देवाबद्दल आजवर बरच काही ऐकलेलं आणि वाचलेलं. त्यात त्याच्या/तिच्या गुणांची वर्णनं भरपूर. म्हणजे कोणताही देव किंवा देवी कसे सर्वशक्तिमान असतात, कसे दयाळू असतात, कसे सर्वज्ञ असतात, कसे सर्वव्यापी असतात, भक्तांची ते कशी काळजी घेतात आणि दुष्टांचा कसा संहार करतात अशा कथा नेहमीच कानावर आलेल्या. त्यातल्या काही रंजक, काही उद्बोधक, काही विचारांत पाडणा-या, काही नकळत त्यातल्या निरागसपणाने हसवणा-या. या सगळ्या गुणांच्या यादीत एक गुण कधी ऐकलेला नव्हता पण तो त्यादिवशी मला दिसला (म्हणजे भक्तांची तशी श्रद्धा आहे हे दिसलं ). 'गोलू देवतेच्या' मंदिरात श्रद्धेच आजवर कधी न दिसलेलं एक स्पष्ट रूप होतं - ते म्हणजे 'ईश्वर साक्षर आहे; त्याला वाचता येत' ही भक्तांची श्रद्धा.
मी एकदम निष्कर्षच सांगितला का तुम्हाला? थांबा, जरा नीट सांगते.
मी होते अल्मोडा शहरात. उत्तराखंड (मला त्याच खर तर उत्तरांचल हे आधीच नाव जास्त आवडत!) राज्यातलं हे एक जिल्ह्याच शहर. या शहरांच एक आकर्षण डोक्यात होत आधीपासून ते विवेकांनंद वाड्मय वाचल्यापासूनच. १९९३ च्या शिकागो सर्वधर्मपरिषदेत भाषण देऊन गाजलेले विवेकानंद चार वर्षांनी भारतात परतले. त्यांच्या व्याख्यानांचा एक झंझावती दौरा मग सुरु झाला कोलंबो शहरापासून आणि त्यातलं शेवटाच भाषण झालं ते अल्मोडा शहरात. 'From Colombo to Almora' हे पुस्तक मी अर्थातच वाचलेलं होत. मायावतीचा 'अद्वैत आश्रम' पण तिथून जवळच आहे असा माझा समज होता पण पहाडात १२० किलोमीटरच अंतर म्हणजे एका दिवसाचा प्रवास असू शकतो हे मला अनुभवाने माहिती होत. पण तरीही अल्मोडा शहरात गेल्यावर जरा चाचपणी करून पाहायची अंतराची हे मी ठरवलं होत.
हिमालयातल्या हवामानाचा फटका इथून निघतानाच आम्हाला बसला. ज्या दिवशी संध्याकाळी चार वाजता आम्ही अल्मोडा शहरात पोचण अपेक्षित होत त्यापेक्षा आम्ही तिथं एकोणीस तास उशीरा म्हणजे दुस-या दिवशी सकाळी अकरा वाजता पोचलो. तीन जिल्ह्यांतून आलेल्या स्वयंसहायता गटाच्या प्रतिनिधी स्त्रियांशी चर्चा झाली, उशीरा एकत्र जेवण झालं, संस्थेच्या कार्यकर्त्यांशी कार्यक्रमाविषयी चर्चा झाली, उद्याचा कार्यक्रम ठरला .. तोवर पाच वाजले. मी आपलं एकाला सहज 'अद्वैत आश्रम' किती दूर आहे ते विचारलं. तिथं जायला मला वेळ मिळणार नव्हता हे उघड होत - ते पुन्हा एकदा सिद्ध झालं.
मग तिथल्या एक वरिष्ठ अधिका-याने सांगितलं, " दीदीला गोलू देवता मंदिरात घेऊन जा."
गोलू देवता? मला एखाद्या लहान मुलाच नावं वाटलं 'गोलू' हे; म्हणून गंमत वाटली. तसाही हातात वेळ होता, म्हटलं चला, आज गोलू देवतेच्या दर्शनाच भाग्य आहे ते घेऊया.
गोलू देवतेच मंदिर बाहेरून कोणत्याही मंदिरासारखं वाटलं आधी. म्हणजे बाहेरचा अरुंद रस्ता, तिकडे दुकानांची गर्दी.. एक वातावरण असत ते वैशिष्टयपूर्ण. त्यामुळे आपण मंदिराच्या परिसरात पोचलो आहोत ते कळत आपण अगदी झोपेत असलो तरी. आत्ता मात्र संध्याकाळची वेळ असल्याने आमच्याव्यतिरिक्त कोणी भक्त नव्हते तिथे. देऊळ बाराव्या शतकात चंद राजवटीत बांधलं गेलं आहे अशी माहिती नंतर मिळाली.

