ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, January 21, 2013

१४७. विवेकानंदांचा वेदान्त विचार: भाग १ : मागोवा


स्वामी विवेकानंदांची ओळख होउन तशी बरीच वर्षे उलटली. प्राथमिक शाळेत शिकत असताना, इयत्ता तिसरीत 'थोरांची ओळख या पुस्तकात विवेकानंदांच्या शिकागो परिषदेतील दिग्विजयाचे वर्णन वाचल्याचे मला आठवते. शाळेच्या वाटेवर भेटलेल्या अनेक गोष्टी कालांतराने विस्मरणात जातात हा नेहमीचा अनुभव! पण सुदैवाने आयुष्याच्या पुढच्या वाटचालीत विवेकानंद मला पुन्हा भेटले. 

एकविसाव्या शतकात जग पुढे जात असताना मागे वळून विवेकानंदांच्या विचारांचा अभ्यास करणे यात एक विशेष औचित्य आहे. ११ सप्टेंबरच्या त्यांच्या विश्वबंधुत्वाच्या हाकेला शंभराहून जास्त वर्षे झाली आहेत. आता तर ११ सप्टेंबर म्हटले की विवेकानंद न आठवता अमेरिकेवरचा भीषण दहशतवादी हल्लाच आठवतो; आपण जणू विश्वबंधुत्व विसरलोच आहोत. पण विवेकानंद वाड्मय वाचणे हे फक्त वरवरचे वाचन राहत नाही. विवेकानंदांचे शब्द अत्यंत जिवंत, रसपूर्ण, चैतन्यमयी आहेत हा माझा आणि अनेकांचा अनुभव आहे. अर्थात त्यांचे शब्द केवळ वाचकांवर मोहिनी घालतात म्हणून सर्वश्रेष्ठ आहेत अशातला भाग नाही. त्यांच्या शब्दांनी प्रेरित होउन लक्षावधी माणसे समाजाच्या भल्याकरिता कृतिशील झाली हे विवेकानंदांच्या शब्दांचे मला सर्वात मोठे वैशिष्टय वाटते.
जगात सर्वसाधारणपणे दोन प्रकारची माणसे आढळतात. एक म्हणजे 'जुने तेच सोने असा अटटहास धरुन बसणारी माणसे. काळ बदलला की व्यवहार बदलतो हा साधा नियम हे लोक विसरतात. याउलट काही लोक सतत नव्याचा हव्यास धरुन जगतात. त्यात काही फायदे जरुर आहेत. माणसांसाठी सोयीची साधने निर्माण करण्यात या प्रकारच्या लोकांचा मोलाचा वाटा आहे. पण कधीकधी निव्वळ बदलालाच प्रगती मानण्याची चूक ते करतात. जुन्या झालेल्या विवेकानंदांकडे वळून पाहणे हे त्यांच्या दृष्टीने मागासलेपणाचे लक्षण ठरते. विवेकानंदांच्या मृत्युलाही आता शंभरपेक्षा जास्त वर्षे लोटली आहेत. मग त्यांच्या विचारांना सामोरे ठेवून आपण काळाची पावले तर मागे फिरवायचा प्रयत्न करत नाही ना? - अशी शंका काहींच्या मनात येते.

सद्यस्थितीतील प्रश्न

भारताचे सध्याचे जे प्रश्न आहेत त्याला धर्माची वाट सोडून वेगळया मार्गांनी उत्तरे शोधण्याची गरज जर कोणाला वाटली तर ते फारच स्वाभाविक आहे. स्वातंत्र्य मिळविण्याचा काळ, त्यासोबत आलेली फाळणी, धार्मिक दंगे आणि त्यापायी उध्वस्त झालेली लाखो लोकांची आयुष्ये हा इतिहास सहजासहजी विसरता येण्यासारखा नाही. त्याची वर्णने आजही अंगावर येतात. बाबरी मशिदीचा पाडाव व त्यानंतर उसळलेले दंगे, मुंबईतील बॉम्बस्फोट, पंजाब, जम्मू-कश्मीर, गोध्रा ..............असे सारे उद्रेक अनुभवताना आपण होरपळून गेलो आहोत. आणि हे सगळे कशासाठी तर ज्यांच्यात्यांच्या धर्माचा अभिमानासाठी! त्यामुळे 'मरो तो धर्म अशी अनेकांची तीव्र भावना आपण समजू शकतो – ती अगदी स्वाभाविक आहे.

