ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Friday, October 5, 2012

१३८. खान मार्केट

'हे एक अजब शहर आहे ..' हे वाक्य  कोणत्याही शहराला लागू पडेल इतकं आता शहरी जगणं अजब झालं आहे.  म्हणून सहसा हे वाक्य मी म्हणत नाही, पण तरीही  दिल्लीबाबत माझ्या मनात ही भावना नेहमी जागी होते. खरं तर इतर इतक्या शहरांत आणि गावांत राहिले मी! त्या प्रत्येक गावात राहताना आपण इथले 'आजन्म निवासी' आहोत अशा थाटात मी राहिले. दिल्लीत मात्र पहिल्या क्षणापासून आपण इथले पाहुणे आहोत आणि एक ना एक दिवस आपण इथून जाणार आहोत अशी स्पष्ट जाणीव माझ्या मनात आहे. आणि कदाचित म्हणूनच दिल्ली मला एक अजब शहर वाटत असावं! 

उन्हाळ्यामुळे मागचे तीन चार महिने दिल्लीत कुठं भटकले नव्हते. त्यादिवशी सुरेखा नारायणचा निरोप आला की 'अमुक दिवशी खान मार्केटला भेट आहे'. इकडे थोडासा पाऊस पडून गेला असला तरी उकडंत होतंच भरपूर - अगदी ऑगस्ट संपला तरी. मी सुरेखाबरोबर आधी एक दोन ठिकाणं पहिली होती. तिचा गट छोटा असतो आणि ती माहिती सांगते व्यवस्थित. तिने खान मार्केट परिसर निवडला आहे म्हणजे तिथं पाहण्यासारखं नक्कीच काहीतरी असणार.  

मी आधी सहका-यांना विचारलं, "खान मार्केट परिसरात पाहण्यासारखं काय आहे?" त्यावर त्या सगळ्यांनी माझ्याकडेच पाहिलं आणि "मार्केट" असं उत्तर देऊन त्यांनी विषय बदलला. मग मी विकीबाबाला शरण गेले. तिथं  हे मार्केट १९५१ मध्ये सुरु झाले, त्याला खान अब्दुल गफारखान यांच नाव देण्यात आलं आहे आणि जगातल्या महागड्या बाजारपेठेत याचा क्रमांक २१ वा लागतो - अशी बरीच माहिती मिळाली. ती वाचून मात्र मी चिंतेत पडले आणि खान मार्केटला जावं का नाही अशा द्विधा मनस्थितीत सापडले.

Hotel Ambassador, Khan Market, New Delhi 
खान मार्केट मेट्रो स्थानकाच्या बाहेर त्या सकाळी आम्ही आठ वाजता भेटलो तेव्हा सहाच लोक होतो ते पाहून मला बरं वाटलं. शनिवारची सकाळ असल्याने रस्त्यावर वर्दळ नव्हती. समोर एक मोठी इमारत दिसली. हा सगळाच भाग तसा उच्चभ्रू गणला जाणारा. त्यामुळे असेल एखादी निवासी इमारत असं मला आधी वाटलं. पण इतरांच्या बोलण्यातून कळलं की ती अ‍ॅम्बेसेडर (Ambassador) हॉटेलची मागची बाजू आहे.  तासाभराने आम्हाला तिथंही डोकावण्याची संधी मिळाली - त्याबद्दल पुढे सांगते मी. 

Bagwali Masjid, Khan Market, New Delhi
डावीकडे वळून आम्ही पाच एक मिनिटं चाललो आणि पोचलो ते 'बागवाली मशीद' इथं - हो बागवालीच, 'बांगवाली' नाही. या माशितीत दोन तीन लोक (अर्थात पुरुष) प्रार्थना करत होते. स्त्रियांना या ठिकाणी प्रवेश करण्याची परवानगी आहे का नाही याची खात्री नसल्याने आम्ही जरा बिचकतच प्रवेश केला. सावधानता म्हणून प्रत्येकीने डोक्यावर ओढणी किंवा स्कार्फ ओढून घेतला. दोन लोकांनी आमच्याकडे पाहिलं पण ते आम्हाला काही बोलले नाहीत त्यामुळे आमची भीड चेपली. 

