ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Tuesday, January 31, 2012

१११. संशयाचा फायदा


“तुमचं नाव काय?” फोनवरचा अपरिचित आवाजातला प्रश्न ऐकून मी दचकते.
मी त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार नाही फारशी – स्वाभाविकच.
म्हणजे प्रश्न काही तसा नवा नाही. अनेकदा याचं उत्तर द्यावं लागतं. आणि स्वत:चं नाव लपवून ठेवण्यात मला स्वारस्य नाही.
पण आत्ता मी फोन लावते आहे तर तो दुस-याच कोणाकडे गेला आहे. मला वाटतं नेहमीसारखी ‘क्रॉस- कनेक्शन’ची भानगड असणार. पण नाही. समोरचा  माणूस टेलिफोन कंपनीचं नाव घेतोय. तो सांगतो की ‘ग्राहकांची ओळख पटवण्याची’ प्रक्रिया चालू आहे. मी माझी ओळख पटवेपर्यंत  मी केलेले सगळे फोन त्याच्याकडेच जाणार. थोडक्यात त्याच्या प्रश्नांची उत्तरं देण्याविना माझ्या हातात दुसरा पर्याय नाही.
मला अशी  ‘दुसरा पर्याय नसण्याची’ परिस्थिती आवडत नाही. मग मी हमखास पर्याय शोधायला लागते.
पण तूर्तास मी मुकाटयाने त्याला माझं नाव सांगते.
“पूर्ण नाव सांगा”, तो ओरडतो. मी तेही सांगते.
“तुमच लग्न झालंय कां?” पुढचा प्रश्न.
आता हे जरा जास्तच होतंय, मर्यादा ओलांडून चाललंय असं मला वाटतं.

लग्नाबाबतच्या प्रश्नातही नवीन काही नाही. तुम्ही मला अतिशयोक्ती करायची परवानगी दिलीत; तर ‘या प्रश्नाचं उत्तर आजवर मी लाखो वेळा दिलंय’ अस मी सहज म्हणू शकते. लोकांना कौटुंबिक –खरं तर खासगी स्वरूपाचे – प्रश्न विचारण्यात फार रस असतो. घरी कोण असतं, किती शिकलात, लग्न झालं कां, मुलंबाळं किती, नोकरी करता का, पगार काय मिळतो – एक ना दोन हजार प्रश्न! सर्वेक्षणासारख्या कामात गरज पडते तेंव्हा मी असे प्रश्न विचारते – विचारावेच लागतात मला – पण एरवी मी त्यांच्या फंदात पडत नाही. अशी माहिती मिळून कोणाची ओळख होते असं मला वाटत नाही. पण कुणी मला ते विचारले तर मात्र मी उत्तर देते – टाळत नाही. मी मागची जवळजवळ पंचवीस वर्ष लोकांबरोबर काम करते आहे. रोज मी कोणत्या तरी नव्या गावात याच प्रश्नांची उत्तरं देत असते.

मी जर लोकांना हे प्रश्न विचारते आणि त्यांच्याकडून उत्तराची अपेक्षा करते – तर त्यांनाही मला ‘खासगी’ प्रश्न विचारायचा अधिकार आहे हे माझं एक तत्त्व आहे. फक्त मी प्रश्न विचारायचे आणि त्यांना मात्र तो अधिकार नाकारायचा हे फारच एकतर्फी होईल याची मला जाणीव आहे. लोकांवर विश्वास टाकण्याचा माझा स्वभाव आहे – त्यामुळे माझ्या भावना, माझे विचार, माझ्या कल्पना, माझ्या आयुष्यातली वास्तविकता हे सगळं त्यांना सांगायला मला संकोच वाटत नाही. क्वचित प्रसंगी ‘मला हे तुम्हाला आत्ता सांगता नाही येणार’ किंवा ‘माझी इच्छा नाही तुम्हाला सांगायची’ असंही मी म्हणते आणि साधारणपणे लोक हे हसून घेतात. त्यांची संवेदनशीलता बहुतेकवेळा वाखाणण्यासारखी असते.

पण एखादी व्यक्ती आपल्या समोर असते तेव्हा अशा प्रश्नाची उत्तरं देणं वेगळं – इथं हा गृहस्थ फोनवर मला हे विचारत होता.
ज्यांच्यासमवेत मी काही वेळ घालवते – त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणं वेगळं – इथं काही तसं नव्हतं.
मलाही जेव्हा प्रश्न विचारायची मुभा असते तेव्हा त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणं वेगळं – इथं मात्र एकतर्फी कारभार होता.
मला कोणतीच गोष्ट एकतर्फी आवडत नाही.

