‘बिग बझार’ आपल्याकडे येऊन किती वर्ष झाली? माहिती नाही. पण तो प्रकार
एकंदर स्थिरावलेला दिसतोय. कधी तिकडं जायची वेळ आली नव्हती. खरेदीची माझी हौस तशी
मर्यादित म्हणा; किंवा कोप-यावरच्या मारवाड्याकडे काय मिळत नाही म्हणा; किंवा
काहीही म्हणा ....
पण मी आज पहिल्यांदा ‘बिग बझार’मध्ये गेले. काही गोष्टी जाणवल्या त्या अशा:
1.
लहानपणीच्या अस्सल गावरान आठवडी बाजाराची आठवण
आली. आमच्या गावाच्या बाजारात माणसं शिरा ताणून ओरडायची – इथं मदतीला स्पीकर्स
होते. पण वृत्ती तीच – गि-हाईक खेचून घेण्याची आणि ग्राहकाची स्वस्तात माल
मिळवण्याची.
2.
देशात आर्थिक मंदी आहे, गरीबी आहे, महागाई
वाढतीये .... हे विसरायला झालं. तिथं वावरताना सगळं कसं व्यवस्थित आहे सभोवताली
असं वाटत राहिलं! भूलभुलैया होता तो जणू.
3.
इतकी खरेदी लोक का करत असावेत असा प्रश्न पडला. म्हणजे
ज्या त्या माणसाच्या भोवती वस्तू ओसंडून
वहात होत्या. आपलं जगणं आपल्याही नकळत प्रचंड गुंतागुंतीचं होऊन गेलंय आणि परतीची
वाट नाही अशी हतबलता एक क्षणभर वाटून गेली – एक क्षणभरचं!
4.
माणसं ‘एकावर एक फ्री’च्या मोहात पडून अनावश्यक
खरेदी करतात. ‘पैसे वाचवायचे असतील तर मुळात ते अधिक खर्च करा’ – हा एक मोठा
विरोधाभास आहे. हे मजेदार आहे. स्वत:ला बुद्धिमान समजणारी माणसं त्यात अडकताना
पाहून तर आणखीच गंमत वाटली. आणि विषादही.
5.
आपण ग्लोबल खेड्यात राहतो आहोत की ‘विश्वाचा अर्क
असणा-या स्थानिक स्थितीत’ राहतो असा एक प्रश्न पडला तो तिथल्या असंख्य वस्तू आणि
एकाच वस्तूमधलं वैविध्य पाहून. ग्राहक म्हणून पर्याय असायला हवेत. पण ते पर्याय
बरेच असले की निर्णय घ्यायला सोपं जातं की गोंधळ वाढतो? या सगळ्यात ‘ब्रान्ड लॉयल्टी’
नावाची काही गोष्ट शिल्लक आहे का आणि नसल्यास त्यातून उत्पादकांनी कसा मार्ग काढलाय
हे समजून घेतलं पाहिजे असं जाणवलं.
6.
बाहेर कांदे ७० रुपये किलो असताना इथं यांना ते
४९ रुपये किलो द्यायला कसे परवडत होते? त्याची अगदी जाहिरात चालली होती जोरात आणि
त्या काउंटरवर झुंबड उडाली असणार याची मी कल्पना करू शकत होते. तुम्ही मोठ्या
प्रमाणात खरेदी केली की तुम्हाला गोष्टी स्वस्त मिळतात हे सामान्यज्ञान मलाही आहे.
पण एका किलो कांद्यामागं २१ रुपये फरक हा खूप जास्त नाही का? हा फरक कसा निर्माण
होतो – त्यात कुणाकुणाचा फायदा होतो आणि कुणाकुणाचा तोटा होतो. दलाल कमी होऊन
प्रत्यक्ष शेतक-यांचा फायदा वाढला का? का दलाल गेले, शेतकरीही तिथंच आहेत आणि दुसरचं
कुणीतरी नफा कमावतंय?
7.
खरेदी करण्याचे निकष काय असतात – उपयोग, हौस, दिखावा,
व्यसन .... ? मी दोन गोष्टी खरेदी केल्या – दोन्ही ‘उपयोग’ या निकषावर – म्हणजे मी
केवळ उपयुक्ततावादी आहे का?
8.
घरात एवढं सामान ठेवायला जागा असते का लोकांच्या?
म्हणजे कुठं ठेवतात इतकं सामान? ते टिकतं का टाकून द्यावं लागतं?
9.
कितीही पैसे कमावले तरी ते इथं अपुरेच पडतील –
याची जाणीव झाली. म्हणजे मोह आहेच – तुमच्याकडे भांडी असतील तर इथं अजून नवी
डिझाइन्स दिसणार, नवे रंग दिसणार, नव्या किमती दिसणार – कुठं थांबायचं हे
ज्याला/जिला कळलं त्यांच्यासाठी ही फक्त गंमत आहे – पण कळेपर्यंत काय?
10.
गर्दीच्या चेह-यावर अनेक प्रकारचे भाव होते – कुतूहल,
टंगळमंगळ, जबाबदारी, टाईमपास, निरिच्छपणा, टवाळकी, गांभीर्य ... बाकी खूप काही बदललं
तरी माणसांत जोवर वैविध्य टिकून आहे तोवर चिंतेचं कारण नाही याची ग्वाही मिळाली
जणू त्यातून.
मला कंटाळा आला अर्ध्या तासात. मग बाहेर पडलो
आम्ही.
एकदा अनुभव घेतला. दुस-यांदा नाही घेतला तरी चालेल.
‘मोठा बाजार’ आपल्या
कामाचा नाही हे कळायला एक भेट पुरेशी होती माझ्यासाठी.
:)
ReplyDelete