या मशिदीचे घुमट छान दिसत होते. रंग मात्र पांढरा देऊन टाकला होता. परिसरात शांतता होती.  आमच्यातले अभ्यासक लोक ही मोगल कला आहे की आणखी कोणती अशी चर्चा करत होते. पूर्वी ही मशीद चारी बाजूंनी बागेने वेढलेली होती म्हणून ही बागवाली मशीद.  रस्त्यावरून आत मशीद असावी अशी कल्पनाही येत नाही. आता इथली रोपवाटिका प्रसिद्ध आहे. 

नंतर आम्हाला दिसलं ते सुजानसिंग पार्क.  हे दिल्लीतलं पहिलं अपार्टमेंट - ते बांधलं गेलं १९४५ मध्ये. कोण आहेत हे सुजानसिंग? ते आहेत सोभासिंग या बांधकाम ठेकेदाराचे वडील.  कोण आहेत हे सोभासिंग? ते आहेत खुशवंतसिंग यांचे वडील. ब्रिटीशांची नवी दिल्ली बांधण्यात यांचाही मोठा सहभाग होता.एके काळी ते अर्ध्या दिल्लीचे मालक होते असं म्हणतात. त्यांची आणखी एक ओळख म्हणजे भगतसिंग आणि बटूकेश्वर दत्त यांनी दिल्ली विधानसभेवर बॉम्ब टाकला होता - त्यांची ओळख पटवून देणारे गृहस्थ. यांची आणखी एक ओळख म्हणजे नवी दिल्ली महापालिकेचे ते चारवेळा अध्यक्ष (महापौर) होते. लोक कुणाला निवडून देतात याचा एक त्रासदायक इतिहास आहे हे त्या निमित्ताने लक्षात आलं माझ्या.

Sujan Singh Park, Khan Market, New Delhi
हे अपार्टमेंट आहे मात्र सुंदर. देखणी वास्तू आहे एकदम. प्रत्येक घराला खुला व्हरांडा दिसत होता. इथं दिल्लीतले अतिश्रीमंत लोक रहात असणार - तिथले सुरक्षारक्षक लगेच धावत आले. पण त्यांना आम्ही फक्त 'पाहायला' आलो आहे, असं सांगितल्यावर ते निमूट आमच्या मागोमाग फिरत राहिले. असे आमच्यासारखे कदाचित बरेच लोक येत असणार ही इमारत पाहायला! या इमारतीची एक विशिष्ट बंदिस्त रचना आहे -  तीन बाजूंना इमारती, समोर प्रवेशद्वार आणि मध्ये छान बाग आहे. एकदम ऐतिसाहिक काळात आपण असल्याचा भास क्षणभरच टिकला - कारण प्रांगणात अत्याधुनिक गाड्याही होत्या. इथल्या सदनिकेची किंमत काय असेल असं एकीने विचारलं - मी त्या चर्चेत अजिबात लक्ष घातलं नाही!!

Old Telephone in Hotel Ambassador, New Delhi 
या इमारतीच्या समोरच्या बाजूला आम्ही गेलो. अ‍ॅम्बेसेडर हॉटेलमध्ये आम्हाला प्रवेश करू देतील का नाही याची कल्पना नव्हती - पण प्रवेश द्वारावरच्या रखवालदारांनी 'सुप्रभात' म्हणत आमचं स्वागत केलं . असं स्वागत करणं हा त्यांच्या कामाचा एक भाग असतो म्हणा. सुरेखाने हॉटेलमधल्या लोकांशी काहीतरी बोलणं केलं आणि आम्हाला आत जाऊन खोली पाहायची परवानगी मिळाली. गेली ३५ वर्ष तिथं काम करणारा एक कर्मचारी पंखे कसे जुने आहेत, पूर्वीच्या लिफ्ट कशा होत्या .. अशा आठवणी सांगत होता. तिथं एक जुन्या काळचा टेलिफोनही दिसला - त्यामुळे एकदम जुन्या हिंदी सिनेमाच्या सेटवर गेल्यासारखं वाटलं मला. हॉटेलच्या भिंती पूर्ण पांढ-या आहेत आणि त्या त्रिकोणी इमारतीच्या मध्यभागी एक घुमट आहे. तो कसला ते कळलं नाही. त्या घुमटाकार जागेत एक उपाहारगृह चालायचं पण आता ते बंद आहे इतकीच बातमी कळू शकली. इतके जास्त पैसे देऊन लोक इथं राहायला का येतात हे मात्र मला कळलं नाही.