मी प्रसंगाची सूत्र हातात घेतली.
“हे पहा श्रीमान, ग्राहकाची ओळख पटवण्यासाठी वैवाहिक स्थितीचा प्रश्न आवश्यक आहे असं मला वाटत नाही,” माझा स्वर नियंत्रित होता पण नक्कीच मैत्रीचा नव्हता. “शिवाय तुम्ही खरोखरच या  टेलिफोन कंपनीचे आहात कां याची खात्री करून घेण्याचं कोणतंच साधन आत्ता माझ्या हातात नाही. (कारण मी केलेला फोन मधेच यांना जोडला गेला होता), त्यामुळे मी तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देवू शकत नाही आणि देवू  इछितही नाही. तुम्ही टेलिफोन कंपनीचे असलात तरी तुम्हाला हा प्रश्न विचारायचा अधिकार नाही. “ ठामपणे बोलायला लागले की मी माघार घेत नाही.
“मग मला तुमचं कनेक्शन तोडावं लागेल” तो गृहस्थ तितक्याच ठामपणे म्हणाला.
“माझ्याबद्दल काही तक्रार नसताना आणि पूर्वसूचना दिल्याविना तुम्ही असा  फोन बंद करू नाही शकत” आता मला जरा राग यायला लागला होता.
“तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या; नाहीतर तुमचा फोन लगेच बंद होईल,” त्याने मला धमकावलं.

मी उत्तरं दिलं नाही. पुढच्या क्षणी माझा सेलफोन बंद झाला. मी फोन करू शकत नव्हतेच पण मलाही  कोणी फोन करू शकत नव्हतं. हे जरा अती झालं. म्हणजे येणारे फोन तरी चालू ठेवायला पाहिजे होते त्यांनी. हे घडलं तेव्हा  संध्याकाळचे साडेसात झाले होते फक्त.

मागच्या तीन वर्षांपासून मी बी. एस. एन. एल. चा ‘सेलवन’ वापरते आहे. खेडोपाडी हिंडताना त्याची रेंज चांगली असते त्यामुळे सेलवन बद्दल माझी कसलीही तक्रार नाही. शिवाय त्यांचं रोमिंग फार महाग नाही. पण मी दिल्लीत आले आणि इथं बी. एस. एन. एल.च्या रेंजचे वांधे आहेत हे लक्षात आलं. फोन मला धड घेताही येत नव्हते – करण्याची बाब तर लांबच! मग मला मुकाट्याने दुस-या कंपनीची सेवा घ्यायला लागली. मी शहाणपणाने बी. एस. एन. एल . पण चालूच ठेवला होता -  असावा हाताशी पर्याय म्हणून.  

या नव्या कंपनीला मी सेवा घेताना योग्य ती कागदपत्रं दिली होती त्याला काही महिने उलटून गेले होते. या कंपनीने ‘ग्राहक ओळखी’संबंधात मला ना काही संदेश पाठवला होता, ना त्यांनी आपण होऊन मला फोन केला होता. त्याऐवजी माझा बाहेर जाणारा फोन वळवून त्यांचा माणूस (तो तसा असलाच तर!) माझ्याशी बोलत होता. शिवाय तो माणूस काही नीट बोलत नव्हता – उद्धट होता तो एकंदरीत. त्या सगळया विचारांसह फोन बंद होण्याचा मला खरच वैताग आला. मी ज्याच्याकडून फोनसेवा घेतली होती, त्या डीलरला फोन केला (बीएसएनएल फोनवरून), पण त्याला काही समजत नव्हतं मी काय म्हणत होते ते. रात्र झाली असल्याने मीही फार काही करू शकत नव्हते. मग मुकाट्याने झोपले.

जेव्हा एखाद्या ‘व्यवस्थेचा’ आपल्याला त्रास होतो, तेव्हा ती सगळी व्यवस्था मोडीत काढण्याकडं आपला कल असतो. पण मला अनुभवानं हे माहिती आहे की एखाद्या असंवेदनशील , बेजबाबदार, बेशिस्त, असमंजस, उद्धट माणसावरून मी पूर्ण व्यवस्थेबद्दल माझं मत बनवण्याची घाई करू नये. अशी स्वार्थी माणसं पूर्ण व्यवस्थेलाच वेठीस धरणार नाहीत हे आपणही पाहायला हवं. अशा माणसांच्या माध्यमातून व्यवस्थेचे कच्चे दुवे दिसतात हे खरंच – पण ते म्हणजे काही पूर्ण चित्र नसतं कुठेच! व्यवस्था आणि व्यवस्थेचा चेहरा आपल्यासमोर घेऊन येणारी व्यक्ती यात फरक करायलाच हवा. व्यवस्था चुकीची असेल तर त्याविरुद्ध लढायला पाहिजे यात शंकाच नाही – पण  ते करताना एखाद्या माणसावरचाच राग आपण व्यवस्थेवर काढत नाही ना हेही पाहिलं पाहिजे.