गरीबी, वाढती महागाई, बेकारी, जागतिकीकरणाचे आक्रमण, दहशतवाद, महिलांवरील अत्याचार, ढासळलेली कायदा व सामाजिक व्यवस्था, राजकारण्यांचे व गुंडांचे साटेलोटे, कशाशी काहीही देणे घेणे नसल्यागत स्वत:च्याच विश्वात रमलेला समाज, शिक्षणाचे व्यापारीकरण, प्रसार माध्यमांचे आक्रमण, निरक्षरता, व्यसनाधीनता, प्रदूषण, भाषिक तंटे, पाणी वाटपावरुन होणारे राज्यांमधले वाद, विस्थापितांचे पुनर्वसन .................. असे असंख्य राष्ट्रीय प्रश्न आपल्यापुढे आहेत. दिवसेंदिवस ते अधिकच उग्र रुप धारण करत आहेत. त्याशिवाय अनेक आंतरराष्ट्रीय घडामोडींचे परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर घडत आहेतच. पूर, दुष्काळ, सुनामी, भूकंप, चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तीही काही आपली पाठ सोडत नाहीत.

या सर्व प्रश्नांची साधकबाधक चर्चा करुन त्यावर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करण्याऐवजी धर्मावर चर्चा करणे ही एक पळवाटच आहे असे काहींना वाटू शकते. कारण खरे सांगायचे तर, कोणी पाहिला आहे ईश्वर? कोणाला माहिती आहे मोक्ष म्हणजे काय ते? असल्या खुळचट समजुतींमुळेच तर भारत आजवर मागासलेला राहिला आहे. भौतिक प्रगती साधण्याला खरे तर पर्याय नाही, ती न जमली की समाज असल्या खुळचट समजुतींच्या आहारी जातो असे दिसते – असे मत अनेक लोक मांडताना आढळतात.

हे असे प्रागतिक आणि बुद्धिवादी विचार मांडणा-या लोकांच्या प्रामाणिकपणाविषयी, त्यांना वाटणा-या तळमळीविषयी आदर व्यक्त करुनही असे म्हणावे लागते की,  भारतीय समाजाच्या मनाची नस कदाचित या लोकांना अदयाप गवसलेली नसावी!

हिंदुत्ववादाची लाट?

कारण देशातील सर्वच माणसे विचारवंतांच्या या बुद्धिवादी मताशी सहमत आहेत असे दिसत नाही. किंबहुना चित्र दिसते ते वेगळेच - समाजातील अधिकाधिक लोकांवर धर्माचा पगडा वाढतो आहे असे दिसते. आणि याचे सर्वात साधे कारण म्हणजे धर्म हा या देशाचा स्वभाव आहे!

'आपण पाहिले आहे की आपले तेज, आपले सामर्थ्य, एवढेच नव्हे तर आपल्या राष्ट्राचे जीवन - या सर्वांचा आधार धर्मच आहे. धर्माला आपल्या जीवनाचा आधार बनविणे हे बरोबर आहे की चूक आहे, चांगले आहे की वाईट आहे, परिणामी कल्याणकारक आहे की अकल्याणकारक आहे याची चर्चा मी आज करीत नाही, पण चांगले असो वा वाईट असो धर्मच आपल्या राष्ट्राच्या जीवनाचा आधार आहे. तो तुम्ही टाळू शकत नाही. तो नेहमीच तुमच्या राष्ट्राच्या जीवनाचा आधार राहणार आहे. आणि म्हणून आपल्या धर्मावर माझ्याइतकी तुमची श्रद्धा नसली तरीही तुम्हाला याचा आश्रय घ्यावाच लागेल. या धर्माने तुम्ही निबद्ध आहात आणि जर तुम्ही त्याचा त्याग केला तर तुमचा सर्वनाश होईल. आपल्या जातीचा तोच जीवनाधार आहे व तो सुदृढ केला पाहिजे. ........................... राजकीय व सामाजिक सुधारणा आवश्यक नाही असे सांगण्याचा माझा आशय नाही - माझे सांगणे हेच आहे, आणि ते तुम्ही नीट लक्षात ठेवा की या गोष्टी भारतात गौण आहेत व धर्म हीच मुख्य गोष्ट आहे........ असे विवेकानंद म्हणतात.