पुढची आमची भेट होती ती सिनगॉगला. Synagogue म्हणजे ज्यू धर्मियांच प्रार्थनास्थळ. इथले सचिव आणि राबी (म्हणजे धर्मगुरू - ते मात्र राबा म्हणत होते - म्हणजे आजवर मी ऐकलेला राबी शब्द चुकीचा आहे तर!) आहेत इझिकेल माळेकर. त्यांना मराठी येत असल्यामुळे मी त्यांच्याशी थोडं (थोडंसंचं - कारण इतराना संभाषणातून बाजूला ठेवायचं नव्हतं आम्हाला) मराठी बोलले. त्यांच्या सांगण्यानुसार भारतात फक्त ५००० ज्यू लोक आहेत आणि दिल्लीत तर फक्त पन्नास.  पण विदेशी राजदूत आणि त्यांचे दूतावास यामध्ये ज्यू धर्माचे अनुयायी मोठया प्रमाणावर असतात - ते इथं प्रार्थनेला येतात. "मी आधी भारतीय आहे आणि मग ज्यू" ;" इस्रायल माझ्या हृदयात आहे तर भारत माझ्या रक्तात" अशासारखे त्यांचे उद्गार त्या समूहातल्या आम्हा इन मीन तीन भारतीयांना सुखावून गेले.

श्री. माळेकर यांनी आम्हाला ब-याच गोष्टी विस्ताराने सांगितल्या. राबीने जी शाल वापरून धर्मोपदेश करायचा असतो, त्यात ठराविक संख्येचे गोंडे असतात, ठराविक प्रकारची टोपी त्याने घालायची असते. मेंढीच्या शिंगापासून बनवलेले शोफर (Shofar) वाजवायचे असते. राबी जिथून धर्मोपदेश करतात त्या कोर्टात दिसणा-या लाकडी पिंज-यात अन्य कुणालाही जायची परवानगी नसते. ते  एक ठरलेले परंपरागत कर्मकांड असते. त्यात फार बदल झालेले नव्हते - पण अलिकडे व्हायला लागले आहेत.

या सिनगॉगचा इतिहास आणि तिथे होणारे कार्यक्रम याबाबत त्याच्या संकेतस्थळावर सविस्तर माहिती आहेच - त्यामुळे ती इथं पुन्हा देत नाही. श्री माळेकर यांनी सांगितलेली इतर माहिती फार रोचक वाटली मला - म्हणजे पारंपारिक ज्यू धर्मात स्त्रियांचे जे स्थान होते (जवळ जवळ नव्हतेच म्हणा ना) ते आता कसे बदलत चालले आहे याची काही उदाहरणे त्यांच्या बोलण्यात आली. या ठिकाणी स्त्रिया आणि पुरुष यांच्यासाठी एकत्रित प्रार्थना आता होते, ज्यू नसलेले लोकही या प्रार्थनेत सामील होऊ शकतात. पारंपरिक मान्यतेप्रमाणे तोराह (Torah) या धर्मग्रंथाचे वाचन करायचे तर किमान दहा पुरुष उपस्थित हवेत - इथं मात्र तसा काही नियम पाळला जात नाही. स्त्रिया आणि पुरुष मिळून दहा जण असावेत - अशी सुधारणा इथं करण्यात आली आहे.  'शनिवार' हा खर तर पवित्र सुट्टीचा '- साबाथ'चा दिवस पण तरीही आम्हाला माहिती सांगण्यासाठी श्री माळेकर यांनी वेळ काढला. बदल होताहेत धर्मात आणि परंपरेत हे नक्की - असा एक दिलासा त्यातून मिळाला.