जय नावाच्या माझ्या एका मित्राकडून त्या कंपनीच्या संबंधित अधिका-याचा इमेल मला मिळाला होता – त्यावर  मी दुस-या दिवशी सकाळी साडेदहाच्या सुमारास लिहिलं. कंपनीच्या संकेतस्थळावर ग्राहक सेवा केंद्राचा पत्ता होता, तिकडंही तेच पत्र पाठवलं इमेलद्वारे. एका बैठकीत तिथले एक वरिष्ठ अधिकारी मला भेटले होते – त्यांनाही त्या पत्राची प्रत पाठवून दिली. त्यात मी घटनाक्रम सविस्तर – जसा झाला तसा – लिहून पुढे म्हटलं, “मी एक जबाबदार नागरिक आहे. सध्याच्या वातावरणात ग्राहक ओळख पटवण्याची गरज मला समजते. पण त्याचबरोबर तुम्ही जी पद्धत त्यासाठी उपयोगात आणली ती मला आवडली नाही. ज्याची ओळख पटून तुम्ही सेवा दिलीत अशा माझ्यासारख्या ग्राहकाला मी जणू काही दहशतवादी आहे अशा थाटात तुम्ही वागवावं याचं मला दु:ख झालं. माझी काही चूक नसताना तुम्हाला असं वागण्याचा अधिकार नाही.” हे लिहून झाल्यावर ग्राहकांना त्रास होणार नाही यासाठी काय सुधारणा करता येईल याबद्दलचे माझे विचार मी लिहिले. मी सोबत माझ्या घरचा पत्ता (जो मी त्याना आधीच दिला होता) आणि माझा कार्यालयीन पत्ताही कळवला.

हे सगळ निस्तरायला पुढचे किमान चोवीस तास तरी लागणार हे मी गृहित धरलं होतं. त्या वेळात उत्तरं नाही आलं, तर पुढं काय करायचं याचाही मी बेत केला होता.

पण आश्चर्य म्हणजे मला तासाभरात कंपनीचा झाल्या गोष्टीबद्दल सखेद माफी मागणारा संदेश आला. त्यांनी मला सेवा पुन्हा सुरु करण्याविषयीची  सविस्तर माहिती – आधी काय करायचं, मग काय, त्यानंतर काय – पाठवली. ती वापरून मी फोन सुरूही केला.

एक बेजबाबदार, असंवेदनशील माणूस – व्यवस्था कोलमडते.
एक संवेदनशील आणि जबाबदार माणूस – व्यवस्था चालते.

पण माझ्या मनात काही शंका आहेत.
प्रत्येक तक्रारीचं या पद्धतीने त्वरित निवारण होतं कां? प्रत्येक ग्राहकाची तक्रार इतक्या गांभीर्याने घेतली जाते कां? का मी जे कामाचं ठिकाण त्यांना कळवलं – त्याचा परिणाम झाला हा? त्यांच्या वरिष्ठ अधिका-याला मी ओळखत होते (आणि ते मला ओळखत होते) त्यामुळे झटपट हालचाल झाली कां?
ग्राहक ओळखीच्या नावाखाली असे खासगी प्रश्न विचारण कंपनी खरंच थांबवेल कां? त्यांची पद्धत सुधरेल कां? त्यांचे लोक अधिक नम्र आणि संवेदनशील होतील कां?

माहिती नाही.
मी त्यांना ‘संशयाचा फायदा’ देतेय.
आपण तेच तर करत असतो पुन्ह्पुन्हा.
२०१० मध्ये घोटाळे झाले – तरी आपण २०११ मध्ये , पुढे २०१२ मध्ये सगळ काही सुरळीत होईल अशी अपेक्षा करतोच की! २०१२ला आपण ‘संशयाचा फायदा’ देत असतो.
लोकशाहीची पूर्ण व्यवस्थाच ‘संशयाचा फायदा’ देणारी आहे – मग ते नेते असोत, पक्ष असोत, मतदार असोत, पत्रकार असोत..... भ्रष्टाचार विरोधातलं आंदोलन असो ....
काही वेळा आपले सहकारी, शेजारी, ओळखीचे लोक, मित्र-मैत्रिणी अनपेक्षितपणे वाईट वागतात .... पण आपण ‘ठीक आहे, झालं असेल काही तरी तेव्हा ‘असं म्हणत त्यांना संशयाचा फायदा देतोच  की ...
कधी कधी आपणही बदलतो. आजवर जे वागत आलो होतो, त्यापेक्षा वेगळं वागतो एकदम. त्यावेळी तर्काचा, अनुभवाचा... कशाचा तरी आधार घेऊन आपण आपल्या वागण्याचं समर्थन करतो .... अशा वेळी आपण स्वत:लाही ‘संशयाचा फायदा’च देत असतो.   