भारतात गेल्या काही वर्षांत हिंदुत्त्ववादाची लाट आली आहे की काय अशी मनात शंका येते. 'तुमचा धर्म कोणता? या प्रश्नावर 'मानवधर्म असे उत्तर अभिमानाने देणारी एक पिढी आता जणू लयाला गेली आहे. 'गर्व से कहो हम हिंदु है असे स्टिकर्स मधल्या काळात कित्येक घरांमध्ये लावलेले दिसत असत. पण त्या आधी या देशात मध्यंतरीचा एक काळ असा होता ,की स्वत:ला हिंदू म्हणवून घेण्याची सामान्य माणसाला लाज वाटत होती. विवेकानंदांनी आपल्या या असल्या प्रवृत्तीवर सडकून टीका केली आहे. 'आज हिंदू शब्दाने जरी काही वाईट अर्थबोध होत असेल तरी हरकत नाही. हिंदू या शब्दाला कोणत्याही भाषेतील अधिकात अधिक गौरवपूर्ण अर्थ आपल्या कृतींनी आणून देण्यासाठी आपण सिद्ध होऊ या. असे अत्यंत रचनात्मक आवाहन स्वामीजी करतात. त्यामुळे हिंदू जनजागरणाचा भारतीयांना अभिमान वाटणेही स्वाभाविकच आहे, हे देखील समजून घेण्याची गरज आहे.

पण अर्थातच विवेकानंदांना अजिबात अभिप्रेत नसणारा जागरणाचा एक पैलूही येथे आहे. आजचा हिंदुत्ववाद, हिंदुत्ववादाची ही लाट निव्वळ राजकीय स्वरुपाची आहे. हिंदू धर्माच्या मूळ तत्वज्ञानाशी या जागरणाचे आणि तिच्या दुराग्रही पाईकांचे फारसे देणेघेणे नाही. त्यामागे मतांचे, सत्तेचे आणि स्वत:चा प्रभाव शाबूत राखण्याचे राजकारण आहे. समाजाचे जीवन सुरळीत राखण्याचा किंवा व्यक्तींना आध्यात्मिक मूल्ये देण्याचा यात काही विचारच केला जात नाही, असे माझे मत आहे.

हिंदुंच्या राजकीय अस्मितेचा प्रश्न महत्त्वाचा नाही असे मला म्हणायचे नाही. पण हिंदुत्वाचा ध्वज उंच राखण्याच्या नावाखाली गेली काही दशके जे राजकारण केले जात आहे त्यात अभिमान वाटण्याजोगे काहीही नाही, हे राजकीय नेते आणि त्यांचे धुंद अनुयायी सोयिस्करपणे विसरत आहेत.

हिंदू जनजागरणाच्या आंदोलकांनी स्वामी विवेकानंदांना आपले मार्गदर्शक, नेता, गुरु, नायक या स्वरुपात स्वीकारले आहे. अनेक पत्रकांमध्ये, जाहिरातींमध्ये, सभांमध्ये विवेकानंदांची वचने सर्रास उदधृत केली जात आहेत. विवेकानंदांना केवळ राजकीय हिंदुत्व अभिप्रेत नव्हते हे जाणूनबुजून नजरेआड केले जात आहे, यात फार मोठा धोका आहे. विवेकानंदांच्या, हिंदुत्वाच्या नावाने भावी पिढयांपुढे जर आपण हिंसेचा, अतिरेकाचा, असहिष्णुतेचा आदर्श ठेवणार असू तर आपण आपल्या पायावर धोंडा घालून घेत आहोत यात शंका नाही. या राजकीय चळवळीला आपण जर तत्त्वचिंतनाची जोड दिली नाही तर कालांतराने आपला समाज आणि देश अधिकच दुर्बल होईल. समाजाला ख-या तेजोमयी हिंदुत्वाची ओळख करुन घ्यायची असेल तर आपल्याला विवेकानंदांचे बोट धरुन चालले पाहिजे.