Parasi Cemetery, Khan Market, New Delhi 
या मंदिराच्या जवळच  दफनभूमी आहे. तिथून थोड्या अंतरावर पारशी लोकांची दफनभूमी . त्या दोन्ही आम्ही पहिल्या. (वाटेतली ख्रिश्चन धर्मियांची दफनभूमी मात्र पाहिली नाही). तिथं काही थडगी आकाराने लहान दिसत होती त्यावर माझ्या गटातले लोक चर्चा करत होते. आकाराने लहान असणारी थडगी ही लहान मुलांची आहेत हे त्यांच्या लक्षात आणून दिल्यावर सगळेच हळहळले. पारशी लोकांची आयुर्मान जास्त असते असं एक तिथल्या माहितीवरून जाणवलं....वस्तुस्थिती नीट जाणून घ्यायला पाहिजे.  दहन आणि दफन यावर एक छोटी चर्चा झाली आमच्या समुहात तेव्हा.

दोन-तीन तासांच्या अवधीत तीन पुरातन धर्मांच्या महत्त्वाच्या ठिकाणी जाऊन आलो आम्ही याची गंमत  वाटली. एरवी खान मार्केट म्हणजे खरेदी किंवा खाणे  हे सूत्र दिल्लीत प्रचलित असताना आम्ही काहीच खरेदी न करता आणि काहीही न खाता - पण बरेच काही मिळवून त्या परिसरातून बाहेर पडत होतो हा एक चमत्कारचं होता. दिल्ली शहराच्या अजबपणाचा माणसांवरही परिणाम होतो - हा अनुभव पुन्हा एकदा आला.

तुकडया-तुकड्यांनी माझ्यासमोर आलेल्या या माहितीचं एक सलग चित्र माझ्याही मनात अजून बनलं नाही - ब-याच गोष्टी धूसर आहेत अद्याप माझ्यासाठी! हे सगळं नीट जुळवून पुन्हा एकदा खान मार्केट परिसरात भटकायचा माझा विचार तरी आहे - तो अंमलात कधी येतोय ते पाहायचं!! तोवर या अजब दिल्लीची आणखी कोणती रुपं समोर येताहेत ते कळेलच!!
*

31 comments:

  1. प्रत्येक शहरात असे झाकलेले माणिक असतेच.. फक्त शोधायला वेळ हवा..

    ReplyDelete
  2. आभार महेंद्रजी. फक्त आपल्याला वेळ असणं पुरेसं नाही - काय पाहायचं ते सांगणारी माहितगार व्यक्तीही हवी!

    ReplyDelete
  3. I recently came across with a refrence to Khan Market. It was in connection with FDI in retail. It was argued that Khan Market is a Mall, but brought up by d retailers there unintendedly. However, it showed that the retailers in India also do investment and that again helps the MSME sector.
    The Khan Market you presented here is different, but interestingly it somehow supports the Mall ambience it seems.

    ReplyDelete
  4. दिल्लीचा ऑगस्ट म्हणजे जीवघेणा असतो. उन्हाळा आणि दमटपणा - सडी गर्मी आणि माश्या ... (त्यात पुण्याच्या पावसाची आठवण घेऊन गेलेलं असलं म्हणजे तर फारच जड जातं :)
    खान मार्केट म्हणजे फक्त गर्दी, खरेदी आणि खादाडी असा समज होता माझा. तिथे इतक्या निवांत आणि सुंदर जागा आहेत, याचा पत्ताच नव्हता! खरंच, माहितगार व्यक्तीबरोबर हिंडलं पाहिजे शहरात.

    ReplyDelete
  5. अनामिक/का, खान मार्केट हे Mall आहे का? माहिती नाही. मी त्याबद्दल कधी विचार केला नव्हता. तुमचा प्रतिसाद वाचून थोडा शोध घेतला. एक दुवा मिळाला तो देते इथं : http://wiki.answers.com/Q/What_is_the_difference_between_a_shopping_center_and_a_mall

    माझ्या समजुतीप्रमाणे खान मार्केट हे शॉपिंग सेंटर आहे. पण या विषयातलं मला काही समजत नाही त्यामुळे अधिक जाणून घ्यायला आवडेल.

    ReplyDelete
  6. गौरी, मी या लेखात उल्लेख केलेल्या सगळ्या जागा खान मार्केट मेट्रो स्थानकापासून दहा मिनिटांच्या चालण्याच्या अंतरावर आहेत. पुढच्या दिल्ली भेटीत नक्की पहा. मी तोवर इथं असले, तर येईन बरोबर.

