ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Tuesday, January 21, 2014

१८६. नजर

त्या सकाळी एक एसएमएस आला. “आज विशेषांक पोस्ट करायचं काम आहे. काम जास्त आहे म्हणून जास्त लोकांच्या मदतीची गरज आहे. तुम्ही येऊ शकाल का?”

निरोप एका संघटनेच्या कार्यकर्त्याचा होता.

अनायासे रविवार होता. मला दुपारी थोडा वेळ मोकळा होता. तीनेक तास या कामासाठी देणं मला सहज शक्य होतं. म्हणून मी गेले. अगदी नेमकी दोन वाजता. अपेक्षेप्रमाणे अजून कुणी आलेलं नव्हतं. पण पाच-दहा मिनिटांत इतर लोक यायला सुरुवात झाली आणि अडीचच्या सुमारास आमचं काम जोमाने सुरु झालं होतं. 

काम तसं सोपं होतं. एक पाकीट घ्यायचं, त्याला दोन तिकीटं लावायची. त्यासाठी दोन लोकांची टीम बनली. अशा खरं तर तीन जोड्या बनल्या. एक जोडी तिकीट लावलेल्या पाकिटात अंक घालून पाकीट नीट बंद करायला लागली. पाचव्या जोडीने बंद पाकिटांवर पत्ते चिकटवायला सुरुवात केली. आणि सहाव्या जोडीने त्या अंकांचे पोस्टात पाठवण्याजोगे गठ्ठे बांधायला सुरुवात केली.

त्या बाराजणांमध्ये मीच नवीन होते. बाकी सगळे अनुभवी, नेहमी हे काम करणारे. त्यामुळे अगदी दोन मिनिटांत कसलाही गोंधळ न होता शिस्तशीर काम सुरु झालं. एकदा ते मार्गी लागल्यावर लोक मग आपापसात गप्पा मारायला लागले. काम मुख्यत्वे ‘हाताचं’ होतं; ‘डोक्याचं’ नव्हतं त्यामुळे ‘सिनेमा’पासून ‘आप’पर्यंत; ‘फेसबुक’पासून ‘लता मंगेशकर’पर्यंत ...कोणताही विषय वर्ज्य नव्हता. मधेच चहा आणि खाण्याचे पदार्थही आले. दोन-तीन चांगली गायक मंडळी होती सोबत, त्यांच्या सुस्वर गायनाचा आस्वाद घेतला.

जो अंक पाठवला जात होता त्याच्या मुखपृष्ठाविषयी लोकांचं अगदी सुरुवातीलाच आपापसात बोलणं झालं. त्याची रंगसंगती, ते तयार केलेला कलाकार, त्यावरच्या मुख्य ओळीतून जाणारा संदेश – यावर सविस्तर बोलणं झालं. या अंकाची मी ‘आजीव सदस्य’ असले तरी मी अंक ‘ऑनलाईन’ वाचते – त्यामुळे मी छापील अंकाकडे पाहिलं नाही. शिवाय माझ्या कामातला ८०% वेळ तिकीटं लावण्यात गेला, आणि फक्त थोडा वेळ मी अंक पाकिटात घालण्याचं काम केलं. शेवटी काम संपवायची घाई असल्याने (मी तीन तास थांबणार होते, ती प्रत्यक्षात साडेचार तास थांबले होते – त्यामुळे मला निघायची घाई होती) मी अंक पहिलाच नाही.

“एक अंक घेऊन जा आणि पाहून सांगा कसा झालाय तो” असं संपादकीय काम करणा-या व्यक्तींनी दोन-तीन वेळा म्हटल्याने मग निघताना एक अंक मी सोबत घेतला. पुन्हा एकदा चहापान झालं, ‘पुन्हा भेटूयात’ असं एकमेकांना-एकमेकींना म्हणून झालं आणि मी तिथून (एकदाची) निघाले.

घरी आले. इतर कामं झाली. दुस-या दिवसाची तयारी करताना हा अंक पिशवीतून काढून टेबलावर ठेवला. सहज म्हणून मी त्यावर नजर टाकली आणि मी चमकले.

कारण अंकावर ‘जानेवारी-फेब्रुवारी विशेषांक २०१४’ ऐवजी ‘जानेवारी-फेब्रुवारी विशेषांक २१०४’ असं छापलं होतं.

माझी पहिली प्रतिक्रिया ‘माझी नजर मला धोका देतेय’ अशी होती. तिथं इतक्या लोकांनी हा अंक पाहिला होता की त्यांना हे दिसलं नसेल असं शक्यच नाही. म्हणजे माझीच नजर मला धोका देतेय. बरं ती सगळी जाणकार मंडळी आहेत – त्यामुळे इतकी ठळक चूक त्यांच्या नजरेतून निसटेल हे अशक्य आहे. त्यांनी मुखपृष्ठावर चर्चा केली होती माझ्यासमोरच; त्यामुळे ‘हे पाहायचं राहून गेलंय’ हेही शक्य नव्हतं.