सर्वांचे विवेकानंद

हिंदू धर्माच्या पुनरुत्थानाची ताकद फक्त विवेकानंदांमध्येच आहे असे अतिरेकी मत मी मुळीच मांडणार नाही. भगिनी निवेदितांच्या शब्दांत सांगायचे झाले तर, 'स्वामी विवेकानंदांच्या भाषणांतही वेदांमधील व उपनिषदांमधील उद्धरणे सढळपणे विखुरलेली आढळतात. भारताच्या स्वत:च्याच ठायी असलेल्या धनाचे त्यांनी त्याला फक्त स्वरुप समजावून सांगितले, त्याचा त्याला साक्षात्कार करवून दिला एवढेच. त्यांनी प्रचारलेली सत्ये, ते जन्माला आले नसते तरी देखील तितकीच खरी राहिली असती, नव्हे, याहीपेक्षा आणखी म्हणावयाचे म्हणजे ती तितकीच विश्वसनीय, अधिकृत नि अस्सलही असती.

विवेकानंदांच्या बाबतीत असे दिसून येते की समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांना ते आपलेसे वाटतात. हिंदुत्ववादी चळवळीप्रमाणे मार्क्सवादी चळवळीलाही विवेकानंदांबददल प्रेम वाटते. (या दोन्ही चळवळी स्वत:च्या सोयीची वचने मागचा पुढचा संदर्भ वगळून वापरतात हेदेखील आपण लक्षात घेतले पाहिजे) युवकांना प्रेरित करण्याची असीम शक्ती विवेकानंदांच्या शब्दांत आहे. केवळ झोपी गेलेल्यांनाच नव्हे तर झोपेचे सोंग घेऊन बसलेल्यांनाही विवेकानंदांचे शब्द जागे करतात.

शिकागो सर्वधर्मपरिषदेच्या शताब्दीच्या निमित्ताने १९९३ च्या सप्टेंबरमध्ये The Week या साप्ताहिकाने विवेकानंदांवर विशेष अंक प्रसिद्ध केला होता. विवेकानंद सर्वांनाच कसे जवळचे वाटतात याविषयी त्या अंकात अनेक लेख होते. धार्मिक प्रवृत्तीच्या लोकांना विवेकानंद आदर्श वाटावेत हे स्वाभाविकच आहे. पण त्याचबरोबर १९०५ मध्ये बंगाल फाळणीविरुद्ध झालेल्या आंदोलनात अनेक क्रांतिकारकांकडे विवेकानंद  साहित्य सापडल्याचा उल्लेख आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणा-या अनेक सेवाभावी संस्था विवेकानंदांच्या विचारांचे ऋण खुलेपणाने मान्य करतात. ज्याचा ज्या प्रकारचा स्वभाव, ज्याची जी गरज, त्याप्रमाणे अचूक मार्गदर्शन विवेकानंदांच्या लेखनातून आपल्याला मिळते. 'ये यथा मां प्रपद्यन्ते या भगवदगीतेतील वचनाची आठवण विवेकानंद वाचताना येतेच येते.

काळाची गरज

विवेकानंद सर्वांना आवडतात हे काही त्यांचा अभ्यास करण्याचे एकमेव कारण नव्हे. विवेकानंद शिला स्मारकाचे शिल्पकार व विवेकानंद केंद्राचे संस्थापक कै. एकनाथजी रानडे यांच्या शब्दांत सांगायचे तर 'विवेकानंदांनी उदघोष केला तो शक्तीच्या – सामर्थ्याच्या उपासनेचा. शरीरबल, मनोबल आणि आत्मबलाच्या उपासनेचा! सर्व क्षेत्रांत बलाची उपासना करणे हीच आजची सर्वात मोठी आवश्यकता आहे. 'मन वज्र हवे अन मनगट ते पोलाद! लोखंडांच्या कांबीसारखे स्नायू, बेलाग पोलादाच्या नसा आणि वज्रासारखे अजिंक्य सामर्थ्यवान मन असलेल्या माणसांनी हे राष्ट्र घडले पाहिजे अशी त्यांची आस होती. सामर्थ्य आणि पुरुषार्थाने युक्त असे क्षात्रवीर्य आणि तप:पूत सत्त्वसंपन्न असे ब्राह्रातेज या दोन्हींचा वारसा भारतपुत्रांनी वाढवला पाहिजे असे ते म्हणत. आजच्या या संकटाच्या आणि विनाशाच्या काळात नेमकी याच गोष्टीची आवश्यकता आहे. आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात नेमक्या याच गोष्टींची आपण उपेक्षा केली आहे. कारण परदेशातून आयात केलेल्या भोगवादी विचारांच्या मायाजालात आपण गुरफटून गेलो आहोत.