    ReplyDelete
  7. तो मॉल आहे असं त्या लेखकानं म्हटलं आहे ते थोडं रुपकात्मक असावं. मॉल म्हणजे काय, याला आव्हान देत त्यानं ती मांडणी केली होती. सिंगल ब्रँड, सिंगल ओनर ते मल्टी ब्रँड, सिंगल ओनर याऐवजी मल्टीब्रँड, मल्टीपल ओनर्स असं त्यांना सांगायचं आहे. थोडक्यात, सध्याच्या चर्चेतल्या अर्थकारणाच्या प्रतिमानाला आव्हान एक प्रकारचं.

    ReplyDelete
  8. Very true.. delhi kharach ajab ahe, ani ho mihi delhitach ahe.. pudhachyaweli delhi bhatkayacha mood asel tar mi sausah madatila hazar hoin :)

    ReplyDelete
  9. Interesting माहीती. मजा आली वाचायला.

    ReplyDelete
  10. अनामिक, त्या लेखाची लिंक असेल तर द्या - वाचायला आवडेल मला तो लेख.

    ReplyDelete
  11. प्रसाद हरिदास, स्वागत आहे आपलं.

    ReplyDelete
  12. संग्राम गायकवाड, आभार.

    ReplyDelete
  13. खान मार्केटची सफर आवडली.

    ReplyDelete
  14. क्षिप्रा, एकदा या आता खान मार्केटला भेट द्यायला :-)

    ReplyDelete
  15. छान छान खान लिखाण !!

    ReplyDelete
  16. आभार, अलिबागवाला.

    ReplyDelete
  17. वाह, छानच

    बागवाली मस्जीदचे घुमट पाहून क्रेमलिन राजवाड्याच्या कांदा घुमटाची आठवण झाली. ते हुबेहूब कांद्यासारखे बसके दिसतात, हे अर्थातच तितके नाहीत पण पाकळ्या रंगवल्यामुळे तसे दिसत असावेत.

    पारशी Tower of Silence बद्दल माहित आहे पण ते दफनही करतात ते माहित नव्हतं. खरंच आपल्याच देशवासीयांबद्दल किती कमी माहित असतं आपल्याला?

    ReplyDelete
  18. प्रीति, गिधाडांची संख्या कमी झाल्यामुळे भारतात तरी
    Tower of Silence वापरणे कमी झाले आहे. कारण आपल्या प्रियजनाचे प्रेत तिथं सडत पडले आहे हे स्वीकारणे जड आहे कुणालाही. ही एक लिंक आहे बातमी सांगणारी.
    http://ibnlive.in.com/news/bury-funeral-ritual-parsi-woman/20608-3-1.html
    त्याचाच आणखी एक दुवा:
    http://www.telegraph.co.uk/news/1528696/In-the-Towers-of-Silence-an-ancient-ritual-of-death-comes-under-threat.html

    असे बदल होत जातात धर्मात - काही वेळा बाह्य परिस्थिती बदलल्याने. शिवाय पर्यावरण आणि धर्म यांचा संबंध आपण समजतो त्यापेक्षा गहन आहे हेही कळते त्या निमित्ताने.

    ReplyDelete
  19. खुप छान माहिती दिली आहेस त्यासाठी आभार
    मी पहिल्यांदाच ह्या ब्लॉग वर भेट दिली आहे, खुप कही वाचन्या सारखे आहे, पुन्हा एकदा आभार
    माज्हा देश

    ReplyDelete
  20. Always Unlucky, स्वागत आहे तुमचं. तुम्हाला इतरही लेख आवडतील अशी आशा आहे.

    बाय द वे, नाव का हो असं निराशावादी घेतलं आहे? We could be unlucky sometimes but not always!!

    ReplyDelete
  21. Yes I was following news on tower of silence especially in Mumbai.

    मुस्लीम, ज्यू आणि पारशी या तीनही धर्मांच्या इतक्या जवळ जवळ असलेल्या स्थळंबद्दलची माहिती Interesting आहे.

    ReplyDelete
  22. अजून एक म्हणजे, सध्या मी Antiquity period बद्दल वाचते आहे. अब्द हा शब्द प्राचीन ग्रीक भाषेत शब्द या अर्थाने वापरला जात होता, असं कळलं. आहे की नाही interesting? ब्लॉगच्या नावात अब्द असल्याने हे सांगावंसं वाटलं. You may know it.