नियम, शिस्त, व्यवस्था, परंपरा ..... या सगळ्याला एक चौकट आहे ....  ती मोडली जाते – भल्यासाठी किंवा   बु-यासाठी  - तेव्हा संशय येतो. पण त्या  व्यवस्थेवर  आंधळा विश्वास ठेवून स्वत;ला त्रास करून घेण्यापेक्षा अपवाद म्हणून संशयाचा फायदा देणं आणि घेणं परवडलं.

विशेषत: अशा ‘संशयाच्या फायद्यातून’ सुख, शांती, समाधान मिळत असेल तर  नक्कीच!
**

Thursday, January 26, 2012

११०. पडले तरी ...

फोन वाजला. गप्पा सोडून बाहेर गेले. 
एक फोन, त्यातून दुसरा, त्यातून तिसरा असं करत मी चांगली अर्ध्या तासाने आत आले. 
मी आल्यावर क्षणभर शांतता.
अंदाज होताच मला, तरीही मी निरागसपणे विचारलं, "काय बोलत होतात एवढ?" 
"मी आल्यावर शांत  का झालात?" हा मी स्पष्ट न विचारलेला प्रश्न अगदी स्पष्ट होता. 
"तुझ्याबद्दलच बोलत होतो अर्थात" धनश्री म्हणाली.
मी अनेक किस्से देते त्यांना बोलायला त्यामुळे त्यात मला काही नवं नव्हत, त्यांनांही नव्हत! 
आज मी चुकीच्या ठिकाणी उतरले होते. जागेची खात्री न करताच चारचाकी सोडून दिली होती.  
मग रिक्षावाले नाही म्हणाले  - कारण मला बरोबर विरुद्ध दिशेला जायचं होत. 
त्यावर रस्ता ओलांडून पलिकडे जाण्याचा पर्याय माझ्याकडे होता.
किंवा त्याहून म्हणजे एक फोन केला तर कोणीही मला तिथवर घ्यायला आलं असत - अगदी आनंदाने.
पण मी चालायला सुरुवात केली.
रस्त्यावर फारशी वाहतूक नव्हती. सुनसान होता रस्ता. 
आजूबाजूला घरं - दुकान नव्हती. माणसही नव्हती. 
एकदम शांतता. 
पण हवा मस्त होती. 
मला चालायला मजा येत होती. 
सामान हातात थोड कमी असत तर चाललं असत - पण त्याने फार काही बिघडत नव्हत.
अशा रीतीने मी पाउण तास उशीरा पोचले होते. 
आणि त्यावरच माझ स्पष्टीकारण जेमतेम देऊन झालं होत, तोवर मी फोनमुळे बाहेर गेले होते.
"तुझा दृष्टिकोन फार सकारात्मक आहे , मला हेवा वाटतो तुझा ..." प्रिया  म्हणाली. 
"आणि कोणत्या अडचणींना घाबरत नाहीस तू" अनुराधा म्हणाली.
"असलं बोलून तुम्ही तिला बिघडवून टाकताय अजून" जयेश एकदम वैतागला होता. 
"का रे बाबा?" अमित बोललाच.
"अरे, ही चुकून भलतीकडे उतरली .. म्हणजे हिला इतक्यांदा इथ येऊनही रस्ता कळला नाहीये..." जयेश म्हणाला. 
"त्यात भर म्हणजे रिक्षा करावी किंवा आपल्याला फोन करावा हे तिला सुचलं नाही. ..." जयेशच चालूच.
"हो रे बाबा, पण मला चालायचं होतच .. कितीतरी दिवसांत मी अशी एकटी चालले नव्हते .. मग घेतली संधी ..." मी त्याला जरा शांत करायचा प्रयत्न केला. 
"तुला अंदाज होता तू किती मागे उतरली आहेस ते?" त्याने माझ्यावर नजर रोखत विचारलं.
"मला वाटल पंधरा मिनिटांत पोचेन मी इथवर .. " मी सांगायचा प्रयत्न केला.
"हेच मला तुझ आवडत नाही ..." आता संतोष खेळात सामील झाला.
"अरे बाबांनो,  माहिती आहे ना तुम्हाला हिचा स्वभाव ...." कीर्ति माझी बाजू घेत म्हणाली. 
"बदलायला नको का हा हिचा स्वभाव?" जयेश  मला आज एवढ्या गांभीर्याने का घेत होता, माहिती नाही. 
मग बराच काळ सगळ्यांनी एकेमेकांना सुनावण्यात गेला. मी शांत होते. मला अशी चर्चेच्या केंद्रस्थानी असण्याची सवय नाही. एरवी मी विषय बदलला असता .. पण आज मला कोणी दाद देत नव्हत. 
काही काळाने एक गोष्ट - जी बहुतेक जयेश, अमित, संतोष. ऋतुजा. मेघना  मघापासून सांगायचा प्रयत्न करत होते  - माझ्या लक्षात आली. 
एखाद्या प्रसंगात सकारात्मक दृष्टिकोन असण ही बाब वेगळी.
पण मी प्रत्येक प्रसंगातून  - मला काहीतरी शिकायला कसे मिळालं, मला त्यात कशी मजा आली  यावरच लक्ष केंद्रित करत असते!  हा माझा एक स्वभाव बनला आहे. 
ज्याच वर्णन आणखी एका प्रकारे करता येईल. ते म्हणजे 'पडले तरी नाक वर...' 
सकारात्मक दृष्टिकोनाच्या गोंडस नावाखाली मी केवळ बदलायला नकार देत आहे असं नाही तर मी माझ्या अहंकाराला पण खतपाणी घालते आहे. 
मी हसून म्हणाले, "बरोबर. एकदम कबूल. मला माझा स्वभाव बदलायला पाहिजे हे मला पटलं आहे ..." 
त्यावर सगळ्यांनी निश्वास टाकला.
त्यांचा आनंद क्षणभरच टिकला पण.
कारण पुढच्याच क्षणी मी मूळ पदावर जात म्हणाले, "आता यावर एक लेख लिहायला हरकत नाही ...." 