द्यस्थितीतील प्रत्येक प्रश्नावर विवेकानंदांकडून आपल्याला तयार उत्तर मिळेल असा आशावाद केवळ भाबडाच नव्हे तर व्यर्थ देखील आहे. अणुध्वम, प्रदूषण, शिक्षण क्षेत्रातील अडचणी, बेकारी अशा प्रश्नांवर विवेकानंदांकडून तयार उत्तर मागणे आणि ते मिळत नाही म्हणून विवेकानंदांकडे लक्ष न देणे करंटेपणाचे ठरेल.

विवेकानंद शंभर वर्षांपूर्वी होऊन गेले म्हणून आजच्या प्रश्नांवर त्यांच्याकडून तयार उत्तर मिळणे अवघड आहे असे मला म्हणायचे नाही. आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनविषयक दृष्टिकोनापेक्षा कितीतरी वेगळया पातळीवरुन विवेकानंद जीवनाकडे पाहतात. त्या विशिष्ट जीवनदृष्टीपर्यंत पोहोचायचे कसे याचे मार्गदर्शन आपल्याला विवेकानंदांकडून निश्चिततपणे लाभते. त्यांची जीवनविषयक दृष्टी एकांगी नसून सर्वसमावेशक आहे हे विशेषत्वाने जाणवते. विवेकानंदांचा मार्ग या जगातील समस्यांनी हैराण होऊन पळ काढणा-यांसाठी नाही, तो शूरांसाठी आहे, झुंजार लोकांसाठी आहे. विवेकानंदांचे वाड्मय उपनिषदातील 'त्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत। क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गं पथस्तत्त्कवयो वदन्ति ।।  या ओळीची आठवण करुन देतात.

विवेकानंदांचा वेदान्त विचार

विवेकानंदांनी शिकागो जागतिक सर्वधर्मपरिषदेत हिंदू धर्माचा ध्वज फडकावला अशा आशयाचे विधान आपण वाचले आणि ऐकले आहे. विवेकानंदांचा धर्म संकुचित नाही तर तो सार्वजनीन धर्म आहे, सनातन धर्म आहे. त्यात पांथिक, सांप्रदायिक अभिनिवेशाला यत्किंचितही जागा नाही; आहे ती उदारता. परमताबददल निव्वळ सहिष्णुता नाही तर आहे खराखुरा स्वीकार! १९ सप्टेंबर १८९३ रोजी त्या परिषदेसमोर विवेकानंदांनी वाचलेला 'हिंदुधर्म हा निबंध आपण मुळातून वाचला पाहिजे.

विवेकानंदांचे व्यक्तिमत्व इतके प्रभावी होते, की मनात येते तर ते एका नव्या संप्रदायाची निर्मिती करु शकले असते. पण त्यांच्या मते 'पंथाभिमान, स्वमतान्धता आणि तज्जन्य अनर्थकारी धर्मवेड यांनी या आपल्या वसुंधरेवर दीर्घकाळ अंमल गाजवला आहे. त्यांनी जगामध्ये अनन्वित अत्याचार माजविले असून कितीदा तरी ही पृथ्वी नररक्ताने हाणून काढली आहे .... पाश्चिमात्य देशांत आणि भारतातही त्यांनी श्रद्धेचा, भक्तीचा, बलाचा संदेश वारंवार दिल्याचे दिसते. इतर सर्व धर्मांबददल आदर राखताना स्वधर्माचे पालन त्यांना महत्त्वाचे वाटे.

विवेकानंदांचा विचार हा मूलत: वेदान्त विचारच आहे असे आपल्याला नि:शंकपणे म्हणता येते. वेदान्त हा केवळ वाचनाचा किंवा मननाचा विचार नसून तो प्रत्यक्ष जीवन जगण्याचा अत्युत्कृष्ट मार्ग आहे अशी त्यांची स्पष्ट धारणा होती. ते म्हणतात ' वेदान्तदर्शन पूर्णपणे व्यवहार्य आहे, त्याच्या आस-याने जीवन जगणे व घडविणे शक्य आहे, अगदी शक्य आहे.