    ReplyDelete
  23. >> लोक कुणाला निवडून देतात याचा एक त्रासदायक इतिहास आहे हे त्या निमित्ताने लक्षात आलं माझ्या.

    भन्नाट निरीक्षण आणि चपराक !!

    >> इथल्या सदनिकेची किंमत काय असेल असं एकीने विचारलं - मी त्या चर्चेत अजिबात लक्ष घातलं नाही!!

    हाहाहाहा


    >> 'शनिवार' हा खर तर पवित्र सुट्टीचा '- साबाथ'चा दिवस पण तरीही आम्हाला माहिती सांगण्यासाठी श्री माळेकर यांनी वेळ काढला.

    ग्रेटच.. इथे अजूनही ज्यू बहुल दुकानं शनिवारी बंद असतात !!

    ReplyDelete
  24. सावितादी, खान मार्केटच्या बाजारात भटकायला मला आवडायचे. तसेच जुन्या दिल्लीत. पण नव्या दिल्ली बद्दल मला नेहमीच तिरस्कार वाटत आला. नव्या दिल्लीतील आधुनिक वास्तू मी पाहात असे. सर्व काही भपकेबाज. पण त्यांच्यावर अनेक वर्षें चिंतन केले. सर्वच शहरांना सत्तेचा दुर्गंध येतो. पण अनेकांना त्या दुर्गंधाची एवढी संवय होते कि तो जाणवेनासा होतो.

    ReplyDelete
  25. प्रीति, पारसी दफनभूमी आणि ज्यूंचे प्रार्थनास्थळ या दोन्ही गोष्टी 'प्राचीन' नाहीत तर स्वतंत्र भारतातल्या आहेत - हेही रोचक आहे.

    बाकी 'अब्द' म्हणजे 'शब्द' आहे ग्रीक भाषेत ही माहिती नवीनच आहे माझ्यासाठी. मला आजवर फक्त अरेबिक भाषेत अब्द शब्दाचा 'सेवक' - किंवा खरं तर 'गुलाम'असा अर्थ आहे इतकंच माहिती होतं. http://en.wikipedia.org/wiki/Abd_(Arabic)

    ReplyDelete
  26. हेरंब, 'साबाथ'अजूनही पाळला जातो तिकडे - हे वाचून आश्चर्य वाटलं.

    ReplyDelete
  27. रेमीजी, तुमची भावना मी काही अंशी समजू शकते.

    ReplyDelete
  28. I so wish there was a translation of this interesting looking post available!

    Looks really nice!

    ReplyDelete
  29. personalconcerns, do visit the following link:
    http://thistimethattime.blogspot.in/2012/10/182-khan-market.html

    Hope you find it interesting.

    ReplyDelete
  30. माझ्या टिप्पणीत वैयक्तिक काहीच नाही. एका लेखकाने दिल्ली शहराला सत्तेचा अक्ष - Axis of Power - असे म्हटलेय. हस्तिनापुर - कुरुक्षेत्र यांपासून ते आजतगायत दिल्ली सत्तेचे केंद्र झालेय. माझ्या भावनांना या वस्तुस्थितीपुढे काय किंमत? आणि आमचे राष्ट्रपती ब्रिटीश सत्तेचे Outhouse, त्याला 'राष्ट्रपती भवन' नाव देऊन तेथे राहायला गेले. यात सर्व काही आले. अर्धे आयुष्य खेड्यांत काढले बाकीचे अनेक शहरात. पाच लक्ष मैलांचा प्रवास केल्यावर आणखी काय पाहायचे राहिले? पहिले त्याचा अर्थ लावायचे आता काम करतोय.

    ReplyDelete
  31. रेमीजी, पाहण्याइतकेच अर्थ लावणेही महत्त्वाचे आहेच. बाकी सत्तेचा अक्ष हे बरोबर आहेच. इथला इतिहास शाळेत मला शिकायला लागला नाही याचं समाधान आहे - इतक्या घटनांच्या सनावळी आणि इतकी नावं माझ्या लक्षातही राहिली नसती.

    ReplyDelete