Wednesday, January 18, 2012

१०९. इडली आणि पनीर


‘तू जाशील का चेन्नैला एका सेमिनारसाठी’ असं मला विचारलं, तेंव्हा मी लगेचच तयार झाले. चेन्नैला जायची संधी आली की मी एका पायावर तयार असते. तशी या शहरात मी एखाद्या रात्रीपुरता मुक्काम वगळता फारशी कधी राहिलेली नाही. पण अनेकदा कन्याकुमारीला जाण्यासाठी मुंबईहून थेट तिकीट नाही मिळालं; की चेन्नैला यायचं आणि पुढची गाडी पकडायची असा खात्रीचा पर्याय असायचा. पुदुच्चेरीला जायची वाटही इथूनच. आणि एकदा मी रमण महर्षी आश्रमात गेले तीही इथूनच. म्हणून चेन्नैची माझी फार ओळख नसली तरी या शहरावर माझं प्रेम आहे. चेन्नैवरच्या प्रेमाचं आणखी एक छुपं कारण म्हणजे मला फिल्टर कॉफी आवडते आणि ती तिथं सहजगत्या मिळते, भरपूर मिळते. दहीभात खावा तर तिथलाच! आज ते शहर बदललं आणि मी तर त्याहून अधिक बदलले – पण चेन्नैचं माझं नातं मात्र मजबूत आहे.

चेन्नैला पहिल्या रात्री जेवणात उत्तर भारतीय (म्हणजे पंजाबी!) पदार्थ पाहून मी चकित झाले. त्या हॉटेलमधले वेटर्स छान हिंदी बोलत होते. 'दहीभात नाही' हे ऐकल्यावर मी वेगवेगळे पर्याय देत गेले आणि दुर्दैवाने त्यापैकी एकही उपलब्ध नव्हता. वेटरला माझ्या मागणीचं नवल वाटत होतं, हे उघड होतं. शेवटी त्यांच्यातला (बहुधा वरिष्ठ) वेटर येऊन मला म्हणाला, मी तुम्हाला सर्वोत्कृष्ट उत्तर भारतीय जेवण देतोय, ते खाऊन तर बघा, तुम्ही दही-भात विसरून जाल .. खाण्याचे माझे फारसे नखरे नसतात. त्यामुळे मग मी पनीर, पराठा, आलू असं काहीबाहीखाल्लं आणि भूक निभावून नेली.

दुस-या दिवशी सकाळच्या नाश्त्यात कॉर्नफ्लेक्स, डबाबंद फळांचा रस, ब्रेड, बटर, ऑम्लेट, पुरी -भाजी  ... असे ठराविक पदार्थ होते आणि त्याच्या जोडीला होती नेस कॉफी. पुढचे दोन दिवस नेस कॉफीच मिळत राहिली – फिल्टर कॉफीची नामोनिशाणी नव्हती कुठेच. मी चेन्नैमध्ये आलेय की दिल्लीत असा प्रश्न मला पडला. माझ्या सोबतचे बहुतेक लोक तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळ या राज्यांतले होते आणि ते हे पंजाबी पदार्थ आवडीने खात होते – त्यांची कोणाचीच काही तक्रार नव्हती.

मग मी वेटर्सशी गप्पा मारल्यावर मला गंमतीदार माहिती मिळाली. या हॉटेलचा मालक होता पाटणा शहरातला एक माणूस. बहुतेक सारे वेटर्स पाटणा आणि इलाहाबादमधून आलेले होते. त्यामुळे ते पंजाबी – उत्तर भारतीय पदार्थ देत होते. त्यांनी कामचलाऊ तामिळ शिकून घेतले होते. ते अडीच तीन दिवस चेन्नैत मी भरपूर हिंदी बोलले, आणि मी बरेच पनीरही खाल्लं. मला शेवटपर्यंत तिथे ना इडली मिळाली, ना दहीभात ना फिल्टर कॉफी.

