ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Wednesday, July 13, 2011

८०. आमंत्रण

मी आधी ज्या ऑफिसात काम करायचे, ते तसं मोठं होतं. म्हणजे बारा तेरा राज्यांत पसरलेलं काम आणि सुमारे ३००० माणसं!  त्यातले काही लोक ३० ते ३५ वर्ष याच संस्थेत काम करणारे तर काही नुकतेच आलेले. वेगवेगळ्या राज्यातले, वेगवेगळ्या भाषा बोलणारे, वेगवेगळी पार्श्वभूमी असणारे, वेगवेगळे शिक्षण असणारे, वेगवेगळे स्वभाव असणारे, वेगवेगळ्या आवडीनिवडी  आणि वेगवेगळे काम करणारे असे हे ३००० लोक म्हणजे मोठा जनसमुदाय होता. 
मला दहा वर्ष काम करूनही सगळे लोक माहिती नव्हते इथले. काही लोकांबरोबर मी अगदी जवळून काम केले; काहीना मी क्वचित प्रसंगानिमित्त भेटले;  काहीबरोबर मला बोलण्यासारखे काही नसे - त्यांनाही नसे अर्थातच माझ्याशी बोलण्यात रस! काहीना मी ओळखत असे पण ते मला ओळखत नसत आणि काही मला चांगले ओळखत असून मला मात्र त्यांचे नावही माहित नसे. पण त्याने फार काही बिघडत नव्हते. आपल्या ओळखीचे लोक खूप कमी असतात तेव्हाही आपले काम व्यवस्थित चालले असेल तर जगणे छान चालू राहते. 
त्या दिवशी मी अशीच संगणकात डोकं खुपसून बसले होते - एका प्रकल्पाची रूपरेखा लिहिण्याच काम चाललं होतं माझं. तेवढ्यात मला मोठमोठ्याने बोलण्याचे आवाज आले. "हं ! तिथेच, उजवीकडे बघा, बसलेल्या आहेतच त्या तिथं' अस माझा एक सहकारी कोणाला तरी सांगत होता. अशी कोणाला तरी शोधत माणसं नेहेमी यायची त्यामुळे या संवादात लक्ष वेधून घेण्यासारख काही विशेष नव्हतं. मी पुन्हा कामावर लक्ष केंद्रित केलं. 
दोनच मिनिटांत माझ्या केबिनच्या दारात कोणीतरी घुटमळत आहे अशी मला जाणीव झाली. मान वर करून पाहिलं तर गांधी टोपी घातलेले एक पन्नाशीचे गृहस्थ दिसले. त्या टोपीमुळे आधी मी त्यांना एकदम ओळखलं नाही. मग त्यांच नाव आठवलं मला. एक दोनदा बोललो होतो आम्ही एकमेकांशी दहा वर्षांत! त्यावरून तुम्हाला आमच्या ऑफिसच्या वातावरणाची कल्पना यावी! ते दुस-या ऑफिसात असतात हे खरं पण इथंही यायचे ते नेहमी म्हणून मला ते माहिती होते. 
मी उभी राहिले आणि त्यांना विचारल, "कोणाला भेटायचं सर?"

मी काम थांबवून त्यांच्याशी बोलले म्हणून त्यांना बरं वाटलं! 
ते म्हणाले, "मला ............... यांना भेटायचं आहे."
त्यांनी जे नाव घेतलं ते माझंच होतं. 


ते जिला शोधताहेत ती व्यक्ती मीच होते हे त्यांच्या लक्षात आलेलं दिसत नव्हतं. 
हे पण आमच्या ऑफिसात नेहमी व्हायचं. 
मी हसले. म्हणाले, "मीच ती. सांगा सर, काय काम आहे ते.
आपण या बाईना ओळ्खलं नाही हे लक्षात येऊन त्यांना कानकोंडं वाटलं. 