मनाची कशी पळवाट शोधायची घाई असते बघा. वरचं सगळा तर्क खरा असला तरी माझ्या समोरच्या अंकावर ‘२१०४’ दिसत होतंच मला – मग माझ्या मनात असा विचार आला की ‘एवढ्या एकाच प्रतीवर चुकीने तसं छापलं गेलं असेल, बाकी प्रतींवर बरोबर २०१४ असेल’. माझा हा विचार हास्यास्पद होता. कारण प्रत्येक मुखपृष्ठ काही हाताने तयार करत नाहीत – सगळी एकदम छापली असणार; त्यामुळे एका प्रतीवर जी चूक आहे ती सगळ्या प्रतींवर असणार.

मी थोडी संकटात सापडले. आम्ही तिथून निघताना ‘काम लवकर संपल्याचा आनंद’ संयोजकांनी व्यक्त केला होता. अंक उद्या पोस्टात टाकायचे आहेत. आता ही चूक कळवली तर त्यांना सगळे अंक पाकिटातून पुन्हा बाहेर काढावे लागणार, त्यावर नवीन स्टीकर लावून पुन्हा अंक भरावे लागणार - म्हणजे त्यांची आजची रात्र बरबाद होणार.

हा अंक मी तिथे पाच तास होते तेव्हाच का नाही पहिला, अशी हळहळ वाटत राहिली. तेव्हा अनेक लोक होते, काम वाटून घेता आलं असतं, दुरुस्ती लगेच झाली असती. आता मी उशीरा अंक पहिल्याने आधीचे पुष्कळसे श्रम वायाच गेले म्हणायचे.

एक शक्यता अशीही आहे की, ही चूक लक्षात येउनही त्यांनी ‘ती दुरुस्त करायची नाही’ असं ठरवलं असेल तर? मी कोण त्यांना काही सांगणारी?

पण त्या गटाला मी जेवढी ओळखते, त्यावरून चूक अशी दडपून टाकण्याचा मार्ग ते स्वीकारतील असं वाटत नाही. त्यांना अधिक काम करावं लागेल, पण ते करतील. त्यांच्या नजरेतून सुटलेली एखादी महत्त्वाची गोष्ट मी सांगितली नाही तर ते योग्य ठरणार नाही.

मग मी ठरवलं – मुखपृष्ठावर चुकीचा मजकूर छापला गेला आहे हे सांगण्याचं आपलं काम आपण करावं; त्यावर काय निर्णय घ्यायचा ते संबधित लोक ठरवतीलच. त्यांनी निर्णय काय घ्यावा याबाबत आपल्या इच्छेचा काही प्रश्न उद्भवत नाही! पण आपण काय करावं हे मात्र आपण ‘इतर काय करतील/म्हणतील’ यावर अवलंबून ठेऊ नये.

घेतला फोन आणि केला एसएमएस. त्यावर उत्तर आलं एका शब्दाचं – त्यावरून मला निर्णयाचा अर्थबोध काही झाला नाही. पण निर्णयाचा विचार मी करण्याचं कारण नव्हतं – हे मी स्वत:ला आधीच सांगितलं होतं.

दुस-या दिवशी सकाळी फोन आला तेव्हा कळलं की चूक दुरुस्त करण्याचं काम काल रात्रीच हाती घेतलंय टीमने. ते ऐकून मला आनंद झाला.

मुख्य मुद्दा तो नाही.

मुख्य मुद्दा आहे की: जे इतर दहा लोकांना दिसलं नाही, ते मलाच का दिसलं?
का दिसतं नेहमीच?

अशी ‘नजर’ असली की जबाबदारी वाढते. 

असली कसली नजर लाभली आहे मला?

20 comments:

  1. :) Spider-man chitrapatatla to famous dialogue athavla..."With great power comes...." :)

    ReplyDelete
  2. सॉफ्टवेअरमधला नियम ... आपण लिहिलेल्यातल्या चुका आपल्याला सापडत नाहीत, त्यामुळे टेस्टिंग नेहेमी दुसर्‍यानेच करावं. आपली त्यात इतकी गुंतवणूक असते, की तटास्थपणे, तिर्‍हाईताच्या अनोळाखी नजरेने आपण बघूच शकत नाही! तसं असेल कदाचित. :)

    ReplyDelete
    Replies
    1. हो, मान्य. गुंतवणूक असली की जे अगदी ‘स्वाभाविक’ तेही दिसत नाही.
      (हे वाक्य लिहिताना मला आंधळे ‘आप’ समर्थक का बरं आठवले?) :-)

      Delete
  3. तुमच्या ’नजरेचं’ कौतुक आहेच पण ती चुक दुरुस्त केली गेली हे ’चलता है’ च्या जमान्यात मोलाचं वाटलं मला.