"इतक्या घंटा का आहेत इथं" या माझ्या प्रश्नाची अपेक्षाच करत होते स्थानिक लोक. त्यांनी उत्साहाने सांगितलं की, नवसाला देव पावला की भक्त त्याची खूण म्हणून एक नवी घंटा देवाला अर्पण करतात. म्हणजे इथं जितक्या घंटा दिसताहेत, कमीत कमी तितक्या लोकांचे नवस पूर्ण झालेले आहेत तर!
अशा स्थानांभोवती परंपरेच्या, इतिहासाच्या, श्रद्धेच्या, संस्कृतीच्या अनेक कथांचे पदर असतात. इथेही ते आहेत. गोलू देवता हा 'गौर भैरवाचा' म्हणजे शिवाचा अवतार मानला जातो. या अवताराचे वैशिष्टय म्हणजे ही एक 'न्याय देवता' मानली जाते. आपल्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार इथे करायची आणि गोलू देवता या अन्यायाचे परिमार्जन करते अशीही भक्तांची श्रद्धा आहे. उत्तराखंडमधल्या कुमाऊ परिसरात गोलू देवतेची अनेक मंदिरे आहेत.
दुस-या एका कथेनुसार चम्पावत प्रदेशात गोलू नावाचा एक राजा होऊन गेला , तिस-या एका कथेनुसार तो एका सैन्याचा अतिशय शूर सेनापती होता आणि तो धारातीर्थी पडल्यावर त्याच्या स्मरणार्थ हे मंदिर उभारले गेले. चुकीचा आळ घेतला जाऊन गोलूची एका राजाने हत्या केली अशीही एक कथा आहे. राजाच्या आवडत्या राणीला मुलगा झाला तेव्हा इतर राण्यांना मत्सर वाटून त्यांनी त्या मुलाला पिंज-यात घालून नदीत सोडून दिला तो पिंजरा आणि राणीच्या कुशीत दगड ठेवून दगड जन्माला घातला अशी बतावणी केली. पिंज-यात सोडून दिलेला तो मुलगा एका कोळ्याच्या घरी वाढला. पुढे तो मुलगा राजाला सापडतो , हाच आपला मुलगा आहे याची त्याला खात्री पटते आणि तो मुलगा पुढे 'ग्वाल्ला देवता' म्हणून ओळखला जातो अशी आणखी एक कथा आहे.
इसवी सन ७०० ते इसवी सन १३०० या कालावधीत अल्मोडा जिल्ह्यात ४०० मंदिरे बांधली गेली असं इतिहास सांगतो. या परिसरात भैरवाची आठ देवळे आहेत - आठही दिशांनी ते शिवाचे संरक्षण करतात असे मानले जाते.

'कसले कागद आहेत हे? आणि ते इथं कुणी आणि कशासाठी लावले आहेत?" मग त्यावर मला जे कळलं ते आजवरच्या माझ्या इतक्या भटकंतीत मी पहिल्यांदाच ऐकत होते. आपल्याला न्याय मिळावा म्हणून कोर्टात जसा stamp पेपरवर लोक अर्ज करतात, तसाच अर्ज इथंही केला जातो. विशेषत: न्यायालयात ज्यांच्या बाजूने निकाल लागत नाही, ते भक्त पुढच्या न्यायालयात जावं या पद्धतीने इथं येतात. या कागदांची संख्या मोजदाद करण्याच्या पलीकडे होती.


मी सहज म्हणून दोन चार अर्ज वाचले. खर तर मी ते वाचण अपेक्षित नाही. गोलू देवता आणि त्याचे भक्त यांच्यातला हा मामला आहे. माझ्यासारख्या त्रयस्थ व्यक्तीच तिथं काही काम नाही.
एका अर्थी वैयक्तिक इच्छा, आकांक्षा, स्वप्न, भ्रमनिरास, अपेक्षाभंग जगजाहीर करण्यातून माणसांच्या सुख-दु:खाचा योग्य पद्धतीने निचरा करण्याची ही एक समाजमान्य पद्धत असेल का? माणसाने भावनांच दमन करण्यापेक्षा त्या भावना व्यक्त करण्याचे वैध मार्ग समाजाने उपलब्ध करून देण्यात व्यक्तींचे आणि अंतत: समाजाचेही अधिक भले असते काय? कधीकधी प्रचलित शहाणपण अधिक उपयोगाचे ठरते म्हणतात.
देवाला वाचता येत, देव साक्षर आहे - ही कल्पना अगदी अलिकडचीच असणार. ती नेमकी कधी आली ती सांगणारे मला कोणी भेटले नाही - पण ब्रिटीश राजवटीत शिक्षण, न्यायालय, अर्ज या गोष्टींना आलेले महत्त्व याच्यामागे असणार असा अंदाज बांधता येतो. धर्माच्या, परंपरेच्या, देवतेच्या शक्तीच्या, रुढीच्या आपल्या कल्पना बदलत जातात हे पुन्ह्पुन्हा दिसते. पण देवतेकडून आपल्या अपेक्षा मात्र त्याच आहेत - माझे, माझ्या कुटुंबाचे भले व्हावे - ते भले म्हणजे माझ्या इच्छेनुसार व्हावे. देवाने भले केले तर आम्ही त्याला परत काहीतरी देऊ - नवस फेडू असं म्हणायचं, पण तो एका अर्थी 'देव-घेवी'चा व्यवहार आहे आपला देवाशी. हे सगळ काय आहे आणि जे आहे ते असं का आहे?
गोलू देवतेला एका अर्ज लिहून मी या अशा प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी प्रार्थना करायला हवी होती - पण ते राहूनच गेलं .. पुन्हा कधीतरी ..