ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Wednesday, January 18, 2012

१०९. इडली आणि पनीर


‘तू जाशील का चेन्नैला एका सेमिनारसाठी’ असं मला विचारलं, तेंव्हा मी लगेचच तयार झाले. चेन्नैला जायची संधी आली की मी एका पायावर तयार असते. तशी या शहरात मी एखाद्या रात्रीपुरता मुक्काम वगळता फारशी कधी राहिलेली नाही. पण अनेकदा कन्याकुमारीला जाण्यासाठी मुंबईहून थेट तिकीट नाही मिळालं; की चेन्नैला यायचं आणि पुढची गाडी पकडायची असा खात्रीचा पर्याय असायचा. पुदुच्चेरीला जायची वाटही इथूनच. आणि एकदा मी रमण महर्षी आश्रमात गेले तीही इथूनच. म्हणून चेन्नैची माझी फार ओळख नसली तरी या शहरावर माझं प्रेम आहे. चेन्नैवरच्या प्रेमाचं आणखी एक छुपं कारण म्हणजे मला फिल्टर कॉफी आवडते आणि ती तिथं सहजगत्या मिळते, भरपूर मिळते. दहीभात खावा तर तिथलाच! आज ते शहर बदललं आणि मी तर त्याहून अधिक बदलले – पण चेन्नैचं माझं नातं मात्र मजबूत आहे.

चेन्नैला पहिल्या रात्री जेवणात उत्तर भारतीय (म्हणजे पंजाबी!) पदार्थ पाहून मी चकित झाले. त्या हॉटेलमधले वेटर्स छान हिंदी बोलत होते. 'दहीभात नाही' हे ऐकल्यावर मी वेगवेगळे पर्याय देत गेले आणि दुर्दैवाने त्यापैकी एकही उपलब्ध नव्हता. वेटरला माझ्या मागणीचं नवल वाटत होतं, हे उघड होतं. शेवटी त्यांच्यातला (बहुधा वरिष्ठ) वेटर येऊन मला म्हणाला, मी तुम्हाला सर्वोत्कृष्ट उत्तर भारतीय जेवण देतोय, ते खाऊन तर बघा, तुम्ही दही-भात विसरून जाल .. खाण्याचे माझे फारसे नखरे नसतात. त्यामुळे मग मी पनीर, पराठा, आलू असं काहीबाहीखाल्लं आणि भूक निभावून नेली.

दुस-या दिवशी सकाळच्या नाश्त्यात कॉर्नफ्लेक्स, डबाबंद फळांचा रस, ब्रेड, बटर, ऑम्लेट, पुरी -भाजी  ... असे ठराविक पदार्थ होते आणि त्याच्या जोडीला होती नेस कॉफी. पुढचे दोन दिवस नेस कॉफीच मिळत राहिली – फिल्टर कॉफीची नामोनिशाणी नव्हती कुठेच. मी चेन्नैमध्ये आलेय की दिल्लीत असा प्रश्न मला पडला. माझ्या सोबतचे बहुतेक लोक तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळ या राज्यांतले होते आणि ते हे पंजाबी पदार्थ आवडीने खात होते – त्यांची कोणाचीच काही तक्रार नव्हती.

मग मी वेटर्सशी गप्पा मारल्यावर मला गंमतीदार माहिती मिळाली. या हॉटेलचा मालक होता पाटणा शहरातला एक माणूस. बहुतेक सारे वेटर्स पाटणा आणि इलाहाबादमधून आलेले होते. त्यामुळे ते पंजाबी – उत्तर भारतीय पदार्थ देत होते. त्यांनी कामचलाऊ तामिळ शिकून घेतले होते. ते अडीच तीन दिवस चेन्नैत मी भरपूर हिंदी बोलले, आणि मी बरेच पनीरही खाल्लं. मला शेवटपर्यंत तिथे ना इडली मिळाली, ना दहीभात ना फिल्टर कॉफी.

या अनुभवानंतर सुमारे दोनेक महिन्यांत मला कामानिमित्त पाटण्याला जावं लागलं. जिथं मी राहात होते, तिथं स्वाभाविकपणे दाल, रोटी, पनीर, आलू ..  अस उत्तर भारतीय खाणं मिळत होतं! त्याचं उपाहारगृह फारसं स्वच्छ नव्हतं आणि तिथली गर्दीही मला आवडली नाही. मी एकटीच होते आणि एकटया स्त्रीला पाटणा शहरात हॉटेलमध्ये एकटीने जाऊन खायला काय अडचण येते, याबाबत माझे सहकारी अगदीच अनभिज्ञ होते! असो.

एका संध्याकाळी कामावरून आल्यावर मला खूप भूक लागली होती. साधारण रात्री साडेआठच्या सुमारास मी बाहेर पडले. मला बाजूलाच एक दाक्षिणात्य पदार्थ मिळणारं हॉटेल दिसलं. तिथं गर्दी दिसत होती पण ती चांगली गर्दी वाटत होती. आत डोकावून पाहिलं, तर स्वच्छताही दिसली. मी आत गेले, निवांत बसून खाल्लं आणि तिथं मी झकास फिल्टर कॉफीही प्याले. पुढचे तीन दिवस रोज सकाळी आणि रात्री माझी तिथं फेरी होत राहिली. पाटणा शहरात राहून मी पनीर टाळू शकले; इतकच नाही तर मी तिथं माझ्या आयुष्यातले काही चविष्ट दाक्षिणात्य पदार्थही खाल्ले.