या अनुभवानंतर सुमारे दोनेक महिन्यांत मला कामानिमित्त पाटण्याला जावं लागलं. जिथं मी राहात होते, तिथं स्वाभाविकपणे दाल, रोटी, पनीर, आलू ..  अस उत्तर भारतीय खाणं मिळत होतं! त्याचं उपाहारगृह फारसं स्वच्छ नव्हतं आणि तिथली गर्दीही मला आवडली नाही. मी एकटीच होते आणि एकटया स्त्रीला पाटणा शहरात हॉटेलमध्ये एकटीने जाऊन खायला काय अडचण येते, याबाबत माझे सहकारी अगदीच अनभिज्ञ होते! असो.

एका संध्याकाळी कामावरून आल्यावर मला खूप भूक लागली होती. साधारण रात्री साडेआठच्या सुमारास मी बाहेर पडले. मला बाजूलाच एक दाक्षिणात्य पदार्थ मिळणारं हॉटेल दिसलं. तिथं गर्दी दिसत होती पण ती चांगली गर्दी वाटत होती. आत डोकावून पाहिलं, तर स्वच्छताही दिसली. मी आत गेले, निवांत बसून खाल्लं आणि तिथं मी झकास फिल्टर कॉफीही प्याले. पुढचे तीन दिवस रोज सकाळी आणि रात्री माझी तिथं फेरी होत राहिली. पाटणा शहरात राहून मी पनीर टाळू शकले; इतकच नाही तर मी तिथं माझ्या आयुष्यातले काही चविष्ट दाक्षिणात्य पदार्थही खाल्ले.

एक काळ असा होता, की तुम्ही ज्या भागात असाल, तिथं फक्त तिथलेच पदार्थ मिळत. देशाच्या दक्षिण भागात वावरताना समोरच्या माणसांच्या ताटातला ढीगभर भात पाहताना हसू यायचं खरं; पण दोन तीन दिवसांत आपणही ढीगभर भात खातोय हे लक्षात यायचं. उत्तरेत वावरताना कधी ताटात न पडणारी जिलबी अन तीही दह्याबरोबर मी मजेत खायला लागले. समोसा, कचोरी आवडते की नाही हा प्रश्न नव्हता, कारण तेवढे दोन पदार्थ सर्वत्र मिळायचे सहज. एका प्रकारे त्या त्या ठिकाणचं अन्न खाणं म्हणजे स्थानिक संस्कृतीशी नातं जुळलं जाण्याचा भाग होता. ज्या समाजात मिसळायचं, त्याच्या आवडी-निवडीशी एकरूप होण्याची ही प्रक्रिया होती. ‘अशी इडली/ असा समोसा/ असं पनीर / अशी दाल / अशी जलेबी .... तुम्हाला जगात दुसरीकडे कुठेच मिळणार नाही' असं सांगत लोक आग्रहाने खाऊ घालायचे. आणि त्यांच्या या अभिमानात बरचसं तथ्यही असायचं.

जागतिकीकरणाच्या झपाट्यामुळे आणि वाढत्या चंगळवादामुळे आता सगळी शहरं एकसारखीच वाटतात मला. शहरांचे चेहरे जणू हरवून गेले आहेत, त्यांची ओळख विसरली आहे. सगळ्या शहरात आता MacDonald, Reliance Fresh, Café Coffee Day  अशी तीच तीच नावं दिसतात. कोणी झोपेत आपल्याला एका शहरातून दुस-या शहरात नेलं, तर जाग आल्यावर फरक कळणंही दुरापास्त आहे. शहरांना आता स्वत:चं वेगळ व्यक्तिमत्त्व म्हणून काही राहिलेलं नाही – त्या शहराचा एक वास असतो, तोही विरून गेला आहे. सगळ जग फक्त एक ‘बाजार’ झालं आहे.

चेन्नैत पनीर आणि पाटण्यात इडली ही बदलत्या काळाची आणि हरवलेल्या दिवसांची चिन्हं आहेत. आपण आपल्याजवळ जे नाही त्याची कशी हाव धरतो ते यातून कळतं. आपली बलस्थानं, आपलं वैभव विसरून आपण दुस-यांची कशी नक्कल करण्यात मग्न आहोत हेही लक्षात येतं. आपण बाहेर वावरताना आपलं आतलं जग सोडायला तयार नाही – त्यामुळे बाहेरच जगही खरं तर आपल्याला कधी नीट समजत नाही. दुस-या काही शक्यता अजमावून न पाहण्याचा आपला हटटही त्यातून पुन्हापुन्हा सामोरा येत राहतो.