धर्म, शिक्षण, स्त्रियांचे प्रश्न आणि संघटना या चारही क्षेत्रांमध्ये विवेकानंदांचे विचार प्रभावी योगदान देऊ शकतात. विवेकानंदांच्या विचारांचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे 'देश हा देव असे माझा अशी भावना चेतविण्यात त्यांना कमालीचे यश लाभलेले दिसून येते. ईश्वर केवळ मंदिरातच नाही तर तो सर्वत्र आहे ही विवेकानंदांची शिकवण म्हणजे 'सर्वं खल्विदं ब्रह्म’ या औपनिषदिक मंत्राचे प्रतिबिंबच होय! दरिद्रीनारायण, मूर्खनारायण, अज्ञानीनारायण याही देवतांची पूजा करण्याचे आदेश त्यांनी आपल्याला दिले. पारमार्थिक आयुष्याबाबत स्वप्ने रचत राहणे हे विवेकानंदांचे जीवनध्येय नव्हते. तर अ‍ॅनी बेझंट यांनी वर्णन केल्याप्रमाणे ते खरेखुरे 'योद्धा संन्यासी होते.

आपण सारे सिंहाचे छावे आहोत पण स्व-स्वरुपाच्या अज्ञानामुळे आपण बकरीचे जिणे जगत आहोत अशी एक कथा विवेकानंद त्यांच्या श्रोत्यांना ऐकवत असत. विवेकानंदरुपी सिंहाच्या गर्जनेला प्रतिसाद देण्याचे ऐतिहासिक काम या जगाने करण्याची वेळ आता आली आहे.

10 comments:

  1. Replies
    1. इंद्रधनू, मतभेदाचे मुद्दे पुढे येतील कदाचित :-)

      Delete
  2. झालेत बहु, होतील बहु... परंतु या सम हा.

    ReplyDelete
  3. "प्रागतिक आणि बुद्धिवादी विचार मांडणा-या लोकांच्या प्रामाणिकपणाविषयी, त्यांना वाटणा-या तळमळीविषयी आदर व्यक्त करुनही असे म्हणावे लागते की, भारतीय समाजाच्या मनाची नस कदाचित या लोकांना अदयाप गवसलेली नसावी! "
    हे भयंकर खरंय.
    वरकरणी हिंदुत्व अन आधुनिक समाज कितीही असंबद्ध विषय असले तरी प्रत्यक्षात तसं नाही. पण विचार अन तत्त्वं सुद्धा वन मिनिट रेसिपी प्रमाणे सोप्पी करून सांगितली नाहीत तर ती न समजण्यात सांगणाऱ्याचाच दोष अधिक वाटतो! त्यामुळे विवेकानंदाचा विचार समजून घेणे बाजूला राहून त्यांच्या चित्रामागच्या भगव्या पार्श्वभूमीलाच अधिक महत्त्व येते!

    ReplyDelete
    Replies
    1. अनुज्ञा, टोकाचं काळं-पांढरं नेहमीच असतं अशातला भाग नाही - म्हणून नीट समजून घ्याव्या लागतात गोष्टी वारंवार!तपासून पाहावं लागत स्वत:लाच!

      Delete
  4. धर्माचा पगडा वाढत आहे असे मला वाटत नाही. वाढतो आहे तो रिच्यु्लिझम ऊर्फ कर्मकांडवाद. उपनिषदात वैदिक कर्मकांडामागील मनोभूमिकेचे विश्र्लेषण केले आहे आणि त्याकडे लक्ष दिले जावे असा विवेकानंदांचा आग्रह आहे. त्यानी वेगळा विचार मांडला असा त्याचा अर्थ लावणे अन्यायकारक आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. अनामिक/का आभार. कर्मकांड हाही धर्माचा एक भाग आहे.विवेकानंदांनी 'वेगळा' विचार मांडला की नाही - याबद्दल पुढे येईल विस्ताराने.

      Delete
  5. Changla vishay nivadla ahes... ani tyavarche ase vistrut likhan vachne nakkich dnyan vadhavnare ahe.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद, श्रीराज.

      Delete