एक काळ असा होता, की तुम्ही ज्या भागात असाल, तिथं फक्त तिथलेच पदार्थ मिळत. देशाच्या दक्षिण भागात वावरताना समोरच्या माणसांच्या ताटातला ढीगभर भात पाहताना हसू यायचं खरं; पण दोन तीन दिवसांत आपणही ढीगभर भात खातोय हे लक्षात यायचं. उत्तरेत वावरताना कधी ताटात न पडणारी जिलबी अन तीही दह्याबरोबर मी मजेत खायला लागले. समोसा, कचोरी आवडते की नाही हा प्रश्न नव्हता, कारण तेवढे दोन पदार्थ सर्वत्र मिळायचे सहज. एका प्रकारे त्या त्या ठिकाणचं अन्न खाणं म्हणजे स्थानिक संस्कृतीशी नातं जुळलं जाण्याचा भाग होता. ज्या समाजात मिसळायचं, त्याच्या आवडी-निवडीशी एकरूप होण्याची ही प्रक्रिया होती. ‘अशी इडली/ असा समोसा/ असं पनीर / अशी दाल / अशी जलेबी .... तुम्हाला जगात दुसरीकडे कुठेच मिळणार नाही' असं सांगत लोक आग्रहाने खाऊ घालायचे. आणि त्यांच्या या अभिमानात बरचसं तथ्यही असायचं.

जागतिकीकरणाच्या झपाट्यामुळे आणि वाढत्या चंगळवादामुळे आता सगळी शहरं एकसारखीच वाटतात मला. शहरांचे चेहरे जणू हरवून गेले आहेत, त्यांची ओळख विसरली आहे. सगळ्या शहरात आता MacDonald, Reliance Fresh, Café Coffee Day  अशी तीच तीच नावं दिसतात. कोणी झोपेत आपल्याला एका शहरातून दुस-या शहरात नेलं, तर जाग आल्यावर फरक कळणंही दुरापास्त आहे. शहरांना आता स्वत:चं वेगळ व्यक्तिमत्त्व म्हणून काही राहिलेलं नाही – त्या शहराचा एक वास असतो, तोही विरून गेला आहे. सगळ जग फक्त एक ‘बाजार’ झालं आहे.

चेन्नैत पनीर आणि पाटण्यात इडली ही बदलत्या काळाची आणि हरवलेल्या दिवसांची चिन्हं आहेत. आपण आपल्याजवळ जे नाही त्याची कशी हाव धरतो ते यातून कळतं. आपली बलस्थानं, आपलं वैभव विसरून आपण दुस-यांची कशी नक्कल करण्यात मग्न आहोत हेही लक्षात येतं. आपण बाहेर वावरताना आपलं आतलं जग सोडायला तयार नाही – त्यामुळे बाहेरच जगही खरं तर आपल्याला कधी नीट समजत नाही. दुस-या काही शक्यता अजमावून न पाहण्याचा आपला हटटही त्यातून पुन्हापुन्हा सामोरा येत राहतो.

हे बरं की वाईट हे मला नाही सांगता येणार.
पण चेन्नैत चेन्नै सापडत नाही आणि पाटण्यात पाटणा सापडत नाही तेंव्हा मला आपणच या जगात हरवून गेलो आहोत असं मात्र वाटतं राहतं ....

**

12 comments:

  1. "जग म्हणजे एक छोटं खेडं झालंय" हे वरदान की शाप असं वाटायला लावणारा अतिशय वास्तववादी लेख.. नेहमीप्रमाणेच अप्रतिम.. नेहमीप्रमाणेच आवडला !

    ReplyDelete
  2. मला सगळ्यात कंटाळा येतो ते भाची भाचरं माझ्याकडे त्यांना पिझा आणि बर्गर खायला घेऊन चल म्हणून सांगु लागली की.....माहित नाही हे खाण्याचे बदल चांगले की वाईट पण पिकत तिथे ते विकत नाही हे आजकालच सगळ्यांनीच केलेलं observation....

    ReplyDelete
  3. <<>> म्हणूनच भारतात आलं की मी मुलांना आता भारताची अमेरिका झाली आहे असं सांगते :-)

    ReplyDelete
  4. परवाच, प्रभाकर पेंढारकरांचं 'चक्रीवादळ' वाचताना एक वाक्य वाचलं होतं...त्याची आठवण झाली मला. इथे आंध्र आहे, महाराष्ट्र आहे, गुजरात आहे...एकसंघ भारत मात्र कुठेही नाही....असं काहीसं होतं ते वाक्य.
    दिसायला सर्वत्र एकच वाटतं परंतु, कुठले मोठे संकट उभे राहिले की मात्र आपण सगळे जिल्हे वेगवेगळे एकमेकांपासून दूर जाऊन उभे रहातो असे वाटून गेले.