हे बरं की वाईट हे मला नाही सांगता येणार.
पण चेन्नैत चेन्नै सापडत नाही आणि पाटण्यात पाटणा सापडत नाही तेंव्हा मला आपणच या जगात हरवून गेलो आहोत असं मात्र वाटतं राहतं ....

**

Thursday, January 12, 2012

१०८. उदघाटन


नमस्कार एवढ्या गर्दीत त्या गृहस्थांनी मला नमस्कार केला.
प्रतिक्षिप्त क्रियेने मीही नमस्कार करती झाले.
कोण आहेत हे? मी शेजारी बसलेल्या माणसाला विचारलं.
अरे, तुम्हाला माहिती नाही? सांसद आहेत ते आपले. त्याने आश्चर्याने मला न्याहाळत सांगितलं.

मला लगेच त्यांच्या नमस्काराच कारण समजलं. त्या मंडपात आम्ही दोनच स्त्रिया होतो – एक होत्या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी. त्यांना खासदार ओळखत होते. अर्थातच त्या व्यासपीठावर होत्या. दुसरी होते मी. मी बेधडक गर्दीत मिसळून फोटो काढत होते आणि लोकांशी बोलत होते. शिवाय माझ्या हातातल्या वहीत मी अधून मधून लिहित होते. हे सगळ मी नेहमीच करते. आणि त्यामुळे अनेकदा मी पत्रकार असल्याचा समज फैलावतो. आजही तसच झालेलं दिसतंय. म्हणून त्या खासदारांनी ओळख नसताना मला नमस्कार केला होता.

तिकडे व्यासपीठावर बसलेले खासदार माझ्याकडे पहात होते. ‘नमस्कार तर केला पण ही बाई आहे कोण’ असे भाव त्यांच्या चेह-यावर दिसत होते. त्यांनी एकाला बोलावून काहीतरी विचारलं. त्याने दुस-याला. त्याने तिस-याला. मला काही काम नव्हत. त्यामुळे मी ती साखळी लक्ष देवून पाहत होते. अखेर त्याची सांगता मघाच्या माझ्या शेजा-याने मला ‘तुम्ही पत्रकार आहात का? अस विचारण्यात झाली. मी कोण आहे (आध्यात्मिक अर्थाने नाही तर लौकिकार्थाने) ते सांगितलं. आलेल्या वाटेने निरोप परत गेला. माझ्याकडे लक्ष द्यायची गरज नाही याची खात्री पडून खासदार महोदय सैलावले.

राजस्थानमधल्या एका गावात प्रधानमंत्री ग्राम सडक योजने’च्या रस्त्याच उदघाटन होत – त्याच्याशी माझा खर तर काही संबंध नव्हता. पण अनेक वेळा खेडयापाडयात भटकताना ‘सडक, वीज, पाणी’ लोकांसाठी किती महत्त्वाचे असतात हे पाहिलं होत. विशेषत: जिथ मुल-मुली शाळेत जाऊ शकत नाहीत, आजा-यांना वेळेत उपचार मिळत नाहीत, शेतातला भाजीपाला सडून जातो किंवा जनावरांना खायला घालावा लागतो – तेव्हा गावक-यांच्या मनात जे येत ते फक्त त्यांनाच कळेल. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेबद्दल माझ मत चांगल आहे. आणि शिवाय मी कधी रस्त्याच उदघाटन बघितलं नव्हत. म्हटल चला, हेही एक पाहू काय असत ते.


आम्ही मुख्य रस्ता सोडून डावीकडे वळलो तेंव्हा
मोहरीची फुललेली शेत समोर आली. सरकारी कार्यक्रम असल्याने गाडयांचा ताफा होता. रस्त्यावर जो तो थांबून कुतुहलाने त्याकडे पहात होता. काही अंतर पक्क्या सडकेन गेल्यावर आम्ही डावीकडे वळलो तर तिथ एक मोठा मंडप दिसला. त्याच्या आत कोणी नव्हत. आधी मला वाटलं गावात कोणाच तरी लग्न असणार – पण तस काही नव्हत. हा मंडप रस्त्याच्या उदघाटन कार्यक्रमासाठी होता हे मला दोन तासांनी कळलच.


आम्ही मंडपापाशी न थांबता कच्च्या रस्त्याने पुढे गेलो. जिकडे तिकडे पुरुष निवांत बिडया फुंकत बसले होते. दोन दिवसांपूर्वी पाउस झाला होता त्यामुळे शेतात काम नव्हत. थंडीही होती चांगलीच. आम्ही एका विशाल महालवजा घरापाशी उतरलो. सुटाबुटातले एक गृहस्थ पुढे आले – त्यांनी आमच स्वागत केलं. हे या गावातले गृहस्थ – आता दिल्लीत उच्चपदस्थ अधिकारी आहेत. एवढया छोटया गावातून येऊन दिल्लीत स्वत:च एक स्थान निर्माण करण ही काही सोपी गोष्ट नाही. मला त्या गृहस्थांच कौतुक वाटलं.