चेह-यावरचा घाम पुसत ते  म्हणाले, "माझा नेहमीच घोटाळा होतो त्या ................  आणि तुमच्यात."
आता खरं तर आम्हा दोघींत आम्ही 'बाई' आहोत ही एक गोष्ट सोडली तर काहीही साम्य नव्हतं. 
पण ठीक आहे, त्यामुळे माझं काही बिघडत नव्हतं. 
आम्ही काही एकमेकाना फार ओळखत नव्हतो त्यामुळे त्यांनी माझा चेहरा विसरणं स्वाभाविक होत! 
मी पुन्हा शांतपणे बोलले,  "होतं असं सर. असू द्या. पण काम काय आहे तुमचं माझ्याकडं?" 
मग त्यांनी आपली बॅग उघडून त्यातून माझं नाव लिहिलेली एक आमंत्रण पत्रिका काढली. त्यांच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका होती ती.  पुढच्या आठवड्यात असलेल्या लग्नाचं आमंत्रण मला द्यायला ते आले होते. मी त्यांच्या मुलीचं अभिनंदन केलं. होणारा जावई काय करतो, लग्नानंतर मुलगी कोणत्या शहरात जाणार अशी चौकशी केली. 
खरं तर औपचारिकता साधारणपणे इथं संपते. पण निघताना ते गृहस्थ मला 'न विसरता या बरं का' असं पुन्हा पुन्हा आग्रहाने सांगत राहिले.
ते गृहस्थ निघून गेल्यावर मी काम करायची थांबलेच एकदम.
ज्या माणसाला माझं नावही नीट माहिती नाही, ज्याना माझ्याबद्दल काहीही माहिती नाही, जे मागच्या दहा वर्षांत माझ्याशी क्वचित फक्त दोन चार वाक्य बोलले असतील ... ते नेमकं कशासाठी मला त्यांचा 'खासगी' आनंदात सहभागी व्हायला सांगत होते?
आमची ओळख नसताना त्यांच्या आनंदात मी उत्साहाने सामील होईन अस त्यांना का वाटलं असेल? असलं औपचारिक आमंत्रण मला आवडेल अस त्यांनी का गृहित धरलं असेल? 
माणसानी लग्न करावं की नाही, कोणाशी करावं, कधी आणि कस करावं - हे व्यक्तिगत निर्णय असतात. त्याच्याबद्दल म्हणून माझ काही मत नसतं. 
त्यांच्या मुलीला पुढचं -म्हणजे वैवाहिक - आयुष्य सुखाचं जावो अशी माझी शुभेच्छा आहेच. 
पण ....
असली आमंत्रणं म्हणजे एक औपचारिकता असते हे मला माहिती आहे. 
रूढी, परंपरा, 'लोक काय म्हणतील' अशा धाकाने आपण अनेक गोष्टी करतो, त्यात जीव न ओतताच करतो. 
स्वत:ला काय हवं आहे हे अनेकदा आपल्याला कळत नाही आणि कळलं तरी तसं वागायची हिमंत नसते - जनरीत असं गोंडस नाव आपण त्याला देतो. 
समाज म्हणून एकत्र जगायचं तर काही नियम, काही रीतीरिवाज हवेत हे बरोबर आहे. आपल्या व्यक्तिगत आयुष्यात अंदाधुंद जगणं तोवरच चालावं जोवर त्याचे दुष्परिणाम इतरांना भोगावे लागणार नाहीत - हे मलाही मान्य आहे. 
पण यामुळे  अनेकदा जगण्यात कृत्रिमता येते, दांभिकता येते, त्याचंही ओझं होतं. 
किंमत अशीही मोजायची आणि तशीही - तर मग निदान किंमत मोजून आपल्या मर्जीचं आपण का जगू नये? कुठवर लोकांची भीती बाळगत जगायचं? 
अशी वरवरची आमंत्रणं देऊन जमवलेल्या गर्दीपेक्षा एकटेपणा काय वाईट? 
पण तसं होत नाही.

आमंत्रण देऊन उगीच  माणसं गोळा करणं, आणि त्या  माणसांच्या गर्दीत एकट असणं -  ही देखील आपली परंपरा आहे!! 
**

11 comments:

  1. आमंत्रण देऊन उगीच माणसं गोळा करण, आणि त्या माणसांच्या गर्दीत एकट असण - ही देखील आपली परंपरा आहे!! ++++++++

    बाकी लेख नेहमीसारखाच ....अचूक मुद्दा पकडणारा ...

    ReplyDelete
  2. aapan enjoy karatana dusaryala tras honar nahi yachi kalaji ghetalich pahije........

    ReplyDelete
  3. मला तर सध्याची एकूणच विवाह्पद्धत अजिबात आवडत नाही......
    बाकी लेख नेहमीसारखाच ....अचूक मुद्दा पकडणारा ... +१

    ReplyDelete
  4. लीना, :-)
    वैभवजी, याबाबत आपली सहमती आहे.
    देवेन. पद्धत बदलायला हरकत नाही. पण अनेकदा आपल्याला पर्याय सापडत नाहीत हेच जास्त खर!

    ReplyDelete
  5. सशक्त पर्याय शोधायला हवेतच, ते नसल्याने अनेक बाबतीत होते तशी याही बाबतीत कोंडी होतेच!

    ReplyDelete
  6. सवयीच्या वाटा आंधळ्या
    विधी राहिले, अर्थ हरवले
    कधी वळून पहा मागे.

    ReplyDelete
  7. प्रीति, हे पर्याय शोधात असतातही अनेक लोक पण ते इतरांपर्यंत पोचत नाहीत बरेचदा. त्याबद्दल काहीतरी करायला हव!

    रेमीजी, तुमच्या या ओळी अतिशय समर्पक आहेत.

    ReplyDelete
  8. ’ समाज ’ या शब्दाचाच बागुलबुवा करून स्वत:ला व इतरांनाही त्याच्या बंधनात अडकवण्याची परंपरा आपली... :( आणि भीड ही जन्मजात वैरीण...:(:(

    तुझ्या मुद्द्याशी सहमत!

    ReplyDelete
  9. एकदम कळीचा मुद्दा आहे..उगाच लोक गोळा करायचे आणि गर्दीत एकट राहायचं...

    ReplyDelete
  10. अपर्णा, बहुतेक आपल्याला असा विरोधाभास आवडतो!

    ReplyDelete