    विचार करण्यास प्रवृत्त करणारा लेख. नेहेमीप्रमाणेच

    ReplyDelete
  5. ताई,

    हे कमेंट मी ब्लॉगवर टाकायचा प्रयत्न करतेय पण अजिबात पोस्ट होत नाहीये !!!

    "ताई झालय खरं असं.... तुझ्या लेखावरून दोन तीन प्रसंग आठवले, पहिला एक तसा या लेखाशी सुसंगत नाही फारसा पण आठवला तो म्हणजे एकदा Sarvana Bhavan मधे जाऊन चायनीज पदार्थ मागवण्याचा मी केलेला शुद्ध गाढवपणा... फ्राईड राईसच्या नावाखाली साध्या शिजवलेल्या भातात त्यांनी टाकलेल्या भाज्या खाव्या लागल्या होत्या. ... एकच जाणवलं त्यादिवशी की हल्ली सगळ्या प्रांतातील लोक सगळीकडे असतात मात्र जाताना आपली संस्कृती घेऊन जातात, आणि त्याचबरोबर आम्ही कश्यात मागे नाही हे दाखवण्याचा खटाटोपही असतो...

    दुसऱ्या प्रसंगात सध्या माझ्या घराच्या अगदी समोर असणारं साउथ इंडियन रेस्टॉरंट आहे.... जिथे सगळ्यात चवीचं काय मिळत असेल तर नॉर्थ इंडियन जेवण !!! अर्थात सगळीच सरमिसळ म्हटल्यावर जेवण बनवणारी व्यक्ती कुठल्या प्रांतातली त्यावरही बरेच काही ठरते !!

    लेख आवडला तुझा.... ’पनीर’ आणि ’इडली ’ दोन्ही तुफान आवडते म्हणून लेख अजून आवडला!! हेरंब म्हणतोय तसं वास्तववादी लेख अगदी!! "

    तन्वी

    ReplyDelete
  6. हेरंब, कोणत्याही गोष्टीची किंवा बदलाची ही दोन्ही रूपे असतात नेहमीच .. आणि आपण त्या दोन्हीतून पुढे जात पर्याय शोधण्याची पण गरज .. तो पर्याय पुन्हा कधी वरदान ठरणार तर कधी शाप .. हे लक्षात घेऊन :-)

    ReplyDelete
  7. अपर्णा, कोणत्याही गोष्टीच नाविन्य आणि म्हणून त्याबद्दल वाटणार आकर्षण हे सहज समजण्याहोग आहे .. पण आपण त्याचा हव्यास धरतो हे मात्र का ते समजत नाही!!

    ReplyDelete
  8. मोहना .. आणि काही अंशी अमेरिकेत पण भारत सापडतो की .. देवघेव चालणारच ही!!

    ReplyDelete
  9. << दिसायला सर्व एकच वाटत >> हे एकत्व एकतानतेतून आलेलं नाही हीच तर यातली मेख आहे. म्हणजे सारखे असून आपण परके .. पण त्याचवेळी इतकी वर्ष वेगळे असून आपण एक होतो .. काय चमत्कार घडवला होता त्यावेळच्या समाजधुरीणांनी ते अशा वेळी कळत!

    ReplyDelete
  10. तन्वी, अनुभव प्रत्येकाचाच असतो हा .. पण Sarvana Bhavan मध्ये चायनीज राईस? करून बघायला हरकत नाही हा प्रयोग .. एक Sarvana Bhavan माझ्या ऑफिसपासून हाकेच्या अंतरावर आहे ..ही आपली म्हणायची पद्धत .. जवळ आहे चालत जाण्याच्या अंतरावर :-)

    ReplyDelete
  11. सविता, लेख नेहमीप्रमाणेच आवडला.

    जस जशी माणसं स्थलांतर करू लागली तसतश्या स्वत:च्या अनेक गोष्टी त्या त्या ठिकाणी रुजवत गेली. तसेच आत्मसातही करु लागली. आवडून घेउ लागली. फक्त पन्नास वर्षे राहूनही आम्ही बाबा अलाहाबादचे... यात काही प्रगती झाली नाही. विषाद वाटतो.

    एकेकाळी ’ऑरंज चिक” ला यक करणारा माझा नवरा आज ते आवडीने खातो.:D

    बाकी दक्षिणात्य पदार्थांवरचं माझं प्रेम उतू जाणारं त्यामुळे जिथे जाईल तिथे मी शक्यतो ते मागवते. कोचीत खूपच छान जेवण मिळालेले. :)

    ReplyDelete
  12. भाग्यश्री, आपली आवड सोडूनच द्यायची किंवा ती अजिबात सोडायची नाही .. अशा दोन्ही टोकांची माणस सभोवताली दिसतात- त्याच एवढ काही नाही. समाज अस वागायला लागतो तेव्हा मात्र चिंता वाटते .. उगीचच! आपल्या चिंतेने काय होणार??

    ReplyDelete