रस्ता या गृहस्थांच्या घरावरून जाणारा – किंबहुना त्यांना घरापर्यंत आणणारा असल्यामुळे बरेच अधिकारी हजर होते. सिमेंटची गुणवत्ता, इंटरलॉकिंग टाईल्स, रस्त्याची रुंदी, त्याची भारवाहक क्षमता, स्थानिक शेतक-यांच्या पाईप टाकून पाणी नेण्याचा गरजा लक्षात घेऊन केलेली रस्त्याची रचना .... अशी देशातल्या ज्येष्ठ इंजिनीअर्स केलेली चर्चा शिक्षणदायी होती.  तसे काम प्रत्यक्षात होते का हा प्रश्न वेगळा अर्थातच!

चहापान झालं आणि ट्रे घेऊन आणखी एक माणूस आला. आमच्या ग्रुपमधल्या कोणीच त्यातल काही घेतलं नाही तेव्हा माझ तिकडे लक्ष गेलं. जमलेल्या गर्दीत जाऊन तो माणूस परत आला तेव्हा मी त्याचा हा फोटो काढला.

 धूम्रपानाच्या धोक्यांबाबत इतक सगळ सांगितलं जात; ते किती व्यर्थ आहे याचा साक्षात्कार होता तो माझ्यासाठी.


मग आम्ही सगळे परत त्या मंडपात गेलो. खासदार आले आणि तो रिकामा मंडप क्षणात भरून गेला. मग अनेकजण बोलले – सगळे अगदी थोडक्यात – दोन शब्दांच्या बरच जवळ पोचेल इतकच – बोलले. त्यात बरीच माहिती मिळाली. म्हणजे उदाहरणार्थ या योजनेत एक किलोमीटर रस्ता बनवायला अंदाजे चाळीस लाख रुपये खर्च होतात. या योजनेच्या माध्यमातून देशात रोज १५६ किलोमीटर रस्ता निर्माण होतो – हे उद्दिष्ट मला आठवत तस आधी बरच जास्त होत – ते होत नाही असं दिसल्यावर हुशारीने उद्दिष्टच खाली आणलं गेलं. राजस्थानमध्ये मागच्या अकरा वर्षांत (२००० मध्ये ही योजना आली.) ८८६० नवे रस्ते निर्माण केले गेले. या रस्त्यांची लांबी ३४, ७९५ किलोमीटर आहे आणि यातून १०७०३ गावे जोडली गेली.

ही सगळी माहिती ऐकत असताना मला त्या अनामिक गावातील अनामिक चेहरे दिसत होते. विकासाच्या किमतीबद्दल आपण – ज्यांनी विकासाची फळे चाखली आहेत – बोलणे आणि त्यामुळे इतरांना संधी नाकारणे हा एक प्रकारचा दांभिकपणा आहे. रस्ते शहरात लागतात तसेच खेडयातही लागतात – फायदे आपण भोगायचे आणि त्यांच्या फायद्याची गोष्ट समोर आल्यावर मात्र पर्यावरण प्रेम जागे व्हायचे हे बरोबर नाही. 

कार्यक्रम संपला. मंडपाच्या बाहेर अनेक स्त्रिया उभ्या होत्या – त्यांची जागा नेहेमी अशी परिघाबाहेर का – हा प्रश्न मला पडलाच. मी त्यांच्याशी गप्पा मारल्या.




आम्ही जेवलो.
टिपीकल राजस्थानी बेत होता – दाल बाटी आणि चुरम्याचे लाडू.


परत निघालो. तोवर मघाचा मंडप उतरवण्याचे काम जवळजवळ उरकलं होत. दोन तासांपूर्वीच्या कार्यक्रमाची नामोनिशाणी दाखवणारा उदघाटनाचा फक्त फलक तिथ होता.

इथ रस्ता नक्की होणार का – अशी शंका माझ्या मनात आली.
होईल इथ बहुतेक.
कारण दिल्लीचे ते अधिकारी. त्यांचे भाऊ इथ राहतात आणि त्यामुळे या अधिका-याच इथ नियमित येण असत.

उदघाटन झालेले सगळेच रस्ते इतके भाग्यवान असतात का पण? 
*

Thursday, January 5, 2012

१०७. काही कविता: १८

जाग आली 
तेंव्हा व्यक्त 
बहराची रास; 
              
               पेटलेले काही
               विझे, हळुवार
                झाले श्वास;


भाव आहे
म्हणूनच
क्षणोक्षणी भास; 
                
                जग बुडताना
                उरे अल्प 
                जगण्याची आस;  


खूण नाही 
काही मागे,
असा रोजचा प्रवास; 
           
             मैत्र तुझे माझे 
             त्याने नवे
             निर्मियले पाश. 


पुणे, २४ नोव्हेंबर, २००४