    ReplyDelete
    Replies
    1. ‘चलता है’ असं मानणारे सगळेच नसतात – म्हणून ही ‘नजर’ वापरात राहते.
      चूक लक्षात आल्यावर ती दुरुस्त करण्यासाठी कष्ट घेणा-या त्या टीमचं मलाही कौतुक वाटलं.

      Delete
  4. छान. तुमचं आणि टीमचं कौतूक. तुम्ही कोणत्या संस्थेसाठी काम करता याच औत्सुक्य आहे. तुमचे लेख छान असतात. मला तुमच्या बरोबर काम करायला आवडेल तुमच्या संस्थेसाठी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा.

    ReplyDelete
    Replies
    1. आभार. मी नेहमी चांगल्या संस्था-संघटनांच्या शोधात असते त्यामुळे एकापेक्षा जास्त संस्था-संघटनांबरोबर जमेल तसं काम करत असते. तुम्ही कोणत्या शहरात आहात ते मला ईमेलद्वारे कळवा. त्या शहरात माझ्या माहितीत असलेल्या संस्था-संघटना तुम्हाला जरूर कळवेन.

      Delete
  5. नजर : पाच संवेदनातील एक. पाहणे, बघणे, निरखणे (see, look, watch etc) इ. पाहण्याची तीव्रता दाखवतात. निरीक्षण करण्याला पाचही इंद्रिये मदत करतात. जेवढी निरीक्षणाची तीव्रता अधिक त्याने बद्धि (intellect) प्रज्ञा (intelligence) बोधना (perception) अन त्यामुळे अंतर्ज्ञान (intuition) पण प्रगल्भ होते. हे सवयीवर अवलंबून असते. सवितादी, आपण एक प्रवासी पण आहात. त्यामुळे तुमचे निरीक्षण तल्लख आहे यात शंकाच नाही. 'दख्खनची राणी' यात 'मुंबई - पुण्यात एकच बोगदा' असा एक उल्लेख आहे त्याची आठवण झाली.

    ReplyDelete
    Replies
    1. हो, हे ‘सवयी’वर अवलंबून असते हे एकदम मान्य!
      बाकी शेवटचं वाक्य – ‘मुंबई-पुण्यात एकच बोगदा आहे’ – कळलं नाही.

      Delete
    2. 'दख्खनराणी', वसंत बापटांची (?) कविता शाळेच्या पाठ्यपुस्तकात वाचली होती. तिचे प्रवासी काय करतात याचे वर्णन यात आहे. ते रोजच जा-ये करतात. मुलांना मात्र चौफेर उत्सुकता असते. मुंबई-पुणे मार्गावर बारातेरा बोगदे असले तरी मोठ्यांचे वागणे जसे काही वाटभर एकच बोगदा आहे असे असते. 'एकच बोगदा मुंबई पुण्यात' हे एकच वाक्य माझ्या कायमचे लक्षात राहिले.

      Delete
    3. धन्यवाद. ही कविता माहिती असेल (पाठ्यक्रमात होती म्हणून), पण आठवत नाही; आता ही कविता मिळवून वाचायलाच हवी.

      Delete
  6. त्या सगळ्या मंडळींनी एका रात्रीत चूक सुधारली हे फारच कौतुकास्पद आहे. :)
    मात्र चूकही होती तशी मोठीच. ढकलून देण्यासारखी नव्हतीच.

    ReplyDelete
    Replies
    1. हो, चूक इतकी ठळक होती की ती लपली नसती. पण ती इतर लोकांना दिसली नाही, तशी इतरांच्याही नजरेतून निसटण्याची एक शक्यता होती म्हणा – कदाचित धूसर शक्यता :-)

      Delete
  7. gauri cha softwercha niyam aavadla.tu chook disali va tu nidarsanat anlis va ti sudharli geli he kautukaspad ahe. nutan

    ReplyDelete
    Replies
    1. चूक दिसली यात कौतुक नाही, ती सुधारली गेली यात मात्र नक्की आहे.

      Delete
  8. बरेचवेळा आपल्या डोळ्यांना आपणच लिहिलेले बरोबरच आहे असे वाचायची सवय लागलेली असते कारण मनात ते मुळात बरोबर असते. जसे अनेक लोकं ३६ च्या ऐवजी ६३ लिहितात. आणि वाचताना चक्क ३६ चं वाचतात. इतकी सवय.. :)

    दाखवलेली चूक सुधारली गेली हे महत्वाचे. :) :)

    ReplyDelete
    Replies
    1. सवयीने आपण अनेक गोष्टी गृहित धरतो - हा प्रसंग त्यापैकीच एक.
      बाकी, ते 'उघडझाप' काय आहे? तोच प्रतिसाद आहे म्हणून तो काढून टाकतेय :-)

      Delete