्छा होतेय! कोल्ह्याला द्राक्षे आंबट!

    ReplyDelete
  6. प्रीती, येईल तुम्हाला पण हा अनुभव .. तुमचा ब्लॉग जुना झाला की!

    ReplyDelete
  7. हेरंब, अक्षराचा हा मुद्दा बरोबर आहे अगदी! मलाही माझं अक्षर आवडत नाही हल्ली!

    ReplyDelete
  8. मलाही हे जाणवतंय सध्या - पुढचे २ महिने लॅपटॉप नसणार आहे जवळ ... त्यामुळे अगदी प्रकर्षाने जाणवतंय. गेल्या रविवारीच लाडकं शाईचं पेन धुतलं, शाई भरली, आणि आपलं अक्षर किती वाईट झालंय हे बघून हादरले. लिहायला वेळ तर इतका लागतोय की पानभर लिहिता लिहिता हात अवघडला! आणि अनडू, कॉपी पेस्ट, स्पेल चेक या सुविधांच्या सवयीमुळे कागदावर लिहितांना खरंच अवघड वाटतंय. रोज पानभर तरी हाताने लिहायचं असं ठरवलंय त्यामुळे.

    ReplyDelete
  9. गौरीजी, मला वाटत, 'हाताने लिहिण्याची' एक चळवळ आपण उभारू शकतो :-)

    ReplyDelete
  10. अगदी बरोबर... संगणकावर लिहीताना विचार विस्कळीत होतात... हाती लिहीताना ते सलग, सुसंबद्ध, सरळ असावे लागतात.... त्यातून विचारात आणि वागण्यात एक प्रकारची शिस्त येते...

    म्हणूनच संगणकाचा अतिरेकी वापर करणारे लोक बेशिस्त होत जातात का...?

    ReplyDelete
  11. राजेश, या प्रश्नाच उत्तर तू किती संगणक वापरतोस त्यावर अवलंबून आहे .. dipolomatic उत्तर नाही हे ... काय stage ला तुम्ही आहात त्यावरून बरयाच गोष्टी ठरतात!

    ReplyDelete
  12. हया अनडु,कट वैगेरेचे कितीही दुष्परिणाम असले तरी हाताने पुर्ण पोस्ट लिहण एकदम अशक्य वाटतय सध्याच्या घडीला...तरी कधी कधी मुद्दे लिहत असतो कागदावर,पण तुमच्या सर्वांसारखीच अक्षर माझ्यावरही रुसलेली आहेत...शेवट आवडला... :)

    ReplyDelete
  13. देवेन, बघू जमतंय का ते!

    ReplyDelete